शाळा (मंदारमाला वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 16 January, 2014 - 11:44

शिस्तीत शाळा जरी पुर्ण केली मला शिस्त नाही कधी लागली,
विक्षिप्त मी वागलो कैक वेळा मुले चांगली ही जरी वागली...
डोक्यात काही शिरेनाच माझ्या सदा केस कापून मी जायचो,
वर्गात बादाम पिस्ते मनूके हळू तोंड झाकून मी खायचो...

खेळायचा तास येता चुकांडी मला खेळणे भावले ना कधी,
मातीत लोळायचे मित्रे सारे मला लोळणे भावले ना कधी...
खेळून व्यायाम होतो गड्यांनो मला गोष्ट खोटी सदा वाटली,
फ़ोडून ढेकूळ तांबूस माती अधाशापरी फ़ार मी चाटली...

पाठीवरी दप्तराचा पसारा असे धाक शाळेतही जायला,
मोजायचो वार प्रत्येकदा मी रवीवार माझा पुन्हा यायला...
हातावरी डाग काळे कुठेही निबेतील शाई तरंगायची,
अभ्यास होता जरीही अधूरा तरी फ़ार घाई घरी जायची....

व्याख्या कशाची कधी ना कळाली गुणाकार ना बेरजा जाणल्या,
वृत्ते अलंकार सार्‍याच मात्रा जिवाणू विषाणू मध्ये आणल्या....
सुत्रे कधी पाठ झालीच नाही उतार्‍यात ना उत्तरे गावली,
प्रश्नोत्तरे फ़ालतू वाचताना वही मी रिती फ़ारदा ठेवली....

मोठेपणा मान देणार शाळा कळालेच नाही जिवा बेतले,
प्रत्येक वर्गात खोड्या करोनी खुले ज्ञान नाही कधी घेतले....
होणार काहीच का शक्य नाही जुना काळ मागे पुन्हा आणणे,
शाळेतल्या सर्वही शिक्षकांना पुन्हा एकदा देवता मानणे....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोठेपणा मान देणार शाळा कळालेच नाही जिवा बेतले,
प्रत्येक वर्गात खोड्या करोनी खुले ज्ञान नाही कधी घेतले....
होणार काहीच का शक्य नाही जुना काळ मागे पुन्हा आणणे,
शाळेतल्या सर्वही शिक्षकांना पुन्हा एकदा देवता मानणे....

क्या बात है !!!

आवडली कविता.