श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ६ - एक वेगळा पैलू.

Submitted by पुरंदरे शशांक on 18 December, 2013 - 10:56

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ६ - एक वेगळा पैलू.

श्री ज्ञानेश्वर महाराज हे नक्की होते तरी कोण ?
योगी ? का भक्त ? का तत्वज्ञानी ? का कविश्रेष्ठ ? का विरक्त संत ? का ज्ञानराज ???

माझ्यामते तर ते या सगळ्या गोष्टी मिळून तयार झालेले आणि या सगळ्या विशेषणांच्याही पलिकडले एक अद्भुत रसायन होते .....

मी स्वतः ज्ञानेश्वरीचा अंतरंग अभ्यासक नाही, अधिकारी तर बिलकुल नाही. केवळ ज्ञानेश्वरीविषयी थोडेफार प्रेम निर्माण झाल्याने ज्ञानेश्वरीचा वेगवेगळ्या पद्धतीने मागोवा घेत असतो, अभ्यास करायचा प्रयत्न करीत असतो. व हे सर्व चिंतन प्रकट करायला सध्यातरी मला हे एक योग्य ठिकाण वाटते म्हणून इथे ते सारे लिहित असतो.

खरे तर ज्ञानदेव हे नाथसंप्रदायी कारण मत्स्येंद्रनाथांपासून थेट गहिनीनाथांपर्यंत आलेल्या या संप्रदायामधे गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अनुग्रहित केल्याचा उल्लेख आहे व स्वतः निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे सद्गुरु.

पण मत्स्येंद्रनाथांपासून थेट गहिनीनाथांपर्यंतचे सर्व नाथ हे मुख्यतः योगी (हटयोगी) होते. समाजापासून तर ते दूर होतेच पण सगुण - उपासना, भक्ति याबाबतही त्यांनी कुठे फार प्रचार केल्याचे दिसत नाही. त्यांचा भर निर्गुण उपासनेवरच होता.
मात्र निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव व मुक्ताई यांनी हा हटयोग राजयोग बनवला. सत्कर्माच्या पायावर उभारलेल्या या परमार्थात कर्म, भक्ति, उपासना व ज्ञान या सर्वांनाच स्थान देऊन सर्वसामान्यांकरता एक राजमार्गच जणू त्यांनी आखून दिला. यात भक्तिला प्राधान्य होते. सर्वसाधारण मनुष्याचा कल हा सगुणाकडे असल्याने सगुणाकडून निर्गुणाकडे अशी ही वाटचाल सुलभतम होते हे त्यांनी विशेषत्वाने प्रतिपादन केले.
दुसरा भाग असा की हटयोगाला लागणारे अति कठीण यम - नियम हे सांसारिकाला त्यामानाने शिथिल करुन टाकले, मात्र नीतीयुक्त आचरण हा पाया मात्र भक्कम पाहिजेच याचे वारंवार प्रतिपादन केले.

त्यांना अभिप्रेत असलेला परमार्थ (जो मला वाटला तो) खालीलप्रमाणे-

१] आपल्या वाट्याला आलेली कर्मे उत्तम प्रकारे करुन ती ईश्वरार्पण करणे. (त्याच्या फळाविषयी फिकीर न करणे)

२] पूजा - नामस्मरण, किर्तन, तीर्थयात्रा अशा प्रकारे सगुणोपासनेने अंतःकरण भक्तियुक्त राखणे. यात गतानुगतिकत्व न आणता भक्तियोगात जास्तीजास्त जिवंतपणा आणणे यावर त्यांचा भर होता.

३] या सर्व भक्तियोग, कर्मयोगाचा मोहरा भगवतप्राप्ती हाच होता. सकाम भक्तिचा पुरस्कार त्यांनी कधीही केला नाही. भगवतप्राप्तीचा अर्थही केवळ सगुण दर्शन न मानता अखंड समाधान, शांति यांची प्राप्ती हीच भगवत्कृपेची ओळख हा भागही त्यांनी सुस्पष्ट केला.

४] त्याकाळच्या रुढी लक्षात घेता कर्मकांड (यज्ञयाग) हा एका विशिष्ट वर्णाचा अधिकार मानला जात असे. पण हे सर्व कर्मकांड मोडीत काढून परमात्मप्राप्ती हे ध्येय समोर ठेऊन तशी वाटचाल करणारा तो भागवत असे सांगून सर्वसमावेशक असा भागवत धर्म त्यांनी स्थापन केला. इथे कोणा एका वर्णाची मक्तेदारी नव्हती तर कोणीही सर्वसामान्य त्यात सामील होऊ शकत असे.

हे सर्व ज्यात सविस्तरपणे लिहिले आहे असा ज्ञानेश्वरी ग्रंथ भागवतांमधे अतिशय मान्य झाला. माऊलींच्या समकालीन अनेक संत होते ज्यांचे अभंग खूप प्रसिद्धी पावले, सर्वसामान्यांच्या मनात त्यांनी आदराचे, प्रेमाचे स्थान पटकावले. पण ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वैशिष्ट्य हे होते की भगवद्गीता या प्रमाण ग्रंथावरील एक आगळेवेगळे संस्करण आणि ते देखील त्याकाळच्या बोली किंवा सर्वसामान्यांच्या भाषेत म्हणजेच मर्‍हाठी / महाराष्ट्र भाषेत ते केलेले होते. यात केवळ प्रत्येक श्लोकाचा अर्थ मराठीत दिलेला नाहीये तर त्यावेळेस संजयाच्या, अर्जुनाच्या इतकेच काय तर प्रत्यक्ष भगवंतांच्या मनात काय भाव उमटले असतील याचे मनोज्ञ वर्णन आहे. यामुळेच या ग्रंथाला भावार्थ दीपिका असेही म्हणतात.

एखादे पद भगवंतांनी - "अद्वेष्टा सर्व भूतानां" म्हणून संक्षिप्तरित्या सांगितले असल्यास त्याचे आपल्या प्रतिभेने सुस्पष्ट व रसाळ वर्णन करणे हे केवळ माऊलीच करु जाणोत.

सध्या उपलब्ध असलेली ग्रंथालये, आंतरजाल, दळणवळण असली कुठलीही संसाधने जवळ नसताना अतिशय सूक्ष्म ग्रहणशक्ति, अपूर्व प्रतिभा व मुख्य अंतःस्फूर्ति (विश्वात्मक भावातून निर्माण झालेली) याच्या जोरावर निर्माण झालेले हे साहित्य कालातीत अशा स्वरुपाचे आहे.

माऊलींची उत्तुंग प्रतिभा, आगळे रसिकत्व यामुळे ज्ञानेश्वरी ग्रंथातील उपमा, दृष्टांत, अलंकार या व अशा अनेक साहित्यिक गुणांकडेच वाचक पहिल्यांदा आकर्षित होतो - जे योग्यही आहे. पण या सगळ्याचा रसास्वाद घेताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की यात सांगितलेले तत्वज्ञान हे आत्ता या काळातही जगण्यासारखे आहे - किंबहुना तसे कोणीतरी जगून दाखवावे याकरता या महापुरुषाचा सगळा अट्टाहास आहे, केवळ वाङ्मयीन, साहित्यिक मूल्ये दाखवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिलेली नाही.

हे सगळे केवळ ज्ञानेश्वरी वाचून समजून येईल हे सर्वथैव अशक्य आहे - हे समजून येण्यासाठी ज्ञानेश्वरी जगणारी कोणी व्यक्ति भेटणे हे अतिशय गरजेचे आहे - भले त्याची भाषा शहरी असेल वा ग्रामीण असेल, भले त्याला साहित्य कळत असेल वा नसेल.... पण ज्ञानेश्वरीचे त्या व्यक्तिला इतके मोल वाटत असेल की यातील एक तरी ओवी मी अनुभवणारच असा त्या व्यक्तीचा ठाम निश्चय झालेला असेल - असे ज्ञानेश्वरीचे जगावेगळे प्रेम लागणे ही पूर्णतः वेगळी गोष्ट आहे पण जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते.

एखादा प्रवचनकार वा प्राध्यापक वा अभ्यासू हा ज्ञानेश्वरीचे साहित्यिक मूल्य उत्तम तर्‍हेने जाणत असेल, समजावून देऊ शकेल पण त्यात सांगितलेल्या तत्वांचा अभ्यास तो करत असेल का यात शंकाच आहे.... कारण यात सांगितलेले आचरण्याचा काही बाही प्रयत्न हा एखादा उत्तम साधक वा संतच करु जाणे - कारण या अशा मंडळींनी त्या साहित्यिक मूल्यांच्या पल्याड जाऊन त्या तत्वाचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला आहे - अशा मंडळींची संगती ही खरी ज्ञानेश्वरी समजावून द्यायला मदत करु शकेल - एरव्ही माऊली म्हणतात तसे रसाळ फळातला मधुर गर, रस चाखण्याऐवजी बाहेरचे रंगीत साल चाटण्यासारखे ते होईल....

याठिकाणी पोहोण्याचे उदाहरण योग्य होईल. एखाद्या तलावाच्या/विहिरीच्या काठावर उभे राहून पोहोण्यावरची अनेक पुस्तके कोणी वाचली व पाण्यात उडी टाकली तर तो जसा निश्चितच बुडणार तसे हा ग्रंथ आचरणात आणण्याचा किंचितही प्रयत्न न करता नुसता वाचणारा वा अभ्यासणारा काय मिळवू शकणार हे काय सांगायला पाहिजे ?
आपल्या आचरणात न आणता ज्ञानेश्वरीसारख्या पारमार्थिक ग्रंथाचा केवळ सखोल अभ्यास ही श्री गोंदवलेकरमहाराजांच्या दृष्टीने केवळ एक बौद्धिक करमणूक, फारतर बौद्धिक कसरत.

या महान ग्रंथात अत्युच्च जीवनाचे जे यथार्थ दर्शन घडविले आहे ते जगण्याला कोणी प्रवृत्त झाला तर तो ज्ञानेश्वरी काहीबाही जाणू शकला असे होईल.

ज्ञानेश्वरीची ही विशेषता सांगणारे महापुरुष माझ्या जीवनात आल्यानेच ही दृष्टी मला लाभली हे मी प्रांजळपणे व नम्रपणे सांगू इच्छितो. असेच कोणी महापुरुष ज्ञानेश्वरी वाचकांना, ज्ञानेश्वरीचे प्रेम निर्माण झालेल्या भाविकांना प्राप्त होवोत ही माऊलींच्याच चरणी प्रार्थना.

नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी | एक तरी ओवी अनुभवावी || हे असे अगदी सर्वार्थाने खरे आहे.

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अगाध, असीम आहे. यातले तत्वज्ञान उमगणे हेच जिथे मोठे कठीण काम तर ते समजल्यावर आचरणात आणण्याचे काम तर अजून कठीणतम... पण, अगदीच काही नाही तरी शुद्ध भाव ठेउन जो कोणी ज्ञानेश्वरी वाचत राहील, माऊलींची करुणा भाकेल त्याच्यावर माऊली स्वतः कृपा करतात, मार्ग दाखवतात असा सश्रद्ध भक्तांचा अनुभव आहे - कोणीही भाविक तो घेऊ शकतो.

हरि ॐ
-----------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/46338 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग १

http://www.maayboli.com/node/46384 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग २

http://www.maayboli.com/node/46475 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ३

http://www.maayboli.com/node/46591 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ४

http://www.maayboli.com/node/46666 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ५
-------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञानेश्वरीची ही विशेषता सांगणारे महापुरुष माझ्या जीवनात आल्यानेच ही दृष्टी मला लाभली हे मी प्रांजळपणे व नम्रपणे सांगू इच्छितो. असेच कोणी महापुरुष ज्ञानेश्वरी वाचकांना, ज्ञानेश्वरीचे प्रेम निर्माण झालेल्या भाविकांना प्राप्त होवोत ही माऊलींच्याच चरणी प्रार्थना>>>>>>>प्रेम निर्माण होण्याचे काम तुम्ही निश्चित करत आहात..

अतिशय सुंदर आणि प्रासादिक लिहिता आपण शशांकजी. शोभनाताईंशी सहमत Happy

ज्ञानेश्वरीचा माझा अनुभव मुळीच नाही. मात्र शेजारी वृद्ध गृहस्थ होते. ते काहीवेळा त्याबद्दल बोलत. मला माझ्या एका आजीकडुन भिडे यांची ज्ञानेश्वरी मिळाली. त्यामुळे थोडासा परिचीत आहे. मला आपल्याला एक विचारायचं होतं. ही शंका मुर्खपणाची वाटल्यास बेलाशक कान उपटा.

सहाव्या अध्यायात ज्ञानदेव महाराजांनी योग, कुंडलीनी, इडा,पिंगला, शुषुम्ना नाड्या यांचं बहारदार वर्णन केलेलं आढळतं. त्यानंतर ज्ञानदेव महाराजांच्या सिद्धी पाहता, विशेषतः पाठीवर मांडे भाजणे.... असे वाटते की ते नाथ परंपरेतील सिद्ध योगी होते. त्यांनी हा मार्ग बाजुला ठेऊन भक्तीमार्ग सर्वसामान्यांसाठी प्रशस्त मानला याचं नक्की कारण काय असावं? हठयोगाचा कठीणपणा? कि त्यावेळची काही सामाजिक परिस्थीती कारणीभुत झाली असावी? मला दुसर्‍या कारणात रस आहे. आपण यावर काही प्रकाश टाकु शकाल काय?

खुप छान उपक्रम ---^----
जसं आई छोटे छोटे घास करुन, वेगवेगळ्या गोष्टी सांगुन आपल्या बाळाचे पोट भरते तसं जणु माउली गीतेचे तत्वज्ञान आपल्याला समजावत आहेत.. म्ह्णुनच तर ते माउली..
<अतिशय सुंदर आणि प्रासादिक लिहिता आपण शशांकजी > +१

सहाव्या अध्यायात ज्ञानदेव महाराजांनी योग, कुंडलीनी, इडा,पिंगला, शुषुम्ना नाड्या यांचं बहारदार वर्णन केलेलं आढळतं. त्यानंतर ज्ञानदेव महाराजांच्या सिद्धी पाहता, विशेषतः पाठीवर मांडे भाजणे.... असे वाटते की ते नाथ परंपरेतील सिद्ध योगी होते. त्यांनी हा मार्ग बाजुला ठेऊन भक्तीमार्ग सर्वसामान्यांसाठी प्रशस्त मानला याचं नक्की कारण काय असावं? हठयोगाचा कठीणपणा? कि त्यावेळची काही सामाजिक परिस्थीती कारणीभुत झाली असावी? मला दुसर्‍या कारणात रस आहे. आपण यावर काही प्रकाश टाकु शकाल काय? >>>>>

यावर माझे मत (जे कोणाला पटेल न पटेल ).... माऊली स्वतः जरी सिद्ध योगी असले तरी त्यांचे अंतःकरण अतिशय कोमल होते, ते स्वतः कविमनाचे होते.
तुम्ही वर निर्देश केलेल्या अनेक सिद्धी हटयोग्यांना प्राप्त होतात पण या हटयोगासाठी अतिशय कठीण असे यम-नियम पाळणे अत्यंत गरजेचे असते. यात भक्ति वगैरे प्रकारच नसतो -कारण ती निर्गुण उपासना आहे - यात ना कोणती देवता ना काही पूजाउपचारादि साधने.
दुसरे महत्वाचे हे की अशा सिद्धी या या मोक्षप्राप्तीसाठी मोठा अडथळाही बनतात. कारण तो साधक मग वेगळ्याच प्रलोभनात अडकून बसतो.
अशा परिस्थीत मार्ग काढायचा असेल तर १] आपण सांगितलेले साधन सुलभतम हवे
२] सर्वसामान्यांना ते आचरता यायला पाहिजे
३]सर्व संसार करीत असतानाच (बायका-मुले, उद्योग धंदा) परमार्थ साधणे जर शक्य असेल तर उगाचच या हटयोगाची साधना कशाला पुढे रेटायची
४] सर्व परमार्थ साधना ही ईश्वराचे अकृत्रिम प्रेम मिळवायचे हे उद्दिष्ट पुढे ठेऊनच करायची. याचे फळ जे अखंड समाधान व शांती याच स्वरुपाचे असल्याने त्याचा समाजधारणेसाठीही फायदाच होणार.
५] समाजधारणेसाठी कर्ममार्ग हाच प्रधान असल्याने त्याची प्रतिष्ठा समाजात अशी वाढवली की कर्म तर केलेच पाहिजे - ते जन्मापासून आपल्या मागे लागलेच आहे - पण त्यातील आसक्ती सोडून द्यायची, म्हणजेच ते ईश्वरार्पण बुद्धीने करायचे. जे कर्म ईश्वराला अर्पण करायचे ते चोरी, खून, दरोडेखोरीसारखे कसे असेल - ते तर सात्विक, फारतर राजस स्वरुपाचे असेल - पण तेही अशा पद्धतीने करायचे की त्याच्या कर्तृत्वाचा बोजा आपल्या मनावर पडता कामा नये - मन सदा सर्वकाळ मोकळे, निर्मळ राहिले पाहिजे.
६] असे निर्मळ मन ठेवण्यासाठी प्रार्थना, अंतःकरणपूर्वक भक्ती यांचा फार मोठा उपयोग होतो - सूक्ष्मात सूक्ष्म अहंकारही रहात नाही (कारण मी कोणी नाहीच, भगवंता-- तूच आहेस - असा भक्ताचा भाव असतो). म्हणून भक्तिला प्राधान्य देण्यात आले.
हा असा भागवत धर्म माऊलींनी स्थापन केला.
आधी धर्माचा भक्कम पाया (नीतीनियमांना धरुन आचरण)- या पायावर मिळवलेले अर्थ व काम पण इथेच जीवनाची इतिकर्तव्यता न मानता संपूर्ण जीवनाची वाटचाल मोक्षाकडे असा संतांचा फार सोपा परमार्थ आहे (आपण आपल्या कल्पनेने केला तर तो गढूळ होतो, संतांच्या मार्गदर्शनाखाली केला तर सफल होतो.) इथे मोक्ष म्हणजे मेल्यानंतर काही मिळणार आहे असे नाही तर समर्थांच्या शब्दात रोकडे फळ - अखंड समाधान - जे आता या क्षणातच मिळवायचे.....
आपले बहुतांशी सर्व संत - नामदेवराय, सेनान्हावी, गोरा कुंभार, जनाबाई, सावता माळी, एकनाथमहाराज, इ हे सगळे प्रपंची होते - आपला प्रपंच व्यवस्थित करीत असतानाच ते संतपदी आरुढ झाले (म्हणजेच अखंड समाधान मिळवू शकले) - याकडे जर बारकाईने पाहिले तर परमार्थ नक्की काय आहे हे कळू शकेल व तो सगळाच्या सगळा आपल्यासाठीच सांगितला आहे याची खात्री पटेल
संसार सुखे करावा | परी काही परमार्थ वाढवावा | परमार्थ अवघाचि बुडवावा | हे विहित नव्हे ||
संसारत्याग न करीता | प्रपंच उपाधी न सोडिता | जनामधे सार्थकता | विचारेचि होये ||
तस्मात विचार करावा | देव कोण ते ओळखावा | आपुला आपण शोध घ्यावा | अंतर्यामी || -श्री समर्थ ||

शशांकजी,

आपल्या मुख्य लेखातील (वरील) प्रत्येक वाक्य लाख मोलाचे आहे. आपण प्रेमळ भक्त आणि अनुभवी आहात - म्हणूनच इतके उत्कृष्ट लिहू शकता.

मात्र वरील उत्तरात थोडासा गोंधळ आहे. हठयोग, सिद्धी इ. पण त्यामुळे मुळ विषयाला धक्का लागत नाही.
पुढील भागाची नेहेमीच आतुरतेने वाट बघत असतो. Happy

आकाश नील,
तुम्ही मला लाजवताय ... हे जे मी लिहित असतो ते माझ्या सद्गुरुंकडून ऐकलेले - ना मी ज्ञानेश्वरीचा खूप मोठा जाणकार आहे, ना अंतरंग अधिकारी....
ज्ञानेश्वरीविषयी असलेले थोडेफार प्रेमच हे सगळे लिहायला उद्युक्त करते - यात एकच स्वार्थ आहे - अजून कोणा ज्ञानेश्वरीप्रेमी व्यक्तिशी ओळख व्हावी - ज्ञानेश्वरीतल्या विचारांचे आदान - प्रदान व्हावे - बस्स ---- ज्ञानेश्वरी चिंतनासारखा दुसरा निखळ आनंद नाही असे वाटते ....

मात्र वरील उत्तरात थोडासा गोंधळ आहे. हठयोग, सिद्धी इ. >>>> ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात याचे सगळे वर्णन आहे - कुंडलिनी जागृती आणि त्यापासून मिळणार्‍या अनेक सिद्धी -
मला एवढेच म्हणायचे आहे की यापासून साधनामार्गात जे अडथळे निर्माण होतात त्याचे भय "भक्ताला" नसते - साधनेत प्राप्त झालेली कुठलीही गोष्ट (सिद्धी असो वा अगदी मोक्षदेखील) तो सहज भगवंताला अर्पण करु शकतो - त्या गोष्टीचे त्याला महत्वच नसते - त्याला हवे असते ते भगवंताचे निखळ, अकारण प्रेम ...

बाकी ना मला हटयोग माहिती ना काही सिद्धींची माहिती - त्यामुळे त्यावर टीका करायचा तर बिल्कुलच हेतू नाही ......
भक्ताविषयी प्रचंड आपुलकी आहे आणि त्यांचे आदर्श म्हणाल तर विशेषतः तुकोबा ......आणि बाकीचेही सारे (नामदेवराय, समर्थ, एकनाथ, स्वरुपानंद, गोंदवलेकरमहाराज, इ.) संत आहेत त्यांचा कृपालेशही मला अत्यंत महत्वाचा वाटतो - त्याचा निदिध्यास मात्र जरुर आहे ...... ते द्यायला खूप तयार आहेत - पण माझी झोळी मात्र फाटकीच आहे.. त्याला ते तरी काय करणार !!

<<ज्ञानेश्वरीची ही विशेषता सांगणारे महापुरुष माझ्या जीवनात आल्यानेच ही दृष्टी मला लाभली हे मी प्रांजळपणे व नम्रपणे सांगू इच्छितो.>>>शशांक मला वाटते तू त्यांच्यावर एक लेख लिहावा .मायबोलीकरांना नक्कीच आवडेल .बाकी अधिक कौतुक काय करावे .सुंदर !!!!

>>सध्या उपलब्ध असलेली ग्रंथालये, आंतरजाल, दळणवळण असली कुठलीही संसाधने जवळ नसताना अतिशय सूक्ष्म ग्रहणशक्ति, अपूर्व प्रतिभा व मुख्य अंतःस्फूर्ति (विश्वात्मक भावातून निर्माण झालेली) याच्या जोरावर निर्माण झालेले हे साहित्य कालातीत अशा स्वरुपाचे आहे>> अगदी यथार्थ निरीक्षण . ज्या मुक्त प्रेमभावाने तुम्ही हे लेखन करत आहात त्याची गोडी वाचकांपर्यंत पोचत आहे शशांकजी.

ज्ञानेश्वरी समजण्यासाठी क्षणैक तरी ज्ञानेश्वर व्हावे लागेल हे एका सत्पुरुषाचे विधान ऐकले होते ते आठवले , जणू त्या महासागराच्या खोलीचा एक तरंगही किती जबाबदारीने मापावा लागेल याची त्यांनी जाणीव करून दिली होती.