याद रखेगी दुनिया ... माझं पहिलं प्रेम !!

Submitted by मी मी on 9 January, 2014 - 12:39

माझ्याच आतल्या संवेदनशील मनाचा पहिल्यांदा परिचय झाला ते वय होत फार फार तर १०-१२ वर्ष. त्या आधी काही गोष्टी अश्या मनाला स्पर्शून जातात किंवा इजा करून जातात. या इजा दुखतात दुखऱ्या दिसत नसल्या तरी आणि ते मनाचे स्पर्श अश्रूवाटे व्यक्तही होतात असं काही अस्तित्वात असतं हे माझ्या गावीही नव्हतं…. या feelings हे emotions पहिल्यांदा जागृत झाले किंवा माझ्यातल्याच माझ्या या रूपाचा मला खरा परिचय झाला तो क्षण ती वेळ मला अजूनही आठवते… आणि त्यासाठी ठरलेलं निमित्त्य देखील.

मी शाळेतून परतले होते दुपारची वेळ होती. आदित्य पांचोली आणि रुख्सार यांचा 'याद रखेगी दुनिया' नावाचा सिनेमा चालू झाला. 1992 ला रिलीज झालेला फ्लॉप सिनेमा म्हणून टीव्ही वर येण्या पूर्वी नावही ऐकलं नव्हतं. बघत बसले, उटी सारख्या नयनरम्य हिलस्टेशन ला शूट झालेला भन्नाट सिनेमा (त्यावेळचा) खळखळून हसायला लावणारा आणि तेवढ्याच उत्कटतेने रडायलाही लावणारा. हल्लीच सिनेमा परत पाहण्याचा योग आला आणि सारे जुने क्षण पुन्हा आठवले…

कुठल्याश्या दुर्धर आजाराने कोलमडून गेलेला विकी आनंद (आदित्य पांचोली) आयुष्याचे शेवटचे दिवस शांततेने काढावे म्हणून या हिलस्टेशन वर येउन राहू लागतो. त्याचा आजार आणि आता तो कदाचित लवकर मरणार या विचाराने विकी आणि आपण बघे सुद्धा नर्वस झालेलो असतांनाच.मस्ती करणारया, तिथल्या लहान मुलांसोबत मिळून सतत खोड्या काढत असणार्या, आपल्याच आजी आणि वडलांशी खोटं बोलणाऱ्या गोड हसऱ्या उत्साही नैनाची (रुख्सार) एन्ट्री होते. तिच्या खोड्या अन मस्ती बघत सिनेमा पुढे सरत जातो आणि आपण या खुशमिजाज, मनमोकळ्या स्वभावाच्या खोडकर अन अविरत मस्ती करत राहणाऱ्या हसर्या नैना सोबत आपसूक गुंतत जातो ….आपल्या भोवतालचे वातावरण कसे रम्य होत जाते आपल्यालाच काळात नाही. सिनेमा पुढे सरकतो नैना ने केलेल्या कुठल्याश्या खोडीचा बदला घ्यायचा म्हणून एकदा विकी तिला जंगलात सोडून येतो. ती परत आली कि नाही हे बघायला तिच्या घरी जातो तेव्हा ती आलेली नाही हे कळतं आणि त्याबरोबरच तिला असणारा भयंकर आणि शेवटच्या टप्प्याला पोचलेल्या रोगाबाद्दलही. आणि कालपासून ती परत आलेली नाहीये म्हणजे तिने औषधही घेतलेले नाहीये आणि अश्या परिस्थितीत तिला काहीही होऊ शकतं हे तिची आजी त्याला सांगते . … आणि आपण काय चूक केली हे विकीच्या ध्यानात येतं. तो तिला परत घ्यायला त्याच जागेवर जातो तेव्हा नैना रात्रभर थंडीमुळे अन औषध न घेतल्याने पुरती ढासळली असते पण अश्याही परिस्थितीत विकी जवळ येती तेव्हा तिच्या खोड्या चालूच असतात. आणि चेहेर्यावरचे हसू कायम असते.

या क्षणापासून दोघांत एक गोड नातं निर्माण होतं.… दोन लोकं … दोघेही मृत्युच्या दारात उभे परंतु एक संपूर्ण कोलमडून जाउन आतापासूनच जगणं सोडून दिलेला तर दुसरी थोडंसं उरलेल आयुष्य तिच्या अटींवर जगणारी दीर्घ आयुष्यातही उपभोगता येणार नाही ती सर्व सुख, आनंद ओढून जगणारी.
तिच्या जगण्याच्या या सुंदर पद्धतीत विकी सुद्धा जगायला शिकू लागतो. आयुष्याकडून त्याच्या अपेक्षा वाढतात स्वप्न जागृत होऊ लागतात.….

http://www.youtube.com/watch?v=fZ7sGrGICkI

पुढला बराच सिनेमा या दोघांच्या प्रेमाच्या प्रसंगाने भरून जातो. आणि आपल्यासारखा संवेदनशील प्रेक्षक भावूकतेच्या लाटेवर हिंदोळे घेऊ लागतो. अश्यातच तिचे डॉक्टर वडील (विक्रम गोखले) विकी ला तिच्यापासून दूर राहण्याची विनंती करतो. तिच्या भल्यासाठी म्हणून विकी मनावर दगड ठेवून तिच्यापासून दूर होतो आणि अश्याच वेळी नैनाचा रोग डोकं वर काढतो. ती आजारी पडते आणि अगदी शेवटच्या टप्प्याला येउन पोचते. ती दवाखान्यात असतांना विकी ने गायलेले हे गाणे …तुमचाही जीव पिळवटून टाकणार नाही तरच नवल ….

http://www.youtube.com/watch?v=kMaKDFSG_pE

तिला जातांना बघवणार नाही म्हणून किंवा विकीला एकटं सोडून जातेय हे पाहून ती दुखी होईल म्हणून विकी परत जायला निघतो…. आणि पुढे काय ……. हे वेडं खूळ अश्याही स्थितीत अगदी स्ट्रेचर वरून रेल्वे स्टेशन वर तिच्या मुळ दाखवलेल्या स्वभावानुसार हसत हसत उपस्थित होते … Somehow Happy Ending

आज बघतांना सिनेमा कसा वाटेल कसा जाणवेल माहिती नाही पण माझ्या मनाला स्पर्शून गेलेला आणि आज इतक्या वर्षांनीही मनातून तस्सुभरही निघू न शकलेला संवेदना जागवणारा आणि सिनेमा बद्दल प्रेम निर्माण करणारा हा सिनेमा …त्यावेळी निर्माण झालेले ते feelings न emotions आजतागायत जिवंत आहेत. हा सिनेमा म्हणजे सिनेमांमधल माझं पहिलं प्रेम हे मी कधीच विसरू शकणार नाही.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीले आहे. काहीच माहिती नव्हती या चित्रपटाबद्दल. हीच रुख्सार नंतर बर्‍याच वर्षांनी सरकार व "डी" ई चित्रपटांत आली तीच असावी.

चांगला लिहीलाय रिव्यू! आपण न पाहीलेले, किंवा ज्यांच्याविषयी कधीच न ऐकलेले असे पण काही चित्रपट आहेत ही जाणीव झाली Happy

बाकी आपला चित्रपट आजही कोणीतरी एवढा लक्षात ठेवून आहे हे जर आदित्य पांचोलीला कळलं, तर त्यालाही त्याच्या आतल्या संवेदनशील मनाचा परिचय होईल Proud

<< "डी" ई चित्रपटांत आली तीच असावी >>
आधी वाटलं 'डी' नंतर 'ई' चित्रपट पण आला काय Happy

अरे मी पण जेंव्हा वेड्या वयात हा बघितला होता तेंव्हा मला पण खूप आवडला होता .
आज बघतांना सिनेमा कसा वाटेल कसा जाणवेल माहिती नाही +१११ म्हणून मी आता बघताच नाही. मध्ये असेच जुने आवडलेले सिनेमे परत बघितले आणि मला त्यांच्यातल्या चुका दिसु लागल्या. मग वाटायला लागले की आपल्याला कसे काय इतके भुक्कड सिनेमे आवडत होते. पण त्या त्या वयात ती ती आवड असते हे एक्सेप्ट केल.

अमितकुमारचं गाणं विसरायला झालं होतं, व्हिडियो पाहून परत आठवलं. कॉलेजच्या दिवसांत खूप आवडलं होतं ते. Happy
सिनेमाही पाहिलाय. मात्र तो काही एवढा ग्रेट वाटला नव्हता त्या वयातही.
मात्र कधीकधी असा कुठलातरी सिनेमा खूप आवडून जातो हे अगदी खरं.

हा मूळ मणिरत्नमचा सिनेमा होता गीतांजली म्हणून. नागार्जुन आहेत त्यात. अतिशय सुरेख आहे. हिंदी रीमेक नंतर पाहिला होता मी. अर्थातच गीतांजली जास्त आवडला. Happy

लले, इतकंच काही नाही हां Proud
गीतांजली दूरदर्शनच्याच कॄपेने पाहिलेला सिनेमा आहे. बहुदा नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाल्यामुळे दाखवला होता. तूच कसा पाहिला नाहीयेस याचं आश्चर्य वाटतंय. कारण रोजा जेव्हा नुकताच आला तेव्हा मणिरत्नमचा मौनरागम (हा पहायचा राहिलाच्चे) आणि गीतांजलीची एकदम धूम होती. इतक्या फ्रेश लव्हस्टोरीज तेव्हा हिंदीत नव्हत्याच होत. कयामत से किंवा बडजात्यांचे पिच्चर मणिरत्नमच्या या सिनेमांच्या पासंगालाही पुरणारे नाहीत

वयानुसार काही सिनेमे आवडतात काही परिस्थितीनुसार तर काही त्यावेळच्या मानसिकतेनुसार. परिस्थिती पालटली किंवा मनःस्थिती बदलली कि तेच रटाळ किंवा हास्यास्पद वाटू लागतात असे असले तरी कुठेतरी एखादा विशिष्ट विषय आपल्या मनाच्या खूप जवळचा असतो. तोच तोच विषय कुठल्याही साच्यात घडवून समोर मांडला तरी आवडत असतो …… मला Love Stories अश्याच आवडतात. Happy Happy

तुटी खिडकी
मकडी का जंगला
जंगले के पिछे भूत बंगला
बंगले मे कोई आया है
आके हमे जगाया है
जायेगा बच के कहाँ

विषयांतर आहे....पण वरदा यानी म्हटल्याप्रमाणे मणिरत्नमचा 'मौनरागम' खूप आवडला होता. लवस्टोरीज आवडण्याच्या काळात त्यामुळे मी मणिरत्नम आणि रेवती यांची पंखा होते. या रेवतीमुळे तिचा आणि सलमान खानचा एक हिंदी सिनेमाही पाहिला..(नाव आठवत नाही, तितकासा आवडला नाही)

या रेवतीमुळे तिचा आणि सलमान खानचा एक हिंदी सिनेमाही पाहिला..(नाव आठवत नाही, तितकासा आवडला नाही)<><< लव्ह, त्यामधे रेवतीचं नाव मॅगी असतं. सलमान खान तिला कब्रस्तानात एकटं सोडून "पाच मिण्टात येतो" म्हणून निघून जातो आणि विसरतोच. मग भूक लागली म्हणून एका हटिलात जातो तर वेटरला म्हणतो "दो मिनिटमे कुछ भी लेके आओ" मग वेटर म्हणतो "दो मिनीटमे मॅगी मिलेगा" मग भाईची ट्युब पेटते आणि मग तिला धावत कब्रस्तानात शोधत येतो. तिथे मॅगी "तुमने कहा था ना मै वापस आऊंगा" असं म्हणते. मग त्या दोघांत प्रेम होतं. असा एकंदरीत सुंदर पिक्चर आहे, क्लायमॅक्सच्या सीन्साठी तर एक नवीन लेख लिहावा लागेल असा अद्भुत क्लायमॅक्स आहे.

त्यातलं "साथिया ये तूने क्या कहा" गाणं माझं फार आवडीचं.

गितांजली पाहिला आहे, वर उल्लेखलेला सिनेमा मात्र पाहिला नाही.

लव हा चित्रपट सुद्धा मला त्या एका वयात आवडलेला. सल्लू तेव्हा आवडायचा. मग सल्लूचे सर्व चित्रपट पाहयचे. नग्मा बरोबरचा पण एक टुकार चित्रपट पाहिलेला.
आता विचार केला की वाटते, अरे का बघितला? Proud

मैने प्यर किया तर तीन तास लाईनीत उभे राहून टिकिट काढून पहिलेला. आणि तेव्हाच सल्लूच एक पोस्टर आणलेलं पण बाबांना घाबरून लपवून ठेवलेलं.(बाबांना असे नटांचे/नटींचे फोटो आणलेले आवडायचे नाहीत. ते लोकं त्यांचे काम करतात, तुम्ही तुमचे काम करा(अभ्यास हे माझं काम)). Proud मग कुठल्याच नटाचे फोटॉ कधीच आणले नाहीत. का माहित पन कुणी इतकं आवडलेलं नाहीच की फोटॉ आणावे. आमिरचा कयामत से कयामत पण आवडलेला. आता पाहिला तर आपण वेडे होतो हे जाणवते.

माधुरीचा दिल पण तसाच 'तेव्हा' आवडलेला. असो.

नग्मा बरोबरचा पण एक टुकार चित्रपट पाहिलेला. - बागी
बघितला पण होता आणि आवडला पण होता.
याद रखेगी दुनिया ची जी हिरवीण आहे तिचा अजून एक पिच्चर पण होता . अशीच लव स्टोरी होती. नाव आठवत नाही पण तो सुधा आवडला होता.

याचा वरिजिनल गीतांजली आधी पायलेला, त्यातला नागार्जून लईच भारी आहे. त्यावेळी मणीरत्नमची लायटींगची पद्धत एकदम नवी वाटलेली;चेहर्‍याची एकच बाजू एकदम उजळवून टाकणे इ.इ.

मी मौनरागमची सबटायटल्ड लिंक शोधते आहे अजून. यूट्यूबवर सबटायटल्स नाहीत. कृपया कुणाला माहित असल्यास इथे किंवा माझ्या विपुत देणे Happy

८०-८५ पर्यंत अनेक भंकस चित्रपट देणार्‍या साउथ च्या इंडस्ट्रीने अचानक कात टाकून एवढे दर्जेदार चित्रपट कसे निर्माण केले कोणास ठाउक. हिन्दीत गेली काही वर्षे दर्जा सुधारला आहे, मराठीतही. पण साउथ मधे कमालीचा फरक जाणवला. अर्थात माझे ज्ञान फार मर्यादित आहे, त्यामुळे आधीही येत असतील आणि आपल्यापर्यंत पोहोचले नसतील तर माहीत नाही.

पोस्टर वरून आठवले माझ्या बहिणीने विवेक ओबराय चे पोस्टर लावले होते. बापरे वय वेड असते अस उगाच नाही म्हणत.

बागी बराच बरा होता की. चांगली कथा होती. >>> तेवढे ते सलमान खान आणि त्याचे मित्र एफ.वाय.जे.सी.चे (म्हणजे अकरावीच की! :अओ:) दाखवले नसते तर बरं झालं असतं Wink

बागी - तेव्हा बरा वाटलेला. पण आताच उल्लेख करताना आठवला तर टुकार म्हणावे लागेल.

खूप काही तेव्हा सुद्धा न्हवता आवडलेला. पण सल्लू आवडायचा तेव्हा म्हणून.

नंतर कॉलेजला जाईतोवर सल्लू बेकार वाटायला लागलेला.

लव मात्र आवडलेला तेव्हा. पण ते पवित्र रिश्ता वाले सतत ती "साथिया तुने क्या किया" धून वाजवून किटवतात. त्यातली गोडीच कमी केली असे वाटते.

काय योगायोग.. दोनच दिवस झाले लेकीला 'तुटी खिडकी मकडी का जंगला..' हे गाणं ऐकवलं, तिला खुप आवडलं त्यामुळे घरी गेल्यावर रोज या गाण्याची पारायणे होतायत आणि नेमके आज या पिक्चरबद्द्ल लिहलयं. मलाही तेव्हा हा पिक्चर खुप आवडलेला. गाणीतर अजुन लक्षात आहेत.

योगायोग यासाठी की या पिक्चरबद्द्ल त्यातही आदित्य पांचोलीच्या पिक्चरबद्द्ल कुणी कधी लिहेल असे कधीच वाटले नव्हते.

टुटी खिडकी .......हे गाणे मी कित्येक्दा बर्याच अंताक्षरी मधे गायलेले...... तेव्हा बरेच लोक विचारायची... "हे कोणते गाणे आहे" म्हणुन.....

मग सगळे रामायण सांगायला लागायचे ........त्यात "रुक्सार बाई" एक चित्रपट करुन पाकिस्तानात कि लंडन ला परत गेल्या त्यामुळे ही रुक्सार कोण हे सांगताच येत नव्हते... आणि आदित्य पांचोली सोलो हिरो होता ही बाब बर्याच जनांना पचणी पडत नव्हती.......त्याचा माधुरीबरोबर चा एकच चित्रपट सोलो मधे आठवतो बर्याच जनांना ( ते ही "हमको आजकल है इंतजार" या गाण्यामुळेच लक्षात आहे Happy )

रुक्सार परत आल्यावर डायरेक्ट रामगोपाल वर्माच्या "सरकार" मधेच दिसली...

Pages