माझी वाईट्ट व्यसनं : बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ !

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 January, 2014 - 08:14

नववी - दहावीचा काळ , खासकरून दहावीचा काळ थोडा विचित्रच होता, किंबहुना तो तसा असतोच. विचित्र एवढ्यासाठी की बरोबरच्या कुठल्याही मित्राला अगदी सुटीच्या दिवशी जरी विचारले,"चल बे, पिक्चर टाकु आज" , तर एकच उत्तर मिळायचे ...

"नाही बे, दहावीचे वर्ष आहे. अभ्यास कसला डेंजर आहे. आई-बाबा हाणतील धरुन पिक्चरला जातो म्हण्लं तर."

मला हे थोडंसं विचित्रच वाटायचं कारण माझ्या आई-वडीलांनी मला कधीच अभ्यासाला बस म्हणून तंबी दिल्याची आठवत नाही. परीक्षेला गुण कमी पडले म्हणून शिव्या किंवा मार बसल्याचे आठवत नाही. (एक बारावी सोडली तर कधीच ७०% च्या खाली आम्ही उतरल्याचेही आठवत नाही ही गोष्ट अलाहिदा). पण दहावीच्या ऐन परीक्षेत दुसर्‍या दिवशी रसायनशास्त्र आणि भुमितीचा पेपर असतानासुद्धा आदल्या रात्री चाळीत भाड्याने आणलेल्या व्हिडीओवर बच्चनचे तुफान आणि जंजीर असे दोन चित्रपट (यातला जंजीर आधी ४-५ वेळा पाहिलेला होता) बघु द्यायला नकार देण्याचा कद्रुपणा आमच्या पिताश्रींनी केलेला नव्हता. कदाचित चित्रपटांचं वेड हे माझ्याकडे त्यांच्याकडुनच आलेलं आहे. अर्थात त्या काळी आमच्या आवडी निवडी वेगळ्या होत्या. कायम बच्चन, धर्मेंद्र आणि खासकरून लाडक्या मिथुनदांचे चित्रपट पाहणे ही आमची आवड. त्याच बरोबर महेंद्र संधू (हे नाव तरी आठवतय का कुणाला?) , विक्रम हे फायटींग करणारे कलाकार जास्त आवडीचे. अशा आवडींच्या त्या काळात जेव्हा आण्णा, दुरदर्शनवर लागणार्‍या कुठल्यातरी जुनाट चित्रपटातल्या त्या गोर्‍या-गोमट्या, रेशमी केसाच्या शामळु हिरोचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहायचे तेव्हा आम्ही भाऊ गपचुप्-गपचुप हसायचो. आण्णांना काही पण आवडतं राव!

मग कधीतरी अकरावीला वगैरे होतो तेव्हा, एका मित्राकडे रात्री अभ्यासाला म्हणून गेलेलो असताना एक चित्रपट पाहण्यात आला. (मित्रांकडे रात्री अभ्यासाला जायचे म्हणजे पिक्चर पाहायलाच जाणे असायचे. अर्थात तेव्हासुद्धा अजुन 'भक्त पुंडलीक'चे वेड लागलेले नव्हते. त्यानंतरही कधी लागु शकले नाही)

त्याच त्या शामळू हिरोची मुख्य नट म्हणून भुमिका असलेला चित्रपट होता तो. १९८६ साली आलेला मुजफ़्फ़र अलीचा ’अंजुमन’. मुजफ़्फ़र अलींच्या नेहमीच्या पद्धतीने स्त्रीयांचे शोषण, उत्पीडन आणि स्त्रीयांच्या हक्कासाठी त्यातल्याच एकीने उठवलेला आवाज असा नेहमीचाच विषय होता. शबाना आझमी आणि "फ़ारुक शेख" हे कलाकार. खय्याम साहेबांचं संगीत, स्वत: मुजफ़्फ़र अलींचीच कथा, राही मासुन रझासाहेबांचे संवाद, शहरयार साहेब तसेच शायरे आझम फ़ैज अहम फ़ैज साहेबांची शायरी, गाणी. शबानाने स्वत;च्या आवाजात गायलेली गाणी सगळाच अदभूत संगम होता चित्रपटात. शबानाच्या आई शौकत कैफ़ी आझमी यांची पण भुमिका होती या चित्रपटात. पण मला या चित्रपटात काही आवडले असेल तर तो होता ’फ़ारुक शेखचा बोलका चेहरा आणि त्यांचा चित्रपटातला सहज-सुंदर अभिनय’ . चित्रपटाची कथा पुर्णपणे शबानाच्या भुमिकेवर ’अंजुमन’वर केंद्रीत होती पण लक्षात राहीला तो ’फारुक शेख’. फिल्म इंडस्ट्रीत मोतीलाल आणि बलराज सहानी यांच्यानंतर इतका सभ्य वाटणारा आणि प्रत्यक्षातही तितकाच सभ्य असणारा असा कलाकार विरळाच असेल. असो.... सांगायचे हे की त्या दिवसापासून मी फारुक शेख या व्यक्तीमत्वाच्या प्रेमात पडलो. आण्णांना हा माणुस इतका का आवडतो हे तेव्हा कळाले.

दुसर्‍या दिवशी आण्णांना मी हे सांगितले. आण्णासाहेब एकदम खुश. आण्णांची प्रतिक्रिया होती. "मोठा झालास !" अस्मादिकपण खुश Happy

त्यानंतर मात्र फारुकजींचे चित्रपट पाहण्याचा धडाका सुरु केला. जमाना अमिताभ, धर्मेंद्र, जितेंद्र, मिथुन यांचा होता. फारुखजींचे चित्रपट बहुतांशी 'समांतर' या श्रेणीतले. त्यामुळे हे चित्रपट सिनेमाघरातुन खुप कमी लागायचे. लागले तरी फार दिवस टिकायचे नाहीत. त्यामुळे आम्ही कायम शोधातच असायचो. कुठे फारुकजींचा सिनेमा लागलाय असे कळले की आम्ही पोचलोच. पुन्हा तिकीटही सहज मिळून जायचे. सगळ्यात पुढचे आठ रुपयांचे तिकीट काढून आम्ही थेटरात दाखल व्हायचो. तिथे मोजुन ३०-४० टाळकी असायची, फार-फार शंभर. त्यामुळे राज्य आपलंच असायचं.

farooq-sheikh-wallpaper_1

अशातच एके दिवशी अशातच एके दिवशी १९७३ साली आलेला, एम्.एस्.सथ्युंचा 'गर्म हवा' पाहण्यात आला. फारुकजींचा हा पहिलाच मोठा चित्रपट होता. फाळणीनंतर भारतात मागे राहीलेल्या मुस्लीम समाजाच्या मनस्थितीचे, अवस्थेचे खोल चित्रण करणारा हा चित्रपट. या चित्रपटात फारुकजींनी सलीम मिर्झाच्या (बलराज सहानी) धाकट्या मुलाची सिकंदर मिर्झाची भुमिका निभावलेली होती. त्या काळातल्या बंडखोर, कम्युनिझ्मकडे झुकलेल्या तरुणाईचे प्रतिक असलेली ही सिकंदर मिर्झाची भुमिका होती. भारत सोडून पाकिस्तानात स्थलांतरीत व्हायला विरोध करणारा, पित्यावर झालेल्या खोट्या आरोपांनी घाबरून न जाता यंत्रणेच्या विरुद्ध लढायला तयार असलेला सिंकदर मिर्झा फारुकजींनी जीव तोडून रंगवला होता. खरेतर त्यातली फारुखजींची भुमिका तशी दुय्यमच होती. पण ती त्यांनी अतिशय आत्मीयतेने रंगवली होती.

या चित्रपटाचा फ़ारुकभाईंना  आर्थिक पातळीवर नसला तर अभिनयाच्या पातळीवर. एक खुप मोठा फ़ायदा झाला. ’गर्म हवा’ साठी फ़ारुकजींना फ़क्त ७५० रुपये मानधन मिळाले होते. पण नफ्याची बाजु ही होती की पहिल्याच भुमिकेत ’नैसर्गिक आणि सहजसुंदर अभिनयाचा बादशहा’ म्हणुन ओळखल्या गेलेल्या ’कै. बलराज सहानीं’ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. बलराज -साहेबांच्या सहज सुंदर अभिनयशैलीचा पगडा फारुकभाईंसारख्या गुणी व्यक्तीत्वावर पडला नसता तरच नवल. त्यामुळे पुढे आपल्या संपुर्ण कारकिर्दीत फारुकभाईंनी नैसर्गीक अभिनयावरच अधिक भर दिला.

gh1

माझ्यासाठी अमिताभ, धर्मेंद्र, राजेश खन्ना, देव आनंद, दिलीपकुमार अशी आवडत्या कलावंतांची हायरार्ची असलेली विचारसरणी बदलण्याच्या दिवसांची ती सुरूवात होती. आता अमिताभच्या नावाआधी बलराज सहानी, फारुक शेख, नासिरुद्दीन शाह अशी नावे यायला लागली होती. हो, फ़ारुकभाईंच्या चित्रपटांनी मला नासिरुद्दीन शहा नावाच्या अफाट कलावंताची ओळख करून दिली. त्याबद्दल नंतर कधीतरी....

गुजरातमधल्या अमरोलीत एका खानदानी जमीनदार घराण्यात जन्माला आलेला हा देखणा कलावंत उच्चविद्याविभुषीत होता. लहानपणापासून मुस्लीम जमीनदारी वातावरणात वाढल्यामुळे ती खानदानी अदब, तो रुबाबदारपणा त्यांच्यात चांगलाच मुरलेला होता.

कदाचित म्हणूनच १९८१ साली जेव्हा मुजफ़्फ़र अलीला एका रसिक, खुशमिजाज नवाबाचे पात्र उभे करायचे ठरवले तेव्हा फ़ारुकजींनाच ही संधी द्याविशी वाटली असेल. तेव्हा अलीसाहेबांना वाटले सुद्धा नसेल की हा चित्रपट इतिहास घडवणार आहे. मुझफ्फर अलीचा चित्रपट, त्यामुळे पुन्हा विषय स्त्रीप्रधानच होता. मिर्झा हादी रुसवा यांच्या कथेवर आधारीत 'उमराव जान'ने तत्कालीन रसिकांवर गारुड केलं. इथेही फारुकजींच्या वाट्याला आलेली भुमिका तशी (नायक असुनही) दुय्यमच होती. उमराववर जिवापाड प्रेम करणारा नवाब सुलतान त्यांनी ताकदीने रंगवला होता. उमराववर मनापासून, उत्कटपणे मोहोब्बत करणारा नवाब सुलतान, आपले कुटुंब, खानदान की आपली प्रिया या द्वंद्वात नाईलाजाने आपल्या परिवाराची निवड करणारा एक पराभूत प्रेमी अश्या दोन टोकाच्या दोन तर्‍हा फारुकभाईंनी विलक्षण उत्कटतेने रंगवल्या होत्या.

कै. सत्यजीत रें यांचा ’शतरंज के खिलाडी’ या पुर्वीच येवून गेला होता. फारुकभाईंची कारकिर्द हळुहळू पण विलक्षण ताकदीने बहराला येत होती. मला वाटतं सत्तरचे दशक फारुकभाईंसाठी खुप महत्वाचे आणि भाग्योदयाचे ठरले. या काळात त्यांची जोडी कलात्मक चित्रपटांची तत्कालीन मोठी अभिनेत्री ’दीप्ती नवल’ यांच्याबरोबर जमली होती.

download

या जोडीने एका मागुन एक खुप सुंदर चित्रपट दिले. साथ-साथ, चष्मेबद्दूर, कथा, किसीसे न कहना, रंगबिरंगी, टेल मी ओ खुदा ही त्यातलीच काही नावाजलेली नावे. चष्मेबद्दूर मधला सरळमार्गी, साधा सरळ प्रेमीक असो वा ’कथा’मधला गुलछबू, दिलफेक आशिक असो दोन्ही भुमिका फ़ारुकभाईंनी मनापासून उभ्या केल्या होत्या. ’Listen Amaya' या २०१० च्या दशकात येवुन गेलेल्या चित्रपटात हे दोघे परत एकदा एकत्र झळकले.

Farooq-Shaikh-Deepti-Naval

अशातच कुणाकडून तरी कळालं की फारुकभाई आणि शबाना आझमी मिळून एक थिएटर प्ले (नाटक) सुद्धा करत. "तुम्हारी अमृता" या नावाचा. आणि मग आपोआपच अमृताला शोधणे अपरिहार्य ठरले...

"'लिखना मुझे अच्छा लगता है अमृता। ख़ास तौर से तुम्हें। ये ख़त नहीं हैं।  मेरी जान ये मैं हूं। ये मेरी रुह के टुकड़े हैं। तुम चाहो तो इन्हें टुकड़े-टुकड़े कर डालो।' "

१९९२ मध्ये जावेद सिद्दिकीने हे नाटक लिहीले होते. ए.आर. गर्नीच्या ’लव लेटर्स’ वरून प्रेरीत होऊन. ८ वर्ष वयाची अमृता निगम वय वर्षे १० च्या जुल्फिकार हैदरला पत्रे लिहीते. पुढची पस्तीस वर्षे हा पत्रव्यवहार चालू राहतो. केवळ एक टेबल आणि दोन खुर्च्या एवढ्या मोजक्या नेपथ्यावर (नंतर काही प्रयोगात दोन टेबल आले) फारुकभाई आणि शबाना हे नाटक सादर करीत. दोघे खुर्चीवर बसून एकामागुन एक , एकमेकांना लिहीलेली पत्रे वाचत असत. पण हा प्रयोग ते दोघेही इतक्या परिणामकारकरित्या सादर करत की या नाटकाचे फ़ारुक आणि शबाना या जोडीने जवळ-जवळ ३०० हाऊसफ़ुल्ल प्रयोग केले.

तुम्हारी अमृता

जवळ-जवळ १२ वर्षे  ’तुम्हारी अमृता’ने रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर २०४ मध्ये सोनाली बेंद्रेच्या साथीत फारुकभाईंनी या नाटकाचा एक सिक्वेल ’ आपकी सोनीया’ या नावाने केला होता. पण तो फ़ारसा यशस्वी ठरला नाही. शबाना आनि फारुक शेख ही जोडी सुद्धा काही मोजक्या पण समर्थ दिग्दर्शकांच्या चित्रपटातून झळकली. यात कल्पना लाजमींचा ’एक पल’ , सागर सरहदीचा ’लोरी’ आणि मुजफ़्फ़र अलींचा ’अंजुमन’ ही नावे ठळकपणे आपले अस्तित्व दाखवून देतात.

दरम्यान फारुकभाईंचे इतरही चित्रपट पाहणे सुरूच होते. जुन्यापैकी बाजार, नुरी तर नव्यापैकी बीवी हो तो ऐसी, माया मेमसाब, लाहौर, सास बहु और सेन्सेक्स, शांघाय अशा चित्रपटांमधून फारुकभाई आपले प्रसन्न दर्शन देतच होते. लाहौर साठी तर २०१० साली फ़ारुकभाईंना उत्कृष्ट सहकलावंतासाठी असलेला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

या दरम्यान फ़ारुकभाई अधुन मधून इडीयट बॉक्सवर सुद्धा झळकत होतेच.१९८५-८६ साली दुरदर्शनची गाजलेली मालिका ’श्रीकांत’ असो, वा त्यानंतर स्टार प्लस वर आलेली ’जी मंत्रीजी’ असो अथवा सोनी टिव्हीवरची ’चमत्कार’ असो फ़ारुकभाई कुठल्या ना कुठल्या मार्गाने सतत चाहत्यांच्या संपर्कात होतेच. त्याच दरम्यान फारुकभाईंनी चित्रपट क्षेत्रातील कलावंतांच्या मुलाखतीवर आधारीत असलेली  " जीना इसी का नाम है" या नावाची एक मालिका सुद्धा केली. अल्पावधीतच या मालिकेने यशोशिखर गाठले. या मालिकेचे दुसरे पर्व सुरेश ओबेरॊय यांनी केले पण ते काही फारुकभाईंची उंची गाठु शकले नाहीत. फ़ारुकभाईंची विनिदाची उत्तम जाण आणि विनम्र स्वभाव, समोरच्या व्यक्तीला क्षणात आपलेसे करत बोलते करण्याची हातोटी हा या कार्यक्रमाचा मर्मबिंदू होता, जिथे सुरेश ओबेरॉय कमी पडले.

२७ डिसेंबर २०१३ रोजी दुबईमध्ये दीप्ती नवलच्याच कुठल्यातरी कार्यक्रमासाठी म्हणून गेलेले फारुकभाई हृदयविकाराच्या धक्क्याने अल्लामियाच्या घरी वर्दी बजावण्यास निघून गेले. हिंदी समांतर चित्रपटांच्या इतिहासातलं एक देखणं, अभिनय संपन्न पर्व नकळत संपलं.......

फारुकभाई, तुम्ही गेलात, पण तुमचे चित्रपट, तुम्ही गाजवलेली गाणी कायम आमच्या हृदयात वास करतील. ती गाणी पुन्हा पुन्हा पाहणे, तुमच्या चित्रपटांची पारायणे करने हीच तुम्हाला आमची श्रद्धांजली असेल, श्रद्धांजली ठरेल.....

विशाल कुलकर्णी

९९६७६६४९१९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदीं खरंय. अतिशय गुणी अभिनेता. त्यांची 'जी, मंत्रीजी ' ही सिरियल सुद्धां 'येस, मिनीस्टर'ची आठवण करून देणारी. वांद्र्याला अनेक वेळां ते दिसत. साधा पेहराव, कसलीही आढ्यता नाही, सेलिब्रीटीचं वलय मिरवणं नाही, तेंच दिलखुलास स्मित व खानदानी आदब.
छान श्रद्धांजली वाहिली आहे तुम्ही फारुखजीना !

अप्रतिम लेख विपु!! सालस, सरळमार्गी नायक छान रंगवले त्यांनी. अगदी नैसर्गिक अभिनय!

<<साधा पेहराव, कसलीही आढ्यता नाही, सेलिब्रीटीचं वलय मिरवणं नाही, तेंच दिलखुलास स्मित व खानदानी आदब.
<< +१ पर्फेक्ट वर्णन!
त्यांच्या चेहर्यावर कधीही अभिनेत्याचा रुबाब, आढ्यता दिसली नाही.

सही.. मस्तच विशालभाऊ.. हा आपलाही फेवरेटच..
हलकेफुलके नर्म विनोद करणारा हा अभिनेता मला लहान वयात देखील कसा आवडायचा हे कोडेच.. किंवा माझी चित्रपटाची जाण आणि आवड चांगली होती असे बोलू शकतो.. सोनीवर चमत्कार नावाची टिपिकल बाष्कळछाप विनोदाची मालिका लागायची, पण हा गडी तिलाही आपल्या अंदाजाने बघणेबल करून जायचा.. त्याचा स्क्रीन प्रेजेन्सच मुळात फीलगूड आणणारा होता.. जीना ईसीका नाम है चे यशही यातच .. Happy

गोविंदा सलमानच्या पार्टनर चित्रपटातला एक संवाद आठवला,
स्टाईल सिखी जाती है, पर सादगी नही.... बस्स, दुसरा फारूख शेख बनणे नाही !

खूप छान लिहीलंय. 'आपकी अमृता' बद्दल एका मित्राकडून बरंच ऐकलं आहे. पण कधी पाहण्याचा योग नाही आला. हे नाटक आंतरजालावर वगैरे कुठे उपलब्ध आहे का?

हो, कुणाला माहित असेल तर सांगा, मलाही पहायचे आहे 'तुम्हारी अमृता'. मी त्याचे मराठी रुपांतरीत नाटक पाहिले होते नीना कुलकर्णी आणि अविनाश नारकरांचे. प्रेमपत्र की प्रेमपत्रे, काय होतं? तेही छान होते, पण मूळ नाटकही बघायचे आहे.

Pages