पवनचक्कींच्या राज्यात

Submitted by Yo.Rocks on 1 December, 2013 - 16:17

नभपटलात कृष्णमेघांचा समुद्र उसळलेला.. सारे आकाश पादक्रांत करुन आता पश्चिमेकडील क्षितीज गिळंकृत करण्यास निघालेला.. वार्‍याची गूंज सैरभैर झालेली.. या हालाखीत धरतीमातेला आपला प्रकाश पोचवण्यासाठी सुर्यदेवांची चाललेली धडपड आणि त्या संधिप्रकाशात उजाळलेली सह्यशिखरे.. निसर्गाच्या या सार्‍या उधळणीत मंत्रमुग्ध होउन गेलेले आम्ही सह्याद्रीवेडे ~ ~

'बितंगा'च्या पायथ्याशी पोलीस पाटलांच्या घरच्या अंगणात तोंड धुताना डोळे मिटले नि पुन्हा पट्टागडावरुन पाहिलेले 'तेच' दृश्य समोर तरळले.. खरच त्या क्षणाने आमचा जीव खूपच सुखावला होता.. ट्रेक सार्थक झाला होता.. तब्बल अठरा तासांच्या भटकंतीनंतर आम्ही 'बितंगा'च्या पायथ्याशी मुक्कामास येउन आजचा दिवस संपवला.. तसे पाहिले तर दिवसभरात आमचा चारचाकी रथ व रथसारथी यांना वगळले तर फारशी दगदग झालीच नव्हती..

शुक्रवार आमचा आवडीचा म्हणत त्या रात्रीच आम्ही पाचजण म्हणजेच गिरी, रोमा, अ‍ॅनिरुद्ध, अस्मादिक व इंद्रा (रथासकट) ट्रेकच्या वाटेला लागलेलो.. उद्दीष्ट होते पवनचक्कीच्या राज्यात मुशाफिरी..

कोजागिरीच्या दुधाळ प्रकाशात 'दुबेर'गडाची वाट पकडली.. सभोवतालच्या सपाट प्रदेशात एकमेव असे टेमकाड अशी दुबेरगडाची ओळख.. त्यामुळे टप्पोर्‍या चांदण्यातच त्याला पटकन टिपले नि पहाटेच्या मंदधुंद गारव्यात आम्ही पायथ्याचे नागेश्वर मंदीर गाठले.. मंदीरात व मंदीरासमोरचा परिसर अगदी ऐसपैस राहण्यासाठी उत्तम.. पण आम्ही आळशीलोक्स.. झोपेचे सामान कोण काढत बसतय म्हणत गाडीतच क्षणभर डुलकीचा आस्वाद घेतला नि सकाळी साडेसहाच्या टोल्याला चालायला घेतले.. वरती जाउन सुर्योद्य पाहण्याचा मानस होता.. पण पश्चिमेकडे कोजागिरीच्या चंद्राचे मावळते रुपच खूप लोभसवाणे होते..

मावळत्या चंद्राला साक्षी ठेवूनच आम्ही पायर्‍या चढायला घेतल्या.. तशा अगदी मंदीराला लागूनच या पायर्‍या सुरु होतात.. पण त्या चंद्रापायी आम्ही सोंडेच्या दिशेने गेलो.. तिथूनच पुढे पायर्‍यांना जाउन मिळालो..

'दुबेर'गड तशी एक छोटी टेकडीच शिवाय बांधलेल्या सिमेंटच्या पायर्‍या यामुळे तुम्हाला आळस करत अगदी गाफीलपणे चढण्याची संधी मिळते.. पण आमच्या कंपूत शॉर्टकट फेम रोमा होता.. पायर्‍या असूनही जल्ला हातपाय फाकवून कातळटप्प्याशी सोप्पी झटापटी करायला लावली.. नॉनसेन्स ! पण गिरीने मात्र आपल्या पायर्‍याच बर्‍या म्हणत पहाटेचा हा व्यायाम कटाक्षाने टाळला..

अंदाजे दहा मिनीटांच्या अंतराने वरती आलो तर ती पायर्‍यांची वाट या डोंगरावरती अगदी कार्पेट टाकल्यागत वाटू लागली.. मागे दुरवर आडकिल्ला, पटटागड(विश्रामगड), औंढ यांची सह्याद्रीरांग धुक्यासंगे निद्रीस्त दिसत होती..

त्या वाटेने मंदीरापाशी पोहोचेपर्यंत पुर्वक्षितीजावर तांबडे फुटले होते.. दुबेरच्या अवतीभवती डोंगरदाटी नसल्याने सभोवताल छानच न्याहाळता येतो.. आमच्या सोबतीला गुरांचा कळप बसला होता तेव्हा त्यांच्या साक्षीने फोटो घेतलेच..

- -

मंदीरातील देवीची मुर्ती अगदी सप्तश्रुंगीदेवीची प्रतिकृती आहे.. तीची प्रसन्न मुद्रा कोवळ्या किरणांमुळे अधिकच तेजस्वी वाटू लागली.. गडाचा घेरा अगदीच छोटा असल्याने पंधरा मिनीटातच परिसर फिरुन गड उतरायला घेतला.. गडावरती पाण्याचे छोटे तळे, एक-दोन टाक्या, एक पडकी इमारत व दर्गा इतक्याच काय त्या गोष्टी पण इतक्या छोट्या उंचीवरुनही दुरदुरवरचा परिसर पाहता येतो हेच 'दुबेरगडा'चे वैशिष्ट्य ! अगदी दुरवर असणारी पवनचक्क्यांची रांग त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होती..

गड उतरुन मंदीरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले.. नव्याने बांधकाम केले आहे पण शिवलिंग भलेमोठे नि सुंदर.. दर्शन घेउन आम्ही चौकाच्या दिशेने निघालो जिथून सिन्नर व आडवाडीसाठी फाटे फुटले होते.. तत्पुर्वी सह्याद्रीमित्र ओंकारने सांगून ठेवले होते तसे दुबेरगावातील थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थळ (बर्वेंचा वाडा) पाहण्यासाठी गेलो.. रस्त्याला लागूनच एक मोठी कमान तेथे वाडा असल्याचे सांगून जाते.. पण वाडयाची बाहेरुनच झालेले दुर्दशा पाहून फक्त रोमा व मीच जाउन आलो.. चांदवडच्या होळकर वाडयाच्या आठवणी ताज्या असल्यामुळे इथे मात्र आमची निराशा झाली.. बाहेरुन तर दुर्दशा होतीच पण आतूनही अगदी डळमळीत.. जागेला महत्त्व असुनही हा वाडा इतका दुर्लक्षित ठेवल्याचे निश्चितच वाईट वाटले..

पण वाडयाच्या परिसरातून बाहेर पडताना ह्या गुलाबाने मात्र मन प्रसन्न केले..

या वाडयाच्या जवळपासच सटवाईदेवीचे मंदीर आहे.. मुर्ती अगदी पहाण्यासारखी.. एका गावकर्‍याने याच गावाच्या कुठल्यातरी आदिवासीपाडयात भोपळ्याची मोठी वेल आहे तीपण बघून या असे सांगितलेले पण एव्हाना भुक अनावर झाली होती.. तेव्हा आम्ही थेट चौकातले हॉटेल गाठून मिसळपावची ऑर्डर दिली.. त्या मिसळीला चव कमी नि झणझणीतपणा जास्त सो आज दिवसभरात नगारे वाजणार याची मला खात्री झाली !

आता गाडी आमची ठाणगावच्या दिशेने निघालेली.. पुढील लक्ष्य होते आडचा किल्ला ! आज दिवसभरात दुबेर, आडकिल्ला करून 'पटटया'ला मुक्काम असा बेत होता आणि दुसर्‍या दिवशी जमलेच तर 'औंढ' व 'बितनगड' हे किल्ले सर करण्याचे मनसुबे आखलेले.. आता रस्त्याच्या दुतर्फा पांढर्‍या गणवेशातील अवाढव्य पवनचक्क्या दुरपर्यंत नजरेस पडत होत्या.. अगदी पवनचक्कींचेच राज्य !

- -

काही अगदी ठिम्म उभ्या तर काही संथगतीने फिरणार्‍या.. काहींची पाती अगदी विमानाच्या पंख्याएवढी ! सुझलॉन कंपनीच्या या पवनचक्क्या अगदी खुबीने सह्याद्रीरांगेच्या डोक्यावर बसवलेल्या आहेत.. म्हणुनच की काय येथील रस्तेही तितकेच चांगले.. अगदी डोंगरांच्या सोंडेवर चढत जाणारे तर मध्येच खोल उतारीचे.. ठाणगाव मागे सरले नि या पवनचक्कींच्या खालूनच जाणार्‍या रस्त्याने आम्ही आडकिल्ल्याजवळ पोहोचलो.. !

सकाळचे नुकतेच दहा वाजून गेले होते पण उनाची प्रखरता जाणवू लागली होती.. शिवाय सगळा प्रांत अगदी ओसाड.. आमच्या आधीच एक ग्रुप वरती चढत जात होता तेव्हा त्यांनी धरलेल्या वाटेनेच चढायला घेतले.. हा आडकिल्लादेखील जेमतेम अर्ध्यातासाच्या चढाईचा दिसत होता.. वाटदेखील बर्‍यापैंकी सोप्प्या चढणीची..
गाडीच्या कृपेने पाठीवर सॅक नसल्या तरी उन घेउन चढताना थोडे त्रासदायक वाटत होते.. पण यातही भोवतालच्या पवनचक्क्यांनी नटलेला नजारा मात्र सारखे लक्ष वेधून घेत होता.. इथे गाडयांची फारशी वर्दळ नसली तरी एसटी तासा-तासाने येते.. वरती गडाला फेरा मारला पण झाडाझुडूपांत झाकलेली पडकी जोती व पाण्याच्या टाक्या यापलिकडे काही नजरेस पडले नाही. येथून 'दुबेरगड' सहज ओळखू येत होता.. तर दुसरीकडे पटटागड-औंढ किल्ल्याची रांग स्पष्ट दिसत होती.. गुरांचा वावर असल्यामुळे टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नव्हते.. जीव आधीच तहानलेला त्यात माश्यांची वैतागवाडी भुणभुण तेव्हा लवकरच गड उतरायला घेतला..

आडकिल्ला चढताना दिसणारी आडवाडी नि एसटीचा रस्ता

- -


- - -.

पवनचक्कींच्या राज्यात यो उडला नाही तर नवलच.. Wink (फोटो by इंद्रा)

- - -


(आडकिल्ल्याहून समोरच टेमकाडसारखे दिसणारा 'दुबेर'गड)

- -


(डावीकडे पसरलेला पटटागड नि उजवीकडचा औंढ)

- -

एवढया गडावर एकही मंदीर कसे नाही हा प्रश्न गड उतरताना पडलाच.. नकाशे वगैरे सगळे गाडीतच राहिलेले.. घाईघाईत आधी चढून गेलेल्यांचीच वाट धरली..शिवाय सह्याद्रीमित्र ओंकार ओकच्या लेखातील उल्लेखही आठवेना.. साहाजिकच आम्ही वाटेत लागणार्‍या एका मोठया गुहेतील देवीचे मंदीर नि कोरलेल्या पायर्‍यांना मुकलो.. !

खाली उतरलो तसे जवळच असणार्‍या विहीरीकडे वळालो.. तळपत्या उनात त्या विहीरीच्या थंडगार पाण्याने जीव मात्र शांत झाला.. तिथेच बाजूच्या झाडाखाली क्षणभर बसकण मारली.. सगळा परिसर अगदी शांत.. अधुनमधून येणारा जोरकस वारा जवळच्या भव्य पवनचक्कीचे गुणगाण सुरु करत होता.. तर दुसरीकडे कुठलातरी पक्षी त्याच्या चोचीने विचित्र आवाज काढत येथील शांततेला भग्न करत होता.. त्याच्या चोचीचा कर्कश आवाजच त्या गडाजवळ इतका दुमदुमत होता की आम्हालाही त्या पक्षीचा शोध घेणे भाग पडले.. पण नक्की कोणता पक्षी ते शेवटपर्यंत कळले नाही..

आडकिल्ला सोडला नि आम्ही ठाणगावात आलो.. जेवणाची वेळ झाली तरी उष्म्याने हैराण असल्याने भूक नव्हती.. तेव्हा पाववडाच्या जोरावर आम्ही पटटावाडीचा रस्ता धरला.. गाडीत एकटा अ‍ॅनिरुद्धच काय तो डुलक्या काढत होत्या.. कसली तुटक स्वप्नं बघत होता तोच जाणे पण या भाऊची शंभरव्या किल्ल्याकडे वाटचाल सुरु झाली होती.. !

आडकिल्ल्यावरुन पटटा-औंढ हे किल्ले जवळ भासत असले तरी बराच फेरा आहे.. जवळपास तासभरानंतर आम्ही पटट्याचा पायथा गाठला.. कच्च्या रस्त्यावरुन गाडी शक्य तितकी वरती चढवली.. गाडीतून उतरल्यावर मात्र जवळपास अर्धी चढाई सर झाल्याचे कळले ! बाजूलाच एक छोटी तोफ नि एका शिल्पाचे अवशेष ठेवलेले आहेत.. गडावरील गुहा अगदी पंधरा-वीस मिनीटांच्या अंतरावर दिसत होती.. पण कडकडीत उन्हात कोणालाच वरती जाण्याची इच्छा नव्हती.. नुकतेच दुपारचे दोन वाजत असल्याने हातात बराच वेळ होता नि याच गडावर मुक्काम आखलेला तेव्हा एका झाडाची सावली दिसताच वामकुक्षीसाठी आडवे झालो.. ये आराम का मामला है !


(फोटोतल्या बाइक आमच्या नव्हेत !! )

तासभराची विश्रांती आटपून सगळे तयारीला लागले.. वरती मुक्कामासाठी लागणारे सामान भरुन होते न होते तोच गिरीने हा किल्लादेखिल पाठीवर वजन न घेताच करण्याचे सुचवले.. हाताशी असलेला भरपुर वेळ, प्रस्तरारोहणामुळे अनिश्चित असलेला औंढ किल्ला व बितनगडाचा आजच पायथा गाठला तर उद्यादेखील आरामदायक ट्रेक होण्याची आशा ह्या सगळ्यांची टोटल काढली नि घेतलेले सामान पुन्हा गाडीतच ठेवले..! पाचेक मिनीटांत प्लॅन बदलून टाकला ! किती सोप्पय ! Proud

काही अवधीतच आम्ही तेथील प्रसिद्ध लक्ष्मणस्वामी यांची समाधी असलेल्या गुहेजवळ पोहोचलो.. दर पौर्णिमेला दरवाजा उघडला जातो असे त्या गुहेच्या बंद दरवाज्यावर लिहीले होते.. या परिसरात माकडांची भली मोठी फौज धुमाकूळ घालत असल्याने आम्ही तिथे न थांबताच वरती सरकलो.. वाटेत अधुनमधुन लागणार्‍या कोरलेल्या पायर्‍या असोत वा खडकाचाच आधार घेउन आजही खंबीरपणे उभ्या असलेल्या तटबंदीच्या भिंती असोत.. किल्ल्याते अस्तित्व चढताना जाणवतेच..

गडावरची गुहा :

- -

अजस्त्र कातळ भिंत व तटबंदी

काही अंतरावरच आणखी एक गुहा लागली जिथे देवीच्या मुर्ती आहेत.. मुक्कामासाठी गुहा छान.. पुढेच उजवीकडे अजुनही भक्कम स्थितीत असलेला उत्तरमुखी दरवाजा (दिल्ली दरवाजा) आपल्याला साद घालतो.. सुस्थितीत असलेली सुंदर कमान हीच खरी या दरवाज्याची शान आहे.. येथील बुरुजावरुन अगदी आडकिल्ल्यापासून सुरु झालेली वाटचाल नजरेस पडते.. अजुन वरच्या बाजूस चढून गेलो तर पटटाई देवीच्या मंदीराचे जीर्णोद्धाचे बांधकाम सुरु असल्याचे दिसले.. बाजूलाच पिण्याच्या पाण्याची टाकीदेखील आहे..

उत्तरमुखी दरवाजा

या गडावर अगदी सुस्थितीत असलेले किल्ल्याचे अवशेष म्हणजे अंबारखाना जो मंदीराच्या पुढे वरती गेलो की नजरेस पडतो.. आम्ही अंबारखानाच्या दिशेने चढू लागलो तोच वातावरणात अचानक बदल झाला.. जोरकस वार्‍याने प्रवेश केला.. मागे वळून पाहिले तर कृष्णमेघांची मोठी लाट आडकिल्ल्यावरुन वेगाने आमच्यादिशेने येत होती..

पावसाची सर आली तर आमचे कॅमेरे धोक्यात होते तेव्हा पुढे जायचे की मागे मंदीरात जाऊन थांबायचे हा प्रश्न पडला.. पण ती लाट एक- दोनच थेंब पाडून आमच्या डोक्यावरुन पुढे सरकली नि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.. अंबारखान्यापाशी जाताच समोरच शिवरायांचा अर्धपुतळा नि त्यांचा शिरावरती फडफडणारा जरीपटका पाहून अंगात स्फूरण चढले.. जालन्याची लूट केल्यानंतर महाराज याच गडावर काही काळ विश्रांतीसाठी थांबले होते व याच घटनेमुळे 'पटटागड नंतर विश्रामगड' म्हणून ओळखू जाउ लागला.. !

- -

तीन घुमटयांचे छत असलेला हा अंबारखाना आतून बर्‍यापैंकी प्रशस्त. आतील कमानी, भिंती इति सारे बांधकाम अजुनही तग धरुन आहे हेच आपले भाग्य समजावे..

- - -

या अंबरखान्यापासून काही अंतरावरच पाण्याची मोठी टाकी आहे.. आम्ही आता सरळ माथ्यावर चढत जाणारी वाट पकडली.. माथ्यावर पोहोचलो नि मन हरपून गेले.. दृश्यच तसे होते.. आकाशात कृष्णमेघांचा उसळलेला समुद्र.. त्यातूनही सुर्यदेवांनी भूतलावर मारलेला टॉर्च.. वातावरणाला एक वेगळीच धुंदी चढली होती.. या धुंदीनेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजेच कळसुबाई व ट्रेकर्सलोकांमध्ये उंचीचे स्थान मिळवणारे 'अलंग-मदन-कुलंग' हे दुर्गत्रिकुट या डोंगररांगेला एक आगळाच साज चढला होता.... आम्ही मात्र पुरते बेहोश होउन गेलो होतो.. कॅमेरे थकले.. शेवटी डोळ्यांनीच तो निसर्गाविष्कार निरखू लागलो.. खरच निसर्गाचे असे खेळ सुरुच असतात फक्त ते दिसले पाहीजेत.. त्यासाठी अश्या उंच ठिकाणी येउन तासनतास बसले पाहीजे.. हाच भाग्याचा दिवस होता कारण वारंवार ट्रेक करुनही असे नशिब क्वचितच फळफळते.. ! मग अश्या आठवणीच हृदयाच्या कप्प्यात कायमच्या कोरल्या जातात..

पटटयाच्या माथ्यावरील सर्वोच्च शेंडयापर्यंत चढेपर्यंत नभापटलावरची रणधुमाळी अकस्मात थंडावली होती.. कृष्णमेघांच्या समुद्राला पश्चिमेचे क्षितीज गिळण्यात अपयश आले होते.. आता दिसणारे दृश्य अगदी स्थिरचित्राप्रमाणे भासत होते..

- -

पटटयाचे सर्वोच्च टोक

या शेंडयावरुन आमच्या नजरेची लेन्स मात्र चोहीदिशेने वळत होती.. आजोबापासून अलंग-मदन-कुलंगपर्यंत तर पलिकडे टोकाला इगतपुरीचा त्रिंगलवाडीदेखिल नजरेस पडत होता..भोवतालचा सारा परिसर नजरेत ठेवता येत असल्याने ह्या किल्ल्याला नक्कीच महत्त्वाचे स्थान मानले जात असावे..

- - -

औंढ किल्ल्याकडे जाणारी वाट

घटकाभर विसावल्यानंतर आम्ही जेमतेम अर्ध्यातासात पायथा गाठला तो अगदी समाधानपुर्ती भावनेने.. ज्यासाठी अटटाहास करतो ते उद्दीष्ट साध्य झाले होते.. तासभरात जो काही निसर्गाविष्कार अनुभवला होता त्याने मन भरुन गेले होते.. आमच्यातला अ‍ॅनी तर त्याच्या गडांचे शतक अश्या अवर्णनिय क्षणामुळे झाले म्हणून भलताच खूष होता !! 'पटटागड' त्याच्या ट्रेकींग-बायोडेटात कायमचा कोरला गेला !

आता आमची गाडी बितनवाडीच्या रस्त्याला लागली.. ज्या पटटागडाच्या माथ्यावरुन रांगेतील पवनचक्क्या पाहिल्या होत्या त्यांच्या खालूनच रस्ता गेलेला.. या रस्त्याने जाताना मागे पटटा अवाढव्य पसरलेला दिसत राहतो..

तर एकीकडे औंढचा माथा दुरुनच बघण्यात आम्ही धन्यता मानली.. ! सांजवेळी अचानक आभाळ भरुन आल्याने सुर्यास्त जवळपास हुकल्याचे वाटले होते.. पण मावळत्या दिनकराने ओझरते दर्शन दिलेच.. अगदी नजरेसमोर होणारा सुर्यास्त पाहून धन्य झालो..

आतापर्यंतची वाटचाल डोंगराळभागातून झाली तरी जवळपास ओसाड प्रदेश.. दाटझाडीचे जंगल वगैरे प्रकार नव्हता.. पण इथे बितनगडाकडे जाताना मात्र जंगलाचा हरितपटटा लागतो.. एका बाजूस दरी तरी दुसर्‍याबाजूस डोंगर.. त्याही डोंगराच्या शेंडयावर पवनचक्क्या ! जल्ला ह्यांना कुठं कुठं कसं कसं उभ केलय याचेच नवल वाटते.. आता अंधाराचे गुढ साम्राज्य क्षणाक्षणाला वाढत जात होते.. सुनसान जागेत आमची गाडी किंचित डळमळीत रस्त्याचा अंदाज घेत पुढे सरसावत होती.. पटटागडावरील मुक्काम टाळण्याचा अजब-गजब निर्णय आम्ही घेतला होता खरा.. पण बितनवाडीत मुक्कामाची नक्कीच सोय होईल याबद्दल सगळ्यांनाच खात्री होती.. भटक्यालोकांना काय अंथरायला एक सपाट जागा मिळाली तरी पुरे..

आमच्या मागून येणार्‍या एका बाईकवरच्या इसमापाशी 'बितनवाडीचाच रस्ता ना' म्हणून खात्री करुन घेतली.. पुढे गेलो तर तोच इसम रस्त्यात उभा ! त्याने ओळख करुन दिल्यावर कळले की तो गावचा पोलीस पाटील.. आमची चौकशी करण्याखातर त्याने घराकडे चहापानासाठी बोलवले.. आम्हाला चौकशीपेक्षा चहा मिळतोय म्हणून लगेच तयार झालो.. Proud

पाटलांच्या घरच्या अंगणात तोंड धुताना डोळे मिटले नि पुन्हा पट्टागडावरुन पाहिलेले 'तेच' दृश्य समोर तरळले..

दिवसभरच्या सुंदर आठवणींची उजळणी करत आम्ही अंगणात पहुडलो.. रस्त्याच्या डावीकडे थोडे वरती असलेले हे घरच या गावात पहिले लागते.. गाडी रस्त्याच्या कडेलाच लावून आम्ही घरी गेलो.. मलाच काय तर आम्हा सर्वांना ह्या घराची जाग एकदम बेस्ट वाटली.. छोटया आंगणाचे छोटे घर.. मागे राखणासाठी मोठा डोंगर.. अंगणातून समोर बघायचे तर आम्ही ज्या डोंगराच्या कडेवरुन आलो ती सगळी वाटचाल नजरेस पडत होती.. अगदी जसे घाटरस्त्यावरचे घर .. रस्त्याच्यापलिकडे काही शेतमळे सोडले तर लगेच दरी होती.. समोर दुरवर डावीकडे पाहिले तर चक्क संपुर्ण 'पटटागड' व मागे 'औंढ'चे डोके नजरेच्या टप्प्यात होते.. ग्रेट ! अंगणातून बसून एवढं सगळ अनुभवता येतय तर घरात कोण जाईल.. चटई टाकून बुड टेकवण्याऐवजी लोळायलाच घेतले..!

लवकरच अंधारात डोंगर झाकाळून गेले पण काही क्षणातच समोरच्या डोंगरामागे दुधाळ प्रकाशाची चाहूल लागली.. डोंगरपल्ल्याड उगवलेला चंद्र हळुवार आपले डोके वर करुन येउ लागला.. कोजागिरी पौर्णिमेनंतरची पहिली रात्र.. पण चंद्र तितकाच तेजस्वी नि प्रसन्न ! पावसाळी हंगामात चंद्र-सुर्य यांच्याशी काही संबंध साधता येत नाही.. पण पाउस सरला की यांच्या उगवतीचा नि मावळतीचा प्रसंग नेहमीच मनावर छाप पाडतो ! आजतर दिवसभरात चंद्रास्त, सुर्योद्य, सुर्यास्त नि आता चंद्रोद्य ! दिल भर गया !


(अमानवीय काही दिसतेय का.. ;))

आता अंगणातच गप्पांचा फड रंगलेला.. चौकशीचे म्हणाल तर आम्हीच पोलीसपाटलांची जास्त चौकशी केली.. Proud आपुलीकीने ! 'आम्हाला ओळख-पाळख लागत नाही.. लगेचच त्या घरातल्या मंडळींना आपलेसे करुन घेतो' हे आमच्या ग्रुपचे वैशिष्टय.. (गर्व आहे, आपलेच लाड करतोय म्हणालात तरी चालेल ! Proud )

ही तर आपलीच मंडळी वाटताहेत हे क्षणातच त्यांना उमगले नि आमच्या पाहुणचाराची सुरवात झाली... पण अश्याठिकाणी पाहुणचार करुन घेण्यात आम्हाला कधीच स्वारस्य नसते तेव्हा 'जेवण वगैरे काहीही नको.. तुमचे सगळे आटपून झाले की फक्त चूल वापरण्यास द्या' इति सांगून मोकळे झालो..

ते पाटिलमामा आपल्या अर्धांगिनीसोबत राहतात.. त्यांची मुलं मात्र मुंबईला.. बाजूच्याच घरात त्यांचे बंधू.. तेदेखिल आमच्या गप्पांमध्ये सामिल झाले.. डोंगर आणि जंगल बघून तरी वाटले होते पण गप्पांमध्ये कळले की इथे जंगली प्राण्यांचा फारसा वावर नाही.. घरातल्या ताईंनी चुलीवर गरम केलेले पाणी आणून दिले नि लगेच 'कप N सूप' चे पडघम वाजले.. अंगणातच एका कोपर्‍यात पापड भाजण्यासाठी आग केलेली.. मग काय 'स्लर्प स्लर्प' नि 'कुर्रम कुर्रम' !!! Happy

आता मात्र भू़क चाळवलेली.. एव्हाना गिरी घरातल्या चुलीवर कामास लागलेला.. म्हणजेच रेडी टू इट ची पाकीटे गरम पाण्यात ठेवलेली.. तर बाजूच्याच आगीवर ते पाटीलमामा 'खवा' बनवत होते .. आणि आम्ही बाकीलोक्स ताटं घेउन बसलेले.. काहीच न करता फक्त पाकीटं फोडून जेवायला घेताहेत याचे मामांना नवल वाटणारच.. Happy

जेवणं उरकली.. खूपच सोयीचे पडले होते.. गडावरचा मुक्काम म्हटला तर चुलीची जागा शोधण्यापासून सुरवात करावी लागली असती.. इथे तर घरचीच चूल नि मदतीस इतर साहीत्यदेखिल मिळाले.. गडावर मुक्काम न केल्याची खंत होती पण डोंगरमाथ्यावरच्या या घराने कसलीच कसर पडू दिली नाही.. तितकाच आनंद घेता आला.. या घरातच झोपण्याचा विचार आला होता खरा पण कशाला उगीच आपली अडचण म्हणून शाळेतल्या ओसरीवरच मुक्काम करण्याचे पक्के केले.. मामांनी दिलेल्या सकाळच्या चहाचे आमंत्रण स्विकारुन आम्ही शाळेची वाट धरली.. तुमच्यासोबत एका मुलाला बितनगडावर पाठवेन असे सांगून मामांनी आमच्या जबाबदारीचा विडाच उचलला होता..!

थंडगार हवेच्या भूपाळीनेच सकाळी जाग आली.. मग चुलीवरची मॅगी व चहा घेउन आम्ही ट्रेकारंभ केला ! मामांनी सांगितल्याप्रमाणे एक मुलगा (सुनिल) आला होताच.. पण बितनवाडीतील इतर चिल्लर पार्टीदेखील आमच्यात सामिल झाली.. मग धमालमस्ती करत बितनगडाच्या दिशेने कूच केले..

- -

इथल्या लोकांसाठी 'बितंगा' म्हणूनच ओळख.. बितनवाडी मुळातच बितंगाच्या खांद्यावर वसलेली.. त्यामुळे बितंगाची चढाई फारशी उंचीची वाटत नाही.. इथे कोरलेल्या पायर्‍या या गडाचे वैशिष्टय ! पकडीसाठी खोबणीची सोय असली तर पावसात येथील चढाई नक्कीच थरारक होउ शकते.. या पायर्‍या दोन-तीन टप्प्यात आहेत.

समोर बितंगा नि मागे कळसूबाई व अलंग-मदन-कुलंग

वाटेत लागणारी दोन कडयांमधली ही अवाढव्य घळ

अरुंद पायर्‍या

इंद्रदेवांचे कष्ट

पायर्‍या चढताना दिसणारा अप्रतिम नजारा

(डावीकडे डोके दिसतेय तो औंढ तर उजवीकडे अगदी धुसर दिसणारा डोंगर म्हणज आडकिल्ला तर मध्ये पसरलेला पटटागड.. अलिकडे बितनवाडीतून इथपर्यंत येणारी वाटही दिसते)

पहिला चढ पार केला की उजवीकडे पाण्याचे चौकोनी भुयारी टाके लागते.. पुढे पायर्‍यांनी चढून गेले की दोन खांब असलेली गुहा लागते.. पाच-सहाजण सहज राहू शकतील इतकी मोठी.. पायर्‍यांनी अजुन वरती गेले की पाण्याच्या काही टाक्या आढळतात.. पुढे पायर्‍या संपल्या की सरळ मातीच्या घसरणीचे चढण लागते.. हे पार केले की थेट माथ्यावर ! माथा अगदीच अरुंद.. किल्ल्याचे अवशेष वगैरे काही नाही पण सभोवतालच्या भव्यदिव्य ङोंगररांगा मनाला सहज भुरळ पाडतात..

इथून दिसणारी खोल दरी थेट काळजात घुसते.. शेणत डोंगराची उंची वेडावून सोडते.. त्याच्या माथ्यावरील पवनचक्क्यांचा तुरा अगदी डौलाने डुलताना दिसतो.. तर दुसरीकडे कळसुबाई, अलंग-मदन-कुलंग हे त्रिकुट अगदी हाकेच्या अंतरावर भासते.. इथून नक्कीच कळसुबाईच्या डोंगरावर जाणारी वाट असावी असा अंदाज होता.. आम्ही नवरात्रीला याच वाटेने कळसुआईच्या दर्शनाला जातो असे सुनिलने सांगत आमचा अंदाज खरा ठरवला ! अ‍ॅनिने तर माझ्या पार्टनिरशिपने पुढच्या नवरात्रीसाठी ह्या ट्रेकचा प्लॅन पण आखला !

बितनगडाच्या मागच्या बाजूची दरी..

शेणत डोंगराचे कडे नि पवनचक्क्यांचा तुरा

खादाडी-फोटोसेशन आटपून आम्ही लगेच उतरायला घेतले.. पण आता बितंगाच्या मागच्या बाजूने.. फारसे सोप्पे नव्हते.. मातीचा घसारा.. त्यात सुक्या गवताची भर नि थेट उतरण तेव्हा घसरगुंडीची कसरत करुन उतरणे भाग पडले.. हाच काय तो संपुर्ण ट्रेकमधला थोडाफार थरार ! पण ती चिल्लर पार्टी अगदी नेहमीचाच खेळ समजून टणाटण घसरगुंडीच्या उडया मारत गेले.. फारच मस्ती चालली होती.. एकाने तर किटकाला पकडून त्याचा 'किर्रकिर्र' आवाज कसा सुरु असतो ते दाखवले.. शिवाय छोटया तेंडलीच्या आकाराची 'मेका' हे रानफळ पण चाखायला दिले.. पिवळ्या फुलांच्या वेलींना येणारी ही मेका चवीला आंबट पण मस्तच.. एक नविन रानमेवा चाखायला मिळाले त्यातच आनंद.. !

मेका (फोटो by रो.मा)

- -

धडकी भरवणारा उतार

पण हे तर अव्वल नंबर !!

बितंगाला वळसा घालेपर्यंत पाण्याच्या अजुन तीन - चार सुक्या टाक्या नजरेस पडल्या.. सगळीकडे वाढलेल्या गवताचे साम्राज्य होते... इथेही वाटेत एक गुहा लागते.. विस्ताराने छोटा असूनही बितंगावर त्यामानाने पाण्याच्या बर्‍याच टाक्या आहेत. पण बहुतांशी सुकलेल्या नि बुजलेल्या..ह्या गडाचादेखिल पहारा ठेवण्यासाठी वापर केला जात असावा.. उत्तुंग डोंगररांगेत छोटा वाटणारा हा बितंगा त्याच्या उत्तम स्थानामुळे प्रिय वाटतोच.. पायथ्याची बितनवाडीदेखील मस्त.. शेळ्यामेंढया नि गुरांना घेउन वसलेली छोटीशी वस्ती.. इथे मुक्काम करण्यासाठी शाळा तर आहेच पण एक हनुमानाचे मंदीरदेखील उत्तम आहे..

वनखात्याने गावात लावलेले पोस्टर

- -

घरासमोरील लाडीळवाणे वासरु:

- -
बच्चाकंपनीचा निरोप घेउन पाटीलमामांकडे पोहोचलो.. त्यांच्याकडून 'खवा' तर विकत घेतलाच शिवाय बळजबरीने हातात 'मानधन' ठेवून त्यांचाही निरोप घेतला.. जाताना मात्र डुंबायला कुठे पाणी लागेल का याची चौकशी केलीच.. त्यांनी सुनिलाच बरोबर पाठवले नि त्याने रस्त्यालाच पुढे लागून असणारा छोटेखानी पण मस्त झर्‍याची जागा दाखवली.. डुबकी मारणे अशक्य होते पण मॅगीच्या टोपाच्या (!!!) मदतीने शंभोचा कार्यक्रम आटपलाच.. थंडगार पाणी अंगावर पडले नि ट्रेक खर्‍या अर्थाने पुर्णम झाला..

बाराच्या आत आम्ही बितनवाडी सोडले.. पहिल्यांदाच मेगा ट्रेक करुन घरी संध्याकाळी सहाच्या आत घरात पोहोचणार याची खात्री झाली.. सर्वतीर्थ टाकेदला जाण्याचे आधीच ठरलेले.. टाकेदच्या रस्त्याला लागलो तर डावीकडचे बितनगड नि त्याचे इतर सह्यपाठीराखे लक्ष वेधुन घेत होते..

- -
बितनवाडीहून टाकेदकडे जाताना रस्त्यात लागलेले व्याघ्रशिल्प

- -
बितनगड व त्याचे सह्यपाठीराखे

टाकेद हे सर्वतीर्थ पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध.. इथेच रावणाशी युद्ध करून जखमी झालेल्या गरुड राज जटायू साठी प्रभू श्री रामचंद्रांनी बाण मारून सर्व तीर्थांना बोलाविले अशी कथा आहे.. इथे बारामाही वाहणारा झरा आहे जिथे काळ्या पाषाणात बांधलेले कुंड आहे.. सभोवताली जटायू मंदीर, श्रीराम मंदीर, श्रीदत्त मंदीर, महादेवांचे व हनुमानाचे मंदीर असा परिसर आहे.. येथील श्रीराम-लक्ष्मण-सीता व श्रीदत्त यांची मुर्ती खूपच सुंदर आहे.. बाकी परिसर सर्वतीर्थ म्हणून ख्याती असल्याने बराचसा चकाचक नि स्वच्छ ! भाविकांची वर्दळ असणारच.. बाजूलाच अजुन एक असलेल्या मोठया कुंडात बच्चाकंपनी अगदी जोमाने सुर मारुन पाण्यात डुंबत होते.. मुख्यकुंडाच्या जवळच बाहेर एक पिंड असून त्यात जमिनीत आत एक गुळगुळीत दगड ठेवला आहे.. मनात इच्छा ठेवून तो बाहेर काढल्यास इच्छापुर्ती होते इति तेथील लोकांची श्रद्धा आहे ! पण हे आम्हाला अ‍ॅनिने सहजतेने दगड बाहेर काढल्यानंतर कळले.. जल्ला अ‍ॅनिची इच्छापुर्तीची संधी अधुरीच राहीली.. !

- -

हे सगळे पाहेस्तोवर जठाराग्नी चांगलाच भडकलेला.. तेव्हा लगबगीने परतीची वाट धरली... कोजागिरी पौर्णिमेचे निमित्त घेउन अकस्मात ठरवलेला हा ट्रेक सुंदर आठवणींमुळे अगदी बहारदार ठरला. खरेतर हा ट्रेक ठरवूनही प्लॅन बोंबलणार होता.. माहिती काढून झाली तरी संध्याकाळपर्यंत काहीच निश्चित नव्हते.. अगदी मंडणगडापासून ते साल्हेर-मुल्हेर ते चक्क लिंगाणापर्यंत गडांची नावे घेउन झाली.. फक्त ट्रेक रद्द होण्याच्या मार्गावर होता ! पण शेवटी सारे आलबेल होउन मस्त- मस्त ट्रेक झालाच.. शिवाय संपुर्ण ट्रेकमध्ये पाठीवर सॅकची ओझी नसल्यामुळे तर अगदी रॉयल ट्रेकच वाटला.. आता इतके सगळे शानदार झाले तर शेवटही शानदार जेवणाने करुया म्हणत एका हॉटेलमध्ये चटकदार वेज-नॉन वेज जेवणाचा आस्वाद घेतला.. आगामी ट्रेकबद्दल गप्पा झाल्या नाही तर नवलच.. ! पण कसे आहे ना.. आम्ही जाऊ तेव्हा जाऊ ! तेव्हा पुढील संधीच्या प्रतिक्षेत.. ! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅमस्टर्डॅमचे काही धुवट प्रवास वर्णन असेल म्हणून वैतागून उघडले तर काय आपले सह्याद्रीचेच कच्चेबच्चे निघाले. फोटो आणि वर्णन मस्त आहे.

मस्त Happy

बित्तंगाला जाताना ती पोरं लोखंडी गोल सळ्याने पळवत आहेत तो आमचा लहाणपणीचा सोल्लिड टाइमपास होता. Happy

यो चिवृ मस्तच..

पोरं लोखंडी गोल सळ्याने पळवत आहेत तो आमचा लहाणपणीचा सोल्लिड टाइमपास >> या ट्रेक मधे सगळ्यांनीच गाडे पळवण्याची हौस पुरवुन घेतली.

मस्त ! तुम्ही सगळेजण आता ही वर्ण॑नं करण्यात मास्टर झाला आहात. अगदी ओघवती शैली...आम्हालाही बरोबर घेऊन जाणारी Happy

त्या भोपळ्याच्या मोठ्या वेलाचं काय खास आहे ते विचारुन नाही का घेतलंत?

आयला यो … बैलाबरोबरचा silhoutte फोटो अगदीच अप्रतिम काढलास … इतर फोटो सुद्धा झकास… आणि नेहमीप्रमाणे वर्णन बढीया… तुझ्या ​Patented उडी चे फोटोस ​कुठेत?

मस्त ! तुम्ही सगळेजण आता ही वर्ण॑नं करण्यात मास्टर झाला आहात. अगदी ओघवती शैली...आम्हालाही बरोबर घेऊन जाणारी >>>> अग्दी अग्दी ........

नेहमीप्रमाणेच कडक वृतांत आणि फोटोज Happy
पट्टा गड आणि हा साराच पट्टा राहिलाय. Wink

बैलाबरोबरचा silhoutte फोटो अगदीच अप्रतिम काढलास>>>>+१ Happy

जबरदस्त....
सगळ्यात पहिला तर फारच कातील फोटो आणि नंतर तीन बैलांचा पण लई भारी...
मस्त ओघवते वर्णन...
पट्ट्यावर मुक्काम करायचा ना राव...सगळ्यात भारी जागा असेल ती मुक्कामासाठी

व्वा मस्तच लिव्हलय यो.. Happy
फोटु तर लय भारी.. खरच एक भन्नाट ट्रेक झाला आपला..

बास झाल आता.. चला पुढच्या ट्रेकची सॅक भरायला घ्या आता... सह्याद्री वाट पाहतोय.

धन्यवाद Happy
ते विचारुन नाही का घेतलंत? >> भरपुर नि मोठमोठे भोपळे हेच आकर्षण
तुझ्या ​Patented उडी चे फोटोस ​कुठेत? >> दत्तू, इंद्राच्या वृत्तांतामध्ये आहे रे ती उडी
दिनेशदा.. ती माकडांना फळे जास्त आवडत असावी असा अंदाज.. पण तिकडे माकडांचा वावर नव्हता
पट्ट्यावर मुक्काम करायचा ना राव...सगळ्यात भारी जागा असेल ती मुक्कामासाठी >> चँप.. त्यासाठी पुनश्च भेट होईलच कधीतरी.. Happy

यो: (नेहेमीप्रमाणे) अफलातून फोटू अन् भटकंती...
ऑफिसमध्ये अडकलेल्या ट्रेकर्सना जळवण्याचा डाव यशस्वी झालाय Wink Proud

यो: (नेहेमीप्रमाणे) अफलातून फोटू अन् भटकंती...
ऑफिसमध्ये अडकलेल्या ट्रेकर्सना जळवण्याचा डाव यशस्वी झालाय Wink Proud

बाहेरुन तर दुर्दशा होतीच पण आतूनही अगदी डळमळीत.. जागेला महत्त्व असुनही हा वाडा इतका दुर्लक्षित ठेवल्याचे निश्चितच वाईट वाटले..>>><<पण वाडयाच्या परिसरातून बाहेर पडताना ह्या गुलाबाने मात्र मन प्रसन्न केले..>>> तुमच्यासारखे सह्याद्रीवीर हे त्या गुलाबासारखे आहेत. सध्या असलेली किल्ल्यांची स्थिती , तिथला सगळा आनंद ह्यात तुम्हांसारखे सह्याद्रीवीर तिथे जाऊन तिथली वर्णन फोटो हे सगळ शेअर करताय हे एक प्रकारे प्रबोधनच आहे , धन्यवाद!