कलरफुल कोलोरॅडो

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

"कोलोरॅडो म्हणजे स्वर्ग.. कोलोरॅडो म्हणजे बर्फाळ सौंदर्याची परमावधी.. कोलोरॅडो म्हणजे स्किईंग.. कोलोरॅडो म्हणजे हिमवादळं.. आणि कोलोरॅडो म्हणजे निव्वळ शांतता !"

*

माझ्या अमेरिकेतल्या वास्तव्यादरम्यान दोन वेळा थँक्स गिव्हिंगची मोठी सुट्टी कोलोरॅडोत घालवल्याने, ह्या दरम्यान कोलोरॅडोची आठवण अगदी हमखास होते आणि अशी काही छापील वाक्य टाकत मी जुने फोटो बघत
बसतो. कोलोरॅडो म्हणजे अमेरिकेतल्या रॉकी पर्वतरांगाच्या दक्षिण भागात आणि 'ग्रेट प्लेन'च्या पश्चिम टोकावर वसलेलं एक राज्य. पर्वत रांगांमध्ये असल्याने जोरदार थंडी, बर्फवृष्टी, लहरी हवामान हे ओघाने आलच. पण ह्या बर्फामुळे आणि पर्वतरांगांच्या नैसर्गिक उतारांमुळे इथे स्किईंग सारखे हिवाळी खेळ खेळण्यासाठी मुबलक सोई उपलब्ध आहेत. रॉकी माऊंटन नॅशनल पार्क बघायला उन्हाळ्यात तर स्किईंग, स्नो मोबिलींग करायला हिवाळ्यात पर्यटक इथे गर्दी करतात.

कोलोरॅडोला जर गाडीने गेलं तर 'Welcome to the colorful Colorado' अशी पाटी आपलं स्वागत करते. वसंतात, उन्हाळ्यात आणि शिशिरात इथे फुलांच्या आणि पानगळीच्या सुंदर रंगाची उधळण होत असते तर हिवाळ्यात पांढरा रंग आसमंत व्यापून टाकतो! अगदी नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेला बर्फ, त्याच्यामधून
जाणारे रस्ते आणि काही ठिकाणी बर्फात घरंगळणारे ठिपके म्हणजे स्किईंग करणारी लोकं हे अगदी हिवाळ्यातलं टिपिकल दृष्य.

हिवाळ्यात कोलोरॅडोला जायचं तर निदान चार दिवस तरी हातात पाहिजेत. स्किईंग आणि स्नो मोबिलिंग करायचं असेल तर त्यासाठी दोन दिवस आणि बाकी गोष्टींसाठी दोन दिवस. थँक्स गिव्हिंग किंवा नाताळची सुट्टी ह्या ट्रिप करता सोईची पडते. बर्फातले खेळ चांगलेच दमवणारे असतात त्यामुळे त्यानंतर काही करणं
शक्य नसतं. शिवाय हिवाळ्यात अंधार खूप लवकर पडतो आणि अंधार पडल्यानंतर थंडीही चांगलीच असते. त्यामुळे सूर्यास्तानंतर फार काही करता येत नाही.

बर्फात अगदी शब्दशः भटकायचं असेल तर स्नोमोबिलिंगला पर्याय नाही. स्कुटरपेक्षा जरा फताडं, जड आणि चाकांना चेन लावलेलं वाहन घेऊन ते हाकत बर्फात मनमुराद फिरायचं! इथे अनेक संस्था डोंगरावर मार्ग आखून त्यावरून स्नोमोबिलच्या टुर्स करतात. ह्यात एक गाईड दहा ते बारा स्नोमोबिल घेऊन त्यांना बर्फात फिरवून आणतो.


साधारण ३-४ तासांची ही टुर असते. ह्यात स्नोमोबिल चालवायची आपल्यालाच असते. पण मार्गदर्शक आणि मदतनीस म्हणून गाईड बरोबर असतो. जंगलात किंवा समुद्रात जसा दिशांचा गोंधळ उडू शकतो तसाच इथे
बर्फातही होऊ शकतो कारण सगळी कडचं दृष्य सारखच दिसतं ! स्किईंग इतकं अवघड नसलं तरी हे प्रकरण वाटतं तेव्हडं सोपं नाही. कारण ती स्नोमोबिल बरीच जड असते. दुसरं म्हणजे आखून दिलेला मार्ग न सोडता ठरविक रस्त्यावरूनच ती दामटवावी लागते. भुसभुशीत बर्फात ती गेली तर सवय नसल्याने नियंत्रित करता
येत नाही. एकदा मी आणि मित्राने वेग वाढवायच्या नादात रस्त्यावरून बाजूला नेली होती. तिथे जवळजवळ गुडघाभर बर्फ होतं. शेवटी ती तशीच ठेऊन आम्ही रांगत रांगत बाहेर आलो आणि आमच्या गाईड हाका मारल्या. त्याने ती बाहेर काढली आणि आम्हांला बर्‍या शब्दांत पण व्यवस्थित झापलं !


अजून एक म्हणजे एव्हढ्या बर्फात जायचं तर स्नो सुट, हेलमेट, बुट, डबल हातमोजे असा सगळा जामानिमा करावा लागतो. त्यामुळे इतकं उकडतं की अगदी 'धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय' अशी अवस्था होते! पण तरीही डोंगर उतारावरून थंड गार वार्‍यात स्नोमोबिल पळवायला खूपच मजा येते.. अगदी हॉलिवूड हिरो किंवा गेलाबाजार 'फना'तला अमिर खान झाल्यासारखं वाटतं. जर आपण मागे बसलेले असू तर चालत्या
स्नोमोबिलवर बसून फोटो काढायलाही धमाल येते.

बर्फातला दुसरा खेळ म्हणजे स्कीईंग. कोलोरॅडोत ब्रेकेनरीज, अ‍ॅस्पेन, वेल्स, विंटर पार्क वगैरे गावांमध्ये मोठमोठी स्कि रिसॉर्ट वसलेली आहेत. जवळपासच्या कॉटेजेस, लॉग केबिन्समध्ये रहायची खायची सोय असते, तिथेच स्किईंगचं सामान भाड्याने घ्यायचं आणि ह्या रिसॉर्टवर यायचं. हा खेळ नियमितपणे खेळणारे बरेच जण आठवडा आठवडा ह्याभागात येऊन सकाळपासून सूर्यास्तापर्यंत स्किईंग करतात! आमच्यासारख्या नवख्यांसाठी इथे स्किईंगची शिकवणी पण असते. तास - दोन तास तिथला अनुभवी माणूस आपल्याला अगदी बेसिक
गोष्टी शिकवतो आणि मग पुढे आपलं आपण करायचं. स्किईंगमध्ये सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे थांबणं. डोंगर उतारावर स्कि करायला सुरुवात करणं सोप्पं असतं पण वेगात असलं की थांबणं फारच अवघड आणि थांबलं नाही की 'घालीन लोटांगण...' नक्की ! आमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये प्रत्येकाने एकदातरी तो अनुभव घेतलाच.

स्किईंग करतानाही बराच जामानिमा करावा लागतो. स्नोपँट, जॅकेट, हातमोजे, टोपी हे तर असतच, पण स्किईंगचे शूज हा एक अत्यंत बोजड प्रकार असतो.. पूर्ण धातूचे ते शूज घातले आणि ते स्किब्लेड्स पायात अडकवले की अगदी पायात बेड्याच घातल्यासारखं वाटतं! अर्थात पायाला तेव्हढ्या आधाराची गरज असतेच. शिवाय जर आपण घसरून पडलो तर ते शूज काढल्या शिवाय उठताच येत नाही. जर ते न काढता उठायचं असेल तर दोन जणांनी दोन बाजूंनी बघोटं धरून उचलावं लागतं.


जितका बर्फ ताजा तितकी स्किईंगला मजा येते.. कारण फार दिवस झाले की बर्फाचा भुसभुशीतपणा जाऊन तो घट्ट होत जातो आणि घसरडा होत जातो ('स्नो' चा 'आईस' होतो). आम्ही ज्या रिसॉर्टवर स्किईंग केलं तिथली मुलगी अगदी काळजीने सांगत होती, 'गेले आठ दिवस बर्फ पडला नाही, असच राहिलं तर ह्या सिझनची वाट लागणार वगैरे वगैरे'.. मला अगदी आपल्याकडच्या पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्‍यांची आठवण झाली! हल्ली कृत्रिम बर्फ बनवण्याची मशिन आहेत. सगळ्या रिसॉर्टवर ती वापरली जातातच. आपण स्किईंग करून उतारावरून खाली आलो की पुन्हा वर जाण्यासाठी लिफ्ट असतात. एकदा जाऊन तरी बघू म्हणून आम्ही त्या लिफ्टने सगळ्यात वरच्या पॉईंटला गेलो पण तिथून खाली दिसणारा उतार बघून छातीच दडपली. मग चालत चालत अर्ध्या अंतरापर्यंत खाली आलो आणि तिथून स्किईंग केलं. स्किईंग करून दमल्यावर आणि गारठल्यावर रिसॉर्टच्या काऊंटरवर गरम गरम हॉट चॉकोलेट पिणं म्हणजे निव्वळ सुख! आणि त्यानंतर केबिन/कॉटेज मध्ये येऊन झॅकुझी किंवा टबबाथ घ्यावा. अशी सडकून भुक लागते की बस!

डेन्वर हे कोलोरॅडोतलं मोठं शहर, पण ते अगदी डोंगरात नाहीये त्यामुळे तिथे रहाण्यापेक्षा ब्रेकेनरीज, अ‍ॅस्पेन, वेल्स, विंटरपार्क वगैरे ठिकाणी रहाणं जास्त सोईचं पडतं. इथे सगळी कडे हॉटेल आहेतच पण मोठा ग्रुप असेल लॉग केबिन किंवा कॉटेजेस मध्ये रहाणं सोईचं पडतं. सगळ्या सोईंनी सुसज्ज, प्रशस्त केबिन अगदी मस्त असतात.
थँक्स गिव्हिंगच्या काळात अनेक रेस्टॉरंट पारंपारिक थँक्स गिव्हिंग डिनर देतात. आपल्या कडे कोकणात जशी घरगुती सोय असते तशी घरगुती रेस्टॉरंटही असतात. मोठ्या किंवा चेन रेस्टॉरंटपेक्षा  ही अशी रेस्टॉरंट छान वाटतात. ह्या थॅंक्स गिव्हिंग डीनरचा आमचा अनुभव फार छान होता.
ह्या डिनरचं आधी बुकिंग करावं लागतं. आम्ही आधी बुकिंग केलेलं ठिकाण आमच्या मुक्कामापासून २० मैल दुर होतं. पण सगळा घाट रस्ता असल्याने जायला यायला वेळ लागला असता. त्यामुळे मग आम्ही स्कि रीसॉर्टवरच विचारलं की जवळपास कुठे जेवण मिळेल का? हे लहान गाव असल्याने लोकं एकमेकांच्या ओळखीतलीच. लगेच तिथल्या काकूंनी त्या स्वतः जिथे जाणार होत्या त्या रेस्टॉरंटला फोन करून आमचं बुकींग करून टाकलं. अगदी स्वरूपातलं हे रेस्टॉरंट होतं. साधारण पन्नास पंचावन्न वयाचे काका काकू ते चालवतात. बोलून अतिशय गोड, खूप गप्पिष्ट! गेल्यावर आमची चौकशी केली, कुठून आलात, आत्तापर्यंत काय केलं वगैरे विचारलं, बर्‍याच इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. त्यांच घर तिथेच मागच्या बाजूला, पुढे बार, सिट आऊट आणि आतल्या बाजुला डायनिंगची जागा. हे पारंपारिक थँक्स गिव्हिंगचं जेवण असल्याने आमची सोय डायनिंग हॉल मधे होती. लाल भोपळ्याचं सुप आणि सलाड, आणि त्यानंतर टर्की किंवा फिश आणि फ्राई़ज, मॅश रताळी, उकडलेले बीन्स, क्रॅनबेरी सॉस, कॉर्न ब्रेड आणि भात असा मेन्यू. टर्की स्टफ्ड असते. पण हल्ली सगळ्यांना हे नुसतं स्टफिंग पण खायला हवं असतं त्यामुळे ते ही वेगळं दिलं होतं. आणि हे झाल्यावर पम्पकीन पाय. ह्या जेवणात जायफळाचा खूप वापर होता. आपल्याला पक्वान्नात जायफळाचा स्वाद असण्याची सवय असल्याने आपोआपच 'फेस्टीव' वाटायला लागलं! शिवाय आम्ही इतक्या दुरुन आलेलो बघून रेस्टॉरंटच्या मालकीणबाईंनी त्यांच्या खास ठेवणीतली व्हाईट वाईनही आम्हांला दिली.आमचं बुकींग जरा उशीराचं होतं, त्यामुळे आमचं जेवण संपता संपता रेस्टॉरंट कर्मचार्‍यांचीही जेवणं सुरु झाली. थँक्स गिव्हिंग असल्याने मालकीणबाईंनी सगळ्या कर्मचार्‍यांचे आभार मानले, त्यांचं पहिलं हवं नको ते बघितलं आणि मग ते दोघं जेवायला बसले. सण आपल्याकडचा असो वा तिकडचा, प्रसन्न वातावरण आपोआपच तयार होतं हे जाणवलं! फोटोत फार प्रॉमिसिंग दिसत नसलं तरी जेवण चवीला खूपच छान होतं.

अ‍ॅस्पेन आणि वेल्स ह्या दोन महागडी ठिकाणंही ह्या थँक्स गिव्हिंग, ख्रिसमस डीनर आणि रोषणाई साठी प्रसिद्ध आहेत. तिथले रहाण्या-खाण्याचे एकंदरीत दर बघता ह्या ठिकाणी नुसता फेरफटका मारून येणचं परवडतं!
बर्फातळे खेळ खेळायची हौस भागली की मग गाडी काढून इतर ठिकाणं बघायला निघावं. बर्फ आपली पाठ सोडत नाहीच पण तरीही! बर्फातल्या खेळांनंतर आम्हांला सगळ्यांत आवडलेलं ठिकाण म्हणजे रॉयल गॉर्ज.
गॉर्ज म्हणजे घळ. अर्कान्सा नदीच्या प्रवाहामुळे ही घळ तयार झाली आहे. ग्रँड कॅनियनचे हे लघुरूप. ह्या घळीवर पुल बांधला आहे. अनेक वर्ष हा जगातला सर्वात उंचीवरचा पुल होता. तिथे कळलेली एक गंमतीची गोष्ट म्हणजे ह्या घळीवरचा पूल हा प्रवासी वाहतुकीसाठी न बांधता केवळ पर्यटनाच्या हेतूने बांधला गेला आहे! त्या पुलावर खाली बघताना जरा भितीच वाटते कारण नदी खूपच खोल दिसते.आम्ही सूर्यास्ताच्या वेळी तिथे पोचलो. तिन्हीसांजेंच्या रंगात घळ फार सुंदर दिसली. पण कमी उजेडामुळे नीट फोटो काढू शकलो नाही.


कोलोरॅडो स्प्रिंग्ज ह्या गावाजवळ 'गार्डन ऑफ गॉड्स' नावाची एक जागा आहे. इथे लाल रंगांचे डोंगर आहेत आणि ह्या लाल दगडांचे विविध आकार तयार झालेले आहेत. ह्या डोंगरांमध्ये रॉक क्लाईंबिंग, माऊंटन बायकिंग वगैरे खेळांसाठी बरेच लोक येतात. गार्डन ऑफ गॉड्स मधले बॅलन्स्ड रॉक, स्टीम बोट रॉक, सायामिज ट्विन्स वगैरे आकार छान आहेत. ह्या सगळ्या दगडांच्या आजुबाजूने रस्ता बांधलेला असल्याने अगदी थेट गाडीने त्यांच्यापर्यंत पोहोचता येतं आणि वर चढूनही जाता येतं. अर्थात जरा वेळाने इथे कंटाळा येतो!

कोलोरॅडो स्प्रिंग गावाजवळच 'पाईक्स पीक' नावाचं शिखर आहे. हे शिखर साधारण १४००० फुट उंच आहे. ह्यावर जाण्यासाठी 'कॉग रेल्वे' नावाची रेल्वेलाईन आहे. ही रेल्वे सुमारे दिड तासात आपल्याला वर घेऊन जाते. रेल्वेचा चालक एकीकडे माहिती सांगत असतो. एव्हड्या उंचीवर चढायचं म्हणजे रेल्वे चांगलीच तिरकी होते! ह्या पीकवर जाण्यासाठी रस्ताही आहे. गाडीने जातानाही खूपच जास्त चढ आहे आणि त्यामुळे ड्रायव्हरचा कस लागतो असं ऐकलं आहे. आम्ही रेल्वेने गेल्याने ते अनुभवता आलं नाही.


इतर बर्‍याच अमेरिकन गोष्टींप्रमाणे ही रेल्वेसुद्धा कशाच्यातरी आधारावर जगातली पहिली वगैरे आहे! आम्हांला तसं वाटलं की खरच तसं होतं हे माहित नाही पण ह्या शिखरावर उंचीमुळे विरळ हवा आहे की काय असं जाणवलं. एकतर खालच्यापेक्षा खूप जास्त थंडी होती आणि दुसरं म्हणजे अगदी दहा पावलं चालल्यावरही दम लागत होता. इथून डोंगरांची आणि दर्‍यांची अतिशय सुंदर दृष्य दिसतात.

तिथल्या व्हिजिटर सेंटरमध्ये कॉफी घेत आजुबाजूची दृष्य बघत वेळ कसा जातो कळत नाही. ही रेल्वेसुद्धा केवळ पर्यटनासाठी बांधली आहे. कारण ह्या शिखरवर वस्ती नसल्याने पर्यटक सोडून तिथले स्थानिक लोक वगैरे रेल्वेचा वापर करत नाहीत. ही रेल्वे ज्या गावातून सुटते ते गाव (Manitou) फार छान आहे. घरांचे रंग
आणि रचना विशिष्ट पद्धतीची आहे. मुख्य रस्त्यावर खाण्यापिण्याची खूप ठिकाणं आहेत आणि मुखत्त्वे मॅक्सिकन जेवण चांगलं मिळतं. केवळ पिक्स पाईकच्या रस्त्यावर नाही तर एकंदरीतच कोलोरॅडोच्या रॉकी माऊंटन्समध्ये बर्फात गाडी चालवणे हा ही एक रोमांचकारी वगैरे अनुभव असतो. त्यात बर्फ पडत असेल तर अजून थोडे रोमांच उभे रहातात! अंधार पडल्यानंतर सगळी कडे बर्फ, घाट रस्ता आणि शांतता ह्या गळ्यामुळे फारच गुढ आणि जरासं भितीदायक वातावरण तयार होतं. आम्हांला दोन्ही ट्रीपांमध्ये दोनवेळा अश्या बर्फातून गाडी चालवावी लागली. अर्थात बर्फ रोजचाच असल्याने रस्ते साफ करणं, मिठ टाकणं वगैरे कामं सरकारी कर्मचारी अगदी लगेच करतात.

बर्फातले खेळ किंवा भटकंती करून संध्याकाळी ताकद उरलीच तर जिथे केबिन आहे त्या गावात रात्री ख्रिसमसची रोषणाई बघायला, नुसता फेरफटका मारायला किंवा विंडो शॉपिंग करायला बाहेर पडावं! खूप रंगीबेरंगी, उत्साही आणि उत्सवी वातावरण असतं. हाड गोठवणार्‍या आणि दात वाजवणार्‍या थंडीत तिथल्या स्थानिक आईस्क्रीम पार्लरमधलं आईस्क्रीम खाण्याचा अनुभवही नक्की घ्यावा.

कोलोरॅडोला जायचां तर फक्त बर्फातच घसरायला हवं असं नाही. तुम्ही वाळूमध्येही घसराघसरी करू शकता. डेन्वरहून साधारण २५० मैल दक्षिणेला सँड्यून्स नॅशनल पार्क आहे. अर्थात आम्हांला तिथे वेळेअभावी जाता आलं नाही. त्यामुळे कलरफुल कोलोरॅडोच्या पुढच्या ट्रीपमध्ये एक नवीन कलर पहायचां आधीच ठरलेलं आहे!

विषय: 
शब्दखुणा: 

नॉस्टॅल्जिक ! चार वर्ष कोलोरॅडोत होतो (फोर्ट कॉलिन्स..)..सगळे दिवस क्षणात डोळ्यासमोरुन सरकुन गेले...धन्यवाद.

राॅयल गाॅर्जच्या लाकडी पुलाचा फोटो सापडला तर टाकिन.

कोलराडोतल्या गोल्डन नावाच्या छोट्या गावात एका मराठी माणसाचा कसीनो आहे. Happy

जबरी अनुभव !
आता या जानेवारीत चक्कर आहे वेस्टमिंन्स्टरला. तेव्हा एक फेरी रॉकीजची होइलच....
वातावरण जर असेच असेल तर मज्जा आहे Happy

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद सगळ्यांना.. Happy

मृ.. जाऊन या ह्या विंटरात.. Happy
विशाल.. मी तुला तुझ्या लेख पाहून तेव्हाच विचारलं होतं की माउंटन्स मधे नाही का गेलास म्हणून.. ह्या वेळी नक्की जा.. Happy

राज.. हो नक्की टाका फोटो.. माझ्याकडे एकही धड नाहीये.. सगळे हललेले !

सशल.. खरं सांगायचं तर लिहिताना तेच तेच बघून चुका नजरेआड होतात.. मुशोसंबंधी चुका सापडल्या तर इथे लिही किंवा इमेल कर.. मी दुरुस्त करेन..

सौरभ.. कोलोरॅडोत चार वर्ष म्हणजे सहीये ! पण अर्थात एव्हड्या थंडीत टुरिस्ट म्हणून जायला ठिक आहे.. पण तिथेच रहाणं नक्कीच अवघड असणार.

मस्त

>> गुडगाभर
गुडघाभर

>> आमच्या गाईड हाका मारल्या
"ला" राहिलं ..

>> एव्हड्या
एव्हढ्या

>> तिथला अनुभवी माणून आपल्याला अगदी बेसिक
गोष्टी शिकवतो आणि मग पुढे आपलं आपण करायचं

माणूस

>> तेव्हड्या
तेव्हढ्या

>> अगदी काळजीने अगदी सांगत होती
दुसरं "अगदी" नको आहे ..

डेन्वर चा पॅरॅग्राफ जिकडे सुरू होतो तोपर्यंत ह्या काही दिसल्या .. चूका काढायचा उद्देश नाहीये, तुला इच्छा असल्यास उरलेला लेख रिव्ह्यू करून काही टायपोज् राहिल्या असतील तर बघ ..

लेख आणि फोटो आवडल्याचं आधीही लिहीलं होतंच, हे परत एकदा .. Happy

धन्यवाद सशल.. ह्या केल्या दुरुस्त.

चूका काढायचा उद्देश नाहीये, >>> हो .. ते माहिती आहे.. काही प्रश्न नाही Happy
मी लिहिलेलं कोणाकडून तरी तपासून घेतो खरं तर.. पण ह्यावेळी नाही केलं ते.. त्यामुळे राहिल्या आहेत बर्‍याच चुका/टायपो असं दिसतय.. पुन्हा तपासेन नक्की.

मस्त फोटो आणि वर्णन.
मला कोलोरॅडो/डेन्व्हर वगैरे नावं घेतली की 'द शायनिंग'च आठवतो! Happy

कॉलरॅडो खरच सही जागा आहे. आम्ही पण ३ दा गेलो तरी पुन्हा पुन्हा जावसं वाटतं.

शेवटी एक वाक्य राहिलं का? "असं हे कलरफुल कोलोरॅडो मला फार फार आवडतं" Happy

>>स्नो-मोबिलवर एक गटग करून टाकू Lol
धुवांधार हाकताना नको बा. रस्त्याच्या बाजूला घसरून भुसभुशीत बर्फात चालेल का? Proud

परत एकदा सगळ्यांना धन्यवाद ! Happy

मनीष.. आम्हीही युटाहच्या ट्रिपचं सगळं प्लॅनिंग करून ठेवलं होतं.. फक्त त्यावेळी जरा जास्तच भटकणं झालं होतं त्यामुळे तो प्लॅन रद्द केला पण ते राहिलच नंतर ! ब्राईस कॅनियन, आर्चेस नॅशनल पार्क वगैरे पहायचं आहे.

रस्त्याच्या बाजूला घसरून भुसभुशीत बर्फात चालेल का? >>> तिथेच करा.. तिथे दुसरं काही करता येत नाही तसही.. Proud

असं हे कलरफुल कोलोरॅडो मला फार फार आवडतं >> Happy

Pages