समाजमन १ - भिल्ल आदिवासींचे “पलायन”

Submitted by अतुल ठाकुर on 28 January, 2014 - 09:46

bhill-300x225.jpg

दिवस फिल्ड ट्रीपचे होते. मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याची ट्रीप निघाली होती. आठ दिवस भिल्ल समाजाचा अभ्यास करायचा होता. माझ्या गटाला या समाजातील शिक्षणाचे स्थान, त्यांची त्यातील प्रगती आणि शिक्षण मध्येच सोडुन जाण्याचे प्रमाण हा विषय होता. मुंबईतुन उत्तरेकडे गेल्यावर भाषेची समस्या जी गावात प्रामुख्याने भेडसावते तीचा फारसा त्रास मला झाला नाही. हिन्दी चित्रपट पाहण्याची सवय कामी आली. लहानपणचा काही काळ मुसलमानांमध्ये गेला होता. शिवाय अनेक वर्षे शेजारी मध्यप्रदेशातील होते. त्यामुळे बर्‍यापैकी सवय होती. गावात शिक्षक जी हिन्दी भाषा बोलत ती तेवढी सोपी नव्हती. ज्या सहजपणे आपण “स्कॉलरशीप” म्हणतो त्यासहजतेने ते लोक “छात्रवादी” हा शब्द वापरीत. त्याची सवय करुन घ्यावी लागली.

येथे सर्वप्रथम मी “पलायन” हा शब्द एका विशिष्ट परिस्थीतीत वापरला गेलेला पाहिला. हिन्दीशी थोडी सलगी असल्याने मला जरासा धक्काच बसला होता. माझ्या माहितीत “पलायन” हा शब्द आजवर तरी हरलेला माणुस पळुन जातो, घाबरुन माणुस पलायन करतो, एखादी गोष्ट जमत नाही म्हणुन टाळण्यासाठी मध्येच टाकुन पलायन करतो अशा अर्थीच वापरला जाणारा होता. पण येथे सर्व माणसे अगदी सहजपणे भिल्ल आदिवासींच्या हंगामी स्थलांतर करण्याला “पलायन” हा शब्द वापरत होती. कदाचित मला हा शब्द जसा टोचला त्याअर्थाने येथे तो वापरला जातही नसेल म्हणुन खात्री करुन घेण्यासाठी मी एका NGO मधल्या माणसाला मुलाखतीदरम्यान हा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर मिळाले कि पुर्वी युद्धात हरल्यावर माणसे जीव वाचवण्यासाठी पलायन करीत त्याचप्रमाणे हे आदिवासी जीवनाचा लढा येथे हरुन अस्तीत्व टिकवण्यासाठी दुसरीकडे पलायन करतात. हे स्पष्टीकरण म्हणजे आपण एखाद्या समाजाबद्दल किती कठोर, अनुदार होऊन बेजबाबदारपणे भाषा वापरु शकतो याचा एक वस्तुपाठच होता.

पुढे सर्वेक्षणात अनेक गोष्टी पुढे आल्या. सर्वात मोठी समस्या पाण्याची होती. त्यामुळे शेतीवर अवलंबुन राहता येत नव्हते. राहाण्याच्या ठिकाणापासुन शाळा लांब होत्या. कित्येक मैल चालत जावे लागायचे. काही शाळांची अवस्था फारशी चांगली नव्हती. लग्न करायचे असल्यास वधुला वराकडुन हुंडा द्यावा लागत असे. महिना तीन हजारापेक्षाही कमी आमदनी असलेल्या कुटुंबांनी बनलेल्या त्यासमाजात वधुच्या पित्याला वराने द्यावा लागत असलेला हुंडा एक लाखाच्या आसपास होता. त्यामुळे समाज कर्जात बुडाला होता. व्यसनाचं प्रमाण बरंच होतं. अंधश्रद्धांचं प्रमाणही मोठं होतं. या सर्व बाबी जगणं दुष्कर करुन टाकत होत्या त्यामुळे काही मोसमात आजुबाजुच्या शहरांमध्ये जाऊन काम करणं हा एवढाच एकमेव पर्याय होता. ते करत असताना मुलांना एकटं सोडता येणं शक्य नव्हतं त्यामुळे शाळा मध्येच सोडण्याचं प्रमाण भरपुर होतं.

या सार्‍या गोष्टी डोळ्यासमोर असुनसुद्धा त्यांच्या अस्तीत्वाच्या लढाईला माणसे सहजपणे “पलायन” म्हणत होती. खरं म्हणजे हे आदिवासी दुसरं अतिशय दारुण युद्ध लढण्यासाठी बाहेर पडत होते. हे आदिवासी मला तरी शूरच वाटले. मात्र आपल्याकडे दुसर्‍यांबद्दल तुच्छता व्यक्त केल्याशिवाय आपण शहाणे आहोत हे सिद्ध करता येत नसल्याने अशा तर्‍हेची भाषा सहजपणे वापरली जात असावी.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म.प्र मधिल आदिवसी काय किवा डहाणु / मेळघाट किवा बस्तर असो ही माणसे आहेत आणि ती भारतीय आहेत त्यांना किमान मानव म्हणुन जगण्याचा हक्क आहे हे सरकार (कुठल्याही पक्षाचे असो) त्यांच्या बाबतीत झोपलेले आहे हे दुर्देव ! मग या एन.जी.ओ किवा समाज सेवक काय आणि कुठे कार्य करतात ? का फक्त अमेरिकन फंडाचे पैसे संपे पर्यंत आणि टीव्ही वर छबी झळके पर्यंत मजल गेलि की आयुष्याची इतिकर्तव्यता पार पडली म्हणुन म्हातारपणी उपदेशांचे झरे टी व्ही वर किवा पेपर मधे वाहते ठेवायचे ही इथली मानसिकता आहे. दुर्देव त्यांचे... दुसरे काय ... भारत माझा देश आहे तरिही मेजर उन्निक्रुषण हा युद्ढात शहिद झाला नाही म्हणुन शोउर्यच्क्र द्यायचे का नाहि यावर खल करणारे मुर्ख राजकीय नेते ... तरिही भारताचा अभिमान न मानणे म्हणजे पुन्हा देशद्रोहि... असो..

आपण एक समाज म्हणून कोसो मैल मागे आहोत. तरीही इथल्याच एका धाग्यावर असे लिहलेय की सध्या समाज फार चांगल्या स्थितीत आहे. हेही एकप्रकारचे समाजमनच.

आपल्याकडे दुसर्‍यांबद्दल तुच्छता व्यक्त केल्याशिवाय आपण शहाणे आहोत हे सिद्ध करता येत नसल्याने अशा तर्‍हेची भाषा सहजपणे वापरली जात असावी. >>>> +१

एका ब्लॉगवर याच भागाबद्दल वाचलं होतं. प्रचंड अस्वस्थ झालो होतो आणि चीडही आली होती, स्वतःचीच.... हे भुभाग तर बरेच दुर आहेत, आपल्याच जवळच्या खेड्यातही खुप चांगली परिस्थिती आहे, असं नाही. Sad