सॅव्हेज माऊंटन - ४

Submitted by स्पार्टाकस on 30 December, 2013 - 21:45

३ ऑगस्ट

कोरीयन मोहीमेतील तीन गिर्यारोहक किम चँग सून, जँग बाँग वान आणि जँग ब्याँग हो भल्या पहाटे कँप ४ वरून निघून शिखराच्या मार्गाला लागले होते !

के २ वरील लहरी हवामान आता बिघडत चाललं होतं ! पहाटेपासूनच वा-याचा जोर वाढत होता. शिखराच्या आसपास असलेल्या ढगांमुळे ते मधूनच दिसत होतं तर मध्येच ढगांत गडप होत होतं ! नैऋत्येच्या दिशेने ढगांचा पुंजका के २ च्या दिशेने झेपावत होता ! याचा अर्थ सरळ होता. जोरदार हिमवादळाची ती नांदी होती !

नैऋत्येच्या मार्गाने चढाई करणा-या माजर, झरविन्का आणि पामोवस्का यांनी बिघडत चाललेल्या हवामानात चढाईचा बेत पुढे ढकलून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता !

आघाडीवर असलेला किम चँग सून एव्हाना बॉटलनेकमध्ये पोहोचला होता. तिथे पोहोचल्यावर एक धोकादायक गोष्ट त्याच्या नजरेस पडली होती. बॉटलनेकच्या एका विशीष्ट उतारावर बांधलेल्या दोन सुरक्षा दोरांमध्ये सुमारे २० मी अंतर होतं. या २० मी मध्ये एकही दोर बांधलेला नव्हता !

दुपारी ४.१५ वाजता किम चँग सून, जँग बाँग वान आणि जँग ब्याँग हो या तीन गिर्यारोहकांनी के २ चं शिखर गाठलं होतं !

रेडीओवरून त्यांनी बेस कँपला ही बातमी कळवताच बेस कँपवर एकच जल्लोष झाला !
मात्र इतर गिर्यारोहकांपैकी कोणाचंही नामोनिशाण त्यांना शिखरावर आढळलं नाही !

दुपारी ४.४५ वाजता किम चँग सून, जँग बाँग वान आणि जँग ब्याँग हो यांनी शिखरावरून परतीचा प्रवास सुरू केला.

संध्याकाळी ५.०० वाजता वोसिच व्रोज, झेम्यस्लाव पिसेकी आणि पीटर बोझीक के २ च्या माथ्यावर पोहोचण्यात यशस्वी ठरले होते !
अतिशय कठीण असलेल्या नैऋत्येच्या मार्गाने अखेरीस त्यांनी के २ चं शिखर गाठलं होतं !

कोरीयन गिर्यारोहक परतीच्या वाटेवर असताना व्रोज, पिसेकी आणि बोझीक त्यांच्या पाठोपाठ उतरत होते. दोन रात्री ऑक्सीजनविना घालवल्यामुळे तिघंही प्रचंड थकलेले होते. परंतु खाली उतरून किमान कँप ४ गाठण्याशिवाय पर्याय नव्हता !

किम चँग सून एव्हाना बॉटलनेकच्या त्या उतारावर पोहोचला होता. पूर्वीच्या अनेक मोहीमांतील गिर्यारोहकांनी बांधलेल्या दोरांपैकी एक दोर त्याने मधल्या २० मी च्या उतारावर बांधला आणि तो खाली उतरला. मात्र त्या दोराचं दुसरं टोक दुस-या सुरक्षा दोराशी संलग्न नव्हतं. अर्थात त्या दोराच्या आधाराने उतरल्यावर पुढचा सुरक्षा दोर गाठणं कठीण नव्हतं. किमने बॉटलनेक ओलांडून कँप ४ कडे आपली वाटचाल पुढे सुरु ठेवली.

एव्हाना दृष्यमानता कमी होत होती. किमच्या पाठोपाठ बोझीक आणि पिसेकी हेडलँपच्या उजेडात बॉटलनेक मध्ये उतरले. बॉटलनेकच्या धोकादायक उतारांवर तासभर ते व्रोझची वाट पाहत होते ! परंतु त्याची कोणतीही चाहूल न लागल्याने अखेरीस त्यांनी कँप ४ वर उतरण्यास सुरवात केली.

मागे राहीलेल्या जँग बाँग वानचा ऑक्सीजन कधीच संपला होता ! रात्रीच्या अंधारात खाली उतरण्याऐवजी तिथेच रात्र काढण्याचा त्याने निश्चय केला ! व्रोझच्या पुढे आलेला जँग ब्याँग हो त्याचं मन वळवण्यासाठी पुन्हा माघारी परतला. परंतु दुर्दैवाने हो ला इंग्रजी येत नसल्याने दोराचं टोक मोकळं असल्याची माहीती व्रोझला कळली नाही ! हो ने खाली उतरण्याविषयी वानचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण वान आपल्या निर्णयावर ठाम होता ! निरुपायाने हो कँप ४ च्या मार्गाला लागला, परंतु त्याच्या पुढे असलेला व्रोझ एव्हाना गायब झाला होता !

व्रोझचा हेडलँप बंद पडला होता. बॉटलनेकमध्ये उतरणा-या त्या उतारावर सुरक्षा दोराचं टोक मोकळं असल्याची त्याला काहीही कल्पना नव्हती ! दोराच्या मोकळ्या टोकावरून तो थेट दरीत कोसळला !

या मोसमातील के २ वर मृत्यूमुखी पडणारा व्रोझ ७ वा गिर्यारोहक होता !

किम सून, पिसेकी आणि बोझीक कँप ४ वर पोहोचले होते. रात्री उशीरा जँग हो ने कँप ४ गाठला.
जँग बाँग वानने बॉटलनेकच्या वर बायव्हॉक केला होता !

४ ऑगस्ट

पहाटे ५.३० च्या सुमाराला रोझ आणि वोल्फ शिखरावरच्या अंतिम चढाईसाठी बाहेर पडले ! त्यांच्या पाठोपाठच डिअ‍ॅम्बर्गर आणि टुलीस शिखराच्या मार्गाला लागले. आल्फ्रेड इमित्झर आणि विली बोअरनेही शिखराच्या दिशेने कूच केलं. अतिश्रमाने दमल्यामुळे हान्स विसरने चढाईचा बेत रद्द केला होता !

बॉटलनेकच्या वर बायव्हॉक केलेल्या जँग बाँग वानने दिवस उजाडताच कँप ४ गाठला होता. तो कँप ४ वर पोहोचताच किम सून आणि जँग हो यांनी त्याच्यासह खाली उतरण्यास सुरवात केली.

के २ च्या शिखरावर असलेलं ढगांचं आवरण निवळत होतं. मात्र दक्षिणेच्या दिशेने के २ कडे सरकत असलेल्या वादळाचा धोका अद्यापही टळलेला नव्हता !

रोझच्या बरोबर निघालेली वोल्फ एव्हाना बरीच मागे पडली होती. इमित्झर आणि बोअर तिला ओलांडून पुढे निघून गेले होते.

पिसेकी आणि बोसीक यांनी सकाळी १०.३० ला कँप ४ सोडला आणि त्यांनी अ‍ॅब्रझी स्परवरील कँप ३ च्या दिशेने उतरण्यास सुरवात केली. विसरला आपल्याबरोबर उतरण्याचं त्यांनी परोपरिने विनवलं, पण विसरने ठाम नकार दिला. इमित्झर आणि बोअरची वाट पाहत तो कँप ४ वर थांबला होता !

विसरचा हा निर्णय किती महागात पडणार होता ?

दुपारी १२.०० च्या सुमाराला अ‍ॅलन रोझ बॉटलनेकवर पोहोचला होता. सावधपणे मार्गक्रमणा करत त्याने बॉटलनेक ओलांडलं आणि तो विश्रांतीसाठी थांबला.

जानुस्झ माजर आणि झरविन्का-पामोवस्का यांना वोसिच व्रोझच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी पिसेकी आणि बोसीक यांच्याकडून मिळाली होती. माजरच्या तुकडीने आतापर्यंत ३ दिवस डेथ झोनच्या जवळपास घालवलेले होते. येणा-या वादळाच्या तडाख्यात सापडणं टाळायचं असेल तर चढाईचा बेत रद्द करून बेस कँप गाठणं अत्यावश्यक होतं.

दुपारचे ३.३० वाजले होते. रोझ आता शिखरापासून फक्त १०० मी अंतरावर होता. इमित्झर आणि बोअरने रोझला गाठलं होतं. त्याला मागे टाकून ते पुढे सरकले. त्यांच्यापाठोपाठ रोझने शिखराची वाट धरली.

दुपारी ४.०० वाजता आल्फ्रेड इमित्झर, विली बोअर आणि अ‍ॅलन रोझ के २ च्या माथ्यावर पोहोचले !

के २ च्या माथ्यावर पोहोचणारा अ‍ॅलन रोझ पहिला ब्रिटीश गिर्यारोहक होता !

दुपारी ४.३० च्या सुमाराला रोझ, इमित्झर आणि बोअरने कँप ४ कडे परतीच्या प्रवासाला सुरवात केली. शिखरापासून सुमारे १७० मी खाली उतरुन आल्यावर त्यांना बर्फात बसलेली एक आकृती दिसली.

डोब्रोस्लावा म्योडोविच्झ-वोल्फ !

अतिश्रमाने वोल्फला झोप लागली होती ! रोझने तिला झोपेतून जागं केलं आणि खाली उतरण्याची सूचना केली. परंतु शिखराच्या इतक्या जवळ पोहोचल्यावर परत फिरण्यास वोल्फ तयार होईना ! मोठ्या मुष्कीलीने तिचं मन वळवण्यात रोझला यश आलं.

संध्याकाळी ५.३० च्या सुमाराला रोझ, वोल्फ, इमित्झर आणि बोअरची गाठ आणखीन दोन गिर्यारोहकांशी पडली.

कर्ट डिअ‍ॅम्बर्गर आणि जुली टुलीस !

ते दोघंही प्रचंड दमले होते. पण माथ्यावर पोहोचण्याची त्यांची जिद्द अद्याप कायम होती ! परत फिरण्याची रोझची सूचना धुडकावून ते दोघे शिखराच्या दिशेने मार्गक्रमणा करत राहिले !

संध्याकाळी ६.०० च्या सुमाराला बेस कँपवरील जिम करन आणि पाकीस्तान आर्मीचा अधीकारी कॅप्टन नीर यांनी माजरशी रेडीओ वरून संपर्क साधला. व्रोझच्या मृत्यूने हादरलेल्या माजर, झरविन्का आणि पामोवस्का यांनी बेस कँपवर परतण्याचा निर्णय घेतला होता.

" या वर्षी के २ वर कितीतरी जणांनी प्राण गमावले आहेत !" झरविन्का रडवेल्या आवाजात उद्गारली.

कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांनी आतापर्यंत सुरक्षीतपणे आणि पध्दतशीर चढाई केली होती. पण त्यांनाही अखेर के २ च्या यज्ञात आपली आहुती टाकावी लागणारच होती.

कोरीयन मोहीमेतील सामान वाहतूक करणा-या पोर्टरवर देखरेख करणारा सरदार महंमद अली इतरांसह अ‍ॅब्रझी स्परवरील अ‍ॅडव्हान्स बेस कँप वरून कँप १ वर चढाई करत होता. अचानकपणे वरून कोसळलेला खडक त्याच्या डोक्यावर आदळला होता. दगडाच्या आघाताने अली एका क्षणात जागच्या जागी मृत्यूमुखी पडला होता ! कोरीयन मोहीमेचा प्रमुख किम जूमच्या सूचनेनुसार इतरांनी अलीचा मृतदेह एका बर्फाळ कपारीत सोडून दिला.

महंमद अली हा या मोसमात के २ वर प्राण गमावलेला ८ वा गिर्यारोहक होता !
अजून किती जणांचे बळी जाणं बाकी होतं ?

कर्ट डिअ‍ॅम्बर्गर आणि जुली टुलीस संध्याकाळी ७.०० वाजता के २ च्या माथ्यावर पोहोचले होते !

सुमारे अर्धा तास शिखरावर बसून विश्रांती घेतल्यावर ते परत फिरले.

अवघे काही फूट ते खाली उतरले आणि टुलीसचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. सुरक्षा दोराने तिच्याशी संलग्न असलेला कर्टही खेचला गेला, पण सुमारे १०० मी कोसळल्यावर आईस एक्सच्या सहाय्याने दोघांची घसरण थांबवण्यात कर्टला यश आलं !

सावधपणे खाली उतरताना पुन्हा टुलीसचा तोल गेला आणि ती कोसळली. काही अंतरावरच घसरण थांबवण्यात पुन्हा एकदा कर्ट यशस्वी ठरला !

रात्रीच्या अंधारात उतरणं टाळून कर्टने तिथेच बायव्हॉक करण्याचा निर्णय घेतला !
रोझ, वोल्फ, इमित्झर आणि बोअर अंधारातून उतरत कँप ४ वर पोहोचले होते !
पिसेकी आणि बोझीकने कँप ३ गाठला होता.
किम सून, जँग वान आणि जँग हो कँप ३ वर न थांबता खाली उतरून कँप २ वर पोहोचले होते.

दक्षिणेच्या दिशेने येणारं हिमवादळ के २ वर पोहोचलं होतं !

५ ऑगस्ट

दिवस उजाडताच कर्ट आणि टुलीसने खाली उतरण्यास सुरवात केली. वादळाचा जोर आता चांगलाच वाढला होता. दृष्यमानता खूपच कमी झाली होती. वादळाशी झुंजत आणि टुलीसला आधार देत डिअ‍ॅम्बर्गरने बॉटलनेक ओलांडलं आणि कँप ४ च्या दिशेने उतरण्यास सुरवात केली. मात्र वादळात कँप ४ ची नेमकी जागा सापण्याविषयी तो साशंक होता.

टुलीसची दृष्टी एव्हाना अंधूक होत चालली होती ! कँप ४ वर पोहोचण्यापूर्वीचं शेवटचे १०० मी ती चक्क हातापायांवर रांगत उतरत होती !

कँप ४ दृष्टीस पडताच कर्टने मदतीसाठी हाका मारण्याचा सपाटा लावला. सुदैवाने त्याची हाक ऐकून विली बोअरने तशा वादळातही बाहेर पडून टुलीसला आधार दिला आणि उपचारांसाठी आपल्या तंबूत नेलं !

दुपारी दोनच्या सुमाराला कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहक किम चँग सून, जँग बाँग वान आणि जँग ब्याँग हो आणि पोर्टर बेस कँपवर पोहोचले. मात्र महंमद अलीच्या मृत्यूने त्यांच्या यशस्वी चढाईला दु:खाची किनार होती.

माजर, झरविन्का आणि पामोवस्का परतीच्या मार्गावर होते. बेस कँपवर असलेला जिम करन त्यांना भराभर खाली उतरण्यासाठी बजावत होता. जितक्या लवकर ते खाली येतील तेवढा त्यांना धोका कमी होता.

रात्री टुलीस आणि कर्ट आपल्या तंबूत परतले.

के २ ची चढाई यशस्वी झाली होती. आता लवकरात लवकर उतरून बेस कँपवर पोहोचणं आवश्यक होतं.

हिमवादळाचा जोर वाढतच होता ! वा-याचा जोर कमी झाल्याशिवाय खाली उतरणं अशक्य होतं.

पिसेकी आणि बोझीक कँप १ वर पोहोचले होते. वरती थैमान घालणा-या वादळाच्या तावडीतून ते निसटले होते.

६ ऑगस्ट

रात्रीच्या झंझावाती वादळात डिअ‍ॅम्बर आणि टुलीसचा तंबू उध्वस्त झाला होता ! विली बोअरच्या ते ध्यानात येताच इतरांच्या मदतीने त्याने दोघांची सुटका केली. टुलीस ऑस्ट्रीयन गिर्यारोहकांच्या तंबूत गेली आणि कर्टने रोझ आणि वोल्फच्या तंबूत आश्रय घेतला.

हिमवादळ निवळण्याची कोणतीही चिन्हं दिसत नव्हती !

दुपारी टुलीसने डिअ‍ॅम्बर्गरची गाठ घेतली. तिची नजर अद्यापही अंधूकच होती. तिला अल्टीट्यूड सिकनेसचाही त्रास जाणवत होता. त्याशिवाय तिला पल्मनरी एडेमानेही ग्रासलं होतं !

लवकरात लवकर खाली उतरण्याला पर्याय नव्हता. मात्र हिमवादळापुढे सर्वांचाच निरुपाय झाला होता. वा-याचा वेग आता ८० मैलावर गेला होता !

ऑस्ट्रीयन मोहीमेतील मायकेल मेसनरचा अपवाद वगळता सर्वांनी बेस कँप सोडून स्कार्डूकडे कूच केलं होतं. अद्यापही अ‍ॅब्रझी स्परवर अस्लेल्या आपल्या तीन सहका-यांची त्यांनी आशा सोडली असावी ! मेसनर जवळ शक्तीशाली दुर्बीण होती. अ‍ॅडव्हान्स बेस कँपवरुन खाली येत असलेले दोन गिर्यारोहक नजरेस पडताच त्याने जिम करनसह त्यांना गाठण्यासाठी बेस कँप सोडला.

सकाळी ११.०० च्या सुमाराला त्यांची पिसेकी आणि बोझीकशी गाठ पडली. दोघंही प्रचंड थकलेले होते. परंतु अखेरीस सुरक्षीतपणे बेस कँपवर परतले होते !

माजर, झरविन्का आणि पामोवस्का एव्हाना नेग्रोटो कोलपर्यंत खाली उतरले होते. फक्त मधली मोठी घळ उतरली की ते फिलीपी ग्लेशीयरवर पोहोचले असते. इथेच कॅसारॉट्टोचा कपारीत पडल्यामुळे मृत्यू झाला होता.

७ ऑगस्ट

सकाळी विली बोअरने डिअ‍ॅम्बर्गरची भेट घेऊन त्याला वाईट बातमी दिली.

जुली टुलीस मरण पावली होती !

टुलीसच्या मृत्यू डिअ‍ॅम्बर्गरवर जबरदस्त आघात करुन गेला होता. ते दोघं सुमारे सहा वर्षांपासून एकत्र गिर्यारोहण करत होते. के २ चं शिखर गाठणं हे कर्टचं तीस वर्षांपासूनचं स्वप्नं होतं. अखेरीस तो आपल्या मोहीमेत यशस्वी झाला होता, पण टुलीसच्या मृत्यूने तो मनातून उध्वस्त झाला.

" तिची अवस्था इतकी गंभीर असेल याची मला कल्पना नव्हती !" डिअ‍ॅम्बर्गर म्हणाला, " शेवटच्या क्षणी मी तिच्याशेजारी नव्हतो हा सल मला जन्मभर राहील !"

अ‍ॅलन रोझने कर्टचं सांत्वन केलं.

के २ वर ९ व्या गिर्यारोहकाने शेवटचा श्वास घेतला होता !

वादळाचं थैमान कमी न होता आणखीन वाढत होतं. वा-याचा जोर आता १०० मैलावर गेला होता !

संध्याकाळी उशीरा माजर, झरविन्का आणि पामोवस्का स्मॉलीचच्या अमेरिकन मोहीमेतील कँप १ वर पोहोचले होते. रात्री तिथेच मुक्काम करून दुस-या दिवशी सकाळी बेस कँपवर परतण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

अ‍ॅब्रझी स्परवर अडकलेल्या सहा गिर्यारोहकांच्या भविष्यात काय लिहीलेलं होतं ?

८ ऑगस्ट

सकाळी साडेदहाच्या सुमाराला माजर, झरविन्का आणि पामोवस्का बेस कँपवर पोहोचले !

कँप ४ वर अडकलेल्या गिर्यारोहकांकडे असलेल्या स्टोव्हचं इंधन संपलं !

डेथ झोनच्या इतक्या जवळ असल्याने पल्मनरी एडेमा आणि सेरेब्रल एडेमा पासून बचाव करण्यासाठी शरिरात द्रवपदार्थ जाणं अत्यावश्यक होतं. अन्यथा रक्त गोठून मृत्यूमुखी पडण्याचा धोका होता.

..आणि स्टोव्ह बंद पडताच बर्फ वितळवण्याचा मार्ग बंद झाला !

आतापर्यंत ठणठणीत असलेल्या अ‍ॅलन रोझची तब्येत एकदम खालावली ! त्याला पल्मनरी एडेमाने ग्रासलं ! इतरांचीही अवस्था फारशी चांगली नव्हती !

वादळाचं थैमान सुरूच होतं ! वा-याचा जोर तसूभरही कमी झालेला नव्हता !

९ ऑगस्ट

अद्यापही सहा गिर्यारोहक अ‍ॅब्रझी स्परवर होते. बेस कँपवर त्यांची कोणतीही बातमी आलेली नव्हती. अर्थात टुलीसचा मृत्यू झाल्याची कोणालाच काही कल्पना नव्हती. कँप ४ वरील कोणाकडेही रेडीओ नव्हता !

अ‍ॅडव्हान्स बेस कँपवरुन मेसनरच्या दुर्बीणीच्या सहाय्याने त्यांची काही हालचाल दिसते का हे पाहण्याच्या दृष्टीने शेवटचा प्रयत्न म्हणून जिम करन आणि मायकेल मेसनरने अ‍ॅडव्हान्स बेस कँपच्या दिशेने चढाईला सुरवात केली.

मेसनरच्या पुढे असलेला करन एका बर्फाळ चढाजवळ पोहोचत असतानाच कोसळणा-या बर्फाचा त्याला आवाज आला.

अ‍ॅव्हलाँच !

करनने पाठीवरची बॅग तिथेच टाकली आणि बेस कँपच्या दिशेने धाव घेतली. सुदैवाने त्याच्यापासून काही फूट अंतरावरच बर्फाचा तो लोंढा येऊन थांबला ! आणखी एक दुर्घटना टळली होती !

हादरलेला करन स्वतःला सावरत असतानाच मेसनर तिथे पोहोचला होता. करन सुरक्षीत असल्याचं पाहून त्याने नि:श्वास टाकला ! काही वेळाने दोघं पुढे निघाले आणि अ‍ॅडव्हान्स बेस कँपवर पोहोचले.

अ‍ॅलन रोझ आदली रात्र आणि दिवसभर शुध्दी-बेशुध्दीच्या सीमारेषेवर होता. शुध्दीत असताना वेदना असह्य होऊन तो सतत विव्हळत होता. इतरांचीही अवस्था जवळपास तशीच होती. ते सर्वजण जेमतेम शुध्दीवर होते इतकंच !

अ‍ॅडव्हान्स बेस कँपवर पोहोचल्यावर करन आणि मेसनरने अ‍ॅब्रझी स्परची दुर्बीणीतून काळजीपूर्वक पाहणी केली, पण त्यांना पर्वतावरील गिर्यारोहकांची कोणतीही खूण दिसून आली नाही. निराश मनाने ती रात्र तिथे काढून दुस-या दिवशी सकाळी बेस कँपवर परतण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

कॅंप ४ वर गिर्यारोहकांना अडकवून ठेवणारं वादळ शमण्याची कोणतीही चिन्हं दिसत नव्हती !

१० ऑगस्ट

अ‍ॅलन रोझची अवस्था गंभीर झाली होती. तो अद्यापही शुध्दी-बेशुध्दीच्या सीमारेषेवर घोटाळत होता. आपला हात उचलण्याचीही त्याच्यात ताकद राहीली नव्हती !

इतरांची अवस्था रोझपेक्षा जेमतेम बरी होती इतकंच ! वादळ शमण्याची कोणतीही चिन्हं दिसत नव्हती. अशा परिस्थितीत बेस कँपवरुन कोणतीही मदत येण्याची शक्यता नव्हती. कँप ४ वरच थांबून राहिल्यास इतरांचीही अवस्था रोझसारखी होण्याची दाट शक्यता होती. गेल्या ७ दिवसांपासून ते डेथ झोनमध्ये होते ! आता निकराची वेळ येऊन ठेपली होती !

अखेरीस सर्वांनी रोझला तिथेच सोडून खाली उतरण्याचा निर्णय घेतला ! त्या परिस्थितीत दुसरा कोणताही इलाज नव्हता !

बोअर आणि वोल्फने सर्वात प्रथम कँप ४ सोडून खालची वाट धरली. त्यांच्यापाठोपाठ डिअ‍ॅम्बर्गर निघाला. निघण्यापूर्वी टुलीसचं अंत्यदर्शन घेऊन त्याने श्रध्दांजली वाहीली. आपण खाली जात असल्याचं त्याने रोझला सांगितलं, पण अर्धवट बेशुध्दीत असलेल्या रोझला ते कितपत कळलं असावं याची शंकाच आहे !

बोअर, वोल्फ आणि डिअ‍ॅम्बर्गर छातीपर्यंतच्या बर्फातून वाट काढत खाली उतरत होते. अखेरीस ते सुरक्षा दोरापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले !

डिअ‍ॅम्बर्गरच्या पाठोपाठ इमित्झर आणि विसरने कँप ४ सोडला होता. मात्र जेमतेम १५० मी अंतर काटल्यावर ते बर्फात कोसळले ते कायमचेच !

के २ वर आणखीन दोन गिर्यारोहकांनी अखेरचा श्वास घेतला !

बोअर आणि डिअ‍ॅम्बर्गर कँप ३ वर पोहोचले, पण वादळात तो पूर्णपणे उध्वस्त झाल्याचं त्यांना आढळून आलं. हळूहळू उतरत असल्याने वोल्फ मात्र बरीच मागे पड्ली होती. कँप ३ वर न थांबता ते कँप २ च्या मार्गाला लागले. वादळाशी झगडत अखेर कँप २ गाठण्यात ते यशस्वी झाले.

कँप २ वर त्यांना स्टोव्ह मिळाला ! बर्फाचं पाणी करणं शक्यं झालं होतं ! अधाशाप्रमाणे पाणी पिऊन ते झोपेच्या आधीन झाले !

वोल्फ कँप २ वर पोहोचली नव्हती, पण वांडा ऋत्कीविझच्या कँप ३ जवळ असलेल्या तंबूत तिने आश्रय घेतला असल्याची डिअ‍ॅम्बर्गरला खात्री वाटत होती !

जिम करन आणि मायकेल मेसनरने अ‍ॅडव्हान्स बेस कँप सोडला आणि ते बेस कँपवर परतले.

आदल्या दिवशीच्या अ‍ॅव्हलाँचमध्ये बेस कँपजवळ वाहून आलेल्या बर्फाच्या पुरात कोरीयन गिर्यारोहकांना एक खूप जुनं मांडीचं हाड आढळलं होतं ! ऑस्ट्रीयन तुकडीच्या पोर्टरना एक जुनी आईस एक्स सापडली होती. त्या आईस एक्सच्या दांड्यावर कोरलेली अक्षरं अद्यापही स्पष्टपणे वाचता येत होती.

अ‍ॅशनब्रेनर इन्सब्रूक !

ही आईस एक्स १९५३ च्या चार्ल्स ह्युस्टनच्या मोहीमेत आर्ट गिल्केच्या स्लीपींग बॅगला आधार देणा-या आईस एक्सपैकी एक होती !

जिम करनच्या सूचनेवरून दोन पाकीस्तानी पोर्टर अ‍ॅडव्हान्स बेस कँपवर असलेलं डिअ‍ॅम्बर्गर आणि टुलीसचं सामान परत आणण्यास निघाले होते. मात्र त्यांचा तंबू तसाच ठेवण्याचं करनने त्यांना बजावलं होतं. यदाकदाचित एखादा गिर्यारोहक खाली आलाच तर त्याला तंबूचा उपयोग होणार होता. कोणताही रेडीओ संदेश नसल्याने डिअ‍ॅम्बर्गर आणि विली बोअर खाली उतरत असल्याची करनला काहीही कल्पना नव्हती !

डोब्रोस्लावा म्योडोविच्झ-वोल्फ कुठे होती ?

११ ऑगस्ट

पहाटेच्या सुमाराला अ‍ॅलन रोझच्या यातना संपल्या.
जिद्दीने हट्टाला पेटून त्याने तीन वेळा के २ वर चढाई केली होती. तिस-या प्रयत्नात त्याने शिखर गाठलं, परंतु के २ ने त्याला कायमचं आपलंसं करून घेतलं !

अद्याप जन्माला न आलेल्या आपल्या मुलाचं तोंड पाहण्याचं भाग्य अ‍ॅलन रोझच्या नशीबात नव्हतं !

सकाळी साडेदहाच्या सुमाराला पाकीस्तान आर्मीचं हेलीकॉप्टर बेस कँपवर उतरलं ! कर्नलच्या हुद्द्याचा एक अधिकारी बेस कँपवर पोहोचला होता. अ‍ॅब्रझी स्परवर हरवलेल्या गिर्यारोहकांच्या शोधासाठी तो हेलीकॉप्टर घेऊन आला असावा अशी सर्वांची समजूत झाली. पण कर्नलचा खरा उद्देश वेगळाच होता.

बेस कँपवरील गिर्यारोहकांकडून स्वस्तात गिर्यारोहणाचं साहीत्य खरेदी करण्याच्या उद्देशाने तो तिथे आला होता !
परवानगी नसलेल्या मार्गाने चढाई केलेल्या गिर्यारोहकांकडून पैसे उकळणं हा सुप्त हेतू होताच !

बेस कँपवर असलेल्या सर्वांनी त्याला हेलीकॉप्टरमधून शक्यं तितक्या उंचीवर उड्डाण करून गिर्यारोहकांचा शोध घेण्याची विनंती केली, पण त्याने स्पष्ट शब्दात नकार दिला !

मिळेल ते साहित्य पदरात पाडून घेऊन कर्नलची स्वारी हेलीकॉप्टरमध्ये चढली आणि ते दिसेनासं झालं.

" अ‍ॅब्रझी स्परवर एक उत्तम स्लीपींग बॅग आहे असं त्याला सांगीतलं असतं तर तो ति़कडे नक्कीच गेला असता !" जानुस्झ माजरने शेरा मारला.

जिम करनच्या सूचनेनुसार अ‍ॅब्रझी स्परवर अडकलेल्या आणि बहुधा मृत्यूमुखी पडलेल्या गिर्यारोहकांची नावं मात्र त्या कर्नलने आपल्या डायरीत लिहून घेतली होती.

पाकीस्तानी पोर्टरनी करनच्या सूचनेकडे लक्ष न देता अ‍ॅडव्हान्स बेस कँपवरील तंबू आणि सर्व सामग्री आधीच गुंडाळली होती ! अ‍ॅब्रझी स्परवर असलेले गिर्यारोहक आता वाचणार नाहीत याची त्यांना खात्री पटली होती !

दुपारच्या जेवणानंतर सर्वजण आवराआवर करत असतानाच.....

अ‍ॅडव्हान्स बेस कँपवरून खाली उतरणारा एक गिर्यारोहक सर्वांच्या नजरेस पडला !

सर्वजण आश्चर्याने थक्क होऊन पाहत असतानाच तो बेस कँपवर पोहोचला. दोन पोर्टरच्या सहाय्याने कसाबसा पाय ओढत तो मायकेल मेसनरच्या मिठीत कोसळला !

विली बोअर !

थोडी हुशारी आल्यावर बोअरकडून इतर गिर्यारोहकांची माहीती सर्वांना मिळाली.

सकाळी बोअर आणि डिअ‍ॅम्बर्गरने कँप २ सोडला होता आणि ते बेस कँपच्या वाटेला लागले. मात्र हळूहळू उतरत असलेला डिअ‍ॅम्बर्गर मागे पडला होता.

जुली टुलीस, आल्फ्रेड इमित्झर आणि हान्स विसर मरण पावले होते.
अ‍ॅलन रोझ कँप ४ वर हालचाल करण्यास असमर्थ अवस्थेत होता. तो जिवंत असण्याची शक्यता नव्हती !
डोब्रोस्लावा म्योडोविच्झ-वोल्फ कँप ४ आणि कँप ३ च्या दरम्यान उतरताना मागे पडली होती.
कर्ट डिअ‍ॅम्बर्गर कँप १ वरून अ‍ॅडव्हान्स बेस कँपच्या दिशेने खाली उतरत होता !

ही बातमी कळताच जिम करनला पाकीस्तानी पोर्टरची भयानक चूक ध्यानात आली. अ‍ॅडव्हान्स बेस कँपवरचा तंबू न गुंडाळण्याचं करनने पुन्हा पुन्हा बजावूनही त्यांनी त्याची सूचना उडवून लावली होती !

करन, माजर आणि पामोवस्का घाईघाईने अ‍ॅडव्हान्स बेस कँपच्या दिशेने डीअ‍ॅम्बर्गरला गाठण्यासाठी निघाले. त्यांच्यापाठोपाठ काही वेळातच मेसनर आणि पिसेकी बाहेर पडले. ते कँप २ पर्यंत जाऊन वोल्फचा शोध घेणार होते !

रात्री ११.३० च्या सुमाराला करन, माजर आणि पामोवस्का अ‍ॅडव्हान्स बेस कँपवर पोहोचले. वाटेत त्यांना कुठेही डिअ‍ॅम्बर्गर भेटला नव्हता. निश्चीतच तो अद्यापही अ‍ॅडव्हान्स बेस कँपच्या वर होता.

माजर आणि पामोवस्का तंबू उभारत असताना करन अ‍ॅब्रझी स्परच्या टोकाशी पोहोचला होता. बराच वेळ तिथे थांबून तो परत फिरण्याच्या बेतात असतानाच त्याला वरून खाली येणा-या गिर्यारोहकाचा आवाज त्याला ऐकू आला !

कर्ट डिअ‍ॅम्बर्गर !

करनला पाहताच कर्टला आपण सुरक्षीत असल्याची कल्पना आली ! करन आणि तोपर्यंत तिथे पोहोचलेल्या पामोवस्काच्या साथीने हळूहळू तो तंबूत पोहोचला !

कर्टच्या हातापायाला फ्रॉस्टबाईटने ग्रासलं होतं. पामोवस्का त्याच्या बोटांना मलम लावत असताना तो जर्मन-इंग्लीश मध्ये असंबद्ध बडबडत होता. अखेर थकव्याने त्याला झोप लागली.

अ‍ॅडव्हान्स बेस कँपमध्ये डिअ‍ॅम्बर्गरवर उपचार सुरू असतानाच मेसनर आणि पिसेकी कँप १ च्या मार्गाला लागले होते.

वोल्फ कुठे होती ?

१२ ऑगस्ट

सकाळी ६.०० वाजता जानुस्झ माजरने बेस कँपवर रेडीओ संदेश पाठवून दोन पोर्टरना वर पाठवण्याची सूचना दिली होती. त्यांच्याबरोबर आणखीन औषधं मागवण्याची त्याने खबरदारी घेतली होती. वोल्फचा शोध लागेपर्यंत माजर अ‍ॅडव्हान्स बेस कँपवर थांबणार होता.

माजरच्या सूचनेवरून दोन पोर्टर ८.०० च्या सुमाराला अ‍ॅडव्हान्स बेस कँपवर पोहोचले. परंतु पोहोचताक्षणीच बेस कँपवर परत जाण्याची ते घाई करू लागले. आपण अद्याप नाष्टा केला नसल्याचं कारण त्यांनी सांगीतलं. मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या डिअ‍ॅम्बर्गरची त्यांना काहीही फिकीर नव्हती. दोन पोर्टरपैकी एकजण सरळ परत फिरला आणि बेस कँपच्या मार्गाला लागला. माजर आणि करनने दुस-या पोर्टरला अक्षरशः धमकावून थांबण्यास भाग पाडलं.

करन आणि पामोवस्काच्या साथीने डिअ‍ॅम्बर्गर बेस कँपच्या मार्गाला लागला. त्यांच्याबरोबर असलेल्या पोर्टरने त्यांना कमीतकमी मदत करण्याचं धोरण स्वीकारलं होतं. वाटेत शेवटच्या कपारीत कर्ट जवळजवळ कोसळला असतानाही त्याने साफ दुर्लक्षं केलं होतं. सुदैवाने सगळी करन आणि पामोवस्काने कर्टला बाहेर खेचण्यात यश मिळवलं ! शेवटच्या टप्प्यात येताच करनच्या सूचनेवरुन पामोवस्का आणि तो पोर्टर स्ट्रेचर आणण्यासाठी पुढे गेले. काही वेळाने स्ट्रेचर येताच कर्टला त्यावरुन बेस कॅंपवर आणण्यात आलं.

बेस कँप जवळ येताच कर्टने जिम करनला आपलं बेस कँपवर परत येताना चित्रीकरण करण्याची सूचना केली ! जीवावरच्या संकटातून वाचल्यावरही त्याला ते महत्वाचं वाटत होतं !

डोब्रोस्लावा म्योडोविच्झ-वोल्फ ?

१३ ऑगस्ट

एव्हाना बोअर आणि डिअ‍ॅम्बर्गर ब-यापैकी सावरले होते, परंतु त्यांना लवकरात लवकर पुढील उपचारांसाठी हलवण्याची गरज होती. मात्र हेलीकॉप्टरचा पत्ता नव्हता !

बेस कँपवर असलेल्या जिम करनने कॅप्टन नीरची गाठ घेऊन त्याला लवकरात लवकर हेलीकॉप्टरची व्यवस्था करण्याची विनंती केली. कँप ४ वरील भयानक अनुभवातून वाचल्यावर केवळ हेलीकॉप्टरला होणा-या दिरंगाईमुळे जर बोअर आणि डिअ‍ॅम्बर्गरची परिस्थिती आणखीन बिघडली असती तर ते निश्चीतच निंदनीय होतं. परिस्थितीची पूर्ण जाणिव असलेला कॅप्टन नीर कॉन्कॉर्डीयाच्या पायथ्याशी असलेल्या आर्मी हेडक्वार्टरवर चालत निघाला ! पाकीस्तानी आर्मीचा हा एकमेव अधिकारी होता ज्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होती.

संध्याकाळी ६.०० वाजता आणखीन एक दु:खद बातमी आली.

झेम्यस्लाव पिसेकी आणि पीटर बोझीक कँप २ पर्यंत जाऊन अ‍ॅडव्हान्स बेस कँपवर परतले होते. वोल्फचा काहीही मागमूस लागला नव्हता. जड अंतःकरणाने पिसेकी, बोझीक आणि जानुस्झ माजर अ‍ॅडव्हान्स बेस कँप गुंडाळून बेस कँपच्या वाटेला लागले होते !

के २ चा या मोसमातील १३ वा बळी !

वोल्फच्या मृत्यूने झरविन्स्का आणि पामोवस्काला जबरदस्त हादरा बसला. कँप ४ वर अडकल्यावर त्यांनी खरंतर तिची आशा सोडली होती. पण बोअर आणि डिअ‍ॅम्बर्गर सुरक्षीत खाली आल्यावर आणि ती त्यांच्यापाठोपाठ उतरत असल्याचं कळल्याने ती सुखरूप परत येईल याबद्दल त्यांची खात्री पटली होती !

" आम्ही तिला दुस-यांदा गमावलं !" पामोवस्का स्फुंदत उद्गारली.

१४ ऑगस्ट

बेस कँपवरील सर्वांनी परतीच्या दृष्टीने तयारीला सुरवात केली होती.

सकाळी १०.३० वाजता हेलीकॉप्टर बेस कँपवर उतरलं ! कॅप्टन नीरच्या आर्मी हेडक्वार्टरवर जाण्याचा अखेर परिणाम झाला होता !

जिम करनच्या आधाराने कर्ट डिअ‍ॅम्बर्गर आणि मायकेल मेसनरच्या आधाराने विली बोअर हेलीकॉप्टरच्या दिशेने निघाले. त्याचवेळी बेस कँपवर असलेल्या पाकीस्तान आर्मीच्या एका अधिका-याने पायलटला गाठून त्याच्याशी काही चर्चा केली. एका पोर्टरने आणलेली बॅग घेऊन तो अधिकारी हेलीकॉप्टरमध्ये चढला आणि हेलीकॉप्टरने आकाशात उड्डाण केलं !

करन, डिअ‍ॅम्बर्गर, मेसनर, बोअर आणि इतर सर्वजण आ SSS वासून पाहत राहीले !
पाकीस्तान आर्मीच्या अधिका-यांचा आणखीन एक अनुभव !

१५ ऑगस्ट

जिम करनने बेस कँप सोडला आणि स्कार्डूची वाट धरली. निघण्यापूर्वी त्याने डिअ‍ॅम्बर्गरची भेट घेतली. आपल्या तंबूत बसून तो के २ च्या शिखराकडे एकटक पाहत होता !

" टेरीला सांग, मी आणि जुलीने अखेर माऊंटन ऑफ माऊंटन्सचं शिखर गाठलं !" टुलीसच्या पतीला - टेरीला निरोप देण्यासाठी डिअ‍ॅम्बर्गरने करनला बजावलं, " असं काही होईल अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती ! मी जुलीला वाचवू शकलो नाही !"

१६ ऑगस्ट

डिअ‍ॅम्बर्गर आणि बोअरला अखेर हेलीकॉप्टरने स्कार्डूला आणण्यात आलं. दुस-या विमानाने त्यांची इस्लामाबादला रवानगी करण्यात आली. तिथल्या हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले !

जिम करन आणि मायकेल मेसनर स्कार्डूला पोहोचले. इस्लामाबाद गाठून लवकरच ते मायदेशी रवाना झाले !

अ‍ॅलन रोझला कँप ४ वर सोडून खाली आल्यामुळे कर्ट डिअ‍ॅम्बर्गरला पुढे तीव्र टिकेला सामोरं जावं लागलं. अर्थात यात ब्रिटीश वृत्तपत्रं आघाडीवर होती. त्यांच्या दृष्टीने रोझ हा हिरो होता, परंतु आठ दिवस वादळाशी तोंड दिल्यावर रोझला खाली उतरवणं डिअ‍ॅम्बर्गरला अशक्यं होतं याकडे मात्रं त्यांनी साफ दुर्लक्षं केलं होतं. मुळात अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गाने रोझ आणि वोल्फने केलेली चढाई बेकायदेशीर होती याकडे त्यांनी काणाडोळा केला होता !

१३ गिर्यारोहक प्राणाला मुकले होते. परंतु यात मानवी चुका किती होत्या ?

जॉन स्मॉलीच आणि अ‍ॅलन पेनींग्टन अ‍ॅव्हलाँच मध्ये सापडले होते. महंमद अलीच्या डोक्यावर दगड आदळला होता. हे अपघात टाळणं शक्य नव्हतं.

मॉरीस बराड अत्यंत तंदुरूस्त गिर्यारोहक होता. लिलेनला शिखरावर पोहोचणारी पहिली स्त्री गिर्यारोहक करण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या मॉरीसने प्रमाणाबाहेर श्रम केले होते. अंतिम चढाईच्या दिवशी शिखरावर पोहोचलेले मॉरीस आणि लिलेन दोघंही प्रचंड थकलेले होते. त्यामुळे शिखरापासून थोड्याच अंतरावर बायव्हॉक करण्याची त्यांच्यावर वेळ आली.

रेनाटो कॅसारॉट्टोच्या बाबतीत मात्र निर्णयक्षमतेतील चूक - एरर ऑफ जजमेंट घातक ठरली. सूर्यास्ताच्या सुमाराला ग्लेशीयरखाली सर्वात जास्त हालचाल होत असते हे अनुभवी गिर्यारोहक असलेल्या रेनाटोला नक्की माहीत होतं. त्याच मार्गाने त्याने आधी दोन वेळा चढाई केली होती. मात्र अखेरच्या वेळी खाली उतरताना त्याचा अंदाज चुकला आणि तो प्राणघातक ठरला होता.

तडेऊस पिट्रोवस्कीच्या मृत्यू प्रमाणाबाहेर श्रम कितपत कारणीभूत होते ? कुकुच्झ्का आणि पिट्रोवस्की यांनी आपल्या अंतिम चढाईच्या वेळी सर्व सामग्री आणि खाणं-पिणं शेवटच्या कँपवर सोडून दिलं होतं. शिखरावर पोहोचल्यावर खाली उतरताना तीन दिवस ते अन्न-पाण्याविना डेथ झोनमध्ये वावरत होते ! अशा परिस्थितीत संतुलीत विचारशक्ती कितपत शाबूत राहणार होती ? पिट्रोवस्की कोसळला तेव्हा तो सुरक्षा दोराशी संलग्न नव्हता.

वोसिच व्रोजच्या मृत्यूला कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांच्या इंग्लीश भाषेच्या ज्ञानाचा आभाव कारणीभूत होता का ? बॉटलनेकमध्ये सुरक्षा दोरात असलेल्या गॅपबद्दल जँग हो व्रोजला सूचना देण्यास भाषेच्या अडचणीमुळे असमर्थ ठरला होता. त्याची परिणीती व्रोज दरीत कोसळण्यात झाली होती. व्रोचचा हेडलँप बंद पडल्यामुळे त्याला अंधारात काहीही दिसू शकत नव्हतं.

३ ऑगस्टला कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांनी शिखरावर अंतिम चढाई केली तेव्हा त्यांच्यापाठोपाठ रोझ, वोल्फ, डिअ‍ॅम्बर्गर, टुलीस आणि ऑस्ट्रीयन गिर्यारोहकांनी चढाई का केली नाही ? ३ ऑगस्टला चढाई करून कँप ४ वर ते परतले असते, तर वादळापूर्वी खाली उतरणं त्यांना शक्य झालं असतं !

डिअ‍ॅम्बर्गरच्या मते कोरीयन गिर्यारोहक ऑक्सीजन सिलेंडर वापरून चढाई करणार असल्याने इतर सर्वजण शिखरापर्यंत मार्ग आखण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून होते. अर्थात स्वतः निष्णात अनुभवी गिर्यारोहक असलेल्या डिअ‍ॅम्बर्गरचं हे मत न पटण्यासारखं आहे. त्याच्या मतानुसार रोझ आणि वोल्फने शिखरावर नेण्यासाठी भरपूर पाणी वितळवण्यासाठी एक दिवस कँप ४ वर काढण्याचा निर्णय घेतला होता !

कोणत्याही कारणाने का असेना, पण एक दिवसाचा उशीर त्यांच्या जीवावर बेतला हे खरं.

हान्स विसरला मात्र पिसेकी आणि बोझीक यांच्याबरोबर खाली उतरण्याची संधी होती. मात्रं आपल्या मोहीमेतील सहका-यांची वाट पाहत कँप ४ वर थांबण्याचा त्याचा निर्णय आत्मघाती ठरला.

आणि

के २ वर टर्न अराऊंड टाईम दुपारी ३.०० ते ५.०० च्या दरम्यान असताना, डिअ‍ॅम्बर्गर आणि टुलीस परत का फिरले नाहीत ? अनुभवी गिर्यारोहक असलेल्या डिअ‍ॅम्बर्गरने ही चूक कशी केली ?

के २ च्या इतिहासात १९८६ च्या मोसम घातकी ठरला होता. १३ गिर्यारोहक प्राणाला मुकले होते.

२२ वर्षांनंतर...

क्रमश :
 
 
 
सॅव्हेज माऊंटन - ३                                                                                                            सॅव्हेज माऊंटन - ५

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पार्टाकस,

अतिशय प्रत्ययकारी वर्णन! बापरे, कोणत्याही लढाईसारखेच हे वातावरण आहे.

असो.

एक गोष्ट विचारीन म्हणतो. रोझच्या यातना संपल्या हे कळलं कसं? सगळेजण त्याला सोडून खाली उतरले होते ना?

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान,

आपला प्रश्न योग्य आहे. रोझच्या शारिरीक अवस्थेवरुन जिम करनने त्याच्या मृत्यूचा अंदाज बांधला आहे.