अन्या - ९

Submitted by बेफ़िकीर on 6 January, 2014 - 06:22

"आता आनि काय व्हईल?"

अन्याच्या प्रश्नावर अजिबातच विचारात न पडलेली रतन ठाम चेहर्‍याने शांतपणे म्हणाली.

"आता पाटील कावंल, इग्या आन् पवार सूड घ्याया टपतील, तालुक्याला ह्यं कळायचं न्हाई की कोन खरं आन् कोन वाईट ...... आनि......"

"आनि??"

"आनि आपल्ये मुडदे पडतील"

"आ? त्ये का?"

"याड न्हाई व्हय लावलंन् सर्व्यांना आपन? फार यळ लोक यडे न्हाई र्‍हात"

"म्हन्जी तालुका उलटंन् व्हय?"

"फार तर दोन दिसांत"

"आन् मंग?"

"मंग काय?"

"मंग आपन करायचं काय?"

"म्हन्जे? दोन दिस काय कमी हायेत व्हय?"

"म्हन्जे?"

"दोन दिसात हिकडची दुनिया तिकडं करू की आपन"

"ती कशी?"

"त्ये माझ्याकं लागलं. तुमी फकत मी सांगत्ये त्येवढं करा"

"तू सांगतीस त्येच तर करतू की यताजाता"

अन्याची ती कबूली ऐकून फस्सकन हसू फुटलेली रतन अंधार्‍या पहाटे आतल्या खोलीत त्याला बिलगली आणि म्हणाली......

"मोटं म्हाराज व्हायचंय नं? मंग मी सांगत्ये त्ये ऐका. गाव भोळा हाय हे खरं हाय, पर इतकाबी न्हाई की आपन काई न करताच यडा बनत र्‍हाईल. तवा चमत्काराला नमस्कार अस्तूय. त्यात तुमचं वय आसं की व्हट पिळलं तं दूध गळंन्. आता कामगिरी आल्याली हाय समूर. लय गणं लडावं लागन्. दोन दिसात गाव पाटलाच्या हातून काढून घियाचा हाय. कसं जमायचं ह्ये? सांगा बरं काय सुचतंय?"

"मला? मला काय न्हाय सुचत. तू म्हनालीस तं आत्ता निघून जाऊ गावात्नं"

"हा! आन् म्हणं म्हाराज व्हनार! आत्ता गावाच्या काळजात काय बसलंय?"

"काय?"

"की पाटील इग्या आन् पवारला हाताशी धरून तुमची खोट मोडनार व्हता."

"व्हय"

"म्हन्जे गाव पाटलाला वाईट समजतंच हाये ना?"

"व्हय"

"मंग गावाच त्ये मत बदलाया पाटील काय करंन्?"

"काय?"

"त्यो तुमचा उदो उदो सुरू करंन्! पैसा ओतंन्. इग्या आन् पवार खोटं बोल्ले म्हणंन्! म्हणंन् का न्हाई?"

"व्हय"

"मंग तुमी अश्या वेळी जर पाटलाची मदत घ्येतलीत, तर पाटील जिंकला की न्हाई?"

"व्हय"

"मंग फुडंमागं यळ मिळेल तसा त्यो आपला काटा काढंन् की न्हाई"

"व्हय"

"म्हन्जी आत्ता आपन काय कराया हवं?"

"आत्ताच पाटलाला गावाफुडं नागडा कराया हवा"

अन्यामध्ये झालेली ती विलक्षण बौद्धिक प्रगती पाहून हरखलेल्या रतनने त्याला मिठीच मारली. अन्याला वाटले आपण फारच दूरदर्शीपणा केला, पण तो दूरदर्शीपणा आपल्याला रतनमुळे सुचला हे तो ऐन क्षणालाच नेमके विसरला. ते माहीत असलेली रतन आनंदाने स्वतःची जीभ स्वतःच्या गालात घोळवत म्हणाली......

"आता नागडा करायचा म्हन्जे काय करायचं सांगा बरं?"

अन्या एक यडचाप! त्याने रतनच्याच कपड्यांना हात घातला तसा त्याचा हेतू समजून रतन सटकन बाजूला सरकली आणि कुजबुजत म्हणाली......

"उजाडायाला धा मिन्टं र्‍हायली आस्तीन्! आत्ता गाव जमा व्हईन हित्तं आश्रमासमूर! काय बी सुचतंत तुम्हाला ह्या यळी! पाटलाला कसा नागडा करायचा त्ये सांगा"

"तूच सांग"

एकुण परिस्थितीचा ताबा हातात आल्याप्रमाणे रतनने चेहरा केला आणि भेदक स्वरात म्हणाली......

"अंगावरल्या कपड्यानिशी गावातून निघायचं दोघांनी! कोन काय इचारंल त्ये इचारंल! भरपूर मान्सं जमलीन् की मंग मागं वळून म्हनायचं! म्हनायचं आमी आश्रमाचा त्याग करतूय. त्याग म्हन्जे काय म्हाइतीय ना? त्याग म्हन्जे आश्रम सोडून चाल्लूय म्हनायचं. कोन इचारंल की का म्हनून. तं त्याला सांगायचं. झित्त पार्मानिक श्रद्धा हाये थित्तेच र्‍हायचा आमाला आदेश हाये. कोनाचा आदेश? कोनाचा आदेश त्ये सांगा???"

"तिन्मूर्ती दत्ताचा"

"आलं ध्यानात म्हनायचं! आवरा आता. काय च्या इडी करायची ती करा आन् सगळं हितलं हित्तं सोडून भाईर पडायची तयारी करा"

"पन, ह्ये आसं क्येल्याने काय व्हईन्?"

"आता हाये का? रामाची सीता क्वोन?? आ?"

"म्हन्जे?"

"पार्मानिक श्रद्धा हाये थितंच र्‍हानार म्हन्ल्यावं गावकरी म्हन्तील की त्यांची तं पार्मानिकच श्रद्धा हाये. मंग अपार्मानिक कोन?"

"तावडे पाटील"

"त्ये आपन न्हाई बोलायचं! गाववाले समजायचं त्ये समजतील. आवरा"

कशात काही नसताना अचानक गावात पाटलाला चॅलेंज द्यायची संधी आलेली होती. पण ही संधी आहे हे रतनला वाटत होते. अन्याची फाटली होती. तावडे पाटलाच्या नुसत्या मग्रूर डोळ्यांकडे पाहिले तरीही त्याची मान खाली जायची. आणि रतन तर डाव टाकत होती गावच पाटलाविरुद्ध करण्याचा! ह्या पाटलाने दिलेल्या कर्जावर अनेक घरे उभी राहिली होती, त्याच्या मदतीवर अनेक लग्ने झालेली होती, अनेक जमीनी सुटल्या होत्या किंवा गहाण पडल्या होत्या. कोणाला बैल मिळाले होते तर कोणाला नोकरी! तावडे पाटलाशी जवळीक आहे असे सांगून गावात कित्येक पोरे अरेरावी करू शकत होती, आणि दिड दमडीची आणि केव्हाही बदलेल अशी श्रद्धा हाताशी घेऊन पाटलाविरुद्ध उभे राहण्याचा रतनचा डाव अन्याला तिच्या तोंडून ऐकायला गोड वाटला असला तरी जसजसा अन्या त्यावर विचार करत होता तसतसा त्याला त्यला फोलपणा पटत चालला होता. फार तर गावकरी आपल्याला शांतपणे गावातून जाऊ देतील इतकेच! पण अख्खे गांव पाटलाविरुद्ध आपल्यासाठी जाणे निव्वळ अशक्यप्राय आहे हे त्याला मनातून समजलेले होते. आजवर आश्रमावर उडालेल्या झुंबडी, स्वतःचेच फोटो विकले जाताना पाहणे, रांगा, दर्शन, नामःस्मरण, कीर्तने, प्रसाद, संस्कार वर्ग, स्वच्छता अभियान, प्रसिद्धी, भक्तीचा अतिरेक ह्या सगळ्या गोष्टी आता केवळ पाटलाने बहाल केल्यासारख्या वाटू लागल्या होत्या. हा आश्रमच नसता आणि आपण उघड्यावर असतो तर थोडीच गाव आपल्यासमोर वाकले असते असा प्रश्न मनात उभा राहात होता. पण परिस्थिती अशी होती की जिला जवळ केल्यामुळे इग्या आणि पवार ह्यांची साथ संपलेली होती त्या रतनचे म्हणणे आत्ता न ऐकणे हेही धाडसाचेच ठरणार होते. खरे जादूगार आपणच असलो तरीही आज रतनलाही गावात एक स्थान आहे ह्याकडे डोळेझाक करता येत नव्हती. कुठून दुर्बुद्धी झाली आणि ह्या नसत्या भानगडीत पडलो असे अन्याला वाटू लागले.

त्याने कशीबशी आंघोळ उरकून पांढरे धोतर आणि पांढरी बंडी असा वेष धारण केला. यडचाप दिसत होता तो त्यात! त्यातल्यात्यात त्याने खिशात काही नोटा लपवल्याच! एक काठी आणि एक दत्ताचा लहान फोटो एवढेच बरोबर घेऊन रतनने सांगितल्याप्रमाणे ठाम चेहरा करून तो आश्रमाच्या दारात येऊन उभा राहिला. आधीच दारात असलेल्या रतनने गावकर्‍यांसमक्ष त्याला साष्टांग नमस्कार केला आणि त्याच्या पाठीमागे उभी राहिली. अन्याने ठामपणे आश्रमाबाहेर पाऊल उचलले. पुन्हा मागे पाहून दत्ताला एक साष्टांग नमस्कार केला. त्याच्याच बरोबर रतननेही दत्ताला नमस्कार केला. कोणाकडेही न पाहता अन्या वेगाने एका दिशेला चालू लागला. मागोमाग पळताना रतनची तारांबळ उडत होती. तिनेही जवळ अनेक नोटा लपवून ठेवलेल्या होत्या. पण दिसायला ती नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडल्यासारखी वाटत होती. जवळपास पन्नास एक फुटांवरून स्तंभित झालेले गावकरी सूर्याच्या पहिल्याच काही किरणांच्या प्रकाशात हवालदिलपणे एकमेकांकडे पाहात मागून चालू लागले होते.

कोणीही काहीही बोलत नव्हते. कोणी काहीच बोलत नसल्यामुळे आता उलट अन्याचीच पंचाईत झालेली होती. कोणी विचारलेच नाही की चाललात कोठे तर सांगणार काय?

शेवटी गावाची वेस आली. वेस आल्यावर मात्र चार जाणते गावकरी पुढे झाले. गावात एक उत्पन्नाचे चांगले साधन म्हणून बस्तान बसलेला महाराज असा निघून गेला तर कित्येकांचा रोजगार तर प्रभावित होणार होताच, वर परत पंचक्रोशीत बदनामी होणार होती की तालुक्याच्या प्रमुख गावात पापे वाढल्यामुळे एक अवतार तिथे राहू शकला नाही, तेथून बाहेर पडला

एका जाणत्याने घाबरत घाबरत अन्याला मागून विचारले.

"म्हाराज? आसं फाटंचं कुनीकं?"

एक नाही दोन नाही. रतनसुद्धा मागे वळली नाही. त्या माणसाने चक्रावून आपल्याच सहकार्‍यांकडे पाहिले. आता आणखी दोघे पुढे झाले. अचानक त्यांनी अन्याच्या समोर जाऊन त्याची वाट अडवून त्याच्यासमोर गुडघ्यांवर बसत डोके टेकवले. अन्याने सवयीने हात उचलला व जय गोरखनाथ असे नांव घेतले.

"म्हाराज? काय चुकलं काय? गाव का सोडतावं?"

"आमी पार्मानिक श्रद्धेच्या शोधात चाल्लू आहोत. तिन्मूर्ती दत्ताचा आदेश झाल्याला हाये. हितलं काम संपलं. हितली पापं आता खुद्द दत्तच बघून घील. ती आमची अखत्यारी र्‍हाइलेली न्हाई. लय कोशिश क्याली. पन् हितलं आव्हान दत्ताला सवतालाच प्यालंन्. आमाला न्हाई. दत्त येईतोवं शांता राखा. जय गोरखनाथ"

सटपटलेले गावकरी आता काही बोलू धजेनात! कोण पापी आहे विचारलं आणि महाराज म्हणाले की पाटील, तर काय घ्या? बरं, पाटलाने पाप करायचं ठरवलेलं होतं हे तर सगळ्यांच्या समक्षच झालेलं होतं. पण घंटा कोण बांधणार? थिजलेला जमाव चाललेल्या महाराजांकडे पाहात नुसता उभा राहिला.

अन्याने मारलेल्या अनावश्यक लांबलचक डायलॉगचा परिणाम हवा तो न होता भलताच झाल्याचे रतनला समजले. तिने चालता चालताच ताडकन मागे वळून सगळ्यांकडे क्रोधीत नजरेने पाहात सांगितले.

"आनि दत्त सवता आल्ये न्हाईत तं गाव बेचिराख व्हईन ह्ये ध्यानात ठिवा"

एवढेच म्हणून ती पुन्हा चालू लागली. आता हवा तो परिणाम झाला. एक तर चांगला गावात आहे तो अवतार निघून चाललाय आणि तो ज्याचा अवतार आहे तो मूळ देव गावात येईल की नाही ह्यावर आपला काहीच ताबा नाही म्हंटल्यावर गावकरी हादरलेच. पुन्हा काहीजण धावत पुढे आले आणि रतनदेवींना म्हणाले......

"आई! आसं नका म्हनू. कोपू नका. काय क्यल्यानं किरपा व्हईन त्ये सांगा."

रतन ती रतनच! खरोखरची आई शोभेल असा डायलॉग टाकला तिने!

"तुमचा पाटीलच फुडली किरपा करंन् तुमच्यावं! त्यो तं दत्तालाबी मानंना"

आता सगळं हवं ते बोलून झालेलं होतं! आता बॉल गावकर्‍यांच्या कोर्टात पडलेला होता. आता गावात जायला मिळालं काय आणि नाही काय, अन्या आणि रतन आता कायमच तावडे पाटलापेक्षा महत्वाचे ठरणार ह्यात शंका नव्हती. हे मनोमन जाणून आता रतन अन्याच्याही पुढे चालू लागली. त्या संदेशाचा अर्थ समजल्यामुळे मागे बघण्याच्या मोहाचा 'त्याग' करून अन्या आणखीनच जोरजोरात चालू लागला.

ते ज्या दिशेला चालले होते तिकडे तालुक्यातले दोन नंबरचे गाव होते 'वीर'! वीरचे प्रमुख होते मशालकर! मशालकर आणि तावडे पाटलांच्या खानदानात विस्तव जात नव्हता. पण तावडे पाटलांच्या गावातून मशालकरांच्या गावात दत्ताचा अवतार आणि मायादेवीचा अवतार मात्र चाललेले होते. त्या दोन्ही अवतारांनाही त्याची कल्पना नव्हती की तिकडे कोणते गाव आहे आणि त्याचे प्रमुख कोण! तावडे पाटील आणि मशालकर हे वैर जर रतनला माहीत असते तर तिने हा निर्णय जरा आधीच घेतला असता.

हवालदिल गावकरी मान खाली घालून चूपचाप आपल्या गावाकडे परतू लागले कारण वीरची वेस त्या दत्ताच्या अवताराला परत आणण्यासाठी ओलांडणे म्हणजे आधी मशालकरांच्या आणि नंतर तावडे पाटलाम्च्या गुंडांचा मार खाणे हे त्यांना पक्के माहीत होते. आता तो अवतार वीरची खासगी दौलत ठरणार होता आणि तावडे पाटलाचे नाक ठेचता येईल म्हणून मशालकर त्यांचा जमेल तितका उदो उदो करणार हे गावकर्‍यांना मनातच समजलेले होते.

त्यातच एक तरुण गावकरी चोरट्या आवाजात कुजबुजला......

"तावडे पाटलानंबी यायला हवं होतं गड्या, म्हाराजांना आवराया, न्हाई?"

सगळ्यांच्याच मनातले वाक्य असल्याने आपोआपच अनेक जाडजूड माना हालल्या. एक म्हातारा किरट्या, फाटलेल्या आवाजात तीक्ष्णपणे म्हणाला......

"तावडे पाटलाला त्वांड हाये व्हय म्हाराजांच्या फुडं याया? आ??"

पुन्हा माना हालल्या. एक एक करत गावकरी आत्ताच निघून गेलेल्या महाराजांच्या बाजूने आणि तावडे पाटलांच्या विरुद्ध होऊ लागले होते. जेव्हा सगळेच्या सगळे गावकरी तावडे पाटलाच्या विरुद्ध होऊन आश्रमापाशी पोचले......

...... तेव्हा कच्च्या सडकेवर 'सक्काळच्या पारी' समोरून येणार्‍या आणि ह्या दोघांना पाहून हबकून रस्त्यातच लोटांगण घालणार्‍या प्रत्येक 'वीर'कराचा मानाचा मुजरा घेत अवलिया बाबा आणि रतनदेवी वीरमध्ये प्रवेश करत होते.

आणि मुळापासून हादरलेला तावडे पाटील जेव्हा सहकुटुंब जीपमधून आश्रमाकडे सुसाट सुटला होता......

...... तेव्हा दोन बायकांसकट अख्खा कुटुंबकबिला दोन बैलगाड्यांत भरून आणि स्वतः घोड्यावर बसून मशालकर ह्या दोन महापवित्र अवतारांचे स्वागत करायला स्वतःच्या घरातून निघालेला होता......

एका खायचे वांधे असलेल्या भिकार्‍याच्या पोराला नशीब कुठून कुठे नेत होते? त्या मुलाने काय केले होते? काहीही नाही. त्याला हे सगळे अपेक्षितही नव्हते. त्याला फक्त फुकट खायला हवे होते आणि तरीही जगाने आपल्यालाच सलाम झोडावा अशी इच्छा होती. त्यासाठी त्याने केलेले पोरकट प्रयत्न प्रत्यक्षात मात्र प्रभावी ठरलेले होते. ते प्रभावी ठरण्यात त्या मुलाचे श्रेय काहीच नव्हते. श्रेय होते ते भोळसट, प्रयत्नवादापासून आणि विवेकापासून दूर राहणार्‍या आणि आयुष्यात शॉर्टकट्सनेच सर्व काही प्राप्त होते असे मानणार्‍या गावकर्‍यांचे! त्या गावकर्‍यांमध्ये कित्येकजण अन्यापेक्षा आणि रतनपेक्षा कित्येक बुके अधिक शिकलेले होते. पण साधा सरळ उपाय समोर होता. ह्या दोघांसमोर वाका, आश्रमाला देणगी द्या नाहीतर समोर दहा रुपये टाका, प्रसाद मिळवा आणि भक्त व्हा,. एकदा भक्त झालात की जे भक्त नाहीत त्यांना भक्ती करायचा आग्रह करायला मोकळे झालात. एकदा तुमचा आग्रह सुरू झाला की तुम्हाला आश्रमाचे, तावडे पाटलाचे वगैरे संरक्षण मिळालेच म्हणून समजा. जगायला लागते काय? वेळच्यावेळी पोट भरावे, सुरक्षित असावे आणि वर परत मिरवता यावे! आहे काय आणि नाही काय?

एका असमंजस मुलाला एका स्थानी बसवून त्याचा उदो उदो करून जर आपल्यालाही मोठे होता येत असेल तर वावगे काय? साधे सरळ तत्वज्ञान होते हे! ही एक वाहती गंगा होती, ह्यात फक्त हात धुवून घ्यायचे होते. पुढेमागे आपलेही स्थान निर्माण होईल ही आशा होती.

अन्या उर्फ अवलिया बाबा उर्फ महाराज ही एका गावातील गावकर्‍यांनी स्वतःच्या सोयीसाठी पूजलेली व्यक्ती होती. प्रत्येकाचा हेतू निरनिराळा होता, पण खरी भक्ती कोणाचीच नव्हती. इग्या आणि पवारलाही मोठे व्हायचे होते आणि रतनदेवीलाही! तावडे पाटलालाही मोठे व्हायचे होते आणि मशालकरलाही! फोटो विकणार्‍यांनाही मोठे व्हायचे होते आणि फोटो विकत घेणार्‍यांनाही! अवलिया बाबा म्हणून अन्या, अन्याचा बाप, दुबे किंवा अक्षरशः कोणीही असता तरीही सगळ्यांना चालले असते. प्रश्न त्या स्थानी कोण आहे हा नव्हताच, प्रश्न होता की त्या स्थानाचे महत्व जनतेच्यादृष्टीने किती आहे हा!

अन्या ही एक कमोडिटी होऊ लागली होती. त्या लहान वयात त्याला हेही समजत नव्हते की तावडे पाटील आणि मशालकर हे एकाच वृत्तीचे दोन चेहरे आहेत. इग्या किंवा पवार आणि रतन हेही एकाच वृत्तीचे दोन चेहरे आहेत.

त्या लहान वयात त्याला हेही समजत नव्हते की एखाद्या विशिष्ट क्षणी जो बुद्धीचा सर्वोत्कृष्ट वापर करतो, करू शकतो तोच ह्या जगात जिंकत राहू शकतो. कोणतेही असे एक विशिष्ट तत्वज्ञान माणसाला आयुष्यभर यशस्वी बनवू शकत नाही तर कोणत्याही क्षणी कोणतेही तत्वज्ञान स्वीकारण्याची वृत्ती माणसाला सातत्याने यशस्वी बनवते.

ह्या अश्या भोंदू साधूंच्या बाह्य रुपामागील वास्तव चेहरा, जो एका सामान्य आणि भोगवादी, विलासी सामान्य माणसाचा असतो, तो धूर्त राजकारणी ओळखतातच. ह्याच नियमानुसार तावडे पाटील आणि मशालकरांनीही तो ओळखलेला होता. आता वीरच्या हद्दीत आलेल्या या अवताराला त्यामुळेच मशालकर 'लार्जर दॅन लाईफ' बनवणार होते. अन्याचे होणार होते एक बाहुले, जे नेते, पुढारी, भक्त, अनुयायी, सामान्य, असामान्य, प्रशंसक, विरोधक ह्यांच्या बाहुबलानुसार त्यांच्या तालावर नाचत राहणार होते आणि त्याचवेळी त्याला चटक लागणार होती मदिरा, मदिराक्षी आणि ऐश्वर्याची!

काहीही कारण नसताना समाजात एक नवीनच आभासी पॉवर सेंटर निर्माण करून त्यायोगे स्वतःची तुंबडी भरून घेण्याचा पारंपारीक उपद्व्याप आपला समाज पुन्हा एकदा करणार होता.

फक्त ह्यात हत्या होणार होती एका अश्या व्यक्तीची, जिने सत्याच्या शोधासाठी आयुष्य पणाला लावलेले होते.

आणि त्या व्यक्तीबरोबरच त्या व्यक्तीच्या विचारांचीही...... दुर्दैवाने!

==============

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

MASTACH AAHE HA BHAG. PUDHACHA BHAG LAVKAR TAKA.

मस्त आहे कथा. आता अन्या १० ची वाट पाहुया.
>>तर कोणत्याही क्षणी कोणतेही तत्वज्ञान स्वीकारण्याची वृत्ती माणसाला सातत्याने यशस्वी बनवते.

Happy

उत्तम तत्वज्ञान

एखाद्या विशिष्ट क्षणी जो बुद्धीचा सर्वोत्कृष्ट वापर करतो, करू शकतो तोच ह्या जगात जिंकत राहू शकतो. कोणतेही असे एक विशिष्ट तत्वज्ञान माणसाला आयुष्यभर यशस्वी बनवू शकत नाही तर कोणत्याही क्षणी कोणतेही तत्वज्ञान स्वीकारण्याची वृत्ती माणसाला सातत्याने यशस्वी बनवते

नेहमीप्रमाणे सुरेख

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत