मनमोकळं-६

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नऊ वर्षं होऊन गेली या अफेयरला. एखाद्या अभ्यासू रोज तेल लावून घट्ट वेण्या घालणार्‍या, आईवडील बर्‍यापैकी
पॉकेटमनी देत असूनही मोजकेच खर्च करणार्‍या, पार्ट्या, फॅशन तत्व म्हणून टाळणार्‍या मुलीनं केसांची पोनीटेल
बांधलेल्या, दंडावर टॅटू काढलेल्या, चुरगळलेली जीन्स आणि ग्रे शेड्सचे टिज घालणार्‍या मुलाचा आधी तिरस्कार
करण्याचा प्रयत्न करावा पण न रहावून नंतर धप्पदिशी पडावं तशी मी मुंबईच्या प्रेमात पडले.
नुसतं टॅटू आणि पोनीटेल म्हणजे एखादा माणूस असं नाही तसंच जुहू बीच, बॅंडस्टॅंड, गेटवे ऑफ ईंडिया म्हणजे मुंबई नाही
हे लक्षात आलं.
इथल्या वेगाची सवय तर झालीच पण तो वेग लोकनृत्यात लय वाढत गेल्यावरच्या नशेसारखा भिनत जातो आणि
त्या उर्जेत माणूस चार तास प्रवास आणि आठ ते चौदा तास काम करू शकतो हे पाहून नकळत त्याचं ऍडिक्शनही झालं.
इथल्या लोकांचा जगण्याचा वेग वाढता आहे त्याच प्रमाणात सहनशीलता आणि जमवून घेण्याची वृत्तीही आहे.
इतर गावांपेक्षा इथं कॅमॅरेडियर जास्त आहे. एकाच मजल्यावर राहूनही कित्येक महिने ओळख नसलेले लोक इथं असू शकतात
तसंच ओळखपाळख नसताना लेटेस्ट गोष्टींवर बिनधास आपली मतं शेयर करणारेही असू शकतात.
ट्रॅफिक मधे गाडीतून उतरून पोलीसाचं काम करून जॅम रिकामा करणारे असतात तसं रॉंग साईडनं आला म्हणून रिक्शावाल्या
बदडणारे आणि एकूणच रिक्शावाल्यांवरचं फ्रस्ट्रेशन काढणारे पण असतात.
येताक्षणी मराठी शिकायला लागणारे पण घरात स्वतःचं गाव वसवणारे लोक मी पाहिलेत तसेच वर्षानुवर्षं इथं राहून
कुणी मराठी बोलायला लागलं की ए मुझे समझता नही है ग्रूपमे हिंदी मे बात करो ना म्हणून मेथीची भाजी मात्र
मराठी लोक करतात तश्शीच आवडते म्हणणारे लोकही पाहिलेत.
मुंबई कॉस्मो आहे. पण आता थोडं वातावरण बदलायला लागलंय.
हे एक. आणि मिडीयाचा २४ तास चालू असलेला मेंदूंचा धोबीघाट. शहाणेसुरते यात सत्य नाही, अतिशयोक्ती आहे हे समजतील,
दुर्लक्ष करतीलही. पण मेंदू कुठूनही धूवून घ्यायला तयार असलेले, न्यूज चॅनल गम्मत म्हणून बघणारे, अफवा
पसरवण्यात विकृत सुख मिळवणारे अर्धसंस्कृत लोक हीच आपल्या देशाची बहुसंख्य प्रजा आहे हे विसरून चालणार नाही.
आणि त्या प्रजेनं गप्प बसावं आणि शहाणे म्हणतात ते ऐकावं असं तुम्हाआम्हाला लाख वाटेल पण
त्यांनाही आपल्याबद्दल नेमकं तसंच वाटतंय.
सामान्याला तर काही समजेनासंच झालंय. कोण खरं बोलत असेल? हा चॅनल की ते वृत्तपत्र?
हे बोलतायत त्यांचा काय उद्देश असेल? सगळे सिनिकल झालेत. राजकारणी लोक लोकांचं लक्ष वळवण्यासाठी दहशतवादालाही
पाठिंबा देत असतील असं मला वाटतं. हेही सिनिकल आहे असा माझा संशय आहेच
इथं लोक आता एकमेकांशी जपून बोलतात. न जाणो कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. हं त्या जाणूनबुजून दुखवायच्या
असतील तर मात्र सोडत नाहीत.
लिफ्टमधे जाताजाता नेहमी गप्पा मारणार्‍या गुजराती शेजार्‍यानं राज ठाकरे करतोय ते बरोबर नाही बर्का.
हे आम्हाला ऐकवलं. फटके खाणारे करतायत तेही फारसं बरोबर नाही हे आम्ही ऐकवलंच. आणि मार्ग चुकीचा असला
तरी मुद्दा बरोबर आहे हे त्याच्याकडून वदवून घेतलं.
पण वेळ आणीबाणीची होती आणि मराठी माणसाची बाजू घ्यायची होती म्हणून. राज करतायत ती प्रामाणिक कारवाई की केवळ
राजकारण हे अजून कुठं समजलंय? पण तोपर्यंत आशा ठेवायला हरकत नाही.
आम्ही काय केलंय खरं सांगा असं सरळ विचारणारे युपी बिहारचे सहकारी. राग तुमच्यावर नाही तुमच्या
राजकारण्यांवर आहे म्हटल्यावर मग त्यांना ते मान्य आहेच. पण राजकारणी सुरक्षित आणि गरीबांचं मरण यात काय नवीन?
खूप कलर्ड मतं असतात सगळ्यांचीच.
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी लढा दिला पण बाकी देशासाठी काय केलं असं मला एकदा एका मुंबईतच
वाढलेल्या आणि इथंच इतिहास शिकलेल्या यादवनं विचारलं होतं. राग डोळ्यात उतरलेला पाहून तू शिवसेनेची आहेस का
हा प्रश्न वर. त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली तेंव्हा पण यापुढं या विषयावर बोलायचं नाही हे ठरवून टकलं.
दहशतवादाच्या तमाशानंतर याचं राजकारण करणार नाही हे वाक्य पूर्ण बोलून सुद्धा न संपवलेले लोक
एकमेकांवर चिखलफेक करून पराभवाची चिंतनबैठक सुरू झाली सुद्धा.
त्याच्या पार्श्वभूमीवरही प्रत्येकाला आपला अगेंडा सुचत होताच. आता एनेस्जी आणि आर्मीच आलं ना मदतीला? महाराष्टानं
काय केलं? असे निर्लज्ज प्रश्न आले. आंही शूट केलेलं फूटेज तुम्हाला दिलं त्याची लाज ठेवा असले बेशरम युक्तीवाद आले.
ही वेळ आहे का हे बोलायची?
वातावरण फारसं चांगलं नाही. दिलदार आणि कॉस्मो तर मुळीच नाही. नेत्यांनी वेळीच आवर घातला असता तर
इतकं कडवटही झालं नसतं पण सगळ्या वोट बॅंक्स राखायची कसरत करण्यात आपल्या या प्रेयसाचा चार्म हरवतोय
याचं त्यांना काही नाही.
मनात आलं तसं मांडलंय त्यामुळं यात सुसंगती नसेलही.
तेवढं त्या गुजराती शेजार्‍याला मोदींबद्दलचं मत विचारायचं राहून गेलं.

वादळ शमलं.
अंगावरची धूळ झटकत,
लांबवरचं नखरेल रोपटं,
उध्वस्त झाडाकडं बघून म्हणालं
ए बाबा जरा सांभाळून झड.
किती तो पानांचा कचरा?...
कुणाला काय तर कुणाला काय!

विषय: 
प्रकार: 

नेहेमी प्रमाणेच छान ! पण ओळी तुटक तुटक का वाटतायत ? सेटींग जमल नाही का व्यवस्थित ? की मलाच तसं दिसतय Sad

संघमित्रा...
मनापासून मनमोकळं. Happy
लेख खूप आवडला...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दिप अरे, भावना समजून घे... सेटिंगचं काय घेऊन बसलायंस?

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अरे त्यामुळे मला नीट वाचता नाही आलं , दुसर्‍यांना पण वाचताना तसं वाटू नये म्हणून बोल्लो .

पहिला para वाचला नि फिट बसून गेले एकदम सगळे.

मस्त लिहिलं आहेस. मुंबईबद्दलच्या भावना पोचल्या. मी मुंबईत जन्मले,वाढले त्यामुळे मुंबईसारखं दुसरं शहरच नाही असं वाटणं आलंच. कोणत्याही पिक्चरमध्ये थोडीशी मुंबई दिसली तरी खूप बरं वाटतं.
>>>राज करतायत ती प्रामाणिक कारवाई की केवळ
राजकारण हे अजून कुठं समजलंय?
राजकारणच असावं नाहीतर आता कुठे गेलं मुंबईप्रेम? आणि आहेच एवढं प्रेम तर मदत करा सुरक्षेकरता. शिवसेनेने ह्या सगळ्या गोंधळानंतर काय मदत केली ते वाचायला आवडेल. ठाकर्‍यांना,शिवसेनेला अमराठी मुंबईत आलेले खपत नाहीयेत पण पाकिस्तानातून आलेले दहशतवादी चालतात असंच दिसतंय.

कुणाला काय तर कुणाला काय!
खरंयं. सन्मी, नेहमीप्रमाणे छानच..

सायो १००% अनुमोदन.

कोनाकदे प्राजक्ताचि फुले ही कविता आहे का?

सन्मे, नेहमीसारखं नेमकं आहे. सुंदर आहे. आतलं आहे.. तरीही सहज आहे.
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

कुनाल,

तुम्ही कृपया तुमची पोस्ट 'माहीती हवी आहे' या बी बी वर हलवाल का?

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

>>> हेही सिनिकल आहे असा माझा संशय आहेच...
संशयच आहे, खात्री नाही... इतका खोल भिनलेला सिनिसिझम... ह्म्म्म.... कोणाचं काय, तर कोणाचं काय हे खरंच !

    blackribbon1.jpg

    छान लिहीलं आहे संघमित्रा.
    एकदम मनातलं..

    ए बाबा जरा सांभाळून झड.
    किती तो पानांचा कचरा?...
    कुणाला काय तर कुणाला काय!

    छान लिहीलं आहेस.

    संघमित्रा...
    लेख छान लिहिला आहे... शेवटच्या ओळी तर खूपच आवडल्या.
    मुंबई हे एक अजब रसायन आहे हे खरं. मराठीपणाबद्दलच म्हणायचं तर मुंबईत वाढलेल्या मराठी माणसांनाच मी हेही बोलताना ऐकलंय की मुंबई मराठी कधी नव्हतीच !!! नुकताच भारतभेटीहून परतताना शेवटचे २-३ दिवस मुंबईत होतो. एक विचित्र गोष्ट लक्षात आली की कुणाशीही बोलायला सुरूवात केली की समोरचा माणूस हटकून हिंदीतच सुरूवात करायचा. मी तसाच अजून २-३ वाक्यं मराठीत बोललो की मग समोरचा ही मराठी बोलायचा आणि मग समजायचं की अरे, हा माणूस मराठीच आहे की !! पण असं आहे की जर मुंबईतली मराठी माणसंच हिंदीने संवाद सुरू करणार असतील तर मग कितीही मारामार्‍या करून उपयोग नाही !!

    सन्मी भा.पो. Happy

    मराठी माणसंच हिंदीने संवाद सुरू करणार असतील तर मग कितीही मारामार्‍या करून उपयोग नाही !! ह्ह्ह्म्म्म्म्म

    सन्मे, मोजक्याच शब्दांत पण छानच मांडलयस.
    ---------------------------------------------------------
    सगळे कागद सारखेच.. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

    आणि मार्ग चुकीचा असला
    तरी मुद्दा बरोबर आहे हे त्याच्याकडून वदवून घेतलं.
    पण वेळ आणीबाणीची होती आणि मराठी माणसाची बाजू घ्यायची होती म्हणून. राज करतायत ती प्रामाणिक कारवाई की केवळ
    राजकारण हे अजून कुठं समजलंय? पण तोपर्यंत आशा ठेवायला हरकत नाही.>>

    त्याच्या पार्श्वभूमीवरही प्रत्येकाला आपला अगेंडा सुचत होताच. आता एनेस्जी आणि आर्मीच आलं ना मदतीला? महाराष्टानं
    काय केलं? असे निर्लज्ज प्रश्न आले. आंही शूट केलेलं फूटेज तुम्हाला दिलं त्याची लाज ठेवा असले बेशरम युक्तीवाद आले. ही वेळ आहे का हे बोलायची? >>

    वातावरण फारसं चांगलं नाही. दिलदार आणि कॉस्मो तर मुळीच नाही. नेत्यांनी वेळीच आवर घातला असता तर इतकं कडवटही झालं नसतं पण सगळ्या वोट बॅंक्स राखायची कसरत करण्यात आपल्या या प्रेयसाचा चार्म हरवतोय याचं त्यांना काही नाही.
    मनात आलं तसं मांडलंय त्यामुळं यात सुसंगती नसेलही.
    तेवढं त्या गुजराती शेजार्‍याला मोदींबद्दलचं मत विचारायचं राहून गेलं. >> मित्रा, __/\__
    तुस्सी ग्रेट हो... सामान्यांच्या भावना सात्विक संताप, हताशपणा सोप्या भाषेत मांडण्याचे कसब तुझ्याठायी! ग्रेट!!

    सं घ मि त्रा ........
    लईईईईईईई भारी लिहिलंय!

    "आपल्या या प्रेयसाचा चार्म हरवतोय" - प्रेमात आहे या वाक्याच्या... स्वतंत्ररीत्याही हे खूप आवडलं वाक्य...
    Happy

    इंद्रधनु, हे वर काढल्याबद्दल विशेष आभार!

    >>वादळ शमलं.
    अंगावरची धूळ झटकत,
    लांबवरचं नखरेल रोपटं,
    उध्वस्त झाडाकडं बघून म्हणालं
    ए बाबा जरा सांभाळून झड.
    किती तो पानांचा कचरा?...
    कुणाला काय तर कुणाला काय!

    सुंदर!!! हे ही!