रहदारीतून घरी -चामर वृत्त

Submitted by भारती.. on 22 January, 2014 - 10:34

रहदारीतून घरी -चामर वृत्त

( गालगा लगालगा लगालगा लगालगा )

ओळखी अनोळखी नितांत चेहरे किती
वाहतात या पथी अखंड ओघ लोटती
वर्दळीतल्या क्षणात वर्दळीतले ध्वनी
एक शब्द भासती अनंत अर्थ सांगुनी

ऊन सावली वरून वेळकाळ रात्र वा
पावसात सादळून गच्च वस्तुमात्र वा
हाट मांडला असे अपव्ययास थार ना
घ्यायची विकायची करायचीच योजना

जायचे मला इथून दूरच्या घरी जिथे
ओंजळीतल्या उबेत शांतता विलासते
मंदज्योत जाणिवेत प्रार्थना जिथे जुळे
दारची सदाफुली अखंड ढाळते फुले

लंबकापरी जिणे अशा धृवात डोलते
घाव घालते अचूक मी मला विभागते
सूक्ष्मभाव छिन्न काय या क्रमात सांडले
मी कुठे कधी असे हिशेब सर्व मांडले

-संगती विसंगतीत एक आस गोमटी
पूर्णचंद्रमा दिठीत मोहरेल शेवटी ..

- भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चामर वृत्ताचे इतके सुंदर सादरीकरण करणे म्हणजे खरोखर कमाल आहे....एक एक शब्द रत्नजडित आहे या काव्यात....खुप खुप आवडले काव्य !

जायचे मला इथून दूरच्या घरी जिथे
ओंजळीतल्या उबेत शांतता विलासते<<<

ह्या ओळी रचणार्‍या कवीच्या कुशीत जावेसे वाटत आहे.

लंबकापरी जिणे अशा धृवात डोलते
घाव घालते अचूक मी मला विभागते
सूक्ष्मभाव छिन्न काय या क्रमात सांडले
मी कुठे कधी असे हिशेब सर्व मांडले

-संगती विसंगतीत एक आस गोमटी
पूर्णचंद्रमा दिठीत मोहरेल शेवटी .. <<< सरप्राइझिंगली इंपॅक्टिंग!

चामर वृत्ताच्या लगावलीच्या दिड-पावणेदोनपट लगावली घेऊन दोनवेळा केलेला उद्धटपणा खाली देत आहे. अक्षरशः मोहानेच! पण ह्यापेक्षा अधिक मोहमयी व्यासपीठ कोणते असेल?

==============

पालखीत पादुका, जिवंत लोक चालतात, हाल हाल पाहुनी कमाल वाटते
पांडुरंग, माउली, तुका मिळून एकजात नाद लावतात यात चाल वाटते

आमचा गुलाल लाल हिंदवी रुपातला, तुझा गुलाल वेगळाच पाकधार्जिणा
फक्त दंगलीत मात्र आमच्याकडील वा तुझ्याकडील रक्त लाल लाल वाटते

आजवर पुण्यात शांतताच नांदली, जगात आमचे शहर कुणास माहिती नसे
स्फोट जाहला, अनेक लोक संपले, अता पुण्यात राहणे कसे विशाल वाटते

राजकारण्या पहा विशाल जाहिरात ही तुझाच वाढदिवस साजरा करायला
गोष्ट वेगळी म्हणा, तुझ्यामुळेच वाहतूक तुंबते, शहर अती बकाल वाटते

कोंडदेव की जिजाउ, रामदास की तुका, अशावरून आज रक्त सांडतो अम्ही
बायका धुणी धुतात, पोरटी जुगार खेळतात, हे अम्हास बेमिसाल वाटते

एक बुद्ध जाहला नि एक भीम जाहला, पुन्हा न आमच्यात जाहले कुणी तसे
वारसे म्हणून मागुनी मते जगाकडे निवडणुकीत लागला निकाल वाटते

मुंज लागताच तो बटू जरा सुधारतो, धरून जानवे हळूच पेग लावतो
बाप सांगतो मुलास 'चोख तंगडी', मधेच बायको म्हणे 'अहो हलाल वाटते'

'बेफिकीर'ला सभागृहात बोलवायचे असेल तर विचार कर, विचार कर जरा
एक एक शेर मुखवट्यास फाडतो, ज्वलंत ओळ ओळ पेटती मशाल वाटते
===============

सावकाश चालतेस तू वळून पाहतेस रीत पाळतेस की उसासतेस तू?
की तिथेच थांबलोय की न थांबलोय मी वळून पाहुनी जरा तपासतेस तू?

तू सुहासशी फुलावयास तू हसावयास मी नसानसांत शायरीस सोसले
मी उदास शायरी भकास आसपास नी झकास कारणाशिवाय हासतेस तू

पेरले तुझ्यात रंग मी उमंग ते तरंग संगतीत त्याच अंग दंगले तुझे
भंगलो अपंग होत जंग हारलो भणंग खंगलो तुझ्यामुळे विकासतेस तू

मी निहारता निखार यायचा करार मीच सार जीवनातले कसे नकारशी?
आरपार वार धारदार मारलास की हुषारशी छुपी कट्यार भासतेस तू

कालकालची कमाल चालचालता गुलाल लागल्यापरीच गाल लाल व्हायचे
आजकाल हालहाल बेमिसाल चाललेत आमचे खुशाल रास रासतेस तू

==============

आगाऊपणाबद्दल आगाऊ दिलगीरी!

-'बेफिकीर'!

अजून एक उत्तम कविता

बेफीजींचे प्रतिसादही मस्त
मी ही ओळ अशी आजवर वाचायचो ..बेफिकीरला पुन्हा सभेत बोलवायचे असेल तर....

अवघड कवितांमधले काहीही कळत नाही मला पण शीर्षकाच्या संदर्भाने वाचत गेल्यावर आपोआप समजत गेली.. नंतर मग पुन्हा वृत्ताचा संदर्भ घेऊन लयीत वाचत गेले तर आणखी थोडी उमगली आणि छान वाटले!
तरीही काही ओळी डोक्यावरून जातायत, थोडा प्रयत्न केल्यास उलगडतील असे वाटते. पूर्वी तुम्हाला म्हणाले तसे कवितासाक्षर होण्यासाठी तुमची मदत होतेय भारतीताई Happy

धन्स लोक्स Happy
मायबोलीवर स्वागत संतोष,तुम्हाला इथे पाहून आनंद वाटला.या विशाल पटावर अनेक विषय चर्चिले जातात, त्यातच कविता , त्यामुळेच कवितेचा अभ्यास असलेल्यांबरोबरच तो नसलेल्यांपर्यंतही कविता पोचते.तुमच्या कविता इथे अनेकांना आवडतील अशी खात्री आहे.

बेफिकीर, अत्यंत सुंदर आहेत तुमच्या रचना दोन्ही, पहिली पूर्वी वाचली होती, दुसरी आत्ताच वाचली. नेहमीचीच भावना, शब्दप्रभू आहात.अस्सल कवीचा आगाऊपणा आहे, जाणते मी . म्हणूनच माफ :).

वैभव,दिनेश, गापै ,उल्हासजी ..आभार आभार ..
श्रीयू , आजच फेबुवर वाचली असशील ही.
सई , ही अवघड नसावी , व्यवहार-वर्दळीचं वास्तव अन एकांताची आस यात दुभंगलेलं अस्तित्व शेवटी तरी आशयाचा पूर्णचंद्रमा पाहण्याची आस धरून आहे.आशेवरच जगतो आपण ..

संगती विसंगतीत एक आस गोमटी
पूर्णचंद्रमा दिठीत मोहरेल शेवटी .. <<< क्या बात है ......

सूक्ष्मभाव सुंदररित्या प्रकटलेत .... अप्रतिम कविता ......

भारतीताई, अवघड शब्दाची तुमची आणि माझी व्याख्या १००% निराळी असेल Happy

बेफिंच्या दोन्ही रचनांपैकी दुसरी जास्त आवडली, कारण पूर्ण समजली. पुन्हा, त्याही अवघडच वाटल्या कारण वाचताना फेफे उडते!! त्यांनीही तसं लिहिलं आहेच की दिड-पावणेदोन पट वगैरे Uhoh

सुरेख

अवघड कवितांमधले काहीही कळत नाही मला पण शीर्षकाच्या संदर्भाने वाचत गेल्यावर आपोआप समजत गेली.. नंतर मग पुन्हा वृत्ताचा संदर्भ घेऊन लयीत वाचत गेले तर आणखी थोडी उमगली आणि छान वाटले!
तरीही काही ओळी डोक्यावरून जातायत, थोडा प्रयत्न केल्यास उलगडतील असे वाटते. >>+१

सुरेख आहे ही कवितासुद्धा ! आवडली. तुमच्या वृत्तबद्ध कविता वृत्तशरण नसतात, मूळ आशयाला वृत्त / छंद कोंदणाप्रमाणे शोभा आणतात- ही गोष्ट मला फार कौतुकास्पद वाटते.

पावसात सादळून गच्च वस्तुमात्र वा

दारची सदाफुली अखंड ढाळते फुले

घाव घालते अचूक मी मला विभागते

संगती विसंगतीत एक आस गोमटी

अशा ओळींपाशी थबकायला होते, क्षणमात्र थांबून, आस्वाद घेत पुढे जावे लागते. जुन्या मराठी कविता वाचत असल्यासारखे वाटते. मजा येते. Happy

हे सॉनेट (सुनीत) आहे ना?

तुमच्या वृत्तबद्ध कविता वृत्तशरण नसतात,
मूळ आशयाला वृत्त / छंद कोंदणाप्रमाणे
शोभा आणतात- ही गोष्ट मला फार
कौतुकास्पद वाटते.>>>>>+111

आभार्स सर्वांचे Happy
ज्ञानेश, धन्यवाद या रसग्रहणासाठी .
हे सुनीतासारखं असलं ( विशेषत: शेवटच्या दोन ओळीतील कलाटणीमुळे ) तरी सुनीत नाही ,कारण एक कडवं जास्त झालंय. १२+२ किंवा ८ + ६ हा सुनीताचा आकृतीबंध .