'शोध स्वामी विवेकानंदांचा' - डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर

Submitted by चिनूक्स on 27 January, 2014 - 11:58

समाजात अद्वितीय काम करणार्‍या समाजपुरुषांना, संतांना, कलाकारांना आपल्याला आवडणार्‍या-पटणार्‍या-मानवणार्‍या विचारचौकटीतच बसवणं, हा आपला आवडता उद्योग आहे. त्यामुळे सामाजिक-धार्मिक-राजकीय क्षेत्रातल्या मंडळींना दैवत्वही चटकन प्राप्त होतं. या समाजदैवतांच्या नावे मग आपले विचारही काहीजण खपवतात. इतरांना नव्यानं विचार करण्याची गरज वाटत नाही.

स्वामी विवेकानंद बहुसंख्यांना माहीत आहेत, ते त्यांनी शिकागोच्या धर्मपरिषदेत केलेल्या भाषणामुळे. त्यांनी त्या सभेत समस्तांना बंधुभगिनी असं संबोधलं, हे आपण लहानपणापासून ऐकत असतो. त्यांच्या मठांना आपण भेटी देतो. गेलं वर्षभर तर त्यांच्या कार्याची महती सांगणारे अनेक लेख छापून आले, अनेक भाषणंही दिली गेली. मात्र या सार्‍या लेखाभाषणांमध्ये भर होता तो त्यांच्या शिकागोतल्या भाषणावर आणि त्यांनी केलेल्या 'हिंदू धर्माच्या उभारणी'वर.

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी मात्र यापलीकडे जाऊन 'शोध स्वामी विवेकानंदांचा' या अप्रतिम पुस्तकात विवेकानंदांच्या विचारधनाचा वेध घेतला आहे. खरे विवेकानंद कसे होते? विवेकानंद हे समाजपरिवर्तनाच्या चळवळीतले अग्रदूत होते. त्यांनी आजन्म विचारधन वाटलं आणि समाजाचं रूप बदलण्यासाठी कृतीही केली. ते वैचारिक लढाया लढले. मतं बदलली, ती मान्य केली. नव्या मतांचा प्रसार केला. स्वामी विवेकानंदांची भाषणं, पत्रं, लेख, मुलाखती यांचा अभ्यास केला, तर असं लक्षात येतं, की त्यांच्या आयुष्याचं खरं ध्येय होतं भारताला उर्जितावस्था प्राप्त करून देणं हे. त्यांना भारतीय समाज सुखासमाधानानं नांदायला हवा होता. इथली गरिबी, अज्ञान, जातिव्यवस्थेमुळे होणारे तंटे, दुबळ्यांवर होणारा अन्याय कायमचे दूर व्हावेत, अशी त्यांची पराकोटीची इच्छा होती. हे काम सहजसाध्य नाही, याची त्यांना जाणीव होती. भारतीय समाजावर धर्माचा, जातिव्यवस्थेचा प्रचंड पगडा होता. हा पगडा दूर करून जनतेला त्यांचं भलं कशात आहे, याची जाणीव करून देणं हे महत्त्वाचं होतं, आणि अवघं एकूणचाळीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या स्वामी विवेकानंदांनी हे कार्य आयुष्यभर केलं. त्यांनी संपूर्ण भारत पालथा घातला. इथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या काळी निषिद्ध असलेलं समुद्रपर्यटन करून ते परदेशातही गेले. अवलोकनातून, मननचिंतनातून तयार झालेले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत राहिले.

'आजचा हिंदू धर्म हा धर्म नव्हे, हा आहे सैतानाचा बाजार!' असं ते उद्वेगानं म्हणाले असले, तरी जगभरातल्या बहुसंख्यांना जगण्यासाठी धर्म लागणार, हे त्यांना मान्य होतं. पण त्यांचा कल कायम धर्माचं खरं स्वरूप समजून घेण्यात आणि समजावून देण्याकडे राहिला. धर्मातल्या अनैतिक, अशास्त्रीय बाबींचं उच्चाटन करण्यासाठी विज्ञानाची कास धरणं आवश्यक आहे, हे त्यांना ठाऊक होतं आणि म्हणून ते कायम विज्ञानवादाचे पुरस्कर्ते राहिले. जपानहून अमेरिकेला जाताना बोटीवर भेटलेल्या जमशेदजी टाटांना त्यांनी विज्ञानाचा अभ्यास करणारी देशी संस्था उभारण्याचा सल्ला दिला, आणि त्यातून बंगळुरूची आज जगप्रसिद्ध असलेली 'आयआयएससी' ही संस्था उभी राहिली.

विवेकानंदांना 'माणूस घडवणारा धर्म' अभिप्रेत होता. 'आपण सर्व पुस्तके जाळूया आणि स्वतः विचार करूया. मी जे बोलतो त्यावर तुमच्यापैकी कोणी निव्वळ विश्वास ठेवला तर मला वाईट वाटेल. स्वतः विचार करण्याची शक्ती तुमच्यात मी जागृत करू शकलो, तर मला आनंद होईल. मला स्त्रीपुरुषांशी बोलण्याची इच्छा आहे, मेंढरांशी नव्हे', असं सांगणार्‍या विवेकानंदांचे विचार अभ्यासले तर ते काळाच्या किती पुढे होते, हे लक्षात येतं. समाजवादी आणि साम्यवादी विचारसरणीही त्यांच्या विचारधनाचा भाग आहेत. 'मी समाजवादी आहे', असं त्या काळात ते म्हणाले. आंबेडकरांच्या कितीतरी आधी त्यांनी वर्गलढ्यावर भाष्य केलं. आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. देशात विज्ञानाचं शिक्षण देणारी विद्यापीठं उभी राहावीत म्हणून धडपडले. 'संन्याशानं धर्माभ्यासापेक्षा खेडोपाडी जाऊन आजारी व्यक्तींची सेवा करावी', असं सांगत आपल्या शिष्यांना कॉलराग्रस्तांची शुषृशा करायला लावली. लोकांना हाताशी घेऊन गटारं साफ केली. सार्वजनिक आयुष्य जगताना व्यवहारात नीतिमत्ता जपली जावी, म्हणून प्रत्येक हिशेब चोख राहील, याची स्वतः काळजी घेतलीच, पण वेळोवेळी आपल्या शिष्यांना पत्रं लिहून ते याबाबत बजावत राहिले.

डॉ. दाभोळकर लिहितात - 'प्रत्येकाने आपापल्या मनात, आजच्या काळाच्या चौकटीत या महामानवांचे कोणते विचार, कोणती कृती बरोबर वाटते हे ठरवायचे असते. त्यांनी आज आपले विचार कसे मांडले असते, कोणती कृती सांगितली असती, कोणते मार्ग सुचवले असते, हे ठरवायला मदत हवी म्हणून, काळाच्या कोणत्या चौकटीत त्यांनी आपले विचार मांडले, त्यांचा पिंड कोणता होता, कोणत्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आघातप्रत्याघातांत ते घडत होते, हे सारे समजावून घ्यावयास हवे. थोडक्यात काय, तर त्यांचे वस्तुनिष्ठ चरित्र आपणासमोर यायला हवे.'

'शोध स्वामी विवेकानंदांचा' हे डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेलं आणि मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित केलेलं चरित्र स्वामी विवेकानंदांचा वैचारिक प्रवास आजच्या पिढीसमोर उभं करतं. विवेकानंद ही व्यक्ती आजही समकालीन आहे, हे या पुस्तकातून कळतं.

प्रत्येकानं हे पुस्तक आवर्जून वाचावं, संग्रही ठेवावं, ही आग्रही विनंती.

vivek.jpg

विवेकानंद : परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रदूत

तो संधिप्रकाशाचा कालखंड होता. एकोणिसावे शतक संपत होते आणि विसावे शतक सुरू होत होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धाने जगाची घडी पार विस्कटवून टाकली होती. जगातील फार मोठ्या भूभागावर धूर्त कावेबाज राष्ट्रांच्या वसाहती स्थिरावल्या होत्या आणि विरोधाभास म्हणून (त्या आधीच्या शतकात, फ्रान्सच्या राज्यक्रांतीने दिलेला) ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ हा विचार व्यावहारिक पातळीवर नव्हे, पण मानसिक पातळीवर फार मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला होता. कार्ल मार्क्सने सांगितलेल्या साम्यवादी तत्त्वज्ञानाने झपाटलेले मूठभर तरुण आणि मूठभर कामगार संघटना जगभर सर्वत्र कार्यरत होत्या. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, विज्ञानाने जगात आपले पाय रोवले होते. विज्ञानाबरोबर तंत्रज्ञान आले होते. उत्पादनाचे, व्यवस्थापनाचे, वितरणाचे, वाहतुकीचे, संवादाचे आणि संपर्काचे सारे जुने प्रकार मोडीत निघाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी जुनी अर्थव्यवस्था आणि म्हणून जुनी समाजरचना ढासळत होती. खरे तर, विज्ञानामुळे त्याहूनही महत्त्वाची अशी गोष्ट घडली होती. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत ‘धर्म’ हे मानवी जीवनाचे खरेखोटे का होईना, पण आधार होते. धर्मग्रंथांच्या विरुद्ध बोलणार्‍या फार मोठ्या शास्त्रज्ञांना मृत्युदंड मिळाले होते. धर्मातील अधार्मिक गोष्टीवर बोलणार्‍यांच्या खुणाही मागे राहणार नाहीत याची धर्म काळजी घेत होता. पण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मानवी इतिहासात प्रथमच काही अघटित घडले होते. सर्वरक्षक आणि सर्वभक्षक विज्ञानाचा ‘अश्‍वमेध’ घोडा जगभर सर्वत्र दिमाखात हिंडत होता. विज्ञानाने विचारलेल्या प्रयोगसिद्ध प्रश्नांपुढे धर्म खोटे ठरत होते. त्यामुळे धर्म हा मानवी जीवनाला शाश्‍वत आधार म्हणून आवश्यक आहे, असे मनापासून वाटणारे जगभरचे धर्मगुरू आणि धर्मप्रेमी गोंधळलेले होते, गांगरलेले होते.

भारतात तर विलक्षण गुंतागुंतीची परिस्थिती होती. ‘आमच्या या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळत नाही’, असे विनम्र दर्पोक्तीत सांगणारे ब्रिटिश साम्राज्य भारतावर राज्य करीत होते. एवढा विस्तृत व एकसंध भूभाग मध्यवर्ती सत्तेच्या ताब्यात असण्याचा या देशाच्या ज्ञात इतिहासातील हा पहिलाच कालखंड होता. कायदा, प्रशासनाची भाषा, चलन सारे एक होते. धर्माच्या नावावर होणार्‍या सतीसारख्या अघोरी प्रथा कायद्याने नाहीशा होत होत्या, बालविवाह थांबणार होते, प्रबोधनाची चळवळ सुरू झाली होती. महत्त्वाचे म्हणजे, या राजवटीमुळे प्रथमच या देशाला खर्‍या अर्थाने उर्वरीत जगाची ओळख झाली होती. विज्ञान म्हणजे काय, हे समजले होते.

पण या जमेच्या बाजू नगण्य वाटाव्यात असे काही महाभयानक या राजवटीमुळे झाले होते. किंवा या राजवटीचे हे मोठेपण, हे ऋण मान्य करीत असतानाच कार्ल मार्क्सने त्याच्या ‘न्यूयॉर्क डेली ट्रिब्यून’मध्ये २५ जून १८५३ रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले होते, ‘‘हिंदुस्थानने आजवर अनेक आक्रमणे सहजपणे पचवलीत; पण ब्रिटिश राजवटीने या देशाला ज्या यातना आणि दु:ख दिलेय त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांनी हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेचा आणि समाजरचनेचा कणाच मोडलाय.’’ कार्ल मार्क्सचे नेमके शब्द द्यावयाचे तर - "There cannot, however, remain any doubt that the misery inflicted by the British on Hindostan is of an essentially different and infinitely more intensive kind than all Hindostan had to suffer before. All the civil wars, invasions, revolutions, conquests, famines, strangely complex, rapid and destructive as the successive action in Hindostan may appear, did not go deeper than its surface. England has broken down the entire framework of Indian society..."

मात्र मार्क्सने सांगितली, ती या देशातील प्रश्‍नांची फक्त एक बाजू होती. अर्थव्यवस्था व समाजरचना कोसळली होती, असंख्य माणसे भुकेने मरत होती. त्याहूनही अधिक माणसे अर्धपोटी व अर्धनग्न होती, हे सारे खरे; पण त्याहूनही भयानक गोष्ट म्हणजे स्वत:ला भद्र समजणारा समाजातील छोटा वर्ग बाकीच्या समाजाला राक्षसी वागणूक देत होता, त्यांचे मानसिक खच्चीकरण करीत होता. ही माणसे अशी किड्यामुंगीसारखी मरताहेत, कारण ही त्यांच्या पूर्वजन्मीच्या वाईट कर्माची शिक्षा आहे, म्हणून सांगत होता. हे किती भयंकर होते याची आपणाला कल्पना यावी म्हणून गोरक्षण मंडळाचा एक प्रचारक स्वामी विवेकानंदांच्या भेटीला आल्यावर जो संवाद झाला तो जरा लक्षात घेऊया.

स्वामीजी : आपल्या या मंडळाचा उद्देश काय?
प्रचारक : आम्ही देशातील गाईंची कसायांच्या हातून सुटका करतो. जागोजागी गोशाळा बांधून तेथे रोगी, दुबळ्या आणि कसायांच्या हातून सोडविलेल्या गाईंचे पालनपोषण करतो.
स्वामीजी : फार चांगले काम आहे हे आपले. हा खर्च चालवायला पैशाची काय व्यवस्था करता तुम्ही?
प्रचारक : आपल्यासारखे उदार लोक दयाबुद्धीने जे काही देतात, त्यातूनच हा खर्च आम्ही चालवितो.
स्वामीजी : आतापर्यंत आपल्यापाशी किती पैसा जमला आहे?
प्रचारक : मारवाडी व्यापारी या कामात सढळ हाताने पैसा ओततात. त्यांनी या कामासाठी बराच पैसा दिलेला आहे.
स्वामीजी : मध्यभारतात भयंकर दुष्काळ पडला आहे. खुद्द सरकारने नऊ लाख लोक ‘अन्न अन्न’ करीत मेल्याचे आपल्या अहवालात जाहीर केले आहे. आपल्या मंडळाने या भुकेलेल्यांना मदत करण्यासाठी काही करण्याचे ठरविले आहे का?
प्रचारक : असल्या दुष्काळबिष्काळाच्या कामात आम्ही अगदी भाग घेत नाही. गोमातेचे रक्षण करण्याच्या हेतूनेच आमचे हे मंडळ स्थापन झाले आहे.
स्वामीजी : लाखोंच्या संख्येने ‘अन्न अन्न’ करून आपल्यासारखीच माणसे दुष्काळात मरत असताना शक्य असूनही त्यांच्या पोटाला अन्न देऊन मदत करणे आपणाला योग्य वाटत नाही?
प्रचारक : नाही. हा दुष्काळ म्हणजे त्यांच्या कर्माचेच फळ आहे. जसे करावे तसे भरावे. जसे कर्म तसे फळ.

प्रचारकाचे हे उत्तर ऐकून स्वामीजींचे मुखमंडळ अगदी लाल झाले. त्यांच्या त्या विशाल डोळ्यांतून जणू आग बाहेर पडत आहे असे वाटले; पण त्या संतापाची ऊर्मी आतल्या आत दाबीत ते म्हणाले, ‘‘ज्या सभा, जी मंडळे माणसासारख्या माणसांकडे सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत, आपलेच देशबांधव उपासमारीने तडफडत असताना त्यांचे प्राण वाचविण्यासाठी मूठभर अन्न न देता पशुपक्ष्यादिकांचे प्राण वाचविण्यासाठी धान्याचे ढीगच्या ढीग वाटण्यासाठी पुढे सरसावतात, त्यांच्याबद्दल मला काडीचीही सहानुभूती वाटत नाही. अशांकडून या समाजाचा काही फायदा होणे अशक्य आहे. माणूस आपल्या कर्माने मरतो म्हणून कानावर जर हात ठेवलेत, तर जगात प्रयत्नांना काही अर्थ राहणार नाही; आणि मग गाई वाचविण्याच्या या तुमच्या धडपडीला तरी काय अर्थ आहे? आपल्या कर्मानीच गाई कसायाच्या हाती पडतात आणि मरतात असे म्हणा!’’
प्रचारक हे सारे ऐकून हादरलाच; पण स्वत:ला सावरून तो म्हणाला, ‘‘आपण म्हणता ते तसं खरं; पण शास्त्रात सांगितलं आहे, गाय आपली आई आहे.’’
यावर किंचित हसून स्वामीजी म्हणाले, ‘‘हो, गाय आपली आई हे तर उघडच दिसते. नाहीतर असली अलौकिक प्रजा आणखी कुणापोटी बरे निपजणार?’’ - हा संवाद झालाय १८९७मध्ये, श्री. प्रियनाथ मुखोपाध्याय यांच्या घरी, बागबाझार कलकत्ता येथे. तो शरच्चंद्र चक्रवर्ती यांनी शब्दांकित केला आहे आणि हा संवाद रामकृष्ण मठाने ‘स्वामी विवेकानंद ग्रंथावलीचे’ जे दहा खंड प्रसिद्ध केलेत त्यातील तिसर्‍या खंडात सुरुवातीला दिला आहे.

या संधिप्रकाशात विवेकानंद असे एकाकी, एकटे पण वादळासारखे हिंडत होते. केवळ भारतात नव्हे, तर जगभर. जगातील सारी माणसे सारखीच आहेत, सर्वांचे प्रश्न एकमेकांत गुंतलेले आहेत, त्यांना एकसुरी उत्तरे नाहीत, हे त्यांना नक्की समजले होते. जग यांना धर्मगुरू म्हणून ओळखत होते. पण धर्म हा मानवी जीवनाला आधार म्हणून आवश्यक आहे हे सांगत असतानाच, आजचे सारे प्रश्न या धर्मांनी निर्माण केलेले आहेत, असे सांगून हे धर्मप्रेमी मंडळींच्या सभेत सर्व धर्मांवर नास्तिकालाही आश्‍चर्य वाटावे असे घणाघाती प्रहार करीत होते. वैश्विक प्रश्‍नांची त्यांना जाण होती आणि ते त्यांची आश्‍चर्यकारक रीतीने नवी मांडणी करून संपूर्ण वेगळी, नवी उत्तरे सांगत होते. चातुर्वर्ण्याची यांच्या मनातील रचना फार वेगळी होती. हे साम्यवादाला शूद्रांची राजवट म्हणत होते. आजवर जगात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या राजवटी झाल्यात, त्यापेक्षा ही शूद्रांची राजवट अधिक चांगली असेल म्हणून सांगत होते. येथवर ठीक आहे, पण त्यावेळी त्यांनी आणखी जे सांगितले ते दिङ्मूढ करणारे आहे. १८९७मध्ये बेलूर मठात आपल्या अनुयायांना त्यांनी सांगितले, ‘‘मला जगात पुढे घडून येणार्‍या सार्‍या घटना दिसताहेत. वर्षानुवर्षं केलेल्या निरीक्षणातून मला ते सारे जाणवते आहे. अभ्यास आणि प्रवास यांची मी केलेली साधना हे त्याचे कारण आहे. खगोलशास्त्रज्ञ ज्याप्रमाणे दुर्बिणीतून तार्‍यांच्या हालचाली पाहतात, तसे भविष्यातील जगात काय होईल हे मला दिसते आहे. मी तुम्हाला निश्चयाने सांगतो. हा शूद्र जातीचा उठाव प्रथम रशियामध्ये होईल, नंतर चीनमध्ये होईल.’’ या संधिप्रकाशात येणारा साम्यवाद त्यांना स्पष्टपणे दिसत होता. ते त्याचे समर्थक होते आणि त्याच्यात असलेल्या त्रुटींमुळे अस्वस्थ होते. १ नोव्हेंबर, १८९६ रोजी आपल्या एका अनुयायाला पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले, ‘‘ही राजवट येईलच. तिला कोणी थोपवू शकणार नाही. या राजवटीमुळे आजच्या विषम झगड्यात गरिबाला चांगली संधी मिळेल. मात्र समाजवाद, साम्यवाद या परिपूर्ण वा निर्दोष अशा शासनपद्धती आहेत आणि म्हणून मी समाजवादी आहे असे मुळीच नाही. तर ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या दृष्टीनेच मी समाजवादी आहे. पण या राजवटीत जे दोष आहेत त्यामुळे ही राजवट पण दीर्घकाळ टिकणार नाही.’’- स्वामीजी हे सांगत होते १८९६मध्ये. रशियन राजवटीची सुरुवात होण्याच्या जवळजवळ पंचवीस वर्षं आधी आणि त्या राजवटीचा अंत होण्याच्या जवळजवळ शंभर वर्षं आधी आणि कोणाला पटो न पटो ही साम्यवादी राजवट का कोसळेल, याचे त्यांनी आपल्या मनाशी एक उत्तर शोधले होते. फेब्रुवारी १८९७मध्ये मद्रासमधील ‘हिंदू’ला मुलाखत देताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते - ‘‘सगळ्या साम्यवादी सिद्धांताना आध्यात्मिक अधिष्ठान आवश्यक आहे आणि ते आध्यात्मिक अधिष्ठान फक्त वेदान्तच आहे...’’

जगभर अस्वस्थपणे हिंडताना उद्याच्या जगाची न्याय्य, चिरस्थायी, समानतेवर आधारलेली रचना यांच्या मनात कायमची होती पण ते सर्वाधिक अस्वस्थ होते, आतून संपूर्ण उसवले होते ते त्यांच्या सनातन, सभ्य, सुसंस्कृत, समृद्ध देशाची आजची अवस्था पाहून. याला इंग्रजांचे शासन जबाबदार आहे हे त्यांनी नाकारले नव्हते. ३० ऑक्टोबर १८९९ रोजी रिजले मॅनॉरहून पाठविलेल्या एका पत्रात त्यांनी आपल्या एका मित्राला सांगितले, ‘‘१८५७ आणि १८५८ साली इंग्रजांनी फार मोठ्या प्रमाणावर येथील लोकांची क्रूर कत्तल केली आणि इंग्रज शासनाचा अपरिहार्य परिणाम म्हणून या देशात भीषण दुष्काळ निर्माण झाले आणि त्यात लाखो माणसे मरण पावली. येथील संस्थानी राज्यांत कधीच दुष्काळ पडला नाही हे लक्षात घ्या!’’ मात्र, हे सांगत असतानाच या देशाच्या अवनतीची आजच्या महाभयंकर परिस्थितीची खरी कारणे त्यांना समजली होती. परकीयांची राजवट, परधर्मियांचे आक्रमण या सर्वांहून ही कारणे महाभयानक आहेत. किंवा या महाभयानक कारणांमुळेच या सनातन सभ्यतेचा आणि संस्कृतीचा र्‍हास झालाय; परधर्मियांचे आक्रमण, परकीयांची राजवट, दारिद्र्य, गरिबी, उपासमार हे सारं होतंय, हे त्यांनी फार दाहक शब्दात मांडले. आजची ही भयाण परिस्थिती बदलावयाची असेल तर या देशात संपूर्ण परिवर्तन, संपूर्ण क्रांती हवी हे त्यांनी सांगितले. सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, जातीय ही सारी समीकरणे एकमेकात गुंतलीत. फक्त एकालाच हात घातलात तर हा गुंता अधिक वाढेल. एकाच वेळी या सर्वांना समजावून घ्यायला हवे, याचे त्यांना, त्या काळाच्या फार पुढे असलेले भान होते. - संपूर्ण परिवर्तन हवे असेल तर या सर्वांची स्वच्छ निकोप मांडणी हवी. आपण आजही आश्‍चर्यचकित आणि भयचकितही व्हावे, अशी या सर्वांची मांडणी त्यांनी केली. ही सारी मांडणी व्यवहारात उतरावी म्हणून त्यांनी मठांची अभिनव प्रकारे स्थापना केली.

विज्ञान आणि वैज्ञानिक मांडणी मानणार्‍या स्वामी विवेकानंदांनी चार धार्मिक गोष्टी सांगितल्या. धर्माचे सनातन महत्त्व सांगितले. अशाश्‍वत मानवी जीवनाला धर्म हा शाश्‍वत आधार देतो, म्हणून धर्म आणि विज्ञान यांचे सहकार्य नव्हे, तर समन्वय हवा म्हणून सांगितले. त्याचबरोबर आजचे बहुतेक सारे प्रश्न धर्माची अधार्मिक मांडणी झाल्याने निर्माण झालेत म्हणून सांगितले. या देशाला नव्हे, तर सार्‍या जगाला सर्वधर्मसमभाव अत्यावश्यक आहे हे वैज्ञानिक भाषेत सांगितले.

मात्र, स्वामी विवेकानंद सर्वाधिक अस्वस्थ होते ते या देशाच्या अवनतीबद्दल. या देशाला सर्वधर्मसमभाव तर हवाच. मात्र, त्यापेक्षा अधिक गरज आहे ती या देशातील बहुजनांचा धर्म खर्‍या अर्थाने बहुजनांचा बनविण्याची. बहुजनांच्या धर्मातील उच्चवर्णीय, अनेक प्रकारे अनेक शतके बहुजनांची पिळवणूक करीत आले आहेत त्याबाबत त्यांनी प्रायश्चित्त घेतले पाहिजे. (हे असे प्रायश्चित्त घेण्यासाठी ‘आरक्षण’ ही एक अत्यावश्यक आणि प्राथमिक गरज आहे हे विवेकानंदांनी ११० वर्षांपूर्वी सांगितले. आजही आरक्षणाचे नाव काढतानाच भले भले अभिजन घाबरतात. आरक्षणाची अंमलबजावणी करू नका म्हणून आंदोलन करून अभिजनांची मुले सामाजिक सद्भाव धुळीला मिळवतात, कटुता वाढवतात. त्यांनी स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलंय ते जरा समजावून घ्यावयास हवे.)

स्वामीजींनी १८९७मध्ये कोलंबो ते अल्मोरा असा झंझावाती दौरा केला, त्यावेळी कुंभकोणम् येथे हिंदू विद्यार्थ्यांनी दिलेल्या मानपत्राला उत्तर देताना त्यांनी सांगितले, ‘‘ब्राह्मवृंदहो, आनुवंशिकतेच्या आधारावर ब्राह्मण जर चांडाळापेक्षा अधिक चांगले शिकू शकत असेल तर ब्राह्मणाच्या शिक्षणावर खर्च करण्याची जरुरी नाही. चांडाळाकरिताच सर्व खर्च करा. दुर्बलांना आधी सहाय्य करा, कारण त्यांनाच सहाय्याची गरज आहे. ब्राह्मण जन्मत: हुशार असेल तर मदतीवाचूनही तो आपले शिक्षण घेऊ शकेल; दुसरे जर जात्या हुशार नसतील तर त्यांनाच शिक्षण द्या, त्यांच्याकरिताच सर्व शिक्षक नियुक्त करा. हेच मला न्यायाचे व बुद्धीला पटणारे वाटते. आपल्या गरीब व दलित जनतेला आपण खरोखरच कोण आहोत हे कळले पाहिजे.’’ या दौर्‍यात मद्रास येथे जमलेल्या विराट जनसमुदायाला त्यांनी सांगितले, ‘‘आपल्या मृत्यूची पूर्वतयारी करणे हे प्रत्येक उच्च जातीचे कर्तव्यच आहे आणि जितक्या लवकर ती ते पार पाडेल तेवढे बरे. ती जेवढा विलंब लावेल तेवढी ती कुजेल व तिचा मृत्यू अधिक दु:खद रीतीने घडून येईल. म्हणूनच भारतातील अन्य जातींच्या उद्धाराचा प्रयत्न करणे हे ब्राह्मणांचे कर्तव्य आहे. ते जोवर हे कर्तव्य करीत राहतील तोवरच त्यांचे ब्राह्मणत्व व ते जर अर्थसंचयाच्या मागे लागले तर त्यांचे ब्राह्मणत्व संपले, असेच म्हणावे लागेल. ब्राह्मणांना माझे आवर्जून सांगणे आहे, की त्यांच्याजवळ असलेले ज्ञान भारतीय सामान्य जनतेला देऊन त्यांनी त्या लोकांच्या उन्नतीसाठी प्राणपणाने प्रयत्न केले पाहिजेत. खरे ब्राह्मणत्व म्हणजे काय, याची स्मृती जागृत ठेवणे हे भारतातील ब्राह्मणांचे कर्तव्य आहे...’’

‘आर्य आणि तामीळ लोक’ या आपल्या इतिहासप्रसिद्ध निबंधात त्यांनी आर्यांबाबतच्या तथाकथित सिद्धांताचे आणि त्यातून निघालेल्या दुष्ट उपसिद्धांताचे जाळे बाजूला फेकले. त्यानंतर थोर तामीळ लोकांच्या, म्हणजेच आर्यांच्या या महान पूर्वजांच्या भूतकालीन वैभवाच्या ज्ञानाद्वारे योग्य आत्माभिमान उपन्न करणे हे विशेषत: दक्षिणेतील लोकांसाठी एक अत्यंत आवश्यक असे कार्य आहे, हे सांगितले. मग त्याच निबंधात ते पुन्हा अगदी रोखठोकपणे या विषयाकडे वळले. त्यांनी लिहिले- ‘‘ब्राह्मणत्वाचा दावा करतो त्याने आपला हक्क दोन प्रकारे सिद्ध करावा - एक तर त्याने खरी आध्यात्मिकता प्रकट करावी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरेजनांचा स्तर उंचावून त्यांना आपल्यासारखे करावे; परंतु आज बहुसंख्य ब्राह्मण केवळ आपल्या जन्माच्या वृथाभिमानाचे संगोपन करीत बसले आहेत. त्यात, आणखी कोणी एखादा देशी किंवा विदेशी लटपट्या मनुष्य येतो, शब्दांची कसरत करून तो या ब्राह्मणांच्या गर्वाचे आणि आळशीपणाचे किळसवाणे समर्थन करतो आणि तेवढ्यानेच त्यांच्यापैकी बहुसंख्य ब्राह्मणांना समाधान वाटते.

... ब्राह्मणांनो सावधान! हे सर्वनाशाचे लक्षण आहे. उठा आणि आपला पुरुषार्थ दाखवा. एखाद्या मालकाच्या भावनेने नव्हे, अंधश्रद्धेने किंवा पौर्वात्य आणि पाश्‍चिमात्य वैदूंच्या दांभिकतेने भरलेल्या सडक्या अहंकाराने नव्हे, तर सेवकाच्या भावनेने हे कार्य करण्यास सिद्ध व्हा...तुमच्या या वागणुकीमुळे ब्राह्मणेत्तर लोकसुद्धा जातिद्वेषांची आग भडकविण्यात आपल्या शक्तीचा अपव्यय करीत आहेत. जातीजातीतील ही भांडणे जर अशीच चालू राहतील, तर प्रगतीच्या मार्गावर आपल्याला एकसुद्धा पाऊल टाकता येणार नाही. त्याउलट लोककल्याणाच्या मार्गावर आपणाला जी वाटचाल करावयाची आहे त्यात अनेक शतकांची पीछेहाट होईल... बौद्धांच्या राजनैतिक घोडचुकांची ती पुनरावृत्ती होईल!’’

स्वामी ब्रह्मानंदांना १८९५मध्ये लिहिलेल्या विस्तृत पत्रात त्यांनी सांगितले, ‘‘... दुसर्‍या शब्दांत सांगावयाचे म्हणजे, चांडाळाला शिक्षणाची जितकी गरज असते तितकी ब्राह्मणाला नसते. त्याला अधिक मदत करण्याची गरज आहे. गोरगरीब, पददलित, अज्ञानी यांनाच तुम्ही आपला ईश्वर माना. त्यांना ब्राह्मणांपेक्षा अनेक पटीने अधिक शिक्षणाची आणि नोकरीची गरज आहे...’’

आपणाला आश्चर्य वाटावी अशी गोष्ट म्हणजे आरक्षणाचा प्रश्न त्यावेळी कुठेच क्षितिजावर नव्हता, (राजर्षी शाहू महाराजांनी आपले आरक्षण धोरण जाहीर केले तेसुद्धा त्यानंतर, म्हणजे २६ जुलै १९०२ रोजी) आणि जातींच्या या जीवघेण्या समस्येला स्वामीजी अनेक अंगांनी भिडत होते. स्वामीजींची त्यांच्या मठात शिष्यांबरोबर झालेली संभाषणे आणि संवाद प्रियनाथ सिंह यांनी संकलित केले होते. ते ‘उद्बोधक’ नामक बंगाली मासिकात प्रसिद्ध होत असत. स्वामीजींनी सांगितले, ‘‘बहुजन समाज अगदी हलक्या जातीचा आहे. आपण उच्चवर्णीयांनी या लोकांवर युगानुयुगे जुलूम केला, पावलोपावली त्यांना पायाखाली तुडविले. त्यामुळे ते आपले मनुष्यत्व गमावून बसले आहेत... आणि आपल्यापैकी उच्चविद्याविभूषित व्यक्ती सभा-समित्या स्थापन करतात आणि तेथे जोरजोराने ओरडतात - हाय! हाय! दिवसेंदिवस हिंदुस्थानचा नाश होत आहे. इंग्रज राज्यकर्त्यांनो, आम्हांला शासनातील श्रेष्ठ अधिकाराच्या जागा द्या, आमच्या देशाला दुष्काळापासून सोडवा... जातीने ब्राह्मण असणे आणि ब्राह्मण्याचे गुण अंगी असणे या अगदी भिन्न गोष्टी आहेत. भारतात जातीवरून ब्राह्मण म्हणून मान्यता मिळते, पण पाश्‍चिमात्य देशात गुणावरूनच ब्राह्मण ठरवले जातात...सर्वांनाच ब्राह्मण बनविणार, ही आपली प्रतिज्ञा हवी. ब्राह्मण बनणे म्हणजे विदेशी लोकांच्या नियंत्रणाशिवाय, आपल्या प्राचीन ज्ञानशाखांचा अभ्यास करणे; पण त्याचबरोबर इंग्रजी भाषा आणि पाश्चिमात्य विज्ञान यांचा अभ्यास अत्यावश्यक आहे. आपल्या येथे उद्योगधंद्यांची वाढ होण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे ते सर्व तांत्रिक शिक्षण आपण घेतले पाहिजे. तसे झाले तर आपण लोक नोकर्‍यांच्या मागे न लागता छोटे छोटे उद्योग सुरू करू. देशाचे दारिद्र्य त्यामुळे कदाचित थोडे कमी होईल...’’

युरोपच्या प्रवासात विवेकानंद दैनंदिनी लिहीत होते. त्यात हेच विचार आहेत, ‘‘... युरोपातील खालच्या गरीब वर्गात जेव्हा विद्येचा प्रवाह वाहू लागला तेव्हाच युरोपची प्रगती होऊ लागली. घरातील घाण बाहेर फेकावी तसे, देशोदेशीचे बाहेर ढकललेले अनेक दु:खी व गरीब लोक अमेरिकेत येतात. त्यांना तेथे आश्रय मिळतो आणि ते लोकच अमेरिकेचा कणा बनतात. श्रीमंत माणसे व विद्वान लोक तुमचे म्हणणे ऐकोत, वा न ऐकोत ते तुमची स्तुती करोत किंवा निंदा करोत, त्याला काहीएक महत्त्व नाही. ते लोक म्हणजे नुसत्या अलंकारासारखे आहेत. नुसती बाहेरची शोभा आहेत. खालच्या वर्गातील लाखो-करोडो गरीब लोक हेच देशाचा प्राण आहेत. त्यांच्यासाठी सर्व काही करूया. होऊ द्या विरोध. - जितका विरोध होईल तितका चांगला. अडथळा आल्याशिवाय का नदीला वेग प्राप्त होतो?’’

इ.स. १८९८मध्ये बेलूर येथील भाड्याच्या जागेत मठ सुरू होत होता. स्वामीजींनी आपल्या शिष्यांना सांगितले, ‘‘... परदेशात जातीपातीची भानगडच नसते. उद्योग व परिश्रमामुळे भाग्यलक्ष्मी ज्यांच्यावर प्रसन्न होते तेच देशाचे नेते व नियंते असतात. आणि तुमच्या देशात तुम्ही जातीची बढाई करूनच या देशाला अन्नाला मोताद केलंय. एक सुई बनवायची म्हटली तरी अक्कल नाही. कुणी काही परीक्षा दिल्या वा भाषणांची आतषबाजी केली की तो आपल्या दृष्टीने मोठा. ‘जन्माला आलो आणि मरून गेलो’ या विधानाचे तुम्ही जणू मूर्तिमंत उदाहरण आहात. शेतकरी, चांभार, भंगी यांची कर्मप्रवणता व आत्मनिष्ठा आपल्यापैकी अनेकांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. आजपावेतो तुम्ही या दलित जातींना पायदळी तुडविलेत. श्रमजिवी लोकांनी काम करण्याचे नाकारले तर तुम्हाला खायला अन्न की ल्यायला वस्त्र मिळणार नाही. ही वस्तुस्थिती असूनही तुम्ही त्यांना हलक्या जातीचे मानता. कलकत्त्यामधील भंग्यांनी तीन दिवस काम करण्याचे नाकारले तर ते शहर साथींच्या रोगांनी उजाड होईल; आणि त्यांची सावली पडली तर तुम्हाला विटाळ होतो. आता मठाच्या बाहेर पडा. त्यांना समजावून सांगा. तुमच्या कृतीने त्यांना पटवून द्या, की ते तुमचे भाऊ आहेत. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल घृणा नाही तर आदर व प्रेम आहे. आधुनिक विज्ञानाच्या मदतीने त्यांच्या ज्ञानाची वाढ करा. इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, साहित्य याचबरोबर त्यांना धर्मातील गूढतत्त्वे पण शिकवा. या लोकांना आपल्यासारखे ज्ञानी बनविणे व त्यांचे रास्त हक्क मिळवून देणे हे तुमचे आज आद्य कर्तव्य आहे. समाधीअवस्था भोगण्यापेक्षा हे महत्त्वाचे आहे....’’

इ.स. १८९८च्या अखेरीस बेलूर मठाची बांधणी जोरात सुरू होती. त्यावेळी आपल्या शिष्यांना स्वामी विवेकानंदांनी सांगितले, ‘‘सुदीर्घ काळापासून देशातील खालच्या जातींच्या लोकांची घृणा करता करता आता तुम्ही सारेच जण जगाच्या दृष्टीने घृणास्पद झाला आहात. तुम्ही ब्राह्मणांनीच धर्मशास्त्राचा मक्ता घेऊन भारतातील इतर जातींना हीन हीन म्हणून हिणवून हिणवून अखेर त्यांची खरोखरीच धारणा करून दिलीत, की ते खरोखरच हीन आहेत. उठता-बसता, खाता-पिता जर एखाद्या माणसाला ‘तू हीन, तू हीन’ म्हणून सतत हिणवत राहाल तर कालांतराने अखेर त्याला वाटू लागेल, की आपण खरोखरीच हीन आहोत. तुम्ही केवळ येथेच थांबला नाहीत, स्वार्थाने प्रेरित होऊन आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी कितीतरी चमत्कारिक, अवैदिक, अनैतिक, तर्कहीन मते प्रसृत केलीत. भारतातील सर्वसाधारण लोकांची ब्राह्मणांनी जी घृणा केली, केवळ तिचेच फळ म्हणून आपण आज हजारो वर्षे गुलामी भोगत आहोत. मी सारा भारतवर्ष पालथा घातला आहे. मलातरी श्रुतिस्मृतींनी निंदिलेल्या रूढींनीच समाज नियंत्रित होत असल्याचे आढळून आले आहे. त्यातून पैसे दिले की वाटेल तो विधी फिरवावयास भटाभिक्षुकांची तयारी असते. - वेदकालीन सारे प्राचीन नियम आज व्यवहार्य ठरणार नाहीत; पण ते समाजोपयोगी करण्यासाठी त्यांच्यात काही काटछाट करून, नवीन साच्यात घालून घडवून घेऊन, त्यांना स्मृतीचे रूप देऊन ते प्रचलित केले पाहिजे. कारण बहुसंख्य माणसांना शेवटी धर्म हवा असतो. मी एक सांगतो ते नीट लक्षात ठेवा. या देशाची दशा आणि भवितव्य पाहून स्वस्थ बसून राहता येणे मला शक्य नाही. तुम्हालापण शक्य असता कामा नये. या देशाची दशा पाहिली की समाधी वगैरे गोष्टी अगदी तुच्छ वाटू लागतात. ‘तुच्छं ब्रह्मपदं’ अशी भावना हवी. लोकांचे कल्याण हे आपले जीवनव्रत असले पाहिजे. ज्या दिवशी हे व्रत अशक्य वाटेल त्या दिवशीच देह सोडून देऊन सरळ निघून जाईन...’’

३० मे, १८९७ला अल्मोडा येथून स्वामी विवेकानंदांनी श्री. प्रमदादास मित्र यांना अखेरचे पत्र पाठवले. प्रमदादास त्यावेळच्या सनातनवृत्तीचे प्रतिनिधित्व करायचे. आपल्या या अखेरच्या पत्रात स्वामीजींनी आपले विचार अगदी जहाल शब्दांत त्यांना सांगितले. स्वामीजी लिहितात, ‘‘...जातिकल्पना हाच मोठ्यात मोठा विभाजक घटक आहे, ही कल्पना माझ्या मनात दिवसेंदिवस बळावू लागली आहे. कोणतीही जाती, मग ती जन्मगत असो की गुणगत असो, व्यक्तीला व समाजाला बंधनच आहे... माझ्याबाबत म्हणाल, तर चिंता करू नका. मी शूद्र आहे. मी म्लेंच्छ आहे. त्यामुळे उच्चवर्णीयांसाठी असलेल्या तुमच्या धर्माचे विधिनिषेध माझ्यासाठी नाहीत. मला परदेशप्रवास काय, समुद्रप्रवास काय, म्लेंच्छांचे अन्न काय अगर चांडाळाचे अन्न काय, सारे सारखेच. पण मी सांगतो, धर्मग्रंथांचा पूर्णपणे अभ्यास केल्यावर सांगतो, ते लक्षात घ्या. जातिभेद इत्यादी खुळचट कल्पना पुरोहितवर्गाने लिहिलेल्या ग्रंथातूनच सापडावयाच्या, ईश्वरप्रणीत ग्रंथात त्या सापडत नाहीत. मला दुसरे एक सत्य जाणवले आहे ते असे, की परोपकार हाच धर्म होय. विधिअनुष्ठाने इत्यादी सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ खुळेपणा होय. - इतकेच नव्हे, तर स्वत:च्या मुक्तीची इच्छा बाळगणे, हेही चूक आहे. जो समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करतो तोच मुक्त होतो. उलट जे लोक ‘माझी मुक्ती’, ‘माझा मोक्ष’ असा अहोरात्र जप करतात ते नुसते भटकत असतात.’’ पत्राच्या शेवटी स्वामीजींनी लिहिले होते, ‘‘माझे हे विचार ऐकूनही आपली मैत्री कायम राहिली तर मला आनंद होईल.’’ - स्वामीजींच्या या पत्राला उत्तरही आले नाही, हे आपण समजू शकतो; पण प्रभुदास मित्रा यांच्याबद्दल अतीव आदर मनात ठेवून, त्यांना पूज्यपाद म्हणून संबोधित, स्वामी विवेकानंदांनी धर्मशास्त्राच्या आधारे जातींचा फोलपणा उघड व्हावा म्हणून फार भेदक प्रश्न विचारले किंवा प्रश्न विचारतानाच पत्रात लिहिले, ‘मधमाश्यांच्या पोळ्याला कशाने तरी टोचल्याशिवाय मध बाहेर पडत नाही. यास्तव मी आपणाला आणखी काही प्रश्न विचारणार आहे. मला बालक व अज्ञ समजून राग न मानता योग्य उत्तरे देण्याची कृपा करावी.’ हे असे सांगून त्यांनी विचारलेले प्रश्न भेदक आहेत, दाहकही आहेत.

वराहनगर, कलकत्ता येथून ७ ऑगस्ट १८८९ला पाठविलेल्या पत्रात ते विचारतात-

१. शंकराचार्य वेदान्तसूत्रांवरील आपल्या भाष्यात जिथे जिथे स्मृतीचा उल्लेख करतात तिथे तिथे ते प्रामुख्याने महाभारताचेच प्रमाण देतात; परंतु महाभारतातील वनपर्वाच्या अजगरोपाख्यानात उमा-महेश्वर संवादात, तसेच भीष्मपर्वात, जातिभेद हा गुणगत आहे असा स्पष्ट उल्लेख आहे. शंकराचार्यांनी या गोष्टींचा उल्लेख आपल्या ग्रंथात कोठे केला आहे काय?

२. वेदातील पुरुषसुक्तानुसार जातिभेद हा जन्मगत नाही, मग जातिभेद हा जन्मगत आहे, असा उल्लेख वेदांमध्ये कुठे कुठे आढळतो?

३. शूद्राला वेदाध्ययनाचा अधिकार नाही, याबद्दल वेदांचे प्रमाण शंकराचार्य कोठेही देऊ शकलेले नाहीत.
केवळ ‘यज्ञेऽनवक्लृप्त:’ (शूद्र हा वैदिक यज्ञ करण्याचा अधिकारी मानला जात नाही) हे प्रमाण उद्धृत करून ते म्हणतात, की ज्याअर्थी शूद्राला यज्ञ करण्याचा अधिकार नाही त्याअर्थी उपनिषदांच्या अभ्यासाचाही त्याला अधिकार नाही. पण ते स्वत:च ‘अथातोब्रह्मजिज्ञासा’ (आता यानंतर या कारणास्तव ब्राह्मजिज्ञासा प्रारंभ होतो) या सूत्राचे स्पष्टीकरण देताना ‘अथ’ शब्दाचा अर्थ ‘वेदाभ्यासानंतर’ असा नाही, असे म्हणतात. कारण, वैदिकमंत्र व ब्राह्मणे यांचे अध्ययन केल्यावाचून उपनिषदांचा अभ्यास होऊ शकत नाही, या म्हणण्याला काही प्रमाण नाही. तसेच वैदिक कर्मकांड व वैदिक ज्ञानकांड यामध्ये कोणताही अनुक्रम वा संबंध नाही. यावरून हे स्पष्ट आहे, की यज्ञात्मक वैदिक कर्मकांड न वाचता उपनिषदांचे अध्ययन करून कोणालाही ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेता येते. याप्रमाणे कर्मकांड व ज्ञानकांड यांमध्ये जर संबंध वा क्रम नाही, तर मग फक्त शूद्रांच्याच बाबतीत ज्ञानपूर्वकम् (त्याच न्यायाने) इत्यादी शब्दप्रयोग करून, आचार्य स्वत:चेच मत का म्हणून खोडून काढतात? शूद्रांनी उपनिषदांचा अभ्यास का करू नये?

१७ ऑगस्ट, १८८९ला प्रमदादास यांना पाठविलेल्या पत्रात स्वामी विवेकानंद आणखी पुढे गेले. त्यांनी सांगितले, ‘‘स्पार्टा देशातील लोकांनी तेथील गुलामांवर वा अमेरिकन लोकांनी तेथील निग्रोंवर जेवढे अत्याचार केलेत, त्यापेक्षा जास्त अत्याचार आपल्या देशातील शूद्रांवर केले गेले आहेत याबाबत संदेह नसावा. जर एखाद्याला कर्माच्या व गुणांच्या पलीकडे जावयाचे असेल तर त्याने जातिभेदाची कल्पना मनालादेखील शिवू देऊ नये. असली कल्पना बाळगल्यास त्याची व समाजाची फार मोठी हानी होईल. या सर्व बाबतीत गुरुकृपेने माझी काही निश्‍चित मते बनली आहेत. - पण आपली विचारसरणी कळली तर बरे होईल.’’ आणि एवढे लिहून मग त्यांनी सनातन धर्माला हादरवणारे ते भेदक तीन-चार प्रश्न विचारले,

१. ‘आप्तोपदेशवाक्य: शब्द’ अर्थात ब्रह्मज्ञ ऋषींची वाणी म्हणजेच शब्द हे वेद होत, असे ज्ञानमय आपणाला सांगते. या दृष्टीने आपले ऋषी हे सर्वज्ञ होत. मग खगोलशास्त्राच्या साध्या साध्या प्रयोगसिद्ध नियमांनी त्यांना अज्ञ ठरवले ते कसे काय? पृथ्वी त्रिकोणी असून ती वासुकीच्या मस्तकावर ठेवलेली आहे, इत्यादी जे सांगतात त्यांच्या बुद्धिरूपी नौकेचा आश्रय घेऊन तुम्ही, मी व आपला समाज भवसागराच्या पलीकडे कसे जाणार?
२. जे कपाळी लिहिले आहे तेच जर घडणार असेल, तर ‘जय दुर्गे श्री दुर्गे’ म्हणून टाहो फोडण्यात काय अर्थ?
३. एखाद्या मुद्यासंबंधी पुष्कळशी समान अवतरणे, एक-दोन विरुद्ध अवतरणाने खोडून काढणे अयोग्य होय. हे जर खरे असेल तर ‘मधुपर्कादी’ ही वेदातील चिरप्रचलित प्रथा आपणाला माहीत आहे. या प्रथेत गोवधाची आवश्यकता आहे. या प्रथेनुसार अतिथीच्या सत्कारासाठी अनेक पक्वान्ने तयार करण्यात येत. त्यात त्यामध्ये गोमांसापासून तयार केलेली पक्वान्ने असत. आता ‘अश्‍वमेधं गवाळभ्यं संन्यासं पलपैतृकम। देवरेण सुतोत्पति: कलौ पंच विवर्जयेत्।’ अर्थात, अश्‍वमेध, गोवध, मांसपिंडदान, संन्यासग्रहण व पती असमर्थ असल्यास दिराच्या द्वारे प्रजोत्पत्ती ही पाच कर्मे कलियुगात निषिद्ध आहेत असं म्हटलंय. म्हणून मग गोवध व संन्यासग्रहण या गोष्टी निषिद्ध का मानावयाच्या?
४. ज्या ईश्वरापासून आपल्याला वेद मिळाले त्यानेच नंतर बुद्ध होऊन वेदांचे खंडन केले. मग या दोहोंपैकी कोणाच्या आदेशाचे पालन करावे?’’

स्वामी विवेकानंदांनी या सनातन सभ्यतेच्या आणि संस्कृतीच्या आजच्या विपन्नावस्थेला कारणीभूत असलेली एक प्रमुख किंवा जवळजवळ एकमेव गोष्ट शोधली होती. इ.स. १८९७मध्ये लाहोर येथे ‘हिंदू धर्मातील सामान्य आधारभूत तत्त्वे’ या विषयावर दिलेल्या त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितले होते- ‘‘जातिभेदासंबंधीच्या जटिल समस्येवर सर्व बाजूंनी विचार करीत आलो आहे. भारतभरच्या जवळजवळ सर्व प्रांतात या समस्येचे काय रूप आहे ते मी पाहिले आहे. ह्या देशातील प्रत्येक भागातील सर्व जातींच्या लोकांमध्ये मी मिसळलो आहे. या जातिव्यवस्थेच्या उद्दिष्टांचा व तिच्या कारणांचा मी जितका अधिक खोल अभ्यास करतो, तितका मी अधिक दिङ्मूढ होऊन जातो.’’ म्हणजे आजन्म अस्वस्थ होऊन केलेल्या प्रवासातून आणि चिंतनातून स्वामीजींनी वर सांगितलेली कार्यपद्धती निवडली होती. या देशाच्या आजच्या दैन्यावस्थेला, शूद्र मानून बहुसंख्य लोकांना दिलेली हीन वागणूक कारणीभूत आहे, हे त्यांनी सांगितले. प्रायश्चित्त म्हणून तुम्हाला काय करावयास हवे, हे उच्चवर्णीयांना सांगितले. हे कार्य करण्यासाठी आपल्या मठातील संन्यासांना तयार केले. आपण आयुष्यात काय केले हे सांगताना त्यांनी एकदा सांगितले, ‘‘बुद्धदेवांनंतर आज प्रथमच या मठातून ब्राह्मण तरुण कॉलर्‍याने आजारी असलेल्या भंग्यांची सेवा करण्यासाठी बाहेर पडले आहेत.’’

मात्र ही प्रबोधनाची लढाई लढत असताना धर्माचा आधार घेऊन धर्मातील अपप्रवृत्तींवर आघात केलात तरच तो समाजात पोहोचेल व रुजेल, हे त्यांचे सूत्र होते. विशुद्ध स्वरूपातील धर्म हा मानवाचा व मानवी समाजाचा प्रमुख आधार आहे, हे त्यांचे मत होते. राजा राममोहन रॉय यांच्यापासून सर्व समाजसुधारकांचे प्रयत्न फसले, कारण त्यांनी धर्मातील अपप्रवृत्तीवर नव्हे तर धर्मावर आघात केला, हे त्यांनी अनेकदा सांगितले; आणि हे असे वाटत असल्यामुळेच परिवर्तनाची लढाई लढत असतानाच प्रमदादासांबरोबर त्यांनी पत्रव्यवहार केला. शास्त्री-पंडितांबद्दल आदर ठेवून त्यांच्याशी शास्त्राच्या आधारे वादविवाद करण्यास आपला वेळ घालविला. या लढाईत विवेकानंद संत तुकारामांच्या जवळ आहेत. तुकारामांनी ‘वेदा निंदी तो चांडाळ, दुष्ट सुतकीया खळ’ म्हणून सांगितले. नंतर ‘वेदाची जो निंदा करी मातेची तो थाने फाडी’ म्हणूनही सांगितले आणि मग समोरच्या ब्रह्मवृंदाला सुनावले, ‘वेदाचा तो अर्थ, आम्हासची ठावे! येरांनी वाहावा भार माथा!’ तुकारामांनी ब्राह्मणांचे मोठेपण नाकारले नाही. पण पुढे सांगितले, ‘महाराच्या स्पर्शे कोपे तो ब्राह्मण नव्हे! ज्याचा स्पर्श चित्ती, तुका म्हणे तो त्या याती!’ आणि तुकाराम त्यानंतर आणखी असेच पुढे गेले आणि त्यांनी परमेश्वराला सांगितले, ‘गुण-अवगुण हे दोन्ही प्रमाण, यातीशी कारण नाही देवा।’ विवेकानंदांनी पुढे जो ‘अद्वैत वेदान्त’ सांगितलाय तोपण खरंतर तुकारामांनी सांगितलाय. पंढरपूरच्या विठोबासमोर उभे असताना, मागून येणार्‍या वारकर्‍यांना त्यांनी सांगितले, ‘‘पाषाण देव, पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी! सार तो भाव, सार तो भाव, अंतरिचा देव वोळखावा।’’

एक गोष्ट मात्र खरी, परदेशात हिंडत असताना जातिव्यवस्थेबाबत बोलत असताना स्वामी विवेकानंदांनी काही लक्ष्मणरेषा पाळल्या. ‘ब्रुकलिन स्टँडर्ड युनियन’मध्ये ८ एप्रिल १८९५ रोजी भाषण देताना त्यांनी सांगितले, ‘‘स्पर्धा टाळण्याच्या प्रयत्नात जातिसंस्थेने स्थितिशीलता निर्माण केली आणि लोकांची प्रगती पूर्णपणे खुंटवली. पशुता नाहीशी करण्याच्या प्रयत्नात तिने सामाजिक सुधारणा थांबवली. स्पर्धेला आळा घालण्याच्या प्रयत्नात तिने लोकसंख्या वाढवली. तिच्या बाजूने असे म्हणता येईल, की एका अर्थाने ती समता व बंधूता याच्या बाबतीत आदर्श आहे. कोणत्याही जातीत सामाजिक दर्जाशी धनाचा काही संबंध नसतो. जातीतील सर्व लोक समान असतात. सर्व थोर समाजसुधारकांचा दोष हा, की जातिसंस्थेचे खरे मूळ, जी विशिष्ट सामाजिक परिस्थिती, तिला जबाबदार न धरता जातिसंस्था ही धार्मिक प्रतिनिधित्वामुळे उत्पन्न झाली, असे मानले आणि बोलघेवड्या सामाजिक सुधारकांनी जातिव्यवस्था नाहीशी करण्यासाठी आवश्यक असलेली कठोर उपाययोजना पुढे मांडली नाही.’’

सोमवार, १९ मार्च १९०० रोजी ऑकलंड येथे दिलेल्या भाषणानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी सांगितले, ‘‘बापाचा धंदाच मुलाने करण्याच्या प्रथेतून ही जातिव्यवस्था विकसित झाली. कालांतराने संपूर्ण समाज हा अनेक वर्गात विभागला गेला. प्रत्येक वर्गाची बंधने कडक असत; पण त्यामुळे समाज विभागला गेला, तरी एका अर्थाने लोकांच्यात ऐक्यही निर्माण झाले. कारण एका जातीचे लोक त्या जातीतील व्यक्तीला गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी बांधले गेले. जातिव्यवस्थेतील अत्यंत वाईट भाग हा आहे, की धंदा एकाच जातीत, जातीत ऐक्य, एकमेकांना मदत, त्यामुळे स्पर्धावृत्ती मारली गेली. एकमेकातील स्पर्धेमुळे होणारे व्यवसायांचे आधुनिकीकरण, नूतनीकरण झाले नाही.’’ आणि एकदा जातिव्यवस्थेने केलेली सर्वांत चांगली गोष्ट सांगताना ते म्हणाले, ‘‘अनेक आक्रमणात आणि विपन्नावस्थेत आमची संस्कृत भाषा आणि वेद-उपनिषदे शाबूत राहिले. कारण ब्राह्मणांना जातिव्यवस्थेत केवळ तेवढेच करावयाची परवानगी होती.’’

आणि ब्राह्मण आणि दलित दोघेही रागावतील; पण दोघांनीही आपले दोष, आपल्या चुका समजावून घेतल्या पाहिजेत, हे त्यांनी मद्रासमधील गाजलेल्या भाषणात सांगितले. स्वामी विवेकानंद म्हणाले, ‘‘माझ्या मते भारतातील जातिसमस्या सोडविण्याचा उपाय पुढीलप्रमाणे आहे. उच्च जातीचे पतन घडवून आणणे वा ब्राह्मणांचा उच्छेद करणे हा काही उपाय नव्हे. इतर जातींना ब्राह्मणांच्या बरोबरीने आणण्याचा मार्ग शोधा. त्यांचे अनुकरण करा. माझ्या मित्रांनो, जातीजातीतील भांडणे योग्य नाहीत. त्यामुळे कोणाचा फायदा होणार आहे? त्यामुळे आपण अधिक विभागले जाऊ. अधिक दुर्बल होऊ. अधिक अधोगतीस जाऊ. जन्मजात हक्कांचे व विशेष अधिकारांचे दिवस आता संपले आहेत. भारतातील ब्रिटिश शासनाचे हे वरदानच म्हटले पाहिजे. या जातिविशिष्ट अधिकारांना नष्ट करण्याचे श्रेय मुसलमान शासकांनाही दिले पाहिजे. तसे पाहिले तर त्यांचे शासन पूर्णपणे वाईट नव्हते. कोणतीही गोष्ट सर्वस्वी वाईट वा सर्वस्वी चांगली नसते. भारतावर मुसलमानांनी मिळविलेला विजय गरिबांच्या व दलितांच्या उन्नतीस कारणीभूत झाला. म्हणूनच आपल्यापैकी एक-पंचमांश लोक मुसलमान बनले. केवळ तलवारीने हे घडलेले नाही. तलवार व बंदुका यांनीच हे सर्व घडून आले असे समजणे हा कमालीचा वेडेपणा ठरेल. आणि तुमच्या मद्रासमधील एक-पंचमांश नव्हे, अर्धेअधिक लोक, तुम्ही बेफिकीर राहिलात तर ख्रिस्ती बनतील. मलबारमध्ये मी जे पाहिले त्यापेक्षा मूर्खपणाची गोष्ट या जगात कोठे आढळणार नाही. ज्या रस्त्याने उच्चवर्णीय लोक जातात त्याच रस्त्याने जाण्यास बिचार्‍या ‘परिया’ला (चांडाळाला) परवानगी नाही; पण तो ख्रिस्ती बनला तर सर्व काही ठीक!... बंगालमध्ये अशी एक जुनी समजूत आहे, की एखाद्याला चावा घेणार्‍या सापाने आपले विष स्वत:च परत शोषून घेतले तर तो माणूस वाचतो. तद्वतच ब्राह्मणाने आपले विष स्वत:च शोषून घेतले पाहिजे. ब्राह्मणेतर जातींना माझी विनंती आहे, की ब्राह्मणांशी कलह करण्याची संधी शोधू नका. कारण तुम्ही पण दोषी आहात. परकीय राजवटीत शिक्षण आणि द्रव्यार्जन यांची उपेक्षा करावयास तुम्हाला कोणी सांगितले होते काय? हा सर्व काळ तुम्ही काय करीत होता? तुम्ही उदासीन का राहिलात? आणि आता काही लोकांना तुमच्यापेक्षा अधिक बुद्धिमत्ता, अधिक शक्ती, अधिक मानमरातब आहे म्हणून तुम्ही त्रागा व संताप कशाला करीत बसता? आपल्या जवळची शक्ती अशा प्रकारच्या व्यर्थ कलहात व वृत्तपत्रीय वादात अजिबात खर्च करू नका. आपल्याच घरात भांडत बसू नका. कारण ते पाप आहे. त्याऐवजी आपली सर्व शक्ती ब्राह्मणांजवळ असलेल्या गोष्टी मिळविण्यात खर्च करा. अर्थात, अधिक जबाबदारी ब्राह्मणांची आहे. या कार्यात त्यांनी तुम्हाला सर्व मदत करावयास हवी.’’

प्रबोधनाची आणि परिवर्तनाची लढाई लढणार्‍यांना, ‘इष्ट आहे ते स्पष्टपणे सांगेन’ असे मानून ते कृतीत परिवर्तित करण्याची हिंमत, कुवत आणि ताकद लागते. आरक्षणाच्या प्रश्नात शंभराहून अधिक वर्षापूर्वी स्वामी विवेकानंदांनी हे केले. आरक्षण हा या देशातील कळीचा प्रश्न आहे हे त्यांनी सांगितले. ब्राह्मणांना आणि उच्चवर्णियांना, या अवनतीला, महाभयानक परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात, हे विष समाजजीवनात तुम्ही ओतलंय, शंकरासारखे हलाहल पचवून ते नाहीसे करा, म्हणून सांगितले. धर्ममार्तंडाना आणि शास्त्रीपंडितांना, तुम्ही चुकीचे अर्थ लावत आहात, हे पटवून दिले. धर्माच्या नावावर विद्वेष पसरविणार्‍यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि दलितांना आणि शूद्रांना मनातील कटुता काढा, हिंसेत त्यांचे परिवर्तन होऊ देऊ नका, स्वत:च्या चुका शोधा, म्हणूनही सांगितले. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा हा विशेष आहे. प्रश्‍नाला सर्व बाजूंनी भिडल्यावर स्पष्टपणे बोलण्यास ते कधीही कुठेही कचरले नाहीत. हे त्यांनी सर्व प्रश्नांवर देशात आणि विदेशातही केले. खरे पाहता, असे करणारे आणखी काहीजण वेगवेगळ्या क्षेत्रात असतात. विवेकानंदांचे वेगळेपण आणि आश्चर्यकारक, अनाकलनीय वाटावे असे मोठेपण हे, की विवेकानंद घणाघाती टीका करीत असताना, ज्यांच्यावर ही टीका होत होती, तो समोरचा अफाट जनसमुदाय हे सारे निमूटपणे ऐकून घेत असे. - देशात आणि परदेशातही!

***

शोध स्वामी विवेकानंदांचा

लेखक - डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर
मनोविकास प्रकाशन
किंमत - रुपये २२०
पृष्ठसंख्या - २५२

***

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी निम्मा अधिक लेख वचला मला खूप आवडला पण तुम्ही तो खूप मोठा लिहिलात म्हणून आज इतकाच वाचू शकलो बाकी नंतर कधीतरी
पण एक नक्की की विवेकानंद बाबासाहेब आंबेडकर , सावरकर अशी फार थोडी माणसे ज्यांनी व्यक्ती ,समाज , राष्ट्र
ह्यांबाबत जी चिंतने माण्दली ती केवळ आणि केवळ अनुकरणीय अहेत
मला ही तीन माणसे फार आवडतात
लेख पूर्ण वाचून झाला की प्रतिसाद देइनच ,

लेखासाठी धन्यवाद
आपला नम्र
वैवकु

लेख बराच मोठा आहे, म्हणून सगळा वाचला नाही. जमेल तेव्हा नक्की वाचेन. कदाचित दोन भागांत आला असता तर वाचायला सोपं गेलं असतं.

तोवर दाभोळकरांनी नेमकं काय 'नवं' सांगितलं आहे विवेकानंदांबद्दल हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. बरेच परिच्छेद वरवर पाहिले - ते विवेकानंद वाड्मयातले दिसताहेत (वाचले असल्याने माहिती आहेत) म्हणून हा प्रश्न.

आतिवास,

<तोवर दाभोळकरांनी नेमकं काय 'नवं' सांगितलं आहे विवेकानंदांबद्दल हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. बरेच परिच्छेद वरवर पाहिले - ते विवेकानंद वाड्मयातले दिसताहेत (वाचले असल्याने माहिती आहेत) म्हणून हा प्रश्न.>

हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे. तुम्हीच वाचून याबद्दल इथे लिहू शकता. Happy

चिनूक्स, धन्यवाद.
हे पुस्तक वाचले आहे. खुप आवडले. पण एखाद दोन वेळा काही मुद्दे समजण्यात गोंधळ झाला असे वाटले. पण पुस्तक परत करायचे असल्याने दुसर्‍यांदा वाचता आले नव्हते. आता इथुन खरेदी करुन वाचेन.

खूप छान लिहिलं आहेस चिन्मय.

मी जिथे योगाभ्यासाचे वर्ग घेतो तिथे अर्थात रामकृष्ण मिशनमधे विवेकानंदांचे आठी खंड विक्रिला उपलब्द्ध आहेत. विवेकानंदांनी जी भाषणे दिलीत. जी पत्रे लिहिलीत. जी प्रवचने केलीत. ती सर्वच ईंग्रजी भाषेत होती. त्यामुळे त्यांच्या शब्दातून त्यांचे विचार वाचताना ते किती प्रभावी होते ह्याची एक दोन वाक्यातच प्रचिती येते.

मला जर वेळ मिळाला तर मी आठी खंड वाचेल.

योद्धा संन्यासी !
ज्याच्या विचारांचे आणि कार्याचे महत्व जगाला जेवढ्या प्रमाणावर समजायला हवे होते तेवढे समजले नाही असे खुपवेळा वाटते. Sad

.