'स्वयंपाकघरा'च्या अन्नपूर्णा सौ. ज्योती कवर आणि सौ. नंदिनी चपळगावकर ह्यांची मुलाखत

Submitted by मो on 20 January, 2014 - 01:32

'स्वयंपाकघर'! औरंगाबाद, किंबहुना संपूर्ण मराठवाड्यातले हे पहिले पोळी-भाजी केंद्र विविध प्रकारच्या चविष्ट, दर्जेदार घरगुती खाद्यपदार्थांकरता लोकप्रिय आहे. खरं तर जगरहाटीच्या मानाने जरा उशीराच, म्हणजे वयाच्या चाळिशीनंतर, दोन अतिशय कर्तबगार महिलांनी सुरू केलेले आणि महिला पुरवठादार असलेले ’स्वयंपाकघर’ गेली १५ वर्षं औरंगाबादकरांच्या जिभेचे चोचले पुरवत आहे. कित्येक महिलांना ’स्वयंपाकघरा’ने रोजगार मिळवून दिलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्था, बचतगट व महिला मंडळे या व्यवसायाची माहिती घेण्याकरता, शिकण्याकरता ’स्वयंपाकघरा’ला भेटी देत असतात. इथल्या अनुभवाच्या जोरावर अनेक महिलांना आपले स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. अशा ह्या 'स्वयंपाकघरा’च्या संस्थापिका आणि संचालिका सौ. ज्योती कवर आणि सौ. नंदिनी चपळगावकर ह्यांची मुलाखत खास संयुक्ता आणि मायबोलीच्या वाचकांकरता!

'स्वयंपाकघर'च्या सौ. नंदिनी चपळगावकर आणि सौ. ज्योती कवर

'स्वयंपाकघर' सुरू करण्यामागची संकल्पना काय होती? हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुम्हाला कसा सुचला?
ज्योतीताई: १९९३ ते १९९७ पर्यंत आम्ही काही ‘काहीतरी वेगळं करायचं’ ह्या कल्पनेने भारावलेल्या समविचारी मैत्रिणी मिळून 'मैत्रिण ग्रूप' नावाची संस्था चालवत होतो. त्यातील काहीजणींचे आधीचेच काही व्यवसाय होते, उदा. ब्युटीपार्लर चालवणे, लहान मुलांचे कपडे शिवणे, सॉफ्ट टॉईज बनविणे वगैरे. मी आणि सौ. चपळगावकर साड्या, बेडशीट वगैरे विकण्याचा व्यवसाय करायचो. तर, ह्या समविचारी आणि समवयस्क मैत्रिणींनी स्थापन केलेल्या संस्थेतर्फे आम्ही विविध उपक्रम राबवित असू. उदाहरणार्थ, एक वर्षभर आम्ही दरमहा व्यवसाय करु इच्छिणार्‍या किंवा सुरू केलेल्या महिलांसाठी काही मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवली. दरमहा वर्तमानपत्रात जाहिरात द्यायचो; त्या जाहिरातीद्वारे महिला आम्हाला संपर्क करीत. नाममात्र फी घेऊन आम्ही विविध विषयांवर तज्ज्ञ लोकांची व्याख्याने ठेवायचो. उदा. बँकेतील कामकाजांसाठी बँक अधिकार्‍यांचे भाषण, मार्केटिंग कसे करावे ह्यावर एखाद्या कंपनीतील मार्केटिंग विभागातील अधिकार्‍याचे भाषण, व्यवसायात पुढे आलेल्या एखाद्या उद्योजिकेचे अथवा उद्योजकाचे अनुभव-कथन वगैरे. ह्या खेरीज आम्ही वर्षातून २-३ प्रदर्शने भरवत असू. औरंगाबादच्या विविध भागात भरविल्या जाणार्याल ह्या प्रदर्शनांना आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत असे. अशा प्रकारचे प्रदर्शन भरविण्याचा पहिला हेतू असा होता की वर्षभरात चर्चासत्रात सहभागी होणार्‍या आणि इतर महिलांना त्यांच्या उत्पादनाची जाहिरात आणि विक्री करुन आर्थिक प्राप्ती व्हावी, आणि त्यांचा आणि त्याबरोबर आमचाही जनसंपर्क वाढावा. अशा प्रदर्शनात बहुतांशी स्टॉल्स हे खाण्यापिण्याचे असत. त्यांना किती फायदा झाला हे ताबडतोब कळत असे. अशा महिला मग आमचा सतत पाठपुरावा करु लागल्या की वर्षातून २-३ वेळाच असा फायदा होण्यापेक्षा कायमस्वरुपी असे माध्यम आम्हाला उपलब्ध करुन द्या म्हणजे आम्हाला वर्षभर काम मिळेल आणि पैसाही मिळेल. ह्या विचारातूनच 'स्वयंपाकघरा'च्या कल्पनेचा जन्म झाला.
नंदिनीताई: ज्योतीने सांगितल्याप्रमाणे काही ना काही छोटे उद्योग आमचे चालूच होते. खरं म्हणजे आमची दोघींची पार्श्वभूमी काही व्यावसायिकेची नव्हती किंवा कुठलही व्यवसायातलं मॅनेजमेंट आम्हाला माहिती नव्हतं. पुण्यात गेलो असताना एक पुरुषाला स्वयंपाकघर चालवताना पाहिले आणि असा प्रयोग औरंगाबादला करुन पहायचा मनात विचार आला. कसं करायचं ह्याची कल्पनाही नव्हती पण एवढं मात्र ठरवलं की जे काम करु ते चांगलं करु.

'खाण्यापिण्याच्या गोष्टी विकण्याकरता माध्यम उपलब्ध करुन द्यायचे' ह्या कल्पनेला पुढे नेऊन त्याचे व्यवसायात रुपांतर करण्याकरता तुम्हाला कोणत्या प्रकारची पूर्वतयारी करावी लागली?
ज्योतीताई: सुरूवातीला दुकानाची जागा भर वस्तीत पाहणे, भाडे, लाईटबिल परवडेल का इत्यादी गोष्टी फारश्या महत्त्वाच्या वाटल्या नाहीत कारण आपण काहीतरी वेगळे करत आहोत ह्याचा उत्साह प्रचंड होता.. स्वयंपाकघरात वापरले जाणारे पदार्थ जे किमान १-२ महिने खराब होणार नाहीत, जसे की लोणचे, चटण्या, पापड, कुरडया, खारवड्या इ. माल देणार्‍या महिला तयार होत्याच. तेव्हा एक महिना आधी पदार्थांची यादी करुन महिलांकडून मागवून, देण्या-घेण्याच्या किमती ठरवून कच्चा आराखडा तयार केला. पॅकींग घरीच केले. दुकानात शेल्फ, काऊंटर म्हणजे साधे टेबल, बसायला ५-६ खुर्च्या, कामासाठी मदतनीस म्हणून २ मुली अशी सुरूवात केली. बाकीची सर्व कामे आणि वेळा आम्ही दोघींनी वाटून घेतल्या.
नंदिनीताई: अजून एक प्रश्न होता जागेचा, पण सुदैवाने उस्मानपुर्‍यात एकनाथ रंगमंदिरासमोर एक छोटेसे दुकान आम्हाला अल्प भाड्यावर मिळाले. दुकानाचे मालक माझ्या यजमानांच्या ओळखीचे होते. ते काही कामासाठी दिल्लीला चालले होते. ते म्हणाले माझी जागा आहे आणि तुम्ही बघा काय करता येईल ते! ती आम्हाला एक सुवर्णसंधीच मिळाली. मध्यवर्ती ठिकाणी खूप सवलतीच्या दरात आम्हाला ते दुकान मिळाले आणि आमची जागेची चिंता तात्पुरती मिटली. सत्यनारायण किंवा आजच्यासारखा मोठा उद्घाटनाचा कार्यक्रम न करता १५ फेब्रुवारी, १९९८ ला 'स्वयंपाकघरा'चा शुभारंभ केला.

ह्या व्यवसायाकरता भांडवल कसे उभे केले? काही वेगळी गुंतवणूक करावी लागली का?
ज्योतीताई: दुकानाचे भाडे आणि इतर किरकोळ गोष्टींकरता अगदी अल्प पैसे दोघींनी आपल्या बचतीतून जमा केले. त्यातून आवश्यक ती सामुग्री उदा. कॅल्क्युलेटर्स, पेन, रजिस्टर्स, साईनबोर्ड तयार करणे, लाईट व्यवस्था, खुर्च्यांची तरतूद केली. ज्या महिलांकडून खाद्यपदार्थांची खरेदी केली होती त्यांच्याकडून १ महिन्याचा अवधी घेतला आणि वस्तू विकल्या गेल्या तर १ महिन्यात पैसे देऊ असे आश्वासन दिले. औरंगाबादमध्ये असे महिलांनी उघडलेले, महिलाच पुरवठादार असलेले हे पहिलेच दुकान होते.
नंदिनीताई: दुकानाकरता लागणारी सगळी भांडी, गॅस इत्यादी गोष्टी आम्ही आमच्या घरातूनच आणल्या होत्या. बाकी सुरूवात छोट्या प्रमाणात केल्यामुळे कर्ज वगैरे काही घ्यावे लागले नाही. नंतरही, विक्रीतून झालेला फायदा हा दुकानातच गुंतवल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कर्ज आम्हाला कधी घ्यावे लागले नाही.

व्यवसायाची जाहिरात तुम्ही कोणत्या प्रकारे केली? जाहिरातीसाठी कोणते तंत्र वापरले?
ज्योतीताई: पेपरमध्ये जाहिरात आणि लिफलेट्स टाकणे एवढेच जाहिरातीचे तंत्र वापरले. प्रदर्शनाच्या माध्यमातून तोंडी प्रसिद्धी हा मोठा जाहिरातीचा भाग होताच. साधारण पहिल्या महिन्यात जाहिरातीचे भाडे, २ महिलांचा पगार आणि लाईटबिल एवढा खर्च निघाला आणि आम्हाला हायसे वाटले. विश्वास वाढला. इतर महिलांचे पेमेन्टही हळूहळू द्यायला सुरूवात केली. त्यांना आमच्यावद्दल विश्वास वाटून त्या आमच्यासाठी वस्तू बनवायला लागल्या.
नंदिनीताई: दुकान मध्यवस्तीत असणे, माऊथ पब्लिसिटी इत्यादीच्या आम्हाला खूप फायदा झाला. म्हणजे - यांच्याकडे हा जिन्नस खूप चांगला मिळतो बरं का, तुम्ही जा - असं करून जी आमची जाहिरात झाली त्याने लोक दुकानात यायला लागले. दुकानात पदार्थ बनवताना स्वच्छता अगदी काटेकोरपणे पाळली गेली/जाते हे ही लोकांना खूप भावले आणि लोकांचा प्रतिसाद वाढला.

सुरूवातीचं चित्रं कसं होतं? लोणची, पापड विक्रीपासून सुरूवात केल्यानंतर पोळीभाजी विक्रीचा निर्णयाप्रत तुम्ही कशा पोचलात?
ज्योतीताई: साधारण ५-६ महिने अशा प्रकारच्या खराब न होणार्‍या उन्हाळी व इतर पदार्थांची विक्री केल्यावर मनात आले की पोळी आणि भाजीची विक्री होऊ शकेल का? त्याकरता आम्ही सुरूवातीला घरुन पोळी आणि भाजी करुन विक्री करायला ठेवली. १-२ महिने संयमाने वाट पहावी लागली कारण तोपर्यंत आपल्या घरच्यासारखी घडीची पोळी आणि भाजी एखाद्या दुकानात मिळू शकते ह्याची कल्पनाही लोकांनी केली नव्हती. आमच्यासाठीही तो प्रयोगच होता. त्यामुळे उरलेल्या पोळ्या आम्ही घरी घेऊन जात असू. त्या काळात पोळ्यांचे असंख्य वेगवेगळे प्रकार आमच्या घरच्या लोकांना खावे लागले. त्यावर आम्हाला टिकाटिप्पणीही ऐकावी लागली. पण आम्हा दोघींच्या मनात पोळीभाजी विक्री ही संकल्पना पक्की होती त्यामुळे आम्ही निराशही झालो नाही किंवा हा व्यवसाय बंद करण्याचा विचारही मनात आणला नाही. जेव्हा ५ पोळ्यांकरता पहिला ग्राहक आमच्या दुकानात आला तेंव्हा आम्हाला कोण आनंद झाला! पोळीभाजी बरोबर आम्ही त्याला चटणी भेट दिली. हळूहळू ग्राहक पोळीभाजीसाठी येऊ लागले.
नंदिनीताई: ही पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता पोळीभाजी विक्री केंद्र जरी गल्लोगल्ली दिसत असली तरी तेव्हा इथल्या लोकांना पोळीभाजी विकत घेऊन खाणं ही कल्पनाच विचित्र वाटली. त्यामुळे इतर वस्तू जरी विकल्या जात असल्या तरी पोळीभाजी विक्रीला आम्हाला सुरूवातीला थंड प्रतिसाद मिळाला. आम्हाला एवढेच माहिती होते की वृद्ध लोक, विद्यार्थी, काम करणारे स्त्री/पुरुष ह्यांना ह्याचा खूप फायदा होईल, आणि आपण धीर न सोडता हा व्यवसाय चालू ठेवायचा. पण सुरूवातीचा प्रतिसाद बदलला आणि थोड्याच काळात ग्राहकांचा ओघ आमच्याकडे वाढायला लागला.

सुरूवातीच्या काळातल्या काही आठवणी?
ज्योतीताई: पोळीभाजी विक्रीला आम्ही सुरूवात केली खरी पण दुकानात पोळी-भाजी बनवणारी कायमस्वरुपी मदतनीस नसल्याने अडचण येऊ लागली. पोळ्या विकत घ्यायला येणार्‍यांची संख्या तशी अजूनही कमी होती आणि वेळही पक्की नव्हती, त्यामुळे पोळ्या करणारी बाई एवढा वेळ पोळ्या करण्याची वाट पाहत दुकानात थांबत नसे. मग आम्ही एक उपाय काढला. त्या काळी मी एम-८० चालवत असे. पोळ्या करणारी बाई इतर मुलांचे डबे त्यांच्या घरी जाऊन बनवत असे. तिची कामाची घरं आम्ही बघून ठेवली. ती किती वाजता कुठे असते ह्याचा अंदाज घेतला आणि मग माझ्या पळापळीला सुरूवात झाली. दुकानात पोळीसाठी ग्राहक आले की मी गाडी काढून बाईला दुकानात आणायचे आणि तिथे ताज्या पोळ्या तिच्याकडून करुन घ्यायच्या आणि तिला परत सोडायचे. ग्राहकांना ताज्या पोळ्या मिळायच्या आणि बाईला दुकानात रहावे लागायचे नाही. पण नंतर ग्राहक वाढल्यावर आणि तिला भरपूर पटवल्यावर ती तयार झाली आणि आमची धावपळ थांबली. ही पोळ्या करणारी बाई अतिशय सुंदर, तलम, नरम अशा पोळ्या बनवायची. शोभा आंग्रे तिचे नाव! पुढे ती आमच्या दुकानाचा आधारस्तंभ झाली. कामाला वाघ आणि वेळेचे बंधन तिने कधी पाळले नाही. अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक! एका बैठकीत ५०० पोळ्या केल्याशिवाय ती उठत नसे. आमच्यावरच्या प्रेमापोटी तिने दुकान अक्षरशः वर आणले. ती असताना आम्ही अगदी निश्चिंत असू. १४ वर्ष आमच्याकडे काम केल्यावर ती गेल्या वर्षी निवृत्त झाली. आमच्याकडे काम करताना तिला इतरही खूप ऑफर्स येत पण तिची आमच्यावरची निष्ठा दांडगी होती आणि तिने शेवटपर्यंत आपलेपणाने आमच्याकडेच काम केले.

इतर खाद्यपदार्थ विक्रीचा निर्णय कधी घेतला? लोकांचा प्रतिसाद कसा होता?
नंदिनीताई: सुरूवातीला पोळीभाजी विक्री करायला लागल्यावर आम्हाला लक्षात आलं की लोकांना नाश्ता हवा असतो, मुलांना मधल्या वेळेचं खाणं हवं असतं, काही जणांचा उपास असतो त्यांना उपासाचे पदार्थ हवे असतात. त्यात इतर काही महिला आम्हाला सांगून गेल्या की आम्ही अजून काही पदार्थ देतो, आम्हाला विकण्याचा अनुभव नाही, पण तुम्ही विकाल का? तेव्हा इतर खाद्यपदार्थही विकावेत हा विचार मनात यायला लागला.
ज्योतीताई: तसेही पोळीभाजीची विक्री वाढल्यावर आम्ही वरण, भात, रस्सा भाजी, सुकी भाजी, आमटी असे पदार्थ ठेवू लागलो. सतत दोघींची दुकानातील उपस्थिती, ग्राहकांशी तत्परतेने बोलणे, पदार्थांचा दर्जा उत्तम ठेवणे, स्वच्छता ह्यामुळे दुकानातली गर्दीही वाढू लागलेली होती. आमच्याकडे येणारे लोक इतर पदार्थांची मागणी करु लागले आणि आम्ही हे पदार्थ आमच्या पुरवठादार महिलांकडून करुन घेऊ लागलो. पुरणाची पोळी, सुरळीच्या वड्या, भाकरी, धपाटे, पराठे, थालीपिठ ह्या पदार्थांची मागणी वाढली. ग्राहक समाधानाने पुन्हा पुन्हा येत आणि कौतुकाचे, अभिनंदनाचे शब्द बोलून जात तेव्हा अतिशय समाधान वाटे.

व्यवसायाचा विस्तार कसा केलात?
ज्योतीताई: काही काळानंतर सध्याची जागा कमी पडू लागली कारण रोजचे पदार्थ वाढले, ग्राहक वाढले आणि आमचा प्रयोगशील उत्साहही! त्यामुळे आम्ही दुकानासाठी मोठी जागा घेतली. तिथे चांगल्या सोयी करवून घेतल्या. स्वयंपाकासाठी मोठा प्लॅटफॉर्म करुन घेतला, गॅसची पाईपलाईन करुन घेतली, पाण्यासाठी मोठ्या टाक्या बसवून घेतल्या, काऊंटरसाठी अधिक चांगली व्यवस्था करुन घेतली. एकूण चांगला बदल केल्याने आम्हाला व कर्मचार्‍यांनाही ह्या नव्या जागी काम करायचा हुरुप आला. इथे आल्यावर मात्र व्यवसायाचा व्याप झपाट्याने वाढला. कर्मचारी महिलांची संख्याही वाढवली. दुकानाची वेळ, पदार्थांची उपलब्धता, दर्जा, ग्राहकांचे समाधान, पॅकिंगमधील बदल अशा बर्‍याच गोष्टींमध्ये बदल केले आणि व्यवसायाला एक निश्चित रूप प्राप्त झाले. शहरामध्ये ’स्वयंपाकघर’ हे एक खात्रीचे, घरगुती पदार्थ मिळण्याचे ठिकाण झाले. व्यवसायात मिळणारे सगळे पैसे त्यातच गुंतविल्यामुळे वेगळे पैसे घ्यावे लागले नाहीत किंवा उधारीचा व्यवसाय नसल्यामुळे पैशाची किंवा भांडवलाची कमी पडली नाही. आतापर्यंत बँकेत खाते काढले होते. बँकेचे अधिकारीही या महिला काहीतरी वेगळे काम करत आहेत म्हणून मदतीला तत्पर होते. पुढे काही मोठी यंत्रसामुग्री किंवा फर्निचर ह्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन ते वेळेच्या आत फेडण्यात आम्ही यशस्वी झालो. आतापर्यंत मिळालेले पैसे परत व्यवसायातच गुंतविल्यामुळे दुकानाच्या वाढीला गती आली. हिशोबाची पद्धत सुरूवातीपासूनच कडक होती. दिवसभरात विक्री किती झाली, खर्च किती झाला, पैसे शिल्लक किती राहिले ह्याचा रोजच्या रोज हिशोब असल्याने व्यवहार एकदम पारदर्शी राहिला.

गुणवत्ता राखण्यासाठी काही विशेष प्रयत्न करता का? (सामग्रीची खरेदी, स्वच्छता, पॅकिंग, लेबलिंग, ग्राहकसेवा, पदार्थांचा दर्जेदारपणा - ताजेपणा व चव, मार्केटिंग इ.)
ज्योतीताई: पदार्थांचा दर्जा आणि चव टिकवून ठेवण्याकरता त्यात टाकण्यात येणारे मसाले दुकानात कर्मचारी आमच्यासमोर करतात. ग्राहकांकडून फिडबॅक घेण्यासाठी रजिस्टर मेंटेन केले जाते आणि त्यांच्या सूचनांप्रमाणे आणि आमच्या प्रयोगशीलतेप्रमाणे वेळोवेळी बदल करुन विशिष्ट चव, विशिष्ट रंग निश्चित करुन पदार्थ उत्तम प्रतीने बनवण्याकडे भर दिला जातो. पदार्थ जास्तीतजास्त ताजा कसा राहील, त्याचे पॅकेजिंग केल्यानंतरही सर्वसामान्यांना कसे परवडेल त्यासाठी काय करावे लागेल याचा विचार करुन त्याप्रमाणे बदल केले जातात. सतत स्वच्छता ठेवण्यासाठी १-२ कर्मचारी जादा ठेवावे लागतात. भाज्या, डाळ-तांदूळ स्वच्छ धुवूनच वापरले जावेत याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष देतो. सुरूवातीलाच मार्केटिंगसाठी, वेळोवेळी (किंवा काही बदल/अ‍ॅडिशन्स केल्यास) स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात देणे यासाठी लेटरहेड्स, बिझनेस कार्ड्स तयार केले. चांगल्या प्रतीच्या वस्तू होलसेलमध्ये कुठे मिळतात ह्याची शोधाशोध केली. सर्वच पातळ्यांवर दोघींकडूनही आत्मीयतेने काम केले गेल्यामुळे व्यवसायाला खूप चांगला आकार व स्वरुप लाभले.

वेगवेगळ्या यंत्रांसाठी, जमाखर्च, विक्री इत्यादीकरता तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे उपयोग करुन घेता?
नंदिनीताई: आम्हाला एका दिवसाला ५० ते १०० किलो कणीक भिजवावी लागते. मोठ्या प्रमाणात कणीक भिजवण्यासाठी आम्ही यंत्र घेतलंय. त्यात एका वेळेला १५-२० किलो कणीक भिजवली जाते. चटण्या/पेस्ट करुन घ्यायला मोठं पल्वरायझर घेतलंय, त्यात २५ किलोपर्यंत गोष्टी बारीक होतात. त्यात दिवाळीच्या काळात आम्ही २-२ क्विंटल अनारश्यांचं पिठ भिजवतो. ताजा नारळ वापरून ओल्या नारळ्याचा करंज्या, वड्या, लाडू करण्याकरता इलेक्ट्रिक खोवणी घेतली आहे. त्यात एका वेळेला ५० नारळ खोवले जातात. काही खाद्यपदार्थ थंड ठेवण्याकरता आम्ही मोठमोठाले फ्रिज असेम्बल करुन घेतले आहेत ज्यात आम्हाला हवे ते तापमान मेन्टेन करता येते. तसेच आम्ही त्यात आम्हाला हवे तसे कप्पे बनवून घेतले आहेत. एका वेळा जास्त ताजे, गरम पदार्थ करता येण्यासाठी जास्त शेगड्या असलेला गॅस असेम्बल करुन घेतला आहे. पदार्थ जास्त दिवस साठवून पोषणमूल्य कमी करुन घेणे पसंत नसल्याने आम्ही १५-१५ दिवसाचा साठा ठेवतो. दुकानात आम्ही क्लोज सर्किट कॅमेरे बसवून घेतले आहेत. सगळा व्यवहार कॉम्प्युटराईज्ड सिस्टिममधून चालतो. आम्ही रोज सगळ्या व्यवहाराचा बॅकअप घेतो, सिडीज बनवून घेतो आणि चार्टर्ड अकाऊंटंटला दर महिन्याला कॉम्प्युटरमधले सगळे हिशेब पाठवतो.

स्वयंपाकघराच्या अजून शाखा सुरू करण्याचा करण्याचा विचार केला का?
नंदिनीताई: व्यवसाय वाढवायला हरकत काहीच नाही पण त्याबरोबर दर्जा राखणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खाण्याशी संबंध असल्याने दर्जा, स्वच्छता याचे आमच्याकरता अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही दुकानांची संख्या वाढवून दर्जा राखू शकला नाहीत तर ग्राहकांचाही हिरमोड होतो, कारण सध्या नुसत्या आमच्या नावावर ग्राहक डोळे मिटून विश्वास ठेवतात. दुसरं म्हणजे आमची पुढची पिढी ह्या व्यवसायात नाही आहे, आणि आमची वयं बघता फार जास्त विस्तार करुन दर्जा राखला न जाण्याचा धोका आम्हाला पत्करायचा नाही. त्यामुळे आम्ही सध्या आहे त्या दुकानातच इतर काही जिन्नस, पदार्थ वगैरे वाढवण्यावर भर देतोय.
ज्योतीताई: खरंय! पण एकदा आम्ही हा ही प्रयत्न केलाय. ३-४ वर्षांपूर्वी औरंगाबादेतल्या एका मोठ्या बिगबझारमध्ये आम्ही लाईव्ह किचन उपक्रम राबवला. बिगबझारच्या संचालकांनी शहरात सर्व्हे केल्यावर आम्हाला त्यांचे स्वयंपाकघर चालवण्याची ऑफर दिली व ती आम्ही आमच्या अटींवर स्वीकारली. मॉलमध्ये मिळणार्‍या जंकफूड किंवा बेकरी पदार्थांपैकी आम्ही काहीही करणार नाही तर अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीच्या पदार्थांची विक्री करु ही आमची प्रमुख अट होती. सांगण्यास अतिशय आनंद वाटतो की धपाटे, पराठे, पुरणपोळी, भाजीपोळी, सुरळीची वडी, झुणका भाकरी वगैरे पदार्थांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. मॉलच्या ग्राहकसंस्कृतीचा प्रकार वेगळा आहे, तो दुकानात येणार्‍या वर्गाप्रमाणे नसतो, तिथे अठरापगड जातीचे लोक सतत येतजात असतात व ते हे महाराष्ट्रीय पदार्थ अतिशय चवीने खात. अशा प्रकारे २-३ वर्षे तरी आम्ही लोकांना जंकफूड पासून दूर ठेवले हेही नसे थोडके. पण नंतर तो मॉल बंद झाला आणि आमचे तिथले लाईव्ह किचनही.

स्वयंपाकघरात कोणकोणत्या प्रकारचे पदार्थ मिळतात?
दोघी: रोज १५-२० ताजे पदार्थ असतात. जेवणात पोळ्या, सुक्या/रस्सा भाज्या, उसळी, वरण/आमटी यांचे वेगवेगळे प्रकार, साधा भात, मसाले भात, वड्यांचे प्रकार (पालक, मका इत्यादी), भज्यांचे प्रकार, तिखटमिठाच्या पुर्‍या , धपाटे, पराठे, थालीपिठ, ज्वारी/बाजरी भाकरी, पिठलं, लाल/हिरव्या मिरच्यांचा ठेचा, विविध चटण्या, तळून ठेवलेल्या मसाला मिरच्या (खास सोलापूरच्या) वगैरे. कोणालाही हे पदार्थ घरी नेऊन साग्रसंगीत जेवण करता येते.
नाश्त्याला: पोहे, उपमा, धिरडी, सामोसे, कचोरी, आप्पे, ढोकळे, साबूदाणा वडा असे पदार्थ असतात.
वर्षभर: वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा, चकल्या, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू (मोतीचूर/रवा/बेसन/नारळ/डिंक/मेथ्या, उपासाचे लाडू इ), वड्या, अनारसे, पुरणपोळी, खवापोळी, बालुशाही वगैरे मिळतात.
पापड, कुरडया, खारवड्या, कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले इत्यादी वर्षभर मिळते.
ह्या व्यतिरिक्त आम्ही वर्षभर केटरिंगच्या ऑर्डर्सही घेत असतो.

सध्या तुमचा स्टाफ किती आहे?
नंदिनीताई: सध्या आमच्याकडे ३५ कर्मचारी स्त्रिया आहेत. त्यातल्या १५ जणी आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवलेल्या आहेत. काही जणींची मुलं लहान आहेत, किंवा शाळेत जाणारी आहेत आहेत, त्या अर्धा वेळ येऊन काम करतात. काऊंटर सांभाळायला, साफसफाईला स्त्रिया आहेत. जातपात, धर्म न बघता उत्तम स्वयंपाक येण्यार्‍या स्त्रियांची आम्ही निवड करतो.

व्यवसायासाठी आवश्यक असणारा सरकारी परवाना, व्यवसायाची नोंदणी इत्यादींविषयी तुमचा कसा अनुभव होता?
ज्योतीताई: ज्यावेळी बाजारात दुकान उघडण्याचे ठरवले होते तेव्हाच महानगरपालिकेकडून शॉपअ‍ॅक्टसाठी परवाना दोघींच्या नावाने घेतला. खाण्याचे पदार्थ असल्यामुळे पालिकेकडून फूड अँड ड्रगचे लायसन्स घ्यावे लागले. ते वेळोवेळी मुदत संपण्याच्या आधी रिन्यू करणे हे आम्ही न चुकता करतो. अग्निशमन दलाचा परवाना लागतो, तो आम्ही घेतो. विशेष म्हणजे कुठल्याही ऑफिसमध्ये आमची कधीही अडवणूक झाली नाही. परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे चोख आणि खात्रीची असल्यामुळे कोणत्याही ऑफिसमध्ये कधीही त्रास झाला नाही. आता तर सेल्स टॅक्स, व्हॅट आणि इतरही दुकानासंबंधी कराचे नियोजन करुन ते आम्ही मुदतीच्या आत भरतो, त्यामुळे आमची कायदेशीर बाजू अगदी पक्की आहे.

ह्या व्यवसायात किती वेळ द्यावा लागतो?
नंदिनीताई: आम्ही ’स्वयंपाकघर’ सकाळी साडेसातला उघडतो. सकाळी साडेसात ते दहा पर्यंत नाश्त्याकरता वर्दळ सुरू असते. त्याचवेळेला आतमध्ये दुपारच्या जेवणाची तयारीही सुरू असते. दुपारनंतर अगदी थोडा वेळ दुकान बंद ठेवून आम्ही लगेच रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागतो. रात्री दहाला दुकान बंद होईपर्यंत वर्दळ असते. जरी कर्मचारी वर्ग मोठा असला तरी आमचे दोघींचे सगळ्या गोष्टींवर बारिक लक्ष असते. स्वच्छता पाळली जाते का, कुठला माल विकत आणायचा आहे, जमाखर्च व्यवहार इ. त्यामुळे प्रत्येक दिवस हा व्यस्त असतो. पण आता स्थैर्य आल्यामुळे कामाचा ताण कमी पडतो.
ज्योतीताई: व्यवसाय म्हटला की वेळ हा द्यावा लागतोच. तो २४ तासही पुरत नाही. सतत व्यवसायाचे, कर्मचार्‍यांचे प्रश्न, तो व्यवसाय अजून चांगल्या प्रकारे कसा करता येईल याचे विचार मनात असतात. शिवाय घर, संसार, नातेवाईक, लग्नकार्य, सणसमारंभही सांभाळावे लागतात. आम्हाला सुरूवातीच्या १० वर्षात प्रचंड वेळ आणि एनर्जी द्यावी लागली. आता स्थैर्य आले आहे. फोनवर कामे होतात. किराणा माल, दूध किंवा इतर ऑर्डर्स पूर्ण करण्यात कर्मचारी तरबेज झाले आहेत. त्यांना मार्गदर्शन करणे, वेळोवेळी सूचना देणे हे काम अजूनही गरज पडेल त्याप्रमाणे करावे लागते. मॅनेजर, कॅशिअर, काऊंटरवरील मुख्य कर्मचारी, किराणा मालाची नोंद ठेवणारे कर्मचारी अशी कामे वेगवेगळ्या महिलांना दिल्यामुळे आम्हा दोघींवरचा ताण बराच कमी झाला आहे. आता देशविदेशात काही कारणामुळे भ्रमंती होत असते त्यावेळीही चौकस बुद्धीने खाद्यपदार्थांबद्दलचे कुतुहल स्वस्थ बसू देत नाही. त्याविषयी विचार व चिंतन चालू असते. त्यातूनचे नवनवे विचार सुचतात व प्रयोगही होतात.

तुम्ही तुमच्याकडे काम करणार्‍या महिलांसाठी काही योजना चालवता का?
ज्योतीताई: आमच्याकडे काम करणार्‍या महिलांसाठी आम्ही भिशी गट चालवतो ज्यात आम्हीही भाग घेतो, जेणेकरुन महिलांना बचतीची सवय लागावी आणि एकरकमी पैसे मिळून संसाराला हातभार लागावा. आमच्या कर्मचार्‍यांसाठी आम्ही बचतगट चालवतो. दुकानातल्या २ महिला पगार झाला की सगळ्यांचे पैसे गोळा करुन बँकेत भरतात. ह्या बचतगटामार्गे कमी व्याजदरात ह्या महिलांना कर्ज मिळू शकते. ह्याकरता आम्ही प्रत्येकीचे बँकेत खाते उघडून दिले आणि मुलभूत कामकाज शिकवले. आनंद ह्याचा आहे की त्याचा आमच्या कर्मचारी महिला ह्याचा पुरेपूर उपयोग करतात.
नंदिनीताई: आमच्याकडे येणार्‍या अर्ध्याअधिक बायकांचे नवरे दारू पिणारे आहेत. त्यामुळे अर्थिक भार, मुलांचा भार, त्यांची शिक्षणं, घरातल्या इतर जबाबदार्‍या त्यांच्यावरच आहेत. घराबाहेर पडून काम करु लागल्यामुळे त्या एकतर स्वावलंबी झाल्या आहेत. कित्येक जणींनी भिशी आणि बचतगटाचा फायदा घराकरता, सणसमारंभाकरता वस्तू घेणे, मुलांच्या शिक्षणाकरता तरतूद करणे इत्यादी करता करून घेतला आहे. मुख्य म्हणजे ह्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यांचे उंचावलेले मनोधैर्य! नीटनेटके राहणे, इतरांशी व्यवस्थित बोलणे, मिळून काम करणे हे त्यांच्या वळणी पडले. ह्या महिला घराकरता, स्वतःकरता स्वबळावर निर्णय घ्यायला लागल्या हे पाहून अतिशय चांगले वाटते.

कोणत्या अडचणी येतात? कोणती आव्हाने असतात? त्यांतून कशा प्रकारे मार्ग काढता?
ज्योतीताई: खाद्यपदार्थ तयार करणे व त्यांची विक्री करणे हाच मुळी आव्हानात्मक व्यवसाय आहे कारण ग्राहकांच्या आवडीनिवडीशी तर तो निगडीत असतोच पण त्यापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याशी निगडीत असतो. त्यामुळे सतत सावध राहून पदार्थ चांगले राहण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते. उन्हाळ्यात पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून खबरदारी घ्यावी लागते. एखाद्या पदार्थाला थोडा जरी वास आला किंवा खराब झाला तर तो नुकसान सोसून ताबडतोब नष्ट करावा लागतो. हसतमुख राहून ग्राहकांचे सहजतेने, शांततेने शंकानिरसन करावे लागते. पदार्थ बदलून द्यावे लागतात. ह्या व्यवसायात अजून एक आव्हानात्मक गोष्ट म्हणजे कर्मचारी टिकवून ठेवणे. त्यांची सर्वतोपरी काळजी घेऊन, त्यांच्या माफक गरजा पुरवून, त्यांना प्रशिक्षण देऊनही ते काम कधी सोडून जातील ह्याचा नेम नसतो. अशावेळी जास्त ऑर्डर्स असल्या तर कमी कर्मचार्‍यांना उत्तेजन देऊन त्यांच्याकडून काम पूर्ण करावे लागते. कारण एकदा ऑर्डर घेतल्यास ती वेळेवर देणे ही पहिली महत्त्वाची गोष्ट असते. अशावेळी शांतपणाने, न चिडता, आत्मविश्वासाने, हाताशी हजर असलेल्या कर्मचार्‍यांबरोबर ह्यातून मार्ग काढावा लागतो. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सतत पदार्थांच्या किमती बदलता येत नाहीत. अशा वेळी पदार्थ तयार करणे आणि त्यांची विक्रीकिंमत ठरविणे आव्हानात्मक ठरते. व्याप वाढला की अडचणी वाढतात, त्यातून मार्गही काढला जातो आणि तो तुमच्या अनुभवातून निघतोही आणि त्याचे एक वेगळेच समाधान मिळते.

हा व्यवसाय करताना आलेले काही हृद्य अनुभव किंवा काही संस्मरणीय आठवणी आम्हाला सांगाल?
नंदिनीताई: बर्‍याचदा अचानकपणे लोक भेटतात आणि चांगलेचुंगले खाऊ घातल्याबद्दल आमचे आभार मानतात तेव्हा खूप आनंद होतो. मी आणि यजमान काही वर्षांपूर्वी सिंगापूर, मलेशियाला गेलो होतो. आम्ही एक शो पाहताना एका मुलाने विचारले, "काकू, तुम्ही इथे कशा?" मी काही त्याला ओळखत नव्हते. तो बायकोला म्हणाला, “अगं दोन वर्ष मी रोज सकाळ संध्याकाळ यांच्याकडे घरच्यासारखं जेवलो. मला खूप चांगलं खायला मिळालं आणि समाधान मिळालं ते ह्या काकूंमुळे!” दुसर्‍या देशातही अचानक कोणी भेटून असं आभार मानल्याबद्दल खूप छान वाटलं. असे प्रसंग अनेक वेळेला येतात आणि कौतुकाचे, आभाराचे शब्द ऐकून खूप चांगले वाटते.
ज्योतीताई: नक्षत्रांचे देणे, प्रसिद्ध नाटके किंवा इतर कार्यक्रम औरंगाबादला असले की त्यातील कलावंत मुद्दाम शोध घेऊन 'स्वयंपाकघरा'त येतात, येथील पदार्थांचा आस्वाद घेतात. होममिनिस्टर फेम आदेश बांदेकर, गायक रवींद्र साठे, अभिनेत्री स्वाती चिटणीस, प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे, मोहन जोशी ही काही नावे ज्यांनी स्वयंपाकघरातील पदार्थांचा आस्वाद घेतला आहे.
एकदा मुंबईहून काही लोक आले व त्यांनी पोळ्या, पिठले, भात वगैरेची १०० लोकांची ऑर्डर नेली. दुसर्‍या दिवशी असे समजले की त्यांच्या जवळच्या एका नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यांचे औरंगाबादला कोणीही नव्हते. शेजार्‍याने आमचा पत्ता दिला आणि त्या दिवशी आणि नंतरही एक-दोन दिवस त्यांची सोय झाली. त्या लोकांनी आमचे मनापासून आभार मानले. इथे अशी काही सोय होऊ शकेल अशी कल्पना नसल्याने ते काळजीत होते. कोणाचे निधन झाल्यावरही आपण कामास येऊ शकतो हा विचार आम्हाला संस्मरणीय वाटला.
एक ८० वर्षांचे गृहस्थ रोज सकाळी साधारण १० मुलांना पुरेल असे वेगवेगळ्या प्रकारचे जेवण रोज अनेक वर्षं नेत असत. त्यांना एकदा कुतुहलाने विचारल्यानंतर त्यांनी जे उत्तर दिले ते खरोखरीच अतिशय हृद्य होते. ते म्हणाले, “मी ८० वर्षांचा आणि माझी बायको ७६ वर्षांची आहे. आम्हाला पेन्शन मिळते. मुले जवळ रहात नाहीत. आम्हाला या वयात शारीरिक काम होत नाही पण समाजासाठी काहीतरी करावे असे वाटते. म्हणून आमच्या घराजवळच्या झोपडपट्टीतील १० मुलांसाठी माझ्या पेन्शनमधून हे जेवण नेतो व त्यांचा अभ्यासही घेतो. तुमच्याकडील जेवण ह्यासाठी, की येथील जेवण मुलांना कधीही बाधणार नाही व वेगवेगळे पदार्थ जे त्यांनी कधी पाहिलेही नसतील ते त्यांना खाऊ घालण्यात आम्हाला दोघांनाही खूप आनंद मिळतो.” अशावेळी डोळ्यात खरंच पाणी येते.

या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणते गुण - कौशल्ये बाळगणे किंवा विकसित करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते? कोणती पथ्ये पाळणे आवश्यक आहेत?
ज्योतीताई: कोणत्याही व्यवसायात टिकून राहण्यासाठी संयम, वेळेचे बंधन, नियोजन, तत्परतेने निर्णय घेणे हे महत्त्वाचे असते. खाद्यपदार्थांच्या बाबतीत विशेष लक्ष द्यावे लागते. पदार्थ तुम्हाला माहिती असावा लागतो. त्यातील घटकपदार्थांचे प्रमाण ठरवावे लागते. कमीतकमी नुकसान होईल हे जसे पाहावे लागते त्याच प्रमाणे एखाद्या वर्षी तोटाही मोठ्या धीराने सोसावा लागतो व त्यात होणार्‍या चुकांमधून शिकून पुढे जावे लागते. एखादी गोष्ट शिस्तीने नियमित केल्याने व्यक्तीला तिची सवय लागते, त्यातील फायदे कळतात आणि परिपूर्णतेकडे तुमची वाटचाल सुरू राहते. त्याकरता सतत प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. वेळ पाळणे, पदार्थांचा दर्जा, चव टिकवून ठेवणे, पदार्थाची उपलब्धता सतत ठेवणे, आर्थिक बाबतीत हिशोब पारदर्शी ठेवणे, कर्मचारी टिकवून ठेवून त्यांचे मनोधैर्य सतत वाढवत राहणे अशा प्रकारची कामे कौशल्याने आणि न कंटाळता करावी लागतात. वेळेवर टॅक्स, व्हॅट, लाईटबिल, फोनबिल भरणे, सतत सजग राहणे अशा प्रकारची पथ्ये पाळल्यास प्रशासकीय बाजूनेदेखील आपण सावध राहतो, निश्चिंत राहतो. केवळ ह्या सवयीमुळेच आतापर्यंत आम्हाला कुठल्याही विभागाकडून आम्हाला त्रास झालेला नाही आहे. उलट चांगले काम केल्यामुळे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, रिजनल ऑफिस, महानगरपालिका, बालविकास सभापती विभाग, रोटरी क्लब, लायन्स क्लब, मी मराठी वाहिनी, इटीव्ही वाहिनी ह्यांच्यातर्फे आमचे सत्कार, गौरव केले गेले.

काही आगामी योजना असल्यास त्याबद्दल सांगाल का?
ज्योतीताई: व्यवसायाचा व्याप वाढवावा तेवढा कमीच असतो. पण अजूनही पुढे जायचे आहे. दवाखान्यांना रुग्णांसाठी लागणारे सकस जेवण पुरविण्याविषयी विचार सुरू आहे. शहरामध्ये गरजू महिलांना रोजगार मिळावा ह्या हेतूने त्या घरुनच काही पदार्थ करुन देऊ शकतील का ह्याविषयी सर्व्हे चालू आहे.
नंदिनीताई: तसंच जानेवारीपासून आम्ही सर्व प्रकारच्या पिठांचं नवीन दालन उघडतोय. स्वयंपाकघरात लागणारी सगळी पीठं आम्ही विक्रीसाठी ठेवणार आहोत.

या व्यवसायात येऊ इच्छिणार्‍यांसाठी काही सल्ला?
नंदिनीताई: या व्यवसायात येणार्‍यांना एक गोष्ट सांगू इच्छिते, ते म्हणजे यशाला शॉर्टकट नसतो. तुम्ही जे काही कराल ते चांगले करा. लोकांना चांगली गोष्ट देणे जितके जरुरीचे आहे, तितकीच आवश्यक आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे सातत्य राखणे. त्यामुळे कष्ट करा. जी गोष्ट आपण लोकांना विकतो, ती चांगली आहे, याची खात्री करूनच ती विका. चवीबरोबरच तिची क्वालिटी महत्त्वाची. यामुळे कदाचित व्यवसायात जम बसायला वेळ लागेल, पण एकदा लोकांना तुमचे पदार्थ रुचू लागले, की ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येतील.
ज्योतीताई: हा व्यवसाय करायला सोपा आहे असे प्रथम सर्वांनाच वाटते कारण स्वयंपाक ही अजूनही स्त्रियांची मक्तेदारी आहे. पण त्यात उतरू इच्छिणार्‍या महिला व पुरुषांना एकच सांगणे आहे, निराश न होता संयमाने, उत्तम दर्जाचे पदार्थ जर तुम्ही देत असाल तर तुमच्या घरातून तो पदार्थ बाजारात सहज येऊ शकतो. फक्त जिद्द, चिकाटी ठेवा.

घरून पाठिंबा कसा मिळाला?
नंदिनीताई: कुठल्याही व्यक्तीला व्यवसायात यशस्वी होण्यासाठी घरचा सपोर्ट अत्यावश्यक असतो. त्या मानाने मी या व्यवसायात उशीरा आले. त्या वयात नव्या उमेदीने काम करण्यासाठी माझ्या घरच्यांनी मला नेहमीच प्रोत्साहित केले. अनेक वेळा असे प्रसंग आले की त्या वेळी आई या नात्याने माझी पूर्णवेळ उपस्थिती असणे आवश्यक होते, पण माझा व्यवसाय लक्षात घेता, ते मला नेहमीच शक्य झाले नाही... मला असलेले सामाजिक भान माझ्या मुलांमध्येही आहे, त्यामुळे आई आपल्यापुरतीच नाही ही जाणीव त्यांनाही आहे. शिवाय माझी या व्यवसायातील भागीदार वेळोप्रसंगी मदतीला असतेच.
ज्योतीताई: खरंतर वयाच्या ४२ ते ४५च्या दरम्यात घरातली मुले मोठी झाल्यावर या मार्गावर आम्ही आलो. जबाबदार्‍या पूर्ण संपल्या नव्हत्याच पण काही तरी करण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच घरदार सांभाळून हे पाऊल पुढे टाकले. सुरूवातीला प्रचंड धावपळ व मानसिक शक्ती खर्च झाली, पण घरच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने विश्वास वाढला, प्रेरणा वाढली. माझे सासूसासरे अतिशय पुढारलेल्या विचारांचे होते. त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासाने मी अधिक पुढे गेले.

मोकळा वेळ कसा घालवायला आवडतो?
नंदिनीताई: माझा मित्र परिवार मोठा आहे, आम्ही मैत्रिणी बर्‍याचदा एकत्र जमतो.. कधी सहलींना जातो. मला सकाळी उठल्यावर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकणे आवडते. मालिनी राजुरकर या माझ्या आवडत्या गायिका; त्यांच्या स्वरांनी माझी सकाळ सुरेल होते. या शिवाय मला जुनी हिंदी गाणी ऐकायला आवडतात. कविता, कथा, कादंबरी हे साहित्यप्रकार माझ्या आवडीचे, त्यामुळे मी वेळ मिळेल तेव्हा आवर्जून पुस्तकं वाचते.
ज्योतीताई: सतत इतकी वर्षे धावपळीत गेल्यानंतर मोकळ्या वेळात हल्ली शांत बसणे, जुनी गाणी ऐकणे, विविध देशातील कर्तबगार स्त्रियांची आत्मचरित्रे वाचणे असे करायला आवडते आहे. मनात एक विचार सतत येत असतो की अजूनही स्त्री स्वतंत्रपणे विचार करु शकत नाही. विशेषतः खालच्या वर्गातील स्त्रियांना सतत प्रोत्साहित करावे लागते. वेळ मिळाल्यास अशा स्त्रियांना बोलावून, त्यांच्या अडचणी समजावून घेऊन, त्यांच्या समोर पर्याय ठेवून त्यांना चांगल्या पद्धतीने जगण्यास मदत करता येईल का हा विचार मी करतेय. नवनवीन पदार्थ करुन बघायला मला आवडते.

टंकलेखन सहाय्यः बिल्वा
फोटो सहाय्यः स्वयंपाकघर आणि अल्पना

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर मुलाखत मो!!
प्रश्न तसेच उत्तरं प्रचंड आवडली! फोटो बघून भूक लागली ते वेगळंच! Happy
औरंगाबादला गेल्यावर नक्कीच भेट देणार! Happy

अगदीच घराजवळ असल्यामुळे स्वयंपाकघर चा प्रवास जवळुन अनुभवला आहे. आज ही मुलाखत वाचुन सुरळीच्या वड्या आठवल्या.

निखिल देशपांडे

मस्त मुलाखत. छान प्रश्न आणि अतिशय सविस्तर उत्तरं.

नंदिनीताई आणि ज्योतीताईंना शुभेच्छा.

एक अत्यंत सुंदर परिपूर्ण मुलाखत..या कर्तबगार महिलांची भरारी वाखाणण्यासारखी आहे.
मुद्देसुद प्रश्न आणि समर्पक उत्तरे--या मुलाखतीबद्दल मो तुझे मनापासुन कौतुक !!

मो,

अतिशय उत्तम माहीती. सौ. ज्योती आणि सौ नंदिनी यांच्या परिश्रमांस, कल्पकतेस आणि चिकाटीस अभिवादन. कधी अजिंठ्याला गेलो तर संभाजीनगरात येऊन इथलं खाईन. पत्ता व फोन मिळेल काय? (गूगल करायचा टंकाळा आलाय)

आ.न.,
-गा.पै.

मस्स्स्त मुलाखत! खाद्यपदार्थ करणारे आणि पुरवणारे सर्व व्यावसायिक ज्या पॅशनने हे काम करतात ते बघून अतिशय आदर वाटतो.
त्यांनी जे संस्मरणीय अनुभव सांगितले आहेत, ते वाचून छान वाटलं.
फोटो एक नंबर आहेत.

सुंदर मुलाखत! मो, अगदी नेटके प्रश्न विचारले आहेस व दोघींनी मनापासून उत्तरे दिलेली जाणवत आहेत. अल्पनाने काढलेले फोटोग्राफ्स पाहून आणि त्या पदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे!!

नंदिनीताई व ज्योतीताईंचे इतक्या सुरेख वाटचालीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!!

अतिशय सुरेख मुलाखत आहे.. प्रश्न, फोटो, मांडणी सगळंच नेटकं झालंय, आवडलं.
अभिनंदन मोहिनी Happy दोघी उद्योजिकांचे पण कौतुक आहे, तिसरा फोटो खुप आवडला.. त्यातले सुबक आणि स्वच्छ पदार्थ ग्राहकांना नक्कीच आकर्षित करणारे आहेत.

छान मुलाखत. वेरुळ्ला जायचे आहेच. त्यावेळी नक्की भेट देता येईल. कौतुक वाटले या दोघीन्चे.धन्यवाद मो.

तो मितानने लिहीलेला येसर आमटीचा मसाला मिळतो का इथे?

मस्त झालीये मुलाखत मो. Happy

स्वैपाकघराशी संबंधित खूप आठवणी आहेत. Happy
गेल्या ८-१० वर्षात औरंगाबादेत बरीच नविन पोळीभाजी केंद्रं झालीत. पण स्वैपाकघराची सर कोणालाच नाही. स्वैपाकघरच्या अगदी सुरवातीच्या दिवसात खूप पाहूणे आल्यावर त्यांना स्वैपाकघरमधली पुरणाची पोळी खाऊ घालून चकित केल्याचं आठवतंय. आमच्या जुन्या घरापासून स्वैपाकघर खूप दुर होतं, पण तरीही वाट वाकडी करून तिथला खाऊ नेहेमी आणला जायचा. स्वैपाकघरातली सांबारवडी कोथिंबीर वडी आणि चिरोटे हे पदार्थ खाल्ल्याशिवाय माझी औरंगाबादवारी अजूनही पुर्ण होत नाही. अगदी साध्या घडीच्या पोळीमध्ये सुद्धा नेहेमीची साध्या गव्हाची पोळी आणि शरबती गव्हाची पोळी असे प्रकारसुद्धा मिळतात तिथे. रुचकर, अगदी घरगुती चवीचं, तेलाचा मोठा तवंग नसलेलं आणि तरीही खूप चविष्ट जेवण मिळतं इथे.

बाबांचे एक जवळचे मित्र वारल्यानंतर सुरवातीचे ३-४ दिवस आलेल्या सगळ्या ( किमान ५०-६०) माणसांसाठी पिठलं-भात-पोळ्या असं जेवण स्वैपाकघरातून अगदी घरपोच आलं होतं.

फोटोच्या निमित्ताने ज्यावेळी स्वैपाकघराला भेट दिली त्यावेळी चपळगावकर काकुंनी दवाखान्यामध्ये रुग्णांसाठी पथ्यकारक आहार पुरवण्याच्या कल्पनेबद्दल परत एकदा सांगितलं. त्यांनी आई रिटायर झाल्यावर तिला आणि तिच्या मैत्रिणींना ही सेवा सुरु करण्यासाठी सुचवलं आहे.

@ रश्मी -- मितान नी सांगितलेलं येस्सर पीठ मिळतं स्वैपाकघरमध्ये.

वा!! मो उत्तम झाली आहे मुलाखत. ज्योतीनगरमधे मधे एक वर्शभर राहिले तेव्हा नियमित वारी होत होती. स्वयंपाक्घर खरोखरच चान्गल आहे.
त्यांच्याकडे पुडाची वडी फार मस्त असते.

उत्तम मुलाखत व फोटो! औरंगाबादला जाऊन इथे नक्कीच भेट द्यायला हवी.
नंदिनीताई व ़ ज्योतीताई ....दोघींचं अभिनंदन व शुभेच्छा!

मो,छान झाली आहे मुलाखत.प्रश्न आणि उत्तरं दोन्ही आवडले.खाद्यपदार्थांचा उद्योग करणे खरंच अवघड काम आहे.
स्वयंपाकघरच्या पुढच्या वाटचालीला खूप शुभेच्छा!! कधी औरंगाबादला जायचा योग आला तर नक्की भेट देईन.

मस्त झालीये मुलाखत. त्यांचे मेन्यु वाचू , फोटो बघून तोंडाला पाणी सुटलं. त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा.

खुप सुंदर मुलाखत व ओळख... धन्यवाद मो, बिल्वा, अल्पना..
"स्वयंपाक" यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा... यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो हि सदिच्छा.

Pages