" बाधा "

Submitted by -शाम on 13 December, 2013 - 03:33

नील नभाची लंघुन माया तेज चालले पुढे पुढे
गडद जांभळी शाल पांघरुन पर्वतराजी शांत पडे

निरव निळाईवरी भाळला दूर दिवाना घन वितळे
जळात विरघळलेले केसर बिंब मिरविते टंच तळे

सावळ वृक्षी एकट पक्षी राग मारवा आळवतो
वारा हळव्या तृणपात्यांतुन हिरवी सळसळ कालवतो

एक एक क्षण बुडतो येथे तसा तिथे उगवे तारा
रिती दिसाची ओंजळ होता उजळुन येई गाभारा

परतीच्या वाटेत मनाचे पुन्हा पुन्हा पाउल अडते
जीव गुंतला सोडवताना गाठ नवीन जणू पडते

या खेळाची स्थळ-काळाची जडली बाधा चित्त झुरे
संग सावळा घडता जैसा राधाहृदयी शाम उरे
_________________________________शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावळ वृक्षी एकट पक्षी राग मारवा आळवतो
वारा हळव्या तृणपात्यांतुन हिरवी सळसळ कालवतो

या खेळाची स्थळ-काळाची जडली बाधा चित्त झुरे?
संग सावळा घडता जैसा राधाहृदयी शाम उरे

शाम , अगदी त्या स्थळकाळात नेलंत.प्रत्येक शब्दागणिक गुंतवणारी कविता.

सुंदर!

छान, लयबद्ध कविता.

रिती दिसाची ओंजळ होता उजळुन येई गाभारा
ही ओळ आणि शेवटची द्वीपदी एकदम खास.

वाहवा!! अतिशय लयबद्ध, ओघवती.सहजसुंदर.......

परतीच्या वाटेत मनाचे पुन्हा पुन्हा पाऊल अडते
जीव गुंतला सोडवताना गाठ नवीन जणू पडते>>>> !! सुरेख!!

फक्त गाठ नवीन जणू पडते.. कुठेतरी लय किंचीत हलली असं वाटलं..

हे म्हणजे बाल की खाल आहे पण पूर्ण कविताच सुंदर आहे म्हणून सांगावसं वाटलं Happy

>>
एक एक क्षण बुडतो येथे तसा तिथे उगवे तारा
रिती दिसाची ओंजळ होता उजळुन येई गाभारा
<<

वा!
छान आहे कविता.

('चित्त झुरे'नंतर प्रश्नचिन्ह का आहे?)

औदुम्बराच्या गूढ विश्वात नेऊन, लय व अर्थाचया गहन डोहात खोल खोल नेणारी आशयघन कविता ! 'नवीन जणू'वर लयीसाठी विचार व्हावा, ही विनंती.

सुंदर.
भारतीताई+१
मलातरी नवीन.. मध्ये अडखळण्याएवढा लयभंग वाटला नाही. थोडं नवीssन म्हणावं लागतंय जे दीर्घ 'वी' ला साजेसेच आहे. Happy