सॅव्हेज माऊंटन - ३

Submitted by स्पार्टाकस on 30 December, 2013 - 00:43

जॉन स्मॉलीच आणि अ‍ॅलन पेनींग्टनच्या मृत्यूने हादरलेल्या अमेरिकन तुकडीने मोहीम आवरती घेतली आणि बेस कँप सोडला. त्यांच्यापाठोपाठ मिचेल पार्मेंटिअरने स्कार्डूची वाट पकडली. बेस कँपवर असलेल्या पाकीस्तानी अधिका-यांनी मारी अब्रेगो आणि जोसेमा कासिमीरो यांना विनापरवाना अ‍ॅब्रझी स्परने चढाई केल्याबद्दल ताब्यात घेतलं होतं ! अर्थात यामागील हेतू बेस कँपवरुन इस्लामाबादला सटकण्याचा आणि गिर्यारोहकांकडून पैसे उकळण्याचा होता हे उघड होतं.

अ‍ॅलन रोझच्या ब्रिटीश मोहीमेतील गिर्यारोहकांची प्रगती फारच धीम्या गतीने सुरू होती. स्वतः अ‍ॅलन रोझ उत्कृष्ट आणि अनुभवी गिर्यारोहक असला तरीही प्रत्येक बाबतीत आपलं तेच खरं करण्याचा त्याचा अट्टाहास जॉन बॅरी आणि फिल बर्कला पटत नव्हता. जॉन पोर्टर आणि जिम हर्ग्रीव्हज् यांच्यापुढे वेगळीच समस्या उभी राहीली होती. जॉन पोर्टरला लवकरात लवकर लंडनला न परतल्यास नोकरी गमावण्याची वेळ येणार होती ! जिम हर्ग्रीव्हज् ही नेमका त्याच कात्रीत सापडला होता. निरूपायाने अखेर दोघांनी मोहीम सोडून परत फिरण्याचा निर्णय घेतला ! ब्रिटीश तुकडीची गळती सुरु झाली !

२ जुलैला पोर्टर-हर्ग्रीव्हज् यांनी बेस कँपहून परतीच्या प्रवासाला सुरवात केली.

पुढील ४-५ दिवसात ब्रिटीश तुकडीने ७४०० मी पर्यंत चढाई केली. अ‍ॅल आणि एड बर्जेसचा त्याच्यापुढे जाण्याचा बेत मात्र निसर्गाने उधळून लावला. सतत बदलत असलेल्या हवामानापुढे अखेर त्यांना हार पत्करावी लागली. सर्वजण बेस कॅंपच्या मार्गावर असताना बर्जेस द्वयीच्या सूचनेचा अ‍ॅलन रोझ विचार करत होता. पूर्ण विचाराअंती त्याने त्यांच्या सूचनेप्रमाणे उत्तरेकडून चढाईचा बेत रद्द करून अ‍ॅब्रझी स्परमार्गे चढाईची योजन आखली !

ब्रिटीश मोहीमेतील गिर्यारोहक बेस कँपवर परतले.

जेर्झी कुकुच्झ्का आणि तडेउस्झ पिट्रोवस्की यांनी ४ जुलैला साऊथ फेसवरून चढाईच्या आपल्या धोकादायक मोहीमेला सुरवात केली. कुकुच्झ्का एक उत्कृष्ट गिर्यारोहक होता. त्याच्यात आणि रेनॉल्ड मेसनरमध्ये ८००० मी उंचीवरील सर्व १४ हिमशिखरं चढण्याची जणू शर्यत लागली होती. के २ च्या चढाईनंतर कुकुच्झ्का मेसनरपेक्षा केवळ एक शिखर मागे राहणार होता.

इटालियन मोहीमेतील सहा गिर्यारोहक ७ जुलैला के २ वर चढाई करण्यात यशस्वी झाले होते !
गिन्नी काल्कॅग्नो, तुलीओ विडोनी, सोरो डोरोटी, मार्टीमो मोरेटी, झेक गिर्यारोहक जोसेफ रान्कोकाज आणि फ्रेंच गिर्यारोहक बेनॉईट शामॉक्स यांनी शिखर गाठलं होतं ! जोसेफ रान्कोकाजने १९८३ मध्ये उत्तरेच्या मार्गाने चढाई केली होती. के २ वर दोन वेळा चढाई करणारा तो पहिला गिर्यारोहक ठरला होता. परंतु सर्वात नेत्रदीपक पराक्रम केला होता तो बेनॉईट शामॉक्सने !

अ‍ॅब्रझी स्परवरून अवघ्या २३ तासात त्याने शिखर गाठलं होतं !

डॉ. कार्ल हेर्लींगकॉफ्फरच्या मोहीमेतील बेडा फ्रस्टर आणि रोल्फ झेम्प यांनीही इटालियन मोहीमेच्या जोडीनेच अ‍ॅब्रझी स्परमार्गे के २ चा माथा गाठला होता.

वेगाने चढाई करत कुकुच्झ्का आणि पिट्रोवस्की ७ जुलैला ८२०० मी उंचीवरच्या आपल्या शेवटच्या कँपवर पोहोचले. हा शेवटचा कँप अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गावरच्या शेवटच्या उतारापासून सुमारे पंचवीस मीटर खाली उभ्याच्या उभ्या दगडी पायरीच्या खाली होता.

८ जुलैच्या सकाळी शेवटच्या कँपमधून त्यांनी आपल्या अंतिम चढाईला सुरवात केली. पंचवीस मीटरची ती दगडी भिंत चढून जाण्यास त्यांना जवळपास सगळा दिवस लागला. संध्याकाळच्या सुमाराला तुफान वा-यात आणि दृष्यमानता कमी असताना अखेरीस ते के २ च्या माथ्यावर पोहोचले. मेसनरने आत्महत्येचा मार्ग असं वर्णन केलेल्या वाटेने त्यांनी यशस्वी चढाई केली होती ! शिखरापासून ३०० मी खाली ८३०० मी वर रात्री त्यांनी बायव्हॉक केला.

९ जुलैच्या दुपारपर्यंत अ‍ॅब्रझी स्परमार्गे बॉटलनेक उतरून ते ७९०० मी वरच्या शेवटच्या कँपवर पोहोचण्यात यशस्वी झाले. मात्र गेल्या ३ दिवसात अन्न-पाण्याचा अभाव आणि उघड्यावरच्या मुक्कामाने त्यांची शारिरीक अवस्था बरीच कठीण झाली होती.

१० जुलैला कोरीयन मोहीमेतील कँप ३ च्या शोधात ते खाली उतरत होते. कुकुच्झ्का खाली उतरत होता. पिट्रोवस्की त्याच्या वर होता. एका विशीष्ट घळीतून उतरत असताना कुकुच्झ्काच्या खांद्यावर अचानक काहीतरी येऊन आदळलं. ती वस्तू काय आहे हे ध्यानात येताच कुकुच्झ्का हादरून पाहत राहीला.

तो पिट्रोवस्कीचा क्रॅम्पॉन होता !

पहिल्या क्रॅम्पॉनपाठोपाठ काही सेकंदातच दुसरा क्रॅम्पॉनही सणसणत त्याच्या बाजूने खाली गेला !

दोन सेकंदातच पिट्रोवस्की घसरून कुकुच्झ्कापासून काही अंतरावरून घसरत खालच्या दरीच्या दिशेने दिसेनासा झाला ! आईस एक्सच्या सहाय्याने आपली घसरण थांबवण्याचा त्याचा प्रयत्न दुर्दैवाने अयशस्वी ठरला होता !

कुकुच्झ्का कोरीयन मोहीमेतील कँप ३ वर पोहोचण्यात अखेर यशस्वी झाला.

कर्ट डिअ‍ॅम्बर्गर आणि जुली टुलीसही इटालियन मोहीमेतील गिर्यारोहकांबरोबरच शेवटच्या कँपवर पोहोचले होते. इटालियन गिर्यारोहकांच्या चढाईचं चित्रीकरण केल्यावरही ते अद्याप बेस कँपवर परतले नव्हते ! १० जुलैला अखेर वादळाशी मुकाबला करत दोघं बेस कँपवर परतले.

पिट्रोवस्कीच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का बसलेला जेर्झी कुकुच्झ्का १२ जुलैला बेस कँपवर परतला. 'आत्महत्येच्या मार्गा' वरील त्याची चढाई यशस्वी ठरली असली तरी पिट्रोवस्कीच्या मृत्यूने त्याला गालबोट लागलं होतं.

रेनाटो कॅसारॉट्टोने आतापर्यंत दोन वेळा नैऋत्येच्या मार्गाने ८२०० मी पर्यंत मजल मारलेली होती. मात्र दोन्ही खेपेला खराब हवामानामुळे त्याला बेस कँपवर परत यावं लागलं होतं. १३ जुलैला आपल्या शेवटच्या चढाईला त्याने सुरवात केली ! झपाट्याने चढाई करत तो १४ तारखेला दुपारी आपल्या अखेरच्या कँपवर पोहोचला होता !

अ‍ॅलन रोझच्या ब्रिटीश मोहीमेने १५ जुलैला अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गाने इतरांची नजर चुकवून चढाईला सुरवात केली ! अ‍ॅल आणि एड बर्जेसने कँप १ गाठून कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांच्या रिकाम्या तंबूत मुक्काम ठोकला. त्यांच्यापाठोपाठ अ‍ॅलन रोझ आणि डेव्ह विल्कीन्सन आणि जॉन बॅरी आणि फिल बर्कही कँप १ वर पोहोचले !

रेनाटो कॅसारॉट्टोचा तिसरा प्रयत्नही अयशस्वी ठरला होता ! ८३०० मी उंचीवर वेगाने वाहणारे वारे आणि स्नोफॉलमुळे नाईलाजाने त्याला परत फिरावं लागलं !

१६ जुलैच्या पहाटे बर्जेस द्वयीने पुढच्या चढाईस सुरवात केली. हाऊस चिमनीचा अडथळा ओलांडून ते कोरीयन मोहीमेच्या कँप २ वर पोहोचले. कँप २ वर न थांबता त्यांनी ब्लॅक पिरॅमीडचा पायथा गाठला. मात्र स्नोफॉल सुरू झाल्याने अखेर माघार घेण्यावाचून गत्यंतर नव्हतं ! एड आणि अ‍ॅलने कुठेही न थांबता संध्याकाळी पाचच्या सुमाराला थेट बेस कँप गाठला !

दुपारी साडेचारच्या सुमाराला कर्ट डिअ‍ॅम्बर्गर बेस कँपवरून नैऋत्येच्या मार्गावरून नेग्रोटो कोलच्या दिशेने उतरणा-या गिर्यारोहकाचं निरिक्षण करत होता. ग्लेशीयरपासून अगदी जवळ शेवटच्या उतारावर असताना तो गिर्यारोहक अचानक लुप्त झाला ! तो गिर्यारोहक बर्फाच्या कपारीत ( क्रिव्हाईस ) मध्ये पडल्याचं कर्टच्या अनुभवी नजरेने एका क्षणात ओळखलं. तो गिर्यारोहक कोण होता ? कॅसारॉट्टो का दुसरा कोणी ?

डिअ‍ॅम्बर्गरने कॅसारॉट्टोचा तंबू गाठून गॉरेटाची गाठ घेतली. रेनाटो नेमका कुठे आहे याची तिला कल्पना नव्हती, पण तो परत बेस कँपवर उतरत होता याची तिला कल्पना होती ! त्यांचं संभाषण सुरू असतानाच रेडीओवर संदेश आला,

" गॉरेटा, मी क्रिव्हाईस मध्ये पडलो आहे ! " रेनाटो बोलत होता, " ताबडतोब कोणाला तरी मदतीला पाठव !"

रेनाटोच्या संदेशाने बेस कँपवर खळबळ माजली. डिअ‍ॅम्बर्गर, जुली टुलीस, गिन्नी काल्कॅग्नो आणि अद्यापही बेस कँपवर असलेली वांडा ऋत्कीविझ यांनी वेगाने चढाई करून ती कपार गाठली.

रेनाटो सुमारे ४० मी कपारीत कोसळला होता. परंतु तो पूर्ण शुध्दीवर होता ! रेडीओवरून त्याने अनेकदा गॉरेटाशी संपर्क साधला होता. इतर सर्वांना तो कपारीच्या तळाशी बसलेला दिसला ! त्याला कोणतीही विशेष दुखापत झाल्याचं जाणवत नव्हतं. मात्रं आपलं डोकं बधीर होत असल्याची त्याने डिअ‍ॅम्बर्गरकडे तक्रार केली ! डिअ‍ॅम्बर्गर आणि काल्कॅग्नोने त्याला दोराच्या सहाय्याने कपारीतून वर खेचून काढलं.

जुली टुलीस बेस कँपवर परतली होती. तिच्या विनंतीवरुन जिम करन, डॉ. बेव्ह आणि फिल बर्क गरम कपडे, स्टोव्ह आणि ऑक्सीजन घेऊन क्रिव्हाईसच्या दिशेने निघाले. क्रिव्हाईसच्या दिशेने जाताना जिम करन एका दुस-या कपारीत जवळ-जवळ कोसळला होता ! पण सुदैवाने बर्कने वेळीच त्याला खेचून घेतलं. काही वेळातच तिघंही कपारीच्या काठी असलेल्या गिर्यारोहकांजवळ पोहोचले, परंतु त्यांना उशीर झाला होता !

कपारीतून वर आल्यावर काही क्षणातच कॅसारॉट्टो बेशुध्द होऊन कोसळला होता. काल्कॅग्नो आणि डिअ‍ॅम्बर्गर त्याला शुध्दीवर आणण्याच्या प्रयत्नात असतानाच कॅसारॉट्टोने शेवटचा श्वास घेतला होता !

कॅल्कॅग्नोने रेडीओवरुन बेस कँपशी संपर्क साधला. इटालियन मोहीमेचा बेस कँप मॅनेजर ऑगस्टीनोला त्याने रेनाटोच्या दु:खद निधनाची बातमी दिली. गॉरेटाला ही अप्रिय बातमी सांगण्याचं काम त्याच्यावर आलं.

रेनाटोच्या मृतदेहाचं काय करायचं हा मोठा प्रश्न सर्वांपुढे होता. त्यांच्यापुढे दोन पर्याय होते. एक म्हणजे ज्या क्रिव्हाईसमधून रेनाटोला बाहेर काढण्यात आलं होतं, तिथेच त्याचा मृतदेह पुन्हा सोडणं किंवा बेस कँपवर त्याचा मृतदेह आणून गिल्के स्मारकाजवळ रितसर दफन करणं. अर्थात गिल्के स्मारकापर्यंत मृतदेह नेणं हे देखील कठीणच होतं.

ऑगस्टीनोचा कॅल्कॅग्नोला संदेश आला. क्रिव्हाईसमध्ये रेनाटोचं दफन करण्यास गॉरेटाने मान्यत दिली होती. मात्र आपल्या नव-याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ती वर येण्याच्या तयारीत होती !

एकेक करून सर्वजण बेस कँपवर परतले. गॉरेटाची वाट पाहत कॅल्कॅनो आणि डॉ. बेव्ह रेनाटोच्या मृतदेहापाशी थांबले होते. मात्र डीअ‍ॅम्बर्गर आणि करन खाली आल्यावर गॉरेटाने आपल्या पतीच्या अंत्यदर्शनाला जाण्याचा बेत रहीत केला. रेनाटोचा मृतदेह कपारीत सोडून कॅल्कॅग्नो आणि बेव्ह बेस कँपला परतले. रेनाटोची आठवण म्हणून त्याचं रिस्टवॉच बेव्हने गॉरेटासाठी आठवणीने आणलं होतं.

१७ जुलैला गॉरेटाने मोहीम आवरुन परतीचा निर्णय घेतला. हेर्लीगकॉफ्फरच्या मोहीमेतील उरलेल्या गिर्यारोहकांनीही मोहीम आवरती घेतली. के २ पाठोपाठ ब्रॉड पीकवर चढाईचा वांडा ऋत्कीविझची योजना होती. पण तिनेही अखेर परतीचा मार्ग पत्करला. ती म्हणते,

" आतापर्यंत जवळच्या मित्रांपैकी इतक्या जणांच्या मृत्यूने माझी ब्रॉड पीकवर चढाईची ईच्छा राहीली नव्हती."

रेनाटो कॅसारॉट्टोच्या मृत्यूने कर्ट डिअ‍ॅम्बर्गरलाही धक्का बसला होता. तो म्हणतो,

" रेनाटो एक अनुभवी गिर्यारोहक होता. दिवसाच्या या वेळी जेव्हा ग्लेशीयरखाली सर्वात जास्त हालचाल होत असते, त्याने खाली उतरण्याचा निर्णय घेणं हे अनाकलनीय आहे ! आणखीन तास-दोन तास तो थांबला असता तर सुरक्षीतपणे बेस कँपवर पोहोचला असता !"

शिखराजवळ अतिशय काळजीने हालचाली करणारे गिर्यारोहक अनेकदा बेस कँपच्या परिसरात काहीसे बेफीकीरीने वागतात. वास्तवीक बेस कँपच्या ग्लेशीयर्सखाली अनेकदा धोकादायक कपारी असतात. ग्लेशीयरची थोडीशी हालचालही अशा वेळेस धोकादायक ठरू शकते.

अ‍ॅलन रोझच्या ब्रिटीश तुकडीतील गिर्यारोहकांनाही आता परतीचे वेध लागले होते. फिल बर्कला आपल्या नोकरीवर तातडीने परतणं आवश्यक होतं. अ‍ॅल बर्जेसला श्रीनगर गाठायचं होतं. आपल्या गर्लफ्रेंडसह काही दिवस काश्मीरमध्ये ट्रेकींग केल्यावर तो एव्हरेस्टच्या मोहीमेवर जाणार होता ! एड बर्जेसला १२ ऑगस्टच्या आत लंडनला परतणं आवश्यक होतं. जॉन बॅरीच्याही नोकरीचा प्रश्न होता.

२० जुलैला अ‍ॅल बर्जेस आणि बर्कने बेस कँप सोडला आणि परतीच्या प्रवासाला सुरवात केली.

त्याच दिवशी कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहक चढाईच्या सरावात गुंतलेले असताना गुडविन-ऑस्टेन ग्लेशीयरच्या वर अ‍ॅब्रझी स्परवर त्यांना एक मृतदेह आढळून आला.

लिलेन बराड !

सुमारे महिन्याभरापूर्वी अदृष्य झालेल्या लिलेनचा मृतदेह मिचेल पार्मेंटिअरने तिला शेवटचं पाहीलेल्या ८३०० मी उंचीच्या तब्बल ३००० मी खाली आढळला होता ! खाली कोसळल्याने तिचा मृत्यू झाला की अ‍ॅव्हलाँचमध्ये तिचा मृतदेह खाली आला होता हे कळणं मात्र सर्वस्वी अशक्य होतं.

२१ जुलैच्या सकाळी हेलीकॉप्टर बेस कँपवर अवतरलं. गॉरेटाला बेस कँपवरून स्कार्डूला नेण्याची डिअ‍ॅम्बर्गरने व्यवस्था केली होती.

जुलैच्या अखेरीस ब्रिटीश मोहीमेतील अ‍ॅलन रोझ आणि जिम करन वगळता सर्वांनी परतीचा मार्ग पत्करला होता. रोझ मात्र के २ वर इतक्या सहजासहजी हार मानण्यास तयार नव्हता.

" आतापर्यंत तीन मोहीमांत मिळून मी चार महिने या बेस कँपवर घालवले आहेत !" रोझ करनला म्हणाला, " आणखी एक प्रयत्न केल्याशिवाय मी इथून हालणार नाही !"

बेस कँपवर जानुस्झ माजरच्या पोलीश तुकडीशी रोझची गाठ पडली. पोलीश मोहीमेत जानुस्झ माजरव्यतिरिक्त वोसिच व्रोज, झेम्यस्लाव पिसेकी आणि झेक गिर्यारोहक पीटर बोझीकचा समावेश होता. अ‍ॅना झरविन्स्का, क्रिस्टीना पामोवस्का आणि डोब्रोस्लावा म्योडोविच्झ-वोल्फ या महिला गिर्यारोहकांचाही पोलीश मोहीमेत सहभाग होता.

अम्रेरिकन मोहीम आणि कॅसारॉट्टोप्रमाणेच नैऋत्य वाटेने के २ वर चढाईचा पोलीश तुकडीचा बेत होता. मात्र स्मॉलीच, पेनींग्टन आणि कॅसारॉट्टोच्या मृत्यूमुळे हबकलेल्या डोब्रोस्लावा म्योडोविच्झ-वोल्फला अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गाने के २ वर चढाई करणं जास्त संयुक्तीक वाटत होतं. स्वतः वोल्फ अनुभवी गिर्यारोहक होती. १९८५ साली नंगा पर्वत आणि १९८४ मध्ये ब्रॉड पीक दोन्हीच्या शिखरापासून अगदी थोड्या अंतरावरुन तिला परत फिरावं लागलं होतं.

रोझ आणि वोल्फ यांनी अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गाने चढाईचा निर्णय घेतला. पोलीश तुकडीतील इतर गिर्यारोहक मात्र नैऋत्येच्या मार्गाने चढाई करण्यावर अद्यापही ठाम होते. पोलीश मोहीमेचा प्रमुख जानुस्झ माजरने करनला बेस कँप मॅनेजर म्हणून काम करण्याविषयी विचारल्यावर करनने होकार दिला.

२९ जुलै

रात्रीच्या जेवणानंतर रोझ आणि वोल्फ अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गाला लागले होते. मध्यरात्रीनंतर जानुस्झ, व्रोझ, पिसेकी, बोझीक, झरविन्स्का आणि पामोवस्का यांनी नैऋत्येच्या वाटेने चढाईला सुरवात केली होती. कर्ट डिअ‍ॅम्बर आणि जुली टुलीसही अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गावर होते. आल्फ्रेड इमित्झरच्या ऑस्ट्रीयन मोहीमेतील गिर्यारोहकही अ‍ॅब्रझी स्परवर होते आणि दक्षिण कोरीयनांचाही त्याच मार्गाने चढाईचा बेत होता !

३० जुलै

बेस कँपमध्ये असलेल्या जिम करनला संध्याकाळी जानुस्झ माजरचा रेडीओ संदेश आला. पूर्वी ठरलेल्या योजनेप्रमाणे व्रोझ, पिसेकी आणि ब्रोझीक यांनी कँप १ वर न थांबता वर चढाई करून कँप २ गाठला होता. माजर, झरविन्का आणि पामोवस्का यांनी कँप १ वर मुक्काम ठोकला होता. एकंदर चढाईचा विचार करून एकाच वेळी सहा गिर्यारोहकांनी चढाई न करता एक दिवसाच्या अंतराने चढाईचा माजरचा बेत होता. अत्यंत कठीण असलेल्या मार्गावर एकतर एकाच जागी गर्दी टाळणं आणि गरज पडल्यास सुरक्षीत माघार घेण्याच्या दृष्टीने त्याची योजना योग्य होती.

१ ऑगस्ट

३१ जुलैच्या संध्याकाळी करनची ऑस्ट्रीयन मोहीमेतील दोन गिर्यारोहकांची गाठ पडली. ते कँप २ वरून नुकतेच बेस कँपवर परतले होते. अ‍ॅब्रझी स्परवरच्या हवामानाविषयी ते निराश दिसत होते. मात्र हवामान हळूहळू सुधारण्याच्या मार्गावर होतं.

बेकायदेशीरपणे अ‍ॅब्रझी स्परच्या मार्गाला लागलेले रोझ आणि वोल्फ एव्हाना कँप २ पार करून वर पोहोचल्याची खात्री झाल्याने जिम करन तसा निर्धास्त होता. दक्षिण कोरीयन तुकडीचा प्रमुख किम जूम कडून कोरीयन मोहीमेत कँप २ पर्यंत गिर्यारोहकांचा राबता असल्याचं कळल्यावर करनने रोझ-वोल्फच्या चढाईची बातमी जूमला दिली. जूमला त्यांच्या या बेताची गंमत वाटली. मात्र जूमच्या तुकडीतील कोणाचीही त्यांच्याशी गाठ पडल्याचा रेडीओ संदेश आला नव्हता !

पोलीश मोहीमेतील व्रोझ, पिसेकी आणि ब्रोझीक यांनी ८००० मी उंचीवरील आपला शेवटचा कँप ४ गाठला होता ! माजर, झरविन्का आणि पामोवस्का हे त्रिकूट कँप ३ वर पोहोचलं होतं. आतापर्यंत त्यांची प्रगती पाहता दोन दिवसात सर्व गिर्यारोहक के २ च्या माथ्यावर पोहोचणार याची कोणतीच शंका नव्हती !

डिअ‍ॅम्बर्गर, टुलीस आणि उरलेले तीन ऑस्ट्रीयन गिर्यारोहक - आल्फ्रेड इमित्झर, हॅन्स विसर आणि विली बोर यांची कोणतीही खबर अथवा एकही रेडीओ संदेश आला नव्हता !

२ ऑगस्ट

व्रोझ, पिसेकी आणि ब्रोझीक यांनी ८००० मी वरील आपल्या अखेरच्या कँपवरून शिखरावरील अंतिम चढाईला सुरवात केली होती !

सकाळी कोरीयन गिर्यारोहकांकडून जिम करनला रोझ आणि वोल्फ बेस कँपवर परतत असल्याचा संदेश मिळाला ! कोरीयन गिर्यारोहकांच्या संदेशानुसार रोझ आणि वोल्फ आदल्या रात्री कँप २ वर होते आणि आता बेस कँपच्या दिशेने खाली उतरत होते.

ही बातमी मिळताच करन गरमागरम कॉफी घेऊन रोझ आणि वोल्फच्या परतीच्या वाटेवर त्यांना गाठण्यासाठी निघाला, पण दुपारी ३.३० पर्यंत वाट पाहूनही त्याला पर्वतावरून उतरणारा एखादा लहानसा ठिपकाही दिसला नाही.

कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांच्या इंग्लीश भाषेच्या अगाध ज्ञानामुळे काहीतरी घोटाळा झाला होता !

दुपारी उशीरा माजर, झरविन्का आणि पामोवस्का हे ८१०० मी वरील शेवटच्या कँपवर पोहोचले होते. दुस-या दिवशी सकाळी शिखरावर अंतिम चढाईची त्यांची योजना होती. मात्र सकाळी शिखरावर अंतिम चढाईला सुरवात केलेल्या व्रोझ, पिसेकी आणि ब्रोझीक यांच्याकडून मात्र कोणताच संदेश आला नव्हता !

रोझ आणि वोल्फ कँप ४ वर पोहोचले होते. त्यांची डिअ‍ॅम्बर आणि टुलीस यांच्याशी गाठ पडली होती ! त्यांच्या जोडीला किम चँग सून, जँग बाँग वान आणि जँग ब्याँग हो हे कोरीयन गिर्यारोहकही होते ! आल्फ्रेड इमित्झर, विली बोअर आणि हान्स विसर हे ऑस्ट्रीयन गिर्यारोहकही कँप ४ वर पोहोचले होते.

दुस-या दिवशी पहाटेच शिखरावर अंतिम चढाईचा त्यांचा विचार होता !

व्रोझ, पिसेकी आणि बोझीक यांना वादळामुळे शिखरावर पोहोचणं अशक्य झालं होतं. शिखरापासून अवघ्या ३०० मी खाली त्यांनी मुक्काम ठोकला होता !

अ‍ॅलन रोझची के २ वरची तिसरी मोहीम अखेर यशस्वी होणार होती का ??
कर्ट डिअ‍ॅम्बर्गर आणि जुली टुलीस त्यांच्या ' माऊंटन ऑफ माऊंटन्स ' असलेल्या के २ च्या शिखरावर चढण्यात यशस्वी होणार होते का ?
ऑस्ट्रीयन आणि कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहक माथ्यावर पोहोचणार होते का ?
नैऋत्येच्या कठीण मार्गाने चढाई करणा-या पोलीश गिर्यारोहकांना यश येणार होतं का ?

काही दिवसांतच या प्रश्नांची उत्तरं मिळणार होती.

क्रमश :

सॅव्हेज माऊंटन - २                                                                                                            सॅव्हेज माऊंटन - ४

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक प्रश्न पडतो कायम. परदेशात या गिर्यारोहकांना किंवा त्यांच्या मोहीमांना इतके स्पॉन्सरर्स मिळतात कां?

आऊटडोअर्स,
काही मोहीमा या गव्हर्मेंट अथवा कोणत्या ना कोणत्या संस्थेने अथवा चॅनलने स्पॉन्सर केलेल्या असतात, परंतु अनेकदा गिर्यारोहक स्वतःच्या खिशातून पैसे भरुन जातात.