पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - समारोप

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
<1’

गेले आठवडाभर तमाम चित्रपटप्रेमींच्या गर्दीत सुरू असलेला जगभरातल्या उत्तमोत्तम चित्रपटांचा महोत्सव आज संपला.

कोथरुडातल्या सिटिप्राईड चित्रपटगृहात समारोप व बक्षीससमारंभ रंगला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आईसलँडचे भारतातले राजदूत गुडमंडूर एरिकसन उपस्थित होते. स्पर्धेचे ज्यूरी, महोत्सवाचे प्रायोजक यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.

पुढच्या वर्षीपासून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा अधिकृत महोत्सव म्हणून ओळखला जाणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली होती. त्यामुळे पुढच्या वर्षी आघाडीच्या जागतिक चित्रपट महोत्सवांप्रमाणे पुण्यातही चित्रपटाची बाजारपेठ महोत्सवादरम्यान असेल.

महत्त्वाचं म्हणजे पुढच्या वर्षीपासून हा महोत्सव पिंपरी-चिंचवड या शहरांमध्येही आयोजित केला जाणार आहे. अतिशय नेटक्या भाषणात कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या डॉ. श्रीकर परदेशी या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी महोत्सवात तशी घोषणा केली. डॉ. परदेशी यांचं नाव पुकारताक्षणी झालेला टाळ्यांचा कडकडाट त्यांच्या स्वच्छ प्रतिमेची ग्वाही देणारा होता. महोत्सवाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर असलेल्या समर नखात्यांचा सत्कार होत असताना टाळ्या-शिट्ट्यांनी थिएटर दणाणून जाणं, हे दरवर्षीचं दृश्य या वर्षीही पाहायला मिळालं. चित्रपट आणि विद्यार्थी या दोन गोष्टींना पहिलं प्राधान्य देणार्‍या नखातेसरांबद्दल विद्यार्थ्यांना असलेला आदर अशावेळी दिसून येतो.

समारोप समारंभाचं मुख्य आकर्षण होतं ते अर्थातच महोत्सवाच्या स्पर्धाविभागाचा निकाल.

मराठी चित्रपटांच्या विभागात अपेक्षेप्रमाणे बाजी मारली 'फॅण्ड्री'नं.

महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'संत तुकाराम सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार' 'फॅण्ड्री'ला देण्यात आला. रुपये पाच लाख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. चित्रपटाचे निर्माते निलेश नवलखा व विवेक कजारिया आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार 'फॅण्ड्री'साठी नागराज मंजुळे यांना देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 'फॅण्ड्री'साठी सोमनाथ अवघडेला जाहीर झाला. करमाळ्याजवळच्या एका लहानशा खेड्यातल्या चौदा वर्षांच्या सोमनाथचा 'फॅण्ड्री' हा पहिलाच चित्रपट. चित्रपटात काम करायला तो मुळीच तयार नव्हता. नागराज त्याच्या मागे तीन महिने धावत होता. शेवटी कसाबसा नागराजनं त्याला कॅमेर्‍यासमोर उभं केलं. 'फॅण्ड्री'तला त्याचा अफलातून अभिनय पाहिल्यावर आश्चर्यानं निव्वळ थक्क व्हायला होतं. आज पुरस्कार जाहीर झाल्यावर तो स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर जायला लाजणारा सोमनाथ यापुढेही चांगल्या संधीचं निर्विवाद सोनं करेल.

सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार 'फॅण्ड्री'साठी विक्रम अमलाडी यांना जाहीर झाला.

सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार 'अस्तु' या चित्रपटासाठी सुमित्रा भावे यांना देण्यात आला.

परीक्षकांचं विशेष पारितोषिक 'नारबाची वाडी' या चित्रपटासाठी मंगेश धाकडे यांना जाहीर झालं.

मराठी स्पर्धाविभागाचं वैशिष्ट्य म्हणजे अमराठी व अभारतीय परीक्षक या चित्रपटांचं परीक्षण करतात. यंदा मराठी विभागाचे परीक्षक होते अंजुम राजाबली (भारत), निकी करिमी (इराण) आणि लॉरेन्स कार्दिश (अमेरिका).

जागतिक चित्रपट स्पर्धाविभागात 'प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार' 'पापुशा' या पोलिश चित्रपटाला देण्यात आला. योहाना कॉस-क्रॉझ आणि क्रिस्तोफ क्रॉझ या दाम्पत्यानं या अप्रतिम देखण्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रुपये दहा लाख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार 'पापुशा'साठी योहाना कॉस-क्रॉझ आणि क्रिस्तोफ क्रॉझ यांना आणि 'फॉरेन बॉडीज' या इटालियन चित्रपटासाठी मिर्को लोकातेली यांना विभागून देण्यात आला.

'अ टच ऑफ सिन' (चीन व जपान) या चित्रपटाला, 'हाऊस विथ अ टरेट' या चित्रपटाच्या दिग्दर्शिका इव्हा नेमान यांना आणि 'रोझी' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार्‍या सिबील ब्रुनेर या अभिनेत्रीला परीक्षकांची खास प्रमाणपत्रं देऊन गौरवण्यात आलं.

प्रेक्षकांच्या पसंतीच्या चित्रपटांसाठीचं पारितोषिक 'फॅण्ड्री' आणि 'नाइट ट्रेन टू लिस्बन' या चित्रपटांना देण्यात आलं.

याच समारंभात महोत्सवातल्या विद्यार्थ्यांसाठीच्या लघुपटस्पर्धेची बक्षिसंही जाहीर करण्यात आली.

१. लाइव्ह अ‍ॅक्शन फिल्म पुरस्कार -

सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट - 'डेव्हिल इन द ब्लॅक स्टोन' (एल. व्ही. प्रसाद फिल्म अकॅडमी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - अरविंद कुपलीकर (अम्मोरथा या लघुचित्रपटासाठी, एल. व्ही. प्रसाद फिल्म अकॅडमी)

सर्वोत्कृष्ट पटकथा - विद्या सागर (अरिवू या लघुचित्रपटासाठी, व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल)

सर्वोत्कृष्ट छायालेखन - Przemyslaw Brynkiewicz (Miruna या लघुचित्रपटासाठी, नॅशनल पोलिश फिल्म स्कूल)

सर्वोत्कृष्ट ध्वनिलेखन - Luis Hernaiz (Stringless, Mordisco Films)

२. अ‍ॅनिमेशन शॉर्ट फिल्म पुरस्कार -

सर्वोत्कृष्ट भारतीय अ‍ॅनिमेशन फिल्म - 'फकिर' (डीएसके सुपरइन्फोकॉम) व 'आयकॅन्डी' (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन) यांना विभागून

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन फिल्म - 'फॉरवर्ड मार्च' (एस्मा, फ्रान्स)

परीक्षकांचं खास पारितोषिक - 'ब्लू' (चॅपमन युनिव्हर्सिटी, अमेरिका) आणि 'मायोसिस' (ले'कोल द लि'माज, फ्रान्स)

३. एफटिआयआय सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पारितोषिक - अभिलाष विजयन आणि हीर गांजावाला.

एफटिआयआयच्या शेवटच्या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्याला दिल्या जाणार्‍या या पारितोषिकाची एक गंमत आहे. २००८ साली मारिया केत्सत्स्नोवा या चेक गणराज्यातील विद्यार्थिनीला सर्वोत्कृष्ट लघुपटासाठीचा व दिग्दर्शनाचा असे दोन पुरस्कार मिळाले. या बक्षिसांची रक्कम तिनं आयोजकांकडे परत केली आणि त्या पैशाच्या व्याजातून दरवर्षी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला महोत्सवात बक्षीस दिलं जावं, अशी विनंती केली. आयोजकांनी तिच्या विनंतीला मान दिला आणि २००९ सालापासून हे पारितोषिक दिलं जाऊ लागलं.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

'फॅण्ड्री' काय आहे?

पराग, चिनूक्स, साजिरा- तुम्ही लोकांनी बघितलेल्या चित्रपटांविषयी थोडं तपशीलात लिहा की.

'फॅण्ड्री' काय आहे? >> नवीन मराठी चित्रपट.. ट्रेलर बघितला होता टाईमपासच्या शो वेळी.. इंटरेस्टींग वाट्ला
तेव्हा पिफ्फ चा पण एक शो होता .. खुपच गर्दी होती त्याला..

अरे वा !!
नाईट ट्रेन तू लिस्बन ला मिळाली का प्रेक्षकांची पसंती.. ? मी त्या एकाच चित्रपटाचं वोटींग कार्ड भरलं होतं..
पापुशा नेमका माझा राहिला पहायचा.. त्या दिवशी सुट्टी असुनही.. Sad

सिंडी.. चिनूक्स लिहिणार आहे.. (म्हणून मी माझी उथळ वर्णनं लिहित नाहीये.. Wink )

आज पेपरमध्येही वाचलं याबद्दल.
सिंडरेला +१.

त्यामुळे पुढच्या वर्षी आघाडीच्या जागतिक चित्रपट महोत्सवांप्रमाणे पुण्यातही चित्रपटाची बाजारपेठ महोत्सवादरम्यान असेल. >>> चित्रपटांची बाजारपेठ म्हणजे काय?

सहीच! फँड्री बद्दल जबरदस्त उत्सुकता वाटते आहे. पिफ्फला गेली चार वर्षं ऑफिसमुळे जाता येत नव्हतं पण यावेळी विविधभारतीवर वृत्तांत, विशेष टिप्पण्या, भाषणांचे तुकडे ऐकून ताकावर तहान भागल्याचं समाधान मिळवलं. Happy

'फँड्री' या महोत्सवातच पाहिला. भीषण सामाजिक वास्तवाचं चित्रण करणारा हा चित्रपट त्याच्या संवेदनशीलतेमुळे सुखावणारा होता आणि अस्वस्थ करणाराही. 'जरुर पाहावा' असा चित्रपट.

'फँड्री' म्हणजे काय - हे आधी जाणून न घेतल्यास उत्तम. चित्रपट पाहताना त्याचा अर्थ एकदम अंगावर येतो - ते अनुभवण्याजोगं आहे!

'फॅण्ड्री' या नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. १४ फेब्रुवारीला तो महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

फिल्म मार्केट किंवा चित्रपटांची बाजारपेठ ही जगभरातल्या सर्व मोठ्या चित्रपटमहोत्सवांमध्ये किंवा महोत्सवांव्यतिरिक्तही भरवली जाते. निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, वितरक, फायनान्सर, उपकरणांचे विक्रेते इत्यादी चित्रपटांच्या सर्व क्षेत्रांशी संबंधित अशा बाजारपेठांना हजेरी लावतात. उद्देश असतो एकमेकांशी ओळख होणे, चित्रपटांच्या हक्कांची खरेदी-विक्री करणे, चित्रपटासाठी भांडवल मिळवणे इत्यादी. गोव्यातल्या इफ्फीत अशी बाजारपेठ असते. पुण्यातही आता ती सुरू होईल.

छान लेख. Fandryबद्दल मध्ये नागराज मंजुळे आणि त्यात काम करणारे बाल कलाकार ह्यांची मुलाखत एका मराठी न्यूज channelवर बघितली होती, तो चित्रपट तयार करतांनाचे अनुभव नागराज यांनी शेअर केले होते.