आणि मग शेवटी उरतं निव्वळ ओंजळभर रान.......अस्तव्यस्त !!

Submitted by मी मी on 17 January, 2014 - 00:42

आणि मग शेवटी उरतं निव्वळ ओंजळभर रान
आयुष्याच्या वाटेवर …. सावडलेलं
अस्तव्यस्त ….

थोड्या काचा, थोड्या ठेचा
वाटेतले काटे , खाचखळगे
थोडी फुले … काही फुललेली काही चुरगळलेली
काही गोटे, शंख शिंपले
एखादे मोरपीस … मखमली
थोडे चमचमते मणी, मोती .. गुळगुळीत

विसाव्याला जमवलेल्या विराट सावल्या
काही आधारवडं ….
पण …. त्यावर गुंफलेल्या विषवल्ली
अन पावलागणिक उमळून पडलेली रोपटी देखील

लाकडाचा देखणा ओंडका
वाळून जाळी झालेली पानांची देखणी नक्षी
पानांतून डोकावणारा सुरेखसा कवडसा
मध्येच चमकून गेलेली झिरमिर वीज
सरसरणारा स्पर्शून गेलेला वारा
आणि उन्हाचा दाह शोषून घेणाऱ्या गार गार धारा

पोटाला आधार म्हणून मिळवलेली फळं, कंद आणि मुळं
ओंजळभर तृप्त करून गेलेली तृष्णा शांती
लालाटावर तेवणारा शांत शीतल चंद्रप्रकाश
अन डोक्यावर छत्र धरणारं अथांग नील आकाश

पायाखालचा पाचोळा थोडा ओला थोडा सुका
माखलेली धूळ …. आणि
तळव्याला घट्ट चिकटून बसलेली चिखलमाती

कधीतरी झटकून काढली गेलेली झाडाची खपली
त्यातून भळभळून वाहणारा चिक … त्याचा आताशा डिंक झालाय
अन त्यावर परत खपली धरतेय असं ऐकलय …

सांर सांर घेऊन ओटीत बांधून
उत्तरेच्या दिशेने नदीच्या काठी
झोळी अलगद उघडली …. ओतली
हक्काच्या अश्या वितभर जमिनीवर

आणि बघते काय ??

वेचून वेचून आणलंय काय ?
येउन जाउन उरलंय काय ??

निव्वळ ओंजळभर रान
तेही ………. अस्तव्यस्त !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users