पुढेमागे कुठे असशील काही माहिती नाही

Submitted by वैवकु on 8 January, 2014 - 15:17

पुढेमागे कुठे असशील काही माहिती नाही
पुन्हा होईल नाही भेट ह्याचीही हमी नाही

तुला पाहून जन्माची सुरू होतील गार्‍हाणी
अवस्था आमची मृत्यो तुझ्याइतकी बरी नाही

तुझ्या प्रेमात आहे मी कधीपासूनचा वेडा
किती आली किती गेली युगांची मोजणी नाही

स्वतःच्या बाबतीमध्ये म्हणे तो बेफिकिर आहे
खरे तर हेच की त्याला कुणाची काळजी नाही

कशी ही शायरी माझी तुला सोप्यात सांगू का
विठ्याचे गूज गातो मी विठ्याची थोरवी नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा वैभवजी....

मस्त !!!

>>>तुझ्या प्रेमात आहे मी कधीपासूनचा वेडा
किती आली किती गेली युगांची मोजणी नाही >>>>

सर्वांत विशेष!!!

गझल मस्तच आहे.

खास करून पहिले दोन शेर सुंदर आहेत.
मतल्यात
'पुन्हा होईल नाही भेट ह्याचीही हमी नाही' या मिसऱ्यामध्ये पहिल्या 'नाही' ऐवजी 'अपुली' वापरल्यास 'नाही' ची पुनरावृत्ती टळून फक्त भेट होण्याची हमी नाहीये असे व्यक्त होईल. जे आत्ता भेट होईल याचीही हमी नाही आणि भेट होणार नाही याचीही हमी नाही असे होत आहे.

अगाऊपणाबद्दल क्षमस्व. ( आवडले नसल्यास दुर्लक्ष करावे)

शुभेच्छा.

छान.

तुला पाहून जन्माची सुरू होतील गार्‍हाणी
अवस्था आमची मृत्यो तुझ्याइतकी बरी नाही

कशी ही शायरी माझी तुला सोप्यात सांगू का
विठ्याचे गूज गातो मी विठ्याची थोरवी नाही >>> हे दोन सर्वात छान वाटले.

मस्त

मतला आणि शेवटचा शेर विशेष आवडले...

वैभव फाटक : जे आत्ता भेट होईल याचीही हमी नाही आणि भेट होणार नाही याचीही हमी नाही असे होत आहे. >>> माझ्यामते ते मुद्दमच तसे लिहिले आहे... त्यामुळेच शेरात गंमत आली आहे असे मला वाटले... कारण दोन्हीची ही हमी नाही आहे...

सर्वंचे मनापासून आभार

बेफीजी विशेष आभार

फाटक साहेब ...मिल्याशेठ म्हणत आहेत ते बरोबर आहे !!!
लक्षात येण्यासाठी ...पुन्हा भेट होईल किंवा नाही ह्याचीही हमी नाही असा अन्वयही लावू शकता पण म्हणताना अंदाजे बयान मधून असे साधायचा प्रयत्न होता की... पुन्हा भेट होईल नाही होईल ह्याचीही हमी नाही
(ठळक अक्षरे अव्यक्त मानता येतील )

असो
फाटक साहेब आणि मिल्याशेठ आपलेही विशेष आभार
आणि क्षमस्वही...की....

जरा संदिग्धसा आहे पुरेसा नेमका नाही
गझल सांगायचा अंदाज माझा बोलका नाही

व्वा....क्य बात है...

>>

जरा संदिग्धसा आहे पुरेसा नेमका नाही
गझल सांगायचा अंदाज माझा बोलका नाही >>

वाह !!!

अवस्था आमची मृत्यो तुझ्याइतकी बरी नाही

विठ्याचे गूज गातो मी विठ्याची थोरवी नाही

हे दोन मिसरे आणि शेवटचा शेर तुफान आवडले !