काल आम्ही ६ माबोकर पितृऋणच्या प्रीमियरला गेलो, बाकीचे नव्हते, जे नव्हते त्या सगळ्यांसाठी हा वृत्तांत..
पितृऋणच्या प्रीमियरला जायचं म्हणून ऑफिसमधून लवकर निघाले आणि रस्त्यात प्रचंड वाहतूक असून सुदैवाने आम्ही सारे माबोकर वेळेत, सेलिब्रिटिज येण्यापूर्वी वर्सोवा सिनेमक्सला पोहोचलो. तसा शुकशुकाटच होता. हळू हळू एक एक सेलिब्रिटिज येऊ लागले. ह्या सेलिब्रिटिज ना इतकं जवळून पाहायची तशी पहिलीच वेळ. कोणत्या सेलिब्रिटिचे नाव काय ते कोणत्या सिरियल मध्ये किंवा कोणत्या सिनेमा मध्ये आहेत / होते... अनेकदा असंच होतं आपण त्या कलाकारांची मूळ नावं विसरून जातो आणि लक्षात राह्तात त्यांनी रंगवलेली पात्रे.
आम्हाला सर्वात आधी दिसल्या पुढचं पाऊल मधल्या पहिल्या मामी. (नाव अर्थात आठवत नाही.) मग सुहिता थत्ते. होणार सून मध्ये त्यांना अगदी साधी आई आणि प्रेमळ सासू रंगवलय आणि त्या आहेत सुद्धा तशाच साध्या प्रेमळ हसर्या (आम्हाला तरी त्या तशाच वाटल्या). त्यांचं खळखळून हसणं पाहाताच आठवण झाली त्यांच्या ८७/८८ मधल्या दिलिप प्रभावळकर ह्यांच्या बरोबरच्या सिरियलची, नाव आठवतय का कोणाला?
श्रीरंग गोडबोले सगळ्यांच्या स्वागताला जातीने हजर होते. सुनिल बर्वे, ऐश्वर्या नारकर, सुमीत राघवन, फुलवा खामकर, अनिकेत विश्वासराव, तुषार दळवी आणि मराठी चित्रपट इंडस्ट्रीमधले (वयाने) लहान मोठे अनेक कलाकार तंत्रज्ञ.
सचिन खेडेकर यांचे आगमन एकदम दमदार झाले. फ्लॅशचा लखलखाट, सर इथे उभं राहून एक फोटो सर त्या पोस्टर्जवळ उभं राहून एक फोटो.. कंटाळा येत नसेल का इतक्या फोटोला, फ्लॅशला सामोरं जाऊन.. असला तरी तो न दाखवायचं आणि एन्जॉय करायचं कसब नक्की बाणवायला लागतं ह्यांना.
मग दिसले नितिश भारद्वाज. लिफ्ट्मधून ते बाहेर आले तेव्हा फारसे कोणाचे लक्ष नव्हते. मला वाटतं मलाच पहिल्यांदा दिसले ते. मी सामीच्या आईला दाखवले, काकू हे नितिश भारद्वाज वाटत आहेत ना? आणि त्यांनी ते ऐकले असावे. आम्हा दोघींकडे बघून ते इतकं छान हसले ना की, मी तर खल्लास, डोळ्यासमोर लहानपणी महाभारतात पाहिलेला कृष्ण आणि अगदी तसाच हसतोय.. आहाहा.. श्रीरंग गोड्बोले यांनी नितिश भारद्वाज ह्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मग दिसल्या तनुजामॅम. खूप खूप हसर्या, ओळखीतल्या सगळ्यांची आवर्जून चौकशी करणार्या, एखादी हसरी बाहुली जणू. उपस्थित असलेल्या प्रत्येकाने स्वतःच्या तोफांसारख्या मोठ्या मोठ्या कॅमेराने, त्याहून मोठा झगमगाट करणाररे फ्लॅश वापरून फोटो काढायला सुरुवात केली. त्यासोबत त्यांच्या मध्ये मध्ये लुडबुडायला सामीचा छोटा कॅमेरा आणि घारूअण्णाचा मोबाईल कॅमेरा होताच.
अजूनही सेलिब्रिटिज येतच होते. मृणाल देव, संदिप कुळकर्णी, मॄणाल देशपांडे, सई परांजपे. तिथे सई परांजपेना पाहून खूप समाधान वाटले. त्यांच्या दूरदर्शनवरच्या सिरियलचं नाव आठवायचा खूप प्रयत्न केला, नाहीच आठवलं पण त्यांना पाहाताच त्या सिरियलची एक झलक डोळ्यासमोरून निघून गेली.
मधे मधे जिप्सी आमचे फोटो काढत होताच.
सगळे जिची आतुरतेने वाट पाहात होते ती काजोल तितक्यात तिथे आली. सगळ्यांचा घोळका तिच्याभोवती जमला. तिला सगळ्यांनी इतके घेरले की तिला तनुजा दिसल्याच नाहीत. तनुजा देखील थोड्या बाजूला उभ्या राहून लेकीचे कौतुक पाहिले. त्यांनी हा क्षण अनेकदा अनुभवला असेल. मुलांचे कौतुक इतरांनी केले की कोणत्याही आईच्या चेहर्यावर कसे अपार समाधान पसरते तसे समाधानी कौतुकाचे हास्य कालही त्यांच्या चेहर्यावर होते. काजोलला पूर्वी सावळी का म्हणायचे देव जाणे इतकी सुंदर, हसरी, उत्साही आणि मुळात "नो सावळी". बारीक गुलाबी बॉर्डरची पिवळ्या सोनसळी रंगाची साडी. गळ्यात कानात काही न घालता नाकात छोटीशी नथ. स्टाईल स्टेटमेण्ट. गोर्जियस हा एकच शब्द खूप भावना वापरून म्हटला तरच ... आणि तोच शब्द तिला सूट होईल. सचिन खेडेकर, तनुजा, काजोल ह्यांचे एकत्र अनेक फोटो काढले सार्या हौशी फोटोग्राफर्सनी. प्रत्येक क्षणाला प्रत्येक कोपर्यातून एक तरी फ्लॅश लखलखत होता. लाऊंज एरिया मधला मंद प्रकाश आणि त्यामुळे वापरलेले प्रचंड झगमगाट करणारे फ्लॅश ह्यामुळे सगळ्यांच्याच डोळ्याला त्रास होतो, तनुजामॅमनाही झाला, एक तर मध्यंतरी त्या आजारी होत्या. त्यांनी फोटोग्राफी थांबवायला सांगितली, तरीसुद्धा अनेक हौशीं आणि ओळखीच्यांच्या छोट्या कॅमेरांना त्यांनी नाकारले नाही.
बराच उशीर झाला होता, सिनेमा सुरू व्हायला हवा होता.
वर्सोवा सिनेमॅक्स ही एक नावाजलेली जागा, अनेक सिनेमांचे प्रिमियर तिथे होतात. पण नाव सार्थ न करणं हा एक गुणधर्म तिथे सार्थ केला थिएटरच्या व्यवस्थापकांनी. थिएटरमध्ये खूप जास्त कुबट वास येत होता. व्यवस्थापकांनी ह्याची काळजी घ्यायला हवी होती.
चित्रपट आणि चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांची ओळख करून द्यायला श्रीरंग गोडबोले यांनी सुरुवात केली. इथेही माझा भ्रमनिरास झाला. मराठी सिनेमा, जवळजवळ सगळे उपस्थित मराठी, गोडबोले स्वतः उत्तम मराठी बोलतात असे असताना त्यांनी बोलायला सुरुवात केली इंग्रजीतून. सिनेमातले महत्वाचे सगले कलाकार हजर असताना सुहास जोशी मात्र प्रिमियरला नव्हत्या.
इतका वेळ ज्यासाठी थांबलो तो सिनेमा सुरू झाला. पहिलाच प्रसंगात वापरलेलं डिजिटल तंत्रज्ञान. खटकलं. कारण अनुभवी, जाणकार नजरांना ते लगेच ओळखू आलं.
सिनेमा पुढे सरकत होता.
सुहास जोशींचा अनुभवी अभिनय. दु:खी प्रसंगात स्वतःला सावरून पुढे जाताना आलेला त्यांच्या बोलण्यातला खटका खूपच छान.
सचिन खेडेकर ह्यांच्या मुलीचं काम करणारी पूर्वी भावे, प्रसन्न चेहरा, खळाळतं हास्य, चेहर्यावरचे पारदर्शक भाव - अतिशय सुंदर अभिनय.
सचिन खेडेकर आपल्यासारख्याच दिसणार्या माणसाच्या घरी जातात आणि त्याला भेटतात आणि त्या माणसाची, समोर आपल्या सारखाच माणूस दिसल्यावरची प्रतिक्रिया, धप्प ... मस्तच.
खेडेकरांनी पूर्ण सिनेमात त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळत नसताना त्यांची होणारी घालमेल खूप चांगल्या प्रकारे व्यक्त केली आहे. जेव्हा ते त्यांच्या व्यथा, त्यांना पडलेले न सांगता येणारे प्रश्न डोळ्यातून व्यक्त करतात तेव्हा ती व्यक्तिरेखा आपल्या मनाची अचूक पकड घेते. ते खूप चांगले अभिनेते आहेतच, प्रश्नच नाही, पण त्यांनी दयाघना गाण्यावर नाचताना ज्या स्टेप्स केल्या आहेत बालकलाकार बने ह्याच्याबरोबर त्याही खूप छान. फक्त त्या गाण्याला नृत्याच्या स्टेप्सची खरच गरज होती का एवढा प्रश्न आम्हाला पडला. त्या स्टेप्स नसत्या तर ते गाणं नैसर्गिकरित्या अधिक खुललं असतं.
भागिरथी मन मोकळं करताना, डोक्यावरचा पदर उतरवताना, भूतकाळात जाताना, तनुजा केलेला अभिनय कोणी शब्दात तर व्यक्त करूच शकत नाही, त्याकरता तो प्रसंगच पाहायला हवा. परंतु तरुण वयातली भागिरथी आणि वर्तमानात प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी ह्यांना भेटलेली भागिरथी ह्यांच्यात असलेला फरक प्रेक्षकांना खटकतो. तरुण वयातल्या भागिरथीचा अभिनयदेखील चांगला आहे, पण वयानुसार डोळ्यांचा रंग बदलत नाही ह्याचा तरुण वयातल्या भागिरथीसाठी अभिनेत्री निवडताना विसर पडला असेल कदाचित.
प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी ह्यांच्यासारखा दिसणारा तो माणूस नक्की कोण? तनुजा ह्यांनी रेखाटलेल्या भागिरथी ह्या कोण? त्यांचा प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी ह्यांच्याशी काय संबंध असावा, ह्याचा अंदाज प्रेक्षकांना मध्यंतरापूर्वीच होतो, तरिही प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. पुढे काय होईल? भागिरथी कशा वागतील, प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी काय करतील? त्या पित्याची अंतिम इच्छा कोणती होती, ती पूर्ण करणं प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी ह्यांना जमेल का? त्यात त्यांच्या कुटुंबियांचे मत काय असेल? ह्या सगळ्यांची उत्तरं हवी असतील तर पितृऋण पाहायलाच हवा.
वाई, कोकण, सातारा येथील मनमोहक लोकेशन्स, कौशल इनामदार यांचे मधुर संगीत, कलाकारांचा सशक्त अभिनय, कथेची सुसूत्र आणि सशक्त मांडणी ह्यात सिनेमातले छोटे छोटे खटकलेले प्रसंग - भरतनाट्यम नाचात वापरलेला गजरा, मध्ये मध्ये दिसणारा प्लॅस्टिकचा गजरा, भूतकाळातल्या गाण्यात वर्तमानातल्या फॅशनच्या साड्या - विसरून जायला काहीच हरकत नाही. मी तर म्हणेन अभिनय आणि संगीतासाठी हा सिनेमा एकापेक्षा जास्त वेळा पाहायलाही हरकत नाही
दीपांजली - सावळी म्हणून
दीपांजली - सावळी म्हणून जिच्याबद्दल ऐकलय ती मुळात सावळी न दिसल्याने जास्त छान वाटले असेल. (सावळे पणाचा न्युनगंड जायला हवा, पण जात नाही. काय करायचं)
अरे अजून एक घटना, प्रीमियर संपला, आम्ही मॉलमधून देखील बाहेर आलो. तिथे तनुजा बोलत उभ्या होत्या. त्या निघता निघता त्यांना फोटोसाठी विनंती केली, सामीने लिहिले तसे त्यांच्याशी बोलताना त्यांनी सिनेमा आवडला का हे तर विचारलेच पण सामीच्या आई फोटो काढताना तनुजासोबत फोटो काढायचा म्हणून अवघडल्या होत्या तेव्हा त्यांच्या खांद्याभोवती हात टाकून त्यांना जवळ घेऊन त्यांना कम्फर्टेबल करवले तनुजा यांनी.
सावळेपणाचा न्युनगंड ? ओह
सावळेपणाचा न्युनगंड ? ओह म्हणजे जे मला वाटले साधारण तेच तुला म्हणायचे होते तर ..
इतक्या सुपरमॉडेल्स , ब्युटी क्वीन्स , सुपरस्टार्स आहेत डस्की , सोडा ते इन्फोरियॉरिटी कॉम्प्मेक्स फॉर नो रिझन ! .. ब्युटी कम्स इन ऑल कलर्स अॅन्ड सायझेस .. असो , या विषयावर कंटाळा आला अता लिहायचा .
एनीवेज विषयान्तराबद्दल सॉरी !
डीजे, हे इतक्या वेळा ऐकलंय की
डीजे, हे इतक्या वेळा ऐकलंय की हल्ली मजा वाटते. "ती अमुक नटी एअरपोर्टवर/मॉलमधे वगैरे दिसली, किती सावळी आहे, मेकपशिवाय किती काळी दिसते"
पुण्याच्या प्रीमियरला उपस्थित
पुण्याच्या प्रीमियरला उपस्थित राहता आल्यामुळे चित्रपट बघायला मिळाला. नेहमीच्या चित्रपट-विषयांपेक्षा वेगळी कथा निवडली आहे. तरी थोडीफार प्रेडिक्टेबल आहेच!
चित्रपटात प्रत्येक मुख्य पात्राचा परिस्थितीशी एक संघर्ष चालू आहे तसेच तो स्वतःशीही चालू आहे. सचिन खेडेकर, तनुजा व सुहास जोशी आपल्या भूमिका समरसून करतात. तनुजाचा वावर हा नेत्रसुखद आहे. तिचा अभिनय, संवाद यांमध्ये ती कोठेही कमी पडत नाही. मात्र मला स्वतःला तिचे मराठी शब्दोच्चार किंचितसे हिंदी उच्चारांची झाक असलेले जाणवले.
चित्रपटातील गाणी सुमधुर आहेत. नंतरही बराच काळ मनात आणि ओठांवर रेंगाळत राहतात. चित्रपटातील दोन्ही नृत्ये (सचिन खेडेकरचे आणि भागिरथीचे भरतनाट्यम्) नसती तरी चालले असते. काही तांत्रिक तपशीलांच्या चुका जाणवतात. पण एकंदरित चित्रपटाच्या पसार्यात त्या नगण्य आहेत.
छान लिहिलंयस वल्लरी
छान लिहिलंयस वल्लरी
आज सिनेमा पाहिला. सर्वांचा
आज सिनेमा पाहिला. सर्वांचा अभिनय उत्तम असूनही तेवढासा नाही आवडला.कथेचा मूळ गाभा म्हणजे भागिरथीचा सल.तोच मुळात नीट न फुलवला गेला नाही.
सिनेमातले बरेच खटकलेले प्रसंग आहेत.कोकणातील वातावरण की साउथ इंडियन (कन्नड) वातावरण ठेवायचे यात दिग्दर्शकाची डुलकी लागली म्हणा.पहिल्याच शॉटमधे कोकणी मामीच्या उजव्या नाकात चमकी, नायिकेच्या साउथ इंडियन साड्या इ. खडे टोचल्यासारखे वाटत होते.दुसरा व्यंकटेश हा कुलकर्णी दाखवला असून शेती करताना( नाच करताना) दाखवला आहे.नंतर संगीत विदयालयासाठीचा शॉट.नेनका काय व्यवसाय? १९६०च्या वेळची कथा घडलेली असून भागिरथीचे मुंडन केलेले दाखवले आहे,ते पचत नाही.असो.
बाकी सचिन खेडेकरची उलाघाल मस्त दाखवली आहे. . तनुजा,सुहास जोशीं,सचिन खेडेकर इ.चा अभिनय झकास!
मला खूप आवडला सिनेमा. मला पण
मला खूप आवडला सिनेमा. मला पण १९६० मध्ये भागीरथीचे मुंडण केलेले पटले नव्हते. मग वाटल काय माहित खेडेगावात असेल पण १९६० साली तशी पद्धत . आपल्याला तेवढी माहिती नाही . आणखीन एक थोडी तपशिलात चूक वाटली. भगिरथिचा पहिला मुलगा १९६० सालचा म्हणजे आत्ता ५३ वर्षाचा अस समजल तर सचिन खेडेकर आईला म्हणतो ( सुहास जोशीला ) तुमच्या लग्नाला ५५ वर्ष झाली अरी अजून तुला बाबांच्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी माहित नाहीत अस कस ? ( अशा पद्धतीचा काही तरी ) तिथे गडबड वाटली कारण भागीरथीच्या नवर्याने १९६० नन्तर लग्न केले असे धरले तर त्यांच्या लग्नाला ५२ वर्षच होतील ना? बाकी सिनेमा मला तरी सगळ्याच अंगाने आवडला . एक सचिनचा आणि त्या लहान मुलाच गाण सोडलं तर
Pages