जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट

Submitted by सुज्ञ माणुस on 29 January, 2014 - 00:19

जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट

जीवधन आणि नाणेघाट यांचा इतिहास आणि माहिती सर्वश्रुत आहेच. यावर बरेच धागे आधीच उपस्थित असल्याने अजून एकाची भर न टाकता फक्त माझा अनुभव मांडतो.
कोणाला इंटरेस्ट असेल तर इतिहास, जायचे कसे वैगरे आणि आधीचे लेख या ब्लॉग लिंक वर वाचू शकता.

कुकडेश्वर मंदिरापासून ST पकडून रात्री घाटघरला उतरलो आणि काळोखात चालत निघालो. हळूहळू ST च्या यंत्रांचा आवाज आणी प्रकाश अंधारात विरळ -विरळ होत गेला.रात्री अंधारात बस मधून उतरलेले गावकरी आणि सगळ्यात पुढे सरपंच पोपटराव. त्यांच्या मागून चालत आम्ही डायरेक्ट त्यांच्या घरी.
आमचे जेवण झाले होते पण त्यांचे व्हायचे होते. आम्ही त्यांच्या अंगणात आमची पथारी मांडली. त्यांनी जेवायचा आणि आत खोलीत झोपायचा फार आग्रह केला. पण आम्ही नाही गेलो. आता शरीर इतके दमले होते की कुठेही झोप आली असती.
शेणाने सारवलेल्या अंगणात एक सोलर दिवा लावलेला होता. बाकी गर्द अंधार आणि फुल टू थंडी. फार मजा आली.

सकाळी सकाळी जाग आली ती गावातील बायकांच्या पाण्याच्या गडबडीने. प्रत्येक घरातून बायका आणि पोर -टोर डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणायला जात होती. आम्ही आवरून पाणी भरायला त्यांच्या बरोबर गेलो.
तळ्यावर पोहोचलो तेवढ्यात सूर्य नारायण ही नुकतेच ड्यूटी वर आले होते.
.
पाणी भरून जरा फ्रेश झालो.
.
आता खरी चढाई सुरू झाली. यावेळी खायचे कमी घेतले होते आणि पाणी जास्त होते. गावात कुठेही खायचे मिळेल असा समज करून खायचे सामान आम्ही आधीच खाल्ले होते. आता फक्त एक चिवडा पाकीट आणि कालच्या डब्यातल्या उरलेल्या पोळ्या शिल्लक होत्या.
सकाळी आम्ही निघालो तेव्हा ज्यांच्या घरापाशी आम्ही राहिलो ते नुकतेच उठले होते. त्यामुळे त्यांना काही मागावे आणि पैसे देतो म्हणावे योग्य वाटले नाही. म्हणून सकाळी चहा हि न पिता चढाई चालू झाली.पहिल्या तासाभरातच कळले की आता वाट लागणार आहे. खायला काही नाही, पोटात काही नाही आणि एवढा डेंजर किल्ला. ओह्ह!
या पठारावरून समोरच 'नवरा ( मोठा पहिला त्रिकोणी डोंगर) , नवरी (त्या पुढचे डोंगर) आणि भटोबा सुळके दिसत होते.
.
खायचे वांदे आणि यात अजून भरीस भर की रस्ता हि माहीत नव्हता. घाटघर पासून चढून आम्ही दुसऱ्या वाटेने उतरून नाणेघाटात जाणार होतो. गावातून पुढे एक पठार लागते तेथून वरती बघितल्यास किल्ल्याचा थोडा भाग पोखरल्यासारखा वाटतो तेथून वाट आहे. आम्ही पठारावरून एका वाटेने वर चढून गेलो. वर गेल्यावर काही वाटच मिळेना. सगळे मोठे कडेच लागले. मग तेथून खाली उतरून परत पठारावर आलो. मग दुसरी पायवाट पकडून परत तेवढेच वरती गेलो तर तिथे फारच घनदाट कारवीचे जंगल लागले. झाडे तोडत, मार्ग काढत कसेतरी वर पोहोचलो तर तिथेही रस्ता नाही. परत खाली पठारावर.
असे वर -खाली करत तब्बल सात वेळा रस्ता चुकून झाल्यानंतर मात्र आमचा स्टामिना संपला. मग ठरवले की इथून परत मागे घाटघर गावात जाऊ आणि तिथून नाणेघाटला जाऊ. काही नको जीवधन.
असे म्हणून मी परत निघालो. परतताना हि वाट असावी, इथून तिथे जात असावी अशी चर्चा चालूच होती.

एका झाडे तोडल्याच्या आवाजाने थांबलो तर एक गावकरी दिसला. त्याला सांगितल्यावर त्याने परत आम्हाला वाट समजावली आणि आम्ही आता शेवटचा चान्स म्हणून परत किल्ल्यावर चढाई केली. आठ वेळा कारवीतून मारामारी करून जाऊन हात पायावर ओरखडे उठले होते. चेहरा घामेघूम आणि पोट रिकामे. अश्या अवस्थेत "काही झाले तरी आता जायचेच" असा विचार केला आणि परत सुटलो. कॅमेरे केव्हाच ठेवून दिले होते.
पुन्हा अर्धा तास अंदाजे चढून गेलो तर समोर एक गुहा दिसली. आता खात्री पटली की तब्बल ४ तासाने का होईना आपण बरोबर मार्गाला आहोत.
.
कोलंबसाला जहाजावर किनाऱ्यावरचे पक्षी बसलेले पाहून आनंद झाला असेल तसा आनंद आम्हाला झाला. आता कॅमेरे बाहेर आले. मस्त गार वारा वाहत होता.
या दगडात खोदलेल्या पायऱ्या इंग्रजांनी तोफगोळे मारून तोडून टाकल्या. आता फारच गुळगुळीत आहेत. पण चढून जाण्या इतपत आहेत. पावसाळ्यात मात्र ह्या डेंजर असतील.
.
त्यानंतर पुढचे संकट म्हणजे १५ फुटी रॉक पॅच. दोरी वैगरे काही प्रकार नसल्याने आम्हाला फार अवघड झाले. शेवटी सगळे सामान खाली ठेवून भूषण वर गेला. मग माझ्याकडे असलेली एकमेव नॉयलोनची दोरीला आम्ही दगड बांधला आणि वर फेकला. तो दगड पकडण्याचे ७-८ प्रयत्न झाल्यावर शेवटी दोरी त्याच्याकडे पोहोचली. मग सॅक, कॅमेरे बांधून दोरीने वर पाठवले. आणि मग शेवटी मी वर चढलो.
.
नुसते चढायला थोडे अवघड आहे. पण सामान घेऊन चढताना पाठीवर वजन असल्याने उलटा झोक जायची शक्यता आहे. तेथे बोल्ट पण मारलेले आहेत. रोप लावता येत असेल तर मग सोपे आहे.
या पायऱ्या चढून आल्यावर लगेचच एक उद्ध्वस्त दरवाजा लागतो. तेथून डावीकडे पाण्याचे टाकी आहेत. हे पाणी पिण्यायोग्य नाही. दुसऱ्या रस्त्यावरून उतरताना लागणारे टाकीतले पाणी बरे आहे.
.
येथून किल्ला सुरू होतो. सुरवातीलाच २ बुरूज दिसतात.
.
येथून अजून सुमारे अर्धा तास चालून गेल्यावर हे धान्य कोठार लागले. एवढ्या वरती येऊन कोण धान्य साठवण करत असावा?
.
आता सकाळपासून पोटात काहीच नसल्याने खूप दम तर लागलाच पण पुढे चालणेही अशक्य झाले. चिवडा वैगरे थोडा खाल्ला पण त्याने अजून त्रास व्हायला लागला. आता पोटात काहीतरी ढकलणे गरजेचे होते. शेवटी असह्य झाल्यावर कालचा उरलेला डबा उघडला. काल पहाटे केलेल्या पोळ्या शिळ्या झाल्याने अशक्य वास येत होता. भाजी तर नव्हतीच मग नाईलाजाने एक एक पोळीचा तुकडा आणि घोटभर पाणी पिऊन वेळ काढली. कालची शिळी पोळी खाऊन अजून त्रास होईल म्हणून पाणी जास्त पिले. थोडा गार वारा पिऊन परत निघालो.
झेंडा दिसल्यावर तेथून चढून किल्ल्याच्या पश्चिम बाजूस गेलो.समोर बघतो तर काय ? कमाल ! नानाचा अंगठ्याचे विहंगम दर्शन घडले. निसर्ग कोणाचा कसा हिशोब लावेल काही लिमिटच नाहीये राव ! काय दिसत होता तो. असे रौद्र रूप पाहिले की सह्याद्री पार वेड लावतो.
.
येथून उतरायला चालू केले. पोटात काही नसल्याने फार काही फिरण्यात इंटरेस्ट नव्हता. पण जे काही पुढात येत होते खरंच भारी होते.हा पश्चिम महा-दरवाजा. अखंड कातळात बेमालूमपणे उभा ठाकलेला. एकावेळी एक घोडा येऊ शकेल एवढीच त्या कातळानंमध्ये जागा होती. त्याची उंची तर बघा. वाह ! मान गये उस्ताद !शत्रू अगदी येथपर्यंत चढून आला तरी त्याला येथे पोहोचेपर्यंत दरवाज्याचा अंदाज येणार नाही. या उपर वरतीही बुरूज बांधले आहेत. घोरपड आणा वा कोरफड आणा, येथे चढाई करणे अशक्यच. याची स्थापत्यकला करणारा माणूस कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेऊन आला असावा?
.
जुन्नर मधल्या जवळपास सर्व किल्ल्यांची अशीच स्थापत्यकला दिसते. शिलाहार राजांनी हे किल्ले वा प्रवेशद्वारे बांधली होती. हे अर्ध गोलाकार घुमट प्रवेशद्वार अजूनही तेवढेच सुस्थितीत आहे.चार लेयर मध्ये कोरलेली नक्षी केवळ अद्भुत. त्यावर चंद्र, सूर्य आणि तोरणा कृती आकृती कोरलेली आहे.
.
पण आता येथून कसोटीची दुसरी इनिंग चालू झाली. येथेही एक १० फुटी रॉक पॅच आहे. तो उतरायला फारच अवघड वाटला मला. मला २० मिनिटे लागली तो उतरायला सगळे समान खाली फेकून दिल्यावर. तेथेच भूषण २ मिनिटात उतरला.
.
थोडे हळू उतरत, सुमारे २ तासात आम्ही उतरणीला लागलो. तेथून वर तो रॉक पॅच कहर दिसत होता. 'हॅरी पॉटर' वा 'लॉर्ड ऑफ द रिंग' पिक्चर मधला सीन वाटतो की नाही?
.
येथून उतरताना मागे पहिले तर अजून एक आश्चर्य. वानरलिंगी सुळका मस्त ऊन खात बसला होता.हे पाहून खरंच "लॉर्ड ऑफ द रिंग" मधला तो सुळक्या वरचा डोळा आठवला.
..
जसे आम्ही उतरत होतो तसे नानांचा अंगठा आम्हाला जास्तच खुणावत होता.कसला अंगावर येतोय असे वाटतेय की नाही?मुरबाड कडून जुन्नर ला येताना माळशेज मधून ST येते तेव्हा हा कडा दिसतो एका स्पॉट ला. फारच भयानक वाटतो तो त्या पुढच्या बाजूने.
.

येथून एक पठार लागले. मग फुल टू पायपीट. आता संपूर्ण जीवधन दृष्टिक्षेपात येत होता.
.
एका स्थळावर वाचले होते की जीवधन आणि नाणेघाट हाकेच्या अंतरावर आहे. 'कोणाच्या हाकेच्या' हा तपशील मात्र आम्हाला कळला नाही. बरेच अंतर होते.
आता अंगठ्याच्या एकदम समोर आलो. एखादे ग्लायडर असते तर वा काय मजा आली असती. सरळ पळत जाऊन बुंग sssssssss !
.
अर्धा तासात नाणेघाटात पोहोचलो. याचा इतिहास तर सर्वश्रुत आहेच. त्यामुळे तो सांगत बसत नाही. नाणेघाटात सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे पुरातन कालीन आणि दगडाचे जकातीचे रांजण आणि येथून होणारे दळणवळण, सातवाहन राजवंश यांची महती सांगणारे गुहेतील शिलालेख.त्या काळी हे मोठाले रांजण दिवसातून ७-८ वेळा रिकामे केले जायचे. यावरून नाणेघाटाची उपयुक्तता लक्षात येईल.
.
नाणेघाटातील गुहा. याला नुकतेच ग्रिल बसवले आहे. ऐतिहासिक गोष्टींची वाट लावण्यात आपले सरकार हुशार आहे.
.
सातवाहन राजवंश यांची महती सांगणारे गुहेतील शिलालेख.
.
नाणेघाटातील गुहेमधील ब्राह्मी लिपीत लिहिलेले सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचे शिलालेख आजही संशोधनाचाच विषय आहेत. शिलालेखात नमूद केलेल्या काही सातवाहन राजांची, त्यांच्या वंशाची आणि त्यांनी केलेल्या यज्ञांची माहिती या लिंक वर जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या लेखातून मिळेल.

हि नाणेघाटाची घळ. अखंड आणि सर्वात कठीण असे दगड फोडून तयार केलेला ऐतिहासिक राजमार्ग. हे कातळ जसे प्याटर्न मध्ये कातरले आहेत त्यावरूनच त्यांची कठिणता लक्षात येईल. पश्चिम घाट हा जसा निसर्ग सौंदर्या साठी ओळखला जातो तसेच इथल्या किल्ल्यांची अभेद्यता आणि दगडांची कठिणता यासाठीही साठी ओळखला जात.
..
पश्चिम घाटात जीवसृष्टीत हि खूप वैविध्य आढळते. जीवधन किल्ल्याच्या जंगलात रानडुकरांचा मुक्त संचार असतो. तेथील स्थानिक मंडळी मोठ्या ग्रुपने रानडुक्कर पकडायला जातात.
आम्ही उतरत असताना एक ग्रुप वरती जात होता. त्यातला एक माणूस म्हणाला की "जंगलातून सांभाळून जा, मला काहीतरी हालताना दिसले." खालून लोकांच्या आरडा ओरडा ऐकू येत होता. मग थोडी धाकधूक वाटली. वाटले की जवळपास असलेले जनावर लांब जावे म्हणून ते ग्रुप ने ओरडत होते. पण त्यांच्यापासून लांब जाऊन ते आपल्या अंगावर आले तर?
मग खाली गेल्यावर कळले की ती लोक सगळीकडे विखुरली होती आणि ओरडत ती रान-डुकराचा पाठलाग करत होते. बराच वेळ म्हणजे ४-५ तास हा प्रकार चालला होता. शेवटी त्यांनी त्याची शिकार केलीच आणि खायला गावात आणले.

एक ग्रुप रात्री गुहेत राहिला होता. ते साप पकडून त्यांचे फोटो काढून त्यांना सोडून देत होते. इथे पश्चिम घाटात सापांचेही विविध प्रकार आढळतात. त्यांनी रात्रीपासून ८ साप पकडले होते. आम्हाला तर एकही दिसला नाही.किल्ल्यावर कबुतर मी कधी पहिले नव्हते. ते इथे पाहिले.

असो.आम्ही जातो आमच्या गावा, सातवाहन कालीन ऐश्वर्याचा राम राम घ्यावा.
.
नाणेघाटात थोडी विश्रांती घेऊन मुंबईकर नाणेघाट उतरून मुरबाड वरून कल्याण ला आणि आम्ही परत मागे फिरून घाटघरला जाऊन बस पकडून जुन्नर आणि मग पुणे.

या सगळ्यात कौतुक वाटले ते MSEB वाल्याचे. कुठे कुठे जाऊन हे टॉवर बांधत असतात. नाणेघाटातून वैशाखरे गावात जाणाऱ्या वीजतारा कश्या जोडल्या असतील असा प्रश्न पडतो.का हे टॉवर हि सातवाहनानी बांधले असावेत? Happy
.
२ दिवसात मस्त भटकंती तर झालीच पण जुन्नरसारख्या, महाराष्ट्राचा शिरेटोप असणाऱ्या, सातवाहन कालीन इतिहास लाभलेल्या संपन्न प्रदेशाविषयी खूप काही कळले. कुकडेश्वर मंदिराचा इतिहास आणि स्थापत्यकला यावर अधिक अभ्यासाची गरज आहे.

सातवाहन साम्राज्य :
ज्यांना इतिहासात जायची फार आवड आहे त्यांना सातवाहन साम्राज्याचा इतिहास फारच इंटरेस्टिंग वाटेल.विकिपीडिया वर खूपच छान माहिती वाचायला मिळेल.

सागर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy जीवधन करायचा राहीलाय अजून. पण नाणेघाट माझा आवडता आहे Happy

नाणेघाटातील गुहा. याला नुकतेच ग्रिल बसवले आहे. ऐतिहासिक गोष्टींची वाट लावण्यात आपले सरकार हुशार आहे.>>> ह्याला कारणीभूत पण आपणच आहोत की. आम्ही गेलो होतो तेव्हा चार पाच तरुण मुलांचा गृप जुन्नर
मार्गे कारने आला होता. गुहेत रात्री मुक्कामाला होता. त्यांचे खाणे पिणे ओकणे सगळं साग्रसंगीत चालू होते. कोणाला काही सांगायला जावे तर ते ऐकण्या इतपत पण ते भानावर नव्हते.

अशा गोष्टी वरचे वर होत असतील तर ग्रिल लावणे/अजून काही उपाय करणे हे ओघाने होणारच. सुक्याबरोबर ओलेही जळते त्याप्रमाणे आशा "न-ट्रेकर्सच्या" ट्रेकिंगचा त्रास रेग्युलर ट्रेकर्सनाही होतो हे वाईट असलं तरी त्याला सध्या इलाजही नाही काही. Sad

नानाचा अंगठा प्रची अतिसुन्दर. कापून घ्यावासा वाटतोय.

<<<हे अर्ध गोलाकार घुमट प्रवेशद्वार अजूनही तेवढेच सुस्थितीत आहे.चार लेयर मध्ये कोरलेली नक्षी केवळ अद्भुत. त्यावर चंद्र, सूर्य आणि तोरणा कृती आकृती कोरलेली आहे>>>>>>>

गेल्या पावसाळ्यात का त्या आधी या दरवाजात दरड कोसळली होती आणि अगदीच वाकून जायला लागत होते. आम्ही तेंव्हा श्रमदान करून काही शिलाखंड आणि माती बाजूला सारून जागा सपाट करून घेतली होती. पण काही शिलाखंड जागेवरून हलवणे सुद्धा आमच्या आवाक्या बाहेरचे होते. सर्व साफ सफाई करण्याकरीता अधिकच मनुष्यबळ आणि तांत्रिक साहित्य सुद्धा लागेल.

आम्ही काम करत असताना भर पावसात जवळपास ५० जणांचा ग्रुप आला होता आणि त्यांनी सुद्धा बरोबर दोर आणला नव्हता. वर चढताना त्यातल्या ४ मुलीं आणि एका मुलाने ढोपर फोडून घेतली होती. मग काय आम्ही दयावान दोर घेवून उभे होतोच संयोजकांच्या मदतीला.

बाकी नाणेघाटाची गुहा म्हणजे अति उंचीवरील बिअर बार आहे. या बेवड्यांचा वावर बघितल्यावर गुहेशेजारील टाक्यातील पाणी पिताना हजारदा विचार करावा लागतो.

कवीन : एकदम सहमत आहे तुमच्याशी. खरच अवघड आहे हे सगळे.

सूनटून्या :
मग काय आम्ही दयावान दोर घेवून उभे होतोच संयोजकांच्या मदतीला. >>> Rofl
बाकी नाणेघाटाची गुहा म्हणजे अति उंचीवरील बिअर बार आहे. >>>> खरे आहे. नाणेघाटाची परिस्थिती फार वाईट व्हायला लागली आहे. म्हणूनच आम्ही घाटघर मध्येच राहिलो. तिथे फालतू पणा होईल असे वाटलेच होते. आणि आम्ही गेलो तेव्हाही चालूच होता. Sad

फारच छान लिहिले आहे .
फोटोही योग्य ठिकाणचे आहेत .काही मुद्दामहून कृष्णधवल ठेवले ती कल्पना आवडली .

आम्ही याच वाटेने भर पावसात चढलो होतो दोर
न लावता आणि मग पलीकडे दुसऱ्या वाटेने न
उतरता "माहिती असलेला राक्षस नवीन राक्षसापेक्षा कमी वाईट असेल " असा विचार करून याच वाटेने उतरलो होतो.

रॉकपैचपेक्षा सुळसुळीत पायऱ्या (!?)भयंकर असा प्रकार पावसाळयात असतो .उभ्या कपारीपेक्षा येथे
पायरीवर शेवाळे खूप असते .

माझ्या बिल्डिंगमध्ये राहाणारा सुनटुन्याचा मित्र हितेश नसता तर हे धाडस मी एकट्याने केले नसते .

चला माझ्या ट्रेकिंगच्या धडपडीत एकतरी रॉकपैच
जमा झाला .

या अगोदर एकदा मी नाणेघाट करून घाटघर गावात राहिलो होतो ती आठवण मला कायम लक्षात राहिली आहे .गावकरी पाहुणचार कसा करतात तसे आपण शहरातले लोक त्यांना वागवतो का ?

मस्त लिहिलयं...

कित्येक वेळा माळशेज वरुन जाताना नाणेघाटाचे ओझरते दर्शन घेतले आहे... बघु कधी योग येतो.

Srd: पावसाळ्यात दोन्ही वाटा फारच डेंजर असतील. खरच निसरड्या पायऱ्या तर अजून डेंजर. तुम्ही घाटघरची वाट भर पावसात दोरा शिवाय कसा उतरला असाल हा विचार करतोय. Uhoh
माहिती असलेला राक्षस नवीन राक्षसापेक्षा कमी वाईट असेल>> हे मात्र भारी आहे बर. Happy

सागर, अशक्य सुंदर लिहिल आहेस. डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. साहसी आहात तुम्ही सगळे.

मग जेवण शेवटी कुठे मिळाले? नंतर मी तुझा ब्लॉग वाचेन. जसा वेळ मिळेल तसा.

वाचकांना धन्यवाद.
Srd: लिहा कि येथेच. पावसाळ्यातला अनुभव वाचायला आवडेल. Happy
बी : धन्यवाद, जेवण तर नाहीच मिळाले. नाणेघाट बघून मी परत ५ किमी चालत घाटघर ला आलो. तेथून ४ ची ST पकडली. आणि जुन्नर-पुणे आलो. भूक मरूनच गेली होती. एक 'माझा' पिले आणि घरी दुध. दुसर्या दिवशी मात्र सकाळी नाष्ट्यालाच जेवण केले. Happy

सागर असे समज त्या दिवशी तुला उपवास घडायचा होता. तो घडला. मला असे अवचित घडलेले उपवास फार आवडतात. आपण ठरवून उपास धरावा आणि जेवणाची वाट बघावी ते मला पटत नाही Happy