'कृतज्ञता' यादी आणि 'आग लागो' यादी

Submitted by हर्पेन on 31 December, 2013 - 04:59

मंडळी नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प-यादी करण्याचे काम आपण बरेच जण करतोच पण मी गेले दोन वर्षे करत असलेल्या कृतज्ञता यादी (Gratitude List) आणि आग लागो यादी (Burnout List) ह्याबाबत माहिती देण्यासाठी हा प्रपंच. आपल्यापैकी काही मायबोलीकर ऑलरेडी अशा याद्या बनवतही असतील कोण जाणे!

ह्या याद्या होता होईल तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आत कराव्या.

मला ह्या दोन याद्या करण्यामुळे चांगला अनुभव आलेला आहे. विशेषतः कृतज्ञता यादीचा.

कृतज्ञता यादी म्हणजे नावाप्रमाणे मागील वर्षातील संकल्पसिध्दींसंदर्भात अथवा त्या वर्षात आपणा सोबत किंवा आपल्या हातून जे काही चांगले घडले त्यासंदर्भात आपल्याला ज्या कोणा व्यक्ती, घटना, संस्था यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असेल किंवा जे घडले त्याबद्दल देवाचे किंवा आपण ज्या कोणत्या शक्तीचे आभार मानायचे असतील तर त्याची यादी.

सरत्या वर्षातील चांगल्या घटनांचा आढावा ह्या निमित्ताने घेतला जातो तो मन-प्रवास खूप छान असतो. ही एक सुंदर संधी असते चांगल्या आठवणीत रमण्याची. ही यादी जितकी मोठी करता येईल तितके चांगले.

उदा. नवीन घर, गाडी, नोकरी, पगारवाढ, मॅरॅथॉन पुर्ण करणे अशा मोठ्या घटनांबरोबरच आपण ज्या गृहित धरतो अशा स्वच्छ पिण्यायोग्य पाणी, आरोग्य, गृहसौख्य, कुटुंब, मित्र-मंडळ, मायबोली अशा गोष्टींचाही आवर्जून समावेश करावा. (मी हे पहिल्यांदा वाचले तेव्हा 'पिण्यायोग्य पाणी' या बद्दल काय कृतज्ञता व्यक्त करायची असे वाटले पण ट्रेकिंगला जाऊन आल्यावर, मेळघाटात जाऊन आल्यावर 'स्वच्छ पिण्यायोग्य पाण्यासाठी किती त्रास कष्ट आणि वणवण करावे लागते हे पाहिल्यावर आपण शहरात राहणारी माणसे किती भाग्यवान आहोत हे जाणवते.

माझी या वर्षाच्या शेवटीस केलेली (उदाहरणादाखल), (अपुर्ण) यादी

मी कृतज्ञ आहे खालील कारणांसाठी
मेळघाट 'मैत्री'
मैत्री मुळे मेळघाटात करता आलेली स्वयंसेवकगिरी
मैत्री संदर्भात मायबोलीकरांकडून प्रत्यक्ष ओळख देख नसताना विश्वासाने दिलेली वस्तूरूप मदत
आयुष्यात पहिल्यांदाच धावलेले दोन आ़कडी अंतर
अर्ध-मॅरॅथॉन पुर्ण केली (२१ किमी धावणे)
नवीन गियरवाली सायकल घेतली,
अर्ध-ट्रायथलॉन पुर्ण केली (७५०मी. पोहोणे, २० किमी सायकलींग, ५ किमी धावणे),
आम्ही संयोजन करत असलेल्या रक्तदान शिबीरात यावर्षी आम्ही रक्तदात्यांचा ५० हा आकडा गाठला,
मायबोली,
मायबोलीवरच्या निबंध स्पर्धेत मिळालेला दुसरा क्रमांक,
'मायबोली'मुळे पहावयास मिळालेले दोन मराठी चित्रपटांचे पुण्यातील प्रथम-खेळ आणि त्या निमित्ताने दिसलेली / भेटलेली / फोटो काढायला मिळालेली कलाकार मंडळी आणि इतरही दिग्गज माणसे उदा. भावे-सुखथनकर, मोहन आगाशे, मिलींद सोमण, नितीश भारद्वाज, सुधा मुर्ती, अनिल अवचट, मंगेश तेंडुलकर, कविता गाडगीळ ई.,
पुण्यातल्या टेकड्या,
स्वच्छ पिण्यायोग्य मुबलक पाणी,
(सकाळी लवकर उठल्यास जाणवणारी) अजूनही मस्त असलेली पुण्याची हवा,
व्यक्तीगत आरोग्य,
कुटुंब आणि गृहसौख्य,
विस्तारते मित्र-मंडळ,
सोशल नेटवर्कींग,
फेसबूक,
व्हॉट्सअ‍ॅप,
वाचनात आलेली अनेक उत्तम पुस्तके,(यांची वेगळी यादी देखिल करू शकता)

..............यादी अपूर्ण

'आग लागो' यादी

'आग लागो' यादी ही संकल्पना ज्यांनी कोणी 'जब वी मेट' नावाचा चित्रपट पाहिला असेल त्यांना नक्कीच माहित असेल. (करीना शाहिदला आपल्या दगाबाज प्रेयसीचे नाव लिहिलेला कागद जाळून फ्लश करायला सांगते तो सीन)

मी करतो ती यादी, सरत्या वर्षात आपल्या सोबत झालेल्या वाईट गोष्टी आणि त्याचबरोबर पुढील काळातदेखिल ज्या आपल्यासोबत होऊ नये अशा वाटणार्‍या गोष्टी यांची एकत्रित यादी. ही अक्षरशः जाळायची. मी फ्लश करत नाही पण कोणाला करायची असल्यास करू शकता.

ह्या 'आग लागो' यादीमधे अगदी वैयक्तीक स्वरूपाचे मुद्दे असल्यास गुपचूप कोणास न दाखवता जाळावी. तसेच ह्या यादीचा फायदा देवासारखा आहे, मानला तरच...;)

आपण या यादीमधे दहशतवाद, प्रदूषण, भ्रष्टाचार इथपासून ते सर्दी, पडसे, दाढदुखी, जोडीदाराबरोबर भांडण यासारखे अगदी वैयक्तिक मुद्दे देखिल घेऊ शकतो.

माझ्या 'आग लागो' यादीतले मुद्दे
कर्ज
गुढगेदुखी
कॅश-फ्लो क्रंच
सुट्ट्या न मिळणे
शनिवार कामाचा वार असणे
जॉब सॅटीस्फॅक्शनचा अभाव
नोकरीतली अस्थिरता
कुठल्याही तर्‍हेची अभावग्रस्तता
वैयक्तिक पातळीवर करावा लागणारा भ्रष्टाचार

तर मग मंडळी लगोलग लिहा बरे, आपापली यादी इथे टाका....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी 'मॅजिक' हे पुस्तक सध्या फॉलो करतो आहे.
त्यामुळे ग्रॅटिट्यूड लिस्ट मी दररोज १०गोष्टी ह्याप्रमाणे तयार करतोय.
आग लागो यादीची आयडिया मात्र छान आहे.
'लुई हे' या लेखिकेचे 'यू कॅन हील युअर लाइफ' हेही पुस्तक वाचनीय आहे.
त्यात 'आग लागो' यादीच्या जवळपास जाणारा फंडा आहे.
आपल्याला अनावश्यक गोष्टी (बहुतांशी इमोशनल लेव्हलवर) आपण उगाच साठवून ठेवत असतो.
तर अशा गोष्टी मानसिक पातळीवर "सोडून द्यायच्या".
उदा. एखाद्या व्यक्तीबद्दलचा आकस, एखाद्या भूतकाळातल्या घटनेबद्दलचा राग्/पश्चात्ताप/ अपराधीपणाची भावना इ.
काही गोष्टी (व्यक्तिगत आयुष्यातल्या) सहज सोडता येत नाहीत. अशा वेळी फक्त स्वतःच स्वतःला
"I am willing to change" असे सांगत रहायचे. काही दिवसांनी याचा नक्कीच फायदा जाणवतो.

इथे ह्यासंदर्भाने काही वाचनीय भाग आहे. नक्की वाचा.

हर्पेनदादा,
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा Happy

मस्त लेख. पण तुमच्या आग लागो यादीत गुढगे दुखी ? आप तो इत ने खासे अ‍ॅक्टिव्ह हो. your activity level is really inspiring. Greetings for the new year.

>>> पण तुमच्या आग लागो यादीत गुढगे दुखी ? <<< कदाचित त्यांचे डोके दुखत असेल! Proud
छान विषय!
आमच्याकडे "आग लागो" ची यादीच मारुतीच्या शेपटीप्रमाणे लाम्बलचक वाढती अस्ते! त्यामुळे मी रोजच्या रोज झोपायच्या आधीच आगलागोची यादी मनातल्या मनात बनवुन जाळून टाकतो अन मगच सुखाने झोपी जातो

सर्वप्रथम सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा !

धन्यवाद सई, चनस, दिपु, स्वाती२, जयु, चैतू, अमा, लिंटी...

चैतन्य मस्त प्रतिसाद आणि दुव्यावरचा मजकूरही,

चैतन्यने लिहिल्याप्रमाणे आग लागो यादी is about burning excess negative emotional baggage. सगळ्यांनी एकदा जरूर करून पहा.

अमा - Thanks for the concern and compliments. गुढगेदुखी तात्पुरती होती, लांब अंतरे पळणार्‍या जवळपास सर्वच धावकांना टाचा, पोटर्‍या, गुढगे दुखणे अशा दुखापतींना तोंड द्यावे लागते. या वर्षी सप्टेंबरमधे, मी आयुष्यात पहिल्यांदाच धावायला सुरुवात केली. त्यामुळे आली होती थोडा मुक्काम पण केला पण आता जाण्याच्या मार्गावर आहे. पण त्यातल्यात्यात जो त्रास मला परत कधिही नकोय तो म्हणजे गुढगेदुखी.... म्हणूनच तर 'आग लागो' त्या गुढगेदुखीला...:)

लिंटी - मनातल्या मनात न करता प्रत्यक्षात तो कागद जाळल्याने त्या सर्व नकोशा गोष्टी आता खरोखरच जळून गेल्या असे वाटून खूप वेगळाच परिणाम होतो.
आणि >>> पण तुमच्या आग लागो यादीत गुढगे दुखी ? <<< कदाचित त्यांचे डोके दुखत असेल! बाबत म्हणेन की स्वतःवरून जग ओळखायची रीत जुनीच आहे, आपणही जुने आहात, तर चालायचंच Wink

>>>> स्वतःवरून जग ओळखायची रीत जुनीच आहे, आपणही जुने आहात, <<< अगदी अगदी Happy हल्लीहल्ली ना, शरिराचा कोणताही भाग दुखूखूपू लागला तरी डोकेदुखीच वाटते! Proud असो

पूर्वी कस? मीठमोहरी ओवाळून चूलीतल्या जाळात टाकीत, तसच पण स्वतःच स्वतःच मनातले वाईटसाईट विचार / वाईटसाईट व्यक्तिंबाबतचा राग/विचार कागदावर लिहुन ते जाळून टाकावेत :)(आगीबाबत सुरक्षिततेचे नियम पाळावेत हे वेगळे सान्गायला नकोच).
पण तुम्ही म्हणता तो "खूप वेगळाच परिणाम" (मला मान्य असला तरी) अन्निस वगैरे बुप्रावाद्यान्ना पटत नाही, ते म्हणतात की सिद्ध करुन दाखवा प्रयोगशाळेत नै त तुम्ही म्हणता/करता ती "अंधश्रद्धा" ! Proud

[तरी बर, मरीआईच्या फेर्‍यासारखा अन्निसवाल्यान्चा फेरा इकडे अजुन सुरू झाला नाहीये, किन्वा त्यान्चे लक्ष इकडे वेधले गेले नाहीये - सांभाळा हो हर्पेनभाऊ, नैतर आजच रात्री अन्निसवाल्यान्च्या नावानेही एक कागद जाळूनच टाका कसा! ]

>>>> लिंटि - किती मुद्देसूद आणि विषयानुसार विषयानुरुप लिहावे माणसाने <<<< कसचं कसचं

अहो पण तस नै लिहिल तर माणसे, हा लिम्ब्या बघा विषयांतर करतो, स्वतःकडे लक्ष वळवतो, समोरच्याला खोडून काढतो, नको तिथे नको तेच्च विषय जसे की ब्राह्मण्य/जाती-धर्मवाद/बुप्रा-ब्रिगेडी-कॉन्ग्रेसी-कम्युनिस्ट वगैरे ओढूनताणुन घुसडतो असे आक्षेप कीबोर्डवर कडाकडा बोटे मोडत मोडत घेतात! Proud

लिंटी, आता माझ्या लक्षात आलं म्हणजे लोकांनी (कीबोर्डवर) कडाकडा बोटे मोडली की (परभारे) दृष्ट निघते तुमची म्हणून तुम्ही असे लिहिता होय.

या दोन्ही याद्या शिवाय माझी एक "रोडगा वाहीन तुला" यादी आहे. बर्याच गोष्टी अशा असतात कि "असून अडचण नसून खोळंबा". त्या गोष्टींचे स्वरूप माझे मलाच नीटसे कळले तर "रोडगा वाहीन तुला" असली ती यादी उदा: भविष्यकाळातील प्रमोशन साठी आज पडणारा ओव्हरताइम.

चांगली कल्पना !
खरं सांगू ? हल्लीं माझ्या 'कृतज्ञता यादी'त साधं हंसून सौजन्यशील बोलणारे भाजीवाले, बस कंडक्टर, बँक कर्मचारी इ.इ . मंडळीच अधिक गर्दी करून असतात. माझी 'आग लागो' यादी मीं स्वतः त्या दिवशीं असं न वागलो/ बोललो असलो त्या नोंदीने भरते; 'गुडघा दुखी'सारख्या क्षुल्लक बाबीना माझ्या वयाच्या व्यक्तींच्या 'आग लागो' यादींत अर्थातच स्थान नाही, हें सांगणे नकोच !!!
शिवाय, माझ्या कृतज्ञता यादीच्या सुरवातीलाच रोज 'मायबोली' ही एंट्री असणं स्वाभाविकच !!! Wink

इन्ना, आग लागो यादी मोठी झाली हे ठीक आहे पण जाळलीस की नाही. आणि कृतज्ञता यादी त्याहीपेक्षा मोठी असायला हवी.

सिमंतीनी - रोवातु यादीची कल्पना वाईट नाही पण मी तरी शक्यतो, यथायोग्य शब्दबदल करून त्यांना संकल्पात किंवा आग लागो मधे बदलवून टाकतो.

भाऊ - सगळीच पोस्ट +१

>>>> "रोडगा वाहीन तुला" <<<<
yaacaa shabdasha: artha saangaal kaa? roDagaa mhaNaje kaay? he devilaa uddeshun mhaNataata naa? thoDe vishleShaNa karun saangaa naa please.

रोडगा म्हणजे वाळलेला भोपळा. एकनाथी भारुडात ह्याचा संदर्भ आहे - देवीला उद्देशून सामान्य संसारी स्त्री मागणे मागते आणि पूर्ण झाले तर "रोडगा वाहीन तुला" अशी लालूच देते. Happy

मस्त धागा हर्पेन, आग लागो संकल्पना नाविन्यपूर्ण . कृतज्ञता मी रोज उठल्याबरोबर व्यक्त करतच असते '' या सुंदर आकाशासाठी आणि त्याखालच्या आयुष्यासाठी ''.. ते असुंदर करणाऱ्या सर्व आतल्याबाहेरच्या गोष्टींना आग लावणे क्रमप्राप्तच.धन्यवाद .

हर्पेन भारी आयडिया.
लिंटी / सिमंतिनी , रोडगा म्हणजे गव्हाच्या जाड चपात्या ( न लाटलेल्या) असं मला एका गावातल्या देवळात एका आजीबाईनी सांगितलं होतं. तिथं देवासमोर पण ठेवलेले एक दोन. Uhoh

झाल्या माझ्या याद्या...

कृतज्ञता मी रोज उठल्याबरोबर व्यक्त करतच असते '' या सुंदर आकाशासाठी आणि त्याखालच्या आयुष्यासाठी ''.. ते असुंदर करणाऱ्या सर्व आतल्याबाहेरच्या गोष्टींना आग लावणे क्रमप्राप्तच.>>> एक नंबर!

Pages