ओशिवार्‍याचे बाईकर्स रोडरोमियो.

Submitted by वेल on 28 January, 2014 - 06:33

अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये रिक्षा घेऊन जग्या उभा होता. दिसायला तसा तो थोडासा गुंडासारखाच होता. फक्त रिक्षा ड्रायवरच्या युनिफॉर्ममध्ये त्याचं गुंड दिसणं थोडं सौम्य वाटत होतं. त्याचं नाव जग्या हे त्यानेच सांगितलं बाजूच्या रिक्षावाल्याला. त्याने रिक्षा चालवायला नुकतीच सुरुवात केली होती आणि तो या भागात फक्त तिसर्‍यांदा आला होता. त्याची रिक्षा होती दहिसरची.

अंधेरी स्टेशन, जुहू, खार, बांद्रा इथे जाण्याची विचारपूस करणार्‍या सगळ्यांना त्याने नाही म्हणून सांगितलं. एकाने त्याला वाहतूक पोलिसाकडे तक्रार करायची धमकी सुद्धा दिली तर त्याने उभं केलेलं मीटर दाखवलं. एकाने जोगेश्वरीला येणार का विचारलं तेव्हासुद्धा त्याने नाही म्हणून सांगितलं. थोड्या वेळाने एका मुलीने त्याला मालाडला जाण्याबद्दल विचारलं तेव्हा कुठे तो हो म्हणाला.

"कुटून घ्यायची रिक्षा?"
"अहो लवकर जायचय, मागच्या रस्त्याने घ्या, एचडीएफसी बँकेवरून, सेलिब्रेशन क्लबवरून, जॉगर्स पार्कच्या मागच्या बाजूने."
"न्हाई म्हंजे दुपारी सुन्सान अस्तो त्यो रस्ता. थितं बाईकवरून फिरनारी पोरं रिक्षेतून जानार्‍या पोरीना छ्येडत असतात म्हने. प्येपरमधे सुदा आलं होतं""
"अहो चला लवकर. त्या मुलांकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही"
"बगा ताई मंग म्हनू नका हिकडून का आनली रिक्षा"
"तुम्ही येताय का मी दुसरी रिक्षा बघू?"
"चला चला"
असं म्हणून जग्याने रिक्षा सुरू केली.

सेलेब्रेशन क्लबच्या रोडला रहदारी कमी, त्यामुळे पोल्युशन आणि ट्रॅफिक जाम नसे. अगदी मेगामॉल येईपर्यंत रहदारीचा त्रास नसे. पण गेले काही महिने तो रस्ता थोडा बदनाम झाला होता. त्या रस्त्याला पोलिस तैनात नसल्याने बाईकवर फिरणार्‍या काही मुलांनी रिक्षात बसलेल्या मुलींचा पाठलाग करणे, मुलींना उद्देशून गाणी म्हणणे, अश्लील शब्द वापरणे अशा प्रकारे मुलींची छेडछाड करून लोकांना वीट आणला होता.

जग्याने रिक्षा सेलिब्रेशन क्लबच्या रस्त्याने घेतली. आणि त्याने म्हटल्याप्रमाणे रस्त्यावरच्या एका बाईकने रिक्षाचा पाठलाग करायला सुरुवात केली. रिक्षापासून सुरक्षित अंतर ठेवून बाईकवरचे ते दोन मुलगे गाणी म्हणत जात होते. जग्याच्या रिक्षामध्ये बसलेली मुलगी फोनला हेडफोन लावून त्यावर कुजबुजत बोलत होती, तिचं लक्षही नव्हतं रिक्षाच्या मागे कोणी आहे ह्यावर. पण जग्याच्या नजरेने ते टिपलं होतं त्याने रिक्षाचा वेग थोडासा वाढवला. त्याचसोबत त्या बाईकचा वेगही वाढला आणि गाणी बंद होऊन त्या मुलांची बडबड सुरू झाली.
"कहा जा रही हो जानेमन हमे भी तो लेकर चलो"
"हमभी चले तुम्हारी राहोंपर"
"अरे तुम्हारा दुपट्टा बाहर ऊड रहा, ऊद जाने दो ऊड जाने दो"

आता त्या मुलीच लक्ष गेलं ती रिक्षात आतल्या बाजूला सरकली.

"अरे हमसे मत शरमाओ क्यु छुप रहि हो"

जग्याने आता रिक्षाचा वेग कमी केला.
"अरे रिक्षावाले भैया कितने अच्छे हो तुम."
"जानेमन चलो हमारे साथ"
"किसके साथ आओगी मेरे साथ या इसके साथ"

रिक्षा एमसीजीएम गार्डनसमोर होती. जग्याने रिक्षा थांबवली. तो रिक्षातून उतरला तसे ते बाईकवरची मुलेही थांबली. रिक्षातून ती मुलगी जग्याला ओरडायला लागली.
"अहो काय करताय तुम्ही रिक्षा थांबवून, मला उशीर होतोय जायला."
"ताई दोन मिनिट थांबा हो, तुमी रिक्षेतच बसा."
"काय कटकट आहे ह्या लोकांची, एक तर उशीर होतोय आणि ह्यात हे असे लोक" रिक्षातली मुलगी म्हणाली. आणि रिक्षाच्या उजव्या दारातून डोकावून बाहेर बघू लागली.

जग्या रिक्षातून उतरून बाईकवरच्या त्या मुलांकडे गेला.
"क्यो भाई मेरे रिक्षाके पिछे पिछे गाना क्यो गा रहे हो? रिक्षा इतनी अच्छी लगी क्या?"
"ओये जा ना रिक्शावाले, कायको दिमाग खराब कर रहेला है?"
"देखो फिरसे मेरे रिक्षाके पिछे पिछे मत आना और गाना मत गाना."
"अबे तेरे बापका रास्ता है क्या, किधर भी जायेंगे तू कौन आया बोलनेवाला."
"देखो मैने तुम्हे बतानेका काम किया, लडकीको छेडना बंद करो."
"अबे जा जा चल फुट जा. भेXX"

जग्या शांतपणे रिक्षात परत येऊन बसला. त्याने रिक्षा सुरू केली तसे ते बाईकवाले आता रिक्षाला खेटून बाईक चालवू लागले. त्यांनी एका हाताने रिक्षाचा दांडा पकडला होता. आता त्या मुलीशी ते डायरेक्ट बोलू लागले.

"बोल आती क्या?"
"चल्लो, चिकन खायेंगे दारू पियेंगे."
"नाचेगी क्या तू? जब तक है जान .. नाचेगी तू. मालूम मेरेको."
जग्याने रिक्षाचा वेग अचानक वाढवला तसा त्या बाईकवरच्या मुलाचा तोल गेला. पण त्याने सावरलं स्वतःला. आता त्या मुलांनी सुद्धा वेग वाढवला आणि रिक्षापर्यंत पोहोचले दोघे. आता त्यांनी जग्याला शिव्या द्यायला सुरुवात केली.

जग्याने मेगामॉलच्या गेटच्या आधी रिक्षा थांबवली आणि तो त्या मुलांशी बोलायला रिक्षातून बाहेर पडला. एकंदरीत रागरंग बघून तशी ती मुलगीसुद्धा रिक्षातून बाहेर पडली आणि रिक्षाच्या हँडलला लावलेल्या पाकिटात पैसे टाकून ती निघाली. ती मुलगी दूर जाते आहे असे पाहून त्या मुलांनी जग्याचा नाद सोडायचे ठरवले आणि बाईकला किक मारली. गियर टाकून अ‍ॅक्सिलेटर फिरवण्याआधीच जग्याने चावी फिरवून बाईक बंद केली आणि चावी हातात घेतली. तसे बाईक चालवणार्‍या मुलाने जग्याची कॉलर पकडली. जग्या तरीही शांतच होता. दुसरा मुलगा मुलीच्या मागे धावला. बाईक आणि ती मुलगी ह्यात दहा पावलाचं अंतरच होतं बाईकवरच्या मागच्या मुलगा दोन उड्यात त्या मुलीजवळ पोहोचला. आता तो मागून तिचा हात पकडणार तितक्यात ती मुलगी मागे वळली आणि हातातली पर्स त्या मुलाच्या तोंडावर आपटली. तो मुलगा गरगरला. त्यातून सावरून तो तिचा हात पकडायचा पुन्हा प्रयत्न करणार तितक्यात पुन्हा एकदा त्याच्या नाकावर जोरात ठोसा पडला. आपल्या मित्राला ती मुलगी मारते आहे हे पाहून बाईक चालवणारा मुलगा जग्याची कॉलर सोडून त्याला मदत करायला धावू पाहात होता मात्र जग्याने एका हाताने त्याची मान आणि एका हाताने त्याचा एक हात गच्च पकडून ठेवली. त्याने जग्याला मारायचा प्रयत्नही केला पण जग्याने त्याचा मार व्यवस्थित चुकवला. आता तिथे लोक जमा झाले होते. त्यांनी मुलीला मारू पाहाणार्‍या त्या मुलाला चोपायला सुरुवात केली. जग्याने पकडलेल्या मुलालाही त्या लोकांनी मारायला सुरुवात केली.

त्या मुलीने आणि जग्याने तीन चार मिनिटं तशीच जाऊ दिली, मग मात्र जग्याने जोरात शिटी वाजवली आणि मेगा मॉलच्या गेटमधून युनिफॉर्ममधले दोन पोलिस बाहेर आले. त्या पोलिसांनी बाईकवरच्या दोन्ही मुलांना पकडलं आणि फरफटवतच रस्त्याच्या पलिकडे नेलं. फाईव्ह स्पाईसच्या गल्लीत पोलिसांची जीप लावली होती. त्यात त्या मुलांना कोंबलं आणि ती जीप ओशिवारा पोलिस स्टेशनच्या दिशेने जाऊ लागली. जग्या आणि ती मुलगी रिक्षात बसून पोलिसांच्या जीपच्या मागे जाऊ लागली. मेगामॉलच्या दरवाजात जमलेली गर्दी अचंबित होऊन पाहू लागली. त्या गर्दीतलाच एक जण जवळच ऑफिस असलेल्या एका न्युज चॅनलचा वार्ताहर होता. त्याने दुसरी रिक्षा पकडली आणि ओशिवारा पोलिस स्टेशनच्या गेटमध्ये त्याने जग्याला गाठलं. स्वतःची ओळख करून दिली, मग जग्यानेही स्वत:ची ओळख करून दिली.
"मी सबइन्स्पेक्टर जगताप आणि ह्या सबइन्स्पेक्टर सिंग. बर्‍याच दिवसांपासून ऐकलं होतं ह्या रस्त्याला बाईकर्सची एक जोडी मुलींना त्रास देते. आमच्याकडे ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रारीसुद्धा आल्या होत्या. फेसबुकवर त्या मुलांचे फोटो सुद्धा पाहिले होते. पण ह्या मुलांना पकडता आलं नव्हतं तेव्हा आम्ही हा प्लान बनवला. आठवडा झाला रोज वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या सबइन्स्पेक्टर्सच्या जोड्या इथे रिक्षा घेऊन फिरायच्या. आज हे दोघं पकडीत आले. आता कृपा करून ह्याची स्टोरी बनवून तुम्ही छापू नका. नाहीतर अजून कोणी रोडरोमियो कुठे फिरत असतील तर सावध होईल." न्युज चॅनलच्या वार्ताहराने ते मान्य केलं आणि एक ब्रेकिंग स्टोरी न्युज व्ह्युअर्स समोर यायची राहूनच गेली.

******************************

ओशिवारा भागात असे बाईकर्स रोडरोमियो फिरत आहेत. फेसबुकवर फोटोदेखील पाहिला होता. त्या फोटोवरून प्रेरणा घेऊन लिहिलेली काल्पनिक कथा.

***************************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

मस्तय कल्पना, वेल. चांगली उतरलीये. असच व्हायला हवं रोडसाईड रोमियोंच्या बाबतीत. कीळस येते असल्या प्रकारांची.

मस्त

एकदम मस्त.................. असल्या नालायकांना तुडवुन काढले पाहीजे. ....
छोट्या शहरात खुपच होते असे अन् काही मुली आत्महत्यासुध्दा करतात.