इडली रव्याचे उप्पीट

Submitted by सुलेखा on 25 January, 2014 - 05:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आपण नेहमी जाड / बारीक रव्याचे उप्पीट करतो.त्याच प्रमाणे हे इडली रव्याचे उप्पीट आहे.त्यात ताक घातल्याने वेगळी चव येते.जर ताक घालायचे नसल्यास लिंबाचा रस घालावा.इडली रवा तांदूळाचा करतात.बर्‍याच जागी मक्याचा रवा मिळतो,त्याचेही उप्पीट चवीला छान लागते.ते करताना तांदूळाच्या रव्यापेक्षा पाणी थोडेसे कमी लागते.
१ १/२ वाटी इडली रवा किंवा तांदुळाचा रवा,
२ हिरव्या मिरच्या,
आवडत असल्यास अर्धा चमचा किसलेले आले,
१ लहान कांदा बारीक चिरलेला,
मटार दाणे, शेंगदाणे,गाजराचे अगदी लहान तुकडे--- हे सगळे एकुण पाऊण वाटी.,
फोडणी साठी २ टेबलस्पून तेल,
अर्धा टी स्पून प्रत्येकी---मोहोरी,जिरे,हिंग आणि हळद.,
एक चमचा साखर ,
१ चमचा उडदाची डाळ,
७-८ कढीलिंबाची पाने,
३/४ वाटी आंबट ताक,
मीठ चवीप्रमाणे,
२ १/२ वाटी गरम पाणी,
१ चमचा तूप,
वरुन घालायला चिरलेली कोथिंबीर व खोवलेले ओले खोबरे. आणि शेव.

क्रमवार पाककृती: 

इडली रवा कढईत भाजुन घ्या .किंवा मायल्रोव्हेव मधे १-१-१ असे एकुण ३ मिनिटे फुल पॉवर वर भाजुन घेणे.प्रत्येक १ मिनिटांनी चमच्याने रवा परतावा.
२ १/२ वाट्या पाणी गरम करायला ठेवावे.
पॅन मधे तेला गरम करुन त्यात मोहोरी-जिरे-हिंग-हिरव्या मिरचीचे मोठे तुकडे, कढीलिंबाची पाने ,चिरलेला कांदा.,उडदाची डाळमटरचे दाणे- शेंगदाणे- गाजर घालुन परतावे.
त्यात भाजलेला इडली रवा ,मीठ,साखर,ताक घालुन परतावे.आता साधारण दोन वाट्यांइतके गरम पाणी घालुन छान ढवळावे.त्यावर चमचाभर तूप घालावे आणि झाकण ठेवुन मंद गॅसवर एक वाफ आणावी.
झाकण काढुन परतावे.आवश्यकता वाटल्यास उरलेले पाणी घालावे व पुन्हा एकदा छान परतावे. [इडली रव्याला बरोबरीपेक्षा जास्त पाणी लागते.] तयार झालेले उप्पीट अगदी मऊसर्,मोकळे असावे.कारण थंड झाल्यावर ते घट्ट होते.
uppeet.JPG
तयार उप्पीटावर कोथिंबीर,खोबरे व शेव घालुन द्यावे.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव! मस्तच! करुन बघते. फोटो तोंपासु!

आमच्याकडे कणकेचे उप्पीट, रव्याचा हळद घालून केल्यास सांजा आणि पांढरा केल्यास उपमा असे म्हणतात.
अशाच प्रकारे भाजणीच्या पीठाचे उप्पीट पण करतात. ते ही मस्त लागते.

फोटो मस्त आहे. इडली रव्याचा करून बघितला पाहिजे उपमा.
मी नेहमीच्या उपम्यात पण कधी कधी ताक किंवा दही घालते.

सिंडरेला, उकडपेंडीइतके मऊ-मऊ होत नाही.इडली रवा शिजल्यावरही दाणेदार/रवाळ रहातो..ताकामुळे वेगळी चव येते.इडली रव्याला नेहमीच्या साध्या रव्यापेक्षा जास्त [गरम] पाणी लागते..हे उप्पीट थड असले तरी छान लागते.त्यामुळे डबा ,प्रवासाला जाताना नेता येते..

खुप छान पाककृती आहे, आवडली. इडली रवाही आहे, इडल्या माझ्याशिवाय घरात कुणाला फारशा आवडत नाहीत, त्यामुळे त्याचं काय करायचं हा प्रश्न होताच. आता उपयोग होईल.

सुलेखा, शीर्षक देऊन झाले की नंतर विरामचिन्ह देऊ नकोस. नावात बदल केला आहेस पण विरामचिन्ह काढायचे राहिले आहे.