घुसमटल्यावर वारा येतो !

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 January, 2014 - 13:11

अतोनात तिटकारा येतो
घुसमटल्यावर वारा येतो !

सादर करते माफीनामा
खाली त्याचा पारा येतो

वादळात हरवू दे नौका
केव्हातरी किनारा येतो

रोज पहाटे स्वप्नांमध्ये
तो साराच्या-सारा येतो

त्याच्यावर मिसरा सुचताना
मोरपीशी शहारा येतो

मन आवरते दिवसाढवळ्या
रात्रीतून पसारा येतो

तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो

मिटवत जाते एक समस्या
प्रत्यय तोच दुबारा येतो

आदर्शांवर चाल जरासे
मागोमाग दरारा येतो

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages