रोमान्स.....काय सेन्श्युअस शब्द आहे ना? नाही... अमेरिकन्स सारखं "रोमॅन्स" नका म्हणू.... रोमान्स! अंगावरून मोरपीस फिरवावं तसा आठवण बनून अंगावर रोमांच उभा करणारा रोमान्स.....पुण्याच्या गुलाबी थंडीत भर दुपारीसुद्धा एकत्र घेतलेल्या वाफाळत्या चहाची ऊब देणारा रोमान्स.....चोरट्या कटाक्षांमधला रोमान्स.....चुकूनच झालेल्या सुखद पुसट हस्तस्पर्शांमधला रोमान्स......'मला कळलंय सगळं' सांगणार्या स्मितहास्यातला रोमान्स!
ह्या वेळी बरेच वर्षांनंतर पुण्यात सलग बरेच दिवस गुलाबी म्हणावी तशी थंडी पडलीये. (८ - ९ डिग्री म्हणजे पुण्यासाठी गुलाबीच!). आणि ते ही ऐन डिसेंबरात ! ही अशी थंडी पुणेकरांच्या एकूणच निवांत प्रकृतीला चांगलीच मानवते. आणि ..... सॉरी - हे थोडं भरकटत चाललंय का?? "बॉक्सिंग डे बॅटल" कुठे आणि आणि आमची गाडी चाललीये कुठे? पण असूदे... आमच्या रोमान्सच्या परिभाषेत ते पण येतंच! सांगायचा मुद्दा हा की पुण्यात वाढल्यामुळे डिसेंबरमध्ये आमचा "रोमॅन्टिकपणा" (ह्याला प्लीज चांगला प्रतिशब्द सुचवा रे कोणीतरी) उफाळून येतोच. पुण्यातल्या मुली हा एक स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे तेव्हा सध्या आपण त्यांना बाजूला ठेवू.
आमचा हा रोमान्स जर वेगळा आहे. शाळेच्या दिवसांत "एकदा जाऊन तर बघू" म्हणत एकदा मामाबरोबर सवाईला गेलो आणि नंतर सवयच झाली. उत्तररात्री राशीद खानचा चारुकेशी, शिवकुमारांचा कीर्वाणी वा शुजात खानचा झिंझोटी ऐकून तृप्त झाल्यानंतर जसराजांचा अहिर भैरव आणि साक्षात आण्णांची भैरवी ऐकण्यासाठीच सूर्य लवकर उगवतो अशी ठाम श्रद्धा असलेल्यांचा संगतीत आमचा हा रोमान्स फुलला. तीन रात्री विजय कोपरकर, विश्वमोहन भट, परवीन सुलताना, मालिनी राजूरकर, अमजद अली खाँ अश्या एकसे एक दिग्गजांच्या स्वर-तालाच्या वर्षावात न्हाऊन पहाटेच्या थंडीत कुडकुडत घरी यावं तर तिकडे गॅबा वा अॅडलेड ओव्हलवर अॅम्ब्रोस, वॉल्श, मार्क वॉ, मॅक्ग्रा, वॉर्न, सचिन, लारा, अॅलन डोनाल्ड सारख्या मातब्बरांनी वेगळाच समा बांधलेला असायचा. एकीकडे रमणबागेवर केवळ अद्भुत अशी तोडी गायल्यावर आण्णा अभंगाला सुरुवात करतायत....पखवाजावर भवानी शंकर आहेत... माऊलींच्या हाती टाळ आहे... तंबोरे तंतोतंत सुरात जुळलेत आणि "जो भजे हरिको सदा"चे स्वर लोण्याच्या गोळ्यातून गरम सुरी फिरावी तसे काळीज चिरत जातायत. आणि दुसरीकडे हिरव्यागार वॅकावर दोन विकेट्स गेल्यावर सचिन गार्ड घेतोय....साक्षात मॅक्ग्रा तो लाल गोळा सीमवर धरून हातात उडवतोय.....मार्क टेलर, वॉर्न, मार्क वॉ अश्या तीन स्लिप्स, गलीमध्ये स्लेटर, बॅकफुट पॉईंटला पाँटिंग आणि फॉर्वर्ड शॉर्टलेगला लँगर उभे आहेत.....आणि मॅक्ग्राच्या गुडलेंग्थवरच्या आउटस्विंगरवर पाँटिंग आणि कव्हर्समधल्या स्टीव वॉच्या मधली गॅप चिरत सचिनचा कव्हर ड्राईव्ह सणसणत सीमेवरच्या होर्डिंग्जवर जाऊन थडकतोय. ह्या दोन्ही गोष्टीतला स्वर्गीय आनंद सारखाच! आणि पुण्याच्या थंडीत हे अनुभव घेणं म्हणजे टिटलिसच्या माथ्यावर चांदण्या रात्री प्रेयसीचं चुंबन घेण्याइतकाच - किंबहुना काकणभर जास्तच रोमॅन्टिक अनुभव! खरंतर आण्णांच्या स्वरातून अथवा सचिनच्या बॅटिंगमधून अनुभवायला मिळणारं अद्वैत हे प्रेमाच्याही पलिकडचं. आणि त्यांमधली लज्जत आणखी वाढवणारी पुण्याची थंडी!
एप्रिल मे मध्ये गायक थोडे बेसूर गातात अथवा ऑक्टोबरमध्ये बोलर्सना ती दिशा अन टप्पा सापडत नाही असं नाही. पण स्वेटर-कानटोपी घालून सवाई ऐकणं आणि अर्धवट झोपेत दुलई घेऊन टीव्हीसमोर गाद्या टाकून घरातल्या सगळ्यांनी ऑस्ट्रेलियातल्या मॅचचा आस्वाद घेणं ह्यातली मजा काही औरच! एका अर्थी बघितलं तर ह्या दोन्ही "रोमान्सेस"चं मूळ एकच. सहनाभवतु सहनौ भुनक्तु म्हणणार्या आपल्या पूर्वजांना ह्यातली गंमत बरोब्बर कळली होती. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे...त्याचा "एकत्र" आस्वाद घेणासारखं दुसरं सुख नाही. परवा २६ तारखेला पहाटे ४:३० चा गजर लावून टीव्हीसमोर एकटे बसा. कितीही क्रिकेटवेडे असलात तरी मजा येणार नाही.... अगदी गुलाबी थंडीतही. पण ३-४ मित्रांना बोलवा..... रात्री उशीरापर्यंत गप्पांचा फड जमवा.....बायकोला पहाटे उठवून चहा टाकायला सांगा आणि बघा कशी मजा येते! ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडल्यावर नाही अँडरसनच्या थाटात मित्राला टाळी दिलीत तर सांगा! हीच तर परंपरांमधली गंमत आहे. पाडव्याला श्रीखंड, होळीला पुरणपोळी तशी जुलैच्या पहिल्या वीकेंडला विम्बल्डन फायनल आणि २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे टेस्ट!
बघा..... मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड ७०-८० हजार लोकांनी भरलेलं असेल. तोकड्या कपड्यांत सूर्यस्नान घेत हातात बिअर घेऊन प्रेक्षकांचा जल्लोष चालू असेल....अत्यंत हजरजबाबी बॅनर्स आणि पोस्टर्समधून अॅशेस गमावलेल्या इंग्लंडची टिंगल चालू असेल...त्यात स्वतःवरच विनोद करणारी बार्मी आर्मीही असेल.....पहिली गोलंदाजी असल्यास पांढरी गोल "कॅनोपी" न घालता झाडून सगळे ऑझी खेळाडू "बॅगी ग्रीन" घालून मैदानात उतरतील..... बार्मी आर्मी "जेरुसलेम" चं समूहगान करत असेल....इयन चॅपल, हीली, मार्क टेलर, डेव्हिड लॉईड कॉमेंटरी करत असतील....कुक गार्ड घेताना त्याच्या स्पाइक्सची खरखर स्पष्ट ऐकू येईल....."दॅट्स वन लेग स्टंप" म्हणत अंपायर आपला उजवा हात खाली करत म्हणेल...."जंटलमेन.... लेट्स प्ले"....आणि मिचेल जॉन्सन ती लालबुंद चेरी घेऊन धडधडत निघेल.....जरूर बघा... कारण क्रिकेट क्रिकेट ज्याला म्हणतात ना.... ते हेच!
त्याच दुपारी तिकडे डर्बनमध्ये देखील दोन सर्वोत्कृष्ट संघ एकमेकांना भिडतील. तिथेही उत्सुकता, उत्कंठा, अपेक्षा, चुरस तितकीच असेल. पण फक्त एक गोष्ट नसेल - परंपरा! ज्या कारणासाठी आपण नरकचतुर्दशीला ब्राह्ममुहूर्तावर उठून अभ्यंगस्नान करतो त्याच कारणासाठी क्रिकेटजगताचे डोळे परवा डर्बनपेक्षा मेलबर्नकडे असतील. कारण बॉक्सिंग डे टेस्ट ही केवळ ऑस्ट्रेलियाची नाही तर क्रिकेटची परंपरा आहे. आषाढी एकादशीला फक्त पंढरपुरात यात्रा नसते.... विठूच्या प्रत्येक देवळात ती भरते. पण आम्ही विट्ठलवाडीला डोकं टेकतो ते "पंढरीच्या रायाचा अंश" म्हणून. तसं बॉक्सिंग डेला जगात कुठेही कसलाही सामना होवो....आमचं लक्ष असणार मेलबर्नकडे! तिथे भरणारी जत्रा खरी!
मझी अशी फार फार इच्छा आहे की आपली अस्सल भारतीय अशी काही क्रिकेट परंपरा असावी. कल्पना करा....संक्रांतीची सकाळ आहे.... मोटेरा वा वानखेडे च्या आकाशात शेकडो पतंग उडतायेत आणि स्टेन अथवा अँडरसन मुरली विजयला गोलंदाजी करतोय.... किंवा दर २६ जानेवारीला दिल्लीची परेड बघून झाल्यावर आम्ही चॅनल फ्लिप करून "रिपब्लिक डे टेस्ट" चा आनंद घेतोय....कारण....कारण ती आमची "परंपरा" आहे! आणि एकदा परंपरा म्हटली की ती गोष्ट आपोआपच आपल्या रक्तात भिनते, आपल्या जगण्याचा एक भाग बनून जाते. आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे एका चांगल्या कारणासाठी सर्वांना एकत्र आणते.
हा आता "पूर्वीचं क्रिकेट राहिलं नाही" चे सूर येणारच. आणि पुण्यातली आयुष्यात हातात बॅट न घेतलेली लोकं त्या सर्वांत पुढे असणार. पण शेवटी क्रिकेट ही आमची ग्रुहिणी सचिवः प्रियशिष्या आहे हो...."लाईफटाईम अफेअर" आहे आमचं.....कधी दु:स्वास होतो...भांडणं होतात... रुसवे फुगवे चालू असतात..... जून जुलैमध्ये टेनिस....चार वर्षांतून एकदा फुटबॉलचा तिला सवतीमत्सर होतो....पण चैत्रात बायकोनी नथ - नऊवारी नेसावी तशी क्रिकेट सुंदरी जेव्हा बॉक्सिंग डेला मेलबर्नच्या हिरव्याकंच शालूवर "बॅगी ग्रीन"च्या पाचूचा आणि फ्लॅनेल्सच्या मोत्यांचा हार घालते.....जेव्हा पांढरेशुभ्र सीगल्स तिच्या अंगावर दागिन्यांसारखे रुळतात.... तेव्हा आम्ही पुनःपुन्हा तिच्या प्रेमात पडतो. अहो शेवटी कधी काळी का होईना....पायात पॅड्स बांधून अंपायर - प्रेक्षकांच्या साक्षीनं तिच्याबरोबर रन्स काढल्या आहेत हो. चालायचंच! Smile
जे.पी.
आवडला लेख. मस्त लिहिलय.
आवडला लेख. मस्त लिहिलय. ऑस्ट्रेलिया दौर्यातील सामने पाहणे कायमच आनंददायी ठरलय, ते सकाळी उठून मॅच बघणं. सवाईचा अनुभव गेली २ वर्षं नाही घेता आला.
पण या लेखातून ती उब मिळाली. 
मस्त
मस्त
खुप प्रसन्न लिहिलंय. मनातली
खुप प्रसन्न लिहिलंय. मनातली तीव्रता तंतोतंत शब्दांत उमटलीये, जशीच्या तशी पोचतेय. क्रिकेटचं माहिती नाही पण डिसेंबर-सवाई-रोमान्सबद्दल अगदी सहमत.
(No subject)
मस्त!!
मस्त!!
बॉक्सिंग डे टेस्ट मलाही का
बॉक्सिंग डे टेस्ट मलाही का कश्याला उगाचच्या उगाच का माहीत नाही पण लहानपणापासून खासच वाटत आलीय. जसे ती जिंकेल त्याला बोनस पॉईंटच..
छान लेख !
जेपी, तुमची रोमान्सची
जेपी,
तुमची रोमान्सची संकल्पना आवडली. ज्याला आयुष्याचा समरसून आस्वाद घ्यायचा आहे तो आपसूक रोम्यांटिक होतोच होतो.
आ.न.,
-गा.पै.
भन्नाट! एकदम आवडले. एक नवीन
भन्नाट! एकदम आवडले.
एक नवीन ओळख झालेला डर्बन मधला मित्र तिकडे गेला आहे सुट्टीसाठी. त्याला सहज विचारले मॅचबद्दल. तो म्हंटला सगळे शहर या दिवशी ती मॅच बघायला जाते.
भारतातही अशी काहीतरी परंपरा असायाला हवी. चेपॉक, इडन गार्डन्स किंवा वानखेडे वर वर्षातील एखाद्या महत्त्वाच्या भारतीय सणाच्या दिवशी/दुसर्या दिवशी सुरू होणारी मॅच.
"लाईफटाईम अफेअर" आहे >> हे मात्र खरे. नुकतीच यातील सत्यता पटली. साहेब रिटायर झाल्यावर क्रिकेट-विरक्ती येतेय असे वाटेपर्यंत परवा केपटाउन मधे पुजारा-कोहली ची बॅटिंग पाहिली, त्या आधी वन डेत स्टेन, मॉर्केल ई ची खत्रा बोलिंग पाहिली आणि खात्रीच झाली
प्रतिक्रियांबद्दल सर्वांनाच
प्रतिक्रियांबद्दल सर्वांनाच मनापासून धन्यवाद.
मला एक शंका आहे. काल धाग्यावर गानू आजोबा ह्या आयडीकडून एक प्रतिक्रिया आली होती. ती आत्ता दिसत नाहिये. ती प्रतिक्रिया गानू आजोबांनीच उडवली असावी काय? सभासदांच्या यादीतदेखील त्यांचे नाव दिसले नाही. एकदम गायब का झाले ते?
जे.पी.
फारएन्ड +१. सुरेख लेख आहे.
फारएन्ड +१.
सुरेख लेख आहे.
सॉल्लिड लिहिता राव तुम्ही -
सॉल्लिड लिहिता राव तुम्ही - मॉर्गनसाहेब...... लै भारी ....
मलाखूप आवडला तुमचा लेख.
मलाखूप आवडला तुमचा लेख. किती समरस होवोन लिहिला आहे. मस्तच.
मी इथेच आहे जेपीएम
मी इथेच आहे जेपीएम
खरच खुपच छान लिहिले आहे...
खरच खुपच छान लिहिले आहे... शब्द न शब्द आवडला...
"भारतातही अशी काहीतरी परंपरा असायाला हवी. चेपॉक, इडन गार्डन्स किंवा वानखेडे वर वर्षातील एखाद्या महत्त्वाच्या भारतीय सणाच्या दिवशी/दुसर्या दिवशी सुरू होणारी मॅच." ..-
+ १११. नक्कि ..असायला हवी.... मला वाटते .. दिवाळी डे टेस्ट..
जेपी... सगळ्यालाच ".. अगदी
जेपी... सगळ्यालाच ".. अगदी अगदी" होत राहिलं
मज्जा म्हणजे आत्ताह्या क्षणी रशीदखानचा चारुकेशी ऐकत लेख वाचला.
एप्रिल मे मध्ये गायक थोडे बेसूर गातात अथवा ऑक्टोबरमध्ये बोलर्सना ती दिशा अन टप्पा सापडत नाही असं नाही. पण स्वेटर-कानटोपी घालून सवाई ऐकणं आणि अर्धवट झोपेत दुलई घेऊन टीव्हीसमोर गाद्या टाकून घरातल्या सगळ्यांनी ऑस्ट्रेलियातल्या मॅचचा आस्वाद घेणं ह्यातली मजा काही औरच! >>
जियो... आख्खा लेखच अप्रतिम जमलाय पण हा पॅरा बुंगाट
सवाई गेल्या खूप वर्षांत ऐकलं नाही... तुमच्या वर उल्लेखलेल्यापैकी ५०% रोमान्स आहे सध्या... बॉक्सिंगडेक्रिकेटमॅच!
उरलेल्या ५०% साठी देव पाण्यात आहेत... अगदी ऑस्ट्रेलियाच्या थंडीतही.... कधी त्यांनाच काकडेल अन मला घडवतील उरलेला रोमान्स...
लिहा हो, लिहा... जबरी लिहिलात हा लेख