छायागीत १ - रात भी है कुछ भीगी भीगी

Submitted by अतुल ठाकुर on 18 December, 2013 - 08:57

waheeda-621x414-300x200.jpghttps://www.youtube.com/watch?v=KXic0pmpKcw

मान्य कि सुनिल दत्त म्हणजे राज कपूर किंवा दिलिपकुमार नाही. मात्र त्याची अभिनयाची स्वतःची एक शैली आहे. विशेषतः डाकूच्या वेषात त्याच्याइतके चपखल ते दोघेही दिसणार नाहीत असे मला वाटते. तो फेटा, तो टिळा उंच्यापुर्‍या सुनिलदत्तला शोभुन दिसतात. “मुझे जीने दो” मधल्या “रात भी है कुछ भीगी भीगी” मध्ये सुनिलदत्तने वहिदाला पाहुन अंतर्बाह्य पेटलेला डाकू मस्त दाखवला आहे.

वहिदाच्या नृत्यकौशल्याबद्दल वादच नाही. मात्र त्याबरोबरच अभिनयही अविस्मरणिय. या गाण्यात ती नजरेनेच बोलते. बरेचसे टाईट क्लोजअप्स घेतले आहेत. “किसको बताये कैसे बतायें” या ओळीत वहीदा हलकेच ओठ चावते. आपल्याकडे काही वेळा ही कृती इतक्या रांगडेपणाने केली जाते की ती नुसती अश्लीलच नाही तर काहीवेळा विभीत्सदेखिल वाटते.पण वहिदाने हा तोल सांभाळला आहे. शेवटी हे गाणे कोठ्यावर नाचणार्‍या कलावंतीणीचे आहे मात्र त्याला धसमुसळ्या तमाशाचे स्वरुप दिलेले नाही.

काही कलावंत जो काही अभिनय करतात त्याला फक्त अप्रतिम हेच विशेषण लावता येते. लीला मिश्रा, ए.के हंगल ही अशी माणसं. त्यातलीच एक मनोरमा. मालकिणीच्या भुमिकेत ती येथे दिसते. फक्त काही सेकंदात तीने चेहर्‍यावर लोभट आणि मिंधेपणाचा भाव अतिशय परिणामकारकरित्या दाखवला आहे. सुनिलदत्त दौलतजादा करायला सुरुवात करतो तोपर्यंत ती नम्रपणाचा आव आणत असते. मात्र त्याने पैशाची थप्पी बंदुकीच्या टोकावर ठेवताच तिचा अनुभवी चेहरा बदलतो, संशयी होतो. हे सर्व मुळातुनच पाहण्याजोगे.

जयदेवचे संगीत त्याच्या समकालिनांपेक्षा वेगळे असायचे हे येथे देखिल दिसुन येते. चाल सोपी नाही पण अतिशय गोड. त्यातुन लताचा कोवळा आवाज. तिने घेतलेल्या ताना अतिशय मधुर वाटतात. आरशासारख्या जमिनीवर वहिदाचं प्रतिबिंब पडत असताना चित्रित केलेलं गाणं मला छायाचित्रणाच्या दृष्टीनेदेखिल आवडतं.

शेवटी एक आणखि गोष्ट लक्षात येते. माणसाला उत्तेजित करण्यासाठी आयटेम साँगची गरज नाही, कपड्यांची लांबीरूंदी तर कमी करण्याची मुळीच गरज नाही. तेथे वहिदासारखी अप्सरा हवी, ते खानदानी सौंदर्य हवे, ते अभिनय कौशल्य हवं आणि तो लताचा आवाज हवा.

अतुल ठाकुर

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहे. बाकीचे लेख पण वाचनीय आहेत तुमचे पण तुम्ही सारखी याची तुलना त्याच्याशी का करता? त्याने एकदम दाताखाली खडा आल्यासारखं होतं.

छान लिहीलत. वहीदा रहेमानच्या अदाकारीबद्दल काय बोलणार? निव्वळ लाजवाब!

लेख कमीतकमी शब्दात लिहीण्याचे बन्धन आहे का तुमच्यावर? सविस्तर वाचायला आवडेल.

सिंडरेला : काहीवेळा तुलना टाळता येत नाही असं वाटतं. विशेषतः समकालिनांच्या बाबतीत. प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

रश्मी : कमीत कमी शब्दात लिहिण्याचा प्रयत्न असतो माझा Happy वाढवत नेलं की माझं लिखाण कंटाळवाणं होऊ लागतं असा माझा स्वतःचाच अनुभव आहे Happy प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

अतुल ठाकूर,

चांगला लेख आहे. वहिदा रेहमान खरोखरंच गुणी अभिनेत्री वाटते. मला यातलं फारसं कळत नाही म्हणून वाटते असं म्हणालोय. लेख त्रोटक वाटतो. केवळ एका गाण्यावर लिहिलाय का? आजून वाचायला आवडलं असतं.

असो.

शेवटी उल्लेखलेलं तुमचं निरीक्षण एकदम चपखल आहे :

>> माणसाला उत्तेजित करण्यासाठी आयटेम साँगची गरज नाही, कपड्यांची लांबीरूंदी तर कमी करण्याची
>> मुळीच गरज नाही. तेथे वहिदासारखी अप्सरा हवी, ते खानदानी सौंदर्य हवे, ...

माणसांना उत्तेजित करायला अप्सरा वगैरे ठीक आहे. पण जनावरांना उत्तेजित करायला अवयव हलवावे लागतात. तेव्हा आयटेम साँगची गरज पडते.

आ.न.,
-गा.पै.

गापैजी Happy तुमचं निरिक्षण माझ्याहुन चपखल आहे Happy

त्रोटक लिहिले आहे. हे असंच आपलं एखाद्या आवडलेल्या गाण्यावर अधुन मधुन लिहित असतो. मजा येते Happy बरं लिहुनही पटकन होतं. लिहिताना (मार्क्स आणि आंबेडकर वर लिहिताना केली तशी) फार डोकेफोड करावी लागत नाही.

खूप छान लिहीलंय.
माझंही हे आवडतं गाणं आहे. वहिदाचं सिनेमात नाव चमेली आहे. या गाण्याला ती अगदी चमेली दिसते.
ब्लॅक न व्हाईटचा अत्यंत परिणामकारक एफेक्ट या गाण्याला जाणवतो.

छान लिहिता अभ्यासपूर्ण ..मुद्देसूद ...नेम्कं !! वाचतच रहावं वाचतच रहावं असं वाटवत राहणारी शैली आणि ह्या सगळ्यातून दिसणारं तुमचं सुसंस्कृत शुचिर्भूत मन ...एखाद्या गोष्टीवर खूप खोलातून असलेलं तुमचं प्रेम मला त्या गोष्टीच्या प्रेमात कधी पाडतं हे कळतसुद्धा नाही

एक शेर आठवला (खास्करून दुसरी ओळ !)

गझलेत असावी जादू जी कळू नये कोणाला
बघणारी नजर म्हणावी व्वा व्वा रे जादूगारा.....

व्वा व्वा रे जादूगारा.....!!!!
खूप आवडला लेख धन्यवाद !

~वैवकु Happy

छान लिहीलं आहे ..

ह्याआधी प्रियाच्या एका लेखानिमित्ताने मी पहिल्यांदा ह्या गाण्याचा व्हिडीयो लक्ष देऊन बघितला होता ..

तुमचा शेवटचा पॅरॅग्राफ आवडला .. Happy

हे इथे विषयांतर आहे .. तेव्हा त्याबद्दल क्षमस्व ..

आपण "खानदानी" सौंदर्य असं म्हणतो .. पण "खानदानी" म्हणण्यातला अर्थ काय असावा? नैसर्गिक, रक्तात असलेलं सौंदर्य असा का? ह्याच्या विरुद्धार्थी कृत्रिम सौंदर्य?