बालि सहल - भाग २ - बेनोआ

Submitted by दिनेश. on 1 February, 2014 - 17:17

माझे यावेळचे प्लानिंग शेवटच्या दिवसात झाल्याने मला विमानाच्या तिकिटाचे आकर्षक डील मिळाले नाही.
बालि ( देनपसार ) ला जायला सिंगापूर एअरलाइन्स शिवाय एअर एशिआ, जेटस्टार ( या दोन्ही लो कॉस्ट आहेत ) चा पण पर्याय आहे, त्यांच्यावर आकर्षक डील मिळू शकेल. मलेशियन, कोरीयन, कातार वर पण कधी कधी चांगले डील मिळू शकते. पण त्यासाठी तारखा खुप आधीपासून ठरवायला हव्यात.

हॉटेलचेही तसेच. आम्ही निवडलेले नोव्होटेल आम्हाला ८० डॉलर्स पी पी पडले. पण त्यापेक्षा बजेटमधे ( आणि अर्थातच जास्त दरातही ) हॉटेल उपलब्ध आहेत. मी आजवर भारत आणि इतर अनेक देशांतल्या दिडशेच्यावर हॉटेल्स मधे वास्तव्य केले आहे. तरीपण हे हॉटेल मला आजवर अनुभवलेल्या हॉटेल्सपेक्षा सर्वात जास्त आवडले. सेवा उत्तम होतीच शिवाय हॉटेलच्या आतमधला आणि बाहेरचाही परीसर खुप रम्य होता. तर चला
आज तिथली सैर करू.

( बालिचे ९०० च्या वर फोटो आहेत. त्यातले निवडक इथे देताना विषयानुरुप न देता, जसे काढले त्या क्रमाने देतोय.. )

तर हे हॉटेल आहे बेनोआ भागात. दोन्ही बाजूला समुद्र असणारा हा भाग आहे. अर्थातच इथे याच रस्त्यावर अनेक हॉटेल्स आहेत. टोकाला एक गावही आहे. मधोमध रहदारीचा रस्ता आहे.
आमचे हॉटेल रस्त्याच्या दोन्ही बाजूला होते. त्यामूळे रस्ता सारखा ओलांडावा लागायचा. पण त्यासाठी हॉटेलने
एक खास सेवक ठेवला होता. आणि गावातले लोकही विना तक्रार थांबत असत. ( रस्त्यावर तिथे कुठेही स्पीड ब्रेकर दिसला नाही. )

१) रमेशभैयांनी मला बालितल्या कलाकृतींबद्दल सांगितल्यावर मी मनाशी ठरवले होते कि आपण मनसोक्त बघून घेऊ. खरेदी वगैरे करायची नाही. कारण मी पुर्वी मस्कतला असताना अनेक वस्तू जमवल्या होत्या.
पुढे त्यांची देखभाल माझ्याच्याने झाली नाही आणि त्या वस्तू तश्याच पॅकबंद कपाटात राहिल्या. पण
बालित माझा हा निश्चय टिकला नाही. तिथे रस्तोरस्ती अशा सुंदर कोरीव मूर्ती दिसत राहतात.

२) हि आमची रुम

३) हा सज्जा

४) सज्ज्यातून दिसणारे दृष्य

५) ही दुसरी बाजू

६) हॉटेलच्या कॉरीडॉर मधे रोज ताजी निशीगंधाची फुले ठेवलेली असत, त्यामूळे मंद सुगंध सगळीकडे येत असे. शिवाय जागोजाग अशी देखणी ऑर्किडस पण होती.

७) बाहेरच्या बाजूला पण सुंदर बाग होती

८) कुठल्याही नव्या ठिकाणी गेल्यावर मी स्थानिक पेये ( अर्थात नॉन अल्कोहोलिक ) आवर्जून पितो. जरा
मान तिरकी करून हे नाव वाचा बरं.

९) हॉटेलचा खाजगी बीचही होता. तो भराव घालून उथळ केला होता. सुरक्षित भागाच्या बाहेर तो खुप खोल
होता आणि त्यात तूफान लाटा येत. डाव्या बाजूला एक निद्रिस्त ज्वालामुखी पण दिसतोय.

१०) हॉटेलमधलीच एक रूम

११) रुम सुंदर असली तरी मला तो रस्ता खुणावत होता. फ्रेश होऊन आम्ही भटकायला बाहेर पडलो. तिथेच
एक देऊळ पण होते. त्याच्या बाहेरची एक मूर्ती

१२ ) त्या स्तंभावरचे शिखर. त्यातला कलश मुद्दाम पहा.

१३ ) तिथलीच आणखी एक मूर्ती

१४ ) हा दगड म्हणजे लाव्हा स्टोन. तो कोरायला सोपा वगैरे नसतो पण त्यातले सुंदर कोरीव काम बालित
ठायी ठायी दिसते. विजयने सांगितल्याप्रमाणे हि कला कुटुंबात जपली जातेच शिवाय सरकारी शिक्षणसंस्थाही आहेत. मला आवडलेली एक कृती.

१५ ) ते देऊळ बंदच होते. पण गेटही सुंदर होते.

१६ ) गेटमधून आत कॅमेरा सरकावून घेतलेला फोटो. स्वच्छता तर बघा. कचरा म्हणाल तर केवळ दोनचार
चाफ्याच्या फुलांचा. नीट बघितलेत तर मूर्तींना काळा पांढर्‍या चौकटीच्या कापडाचे सरोंग नेसवलेले दिसेल.

१७ ) बाहेरचा नामफलक

१८ ) त्यावरचे बालि लिपीतले लेखन

१९ ) त्यावरचीच सुबक नक्षी

२०) एका हॉटेलच्या प्रवेशद्वारावरची देखणी कलाकृती

२१ ) आणखी एका हॉटेलचे प्रवेशद्वार

२२ ) आणखी एक

२३ ) दुसर्‍या एका हॉटेलचे आवार

२४ ) एका वॉटर स्पोर्ट्स सेंटरचे प्रवेशद्वार

२५) त्याच देवळाच्या समोरच्या बाजूने घेतलेला फोटो. वाहत्या रस्त्यावरची अशी स्वच्छता आपल्या देशात कधी दिसणार ?

२६) पहिल्या रात्री आम्हाला हॉटेलतर्फे कॉम्प्लिमेंटरी डिनर होते. त्यानंतर बीचवर फायर डान्स होता.
तो डान्स म्हणजे अक्षरशः आगीशी खेळ होता. त्या मुलांच्या हातात ओळंब्याप्रमाणे मशाली होत्या आणि त्या
अखंडपणे गरगर फिरवत ते नाचत होते. मधेच त्या दोन मशाली एकमेकांत गुंतवत पण असत.
नजर ठरत नव्हती. अंधारात फोटो चांगले आले नाहीत. पण निदान कल्पना तरी यावी

२७) आणखी एक पोझ

२८ ) आपल्यालाच गरगरायला होतेय, हो ना ?

२९ ) नंतर काही मुलीदेखील सहभागी झाल्या

३०) सतत १० मिनिटे असे नृत्य चाललेले होते. सोबत तालवाद्यांचा गजर होताच. ( लक्षात घ्या नर्तकांच्या
पायाखाली वाळू आहे. त्यात पाय रोवून असे नृत्य सादर करणे म्हणजे सोपे काम नक्कीच नाही. )

३१ ) हॉटेलमधेही ठिकठिकाणी अशी सरोवरातील लिलीची फुले जोपासलेली होती.

३२) दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करताना समोर असे कोरल ट्री दिसले. त्या फ्रेममधे काही पक्षीही आलेत्त.

३३ ) हे कोरल ट्री आपल्याकडे फारसे दिसत नाही.

३४ ) हा दुसरा पक्षी

३५ ) नाजूक दिसणार्‍या या फुलांच्या पाकळ्या हाताला मात्र चांगल्याच कडक लागत होत्या.

३६ ) माझा मलाच आवडलेला एक फोटो

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! ड्रिन्क चं नाव नाही वाचता आलं (मान वाकडी केली तरी) पिस्तोल तेवढं कळ्लं.
मूर्ति सुंदर ! रात्रीचे फायरडान्सचे ही फोटो मस्त!

ड्रिन्क चं नाव नाही वाचता आलं (मान वाकडी केली तरी) पिस्तोल तेवढं कळ्लं >>>>>> +११११

बाकि फोटो आणि महिति, दोन्हि छान Happy

liang teh : हर्बल टी
सुरेख फोटो आहेत
हॉटेल किती स्वच्छ ठेवले आहे... शिवाय ग्रीनरी तर मस्तच आहेत,
दगडी कोरीव काम ही सुंदरच आहे.
फोटो नेहमीप्रमाणे छानच आहेत.

सुंदर फोटोज!! दा, तिकडेही शंकासूर आहेच! :स्मित:, आणि आपल्याकडचा पांगारा जरा वेगळ्या रुपात कोरल ट्री म्हणून आलाय का? केळफुलाचा फोटो फार सुंदर आलाय. आणि तो दुसर्‍या फोटोतला होल्यासारखा दिसणारा पक्षी कोणता आहे?
मूर्ती किती सुघड आहेत नै! आणि कोरीवकामही आपल्याकडच्या कोरीव कामाइतकेच सुंदर आहे, फक्त ते जास्त चांगल्या प्रकारे मेंटेन केलेय. त्यात अर्थात मूर्तीही आल्याच! आपल्याकडे भग्न-छिन्न अवस्थेतल्या मूर्ती खूप केविलवाण्या दिसतात (याला काही ठिकाणं अपवाद आहेत नाही असं नाही).
हिरवाई सुद्धा अगदी मनोवेधक आहे.
घरबसल्या बालीची सहल होतेय तुमच्यामुळे. Happy

खूप सुंदर आलेत फोटोज.. Happy

पिस्तौल छाप आईस्ड चहा.. Proud

होटेल सो सो टिप्पिकली बालीनीज....

रामायणावर आधारित बालीनीज बॅले डांस ही पाहिला असशीलच!!!!

वरील सर्व प्रतिसादांना अनुमोदन !
पुढील भागांची उत्कंठा !
मीही बालीस गेलेलो पण आपले वर्णन वाचून वाटले कि "कम्बख्त , मैने कुछ देखाही नही"
क्यामेरा कोणता आहे ?

आभार दोस्तांनो..
रॉबीन, ५ दिवसांच्या सहलीसाठी माणशी १ ते सव्वा लाख रुपये खर्च येईल. यात विमानभाडे, हॉटेल स्टे आणि थोडेफार साईट सिईंग येईल. शॉपिंगसाठी वेगळे बजेट ठेवावे लागेल. ( मला तिथे एक नवीन बॅग घ्यावी लागली Happy ) अरेंज्ड टूअर यापेक्षा स्वस्त असेल. कारण त्यात ग्रुप बुकिंगचे फायदे मिळतील.

वर्षू, महाभारतावर एक नाच बघितला. पुढे फोटो येतीलच. तिथले पदार्थ चाखायच्या बाबतीत मात्र मी बिनकामाचा. केदारने बरेच खाल्ले ( पण तो स्वतः स्टार शेफ आहे. ) नाही म्हणायला बरेच मसाले आणलेत.
त्यात योग्य त्या रिप्लेसमेंट करून ( चिकनच्या जागी बटाटे वगैरे ) पदार्थ करेन आणि मग सांगेन.

डॉक्टर... कुठेही गेलो तरी मी असाच भटकतो. पण तरीही माझेही बरेच बघायचे राहिले.

त्या मूर्तींचे अनेक फोटो येतील पुढे. लाकडातलेही अप्रतिम कोरीव काम प्रत्यक्ष करताना बघितले. ते पण ओघात येईलच. त्या त्या फोटोसोबत वर्णन लिहीनच.

शांकली ते झाड म्हणजे Cockspur Coral Tree ( Erithrina crista-galli ) म्हणजे पांगार्‍याचेच कूळ. पण झाड खुपच देखणे, ( पुण्यात पोचा सीड्स, सोलापूर रोड वर आहे असे वाचले. ) मूर्ती घडवणारे कलाकार अजूनही आहेत त्यामूळे त्यांची दुरुस्ती सहज शक्य असेल. शिवाय ते कोरीव काम एकसंध नाही, त्यातले
जोडकाम सहज लक्षात येत नाही, ते सोडा. पण बी ने जसे लिहिले होते तसे ते सर्वच कलाकार आहेत.
त्याबद्दलही लिहितोच.

जिप्स्या, पक्ष्यांचे फोटो सहज निघाले ( फुलाचे फोटो काढताना, ) नाहीतर पक्ष्यांचे फोटो काढणे मला जमत
नाही. ( तेथे मार्को पोलो, कांदेपोहे, इंद्रा नाहीतर तू हवेत, )

अप्रतिम. आम्हालापण सहल घडवल्याबद्द्ल धन्यवाद. नेहेमीप्रमाणे पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

दिनेशदा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. बालीमधील नृत्यावर एक वेगळा लेख होईल इतके नृत्य आहेत तिथे. केचक नृत्य सर्वात सुंदर. पुर्वी समईच्या प्रकाशात व्हायचे हे नृत्य. पुलंनी खूप सुंदर वर्णन रेखाटले आहे ह्या नृत्याचे.

बालीत जागोजागी छोट्याशा सुपात हिरव्या चाफ्याची फुले ठेवतात. अगदी बाथरुममधेही असतात ही फुले. त्यामुळे वातावरणात एक नैसर्गिक गोडवा भरुन राहतो.

जास्वंदाची झाडे, पांगिर्‍याची झाडे आणि कचनारची झाडे खूप आहेत. देनपासार विमानटळासमोरच कचनारच्या ओळी रस्त्याच्या दुतर्फा दिसतात. त्यावेळी जर फुले असतील झाडाला तर तो परिसर तरल आनंद देतो.

बालिमधे उबुद म्हणून एक शहर आहे. तिथे बातूबुलान म्हणून एक बोळ आहे. तिथे आपल्या गणेशाच्या, शंकराच्या मुर्त्या विकत मिळतात. आणि त्या मुर्त्या ज्लावामुखी दगडापासूनच बनवलेल्या असतात. तसेच महोगामी लाकडापासून बनवलेले हत्त्ती, त्यांची राईस गॉड वगैरे अप्रतिम असतात त्या वस्तू. बुद्धाचे अनेक मुखवटे मिळतात. बाटिक सुद्धा मिळते. पण बाटिक योग्यकर्त्याला आणखी छान मिळते. बालिला गेलात तर योग्यकर्त्याला अवश्य जायलाच हवे. कारण परत परत खर्च होत नाही असा.

रॉबीन, तुम्हाला जर माहिती हवी असेल बालिची तर विनासंकोच विचारा. हे बघा, एक तर विमानाची तिकिट स्वस्त काढायचे. सिंगापूर ऐअरलाईन्स खूप महागडे पडेल. बालिमधे कुठेही अमेरिकन डॉलर्समधेच तुम्हाला खर्च करावा लागतो. बालि खूप स्वस्त नाही पण योग्य तो अभ्यास करुन गेलात तर खर्च कमी करता येऊ शकतो.

वाह, दिनेशदा - काय सुंदर फोटो टिपलेत ......

देवळांची ती सुंदर शिल्पकला, ती फुले, पक्षी, परीसर --- सगळेच देखणे...... आणि "प्रत्यक्षाहूनि प्रतिमा सुंदर" ....
क्या बात है ....

सुंदर फोटो.. घरबसल्या सफर घडतेय आम्हाला. ९०० फोटो म्हणजे भरपुरच झाले.. पुरवुन पुरवुन टाका इथे Happy

सुंदर फोटो..............

हिरवाई सुद्धा अगदी मनोवेधक आहे.
घरबसल्या बालीची सहल होतेय तुमच्यामुळे. >>>++१११११

रॉबीन, सिंगापूर एअरलाइन्स ची तिकिटे रिफंडेबल नसतात, हे पण लक्षात असू दे !
बी, त्या लाकडाच्या मूर्तींनीच तर मला मोहात पाडले ना !