नैरोबीतले दिवस - भाग १

Submitted by दिनेश. on 20 January, 2014 - 06:39

अनेकवेळा अफ़्रिकेचा उल्लेख एक देश म्हणून केला जातो. पण तो एक भला मोठा खंड आहे. त्यातल्या काही देशांत माझे वास्तव्य झाले. तर अशाच एका सुंदर शहराची ओळख करून देणारी हि मालिका सुरु करतोय.

एखाद्या शहरात पर्यटक म्हणून जाणे वेगळे आणि त्या शहराचा रहिवासी म्हणून तिथे दिर्घकाळ वास्तव्य करणे वेगळे. एकाच शहराचे दोन वेगवेगळे चेहरे दिसतात आपल्याला.
जोहान्सबर्ग, हरारे, अदीसअबाबा आणि नैरोबी यांना आफ़्रिकेतील हिलस्टेशन्स म्हणावी लागतील. आज ती आधुनिक शहरे असली तरी आपले सौंदर्य राखून आहेत. यापैकी मी अनुभवलेले नैरोबी इथे मांडण्याचा प्रयत्न करतो.

विमानतळ, वाहतूक व्यवस्था, हवामान, निसर्ग, खादाडी, भाजीपाला, फ़ळफ़ळावळ, लोक, भाषा, आर्थिक व्यवहार, उद्योगधंदे, सुरक्षितता.. असे एकेक करत लिहित जातो.

१) विमानतळ

नैरोबी शहरात दोन विमानतळ आहेत. एक ज्योमो केन्याटा आणि दुसरा विल्सन. ज्योमो केन्याटावर मोठी विमाने उतरतात तर विल्सनवर छोटी. इंटरनॅशनल आणि लोकल अशी विभागणी मात्र नाही.

ज्योमो केन्याटा खुप जूना आहे. साठच्या दशकातली बांधणी असावी. त्या काळात एअरोब्रिज नव्हते. ते आता झालेत पण त्यावेळेस विस्तार झाला नाही. त्यामूळे आता मधला कॉरिडॉर अगदीच अरुंद झाला आहे. त्यातही ड्यूटी फ़्री वगैरे आहेच.

एअरोब्रिज झाले असले तरी ते मर्यादीत आहेत आणि केवळ मोठ्या विमानांसाठीच उपलब्ध असतात. छोटी विमाने जरा लांबवरच थांबतात आणि बसची सोय नसल्याने पायीच जावे लागते. त्यातही हातात मोठे व जड सामान असले तर विचारूच नका. आणि त्यातून नैरोबीची बोचरी थंडी !

विमानातून उतरल्यावर एक लांबलचक चढा मार्ग पार करून जावे लागते. आता नवीन टर्मिनल बांधायचे काम चालू आहे पण त्यात काही वर्षे जातील.
विमानतळावर खाण्यापिण्याची बरी सोय आहे. ड्य़ूटी फ़्री शॉपिंगबद्दल मग लिहितो. टॉयलेट्स मात्र अपुरी आणि तीसुद्धा पुरातन आहेत. हॉटेल रुम्स नाहीत.

पण त्याआधी विमान उतरतानाचा अनुभव लिहायलाच पाहिजे. नैरोबी जवळजवळ वर्षभर ढगांखाली असते. त्यामूळे डिसेंट सुरु झाल्यावर विमानाची थरथर होतेच. सकाळी उतरणारे विमान असेल तर हा त्रास जास्तच होतो. पण जर दुपारचे किंवा संध्याकाळचे विमान असेल तर मात्र खुपदा ढगातून वर डोके काढलेला, बर्फ़ाच्छादीत माऊंट केनया दिसू शकतो. सूर्य मावळतीकडे झुकलेला असेल तर हे दृष्य फ़ारच सुंदर दिसते.

त्यापेक्षा जरा आधी आलात तर नैरोबी नॅशनल पार्कमधले प्राणी सहज दिसू शकतात. जिराफ़, झेब्रे, हरणे तर हमखास दिसतात. नवल म्हणजे या प्राण्यांनाही विमानाची एवढी सवय झालीय, कि ते अजिबात घाबरून पळायला वगैरे लागत नाहीत.

विमानातून उतरल्यावर मात्र गर्दीतून वाट काढत इमिग्रेशन काऊंटर गाठावा लागतो. पर्यटकांना ऑन अरायव्हल व्हीसा मिळायची सोय आहे. ( ५० डॉलर्स ) सध्या फ़िंगर प्रिंट्स व फ़ोटो तिथेच घेतला जातो. कष्ट्म्सवाले फ़ार पिडत नाहीत. पण दहावीस डॉलर्स हाताशी ठेवलेले बरे.

विमानतळाच्या बाहेर पडल्याबरोबर लोकल सिमकार्ड मिळायची सोय आहे. आफ़्रिकेतील बऱ्याच
देशात एअरटेल कार्यरत असल्याने, तुमच्याकडे भारतातील एअरटेल असेल तर नवे कार्ड घ्यायची
गरज नसते. तसेही केनयातून भारतात फ़ोन करणे स्वस्तच आहे.

विमानतळावर एकच एटीम आहे आणि ते बऱ्याचवेळा बिघडलेले असते. परकिय चलन बदलण्या
साठी मात्र काही अडचण येत नाही.

मला नैरोबीला उतरल्याबरोबर खुपदा डीहायड्रेट झाल्यासारखे वाटते. म्हणून इमिग्रेशनला जाण्यापुर्वी
थोडे पाणी पिणे आवश्यक वाटते. ( अर्थात हा वैयक्तीक अनुभव आहे. )
भारतातून नैरोबीला केनया एअरवेजची ( जेट एअरवेज कोड शेअर ) थेट सेवा आहे. ( मुंबई व दिल्लीहून )
एखादा स्टॉप ओव्हर चालत असेल तर एमिरेट्स, एथिओपियन, कातार, अरेबिया असे पर्याय आहेत. लांबचा वळसा चालत असेल तर के एल एम, ब्रिटिश एअरवेज असेही पर्याय आहेत.

२) वाहतूक व्यवस्था

विमानतळावरून बाहेर पडल्यावर भरपूर टॅक्सीज दिसतील. त्या मात्र मीटर्ड नाहीत. बसण्यापुर्वीच भाडे ठरवलेले चांगले. एकदा भाडे ठरवल्यावर सहसा वाद होत नाहीत. तिथे जायला कितीही वेळ लागला तरी भाडे तेच राहते.

वेळ हा नैरोबीच्या वाहतुकीत फ़ार महत्वाचा घटक आहे. रस्त्यावर सत्राशे साठ गाड्यांचे प्रकार
दिसतील त्यामानाने रस्तेच कमी दिसतील.

साधारणपणे अत्याधुनिक गाड्या, पिक अप्स, टुरीस्ट सफ़ारी वेहिकल्स, बाहेरगावाहून आलेल्या व जाणाऱ्या बसगाड्या, इतर देशांतून, खास करुन युगांडा, टांझानिया मधून आलेल्या बसगाड्या असे सगळे प्रकार दिसतील. पण नैरोबीची खासियत म्हणजे मटाटू. मटाटूचा शब्दश अर्थ तीन सेंट्स (ला एक मैल ) असा आहे. कधी काळी हा दर होताही. सध्या मात्र पाऊसपाणी बघून भाव ठरवले जातात. आणि ते भावही सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामूळे बहुतांशी केनयन चालत कामाच्या ठिकाणी ये जा करतात. सरासरी रोज दोन ते तीन तास सहज चालतात ते. या मटाटूमधे प्रवाश्यांच्या संख्येवर आता बंधने आलीत, पुर्वी कसेही प्रवासी कोंबत असत. शिवाय कुठे ट्राफ़िक जाम झाला तर पुढे जायला ते नकार देतात आणि प्रवाश्यांना मधेच उतरायला भाग पाडतात. त्यामूळे आपण त्यांच्या वाटेला न जाणेच योग्य.

वाटेला न जाणे योग्य असे लिहिलेय खरे पण ते मात्र आपल्या वाटेला येतातच. आपल्या गाडी समोरचा मटाटू कधी थांबेल, कुठे वळेल आणि कधी आपल्याला आडवा येईल ते सांगता येत नाही. त्यामूळे प्रत्येक मटाटू सगळीकडून ठोकर खाल्लेलाच असतो. शिवाय अशी वंदता आहे कि ते मटाटू पोलिसांच्याच मालकीचे असल्याने किंवा ते ठराविक हप्ता देत असल्याने त्यांना पोलिसांपासून अभय असते. तरी एकेक मटाटूचा थाट आणि आतली सजावट खासच असते.
चालू टिव्ही असेल तर दरही चढे असतात. नैरोबीचा बाहेरच्या भागातून देखील हे मटाटू येतच असतात.

नैरोबीची रहदारी अजूनही फ़ार बेशिस्त आहे. रस्ते खराब आहेत अशातला भाग नाही, पण वाहतुकीची कोंडी कायमच असते. अपघात, पाऊस, राजकीय नेत्याची स्वारी असे कुठलेही निमित्त पुरते आणि रोज किमान एकतरी निमित्त असतेच. माझे घर ते ऑफ़िस हे अंतर केवळ ८ किमी होते पण ते कापायला मला सकाळी एक तास आणि संध्याकाळी किमान दिड तास लागत असे. शनिवारी मात्र तेच अंतर १० ते १२ मिनिटात कापले जात असे.

नैरोबीत फ़्लायओव्हर नव्हतेच. म्यूझियम हिलजवळचा फ़्लायओव्हर गेल्याच वर्षी पुर्ण झाला आहे. नैरोबीतली सरकारी कार्यालये असणारा भाग (टाऊन ) इंडस्ट्रीयल एरिया, सिटी मार्केट आणि रहीवासी भाग पार्कलॅंड्स, वेस्ट्लॅंड्स, नैरोबी वेस्ट, लंगाटा अशा भागातून वाहतूक चाललेली असते आणि ती अनेक ठिकाणी एकमेकांना छेदते. त्या ठिकाणी सिग्नल्स आहेत पण त्यांना कुणी जुमानत नाही. ट्राफ़िक पोलिस आहेत ते अगदीच अनुनभवी आहेत. एका रस्त्यावरची बाहतूक थांबवून ते दहा पंधरा मिनिटे फ़ोनवर बोलत
राहतात. तोपर्यंत सगळ्या गाड्यांचे हॉर्न्स कोकलत राहतात.

पुर्वी इंडस्ट्रीयल एरियात मालवाहतूक रेल्वेने होत असे. आता फ़क्त रुळ उरलेत. रेल्वेची मालवाहतूक बंद पडलीय. त्यामूळे गोदीतून माल घेऊन आलेले मोठे मोठे ट्रेलर्स दिवसाच्या कुठल्याही प्रहरी रस्त्यावर असतात.

अगदी सकाळच्या वेळी वेगवेगळ्या सफ़ारीवर जाणाऱ्या खास गाड्यांची गर्दी असते. रेडीओ वगैरेची सोय असलेल्या या गाड्या चिखलती सुरक्षेत असतात. पण त्या दिवसा नसतात.

या अशा रहदारीमूळे दिवसा कुठे बाहेर पडायचे म्हणजे दोन तीन तास मोडलेच समजायचे. त्यामूळे कामे शक्यतो फ़ोनवरती किंवा बाईकवरुन जाणाऱ्या एका माणसाकरवी केली जातात. बहुतेक कंपनीमधे अशी माणसे नेमलेली असतात आणि त्यांना रायडर्स असे खास नाव आहे.

रस्त्यावरचे अपघात हा काळजीचा विषय आहे. खुपदा अपघात्ग्रस्त गाड्यांची दिशा आणि स्थिती बघून हा अपघात कसा घडला असावा, असे मनात येते. ऑफ़िसमधे आल्यावर तिच चर्चा असायची ( दिनेशभाई वो ॲक्सिडेंट देखा, कैसा किया होगा ?)

एक विचित्र अपघात तर माझ्या डोळ्यासमोरच घडला. मी पेट्रोल पंपावर होतो. दोन ट्रेलर्स भयानक वेगात एकामागोमाग जात होते. त्यापैकी पुढच्या ट्रेलरचा एका छोट्या गाडीला धक्का लागला आणि ती एकशे ऐंशी अंशात वळली. तेवढ्यात मागच्या ट्रेलरच्या पुढच्या भागाने तिला तशीच फ़रफ़टत नेली आणि थोड्या
वेळात बाजूला ढकलून दिली. गाडी रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. गाडी माझ्या ओळखीची होती म्हणून आम्ही धावलो तर त्यात माझा मित्रच होता. झाला प्रकार क्षणार्धात घडला होता आणि त्याला साधे खरचटले पण नव्हते तरी त्याला एवढ्या मानसिक धक्का बसला होता कि तो काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हता.

आपली गाडी नसेल तर काही कंपन्यांतर्फ़े चालवलेल्या टॅक्सीज मात्र जागोजाग उपलब्ध असतात. त्या मात्र सुरक्षित आहेत. त्यांचे चालक फ़ार अदबीने वागतात आणि बोलके असतात (पर्यटक सहसा याच वापरतात. ) शिवाय प्रवासी घेतल्याबरोबर आपण कुठल्या भागात चाललो आहोत ते त्यांना त्यांच्या मुख्यालयाला कळवावे लागते. गाडीत राहिलेले सामानही परत करण्याबद्दल त्यांची ख्याती आहे. मी गरजेला अश्या टॅक्सीज स्वतः वापरल्या आहेत.

एवढा त्रास असूनही नैरोबीतला प्रवास मी खुपच एंजॉय करायचो. त्याला कारणे दोन, एक तिथला एफ़ एम रेडीओ आणि दुसरे म्हणजे रस्त्यावरच्या फ़ेरीवाल्यांकडे मिळणाऱ्या अनेकविध वस्तू. ( त्याबद्दल पुढे सविस्तर लिहितो. )

३) नैरोबीचे हवामान

नैरोबीत राहण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे नैरोबीचे हवामान. नैरोबीत लॉंग रेन आणि शॉर्ट रेन असे पावसाचे दोन ऋतू असतात आणि हे दोन्ही मिळून जवळजवळ ९/१० महिने पाऊस पडत असतो.

वर्षातून ८/१० दिवस गरम होते तेवढेच. एरवी हवामान थंडच असते. नैरोबी आधीच उंचावर वसलेले आहे आणि त्यातही अनेक टेकड्या आहेत. अपर हिल, लोअर हिल, म्यूझियम हिल अशी त्यांची नावे आहेत. शिवाय नैरोबीच्या पश्चिमेला एक मोठी पर्वतरांग आहेच.

बहुतेक घरात एसीच काय पंख्याची पण गरज नसते. अगदी दुपारीदेखील झोपताना ब्लॅंकेट घेऊन झोपावेसे वाटते.

नैरोबीतले बहुतांशी मॉल्सही एअर कंडिशन्ड नाहीत. या हवामानामूळे आणि उंचीमूळे नैरोबीत पुर्वी डासही कमी असत. ( असा उल्लेख द इनकन्व्हीनियंट ट्रूथ मधेही आहे. ) आता थोडे थोडे डास असतात हे खरे आहे.
( केनया आणि इतर अनेक आफ्रिकन देशांत येण्यापुर्वी यलो फीव्हर व्हॅक्सीनेशन घेणे गरजेचे आहे. त्याबद्दल सविस्तर लेख मी लिहिला होता. )

नैरोबीचा पाऊस हे एक फ़ार रोमॅंटीक प्रकरण आहे. ( अर्थात घरी असलात तर ) नैरोबीत फ़ारश्या उंच इमारती नाहीत. त्यामूळे फ़ार मोठा परीसर नजरेच्या टप्प्यात असतो. दूरवरून येणारे काळे ढग आणि त्यातून पडणारा पाऊस दिसत राहतो. थाड थाड आवाज करत पडणारा पाऊस नेहमीचाच. क्वचित गाराही पडतात. सखल भागात पाणी साचणे आणि त्यात गाड्या अडकणे हे पण नित्याचेच. वेगवेगळ्या टेकड्यांवरुन खालच्या भागात पाणी वहात येते. आणि ते भाग जलमय होऊन जातात.

चालत जाणाऱ्या लोकांचे मात्र फ़ारच हाल होतात. त्या लोकांना पावसात भिजण्याचे वावडे आहे. एरवी काटक असणारे ते लोक पावसात भिजले तर हमखास आजारी पडतात. शिवाय त्या काळात मटाटू पण कमी असतात आणि त्या मधेच बंद तरी पडतात किंवा रस्त्या अडल्याने प्रवाश्यांना मधेच उतरावे लागते. मी पण बऱ्याच वेळा या पावसात (गाडीत ) अडकलो होतो.

बाहेर मस्त पाऊस पडत असावा आणि खास केरिचो गोल्ड चहा व सोबत मारू भजिया खाणे म्हणजे आनंदाची पर्वणी. हे दोन पदार्थ म्हणजेही नैरोबीची खासियत आहेत.

या हवामानाचा एक वाईट परीणाम म्हणजे आम्हाला नैरोबी सोडून जाणे जीवावर यायचे. कारण नैरोबी सोडून मोंबासाच्या दिशेने म्हणजेच समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने गेलो तरी किंवा रिफ़्ट व्हॅलीत उतरलो तरी हवामान गरमच असते. त्यामूळे अगदी जोडून सुट्ट्या आल्या तरच आम्ही फ़िरायला जात असू.

या हवामानामूळे शाळेतील मुलामुलींना जवळजवळ वर्षभर स्वेटर घालावा लागतो आणि तोपण त्यांच्या युनिफ़ॉर्मचाच भाग बनून राहिलेला आहे. रस्त्यातून चालत शाळेत जाणारी मुले, हे पण नैरोबीतले नेहमीचेच दृष्य आहे. मोठी माणसे पण बहुतेकवेळा स्वेटर्स घातलेली दिसतात. किमान सकाळच्या वेळी तरी तो आवश्यक असतो.

क्रमश :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम.. अजुन येवू द्या..
मी केनयन एअरवेजने मुम्बई- आक्रा (व्हाया नैरोबि) प्रवास केला आहे.त्यामुळे नैरोबी एअर पोर्ट ओळखीचा आहे.

व्वा! माहितीपूर्ण , इन्ट्रेस्टिन्ग!
एखाद्या शहरात पर्यटक म्हणून जाणे वेगळे आणि त्या शहराचा रहिवासी म्हणून तिथे दिर्घकाळ वास्तव्य करणे वेगळे. एकाच शहराचे दोन वेगवेगळे चेहरे दिसतात .. अगदी पटलं.

खूप छान वर्णन . यात एखादी त्या खंडाची ट्रिप प्लॅन करायची तर टीप्स सुध्दा द्या ना. खूप ओघवते वर्णन आहे !!!

वाह दिनेशदा, पूर्णपणे गुंतून गेलो वाचण्यात की 'क्रमशः' कधी आले ते कळलेच नाही.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.....

आह्हा..आफ्रिकेला भेट देण्याच्या प्रबळ इच्छेला इन्सेंटिव्ह देणारी मालिका.. Happy

केनिअन एअर वेज मधे किती के जी सामान अलाउड आहे??????????

अभार दोस्तांनो... मटाटू म्हणजे पिक अप, मिनीबस ते मोठी बस असे काहिही असू शकते.
फोटो आधी वेगवेगळ्या निमित्ताने इथे टाकलेच होते. परत बघतो.
ओघात, पर्यटकांसाठी सूचना येतीलच.

वर्षू, केनयावर ३० किलो तर इथिओपियन वर ४० किलो बॅगेज चालतं. वर ४/५ किलो असलं तरी ते विचारत नाहीत.

खूप छान वर्णन . यात एखादी त्या खंडाची ट्रिप प्लॅन करायची तर टीप्स सुध्दा द्या ना. खूप ओघवते वर्णन आहे !!! +१

आफ्रिकन सफारि (केनया/ साउथ आफ्रिका/ बोट्स्वाना ई) साठी टिप्स दिल्या तर खूप बरे होइल.

वाह दिनेशदा, पूर्णपणे गुंतून गेलो वाचण्यात की 'क्रमशः' कधी आले ते कळलेच नाही.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..... >>>>>> +१०००....

एकदम भारी वर्णन ......

छान.

तुमच्या नेहमीच्या लेखांइतका नाही आवडला, ट्रॅव्हलॉगसारखा माहितीपर आणि तांत्रिक वाटतोय.
माणसांच्या तुरळक उल्लेखांमुळे असेल.
पुढचे भाग रंजक असतील बहुतेक.

केनयावर ३० किलो तर इथिओपियन वर ४० किलो बॅगेज चालतं.. वॉव..यिप्पी!!!! Lol

आणी लोक्स, आफ्रिकेला जाण्याअगोदर यलो फीवर चं इन्जेक्शन आणी सर्टिफिकेट घ्यायला विसरू नका..

Pages