अश्वत्थामा, व्यासांचा आणि जीएंचा!

Submitted by अतुल ठाकुर on 4 December, 2013 - 18:44

G_A_Kulkarni.jpg

जीएंना महाभारताचे खुप आकर्षण होते हे आता सर्वश्रुत आहे. प्रतिभावंताचा विषय निघाला की जीए हटकुन व्यासांचे नाव घेत. जीएंच्या कथांमध्ये काही ठिकाणी महाभारताचे संदर्भ आलेले आढळतात. त्या उपमांनी, संदर्भांनी जीएंच्या कथांना एक वेगळीच श्रीमंती बहाल केलेली दिसते. त्यादृष्टीने जीएंची पत्रे महत्वाची आहेत. विशेषतः सुनिताबाईंना लिहिलेल्या जीएंच्या पत्रांत त्यांनी महाभारतावर, त्यातील व्यक्तीरेखांवर चर्चा केली आहे. ज्या तर्‍हेने जीए या विषयावर लिहितात त्यावरुन हे जाणवते की महाभारत हा त्यांच्या सततच्या चिंतनाचा विषय असावा. त्यांनी त्यावर स्वतंत्रपणे लिहिले असते तर आमच्यासारख्या जीएप्रेमींना आणखि एक खजिना कायमस्वरुपी प्राप्त झाला असता. आणि तो ही अक्षय असा. कारण जीएंचे लिखाण कितीही काळानंतर पुन्हा पुन्हा वाचले तरी त्यात नवीन काहीतरी मिळतेच. मात्र बारकाईने पाहिले असता हे जाणवते कि जीए त्यातील सर्व व्यक्तीरेखांबद्दल भरभरुन बोलत नाहीत. कर्णाच्या दु:खाने जीए विचलित झाले नाहीत. वेदनेचे वरदान मागणार्‍या कुंतीचे दु:ख जीएंना फारसे आकर्षित करु शकले नाही. फार काय, महाभारतातील तत्वज्ञांचा मेरुमणी जो कृष्ण, त्याच्याबद्दलही जीए फारसे बोलताना आढळत नाहीत. जीए बोलतात ते अश्वत्थाम्याबद्दल. आणि ते बोलत असताना त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेने त्यावर ते स्वतःचे असे वेगळे भाष्य करतात. ते वाचताना पुनःपुनः हे म्हणावेसे वाटते कि यावर जीएंनी स्वतंत्र लिहायला हवे होते. जीएंना महाभरतात हे व्यक्तीरेखा का भावली? त्या व्यक्तीरेखेला व्यासाने जसे रंगवले आहे त्याहुन वेगळे असे जीएंनी त्यात काय शोधले? जीएंच्या स्वतःच्या तत्वज्ञानाशी जुळणारी अशी ही व्यक्तीरेखा त्यांना वाटली असावी काय? या प्रश्नांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

व्यासांनी जो अश्वत्थामा रंगविला आहे त्याला फारसे कंगोरे नाहीत अशी माझी समजुत आहे. मात्र त्याच्याशी निगडीत जनमानसातील पाण्यात पीठ मिसळुन ते दुध म्हणुन अश्वत्थाम्याला प्यावे लागत असे ही कथा प्रसिद्ध आहे. तेथपासुन अश्वत्थाम्याच्या उल्लेखाला प्रामुख्याने सुरुवात होते. या कथेने अर्थातच द्रोणाचे दारिद्र्य अधोरेखित केले जाते. त्यानंतर पुढे इतर कौरव पांडव यांच्याबरोबर त्याचा पिता द्रोण त्याला शिक्षण देतो. त्यातदेखिल त्याने फारशी चमक दाखवल्याचे दिसत नाही. कपटाने वागुन पोटच्या मुलाला जास्त शिक्षण देण्याचा द्रोणाचा डाव अर्जुन हाणुन पाडतो. मात्र पुढे स्वतः द्रोणाला देखिल आपल्या मुलाच्या पराक्रमावर भरवसा वाटत नसावा, कारण द्रुपदाच्या पराभवासाठी द्रोण सर्वस्वी आपल्या इतर शिष्यांवर, विशेषतः अर्जुनावर अवलंबुन असतो. यानंतर व्यासप्रणित महाभारतात अश्वत्थाम्याचा प्रामुख्याने उल्लेख येतो तो युद्धप्रसंगीच. तेथेही या महाक्रमी चिरंजीव द्रोणपुत्राकडुन डोळे दिपुन जातील असे काहीही घडत नाही. अजुनपर्यंतचा त्याचा प्रवास हा वडीलांसोबत असावे, दुर्योधनाचे मीठ खाल्ले आहे त्यानुसार खाल्ल्या मीठाला जागावे असाच झालेला दिसतो. त्यानंतर अश्वत्थामा प्रामुख्याने दिसतो ते युद्धाच्या शेवटी, रात्री कपटाने धृष्टद्युम्न आणि द्रौपदीच्या पाच पुत्रांना मारताना. तोपर्यंत त्याचा प्रवास सामान्य असाच झाला आहे. त्याच्या नावावर नजरेत भरेल असा पराक्रम नाही आणि त्याच्याबद्दल शिसारी वाटेल असे कृष्णकृत्यही नाही.

पुढे त्याच्या हातुन द्रौपदीचे पुत्र आणि भाऊ धृष्टद्युम्न मारले जातात. त्याच्या मस्तकावरील मण्यासाठी द्रौपदी अडुन बसते. अर्जुन समोर येताच अश्वत्थामा ब्रम्हास्त्र सोडतो. त्याला तोड म्हणुन अर्जुनही ब्रह्मास्त्राचाच प्रयोग करतो आणि जगाच्या अंताची वेळ येते. त्यावेळी व्यास मध्ये पडुन उभयतांना ती शस्त्रे परत घ्यायला सांगतात. अस्त्रांमध्ये निपुण अर्जुनाला ते परत घेण्याचीही विद्या माहीत असते. मात्र अश्वत्थाम्याला ते परत घेता येत नाही. तो ते अस्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडतो. कृष्ण उत्तरेच्या गर्भाला वाचवतो आणि अनंत काळ पर्यंत ही ओली जखम बाळगत हिंडत राहशील अशा तर्‍हेचा शाप कृष्ण अश्वत्थाम्याला देतो.त्यानंतर कृष्णाला मस्तकावरील मणी देऊन तो तेथुन निघुन जातो. जनमानसात आजदेखिल अश्वत्थामा नर्मदातीरावर फिरत असल्याचा समज आहे. तो जखमेवर लावण्यासाठी तेल मागत हिंडतो. नर्मदा परिक्रमेत अश्वत्थामा दिसल्याच्या कथादेखिल प्रसिद्ध आहेत. खुद्द जीएंनी सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रात आपला अश्वत्थाम्याबद्दलचा अनुभव वर्णिलेला आहे. अशा या अश्वत्थाम्याच्या या आयुष्यावर वेगळा प्रकाशझोत पाडला तो सर्वप्रथम “युगान्त” मध्ये इरावती कर्वे यांनी. “परधर्मो भयावहः” या लेखात ईरावती बाईंनी द्रोण-अश्वत्थामा हे पितापुत्र विस्मृतीचे उत्तम उदाहरण असल्याचे म्ह्टले आहे. ब्राह्मण असुन क्षत्रियांचा धर्म पाळणारी आणि तो पाळताना स्वधर्म विसरुन गेलेली ही पराक्रमी माणसे. द्रोणाने क्षत्रिय धर्म पाळताना कुणालाही दयामाया दाखवली नाही. पुत्राने तर रात्री कपटाने माणसे ठार करुन पुढची पायरी गाठली.

जीएंचा अश्वत्थामा मात्र व्यास आणि ईरावतीबाईंच्या अश्वत्थाम्याहुन सर्वस्वी वेगळा आहे. जीएंना सर्वप्रथम या व्यक्तीरेखेतले कारुण्य जाणवले आहे ते पीठ मिसळलेले पाणी दुध म्हणुन आनंदाने पिणार्‍या लहान अश्वत्थाम्याकडे पाहुन. आयुष्यात बराच काळ दारिद्र्य भोगणार्‍या आणि त्याच्या वेदना आपल्या कथेत मांडणार्‍या जीएंना यातील कारुण्य जास्त भेदक वाटल्यास नवल नाही. मात्र वेदनेचा हा प्रवास येथेच संपत नाही. जीए सुनिताबाईंशी चर्चा करताना म्हणतात कि त्यांना कथा या नुसत्या माणसांच्या नको असतात. नुसती माणसे नव्हे तर काही एक विशिष्ठ सिच्युएशनमध्ये सापडलेली माणसे. कुणीतरी काहीतरी बोलतो आणि आमच्यासारख्या सामान्यांच्या मनात आयुष्यभर अंगार धुमसत राहतो असेही एका ठिकाणी जीए म्हणुन जातात. जीएंचे कथानायक घेतले तरी आपल्याला हेच आढळुन येते. “वीज” मधला बळवंत मास्तर हा सर्कशीतल्या मग्रुर सुंदरीकडुन अपमानीत झालेला आहे. “पुरुष” मधील प्राध्यापक निकम तर त्यांच्या अपमानास्पद भुतकाळापासुन सुटण्यासाठी धडपडत आहेत आणि नेमक्या विश्वनाथच्या रुपाने तो भुतकाळ पुन्हा त्यांच्या समोर उभा राहतो. आता त्यातुन त्यांची सुटका नाही. “तळपट” मधील दानय्या आपल्याला देशोधडीला लावणार्‍या रुक्मीणीला शोधत हिंडतो. त्याला ती शेवटपर्यंत मिळतच नाही, ती आग पोटात घेऊनच त्याचा शेवट होतो. सारी विशिष्ठ सिच्युएशनमध्ये सापडलेली माणसे. लेखकाच्या खाजगी जिवनात डोकावण्याचा अगोचरपणा करावासा वाटत नाही त्यामुळे इतकेच म्हणुन थांबतो की जीएंनी स्वतः आपल्या आयुष्यात खुप खुप भोगले आणि त्या दु:खातुन ते शेवटपर्यंत कधीही बाहेर पडु शकले नाहीत. विशिष्ठ सिच्युएशनमध्ये सापडलेला एक माणुस खुद्द जीएंच्यातच होता.

या माणसांची दु:खे शाश्वत आहेत. त्यांची सुटका नाही. मृत्युनंतरच कदाचित सुटका असल्यास असेल. मृत्युनंतर उरणारा सांगाडा, शेवटी तोही विरुन जाईल आणि शेवटी उरणारे शुन्य असा उल्लेख जीएंनी केला आहे. जीएंना मृत्युनंतरच कदाचित या दु:खाची समाप्ती होते असे वाटत असावे त्यामुळे त्यांना मृत्यु आणि आत्महत्या या विषयांचे आकर्षण होते. त्यांची नियती शरणता ही त्यांनी भोगलेल्या आणि कधीही न संपणार्‍या वेदनेतुन आली असावी. या कधीही न संपणार्‍या वेदनेचा दाह सोसणारा चिरंजीव अश्वत्थामा जीएंना महाभरतात भेटला. तो त्यांना जवळचा वाटला. अश्वत्थाम्याच्या वेदनेला क्षमेचे वरदान नाही. कसल्याही सावलीची शीतलता नाही. तात्पुरता विसावा नाही. त्याच्या कपाळी आहे ते सतत हिंडणे. ओली वाहाती, कधीही बरी न होणारी जखम कपाळावर बाळगत फिरत राहणे. जखमेचा दाह असह्य झाल्यास त्यासाठी लोकांकडे तेलाची भीक मागणे. ती झाकण्यासाठी त्यावर कापड गुंडाळणे. पण त्याहीपेक्षा एक महाभयानक शिक्षा त्याच्या कपाळी आहे. ती म्ह्णजे पश्चात्तापाची शिक्षा. “इस्कीलार” मध्ये जीए “प्रत्यक्ष आघातापेक्षाही असह्य अशी पश्चात्तापाची शिक्षा त्याने मागे ठेवली” असे लिहितात. अश्वत्थामा चिरंजीव आहे म्हणुन त्याची वेदनाही चिरंजीव आहे. अशा या अश्वत्थाम्याची व्यक्तीरेखा ही जीएंना महाभारतातील intriguing personality वाटत होती.

मात्र जीए तेथेच थांबले नाहीत. त्यांनी कथेत त्यांच्या अश्वत्थाम्याला राजपुत्र गौतमाजवळ आणले. राजपुत्र आपल्या राज्यातील वृद्ध माणसे, त्यांच्या जरा व्याधी आणि मृत्यु पाहुन उदास, विषण्ण झाला होता. त्यावर उपाय शोधण्याच्या मर्गावर असतानाच त्याला जीएंचा अश्वत्थामा भेटतो. मृत्युवर उपाय शोधणार्‍या गौतमाला चिरंजीव असण्याची वेदना माहीत असण्याचे कारणच नसते. अश्वत्थामा त्याला मृत्युमुळे जिवन किती सुखावह होते ते समजवतो. आणि विस्मयात पडलेल्या गौतमाला “मी अश्वत्थामा आहे” अशी ओळख देऊन निघुन जातो. मानवी जिवनात चिरंतन स्थान असलेली वेदना जिवंतपणी संपली नाही तर दयाळु मृत्यु त्यातुन मानवाची सुटका करतो. मात्र जीएंच्या अश्वत्थाम्याला हाही मार्ग मोकळा नाही. त्याला अनंत काळ जंगलात हिंडतच राहावे लागणार आहे. अशा या अश्वत्थाम्याच्या वेदनेला जीएच सर्वार्थाने जाणु शकले. म्हणुन तर त्यांनी “पिंगळावेळ” मध्ये सुरुवातीलाच Shallow people demand variety — but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. – Strindberg हे वाक्य टाकले आहे. जीएंच्या आयुष्यात ही दुखरी नस सतत मनस्ताप देत राहीली. त्या दु:खाला जाणुन घेण्यासाठी त्यांनी त्याच्या मुळाशी, अगदी गाभ्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला, त्यातुन अजरामर साहित्य निर्माण झाले मात्र जीएंच्या वेदनेचा अंत झाला नाही. जीएंचे अश्वत्थाम्याशी वेदनेचे नाते होते असे मला वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख वाचनीय आहे, आवडला.
अश्वत्थामा या कॅरेक्टर बद्दल इतका विचार केला नव्हता. पण बापाच्या भव्य छायेत खुरटलेलं व्यक्तिमत्व आणि नंतर अशा नाही तर तशा (वाईट प्रकारे) स्वतःला प्रूव्ह करण्याचा डेस्परेट प्रयत्न करणारा असा वाटत आला आहे. शेवटीही त्याला खरंच त्याच्या कृत्यांचा पश्चात्ताप झाला होता की नाही , की नुस्तंच झालेल्या शिक्षेचं वैषम्य होतं ते स्पष्ट झालं नव्हतं मला.
लेखकाच्या वैयक्तिक जीवनात डोकावू नये हे 'नदीचं मूळ आणि ऋषीच्या कुळा'इतकंच खरं. लिखाण डोक्यात ठेवून त्याच्या कर्त्याला भेटावं तर आपल्या पदरी निराशा आणि त्याच्या पदरी नसत्या अपेक्षांची ओझी पडण्याची शक्यता जास्त. >>>> हे फार पटलं!

लिखाण डोक्यात ठेवून त्याच्या कर्त्याला भेटावं तर आपल्या पदरी निराशा आणि त्याच्या पदरी नसत्या अपेक्षांची ओझी पडण्याची शक्यता जास्त. असो.
<<
कृष्णद्वैपायन व्यासांना भेटण्याची ओढ लागून राहिली आहे..
असो.
ओझं सोबत घेऊनच फिरेन म्हणतो Wink

छान लेख!

दुसरे असे की महाभारतात या ना त्या मार्गाने सप्त चीरंजीवांमधले विभीषण आणि बळि सोडता ( थोडक्यात असूर सोडता) सगळे चिरंजीव आले आहेत. अश्वत्थामा हा एकमेव असा चिरंजीव आहे की ज्याला चीरंजीवित्व वरदानाने नव्हे तर शापाने लाभले आहे.

कदाचित हेही अपेक्षित असावे. अन्यथा चीरंजीव रहाणे हीच मोठी वेदना नव्हे काय?

लेख आवडलाच त्यानिमीत्ताने झालेली चर्चाही आवडली.
जीएंची कितीतरी पात्र वाचणार्‍याच्या मनाला "अश्वत्थाम्याची ठसठसती वेदना" कायमची देउन जातात. विसरु म्हणता विसरु शकत नाही.

साजिरा,
"जीएंनी तर मृत्य्ला, दु:खाला आणि ठसठशीला रहस्याचं आणि अद्भूतरम्यतेचं जबरदस्त भक्कम आणि अलौकिक कोंदण दिलं. मृत्युला चौकसपणे बघणं, त्याला निरनिराळ्या रूपकांमधून पुढे आणणं हेही त्या वेदनेच्या आकर्षणाचाच भाग असावेत." >> सुरेख मांडलं आहेस.

लेखकाच्या वैयक्तिक जीवनात डोकावू नये हे 'नदीचं मूळ आणि ऋषीच्या कुळा'इतकंच खरं. >> +१ Happy

महाभारतात या ना त्या मार्गाने सप्त चीरंजीवांमधले विभीषण आणि बळि सोडता ( थोडक्यात असूर सोडता) सगळे चिरंजीव आले आहेत.<<< बिभीषण जरी चिरंजीवी असला तरी तो रामावतार सम्पल्यानंतर मुक्त झालेला आहे. बळी पाताळामधे राज्य करत आहे. हे मन्वंतर संपल्यानंत्तर पुढच्या मन्वंतरामधे हा बळी "इंद्र" अर्थात देवांचा राजा असेल.

लेख छान आहेच, त्यावरची चर्चादेखील तितकीच रोचक. जीएंच्या विद्यार्थांच्या मते, ते काही तितकेसे तर्‍हेवाईक वगैरे नव्हते, जास्त बोलत नसत हे मात्र खरे. पण, अख्ख्या धारवाडमधे फार कमी जणांना ते मराठीमधले एवढे प्रथितयश लेखक आहेत हे माहित होतं. यासंदर्भात जीए कॉलेजमधे कधीही काहीही बोलायचे नाहीत.

नंदिनी....

जी.एं.ची त्यांच्या विद्यार्थ्यांमधील प्रतिमा याबद्दल खूप काही लिहिण्यासारखे आहेच....शिवाय जी.एं.च्या सेवानिवृत्तीनंतर जे.एस.एस.कॉलेजच्या इंग्रजी विभाग प्रमुखपदी निवड झालेल्या डॉ.मालती पट्टणशेट्टी यानीही त्यांच्या कॉलेजजीवनाविषयी खूप सुंदर माहिती दिली आहे. वीस वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानी तिथे काम केले होते त्यामुळे त्याना 'जीए - एक वरीष्ठ प्राध्यापक प्रमुख' तसेच 'जीए - विद्यार्थ्यामधील' आणि 'जीए - एक लेखक' या नात्याने फार जवळून माहितीचे होते. जी.एं.च्या स्टाफ रूममधील खुर्चीवर दुसरे कुणीही बसत नसत इतका त्यांचा दरारा होता. डॉ.पट्टणशेट्टी ज्यावेळी विभागप्रमुख झाल्या त्यावेळी त्याना ते टेबल आणि खुर्ची मिळाली.....जी.ए. नव्हतेच....पण त्या खुर्चीकडे जाताना मॅडमचे हृदय धडधडत होते. त्या खुर्चीला सारे कॉलेज "The judgement seat of Vikramaditya" या नावाने ओळखत.....त्याच गोष्टीची आठवण त्याना आली आणि किमान काही दिवस मॅडमनी त्या खुर्चीवर बसणे टाळलेच.....स्टाफ रूममध्ये आले की प्रथम एक कप चहा घेत....त्याचे आठ आणे लागलीच टेबलवर ठेवत असत....विल्सची सिगारेट ओढत आणि मग टाईम्स ऑफ इंडिया मधील क्रॉसवर्ड पझल सोडविण्यात ते मग्न होऊन जात.

बर्‍याच आहेत आठवणी.

अशोकराव,

जीएंबरोबर प्रत्यक्ष भेटीचे आणि त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारण्याचे भाग्य आपल्याला अनेकदा लाभलेले आहे. त्याबद्दल काही आठवणी लिहीण्याची विनंती पुन्हा एकदा करीत आहे Happy

उत्तम लेख आणि त्याअनुषंगाने झालेली चर्चाही आवडली.
साजिरा,
"जीएंनी तर मृत्य्ला, दु:खाला आणि ठसठशीला रहस्याचं आणि अद्भूतरम्यतेचं जबरदस्त भक्कम आणि अलौकिक कोंदण दिलं. मृत्युला चौकसपणे बघणं, त्याला निरनिराळ्या रूपकांमधून पुढे आणणं हेही त्या वेदनेच्या आकर्षणाचाच भाग असावेत." >> सुरेख मांडलं आहेस. >> अगदी.
लेखकाच्या वैयक्तिक जीवनात डोकावू नये हे 'नदीचं मूळ आणि ऋषीच्या कुळा'इतकंच खरं. >> वा!

<<जीएंबरोबर प्रत्यक्ष भेटीचे आणि त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारण्याचे भाग्य आपल्याला अनेकदा लाभलेले आहे. त्याबद्दल काही आठवणी लिहीण्याची विनंती पुन्हा एकदा करीत आहे >> बाडिस अतुलभौ Happy

इतका सुंदर लेख आणी त्यावर इतक्या सुंदर, अभ्यासु प्रतिक्रिया !! आता पुन्हा नव्याने माबोवर सक्रीय व्हावेसे वाटू लागले आहे. Happy

लेखक, मूळ, कुळ- यासाठी अनुमोदन. मात्र ते शोधण्ञाचे असे प्रयोग आणि प्रयत्न नेहमीच होत असतात. (इथेच जीएंच्या आठवणी गप्पांतून जागवण्याचे विषय होताहेत. Happy ) त्याला काहीच इलाज नाही. ते चूक, बरोबर असं काही म्हणताही येत नाही. लोकोत्तर साहित्यलेखकांची प्रेरणा आणि स्फुर्ती नक्की कुठची, आणि कुठून आली- असा शोध घेण्याचाही विचार यापाठीमागे असतो. आणि एखादा लेखक हा 'माणुस' म्हणून संपूर्णपणे माहित नसल्याने आणि तसा कधीच माहित होण्याची शक्यता नसल्याने स्वभावाबाबत लेबलं लावली जाणं साहजिक आणि 'ह्युमन' आहे.

यार्दी आणि वडेर- या धारवाडच्याच प्राध्यापकद्वयींनी असा प्रयोग जीएंच्या कथांबाबत केला आहे. 'जीएंची कथा- परिसरयात्रा' या पुस्तकाबद्दल जीएप्रेमींना माहिती असेलच. कथेची पात्रं जन्मली आणि जगली- ते परिसर शेधताना जीएंच्या जीवनात आपसुकच डोकावणंही यात आलंच आहे.

cover.jpg

जीएंबरोबर प्रत्यक्ष भेटीचे आणि त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारण्याचे भाग्य आपल्याला अनेकदा लाभलेले आहे. त्याबद्दल काही आठवणी लिहीण्याची विनंती पुन्हा एकदा करीत आहे >> अनुमोदन. Happy

साजिरा...

"....स्वभावाबाबत लेबलं लावली जाणं साहजिक आणि 'ह्युमन' आहे...." ~ मी सहमत आहेच आहे तुमच्या या वाक्याशी.... माझे मत इतकेच की लेखकाचा स्वभाव शोधण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी ते कसे 'विकृत' होते हे वाचकांच्या मनावर ठसविण्यासाठी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणे कितपत योग्य आहे ?

जी.ए. वारंवार सिगारेट ओढत असत....म्हणजे ते बाद
जी.ए. क्लबवर जाऊन रमी खेळत असत.....म्हणजे ते बाद
जी.ए. कुणाच्याही पैशाने चहा घेत नसत....म्हणजे ते बाद
जी.ए. कुठेही जेवायला थांबत नसत....म्हणजे ते बाद
जी.ए. नेहमी काळा चष्मा लावत असत.... म्हणजे ते बाद

~~ असा जो विचित्रपणा पुढे येत गेला त्यांच्या नित्य जीवनशैलीचा....तो रंगविण्यामध्ये कसली आली आहे कला आणि कसले आले आहे त्यांचे रेखाटन ? ज्याला लिहायचे आहे ते 'विदुषक' वर लिहा....'इस्किलार' वर लिहा....चंद्रावळ आहे...गुंतवळ आहे...कैरी तुती राक्षस प्रवासी यात्रिक आहेत...कैक आहेत....तिथे पानामागून पाने लिहा....त्याचे स्वागतच होईल. पण जी.ए. घरी कुणाला भेटत नाहीत, भेटले तर बोलत नाहीत... हे जे प्रवाद आहेत ते निखालस खोटे मानले जावेत. मी कुठेही एकही कथा लिहिलेली नाही...त्यांच्याशी पत्रव्यवहार होता....आणि जी.एं.च्या घरी मी धारवाडला गेलो ते त्यांचेच बोलावणे आले म्हणून....तरीही मी ज्यावेळी बोलावले त्या दिवशी गेलोच नाही [कारण इथे सांगत नाही....]. पाठोपाठ तीन दिवसांनी "का आला नाहीत, पाटील तुम्ही ? माझ्याकडे येणे तुम्हाला अवघड वाटले का ? तसा समज झाला असेल तर तो ताबडतोब मनातून काढून टाका....आणि पुढील धारवाडच्या भेटीत जरूर या....फक्त आगावू कळवा, म्हणजे मी कुठे बाहेर जाणार नाही...." ~ आता पत्रातील या भाषेवरून जी.ए.कुलकर्णी हे कोणत्या स्वभावाचे होते हे सिद्ध होईल ? [त्यातही त्याना कोल्हापूरविषयी बिलकुल प्रेम नव्हते....कारण वेगळे आहे.... तरीही मी कोल्हापुरी ही सत्य बाब आमच्या लेखक-वाचक नात्यामध्ये आडवी आली नाही.]

पुढे गेलोही....देवाला भेटल्यागत मला वाटले....अत्यंत प्रसन्न मुद्रेने त्यानी माझे स्वागत केले....प्रभावतीताईंनीही....अन्य कुणालाही त्यानी ती दुपारची वेळ दिली नव्हती....मनसोक्त गप्पा मारत बसलो, खाणे चहा झाले...विषयाना अंतच नव्हता....आणि दिवेलागण झाली, कडेमणी कम्पाऊंड जागोजागी प्रकाशले....शांत परिसर...मुख्य वस्तीपासून आतील बाजूला....शेजार्‍यांपैकी कितीजणांना माहीत असेल की शेजारील घरातील एका प्राध्यापकाला सारा मराठी भाषिक समाज डोक्यावर घेऊन नाचतोय?.....जी.ए.ना मी याबद्दल थेट विचारले, तर ते फक्त मंदपणे हसले, "पाटील, उलटपक्षी मला हे आवडतेच ! तुम्ही लोक ओळखता ना. बस्स !"

त्यानंतर भेटीचे अनेक प्रसंग आलेच [माझी धाकटी बहीण धारवाडमध्ये दिली आहे, त्यामुळे तिच्याकडे जाणे व्हायचेच....]....इतके की ज्यावेळी त्यानी मला 'अरे अशोक...' असे म्हणायला सुरुवात केली आणि आपला पुतण्या शंतनु कुलकर्णी याच्या एमबीए शिक्षणासाठी कोल्हापूरला पाठविले त्यावेळी साहित्यप्रेम या व्यतिरिक्तही वेगळे नाते निर्माण झाले.....[शंतनू समवेत पाठविलेल्या चिठ्ठीत त्यानी एक धोक्याची सूचनाही लिहिली आहे...."अशोक....हा जरी माझा पुतण्या असला तरी मराठी अक्षरांचा दुश्मन असल्याने त्याच्यासमवेत माझ्या साहित्याविषयी एक शब्दही बोलणार नाहीस याची दक्षता घे...!" - मजाच होती. शंतनूला आपले काका 'महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध लेखक आहेत....' इतपतच माहिती होती....पण त्याच्याकडूनही काकाविषयी बर्‍याच गोष्टी समजल्या....त्यामध्येही काही जगावेगळे नव्हतेच.]

असो....आणखीही लिहिता येईल. पाहू.

बरोबर आहे अशोक., 'विकृत' वगैरे लेबलं लावणे बालिश आहे. पण खरं तर तसं (किंवा जीए कसल्यातरी सवयीमुळे 'बाद' असल्याचं) कुणी लेखकाने / वाचकाने म्हणल्याचं / लिहिल्याचं मला आठवत नाही. अर्थात तुम्हाला अशी माणसं माहिती असतील, म्हणून तुम्ही पुन्हापुन्हा सांगताय- असंही असेल. मी फार तर 'तर्‍हेवाईक' बद्दल बोलत होतो, आणि ते असणं हे चूक किंवा बरोबर- असं काहीच नाही, असं पुन्हा पुन्हा लिहिलं आहे. असो. हा खरं तर मूळ लेखाचा विषय नाही, तेव्हा त्याची जास्त चर्चाही बरोबर नाही.

तुम्ही लिहा अजून. Happy

ओझं सोबत घेऊनच फिरेन म्हणतो >> हे भारी आहे. Happy

पण एखाद्या व्यक्तीला/ लेखकाला पूर्णपणे देवासारखा किंवा तर्‍हेवाईक अशा दोनच कॅटेगरीजमधे का बसवायचा प्रयत्न करायचा?

जी.ए. घरी कुणाला भेटत नाहीत, भेटले तर बोलत नाहीत... हे जे प्रवाद आहेत ते निखालस खोटे मानले जावेत.>> खोटेच असतील कशावरून? कदाचित काहींना तसे अनुभव आलेही असतील की! एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे अनुभव येऊच नयेत का? हां, आता एका वैयक्तिक अनुभवावरून त्या माणसाला आपण लेबलं लावू नयेत हे अगदी खरं!

पण समजा एखाद्या लेखक/लेखिकेच्या वागण्यात काही लोकांना अप्रिय वाटतील असं काही असेल्/अनुभव आला असेल तर त्याने संबंधित साहित्यमूल्यात काही फरक पडतो का? निश्चितच नाही!

वरदा....

"...संबंधित साहित्यमूल्यात काही फरक पडतो का? निश्चितच नाही!...." ~ निदान इतपत समज तरी त्याने/तिने ठेवली तरी पुष्कळ झाले......’अ’ व्यक्तीला ’इस्किलार’ खूप आवडत होती आणि ती त्या कथेच्या प्रेमातच होती. पुढे काही निमित्ताने ती व्यक्ती धारवाडला आली आणि तिने जी.ए. भेटायचा प्रयत्न केला.....कारण काहीही असो, पण जीए भेटले नाही....म्हणजे मग समग्र जी.ए. त्याने चिडीने बाद ठरवून टाकायचे का ? टाकणार असेलच तर त्याला समजाविणेही कठीणच....तसल्या प्रसंगी शांत राहाणे हेच योग्य. मग पुढे केव्हातरी अशाच लेखनाचा धागा इकडे वा अन्यत्र निघाला की, "जी.ए. ना माणसे आवडत नव्हतीच....ते कुणालाही भेटत नसत... लपून बसत..." असे काल्पनिक पतंग उडवित बसतात....ते मुद्दे मग खोडून काढणेही शक्य नसते. सबब प्रत्येकालाच चांगला अनुभव लेखकमंडळींकडून येत राहतील याची अपेक्षा ठेवणे केव्हाही चूकच.

लेखकालाही स्वतःचे खाजगी आयुष्य असते आणि त्याचे त्याने [वा त्याचा पत्नीने काटेकोरपणे] पालन करणे योग्यच ना?.... सुनीता देशपांडे यानी पु.लं.ना असाच वाचकभेटींचा त्रास होत होता म्हणून काही कठोर वाटावीत अशी बंधने घातली होती....त्याचा फटका कित्येक प्रतिष्ठितांनाही बसला होता....मराठीतील एक जेष्ठ लेखक तर "सुनीताबाई म्हणजे पु,लं.च्या दारातील कुत्री" असाच उल्लेख करत....हे कितपत योग्य होते ?

माझ्या आठवणीत जयवंत दळवींनी त्यांच्या "आप्त" या पुस्तकात जीएं वर एक लेख लिहिला आहे त्यात जीएंच्या काही सवयींचे वर्णन आहे. हे पुस्तक आता माझ्याजवळ नाही त्यामुळे स्मृतीवरच विसंबुन लिहित आहे. मला हा लेख वाचताना गंमत वाटली आणि जीएंच्या स्वभावाचा आणखि एक भाग समजला. एक किरकोळ कुतुहल त्यामुळे शमले. इतकेच. दोघांचीही अनप्रिंटेबल भाषेत शिव्या देण्याइतकी मैत्री होती. आणि जीए. सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रांमध्ये दळवींनी भाषांतरासाठी पुस्तके दिल्याचा अतिशय कृतज्ञतेने अनेकदा उल्लेख करीत. त्यावेळी अत्यंत मनस्तपाच्या अवस्थेत असताना दळवींनी त्यांना ही मदत केली होती. जीएंचा स्वभाव वर्णन करताना स्वतः दळवीच्या लेखनाचा सुर हा मला तरी गमतीशीर वाटला.

मात्र एक गोष्ट मला मुद्दाम नमुद करावीशी वाटते. स्वतः जीएनी आपले लाईक्स आनि डीसलाईक्स व्हायलंट आहेत हे अनेकदा मान्य केले होते. त्यामुळे काहींना त्यांचा स्वभाव तर्‍हेवाईक वाटण्याची शक्यता आहे. सुनिताबाईंना लिहिलेल्या एका पत्रात काही अतिशय दु:खद कारणासाठी त्यांनी कोल्हापूरचे नाव कायमचे टाकले असे लिहिले होते. जीए. आयुष्यात कोल्हापूरला कधीही गेले नाहीत अशी माझी माहीती आहे. आता ही बाब अनेकांना चमत्कारीक वाटण्याची शक्यता आहे. मात्र दु:खाच्या आवर्तात जन्मापासुन सापडलेल्या त्या प्रतिभावंताच्या मनाचे आकलन आपण कसे काय करणार? त्यापेक्षा त्यांनी कोल्हापुर टाकले असुनही कोल्हापूरच्या अशोकरावांना जवळ केले हीच बाब मला जास्त महत्त्वाची वाटते.

उत्तम लेख आणि उत्तम चर्चा.
प्रत्यक्षातला लेखक आणि तो कसा असेल/असावा याबद्दलचा त्याच्या लेखनावरुन केलेला अंदाज या दोन्ही प्रतिमा वेगळ्या असू शकतात एवढे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. असा'मी' मधला मी म्हणजे पुलं स्वतःच अशी समजूत करुन घेतलेल्या त्यांच्या अनेक चाहत्यांना पुलं त्यांचा खर्‍या आयुष्यात धोरणी, प्रचंड कष्ट करण्याची तयारी असलेले, परफेक्शनचा ध्यास घेतलेले; थोडक्यात काय तर वृत्तीने अजिबात 'डि.बी.जोशी' नव्हते याचा धक्काच बसला. ही आपली फसवणूक आहे या पातळीपर्यंतही लोक पोचले.
लेखकाच्या खासगी आयुष्याबद्दल 'गॉसिप' पातळीचे कुतूहल असणे आणि त्याच्या लेखनप्रक्रियेच्या संदर्भात, त्याच्या प्रेरणांच्या, प्रभावांच्या बाबतीत माहिती हवी असणे यातला फरक कळणे गरजेचे आहे . साजिर्‍याने उल्लेख केलेले पुस्तक दुसर्‍या प्रकारचे आहे आणि अशी पुस्तके आपल्याकडे फार कमी आहेत.

"....जीए. आयुष्यात कोल्हापूरला कधीही गेले नाहीत अशी माझी माहीती आहे. ....

~ अतुल....थोडीशी दुरुस्ती करतो. आयुष्यात कधीही जी.ए. कोल्हापूरात आले नाहीत असे झाले नाही. त्यानी बी.ए.ची परीक्षा इथल्या राजाराम कॉलेजमध्येच दिली आणि त्यासाठी [अभ्यासासाठीही] कोल्हापूरातील मंगळवार पेठेत राहिले होते. खासबाग हॉटेलमधील मिसळपाव नाष्टा करूनच ते पेपरसाठी जात असत.

दु:खद घटना घडली ती त्यानंतर....मग मात्र त्यानी कोल्हापूरचे नाव टाकले ते कायमचेच. इचलकरंजीला 'फाय फौंडेशन पुरस्कार" स्वीकारायला गेले तेही कोल्हापूरचा पट्टा गाळून....निपाणी मार्गे गेले होते.

यस सर Happy दुरुस्तीबद्दल आभार. बीए. ला कोल्हापुरला परीक्षेला असताना नऊ दिवस केवळ तेथील प्रसिद्ध मिसळीवर काढल्याचा त्यांच्या पत्रात उल्लेख आहे. "आज मला परीक्षेत काय लिहिले ते आठवत नाही मात्र मसाल्याच्या वासाचे ते नवरात्र आठवते" असे काहीसे ते वाक्य आहे. अशोकराव असे काही प्रसिद्ध दुकान तेथे अजुनही आहे काय्..मिसळ देणारे? Happy

अतुल ठकुर यांच माबोवर स्वागत..लेख आणि चर्चा खुप छान.नविन लेखाच्या प्रतिक्षेतअशोक तुम्ही जी.ए.यांच्यावर स्वतंत्र लेख लिहावा.या अनेकांच्या सूचनेला दुजोरा.

अरे व्वा !!!! चक्क शोभनाताई धाग्यावर !!!! मस्तच. अतुल तुमचे खास आभार मानले पाहिजेत या धाग्याबद्दल. तुम्हाला सांगायचे म्हणजे परवाच्या आपल्या गटगच्या आदल्या दिवशी शोभनाताईंशी माझी भेट झाली त्यांच्या घरी.....किती छान वाटले इतक्या विद्वान व्यक्तीला पाहून, भेटून....नुकताच त्याना रोहन प्रकाशन आणि मायबोली प्रायोजित लेखन स्पर्धेतील 'प्रथम क्रमांक' मिळाला होता...तेही निमित्त होतेच. ताई मूळच्या बेळगावच्या असल्याने जी.ए.कुलकर्णी यांची आठवण ओघाने निघालीच. फार भारावून गेलो मी या सार्‍यामुळे.

शोभनाताई....मी जरूर तो लेख लिहितो.

अतुल....ते मिसळीचे हॉटेल आहे....पण काप गेले भोके राहिली अशीच अवस्था आहे....चालायचेच... कालायः तस्मे नमः म्हटलेच आहे.

माबोवरील या माहीतीपूर्ण चर्चा नेहमीच वाचनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण
जी. ए. यांच्या एकंदर व्यक्तीमत्वाबद्दलच प्रचंड कुतुहल आहे... त्यांच्या भुरळ घालणार्‍या लेखनासारखंच त्यांचं व्यक्तीमत्व होतं... गूढ, पुन्हा पुन्हा समजून घ्यावसं वाटणारं, पुन्हा पुन्हा नव्याने सापडणारं...पुन्हा पुन्हा मोहीत करणारं!!

जीएंबद्दल पुन्हा पुन्हा आणखी वाचायला आवडेल... साजिरा, अशोकजी, अतुल ठाकुर प्लीज लिहाच...

आता पुन्हा नव्याने माबोवर सक्रीय व्हावेसे वाटू लागले आहे>> विकु... नक्कीच म्हणजे मायबोली पुन्हा एकदा नव्या उत्साहाने सळसळणार तर!! Happy

स्वातीच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन... कुळ, मूळ आणि कलाकाराचे खाजगी जीवन...
कलाकार हा कलंदरच (मूडी, मनस्वी याअर्थी) हवा... त्याच्या मनस्वी मूडमधूनच नवे सृजन जन्माला येते... त्यामुळे तर्‍हेवाईकपणा जर अनोख्या कलेला जन्म देणार असेल तर हजारवेळा तो क्षम्य!!

जी.एं च्या एकांतप्रियतेबद्दल बोलताना त्यांच्या भगिनी एके ठिकाणी म्हणतात की, "बाबुअण्णाच्या एकांताची ,'तथाकथित' माणूसघाणेपणाची काही जणांनी खिल्ली उडवूनही त्यानं त्यांची पर्वा केली नाही व तो निर्मितीमग्नच राहिला.तो खरंच माणूसघाणा असता तर माणसांची विविध रूपं तो त्याच्या कथांमध्ये दाखवूच शकला नसता. इतरांच्या दोषारोपांची तमा न बाळगता, साहित्यिक कोंडाळ्यात न वावरता एका अस्सल व्रतस्थाप्रमाणे जीवन जगला."

सुनिताबाईंशी जी.एं.नी केलेल्या पत्रव्यवहारातून तर त्यांच्यातला काहीसा मनमोकळा, नर्मविनोदी माणुस वारंवार दिसून येतो. आपल्या आवडीनिवडी थोड्या वेगळ्या असल्याचं मनमोकळेपणानं सांगून जातात .परंतू कोणावरही त्या लादण्याचा अट्टहास करत नाहीत .आपण अगदी "of the earth,earthy" माणूस असल्याचा उल्लेखही एका पत्रात केला आहे .

कवी ग्रेसांनी आपल्या या मित्रासाठी लिहिलेल्या या ओळी :

'कशा आवराव्या कशा सावराव्या
भुलीभारणीच्या मनाच्या मुभा
मुक्या धर्मशाळांतल्या राउळांच्या
तुझे मंत्र उच्चारणार्या सभा ?'

अत्यंत सुरेख लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रियाही.
अशोक मामा, लिहाच जीएंवर.
स्वातीशी सहमतच. कुणाही कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याचा आडाखा त्याच्या कलाकृतीवरून बांधायला जाऊ नये. किंवा उलटही...
... वैयक्तिक आयुष्यं किती कलेत डोकावतं, कला किती वैयक्तिक आयुष्यं घडवते... दोन दालनं वेगळी ठेवता येतात का, ठेवायची धडपड माणसं करतात का... अन का करतात ...
फार फार गुंतागुंतीचं अस्तं सगळं.
एखाद्या कलाकृतीची आपल्याला आलेली अनुभूती हाच काय तो सच्चा क्षण... कलाकाराला जे काही म्हणयाचं असतं ते तो म्हणून गेलेला असतो... आपल्याला आलेली अनुभूती हा त्यावेगळ्या स्थळ्-काळ छेदाचा बिंदू.
असो... जीए, मला फार वेळ झेपत नाहीत. खूपच चित्रदर्शी आणि रुतणारं लिहितात. वाचता वाचता आपण बदलतो आहोत असं काहीसं विचित्रं जाणवतं आणि मी घाबरते...
जीएंच्या भुलीवर साधासुधा उतारा चालत नाही... हे ही कळून चुकलय Happy
असो... साजिर्‍या, अशोकमामा, आणि अतुल... तुम्ही लिहाच. जीए हा विषय माझ्यासारखीला कुणी हाताला धरून घडविलात तर उपकारी असेन.

Pages