अश्वत्थामा, व्यासांचा आणि जीएंचा!

Submitted by अतुल ठाकुर on 4 December, 2013 - 18:44

G_A_Kulkarni.jpg

जीएंना महाभारताचे खुप आकर्षण होते हे आता सर्वश्रुत आहे. प्रतिभावंताचा विषय निघाला की जीए हटकुन व्यासांचे नाव घेत. जीएंच्या कथांमध्ये काही ठिकाणी महाभारताचे संदर्भ आलेले आढळतात. त्या उपमांनी, संदर्भांनी जीएंच्या कथांना एक वेगळीच श्रीमंती बहाल केलेली दिसते. त्यादृष्टीने जीएंची पत्रे महत्वाची आहेत. विशेषतः सुनिताबाईंना लिहिलेल्या जीएंच्या पत्रांत त्यांनी महाभारतावर, त्यातील व्यक्तीरेखांवर चर्चा केली आहे. ज्या तर्‍हेने जीए या विषयावर लिहितात त्यावरुन हे जाणवते की महाभारत हा त्यांच्या सततच्या चिंतनाचा विषय असावा. त्यांनी त्यावर स्वतंत्रपणे लिहिले असते तर आमच्यासारख्या जीएप्रेमींना आणखि एक खजिना कायमस्वरुपी प्राप्त झाला असता. आणि तो ही अक्षय असा. कारण जीएंचे लिखाण कितीही काळानंतर पुन्हा पुन्हा वाचले तरी त्यात नवीन काहीतरी मिळतेच. मात्र बारकाईने पाहिले असता हे जाणवते कि जीए त्यातील सर्व व्यक्तीरेखांबद्दल भरभरुन बोलत नाहीत. कर्णाच्या दु:खाने जीए विचलित झाले नाहीत. वेदनेचे वरदान मागणार्‍या कुंतीचे दु:ख जीएंना फारसे आकर्षित करु शकले नाही. फार काय, महाभारतातील तत्वज्ञांचा मेरुमणी जो कृष्ण, त्याच्याबद्दलही जीए फारसे बोलताना आढळत नाहीत. जीए बोलतात ते अश्वत्थाम्याबद्दल. आणि ते बोलत असताना त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेने त्यावर ते स्वतःचे असे वेगळे भाष्य करतात. ते वाचताना पुनःपुनः हे म्हणावेसे वाटते कि यावर जीएंनी स्वतंत्र लिहायला हवे होते. जीएंना महाभरतात हे व्यक्तीरेखा का भावली? त्या व्यक्तीरेखेला व्यासाने जसे रंगवले आहे त्याहुन वेगळे असे जीएंनी त्यात काय शोधले? जीएंच्या स्वतःच्या तत्वज्ञानाशी जुळणारी अशी ही व्यक्तीरेखा त्यांना वाटली असावी काय? या प्रश्नांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

व्यासांनी जो अश्वत्थामा रंगविला आहे त्याला फारसे कंगोरे नाहीत अशी माझी समजुत आहे. मात्र त्याच्याशी निगडीत जनमानसातील पाण्यात पीठ मिसळुन ते दुध म्हणुन अश्वत्थाम्याला प्यावे लागत असे ही कथा प्रसिद्ध आहे. तेथपासुन अश्वत्थाम्याच्या उल्लेखाला प्रामुख्याने सुरुवात होते. या कथेने अर्थातच द्रोणाचे दारिद्र्य अधोरेखित केले जाते. त्यानंतर पुढे इतर कौरव पांडव यांच्याबरोबर त्याचा पिता द्रोण त्याला शिक्षण देतो. त्यातदेखिल त्याने फारशी चमक दाखवल्याचे दिसत नाही. कपटाने वागुन पोटच्या मुलाला जास्त शिक्षण देण्याचा द्रोणाचा डाव अर्जुन हाणुन पाडतो. मात्र पुढे स्वतः द्रोणाला देखिल आपल्या मुलाच्या पराक्रमावर भरवसा वाटत नसावा, कारण द्रुपदाच्या पराभवासाठी द्रोण सर्वस्वी आपल्या इतर शिष्यांवर, विशेषतः अर्जुनावर अवलंबुन असतो. यानंतर व्यासप्रणित महाभारतात अश्वत्थाम्याचा प्रामुख्याने उल्लेख येतो तो युद्धप्रसंगीच. तेथेही या महाक्रमी चिरंजीव द्रोणपुत्राकडुन डोळे दिपुन जातील असे काहीही घडत नाही. अजुनपर्यंतचा त्याचा प्रवास हा वडीलांसोबत असावे, दुर्योधनाचे मीठ खाल्ले आहे त्यानुसार खाल्ल्या मीठाला जागावे असाच झालेला दिसतो. त्यानंतर अश्वत्थामा प्रामुख्याने दिसतो ते युद्धाच्या शेवटी, रात्री कपटाने धृष्टद्युम्न आणि द्रौपदीच्या पाच पुत्रांना मारताना. तोपर्यंत त्याचा प्रवास सामान्य असाच झाला आहे. त्याच्या नावावर नजरेत भरेल असा पराक्रम नाही आणि त्याच्याबद्दल शिसारी वाटेल असे कृष्णकृत्यही नाही.

पुढे त्याच्या हातुन द्रौपदीचे पुत्र आणि भाऊ धृष्टद्युम्न मारले जातात. त्याच्या मस्तकावरील मण्यासाठी द्रौपदी अडुन बसते. अर्जुन समोर येताच अश्वत्थामा ब्रम्हास्त्र सोडतो. त्याला तोड म्हणुन अर्जुनही ब्रह्मास्त्राचाच प्रयोग करतो आणि जगाच्या अंताची वेळ येते. त्यावेळी व्यास मध्ये पडुन उभयतांना ती शस्त्रे परत घ्यायला सांगतात. अस्त्रांमध्ये निपुण अर्जुनाला ते परत घेण्याचीही विद्या माहीत असते. मात्र अश्वत्थाम्याला ते परत घेता येत नाही. तो ते अस्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडतो. कृष्ण उत्तरेच्या गर्भाला वाचवतो आणि अनंत काळ पर्यंत ही ओली जखम बाळगत हिंडत राहशील अशा तर्‍हेचा शाप कृष्ण अश्वत्थाम्याला देतो.त्यानंतर कृष्णाला मस्तकावरील मणी देऊन तो तेथुन निघुन जातो. जनमानसात आजदेखिल अश्वत्थामा नर्मदातीरावर फिरत असल्याचा समज आहे. तो जखमेवर लावण्यासाठी तेल मागत हिंडतो. नर्मदा परिक्रमेत अश्वत्थामा दिसल्याच्या कथादेखिल प्रसिद्ध आहेत. खुद्द जीएंनी सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रात आपला अश्वत्थाम्याबद्दलचा अनुभव वर्णिलेला आहे. अशा या अश्वत्थाम्याच्या या आयुष्यावर वेगळा प्रकाशझोत पाडला तो सर्वप्रथम “युगान्त” मध्ये इरावती कर्वे यांनी. “परधर्मो भयावहः” या लेखात ईरावती बाईंनी द्रोण-अश्वत्थामा हे पितापुत्र विस्मृतीचे उत्तम उदाहरण असल्याचे म्ह्टले आहे. ब्राह्मण असुन क्षत्रियांचा धर्म पाळणारी आणि तो पाळताना स्वधर्म विसरुन गेलेली ही पराक्रमी माणसे. द्रोणाने क्षत्रिय धर्म पाळताना कुणालाही दयामाया दाखवली नाही. पुत्राने तर रात्री कपटाने माणसे ठार करुन पुढची पायरी गाठली.

जीएंचा अश्वत्थामा मात्र व्यास आणि ईरावतीबाईंच्या अश्वत्थाम्याहुन सर्वस्वी वेगळा आहे. जीएंना सर्वप्रथम या व्यक्तीरेखेतले कारुण्य जाणवले आहे ते पीठ मिसळलेले पाणी दुध म्हणुन आनंदाने पिणार्‍या लहान अश्वत्थाम्याकडे पाहुन. आयुष्यात बराच काळ दारिद्र्य भोगणार्‍या आणि त्याच्या वेदना आपल्या कथेत मांडणार्‍या जीएंना यातील कारुण्य जास्त भेदक वाटल्यास नवल नाही. मात्र वेदनेचा हा प्रवास येथेच संपत नाही. जीए सुनिताबाईंशी चर्चा करताना म्हणतात कि त्यांना कथा या नुसत्या माणसांच्या नको असतात. नुसती माणसे नव्हे तर काही एक विशिष्ठ सिच्युएशनमध्ये सापडलेली माणसे. कुणीतरी काहीतरी बोलतो आणि आमच्यासारख्या सामान्यांच्या मनात आयुष्यभर अंगार धुमसत राहतो असेही एका ठिकाणी जीए म्हणुन जातात. जीएंचे कथानायक घेतले तरी आपल्याला हेच आढळुन येते. “वीज” मधला बळवंत मास्तर हा सर्कशीतल्या मग्रुर सुंदरीकडुन अपमानीत झालेला आहे. “पुरुष” मधील प्राध्यापक निकम तर त्यांच्या अपमानास्पद भुतकाळापासुन सुटण्यासाठी धडपडत आहेत आणि नेमक्या विश्वनाथच्या रुपाने तो भुतकाळ पुन्हा त्यांच्या समोर उभा राहतो. आता त्यातुन त्यांची सुटका नाही. “तळपट” मधील दानय्या आपल्याला देशोधडीला लावणार्‍या रुक्मीणीला शोधत हिंडतो. त्याला ती शेवटपर्यंत मिळतच नाही, ती आग पोटात घेऊनच त्याचा शेवट होतो. सारी विशिष्ठ सिच्युएशनमध्ये सापडलेली माणसे. लेखकाच्या खाजगी जिवनात डोकावण्याचा अगोचरपणा करावासा वाटत नाही त्यामुळे इतकेच म्हणुन थांबतो की जीएंनी स्वतः आपल्या आयुष्यात खुप खुप भोगले आणि त्या दु:खातुन ते शेवटपर्यंत कधीही बाहेर पडु शकले नाहीत. विशिष्ठ सिच्युएशनमध्ये सापडलेला एक माणुस खुद्द जीएंच्यातच होता.

या माणसांची दु:खे शाश्वत आहेत. त्यांची सुटका नाही. मृत्युनंतरच कदाचित सुटका असल्यास असेल. मृत्युनंतर उरणारा सांगाडा, शेवटी तोही विरुन जाईल आणि शेवटी उरणारे शुन्य असा उल्लेख जीएंनी केला आहे. जीएंना मृत्युनंतरच कदाचित या दु:खाची समाप्ती होते असे वाटत असावे त्यामुळे त्यांना मृत्यु आणि आत्महत्या या विषयांचे आकर्षण होते. त्यांची नियती शरणता ही त्यांनी भोगलेल्या आणि कधीही न संपणार्‍या वेदनेतुन आली असावी. या कधीही न संपणार्‍या वेदनेचा दाह सोसणारा चिरंजीव अश्वत्थामा जीएंना महाभरतात भेटला. तो त्यांना जवळचा वाटला. अश्वत्थाम्याच्या वेदनेला क्षमेचे वरदान नाही. कसल्याही सावलीची शीतलता नाही. तात्पुरता विसावा नाही. त्याच्या कपाळी आहे ते सतत हिंडणे. ओली वाहाती, कधीही बरी न होणारी जखम कपाळावर बाळगत फिरत राहणे. जखमेचा दाह असह्य झाल्यास त्यासाठी लोकांकडे तेलाची भीक मागणे. ती झाकण्यासाठी त्यावर कापड गुंडाळणे. पण त्याहीपेक्षा एक महाभयानक शिक्षा त्याच्या कपाळी आहे. ती म्ह्णजे पश्चात्तापाची शिक्षा. “इस्कीलार” मध्ये जीए “प्रत्यक्ष आघातापेक्षाही असह्य अशी पश्चात्तापाची शिक्षा त्याने मागे ठेवली” असे लिहितात. अश्वत्थामा चिरंजीव आहे म्हणुन त्याची वेदनाही चिरंजीव आहे. अशा या अश्वत्थाम्याची व्यक्तीरेखा ही जीएंना महाभारतातील intriguing personality वाटत होती.

मात्र जीए तेथेच थांबले नाहीत. त्यांनी कथेत त्यांच्या अश्वत्थाम्याला राजपुत्र गौतमाजवळ आणले. राजपुत्र आपल्या राज्यातील वृद्ध माणसे, त्यांच्या जरा व्याधी आणि मृत्यु पाहुन उदास, विषण्ण झाला होता. त्यावर उपाय शोधण्याच्या मर्गावर असतानाच त्याला जीएंचा अश्वत्थामा भेटतो. मृत्युवर उपाय शोधणार्‍या गौतमाला चिरंजीव असण्याची वेदना माहीत असण्याचे कारणच नसते. अश्वत्थामा त्याला मृत्युमुळे जिवन किती सुखावह होते ते समजवतो. आणि विस्मयात पडलेल्या गौतमाला “मी अश्वत्थामा आहे” अशी ओळख देऊन निघुन जातो. मानवी जिवनात चिरंतन स्थान असलेली वेदना जिवंतपणी संपली नाही तर दयाळु मृत्यु त्यातुन मानवाची सुटका करतो. मात्र जीएंच्या अश्वत्थाम्याला हाही मार्ग मोकळा नाही. त्याला अनंत काळ जंगलात हिंडतच राहावे लागणार आहे. अशा या अश्वत्थाम्याच्या वेदनेला जीएच सर्वार्थाने जाणु शकले. म्हणुन तर त्यांनी “पिंगळावेळ” मध्ये सुरुवातीलाच Shallow people demand variety — but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. – Strindberg हे वाक्य टाकले आहे. जीएंच्या आयुष्यात ही दुखरी नस सतत मनस्ताप देत राहीली. त्या दु:खाला जाणुन घेण्यासाठी त्यांनी त्याच्या मुळाशी, अगदी गाभ्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला, त्यातुन अजरामर साहित्य निर्माण झाले मात्र जीएंच्या वेदनेचा अंत झाला नाही. जीएंचे अश्वत्थाम्याशी वेदनेचे नाते होते असे मला वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले लिहिलेय, बरेच दिवसांनी असे काही वाचायला मिळाले, अजूनही असेच काही लेख येऊद्या. स्वागत आणि अनेकानेक शुभेच्छा Happy

सुरेख आहे लेख, आवडला.
महाभारतातल्या पात्रांपैकी 'अश्वत्थामा' हे माझे आवडते पात्र नाही, पण जीए नेहमीच विचारांना एक वेगळी दिशा देत आलेले आहेत. अश्वत्थाम्याच्या चिरंतन वेदनेशी नाते सांगणारी जीएंच्या लिखाणाची जातकुळी आहे, हे पटले.
'युगान्त' वाचले पाहिजे एकदा.

खूप सुंदर लिहिलेय . अजून लेख येऊद्यात .अश्वत्थाम्यावर 'अमृतवेल' मध्ये वि.स. खांडेकरांनी एक परिच्छेद लिहिलाय तो आठवला .
जी. एं बद्दल आपल्याकडून अधिकाधिक वाचायला आवडेल

स्वागत आणि शुभेच्छा ! Happy

अतुल....मायबोली परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत. या लेखाविषयी पूर्वी आपल्यात चर्चा झालेली आहेच. जी.ए. कुलकर्णी हे नाव आणि त्यांच्याभोवती वेढल्या गेलेल्या अनेक कथा यांच्याशी जे कुणी परिचित आहेत त्यात तुम्ही अग्रक्रमाने आहात....आज इथल्या प्रथम लेखाची सुरुवातही तुम्ही 'जी.ए.' यांच्यासंदर्भात केली आहे हे सुंदरच....मायबोलीकर तुमचे आणि लेखनाचे अगत्याने स्वागत करतील याचा विश्वास वाटतो मला.

व्वा अतुल ! अप्रतिम लेख ! अश्वत्थामा मलाही नेहमी विचार करायला लावणारे व्यक्तिमत्व आहे. Happy

लेख उत्तमच आहे.

अश्वथामा एकटाच नाही तर चिरंजीव या संकल्पनेत अश्वथामा, बळी ( बली ), व्यास, हनुमंत, बिभीषण, कृप ( कृपाचार्य ) परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत.

पैकी अश्वथामा हा खलनायक आणि निगेटीव्ह अशी व्यक्तीरेखा आहे. बाकी सर्व त्याच्या विशिष्ठ गुणांमुळे नायक किंवा पुजनीय अश्या व्यक्तीरेखा आहेत.

ब्रम्हांडात जो जन्मला तो मरणार असा नियम असताना ह्या सात व्यक्तीरेखा अपवाद आहेत.

पैकी अश्वथामा अनेकांना भेटला असा नर्मदा परिक्रमा करणार्‍यांचा दावा आहे. हनुमंतांनी सुध्दा अनेकांना विवीध रुपात दर्शन दिल्याचे वर्णन सापडते पण अन्य पाच व्यक्तीरेखा भेटल्या, प्रसन्न होऊन दर्शन दिले असे वाचल्याचे स्मरत नाही.

हे सर्व खरे की खोटे ह्यावर वाद घालण्यापेक्षा भारतभुमीवरच्या पौराणीक कथांचे वेगळेपण या अंगाने ह्याकडे पहावे.

मरावे आणि विस्मृतीत जावे
मरावे परि किर्तीरुपे उरावे
चिरंजीव व्हावे

या तीन ओळी कशासाठी जगावे हा संदेश आपल्यासारख्या सामान्य मरणभयाने व्यापलेल्यांना देतात की काय ?

सर्वांचे मनःपूर्वक आभार. स्वागताबद्दल धन्यवाद अशोकराव Happy आपल्याला भेटणे, आपला आशीर्वाद मिळवणे हा गटगला येण्याचा उद्देश त्यादिवशी सफल झाला.

छान विश्लेषण, अतुल. Happy

जीएंना अश्वत्थाम्याची वेदना जास्त भावली, हे साहजिकच आहे. आपल्या सार्‍या लिखाणात त्यांनी वेदनेचा, वेदनेतल्या अद्भुततेचा आणि अद्भुतातल्या सौंदर्याचा शोध घेतला, असं जाणवतं. जरा जनरलायझेशनच करायचं तर 'वेदने'पेक्षाही सामान्य जगण्यापलीकडच्या अद्भुताचा शोध ते घेत आले. त्यांची पात्रं कितीही गरीब, फाटकी, वेडसर, तर्‍हेवाईक असली तरी त्यांच्या जगण्यातल्या नितांतसुंदर विसंगती आणि त्या जगण्यातलं भव्यपण त्यांनी जीव-मन लावून रेखाटलं. असं भव्यदिव्यपण कुणाही फाटक्या माणसाच्या रोज दिसणार्‍या आयुष्यात सापडत नाही- आणि त्या दृष्टीने त्यांची पात्रं वास्तववादी नाहीत, खोटी आहेत, त्यांना उगाच जरतारी वगैरे करून ठेवलं आहे- अशीही प्रासंगिक टीका त्यांच्यावर झाली, मात्र जिकडेतिकडे अद्भुतरम्य रहस्याचा शोध घेणारी पात्रं रंगवणं त्यांनी सोडलं नाही. हे त्यांच्या लिखाणाचं सूत्रच बनून गेलं, मुख्य आशय बनून गेला- कथासूत्र काहीही असो.

जगण्याच्या रहाटगाडग्यातल्या छोट्यामोठ्या उत्सवांचा शोध घेणार्‍या आणि त्यांचे महोत्सव करणार्‍या अनेक लेखकांना आपण डोक्यावर घेतलं. मात्र ठसठसती वेदना ठायीठायी दाखवणारे लेखक सामान्यांचे कधीच झाले नाहीत. जीए आणि खानोलकर - ही त्याची उदाहरणं. जीएंनी तर मृत्य्ला, दु:खाला आणि ठसठशीला रहस्याचं आणि अद्भूतरम्यतेचं जबरदस्त भक्कम आणि अलौकिक कोंदण दिलं. मृत्युला चौकसपणे बघणं, त्याला निरनिराळ्या रूपकांमधून पुढे आणणं हेही त्या वेदनेच्या आकर्षणाचाच भाग असावेत.

मात्र असे लेखक स्वतःच्या वेदनेबदल दु:खाबद्दल कधी बोलताना दिसत नाहीत. फारतर त्यांच्या वेदनेचं भावविश्व त्यांनी अनेक कथानायक आणि नायिकांच्या भोवती गुंफलं. मात्र त्याभोवती सतत रहस्याचं, थरारकतेचं, अगम्यतेचं आवरण राहील- याची नीट काळजी घेतली. व्यावहारिक जगाशी आपलं फारसं नीट जमत नाही, हे उमगल्यावर जीएंनी तिला आपल्या काळ्या चष्म्याच्या कुंपणाचं रूपक वापरून कायमचं पलीकडे ठेवलं.

इन अ लायटर मूड- जीएंचं खाजगी आयुष्य फारसं कुणाला माहिती नसलं, तरी जीए भलतेच तर्‍हेवाईक होते- हे निरीक्षण अनेकांनी लिहून बोलून ठेवलं आहे. भेटायला बोलावून मुद्दाम न भेटणं, कुणाची तरी गोची करून ठेवणं, अचानक कुठेतरी निघून जाणं, एकदम मत किंवा बाजू बदलणं- अशा अनेक प्रकारांतून त्यांनी हे तर्‍हेवाईकपण अत्यंत मनस्वीपणे जपलं. Happy

मायबोलीवर स्वागत अतुल ठाकूर .
अश्वत्थामा अन जी.ए. या दोघांचाही उत्तम व्यक्तित्ववेध या लेखात घेतला आहे.ले.शु.
साजिरा यांचा प्रतिसादही आवडला.

साजिरा....

एका अत्यंत सुंदर अशा प्रतिसादाचा शेवट "लायटर मूड" मध्ये करताना...."भेटायला बोलावून मुद्दाम न भेटणं, कुणाची तरी गोची करून ठेवणं, अचानक कुठेतरी निघून जाणं, एकदम मत किंवा बाजू बदलणं-...." हे जे ऐकीव तुम्ही लिहिले आहे त्याबद्दल दोन ओळी लिहिणे मला नीतांत गरजेचे वाटते.

जी.ए.कुलकर्णी हे अगदी चारचौघांसारखे जीवन जगणारे इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यानी आपला शिक्षकी पेशा आणि लेखक जी.ए.कुलकर्णी दोन्ही बाबी अलग ठेवल्या होत्या. लेखनासाठी घरची वरची खोली त्यांच्यासाठी राखीव होती तर खाली बहीण प्रभावती राहत असत [तेही भाड्याचे घर....आयुष्यभर स्वतःच्या घरात कधीच जाऊ शकले नाहीत]. आता जी.ए. ज्या प्रकारच्या कथा लिहित होते....वा प्रसिद्ध होते....त्या लिहिताना त्याना अत्यंत प्रिय असा एकांत आवश्यक तर होताच शिवाय विचार नावाचा जो घटक असतो त्यांच्या लेखनात तो सुचणे यासाठी काही गोष्टींचे पथ्य पाळणे त्यानी आवश्यक मानले होते. "भेटायला बोलावून मुद्दाम न भेटणं...." हे कुणाबाबत झाले ? याचा कुणीच खुलासा केलेले नाही. जयवंत दळवीनी जर असे कुठे लिहिले असेल तर तो शुद्ध मूर्खपणा मी मानेन. जी.एं.च्या दृष्टीने एक हकनाक दोषारोप झाल्याची बाब म्हणजे डॉ.श्रीराम लागू यांची होऊ शकणारी भेट. ते धारवाडला सूर्यग्रहण पाहाण्यासाठी येणार होते आणि ज्यांच्याकडे ते उतरणार होते तेही जीएंच्या ओळखीचे होतेही पण लागू त्यांच्याकडे कधी येणार त्याबाबत जीएंना कळविलेच नाही. ते थेट डॉ.लागूना घेऊन तीन वाजता घरी आले. जीए कॉलेजवर....ते पाहून डॉ.लागू यांचा काहीतरी गैरसमज झाला, ते चारच्या महालक्ष्मीने मुंबईला निघाले. जी.ए. नी निरोपाचा घोटाळा झाला म्हणून डॉ.लागूना एक दीर्घ पत्र पाठवून खुलासाही केला....पण लागू नी त्याला उत्तर दिले नाही.....आता यामध्ये दोषी कोण ? हा विचार केला तर डॉ.लागू यांच्या धारवाडमधील त्या पाहुण्यांकडेच दोष जातो, ज्याने जीए दुपारी घरी असणार हे गृहित धरले होते. पण गैरसमजाचे धनी झाले जी.ए.कुलकर्णी.

"एकदम मत बदलणे...बाजू बदलणे...." ~ हा प्रकार वादाचा होऊ शकतो. त्यांची स्वत:ची राजकीय मते अशी काही नव्हती....मुळात वयाच्या ५५ व्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या [कर्नाटकात ५८, ६० नाही तर ५५ वय आहे निवृत्तीसाठी] या शिक्षकाला मत होते ते जागतिक साहित्याबद्दल आणि अभ्यास होता त्याच विषयाबाबत. आजारपण, क्लब आणि सिगारेट ह्या तीन गोष्टी ते इतरांपासून लपवून ठेवत....आणि ह्या तीन घटकांनी त्याना वेढून घेतले होते....तेच त्यांच्या जीवनाचे साथीदार झाले होते....अशा स्थितीत त्यानी कुणाला भेट दिली नाही म्हणजे त्याना खलनायक ठरविणे ही फार बालिश बाब मानली जावी.

अत्यंत खाजगी पातळीवर जीवन जगलेल्या या अजोड लेखकाच्या तितक्याच खाजगी बाबी सार्वजनिक पातळीवर येऊ नयेत....पण त्यांच्या साध्या वर्तणुकीचा मोठा पुतळा करून तो वेगळ्या रंगाने रंगविणे व तोच खरा मानणारे लोक असतात या समाजात....आपण जी.ए. प्रेमींनी तिकडे लक्ष देवू नये, इतकेच म्हणता येईल.

बरोबर आहे अशोक, पण 'तर्‍हेवाईकपणा' हा कुठच्याही लेखकाचा 'दोष' मानता येणार नाही. उलट जीएंनी ज्या प्रकारचं लिखाण आयुष्यभर केलं- त्यासाठी असा तथाकथित तर्‍हेवाईकपणा आवश्यकच होता. प्रत्येक बुद्धीमान माणसात किंचित वेडसरपणाची झाक असते (असं सामान्य लोक म्हणतात)- तशातलाच हा भाग झाला. त्याला चांगलं किंवा वाईट - असं मी काहीच म्हटलेलं नाही. आपल्या मनातलं- मग ते वेदना असो, दु:ख असो, की सुख- ते सतत दाबुन आणि झाकून टाकत राहिले- हे मला 'वेदनेचं आकर्षण' या मुद्द्याशी सुसंगत असल्याने लिहावंसं वाटलं. आपलं खाजगी आयुष्य ते कडेकोट जपत राहिले- आणी त्यासाठी जे काय करावं लागलं- त्याला 'सर्वसाधारणपणे' तर्‍हेवाईकपणा म्हटलं गेलं, तरी त्याची फिकीर त्यांनी केली नाही- इतकाच काय तो माझ्या पोस्टमधल्या 'त्या' भागाचा अर्थ.

छान लिहिला आहे लेख. आवडला.

मलाही स्वतःला अश्वत्थाम्याबद्दल (लहानपण गरीबीत गेलं इतका एक भाग सोडला तर) फारशी सहानुभूती वाटलेली नाही. फार कोत्या-छोट्या मानसिकतेचा प्रतिनिधी वाटतो तो. त्याच्या वाट्याला आलेल्या संधींतून अन्य एखाद्याने भव्य जीवन घडवलं असतं पण त्याच्यात ती कुवत आणि मुळात व्हिजन नव्हतीच असं वाटतं. चिरंजीवीत्वही त्याने शापासारखं भोगलं यातच काय ते आलं. त्याला क्षमायाचनेची, परिमार्जनाची आणि मुक्तीची (रिडेम्प्शन) केवढी मोठी संधी त्यामुळे मिळाली होती! पण नाहीच!

लेखकाच्या वैयक्तिक जीवनात डोकावू नये हे 'नदीचं मूळ आणि ऋषीच्या कुळा'इतकंच खरं. लिखाण डोक्यात ठेवून त्याच्या कर्त्याला भेटावं तर आपल्या पदरी निराशा आणि त्याच्या पदरी नसत्या अपेक्षांची ओझी पडण्याची शक्यता जास्त. असो.

Pages