.... भेट ....

Submitted by मिलिंद महांगडे on 28 December, 2013 - 01:47

" हो ... हो... मी निघतो ताबडतोब " दादासाहेबांनी फोन खाली ठेवला, पलीकडुन जी बातमी आली ती डोकं सुन्न करणारी होती हे त्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावरुन कळत होतं. थोडा वेळ ते तसेच बसुन राहीले. नंतर भानावर आल्यावर तत्काळ ड्रायवरला गाडी काढायला सांगितली. दुसरा फोन लावला, " Mery , cancel todays all meetings and appointments... i am leaving.... " बोर्ड मिटींग बाबत आणखी काही सुचना देऊन त्यांनी फोन ठेवला. आपल्या केबिनमधुन जवळ जवळ धावतच ते बाहेर पडले. दादासाहेब अचानक बाहेर आलेले पाहुन इतर सगळ्या स्टाफची चांगलीच भंबेरी उडाली. हातातली कामे जशीच्या तशी टाकुन धडपडत सगळे उभे राहीले. पण दादासाहेबांचं मात्र तिकडे लक्षच नव्हतं. सगळे काहीशा आश्चर्याने एकमेकांकडे पहात होते. दादासाहेब घाईघाईने बाहेर आले, तोपर्यंत ड्रायवर ने गाडी तयार केली. " साताऱ्याला जायचंय... शक्य तितक्या लवकर ...." गाडीत बसता बसता ते ड्रायवरला म्हणाले. दादासाहेब गाडीत बसल्यावर ड्रायवरने लगेचच गाडी स्टार्ट केली. गाडी निघाली.… एसी फुल असुनही त्यांना अस्वस्थ वाटु लागले. अंगातला कोट काढुन ठेवला, आणि टायची नॉट सैल केल्यावर आता त्यांना थोडे बरे वाटु लागले. डोळ्यांवरचा चश्मा काढुन शर्टच्या खिशात टाकला, कपाळावर जमा झालेले घामाचे टपोरे थेंब खिशातल्या रुमालाने पुसुन ते सिटला मागे रेलुन बसले. दादासाहेब... अनुसया कन्स्ट्रक्शन्स कंपनीचे मालक. वय वर्ष ६३, पण एखाद्या तरुणाला लाजवील असा त्यांचा उत्साह होता, त्यांचं काम होतं.… ३० वर्षापुर्वी त्यांनी गाव सोडलं आणि सरळ मुंबई गाठली. त्यांच्या महत्वाकांक्षा फक्त आणि फक्त मुंबई पुर्ण करु शकेल, अशी त्यांची पक्की खात्री होती. आणि त्यात ते यशस्वीही झाले. आता ते एक बडी असामी म्हणुन ओळखले जात होते. आपल्या मुळ गावाशी तसा त्यांचा फारसा संबंध राहीला नव्हता. गावात त्यांचं वडीलोपार्जित घर होतं पण अण्णा, म्हणजेच दादासाहेबांचे वडील वारल्यानंतर चुलत्यांनी ते बळकावलं. आणि गावाशी जोडलेली त्यांची एकमेव नाळच तुटली. काही नातेवाईक होते पण ते मनाने दुर झाल्याने नसल्यातच जमा होते. जवळपास, दहा बारा वर्ष ते गावाकडे फिरकले नव्हते. आणि आज अचानक ते तडकाफडकी गावाला जायला निघालेही... त्याचं कारण होतं, सदाशिव शिर्के.... " तो अतिशय सिरीयस आहे, आणि केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. तु लवकर निघ… " मघाशी आलेल्या गणप्याच्या फोनमुळे ते अतिशय अस्वस्थ झाले होते. कामातलं त्यांचं लक्ष उडालं. सगळं काही सोडुन ते साताऱ्याला निघाले. दादासाहेब, सद्या आणि गणप्या हे तिघेही बालपणीचे जिवश्च कंठश्च मित्र... हे त्रिकुट सगळ्या गावात प्रसिद्ध होतं. तिघेही जाम मस्तीखोर... लहानपणापासुन एकत्र... त्यात दादासाहेबांना आई नसल्याने सद्याच्या आईनेच त्यांचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. त्या दोघांबरोबर गणप्याही असायचा. त्यामुळे त्याचीही काळजी ती माऊली घेत असे. गणप्या त्याच्या स्वतःच्या घरी कमी आणि सद्याच्या घरीच जास्त असायचा. पहील्या पावसाच्या वेळी जसे संध्याकाळी अचानक आकाशात जसे काळे ढग जमा होतात तशा चाळीस पंचेचाळीस वर्षापुर्वीच्या आठवणी दादासाहेबांच्या मनात जमा होऊ लागल्या. गाडी आता मुख्य रस्त्याला लागली. ते थंड नजरेने गाडीच्या काचेतुन बाहेर पाहु लागले. रस्त्याच्या बाजुची झाडे, घरे वेगाने मागे जाऊ लागली तसे त्यांचे विचारही त्याच वेगाने काळाच्या मागे जाऊ लागले.…
" सद्या, मला लई भिती वाटतीय ... मी नाय जाणार पाण्यात, बुडलो बिडलो तर ...? " लंगोट घातलेली स्वतःचीच लहानपणीची प्रतिमा दादासाहेबांच्या डोळ्यापुढे उभी राहीली. " आरं यडा का काय तु…? मी असताना तु कसा बुडशील....? ते तिकडं बग लहान पोरगं कसं पवतंय.... " आपण तिकडे बघायच्या नादात असतानाच सद्याने आपल्याला पाण्यात ढकलुन दिले होते. दोन चार गटांगळ्या खाल्ल्यावर आपण पार बुडणार तेव्हा कुठं सद्याने पाण्यात उडी टाकली आणि आपल्याला बाहेर काढलं. त्यावेळी रागाच्या भरात आपण खच्चुन दिलेली शिवी ... आणि सद्याचं निर्लज्ज हास्य तस्संच्या तस्सं दादासाहेबांच्या कानात घुमलं.... पण त्याच्यामुळेच आपण पोहायला शिकलो. सुर मारायला, विहीरीच्या तळाशी टाकलेला रुपया बुडी मारुन वर काढायला, त्यानेच शिकवले होते..... झाडावर चढण्यात सद्या आणि गणप्या पटाईत होते. आपल्याला मात्र ते लाख प्रयत्न करुनही शेवटपर्यंत जमलं नाही..... गणप्या झाडावरुन म्हव - ( मधाची पोळी ) काढायचा... रानात गेल्यावर कधीही रिकाम्या हातांनी आपण परत आलो नाही. पण एकदा एका आगीम्हवाने गणप्याला असा फोडला की त्याचं तोंड पुरीसारखं फुगलं होतं. सद्याच्या आईने कसलंतरी तेल लावलं तेव्हा कुठे कमी झालं होतं. पण गणप्या तेच तोंड त्याच्या घरी घेऊन गेला आणि पुन्हा तोंड सुजवुन आला, तेव्हा सद्या आणि आपण किती हसलो होतो त्याला ..... ते आठवुन आत्ताही दादासाहेबांच्या चेहऱ्यावर हास्याची एक लकेर उमटलीच..... रात्री शाळेत अभ्यास करायला जातो असं सांगुन चोरुन पिक्चर बघायला तालुक्याला जायचो... एकदा शम्मी कपुरचा " राजकुमार " बघुन येत असताना मास्तरांनी पकडलं आणि नंतर तिघांनाही रांगेत उभं केलं पहीला गणप्याला फोडला. दुसरा सद्या , तिसरे आपण होतो ... मास्तरांनी हात पुढे करायला सांगितला ... जीव खाऊन मास्तरांनी पट्टी हातावर मारली... आणि आत्ताही दादासाहेबांनी दचकुन हात मागे घेतला... एक एक विचार त्यांच्या मनात प्रवेश करु लागला , नव्हे तर इतक्या वर्षांपूर्वीची चित्रफीतच त्यांच्या डोळ्यांसमोर येऊ लागली . तेवढ्यात दादासाहेबांचा मोबाईल वाजला. घाईघाईने त्यांनी तो उचलला, " हॅलो., हा बोल गणप्या,... हो हो .... निघालोय मी... वाटेतच आहे... सद्या कसा आहे....? " गणप्याने दिलेल्या उत्तराने त्यांची काळजी आणखीनच वाढली. त्यांनी ड्रायवरला गाडी जलद चालवण्यास सांगितले. अस्वस्थ मनाने ते पुन्हा बाहेर पाहु लागले. ' सद्या भावा ... मी येतोय.... ' दादासाहेब मनातल्या मनात म्हणाले. आपण पोहोचेपर्यंत सद्या व्यवस्थीत असु दे अशी त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली. गाडी सुसाट वेगात चालली होती पण दादासाहेबांचं मन गाडीपुढे धावत होतं. कधी एकदा गावात जातोय असं त्यांना झालं. अखेरच्या घटका मोजणाऱ्या , वेदनांनी पिळवटलेला सद्याचा चेहरा त्यांना दिसत होता... पण आता तरी निदान स्वस्थ बसण्यावाचुन काही पर्याय नाही हे त्यांच्या व्यवहारी मनाने त्यांना सांगितले. त्यामुळे पुन्हा ते गाडीच्या काचेबाहेर पाहु लागले.... आता दिवस मावळतीकडे झुकला होता. अस्ताला जाणारा लालबुंद सुर्य पाहुन तर त्यांचं मन आणखीनच खिन्न झालं...
" लेका दादु, तुला जर ती सुनी इतकी आवडती तर तु सांगुन का नाय टाकत...? " परमवीर कॉलेजच्या बाहेर असलेल्या अंबर बारमधे अशाच एका संध्याकाळी सद्या आपल्याला विचारत होता.
" विचारायला काय नाय रे, पन ती नाय म्हनली तर...? " आपण मनातली भिती बोलुन दाखवली होती.
" आरं नाय त नाय ... पन एकदा विचारलंस तर कळंल ना....? ती नाय तर दुसरी...." सद्या असं बोलल्यावर आपण गोंधळलो होतो. सुनीवर आपलं फार प्रेम होतं. अन् तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाच आपण केली नव्हती...
" गंमत केली रे.... खरं सांगु.? तिची पन लाईन हाय तुज्यावर.....बिन्दास विचार... तिच्या घरच्यांचा काय प्रॉब्लेम असंल तर पळवुन घेऊन जाऊ च्यामायला....!!! " सद्याने दिलेल्या धीरामुळेच आपण सुनीला विचारु शकलो.... आज सुनी असती तर तीही आली असती सद्याला बघायला... आयुष्यरुपी प्रवाहाने आजपर्यंत अनेक वळणे घेतली... सुरुवातीला उथळ असलेला हा प्रवाह आता अनुभव व पैसारुपी पाण्याने तुडुंब भरलेला आहे. पण सुरुवातीच्या उथळपणात जी मजा होती ती आताच्या संथ प्रवाहात नाही... दादासाहेब असा विचार करत असताना पुन्हा त्यांचा मोबाईल वाजला., " बोल गणप्या, .... मी पोचतोच अर्ध्या तासात... " आताच्या फोन नंतर तर दादासाहेबांचा धीर सुटत चालला... शेवटची हातघाईची लढाई व्हावी तसं काहीसं झालं. गाडी तिच्या सुसाट वेगात होती. समोरच्याला हॉर्न देत, ओव्हरटेक करत, इतर गाड्यांना कट मारत दादासाहेबांची कार चालली होती.... न सांगता ड्रायवरही त्याचे सर्व कौशल्य पणाला लावुन सुसाट गाडी चालवत होता. आता आणखी एक उजवे वळण घेतलं की गावाची वेस येणार होती. ती ओलांडली की जगन्नाथाचं देऊळ...! इतक्या वर्षांनंतर दादासाहेब गावात जात होते पण असं वाटत होतं की काल-परवाच गाव सोडुन आले आहेत... पुर्वीच्या लहानशा जगन्नाथाच्या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता... गावात डांबरी रस्ते आले ... घरोघरी टिव्ही आले होते व त्यावर त्याच रटाळ मालिका लागलेल्या दिसत होत्या ... गावात बाकी बराच बदल झालेला दादासाहेबांना दिसला ... त्यांची गाडी आता चावडीत शिरली ... ग्रामपंचायतीची दोन मजली इमारत नजरेत भरत होती... " इथुन सरळ घे, नंतर डावीकडे आणि नंतर उजवीकडे घे आणि समोर माडीवाल्या घरापाशी थांबव. " दादासाहेब ड्रायवरला सांगत होते... ते सांगतानाही त्यांचा स्वर कापरा झाला होता. आता सद्याचं घर अगदीच जवळ होतं ... काय चालु असेल तिथे ....? कसल्या अवस्थेत असेल तो ...? कल्पनाही करवत नव्हती .... त्याच विचारात दादासाहेब असताना सद्याच्या घरासमोर गाडी थांबली . गाडीच्या बाहेर आल्यावर आपल्या पायात त्राण उरले नसल्याचं दादासाहेबांना जाणवलं. " सद्या .... " जोरात हाक मारुन ते दारात उभे राहीले ... समोरचं दृष्य पाहुन ते जागच्या जागीच थबकले....आणि समोर पहातच राहीले..... " हा हा हा हा .... " समोरुन जोरदार हसण्याचा आवाज आला.... पाहतात तर समोर सद्या आणि गणप्या बसलेले .... हातात व्हीस्कीचे ग्लास .... समोर चखणा म्हणुन पापड, शेंगदाणे, मटणाचा रस्सा ठेवलेला... दादासाहेबांचा डोळ्यावर विश्वास बसेना. " अरे, काय हे ....? " अविश्वासाने त्यांनी विचारले....
" काय नाय.... पार्टी चालु आहे.... ये बस... गणप्या, साहेबांसाटी पेग तयार कर... " सद्या जणु काही झालंच नाही अशा आविर्भावात बोलत होता. ... दादासाहेबांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य अजुनही तसंच होतं.
" आरं ये की ... बस लेका .... दमुन आला आश्शील .... " गणप्या त्यांना बोलवत होता. आता मात्र दादासाहेबांच्या चेहऱ्यावरच्या आश्चर्याची जागा रागाने घेतली ...
" सद्या , हा काय पोरखेळ लावलाय ...? तू सिरियस आहेस , आणि असशील तसा निघून ये असा निरोप दिला ह्या गणप्याने …! मी माझ्या महत्वाच्या मिटींग्स् सोडुन एवढ्या लांब तातडीने आलोय .... वाटेत माझी काय अवस्था झाली माझी मलाच ठाऊक....! काय चाल्लय हे ? " दादासाहेब भलतेच भडकले.
" दादु, तु बिलकुल बी बदलला नाईस ... आज बी तसाच हाईस.…पन माफ कर यार आम्हाला ... राग मानू नकोस भावा … " सद्या पेगचा एक घोट घेत बोलला.
" सद्या , काय लेका हे... ! मी .... काय काय विचार माझ्या डोक्यात आले .... जाम घाबरलो होतो मी ....एक वेळ वाटलं की तुझी- माझी भेट होते की नाही. सगळ्या प्रवासात नुसते तुझेच विचार येत होते... तू कसा असशील …? काय झालं असेल …? ह्या विचारांनी माझं डोकं फिरलं … पण जाऊ दे... तु बरा आहेस ना.... बास... आता काय काळजी नाही …. " दादासाहेबांचा राग जसा आला तसा निघुन गेला... आणि तेही निवांतपणे त्या दोघांच्यात जाऊन बसले... गप्पा टप्पा सुरु झाल्या ... पेग पुन्हा भरले गेले... बालपणीचे किस्से पुन्हा निघाले... हास्याचा स्फोट झाला ... हसता हसता सद्याला जोराचा ठसका लागला... आणि त्याच्या हातातला ग्लास खाली पडला. गणप्या त्याला सावरायला धावला...
" सद्या , काय होतंय तुला ...? " दादासाहेब घाबरलेल्या सुरात म्हणाले... सद्याला सावरता सावरता गणप्याला रडु कोसळले.
" दादु, तुला फोन केला व्हता ते सगळं खरं हाय... सद्यानेच सांगितलं तसं करायला... दोस्ताचा निरोप घेतल्याशिवाय जाणार नाही, असं मला म्हणाला... त्याला कँसर झालाय... उद्या त्याला हॉस्पीटलात जायचंय... पन मला म्हनाला मी काय परत येत नाय म्हणुन दादुला बोलावुन घे... मी जायच्या वेळी आपण सगळे एकत्र असलो पाहिजे... " बोलता बोलता गणप्या रडु लागला... दादासाहेबांना काय बोलावं ते कळेना... क्षीण नजरेने त्यांच्याकडे पहात असलेल्या सद्याचा हात हातात घेऊन ते लहान मुलासारखे रडु लागले...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच

छान लिहिली आहे कथा - यातील बालपणाच्या बर्याच आठवणी आमच्या बालपणी केलेल्या कारामतीशी जुळतात .