डोंगराच्या कोंदणात लपलेले भीमाशंकर

Submitted by ferfatka on 25 December, 2013 - 05:02

भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे ‘भीमाशंकर’. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. निसर्गातील डोंगराच्या कोंदणात लपलेले हे मंदिर पाहण्याचा नुकताच योग आला त्या विषयी.....

DSCN5465.jpg

सरत्या वर्षाच्या चौथ्या रविवारी सकाळी संपूर्ण परिवारासह भीमाशंकरला जाण्याचा बºयाच वर्षांनी योग आला. मंचरमार्गे भीमाशंकरला अवघ्या अडीच तासात पोहचलो. येथील निसर्गरम्य परिसर, शांत वातावरणामुळे मन प्रसन्न झाले. भीमाशंकरचे मंदिर हे डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. इतर मंदिरांप्रमाणे या मंदिर डोंगरावर नसून डोंगराच्या कोंदणात असल्याने सुमारे ३०० ते ३५० पायºया उतरून मंदिरात जाता येते. गाडीतळावर गाडी पार्क करून मी खाली उतरायला सुरवात केली. दहाच मिनिटात मंदिरासमोर पोहोचला देखील. आईला जास्त चालता येत नसल्याने प्रथम आम्ही डोली करणार होतो. मात्र, डोलीवाल्याने ६०० रुपये सांगितल्यावर जमेल तेवढे चालून मग डोली करण्याचा विचार आईने केला. मंदिराच्या बाहेर ट्रॅक्स आलेली पाहून मला आश्चर्य वाटले. आजुबाजूला चौकशी केल्यावर गाडीतळाशेजारून एक कच्चा रस्ता मंदिरापर्यंत पोहोचतो असल्याचे समजले. मात्र गर्दीच्या वेळी हा रस्ता बंद असतो. कारण जायला व यायला अगदीच जेमतेम फोरव्हिलर बसेल एवढीच जागा मिळते. शिवाय कच्चा रस्ता, दगडधोंड्याचा असल्याने गाडीची वाट लागण्याचीही शक्यता आहे. आम्ही गेलो तेव्हा विशेष म्हणजे गर्दी नसल्यामुळे गाडीने आईला खाली घेऊन येण्यासाठी मी पुन्हा माघारी फिरलो. दहाच मिनिटात गाडीने मंदिरापाशी पोहाचलो.

गावाचे नाव ‘भीमाशंकर’

इतर स्थळांप्रमाणे या ठिकाणी पौराणिक गोष्टी व त्यावरून पडलेले या ठिकाणाचे नाव याही ठिकाणी आपल्याला ऐकावयास मिळते. पुराणात त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी येथे आले असता तेथे अयोध्येचा ‘भीमक’ नावाचा राजा तप करीत होता. शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्याने 'शंकराला आलेल्या घामाच्या धारांची नदी होऊ दे', असा वर मागितला व त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. दुसरी एक कथा अजून सांगितली जाते त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भागात फारच धुमाकूळ घातला होता. त्याचा नाश करण्यासाठी शंकरांनी प्रचंड असे भीमरूप धारण केले. अनेक रात्र चाललेल्या या युद्धात त्रिपुरासूराचा वध केला. शंकर घामाघूम होऊन येथील शिखरावर बसले. अंगातून निघणाºया घामाच्या धारेतून ‘भीमा’ नदी उत्पन्न झाली.

मंदिराविषयी :

DSCN5458.jpg

हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभाºयातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.

DSCN5470.jpgभीमाशंकरचा परिसर :

रायगड जिल्ह्यातील खांडस गावातून पायी चालत पुढे गणपतीघाट किंवा शिडीघाट रस्त्याने भीमाशंकरला येता येते, पण हा रस्ता फक्त अनुभवी व ट्रेकिंग करणाºयांसाठी आहे. येथून जवळच असलेला भंडारधरा, हरिश्चंद्रगड, शिवनेरी, चावंड, हडसर, आदी किल्यांमुळे तसेच अष्टविनायकातील ओझर, लेण्याद्री या तीर्थस्थानांमुळे पर्यटकांची गर्दी नेहमीच दिसून येते. मी १७ वर्षांपूर्वी ढाकचा बहिरी ते भीमाशंकर असा पावसाळा संपल्यानंतर पायी ट्रेक केला होता. जाम मजा आली होती. त्यानंतर आज पुन्हा हे मंदिर पाहण्याचा योग आला. त्यावेळचे डोळ्यासमोरील मंदिर व आजचे मंदिर यात खूपच फरक पडलेला दिसून आला.

DSCN5476.jpgवातावरण :

भीमाशंकर शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ३४५४ फूट म्हणजे सुमारे पाऊण मैल आहे. सह्याद्रीच्या या भागात उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात नको होईल एवढा धो-धो पाऊस व हिवाळ्यात हाडे गोठविणारी थंड बोचरी हवा या ठिकाणी असते. भीमाशंकरला पाऊस खूप पडतो. पावसाळ्यात डोळ्यांना तृप्त करणारा असा येथील निसर्ग असतो. आल्दादायक स्वच्छ वातावरणामुळे एकदा तरी आवश्यक भेट देण्याचे हे ठिकाण आहे हे निश्चित.

पशुपक्षी :

भीमाशंकरचे अभयारण्य अनेक जातींचे पक्षी तसेच अनेक प्रकारच्या वन्यजीवांचे घर आहे. वनसंपदा संरक्षित करण्यासाठी १९८५ पासून हा संपूर्ण परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. निर्सगाने या ठिकाणी मुक्त हस्ताने उधळण केलेली दिसून येते. नानाप्रकारचे पशुपक्षी, वेली, झाडे, औषधी वनस्पती खूप प्रमाणात दिसतात. रिठा, शिसम, आंबा, उंबर, हिरडा, बेहडा, रानजाई, रानतुळस, आपटा, आवळा, अडसुळा, डोंगरची काळी मैना असलेली करवंदे, जांभूळ या ठिकाणी आढळून येतात. मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी ही औषधी वनस्पती घेऊन विक्री करणारे दुकानदार पहावयास मिळतात. बहुधा हे लोक कातकरी, ठाकर, आदीवासी असतात. किरकोळ किंमतीला ते विविध रोगांवर ही औषधी वनस्पती विकतात. याच जोडीला पशुपक्षी देखील पहावयास मिळतात. भीमाशंकरचं प्रतीक म्हणून वैशिष्टयÞपूर्ण असलेला दुर्मिळ प्राणी म्हणजे ‘शेकरू’. महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून शेकरू ला महत्व आहे. छोट्या खारीची ही मोठी बहीणच. त्याचबरोबर बिबळ्या, भेकर, सांबर, चितळ, रानडुक्कर, ससे, कोल्हे, काळविट, मुंगुस, भेकर, सर्प या प्राण्यांबरोबरच सुतारपक्षी, दयाळ, पोपट, कोतवाल, जंगली कबुतरे, कोकीळ, तांबट, घुबड, मोर, खाटीक, चंडोल, रानकोंबडया, धनेश हे पक्षीही येथे पाहायला मिळतात.

‘वाहतूक कोंडीची समस्या’

भीमाशंकर आधीच धार्मिक स्थळ. त्यात सर्वसामान्य पर्यटकांप्रमाणे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींमुळे हे ठिकाण बाराही महिने गजबजलेले असते. मुख्य भीमाशंकरच्या एसटी स्टॅण्ड पार्किंगच्या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे व संपूर्ण रस्ता एकपदरी (वन वे) असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुककोंडी होत असते. बारा ज्योर्तिलिंगची सफर घडविणारे टुरिस्ट मोठ मोठ्या गाड्या या ठिकाणी घेऊन येतात. शाळांच्या सहली, ट्रेकिंग व आमच्यासारखे हौशी पर्यटक या ठिकाणी येऊन आणखीनच गर्दी वाढवतात. तेव्हा श्रावणातील सोमवार, महाशिवरात्र, त्रिपुरी पौर्णिमा व अन्य धार्मिक समारंभ सोडून या ठिकाणी आल्यास कदाचित गर्दी कमी सापडेल. अन्यथा ट्रॅफिक जॅमचा चांगलाच दणका पडल्याशिवाय राहणार नाही. या विषयीच्या बातम्या पेपरात अनेक वेळा झळकताना दिसतात.

भीमाशंकर भीमा नदीचे उगमस्थान :

महाराष्ट्रातील एक मुख्य नदी व पवित्र नदी म्हणून ओळखल्या जाणाºया भीमेचा उगम याचा भीमाशंकरच्या डोंगरातील ‘डाकिणीचे वन’ या भागात होतो. उगमस्थानापासून कृष्णा नदीला मिळेतेस्तोवर नदीची लांबी सुमारे ८६७ किमी एवढी भरते. 'भीमरथा', 'भीमरथी' ही या नावानेही तिला ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरला आल्यावर तिचे पात्र चंद्रकोरीच्या आकारासारखे दिसते. त्यामुळे तेथे ती ‘चंद्रभागा’ म्हणून ओळखली जाते. भामा, इंद्रायणी, वेळ, मुळा-मुठा, घोड, नीरा, माण, सीना आदी भीमेच्या उपनद्या आहेत. भीमेवर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात उजनी धरण बांधले आहे. नदी पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांतून पुढे विजापूर, गुलबर्गा या कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन कृष्णा नदीस मिळते.

भीमेवरील धरणे :

भीमा नदीवर एकुण बावीस धरणे बांधली आहेत. त्यात कुकडी, चासकमान, उजनी सारखी मोठमोठी धरणे आहेत. भीमेच्या कठावर अनेक मोठी तीर्थक्षेत्रे देखील आहेत.

कसे जावे :

पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातून तसेच नारायणगाव किंवा मंचरहून एसटी बसेस भीमाशंकरला जातात. पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण अंदाजे १२५ किलोमीटर भरते. सकाळी लवकर निघून संध्याकाळपर्यंत एका दिवसात पुण्यात येता येण्यासारखे हे स्थळ आहे. कर्जतहून या ठिकाणी येता येते. पोखरा घाटातून येताना लाल माती, अवघड वळण, काही ठिकाणी अरुंद रस्ते यामुळे गाडीत बसून डोके चांगले हालते. हेलकावे घेत, एकमेकांच्या अंगावर जात आपण भीमाशंकरला येऊन पोहचतो. गाडी पार्किंगची जागा अजून थोडी सुधारल्यास होणारा मनस्ताप कमी होऊ शकतो. भगवान शंकराचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो.
प्रशासनाचे कौतुक :

या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसून येते. अनेकवेळा पेपरात या संदर्भातील बातम्या वाचण्यास मिळतात. मी गेलो तेव्हा मंचर पासून ते भीमाशंकरपर्यंतचा संपूर्ण रस्ता डांबरीकरण केल्याने सुसह्य वाटला. वाटेत काहीच ठिकाणी थोडा रस्ता उखडला आहे पण तेवढे पाहिजेच नाही का? प्रशासनाने या ठिकाणी ‘प्लॅस्टिक’, कचरा न करण्याचे आवाहन केलेले जागोजागी लिहून ठेवलेले आहे. त्यासाठी रस्त्यात थांबून जेवणाचा आस्वाद घेणाºया पर्यटकांसाठी रस्त्याच्याकडेला कचरा टाकण्यासाठ आवश्यक त्या सोयी केलेल्या आहेत. एकूणच हे धार्मिक स्थळ इतर धार्मिक स्थळांपेक्षा जास्त स्वच्छ व निर्मळ वाटले हे नक्की.

कसे जावे :

पुणे - ना

  • शिक महामार्गावरून मंचर येथून भीमाशंकरकडे जाता येते.
  • मुंबईहून येताना माळशेज घाट, आळेफाटा व तेथून नारायणपूर-मंचर-भीमाशंकर असा रस्ता आहे.
  • पुणे ते भीमाशंकर : १२५ कि.मी.
  • मंचर ते भीमाशंकर : ६५ कि.मी.

अजून काय पहाल :

ट्रेकिंग करणाºयांसाठी हे क्षेत्र म्हणजे पंढरपूरच आहे.
हडसर, चावंड, शिवनेरी, लेण्याद्री, ओझर हे अष्टविनायक गणपती.

अधिक फोटोसाठी खालील दुव्यावर टिचकी मारा....
http://ferfatka.blogspot.com/2013/12/blog-post.html

आपल्याला हा ‘भीमाशंकराचा’ फेरफटका कसा वाटला या विषयी जरूर लिहा. अथवा मेल करा. आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आणि माहितीपूर्ण वर्णन केलय. पोर्तुगीजकालीन घंटेचा फोटू मस्त. केवढी मोठी वाटते आहे या फोटूत.:)

फारच आवडलं वर्णन .

दरवर्षी जातो पण अजूनही कंटाळा येत नाही इतका इथला निसर्ग बोलावतो.

ट्रेकर आणि भाविकांचे आवडीचे ठिकाण .

देऊळ साडेपाच ते साडेनऊ उघडे असते .

आषाढ कृष्ण पक्षात मारवाडी लोकांचा 'श्रावण'? असतो .
सकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ पर्यंत अतोनात गर्दी असते .शांततेत दर्शन करतात .
नंतर आपला श्रावण येतो.काही भाविक येताना फटाके आणतात .साक्षीविनायक -गुप्तभीमाशंकरला जातांना फटाके लावतात .जय भोलेनाथची गर्जना चालू असते .
एरवी शांतता असते .

निशिकांतजी, तुम्ही महाराष्ट्रातील या विविध ठिकाणांची जी सुरेख माहिती देत आहात (फोटोंसहित) त्याकरता तुमचे मनापासून आभार ....
ही सर्व माहितीही अतिशय वैविध्यपूर्ण व नवीन जाणार्‍याला उपयुक्त अशी ..... ग्रेट जॉब ...

हे सगळे संग्रहित करुन एखादे चांगले पुस्तक काढायचे पहा --- अनेकांना उपयोग होइल असे वाटते ....

ही माहितीही आवडलीच .....

सुरेख वर्णन आणि फोटोही Happy

निशिकांतजी, तुम्ही महाराष्ट्रातील या विविध ठिकाणांची जी सुरेख माहिती देत आहात (फोटोंसहित) त्याकरता तुमचे मनापासून आभार ....
ही सर्व माहितीही अतिशय वैविध्यपूर्ण व नवीन जाणार्‍याला उपयुक्त अशी ..... ग्रेट जॉब ..>>>>>अगदी मनातलं. Happy

भीमाशंकर हे एक अभयारण्य आहे याचाच विसर पडलाय सगळ्यांना. :(:-(:अरेरे:

खेदाने म्हणाव लागतंय, सामान्य तीर्थकरूना अजिबात प्रोस्ताहन देऊ नका.

बाकी वर्णन छान.

मस्त लेख आणि फोटो. भीमाशंकर सुंदर आहे. आम्ही पूर्वी एकदा खांडस च्या बाजूने उतरून गेलो होतो. पूर्वी तेथे जवळ राहणार्‍या लोकांपैकी काहींकडे जेवणाची सोय होत असे. आधी सांगितले की थोड्या वेळाने मिळत असे. आम्ही जेवलो ते साधे पण अत्यंत चवदार जेवण होते.

त्या घंटेचा अजून काहीतरी इतिहास आहे बहुधा.

फेरफटका, वर्णन सुरेख जमलंय. अनेकदा गेलोय पण लेख वाचतांना नव्याने गेल्यासारखं वाटतंय. Happy धन्यवाद!

सूनटून्या,

१.
>> भीमाशंकर हे एक अभयारण्य आहे याचाच विसर पडलाय सगळ्यांना.

बरी आठवण करून दिलीत. त्याला डाकिनीवन म्हणतात बहुतेक.

२.
>> खेदाने म्हणाव लागतंय, सामान्य तीर्थकरूना अजिबात प्रोस्ताहन देऊ नका.

माझ्या माहितीप्रमाणे सामान्य तीर्थकरू घाटावरून दर्शनाला येतात आणि परस्पर परत जातात. त्यांचा अभयारण्याशी संबंध येत नाही. चूकभूल देणेघेणे.

Srd,

>> आषाढ कृष्ण पक्षात मारवाडी लोकांचा 'श्रावण'? असतो .

पंचद्रविडांत (आपल्या महाराष्ट्रासह) शुक्ल प्रतिपदा ते आमावस्या असा एक महिना धरतात. तर पंचगौडांत (= उत्तर भारतात) कृष्ण प्रतिपदा ते पौर्णिमा असा महिना धरतात. त्यांचे महिने आपल्या १५ दिवस अगोदर पडतात. मारवाड पंचगौड देशांपैकी असल्याने तिथे श्रावण आपल्या आधी सुरू होतो.

अधिक माहीतीसाठी : http://en.wikipedia.org/wiki/Amavasya#Meaning_of_Amavasya

आ.न.,
-गा.पै.

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे धन्यवाद
त्या घंटेचा अजून काहीतरी इतिहास आहे बहुधा. >>
http://www.maayboli.com/node/42608

चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्यातून आणलेल्या ‘घंटेचा शोध’ या लेख वाचला खूपच छान आहे.

#गामापैलवान ,
१२ - १३ जुलै २०१२ ही आषाढ कृष्ण नवमी -दशमी तिथी होती त्यावेळी गेलो होतो . सर्व भाविक पुणे नाशिकचे मारवाडी समाजाचे होते .चहावाल्याने सांगितले आता त्यांचा 'श्रावण' असतो .
दर्शनाला येतात पण काही घेत नाहित .

पुन्हा आसमंत या पुस्तकातील श्रीकांत इंगळहाळीकरांचा लेख अवश्य वाचा. अतोनात गर्दीमूळे भीमाशंकरचे
कधीही भरून न येणारे नुकसान झालेले आहे. त्या औषधी वनस्पति ओरबाडून आणलेल्या असतात. लागवड केलेल्या औषधी वनस्पतिदेखील तितक्याच गुणकारी असतात. पण एकदा अशा वनस्पति ओरबाडून आणल्या तर त्यांची परत लागवड केली जात नाही. त्यापैकी काही वनस्पती ( उदा. संजीवनी ) तर खास औषधीही नाही.
तिथेच पावसाळ्यात झाडांवर अंधारात चमकणारी बुरशी पण दिसते.