घुसमटल्यावर वारा येतो !

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 January, 2014 - 13:11

अतोनात तिटकारा येतो
घुसमटल्यावर वारा येतो !

सादर करते माफीनामा
खाली त्याचा पारा येतो

वादळात हरवू दे नौका
केव्हातरी किनारा येतो

रोज पहाटे स्वप्नांमध्ये
तो साराच्या-सारा येतो

त्याच्यावर मिसरा सुचताना
मोरपीशी शहारा येतो

मन आवरते दिवसाढवळ्या
रात्रीतून पसारा येतो

तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो

मिटवत जाते एक समस्या
प्रत्यय तोच दुबारा येतो

आदर्शांवर चाल जरासे
मागोमाग दरारा येतो

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक शेर उत्तम फार फार आवडले
अनेक कल्पना नाविन्यपूर्ण
आवडली गझल
आता काय काय आवडले ते कोट करत बसत नाही आहे ..समजून घ्यालच
पण एकंदरच ज्जामच फॉर्मात आहात ब्वॉ Happy
धन्यवाद

मोरपीशी शहारा येतो<< ही एकच ओळ लयीत वाचताना अडखळलो काय गडबड असेल तर पाहून घ्याच

मस्त गझल सुप्रिया!

माझ्यामते आणखी एक उत्तम गझल!

अतोनात तिटकारा येतो
घुसमटल्यावर वारा येतो !<<< वा वा

सादर करते माफीनामा
खाली त्याचा पारा येतो<<< छान

वादळात हरवू दे नौका
येवो कधी किनारा येतो<<< (रदीफ किंचित हालली)

रोज पहाटे स्वप्नांमध्ये
तो साराच्या-सारा येतो<<< वा वा

त्याच्यावर मिसरा सुचताना
मोरपीशी शहारा येतो<<< वा

मन आवरते दिवसाढवळ्या
रात्रीतून पसारा येतो<<< (रदीफ हालली, 'होतो' अशी रदीफ अधिक रुचली असती बहुधा)

तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो<<< व्वा व्वा

निपटत जावी एक समस्या
लोंढा त्यांचा दारा येतो<<< दारा हा शब्द तितकास रुचला नाही.

आदर्शांवर चाल जरासे
मागोमाग दरारा येतो<<< व्वा

वैवकु मनःपुर्वक धन्यवाद !

बेफिजी तुम्ही काढलेली प्रत्येक शंका शिरसावंद्य !

नेमके हेच आणि असेच खटकत होते मलाही

दोन शेरात बदल केले आहेत माझ्या कुवतीनुसार Happy

आपली ऋणी,

-सुप्रिया.

गझल फार आवडली (काही किरकोळ गोष्टी वगळता).

मन आवरते दिवसाढवळ्या
रात्रीतून पसारा येतो

शेर कळतोय, आणि कानालाही
छान वाटतेय.

त्या किनार्‍याच्या शेरात दुसर्‍याओळीत जी गडबड वाटत होती त्याला रदीफ हलणे असे म्हणतात हे माहीत नव्हते धन्यवाद

मी लग्गेच बसल्याबसल्या एक पर्यायी करून टाकला Happy

वादळात हरवावे वाटे
त्यावेळीच किनारा येतो

आवडल्यास अवश्य कळवावे ही विनंती
धन्यवाद

सुरेख, ,"दुबारा" सोडून इतर सगळे शेर खूप आवडले. खास करून मतला आणि "रोज पहाटे" .. सुपर्ब.
वैभव, तुझा शेरही भन्नाट आवडला.

मन आवरते दिवसाढवळ्या
रात्रीतून पसारा येतो

तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो

<< खयाल सुंदर आहेत.

वादळात हरवू दे नौका
केव्हातरी किनारा येतो

तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो

वा! गझल छान.

सादर करते माफीनामा
खाली त्याचा पारा येतो

तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो

आदर्शांवर चाल जरासे
मागोमाग दरारा येतो

व्वा ! सुरेख.

वा सुप्रियातै. मस्त आहे गझल.

>>मन आवरते दिवसाढवळ्या
रात्रीतून पसारा येतो

यात ढवळ्या थोडं खटकलं मला. दिवसाढवळ्या हा शब्द negative आहे जरा. त्यामुळं मग अजून जरा details हवेत असं वाटतं .

>> तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो
वाहवा च!!

व्वा चांगली गझल...

मतला खूप आवडला...

वादळाचा शेर पण मस्तच.. वैवकुंचाही शेर मस्त आहे

तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो >>> सुरेख...

मन आवरते दिवसाढवळ्या
रात्रीतून पसारा येतो >>> ह्यात रोज दिवसा मी मन आवरते पण रात्रीतून परत पसारा व्हायचा तो होतोच असे काही आले असते तर अजून मस्त झाला असता शेर असे वाटले...

हाच खयाल वेगळ्या वृत्तासाठी राखून ठेवा आणि अजून चांगल्याप्रकारे मांडा अशी एक आगाऊ सुचना..

>> ह्यात रोज दिवसा मी मन आवरते पण रात्रीतून परत पसारा व्हायचा तो होतोच असे काही आले असते तर अजून मस्त झाला असता शेर असे वाटले...
अगदी हेच वाटलेलं मला मिल्या.

रोजच मन आवरते दिवसा
रातोरात पसारा येतो
असं सुचलं. Uhoh (पण फ्लॅट वाटतं आहे ते germ च्या मानानी )

>> सादर करते माफीनामा
खाली त्याचा पारा येतो

हे वाचताना खच्कन दुखलं हे सांगायला विसर्ले होते. Sad (big hugs for this one. sorry for being so womanly on this forum but still.. हे सुचताना तुमच्या मनात नक्की काय आलं असेल हा विचार पण आला मनात. Sad )

हे सुचताना तुमच्या मनात नक्की काय आलं असेल हा विचार पण आला मनात. अरेरे ) >>>

हा शेर माझ्या दैवाला उद्देशून लिहिला आहे मी पारिजाता, जेव्हा जेव्हा त्याच्यापुढे नमते घेते तेव्हा तेव्हा त्याची तिव्रता कमी जाणवते .

बाकी प्रत्येकाने त्याला जो अपिल होईल तो अर्थ घेणेच अभिप्रेत असते Happy

'पसा-याच्या' शेरात रदिफ हाललीय हे पूर्णतः मान्य आहे मला.

<<<मन आवरते दिवसाढवळ्या
रात्रीतून पसारा येतो >>> ह्यात रोज दिवसा मी मन आवरते पण रात्रीतून परत पसारा व्हायचा तो होतोच असे काही आले असते तर अजून मस्त झाला असता शेर असे वाटले...

हाच खयाल वेगळ्या वृत्तासाठी राखून ठेवा आणि अजून चांगल्याप्रकारे मांडा अशी एक आगाऊ सुचना..>>>

मिल्या अगदीच माझ्या मनातल बोललात आपण. Happy

धन्यवाद मंडळी,

पारिजाता विशेष Happy

-सुप्रिया.

@सुप्रिया-

हा शेर माझ्या दैवाला उद्देशून लिहिला आहे मी पारिजाता, जेव्हा जेव्हा त्याच्यापुढे नमते घेते तेव्हा तेव्हा त्याची तिव्रता कमी जाणवते.

माझ्यामते हा अर्थ त्या शेराला डायल्यूट करतो. काही शेर थेट वाच्यार्थाने घेतले तर जास्त भिडतात, काहींना अर्थाचे अनेक पदर असतात. मला वाटते की 'माफीनामा' शेर पहिल्या प्रकारचा आहे.
(गैरसमज नसावा / याहून अन्य मतांचा आदर करतो / माझे मत चुकीचे असू शकते, याची कल्पना आहे.)

ज्ञानेशजी,

तुमच म्हणण एकदम दुरूस्त पण हा शेर लिहिताना दैवाचाच विचार माझ्या मनात पिंगा घालत होता याचा अर्थ असा अजिबातच नाही की शेराच्या दुस-या अर्थाच्या पदराशी मी अनभिज्ञ आहे....तो त्या अर्थीही अनेकदा अनुभवला आहेच मी.

-धन्यवाद !

छान आहे गझल

पसारा होतो हे योग्यच आहे पण पसारा `येतो' हे सुध्दा फार खटकले नाही. फार आवडला हा शेर

Pages