पितृऋण - प्रीमीयर वृत्तान्त

Submitted by वेल on 6 December, 2013 - 03:46

काल आम्ही ६ माबोकर पितृऋणच्या प्रीमियरला गेलो, बाकीचे नव्हते, जे नव्हते त्या सगळ्यांसाठी हा वृत्तांत..

पितृऋणच्या प्रीमियरला जायचं म्हणून ऑफिसमधून लवकर निघाले आणि रस्त्यात प्रचंड वाहतूक असून सुदैवाने आम्ही सारे माबोकर वेळेत, सेलिब्रिटिज येण्यापूर्वी वर्सोवा सिनेमक्सला पोहोचलो. तसा शुकशुकाटच होता. हळू हळू एक एक सेलिब्रिटिज येऊ लागले. ह्या सेलिब्रिटिज ना इतकं जवळून पाहायची तशी पहिलीच वेळ. कोणत्या सेलिब्रिटिचे नाव काय ते कोणत्या सिरियल मध्ये किंवा कोणत्या सिनेमा मध्ये आहेत / होते... अनेकदा असंच होतं आपण त्या कलाकारांची मूळ नावं विसरून जातो आणि लक्षात राह्तात त्यांनी रंगवलेली पात्रे.

आम्हाला सर्वात आधी दिसल्या पुढचं पाऊल मधल्या पहिल्या मामी. (नाव अर्थात आठवत नाही.) मग सुहिता थत्ते. होणार सून मध्ये त्यांना अगदी साधी आई आणि प्रेमळ सासू रंगवलय आणि त्या आहेत सुद्धा तशाच साध्या प्रेमळ हसर्‍या (आम्हाला तरी त्या तशाच वाटल्या). त्यांचं खळखळून हसणं पाहाताच आठवण झाली त्यांच्या ८७/८८ मधल्या दिलिप प्रभावळकर ह्यांच्या बरोबरच्या सिरियलची, नाव आठवतय का कोणाला?

श्रीरंग गोडबोले सगळ्यांच्या स्वागताला जातीने हजर होते. सुनिल बर्वे, ऐश्वर्या नारकर, सुमीत राघवन, फुलवा खामकर, अनिकेत विश्वासराव, तुषार दळवी आणि मराठी चित्रपट इंडस्ट्रीमधले (वयाने) लहान मोठे अनेक कलाकार तंत्रज्ञ.

सचिन खेडेकर यांचे आगमन एकदम दमदार झाले. फ्लॅशचा लखलखाट, सर इथे उभं राहून एक फोटो सर त्या पोस्टर्जवळ उभं राहून एक फोटो.. कंटाळा येत नसेल का इतक्या फोटोला, फ्लॅशला सामोरं जाऊन.. असला तरी तो न दाखवायचं आणि एन्जॉय करायचं कसब नक्की बाणवायला लागतं ह्यांना.

मग दिसले नितिश भारद्वाज. लिफ्ट्मधून ते बाहेर आले तेव्हा फारसे कोणाचे लक्ष नव्हते. मला वाटतं मलाच पहिल्यांदा दिसले ते. मी सामीच्या आईला दाखवले, काकू हे नितिश भारद्वाज वाटत आहेत ना? आणि त्यांनी ते ऐकले असावे. आम्हा दोघींकडे बघून ते इतकं छान हसले ना की, मी तर खल्लास, डोळ्यासमोर लहानपणी महाभारतात पाहिलेला कृष्ण आणि अगदी तसाच हसतोय.. आहाहा.. श्रीरंग गोड्बोले यांनी नितिश भारद्वाज ह्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मग दिसल्या तनुजामॅम. खूप खूप हसर्‍या, ओळखीतल्या सगळ्यांची आवर्जून चौकशी करणार्‍या, एखादी हसरी बाहुली जणू. उपस्थित असलेल्या प्रत्येकाने स्वतःच्या तोफांसारख्या मोठ्या मोठ्या कॅमेराने, त्याहून मोठा झगमगाट करणाररे फ्लॅश वापरून फोटो काढायला सुरुवात केली. त्यासोबत त्यांच्या मध्ये मध्ये लुडबुडायला सामीचा छोटा कॅमेरा आणि घारूअण्णाचा मोबाईल कॅमेरा होताच.

अजूनही सेलिब्रिटिज येतच होते. मृणाल देव, संदिप कुळकर्णी, मॄणाल देशपांडे, सई परांजपे. तिथे सई परांजपेना पाहून खूप समाधान वाटले. त्यांच्या दूरदर्शनवरच्या सिरियलचं नाव आठवायचा खूप प्रयत्न केला, नाहीच आठवलं पण त्यांना पाहाताच त्या सिरियलची एक झलक डोळ्यासमोरून निघून गेली.

मधे मधे जिप्सी आमचे फोटो काढत होताच.

सगळे जिची आतुरतेने वाट पाहात होते ती काजोल तितक्यात तिथे आली. सगळ्यांचा घोळका तिच्याभोवती जमला. तिला सगळ्यांनी इतके घेरले की तिला तनुजा दिसल्याच नाहीत. तनुजा देखील थोड्या बाजूला उभ्या राहून लेकीचे कौतुक पाहिले. त्यांनी हा क्षण अनेकदा अनुभवला असेल. मुलांचे कौतुक इतरांनी केले की कोणत्याही आईच्या चेहर्‍यावर कसे अपार समाधान पसरते तसे समाधानी कौतुकाचे हास्य कालही त्यांच्या चेहर्‍यावर होते. काजोलला पूर्वी सावळी का म्हणायचे देव जाणे इतकी सुंदर, हसरी, उत्साही आणि मुळात "नो सावळी". बारीक गुलाबी बॉर्डरची पिवळ्या सोनसळी रंगाची साडी. गळ्यात कानात काही न घालता नाकात छोटीशी नथ. स्टाईल स्टेटमेण्ट. गोर्जियस हा एकच शब्द खूप भावना वापरून म्हटला तरच ... आणि तोच शब्द तिला सूट होईल. सचिन खेडेकर, तनुजा, काजोल ह्यांचे एकत्र अनेक फोटो काढले सार्‍या हौशी फोटोग्राफर्सनी. प्रत्येक क्षणाला प्रत्येक कोपर्‍यातून एक तरी फ्लॅश लखलखत होता. लाऊंज एरिया मधला मंद प्रकाश आणि त्यामुळे वापरलेले प्रचंड झगमगाट करणारे फ्लॅश ह्यामुळे सगळ्यांच्याच डोळ्याला त्रास होतो, तनुजामॅमनाही झाला, एक तर मध्यंतरी त्या आजारी होत्या. त्यांनी फोटोग्राफी थांबवायला सांगितली, तरीसुद्धा अनेक हौशीं आणि ओळखीच्यांच्या छोट्या कॅमेरांना त्यांनी नाकारले नाही.

बराच उशीर झाला होता, सिनेमा सुरू व्हायला हवा होता.

वर्सोवा सिनेमॅक्स ही एक नावाजलेली जागा, अनेक सिनेमांचे प्रिमियर तिथे होतात. पण नाव सार्थ न करणं हा एक गुणधर्म तिथे सार्थ केला थिएटरच्या व्यवस्थापकांनी. थिएटरमध्ये खूप जास्त कुबट वास येत होता. व्यवस्थापकांनी ह्याची काळजी घ्यायला हवी होती.

चित्रपट आणि चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांची ओळख करून द्यायला श्रीरंग गोडबोले यांनी सुरुवात केली. इथेही माझा भ्रमनिरास झाला. मराठी सिनेमा, जवळजवळ सगळे उपस्थित मराठी, गोडबोले स्वतः उत्तम मराठी बोलतात असे असताना त्यांनी बोलायला सुरुवात केली इंग्रजीतून. सिनेमातले महत्वाचे सगले कलाकार हजर असताना सुहास जोशी मात्र प्रिमियरला नव्हत्या.

इतका वेळ ज्यासाठी थांबलो तो सिनेमा सुरू झाला. पहिलाच प्रसंगात वापरलेलं डिजिटल तंत्रज्ञान. खटकलं. कारण अनुभवी, जाणकार नजरांना ते लगेच ओळखू आलं.

सिनेमा पुढे सरकत होता.

सुहास जोशींचा अनुभवी अभिनय. दु:खी प्रसंगात स्वतःला सावरून पुढे जाताना आलेला त्यांच्या बोलण्यातला खटका खूपच छान.

सचिन खेडेकर ह्यांच्या मुलीचं काम करणारी पूर्वी भावे, प्रसन्न चेहरा, खळाळतं हास्य, चेहर्‍यावरचे पारदर्शक भाव - अतिशय सुंदर अभिनय.

सचिन खेडेकर आपल्यासारख्याच दिसणार्‍या माणसाच्या घरी जातात आणि त्याला भेटतात आणि त्या माणसाची, समोर आपल्या सारखाच माणूस दिसल्यावरची प्रतिक्रिया, धप्प ... मस्तच.

खेडेकरांनी पूर्ण सिनेमात त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळत नसताना त्यांची होणारी घालमेल खूप चांगल्या प्रकारे व्यक्त केली आहे. जेव्हा ते त्यांच्या व्यथा, त्यांना पडलेले न सांगता येणारे प्रश्न डोळ्यातून व्यक्त करतात तेव्हा ती व्यक्तिरेखा आपल्या मनाची अचूक पकड घेते. ते खूप चांगले अभिनेते आहेतच, प्रश्नच नाही, पण त्यांनी दयाघना गाण्यावर नाचताना ज्या स्टेप्स केल्या आहेत बालकलाकार बने ह्याच्याबरोबर त्याही खूप छान. फक्त त्या गाण्याला नृत्याच्या स्टेप्सची खरच गरज होती का एवढा प्रश्न आम्हाला पडला. त्या स्टेप्स नसत्या तर ते गाणं नैसर्गिकरित्या अधिक खुललं असतं.

भागिरथी मन मोकळं करताना, डोक्यावरचा पदर उतरवताना, भूतकाळात जाताना, तनुजा केलेला अभिनय कोणी शब्दात तर व्यक्त करूच शकत नाही, त्याकरता तो प्रसंगच पाहायला हवा. परंतु तरुण वयातली भागिरथी आणि वर्तमानात प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी ह्यांना भेटलेली भागिरथी ह्यांच्यात असलेला फरक प्रेक्षकांना खटकतो. तरुण वयातल्या भागिरथीचा अभिनयदेखील चांगला आहे, पण वयानुसार डोळ्यांचा रंग बदलत नाही ह्याचा तरुण वयातल्या भागिरथीसाठी अभिनेत्री निवडताना विसर पडला असेल कदाचित.

प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी ह्यांच्यासारखा दिसणारा तो माणूस नक्की कोण? तनुजा ह्यांनी रेखाटलेल्या भागिरथी ह्या कोण? त्यांचा प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी ह्यांच्याशी काय संबंध असावा, ह्याचा अंदाज प्रेक्षकांना मध्यंतरापूर्वीच होतो, तरिही प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. पुढे काय होईल? भागिरथी कशा वागतील, प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी काय करतील? त्या पित्याची अंतिम इच्छा कोणती होती, ती पूर्ण करणं प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी ह्यांना जमेल का? त्यात त्यांच्या कुटुंबियांचे मत काय असेल? ह्या सगळ्यांची उत्तरं हवी असतील तर पितृऋण पाहायलाच हवा.

वाई, कोकण, सातारा येथील मनमोहक लोकेशन्स, कौशल इनामदार यांचे मधुर संगीत, कलाकारांचा सशक्त अभिनय, कथेची सुसूत्र आणि सशक्त मांडणी ह्यात सिनेमातले छोटे छोटे खटकलेले प्रसंग - भरतनाट्यम नाचात वापरलेला गजरा, मध्ये मध्ये दिसणारा प्लॅस्टिकचा गजरा, भूतकाळातल्या गाण्यात वर्तमानातल्या फॅशनच्या साड्या - विसरून जायला काहीच हरकत नाही. मी तर म्हणेन अभिनय आणि संगीतासाठी हा सिनेमा एकापेक्षा जास्त वेळा पाहायलाही हरकत नाही

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वल्लरी, छान लिहिला आहेस वृत्तांत. आणि जिप्सीने टाकलेले प्रचिही मस्तच!
ही कादंबरी वाचली आहे आणि सिनेमा 'मस्ट सी' च्या यादीत आहे.
रच्याकने, सीतेच्या पुढच्या भागाचं प्रॉमिस विसरलीस वाटतं सिनेमा बघण्याच्या नादात!:P Proud Proud

वल्लरी, छान लिहिलेय.
आता काजोलनेही एखादा मराठी चित्रपट करायला हवा. तिला आव्हान वाटेल अशी भुमिका मात्र हवी.

(कलाकार या शब्दाचा टायपो झालाय, जरा सुधारणार का ?)

छान आहे वृत्तान्त.
सई परांजपेंनी सख्खे शेजारी नाटकाचीच मालिका केली होती बहुतेक. गजराचे काही भाग त्यांनी केलेले आठवताहेत. हिंदीत रामेश्वरी आणि अमोल पालेकर यांना घेऊन केलेली अडोस पडोस आणि विनीला घेऊन केलेली छोटे बडे अशा दोन मालिका आठवताहेत.

एक प्रसंग लिहायचा राहिला. मध्यांतरात आम्ही खाणे हातात घेऊन थिएटरमध्येजात होतं. सामीच्या आईच्या हातात कॉफी होती. आम्ही बसलो होतो त्या रांगेच्या सुरुवातीला एक वृद्ध जोडपे बसले असल्याने सामीच्या आई रांगेत शिरताना थोड्या अडखळल्या. त्यांच्या मागे मृणाल देशपाण्डे उभ्या होत्या.त्यांनी तत्परतेने सामीच्या आईला विचारले, " मी पकडू का तो कप?" असे जिव्हाळ्याने फार कमी लोक विचारतात. म्हणून मुद्दाम लिहिले.

मस्त वृत्तान्त.
पितृऋण वाचले आहे. तुम्हाला काही कल्पना आहे का की कादंबरीप्रमाणेच स्टोरी आहे की काही बदल केले आहेत.

तुम्हाला काही कल्पना आहे का की कादंबरीप्रमाणेच स्टोरी आहे की काही बदल केले आहेत.

मेलोडी खाओ खुद जान जाओ, सारखेच सिनेमा देखो खुद जान जाओ Happy

साधारणपणे कथा/कादंबरीवरुन चित्रपट बनवताना थोडेफार बदल करतातच ना लोक. दोन तिन व्रु. आलेत माबोवर त्यावरुन तुम्हाला अंदाज आला असेलच.

काजोलला पूर्वी सावळी का म्हणायचे देव जाणे इतकी सुंदर, हसरी, उत्साही आणि मुळात "नो सावळी".
<<<
हे वाचल्यावर एक विचार अला मनात , जस्ट शेअरिंग व्हॉट आय थॉट (आय मे बी राँग)
या वाक्य रचनेतून चुकून (इनडायरेक्ट्ली) असा अर्थ निघतोय कि सावळी म्हणजे फार सुंदर नाही पण प्रत्यक्षात ती सावळी नसल्याने इतकी सुंदर वाटली Happy , अर्थात तुला देखील असं नक्कीच म्हणायचं नसेल !

एनीवेज .. मेरे ख्वाबोमे जो आये मधली काजोल आणि फोटोतली काजोल खरच दोन वेगळ्या व्यक्ती वाटाव्या असा फरक दिसतोय स्किन टोन मधे !
डस्की ब्युटी म्हणून बरेचदा उल्लेख होयचा बाजिगर दिलवाले च्या काळात करिअर च्या पिक ला असताना तिचा!
त्या काळातल्या सिनेमातल्या फोटोग्राफीमुळे कि काजोल ने अत्ता काही कॉस्मॅटीक ट्रिटमेन्ट केलीये माहित नाही पण फरक दिसतोय स्किन टोन मधे .

हो मलाही गेल्या २-३ वर्षांतले तिचे फोटो पाहून स्कीन टोन मधे फरक जाणवत होता, आता जिप्सीच्या फोटोंमधे (आणि डिडीएलजे मधे) तर चांगलाच जाणवतोय. Happy

हो मलाही गेल्या २-३ वर्षांतले तिचे फोटो पाहून स्कीन टोन मधे फरक जाणवत होता, आता जिप्सीच्या फोटोंमधे (आणि डिडीएलजे मधे) तर चांगलाच जाणवतोय.
<<<+१
बाजिगर डीडीएलजे ची काजोल आणि जिप्सीच्या फोटोतली काजोल २ वेगळ्या व्यक्ती वाटाव्या असा फरक दिसतोय स्किन टोन मधे .
अलीकडच्या फना वगैरे मुव्हीज पासूनच दिसायला लागला हा फरक.

हा फर्क मला शिल्पा ( शेट्टि) मधे पण जाण्वतो, म्हणजे स्किन टोन मधला... बाकि कॉ . चेन्जेस सर्वश्रुत आहेत.

एक प्रसंग लिहायचा राहिला. मध्यांतरात आम्ही खाणे हातात घेऊन थिएटरमध्येजात होतं. सामीच्या आईच्या हातात कॉफी होती. आम्ही बसलो होतो त्या रांगेच्या सुरुवातीला एक वृद्ध जोडपे बसले असल्याने सामीच्या आई रांगेत शिरताना थोड्या अडखळल्या. त्यांच्या मागे मृणाल देशपाण्डे उभ्या होत्या.त्यांनी तत्परतेने सामीच्या आईला विचारले, " मी पकडू का तो कप?" असे जिव्हाळ्याने फार कमी लोक विचारतात. म्हणून मुद्दाम लिहिले.>>

अरे वल्लरी मला हे माहीत न्हवते, आय मीन आई ने मला सांगितले पण मृणाल देशपाण्डे होत्या ते माहीत न्हवते. हा किस्सा सांगताना पण आईला त्या अज्ञात व्यक्तिचे कौतूक वाटत होते.

इव्हन तनुजा पण आपल्याशी बोलताना खूप मोकळेपणाने बोलल्या. आवडला ना तुम्हाला सिनेमा असे आवर्जून विचारले.

अत्ता काही कॉस्मॅटीक ट्रिटमेन्ट केलीये माहित नाही पण फरक दिसतोय स्किन टोन मधे . >> कॉस्मेटिक ट्रीटमेंट तर आहेच पण तिने एका इंटरव्युमधे सांगितलं होतं की त्याकाळात तिला मेकपची इतकी समज नव्हती, शिवाय स्कीन केअर पण अजिबात घेतली जायची नाही, परिणामी तिची स्किन टॅन दिसायची. आता मात्र ती स्किनची व्यवस्थित काळजी घेते. इत्यादि. खखोदे(वगण)जा. Happy

Pages