काय झाले ते कळेना

Submitted by आनंदयात्री on 8 January, 2014 - 03:20

काय झाले ते कळेना
सत्य बिल्कुल ऐकवेना

संपली केव्हाच मैफल
पाय पण माझा निघेना

पोचलो वरती अचानक
आणि खाली उतरवेना

विस्मृतीने जन्म घ्यावा
स्मरणवेणा सोसवेना

जवळचे सोडून गेले
हट्ट तरिही सोडवेना

भोवती ओसाड दुनिया
आतली गर्दी हटेना!

शोधुया मुक्काम नंतर
सोबतीचा हात दे ना!

भोगण्याचा मोह नाही
अन् विरक्तीही जमेना!

नेहमी कर्तव्य केले
देव का अजुनी दिसेना?

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2014/01/blog-post.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विस्मृतीने जन्म घ्यावा
स्मरणवेणा सोसवेना

भोवती ओसाड दुनिया
आतली गर्दी हटेना! >>> हे दोन सर्वात छान वाटले.

सत्य बिल्कुल ऐकवेना >>> ही ओळ वाचताना किंचित अडखळल्यासारखे झाले.
कदाचित मला नीट वाचता आली नसेल.

गझल आवडली.

विस्मृतीने जन्म घ्यावा
स्मरणवेणा सोसवेना

भोवती ओसाड दुनिया
आतली गर्दी हटेना!

शोधुया मुक्काम नंतर
सोबतीचा हात दे ना!

भोगण्याचा मोह नाही
अन् विरक्तीही जमेना!

<<< सर्वाधिक आवडलेले शेर!

काय झाले ते कळेना
सत्य बिल्कुल ऐकवेना

दुस-या ओळीत
सलग चार-पाच लघु
आल्याने अडखळायला होत आहे.
शेरात अधिक स्पष्टता हवी आहे.

जवळचे सोडून गेले
हट्ट तरिही सोडवेना

शेर छान आहे.

भोवती ओसाड दुनिया
आतली गर्दी हटेना!

नेहमीचाच विचार आहे.
लालित्यपूर्ण असेही काही वाटले नाही.

भोगण्याचा मोह नाही
अन् विरक्तीही जमेना!

विचार गोंधळपूर्ण आहे. मोह नसणे म्हणजेच विरक्ती नव्हे काय ?
विचार नीट पोहोचला नाही.

शेवटचा शेर आवडला.

सर..बरेच शेर आवडले...

मतल्यात सानी मिसर्‍यात अडखळायला झाले मलाही.

'काय सांगू ते कळेना' असा सानी मिसरा असावा असं मला उला वाचताना वाटलं होतं...

मी पहिल्यांदाच तुम्हाला प्रतिसाद लिहितो आहे बहुतेक..

चुकून जास्त बोललो अस्ल्यास .छोटा समजून माफ करा. Happy

संपली केव्हाच मैफल
पाय पण माझा निघेना

विस्मृतीने जन्म घ्यावा
स्मरणवेणा सोसवेना

भोवती ओसाड दुनिया
आतली गर्दी हटेना!

शोधुया मुक्काम नंतर
सोबतीचा हात दे ना!

भोगण्याचा मोह नाही
अन् विरक्तीही जमेना!
>>>हे जास्त आवडले

नेहमी इतकी आवडली नाही पण शेर छानच आहेत अनेक जागी तुरळक बदल असते तर अजून छान झाली असती असे वाटले (वर सुचवले गेलेले बदल असे म्हणत नाही आहे गै.न..)
यातल्या दोन शेरांवरून जितूच्या एकाच गझलेतील दोन शेर आठवले..... सहजच आठवले कृगैन !!

सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही .........(सोडवेना चा शेर)

मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही .......(निघेनाचा शेर )
असो
धन्यवाद

विस्मृतीने जन्म घ्यावा
स्मरणवेणा सोसवेना

भोगण्याचा मोह नाही
अन् विरक्तीही जमेना!

>>> आवडले...

सर्वांचे आभार.

समीर, तुमच्या प्रतिक्रियेवर (विचार गोंधळपूर्ण आहे) माझ्याकडे उत्तर नाहीये. तसेच पहिल्या शेरातील दुसर्‍या ओळीत अडखळण्याबद्दल बर्‍याच जणांनी लिहिलंय. मलातरी कुठे अडखळायला झाले नाही. त्यामुळे त्यावरही काही सांगू शकत नाही.

जयदीप, माझ्या मते कुणी 'लहान मोठं' नाहीये इथे. जे मनापासून वाटेल ते तुम्ही लिहा बिंधास. मला जे वाटेल ते मी लिहेन.. Happy

पुनश्च धन्यवाद!

वा वा... मतला फारच आवडला...

भोवती ओसाड दुनिया
आतली गर्दी हटेना! हा शेरसुद्धा भन्नाट.

एकंदर गझल आवडली.

एक दोन शेर सोडल्यास गझल आवडली. मतला आणि त्या नंतरचे दोन शेर विशेष वाटले.

दुसरे म्हणजे मोह आणि विरक्तीचा शेर मनाच्या गोंधळलेल्या स्थितीवर आहे, असे वाटल्याने त्यात गोंधळ वाटला नाही. धन्यवाद.

दुसरे म्हणजे मोह आणि विरक्तीचा शेर मनाच्या गोंधळलेल्या स्थितीवर आहे, असे वाटल्याने त्यात गोंधळ वाटला नाही.

इन्टरप्रिटेशन आवडले. असा शेर गोंधळलेल्या मनःस्थितीतच होऊ शकतो बहुधा.
धन्यवाद.

अनेक शेर आवडले.

<सत्य बिल्कुल ऐकवेना

दुस-या ओळीत सलग चार-पाच लघु आल्याने अडखळायला होत आहे.>

त्य आणि बिल्कुल लघु आहेत की गुरू?

सत्य बिल्कुल ह्या शब्दाची मात्राफोड अशी आहे: २ १ २ १ १
तेव्हा टेक्निकली माझे विधान चुकीचे आहे. बिलकुल असे डोक्यात असल्याने मी चार-पाच लघु म्हटले होते.