श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ४

Submitted by पुरंदरे शशांक on 30 November, 2013 - 11:12

श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ४

तत्वज्ञ म्हणून माऊली एखादा विषय कसा सुरेख दृष्टांत, उपमा, उदाहरणे देऊन सांगतात ते पाहूया..

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् |
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ||४७-अ. १८||

उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा ।
स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥ ४७ -गीताई॥

अगा आपुला हा स्वधर्मु| आचरणीं जरी विषमु|
तरी पाहावा तो परिणामु| फळेल जेणें ||९२३|| ...... (विषम = कठीण, अवघड, परिणाम=शेवटी)
अरे, आपला हा स्वधर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी जे मोक्षरुपी मोठे फळ प्राप्त होणार त्या परिणामावर लक्ष ठेवले पाहिजे.

जैं सुखालागीं आपणपयां| निंबचि आथी धनंजया|
तैं कडुवटपणा तयाचिया| उबगिजेना ||९२४|| .....(उबगिजेना=कंटाळत नाही)
हे धनंजया, कडुनिंबाचे सेवन केले असता जर आपल्याला तो निंबच सुखकर होत असेल तर त्याच्या कडुपणाला कंटाळू नये.

फळणया ऐलीकडे| केळीतें पाहातां आस मोडे|
ऐसी त्यजिली तरी जोडे| तैसें कें गोमटें ||९२५||...(आस मोडे=आशा रहात नाही)
केळ विण्याचे पूर्वी तिच्या झाडाकडे पाहिले तर आशा भंग होतो (निराशा होते) आणि अशा स्थितीतच जर ती झाडे तोडून, उपटून टाकली तर त्या केळीपासून उत्तम (गोमटी) फळे कोठून प्राप्त होणार ?

तेवीं स्वधर्मु सांकडु| देखोनि केला जरी कडु|
तरी मोक्षसुरवाडु| अंतरला कीं ||९२६||.... (सांकडु = कठीण, मोक्षसुरवाडु=मोक्षसुख)
त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे असे पाहून तो कडू केला (सोडून दिला) तर तो मोक्षसुखाला अंतरला नाही का ? (दुरावला नाही का)

आणि आपुली माये| कुब्ज जरी आहे|
तरी जीये तें नोहे| स्नेह कुऱ्हें कीं ||९२७||.. (कुर्‍हे=वाईट)
आणि समज, आपली आई जरी कुबडी (कुरुप) असली तरी ज्या तिच्या प्रेमामुळे आपण जगतो, ते तिचे प्रेम काय वाकडे असते का?

येरी जिया पराविया| रंभेहुनि बरविया|
तिया काय कराविया| बाळकें तेणें ? ||९२८||..(येरी=इतर, पराविया=परक्या, बरव्या=चांगल्या)
एर्‍हवी इतर दुसर्‍या स्त्रिया जरी रंभेहूनही सुस्वरुप अशा असल्या तरी त्या बालकाला त्या घेऊन काय करायच्या आहेत ?

अगा पाणियाहूनि बहुवें| तुपीं गुण कीर आहे|
परी मीना काय होये| असणें तेथ ||९२९||..(बहुवे=जास्त, कीर= खरोखर, मीना=माशाला)
अरे, पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत, हे अगदी खरे; पण त्या तुपात माशाला ठेवून काय उपयोग ? तो जगेल तरी का?

पैं आघविया जगा जें विख| तें विख किडियाचें पीयूख|
आणि जगा गूळ तें देख| मरण तया ||९३०||....(विख =विष, पीयूख= अमृत)
हे पहा ! जे (विषारी वनस्पतीतील विष) सर्व जगाला विष आहे, तेच विष त्यातील किड्याला अमृत (जीवन) आहे; आणि गूळ जो सार्‍या जगाला गोड आहे, तोच त्या किड्यांना मृत्यु-मारक आहे.

म्हणौनि जे विहित जया जेणें| फिटे संसाराचें धरणें|
क्रिया कठोर तऱ्ही तेणें| तेचि करावी ||९३१||
म्हणून शास्त्राने ज्याला जे विहित कर्म सांगितले आहे व ज्याच्या आचरणाने संसाराचे धरणे फिटते-बंधन तुटते, ते विहित कर्माचरण कितीहि कष्टसाध्य असले तरी तेच विहित कर्माचरण करावे.

येरा पराचारा बरविया| ऐसें होईल टेंकलेया|
पायांचें चालणें डोइया| केलें जैसें ||९३२||..(पराचारा = पर आचार, बरविया=चांगले, उत्तम, )
आपल्या विहित कर्मावाचून इतर धर्म (दुसर्‍याचा धर्म) उत्तम म्हणून जर त्याचे आचरण केले तर, पायाने चालण्याचे काम डोक्याने करावे त्याप्रमाणे होईल (उलट ते दु:खाला मात्र कारण होईल)

यालागीं कर्म आपुले| जें जातिस्वभावें असे आलें|
तें करी तेणें जिंतिलें| कर्मबंधातें ||९३३||
याकरिता आपल्या जातिस्वभावानुसार आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आपले आहे त्याचे जो आचरण करतो, त्यानेच कर्मबंधाला जिंकले असे समज.

आणि स्वधर्मुचि पाळावा| परधर्मु तो गाळावा|
हा नेमुही पांडवा| न कीजेचि पै गा ? ||९३४||... (गाळावा= टाकावा, सोडावा)
आणि म्हणूनच अर्जुना ! परधर्माचा त्याग करावा व स्वधर्माचेच आचरण करावे असा नियम नको का करावयाला ?

तरी आत्मा दृष्ट नोहे| तंव कर्म करणें कां ठाये ? |
आणि करणें तेथ आहे| आयासु आधीं ||९३५|| (का ठाये = राहिल काय, आयास=सायास, कष्ट )
जर असा नियम न केला तर आत्मा जोपर्यंत यथार्थ अनुभूतिदृष्ट्या, दृष्ट झाला नाही तोपर्यंत कर्म करण्याचे राहिल काय? (तर नाही), म्हणून ते स्वकर्म अवश्य केलेच पाहिजे आणि कोणतेहि कर्म करणे म्हटले तरी त्यात आरंभी सायास हे आहेतच.

स्वभावतः आपल्या वाट्याला आलेले जे विहित कर्म तो स्वधर्म. (जसे विद्यार्थ्याला अभ्यास, आईला मुलाचे संगोपन, इ.) तो आपल्या वाट्याला आल्याने त्याचेच नीट आचरण केले तर सुरुवातीला जरी तो कठीण, विचित्र, नकोसा, त्रासदायक वाटला तरी तो अंतिमतः (परिणामी) कसा उपयुक्त असतो हे माऊली आपल्याला उलगडून सांगत आहेत. हा स्वधर्म आचरीत असतानाच जर अनायासे मोक्ष मिळणार असेल तर तो कठीण म्हणून अजिबात सोडून देता कामा नये.
आपला स्वधर्म जरी सुरुवातीला कडुनिंबासारखा कडु वाटला तरी स्वधर्म असल्याने त्याला कंटाळून चालत नाही. कारण औषध हे चवीला कडू असले तरी त्याचा परिणाम हा जसा उत्तम आरोग्य प्राप्त करुन देणारा असाच असतो.

पुढे माऊलींना स्वधर्माला आईची उपमा दिली आहे. एखादी आई जरी कुबडी, कुरुप असली तरी तिचे मुलावर जे प्रेम असते ते काय वेडेवाकडे असते का? आणि तिच्या मुलाच्या दृष्टीने विचार केला तर एखाद्या रंभा-उर्वशीपेक्षाही सुंदर बाईपेक्षाही जशी त्याला ती कुरुप आईच प्रिय असते तसे स्वधर्माचे आहे. तो वरवर जरी कुरुप भासला तरी त्याच्याशिवाय आपले जिणेच कठीण असते.

तूप हे पाण्यापेक्षा खूप मौल्यवान असले तरी माशाला जसे जगण्यासाठी पाणीच आवश्यक असते तसा स्वधर्म आपल्याला इतर कोणापेक्षाही (परधर्म) जास्त मूल्यवान असतो.
काही किडे हे विषारी (आपल्या दृष्टीने) वनस्पतींवर जगतात. ही वनस्पती आपल्याला विषारी असली तरी त्या किड्याच्या दृष्टीने अमृतासम असते. आणि आपल्या दृष्टीने खाद्य असा गूळ त्या किड्याला मात्र विषासम असतो.

अशा प्रकारची अनेक उदाहरणे देऊन माऊलींनी स्वधर्माचे जे श्रेष्ठत्व विशद केले आहे ते कायम अभ्यासण्यासारखे आहे. आई जशी मुलाला स्वभावतः मिळालेली असते तसा स्वधर्म हा स्वभावतः मिळालेला असतो - तो कुठे शोधून मिळण्यासारखा नाही. हा स्वधर्म सोडून परधर्म (दुसरा जे आचरण करीत असतो ते काम) जरी कितीही सुंदर, चांगले असे वाटले तरी अशा परधर्माचे आचरण किती घातक, विपरित असते हे माऊलींनी किती छान समजावून सांगितले आहे.

कर्मयोगातील बारकावे असोत, भक्ताची लक्षणे असोत, ज्ञानयोगाचे मर्म असो - माऊली ते अतिशय सुरसरित्या, साधी-सोपी उदाहरणे देऊन इतके सुरेख समजावतात की ते वाचतच रहावे असे होऊन जाते.

-------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/46338 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग १

http://www.maayboli.com/node/46384 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग २

http://www.maayboli.com/node/46475 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ३
------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -

१] http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/abhang/svarup/

२] http://sanskritdocuments.org/marathi/

३] http://www.gharogharidnyaneshwari.com/

४] सार्थ श्रीज्ञानेश्वरी - श्रीगुरु साखरे महाराज सांप्रदायिक
-----------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाग १ वाचला होता २/३ कधी आले समजलेच नाही.आज सर्वच भाग वाचले.ज्ञानेश्वरीची गोडी लावण्याचे खुप छान.काम करत आहात.धन्यवाद!

शशांक, मस्त.

माऊली गीतेतील एक ओवी उकलून दाखवताना अनेक क्षेत्रातले दाखले देतात. जगात अनेक प्रकारची, स्वभावाची माणसे असतात. एकच दाखला दिला तर तो सर्वांना समजेलच असे नाही कारण सर्वांनाच त्या विषयातली माहिती / अनुभव असतीलच असे नाही. पण अनेक दाखले दिल्याने त्यातला एखादा तरी प्रत्येकाला भिडतोच.

ज्ञानेश्वरीची गोडी लावण्याचे खुप छान.काम करत आहात. >>>>> मुळातच ज्ञानेश्वरी गोड आहे - ती भाषा खूपच जुनी असल्याने आपण वाचायची टाळाटाळ करतो - बाकी सगळे श्री सद्गुरुच करु जाणे - येथ माझे ते उरले पाईकपण......

सर्व माऊलीभक्तांचे मनःपूर्वक आभार ....

खूपच छान !

विहीत कर्मे करीत रहाणे - हे खूप छान समजावले आहे इथे.

मी ज्ञानेश्वरी तर वाचली नाही पण हेमाडपंत विरचित श्रीसाईसच्चरित्र वाचले आहे. त्यातही शिरडीचे साईनाथ अशीच संसारातली, दैनंदिन जीवनातली साधी, सोपी उदाहरणे देऊन भक्तीचे दॄढीकरण करीत असत.

एका अध्यायात अशीच कथा आहे. एक बाई साईनाथांकडून मंत्र घेण्यासाठी शिरडीत येऊन राहिली. तुम्ही मला उपदेश केल्यावाचून मी इथून हलणार नाही असा चंगच बांधला होता तिने. ती ज्यांच्या घरी उतरली होती त्या केळकर नामक कुटुंबातील स्त्री आजारी होती. त्याच सुमारास होळीचा सण आला. या केळकरांच्या घरात पुरणपोळ्या करणारे कुणी नाही हे जाणून, ते कुटुंब सणासुदीच्या दिवशी पक्वान्नाविना राहू नये म्हणून, साईंनी त्या बाईलाच तिथे पाठवून स्वयंपाक करण्यास सुचवले. गुर्वाज्ञा शिरोधार्य मानून हिनेही ताबडतोब ते मानले. आणि पुरणपोळीचे जेवण करुन सर्वांना वाढले आणि स्वतःही जेवली.

विहीत कर्म करता करताच परमार्थ साधता येतो, त्यासाठी इतर कुठल्याही गुरुमंत्राची आवश्यकता नसते, हे किती सुचकपणे त्यांनी दाखवून दिले होते.

इथे ही पोस्ट अस्थायी वाटत असेल तर मी काढून टाकते. मला आपले साधर्म्य जाणवले इतकेच.