येल्लागीरीच्या टेकडीवरचा नरभक्षक चित्ता - ३ (अंतिम)

Submitted by स्पार्टाकस on 29 November, 2013 - 03:41

येल्लागीरीच्या टेकडीवरचा नरभक्षक चित्ता - १ - http://www.maayboli.com/node/46555
येल्लागीरीच्या टेकडीवरचा नरभक्षक चित्ता - २ - http://www.maayboli.com/node/46562

दुसर्‍या दिवशी सकाळी माझी तीनही गाढवं जीवंतं होती. दुसरं काहीच करण्यासारखं नसल्याने मी दिवसभर आराम केला. तिसर्या दिवशी सकाळीही एकाही गाढवावर चित्त्याने हल्ला केला नव्हता.

चित्त्याने पोस्टमनचा बळी घेतल्यावर नवीन पोस्टमनला अंगरक्षक म्हणून दोन चौकीदारांची नेमणूक करण्यात आली होती. जालारपेटहून आता पोस्टमनसह दोन्ही चौकीदारही टेकडीवर ये-जा करत असत. दोन्ही चौकीदारांपाशी भाले होते. खेरीज पोस्टमनकडे त्याचा रिंगांचा आवाज करणारा भालाही होताच ! जालारपेटहून येताना पोस्टनचा बळी गेल्याच्या जागेपासून सुमारे पाव मैलांवर दगडांवर ऊन खात बसलेला चित्ता त्यांच्या दृष्टीस पडला होता. त्यांच्याकडून ही बातमी कळताच पाटलाने मला बोलावण्यासाठी कोठीवर माणूस पाठवला. माझी रायफल घेऊन शक्य तितक्या घाईने मी ती जागा गाठली. चित्ता माझ्या स्वागताला न थांबता निघून गेला होता. त्या खडकाळ भागात त्याचा शोध घेण्यात अर्थ नव्हता, पण त्या परिसरातलं त्याचं दर्शन उत्साहवर्धक होतं हे निश्चीत ! काजूच्या झाडाखालच्या गाढवाचा चित्त्याने बळी घेतला तर माचाण बांधण्यासाठी कोणतं झाड निवडावं याचा विचार करतच मी माझ्या फार्म हाऊसवर परतलो.
माझ्या अपेक्षेप्रमाणे चित्त्याने त्या रात्री काजूच्या झाडाखालच्या गाढवाचा बळी घेतला. गाढवाचं अर्धं मांस खाऊन चित्ता गेला होता, बळीची व्यवस्था पाहणार्यांनी गाढवाचे अवशेष गिधाडांपासून संरक्षण होण्यासाठी डहाळ्यांनी नीट झाकून ठेवले आणि मला वर्दी देण्यासाठी ते माझ्या कोठीवर आले.

दुपारचं जेवण लवकरच आटपून मी माझा कोट, टॉर्च, थर्मासमध्ये भरपूर चहा आणि बिस्कीटं घेऊन गावात गेलो. माचाणासाठी बाज आणि चार माणसांना घेऊन पाटील माझ्याबरोबर आला. माचाण बांधण्याचं आणि ते चारही बाजूंनी खुबीने लपवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. नरभक्षकाच्या बाबतीत तर ते जास्तच काळजीपूर्वक करावं लागतं. एखादी क्षुल्लक दिसणारी चूक पण त्यावरही यशापयश अवलंबून असतं. उलट्या बाजूला वळलेलं एखादंच पान, झाडावर जास्तं दिसणारी पानं, वेगळ्याच झाडाची पानं, चुकून दिसणारा माचाण सांधणारा दोर नरभक्षकाला संशय येण्यास पुरेसा असतो. मारून टाकलेल्या भक्ष्यावर परतणारा नरभक्षक कमालीचा सावध असतो.

माझ्या मनाप्रमाणे सगळी व्यवस्था झाल्याची मी खात्री केली. या सगळ्यात एकच थोडासा धोक्याचा भाग म्हणजे माझं माचाण जमिनीपासून फक्त दहा फूट उंचीवर होतं. ते का़जूचं झाड चढायलाही तसं सोपंच होतं. रात्रीतून मी परतलो नाही तर सकाळी लवकरच येण्याची सूचना मी गावकर्यांना दिली, मला माचाणावर सोडून ते गावात परतले तेंव्हा दुपारचे अडीच वाजले होते.

दुपारच्या रणरणत्या उन्हाने मी घामाघूम झालो. सूर्यास्तानंतर मला हायसं वाटलं. माझ्यासमोर पसरलेल्या म्हैसूरच्या पठारावर मला जालारपेटचं रेल्वे स्टेशन अगदी स्पष्ट दिसत होतं. दूरवर जंगलात आलेला एका मोराचा आवाज सोडला तर जंगल अगदी शांत होतं.

माझ्या समोरच्या पठारावर रात्रं चढू लागली, जालारपेटचा एकेक दिवा हळूहळू उजळू लागला. रेल्वे स्टेशनवरचे निळे निऑन साईन्स मला पाच मैलांवरुनही स्पष्ट दिसत होते. काही वेळाने इंजिनाच्या हेडलाईटचा अंधार चिरत जाणार प्रकाशझोत फेकत एक गाडी जालारपेट्च्या दिशेने येताना मला दिसली. स्टेशनच्या आधीचा चढ चढून ती स्टेशनवर विसावली.

जंगलात नेहमी सतावणार्या किटकांचा पत्ता नव्हता. रातकिड्यांची किरकिरही ऐकू येत नव्हती. मधूनच एखाद्या डासाला माझा शोध लागत होता. मग त्याला हाकलणं हे एक काम होऊन बसत होतं. वेळ जाता जात नव्हता आणि माझ्या रिकाम्या डोक्यात अशा वेळी हमखास येणारे नवनवीन शोध लावण्याचे विचार येत होते! मी अशा एका सायकलच्या शोधात मग्न होतो जी कमीतकमी मेहनतीत लांब अंतर काटू शकेल!

सायकलच्या शोधात मी बुडालेलो असतानाच मला गाढवाच्या दिशेने एक पुसटसा आवाज आला. चित्ता भक्ष्यावर आला होता तर. चित्त्यावर आत्ताच बार टाकण्यात अर्थ नव्हता. त्याल भोजनाला सुरवात करु द्यावी आणि तो स्थिरावला की मग त्याला टिपावं असा मी विचार केला.

मी मांस फाडण्याचे, हाडांचे तुकडे पाडण्याचे आवाज ऐकायला आतूर झालो होतो. पण यापैकी कोणताही आवाज आला नाही. काहीतरी घोटाळा झाला होता खास ! कानांत प्राण आणून कोणतीही हालचाल न करता मी बसून राहीलो. नऊ वाजून गेले होते आणि माझ्या उजवीकडच्या खडकाआडून मला चित्त्याच्या गुरगुरण्याचा आवाच आला !

चित्त्याला माझा पत्ता लागला होता हे निश्चित ! त्याला माझा वास आला नसावा कारण वासाच्या बाबतीत चित्ता म्हणजे शुध्द नंदी ! मी कोणताही आवाज केला नव्हता त्यामुळे त्याला माझा आवाज गेला नसावा याबद्द्ल माझी खात्री होती. त्याने सहजपणे वर पाहीलं असावं आणि त्याच्या नजरेला माचाण पडलं असावं किंवा त्याच्या अंतर्मनाने त्याला सावध केलं असावं ! आजपर्यंत त्याला बळी पडलेल्या माणसांप्रमाणे झाडावरचा माणूस नसून हा माणूस त्याला अपाय करू शकतो ही धोक्याची सूचना त्याला मिळाली असावी !

कदाचीत हा चित्ता नरभक्षक नसावा असा विचार माझ्या मनात आला, पण त्याची एकंदर वागणूक पाहता तो नरभक्षक असल्याची माझी पक्की खात्री पटली होती.

चित्त्याच्या डरकाळ्या सुरवातीला सूचनावजा स्वरात होत्या. हळूहळू तो स्वतःचं धैर्य वाढवीत होता. एका विशीष्ट वेळी मी बसलेल्या झाडावर हल्ला करून तो माझ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार होता हे निश्चीतच. तत्पूर्वी मला झाडावरुन पळवून जमिनीवर उतरवण्याचा तो प्रयत्न करत होता. चित्ते माकडांच्या शिकारीसाठी ही युक्ती नेहमीच वापरतात. त्याच्या डरकाळ्यांची तीव्रता आता शिगेला पोहोचली होती. माझ्या अंदाजाप्रमाणे तो झाडावर चढून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार या अपेक्षेने मी तयारीत बसलो होतो.

घशातून खोकल्यासारखा घुसमटल्यासारखा गुरगुराट करत अखेर त्याने झाडाच्या दिशेने मुसंडी मारली. तो झाडाच्या बुंध्याशी पोहोचत असतानाच मी बाजेवरुन पुढे झुकलो आणि माचाण लपवण्यासाठी लावलेल्या डहळ्या बा़जूला सारत रायफलची नळी खाली रोखली आणि टॉर्चचं बटण दाबलं. जमिनीपासून अवघ्या दहा फूट उंचीवरच माचाण असल्याने मला ही घाई करणं आवश्यंकच होत़ं अन्यथा क्षणार्धात तो माझ्यापर्यंत पोहोचला असता. दुर्दैवाने माचाणाची एक फांदी थेट वर चढू पाहणार्या चित्त्याच्या अंगावरच पडली. त्याला वर चढण्यापासून परावृत्त करण्यासाठी नाही पण क्षणभर थोपवण्यासाठी फांदीचा उपयोग झालाच, पण त्या फांदीच्या आडोशामुळे टॉर्चचा प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही. मला माचाणावरुन हलणारी फांदीच फक्त दिसली.

त्यानंतर मी त्या रात्रीची दुसरी घोड्चूक केली. मूर्खपणाच ! चित्त्याल फांदीखालून बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ न देताच मी तो जिथे असेल अशी कल्पना केली होती तिथे नेम धरुन गोळी झाडली. गोळीच्या आवाजा पाठोपाठ चित्ता जमिनीवर पडल्याचा धप्पदिशी आवाज झाला. चित्ता गोळीला बळी पडला होता की काय ? क्षणभरच हा विचार माझ्या मनात आला क्षणभरच ! पण दुसर्याच क्षणी बाजूच्या झुडूपात झेप घेणार्या चित्त्याच्या देहावरचे पिवळसर ठिपके मला स्पष्ट दिसले. त्याचा जीव बचावण्यास कारणीभूत झालेल्या फांदीपासून सुटका करुन घेत चित्ता पसार झाला होता! मला दुसरी गोळी चालवण्याची त्याने संधीच दिली नाही.

टॉर्चचा प्रखर झोत तो गेलेल्या दिशेकडे मी टाकला, पण त्याचं नखही दृष्टीस पडलं नाही किंवा पुसटसा आवाजही आला नाही, चोहीकडे नीरव शांतता पसरली होती. कदाचित चित्ता झुडूपात शिरुन मरुन पडला असावा.. कदाचित जखमी झाला असावा.. कदाचित दूर निसटून गेला असावा. काहीच कळायला मार्ग नव्हता. काही वेळाने टॉर्च बंद करुन मी चित्त्याचा कानोसा घेत बसलो होतो. तासाभरात कोणताही आवाज आला नाही. तासाभराने तो ज्या दिशेला गेला होता त्या दिशेने मी एक गोळी झाडली. गोळीचा आवाज आणि टेकडीवरुन आलेला प्रतिध्वनी वातावरणात विरुन गेले. चित्त्याचा कसलाही आवाज आला नाही.

रात्री साडेअकरापर्यंत मी माचाणावर बसून होतो. मद्रास-कोचीन एक्सप्रेसच्या इंजिनाच्या शिट्टीचा आवाज आला आणि मी गावात परतण्याचा निर्णय घेतला. माचाणावर बसून रात्र घालवण्यापेक्षा कोठीत परतून निवांत झोप काढावी. चित्ता रात्री परतण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. तो आसपास कोठे असलाच तरी माझ्या शेवटच्या गोळीच्या आवाजाने तो गुल झाला असणार याची पक्की खात्री मला होती, झाडावरुन उतरून टॉर्चच्या प्रकाशात मी गाव गाठलं. पाटील आणि उत्सुकतेने वाट पाहणार्‍या गावकर्‍यांना सगळी हकीकत सांगून मी माझ्या कोठीत येऊन गाढ झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी वीस गावकरी आणि अर्धा डझन गावठी कुत्री यांच्यासह मी पुन्हा त्या काजूच्या झाडापाशी परतलो. गाढवाच्या अवशेषांना कोणीही तोंड लावलं नव्हतं. जमिनीवर पडलेल्या खड्ड्याने मला माझ्या आदल्या रात्रीच्या गोळीचा परिणाम आ SS वासून दाखवला होता. आजूबाजूच्या खडकांवर अत्यंत कसोशीने शोध घेऊनही रक्ताचा एक थेंबही मला कुठे दिसला नाही. याचा अर्थ स्पष्ट होता. माझा नेम साफ चुकला होता आणि चित्ता सहीसलामत निसटला होता !

स्वतःवरच चरफडत-चिडत मी सर्वांसह गावात परतलो. माझी रजा संपल्यामुळे बंगलोरला परतण्यावाचून मला गत्यंतर नव्हतं. चित्त्याच्या पुढच्या हालचाली मला तारेने कळवण्यास मी पाटलाल बजावून सांगीतलं. कोठीतलं सगळं सामान आवरुन टेकडी उतरून जालारपेट स्टेशन गाठलं आणि मद्रास-बंगलोर एक्सप्रेसने रात्री मी बंगलोरला माझ्या घरी पोहोचलो.

येल्लागीरीच्या नरभक्षकाशी झालेल्या माझ्या सामन्याचा पहिला अध्याय अशा रितीने संपला.

पुढचे दोन महिने चित्त्याची काहीही बातमी आली नाही. पाटलाला पत्रं पाठवून मी चौकशी केली पण त्याच्याकडेही काहीच बातमी नव्हती. कदाचित चित्त्याने नरमांसभक्षण सोडलं असावं किंवा १५ मैलांवरच्या जावडी टेकड्यांच्या भागात मुक्काम हलवला असावा. अर्थात त्याने जावडी भागात नरबळी घेतले असते तर सरकारी वृत्तपत्रातून मला कळलंच असतं. त्या रात्रीची माझी गोळी वर्मी लागून चित्ता दाट जंगलात जाऊन मेला तर नसेल ? अर्थात अशी शक्यता जवळजवळ नव्हतीच.

आणखीन अडीच महीने गेले आणि एक दिवस पाटलाची तार येऊन धड्कली. नरभक्षक पुन्हा प्रगटला होता आणि त्याने आणखीन एक बळी मिळवला होता. तार हातात पडल्यापासून दोन तासांत मी बाहेर पडलो आणि जालरपेटला जाणारी पहिली गाडी पकडली.

ही पॅसेंजर गाडी होती. जालारपेटला ती पोहोचेपर्यंत रात्रीचे साडेआठ वाजले होते. रात्री टेकडी चढून जाण्यात काहीच हशील नसल्याने स्टेशनवरच्या वेटींगरुम मध्ये विश्रांती घेण्याचा मी विचार केला. पण रात्रभर येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांचे आवाज आणि डास-ढेकणांची संयुक्त फौज यामुळे झोप घेणं अशक्यं झालं. शेवटी प्लॅटफॉर्मवर चकरा मारत मी रात्र घालवली आणि पहाटे पाचच्या सुमाराला येल्लागीरीकडे प्रस्थान ठेवलं. पाटलाच्या घरी मी पोहोचलो तो साडेसात वाजले होते.

पाटलाने माझं आनंदाने स्वागत केलं आणि कॉफीचे घुटके घेताना बळीची हकीकत सांगीतली. तीन दिवसांपूर्वी पेरियामलई टेकडीच्या पूर्वेला पायथ्याशी असलेल्या झर्‍यावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणीची चित्त्याने शिकार केली होती. गावातल्या लोकांनी माग काढून तिचे अवशेष ताब्यात घेतले होते. तिच्या प्रेतावर ताव मारण्यास चित्त्याला फारसा वेळ मिळाला नव्हता.

याखेपेला माझ्यापाशी फक्त चार दिवस सुट्टी होती त्यामूळे आमीष म्हणून बोकड बांधून बसायचं मी ठरवलं. पाटलाने बोकडाची व्यवस्था करायचं कबूल केलं, मात्र ज्या वस्तीवरुन त्याने पूर्वी बोकड आणले होते त्या लोकांनी आता बोकडांची किंमत चांगलीच वाढवून मागीतली होती.

माझ्या कोठीवर जेवण आटपून आणि थोडी विश्रांती घेऊन मी गावात परतलो तरी बोकडाचा पत्ता नव्हता. अखेर दुपारी दोननंतर पाटलाचा माणूस एका काळ्या वयस्कर बोकडाला घेऊन आला. हा म्हातारा बोकड किती वेळ ओरडून चित्त्याला आकर्षित करेल याबद्द्ल शंकाच होती. चित्ता-वाघ यांच्यासाठी आमीष बांधताना शक्यतो तपकीरी रंगाचा प्राणी बांधावा. वाघ-चित्त्याच्या नैसर्गिक भक्ष्याशी त्याचा रंग मिळताजुळता असल्याने ते लवकर भक्ष्यावर येतात असा माझा अनुभव आहे. काळा किंवा पांढरा प्राणी म्हणजे नरभक्षकाच्या संशयाला आमंत्रण. अर्थात आता माझा निरुपाय होता.

माचाण बांधायचं सामान आणि काही माणसं बरोबर घेऊन पाटलासह मी त्या बळी गेलेल्या तरुणीच्या वस्तीवर पोहोचलो. वस्तीपासून सुमारे पाऊण मैल अंतरावर चित्त्याने तिला उचललं होतं. पेरियामलई टेकडीच्या पायथ्याशी एक लहानसा ओढा पूर्व-पश्चिम वाहत होता. ओढ्याच्या दोन्ही तीरांवर लँटना आणि काटेरी झुडूपांचं रान माजलं होतं. या ओढ्याच्या मध्यावर पाणी साठवण्यासाठी गावकर्‍यांनी लहानसा खड्डा खणलेला होता. या खड्ड्यातून पाणी भरतांनाच चित्त्याने त्या तरूणीवर झडप घातली होती.

एखादा वाघ जेव्हा नरभक्षक होतो तेव्हा त्याच्या मनातली मनुष्यप्राण्याविषयीची भीती समूळ नष्ट होते, त्यामुळे भर दिवसाही माणसावर हल्ला करायला तो कचरत नाही. याउलट चित्ता किंवा बिबळ्या यांनी कितीही मानवी बळी घेतले तरी माणसाबद्दलची त्यांची नैसर्गीक भीती कधीच लोप पावत नाही, त्यामुळे त्यांच्या हालचाली शक्यतो रात्रीच होत असतात, येल्लागीरीचा नरभक्षक मात्र याला अपवाद असावा.

अर्थात अशीही एक शक्यता होती की त्या ओढ्याजवळ चित्ता आधीच आराम करत पडलेला असावा आणि ती तरुणी पाणी भरण्यासाठी आल्यावर आयतीच त्याच्या तावडीत सापड्ली असावी. हा विचार मनांत येताच हातापायावर रांगत मी झुडूपात शिरलो आणि माझा तर्क अचूक असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. चित्त्याचं ते नेहमीचं लपण्याचं ठिकाण असावं. खाली पडलेल्या पाचोळयामुळे त्याच्या पायाचे ठसे मिळणं अशक्यं होतं, पण चित्त्याच्या शरिराला येणारा एक प्रकारचा उग्र गंध अद्यापही तिथे दरवळत होता. त्या झुडूपांत बेमालूमपणे दडून राहून पाण्यासाठी ओढ्यावर येणार्‍या कोणत्याही जनावरावर झडप घालणं चित्त्याला सहज शक्यं होतं. अर्ध्या मैलावर असलेल्या पेरियामलईच्या वरच्या खडकांमध्ये चित्त्याची गुहा असावी असा मी अंदाज केला.

माझी पुढची योजना मी लगेच आखली. एका खुंटाला बोकडाला बांधून त्याला ओढ्याच्या काठावर उभं करायचं. टेकडीवरुन पाहणार्‍या चित्त्याल बोकड पाण्यासाठी ओढ्यावर आल्याची खात्री पटणार होती, हाता-पायांवर रांगत मी त्या झुडूपात शिरलो आणि आरामशीर बैठक मारली. या योजनेत मला तसा कोणताही धोका नव्हता. टेकडीवरून बोकड दिसल्यावर चित्ता निश्चितच त्याच्यावर हल्ला करणार होता आणि नेमका माझ्या तावडीत सापडणार होता. शिकार साधण्यासाठी आपण नेहमी वापरत असलेल्या सापळ्यात आपणच सापडू शकतो हे त्याच्या डोक्यात येण्याची शक्यता नव्हती.

माझ्या रायफलच्या क्लॅम्पवर मी माझा नवीन टॉर्च नीट बसवून टाकला, नंतर मी किटलीभर चहा प्यायलो आणि पाटलाला बोकडाला खुंटाला बांधून गावात परतण्याची मी सूचना केली. ही सर्व तयारी चालू असताना आम्ही बोकडाला मुद्दाम लांबवरच ठेवलं होतं. त्या झुडूपाखाली मी दडलो आहे याची कल्पना बोकडाला आली असती तर त्याने तोंडातून एक आवाजही काढला नसता. बोकडाने आवाज काढून चित्त्याला आकर्षित करण्यातच माझ्या योजनेचं यश अवलंबून होतं.

पाटील आणि त्याची माणसं गावात परतली आणि मी त्या बोकडावर माझी पाळत सुरु केली. बोकडाने सुरवातीला थोडा ओरडा-आरडा केला, पण थोड्याच वेळात तो पार शांत होऊन गेला होता ! थोड्यावेळाने तो पुन्हा आवाज करेल आणि त्याच्या आवाजाच्या मागाने चित्त येईल अशी आशा धरुन मी बसलो होतो. बोकडाला मात्र त्याचं काही नव्हतं. आपले चारही पाय मुडपून तो आडवा झाला आणि सरळ झोपून गेला !

मला डासांनी हैराण केलं होतं. झुडुपाखाली अनेक प्रकारचे कीटक माझ्या अंगावरुन उड्या मारून जात होते. जंगलात आढळणार्‍या छोट्या उंदरांची मध्येच खुसफूस चालू होती. मध्येच माझ्या पायाला कसलातरी थंडगार स्पर्श झाला. तो साप होता. विषारी का बिनविषारी ते कळायला मार्ग नव्हता. मनातल्या मनात शांत झोपलेल्या बोकडाचा मला हेवा वाटत होता. मला मात्र एक क्षणभरही डोळे मिटणं शक्यचं नव्हतं. कोणताही आवाज न करता मी निश्चलपणे बसून होतो.

अखेर एकदाची ती प्रदीर्घ आणि कंटाळवाणी रात्र संपली. पूर्वेला तांबडं फुटायला सुरवात झाली आणि हात-पाय आखडत मी त्या लँटनाच्या झुडूपाखालून बाहेर आलो. रात्रभरात चित्ताच काय दुसर्‍या कोणत्याही प्राण्याचा मला आवाजसुध्दा ऐकू आला नव्हता. पाय मुडपून मजेत झोपलेल्या त्या बोकडाला मनोमन मी शिव्यांची लाखोली वाहीली. माझी चाहूल लागताच तो बोकड धडपडत उठला. हात-पाय ताणून त्याने झक्कपैकी आळस दिला, छोटीशी शेपटी हलवली आणि प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहिलं. जणू तो मला विचारत होता,

" बळीचा बकरा म्हणून तू मला इथे बांधून ठेवलंस खरं, पण बकरा कोणाचा झाला ? माझा ? की तुझा ? "

मी अर्थातच त्याला उत्तर देण्याचं टाळलं.

गावात परतून मी बो़कडाला पाटलाच्या ताब्यात दिलं आणि विश्रांती घेण्यासाठी माझ्या कोठीवर गेलो. त्या रात्री दुसरा बोकड बांधून त्या ओढ्याकाठच्या झुडूपात छपून बसायचं मी आधीच ठरवलं होतं. बिछान्यावर अंग टाकताच मला गाढ झोप लागली.

दुपारी बारानंतर मला जाग आली. सामन माशाचा डबा फोडून मी त्यावर ताव मारला आणि चहासाठी पाणी उकळत ठेवलं. पोटभर चहा पिऊन झाल्यावर किटलीभर चहा मी बाटलीत भरुन घेतला. रात्र तशी उबदारच असल्याने कोटाची जरुर नव्हती, गावात परतून मी पाटलाची गाठ घेतली आणि बोकडाची निवड करायला निघालो. मनाजोगता बोकड निवडल्यावर बरीच घासाघीस करुन सौदा पटवला आणि दुपारी चारच्या सुमाराला आम्ही बोकडासह ओढ्यापाशी पोहोचलो. माझी सर्व सिध्दता झाली आणि बोकडाला खुंटाला बांधून पाच वाजण्याच्या सुमाराला पाटील गावकर्‍यांसह परतला.

पाटील आणि गावकरी दिसेनासे होतात तोच बोकडाने जोरदार आवाजात ओरडायला सुरवात केली. तो इतक्या जोराने ओरडत होता की त्याची निवड केल्याबद्दल मी स्वतःलाच मनोमन शाबासकी दिली.

चारही बाजूला अंधाराचं साम्राज्यं पसरलेलं होतं. बोकडबुवा अद्यापही मोठयाने ओरडतच होते ! आता कोणत्याही क्षणी मी ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो चित्ता येण्याची शक्यता होती. अशातच अजून तासभर गेला आणि मला पायाखाली काटकी मोडल्याचा आणि अंगाला पानं घासल्याचा अगदी हलकासा आवाज ऐकू आला ! चित्ता येत होता तर ! ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो येऊन ठेपला होता. पूर्वीच्या अनुभवावरुन मला टॉर्चचा उपयोग फार काळजीपूर्वक करावा लागणार होता. चित्ता पूर्णपणे दृष्टीक्षेपात येण्यापूर्वी टॉर्च चालू केला असता तर चित्ता पसार झाला असता. मला क्षणभराचा उशीर झाला असता तर त्याने माझ्यावर निश्चितच हल्ला केला असता किंवा पुन्हा सूंबाल्या केल्या असत्या.

पूर्ण सावध होऊन मी चित्त्याच्या हालचालींचा कानोसा घेत होतो. त्याच्या हालचालीचा पुसटसाही आवाज येत नव्हता. काही क्षण गेले आणि हलकेच हिस्स.. असा आवाज आला ! डरकाळी फोडण्यापूर्वी त्याच्या ओठांची जी हालचाल झाली त्याचा तो आवाज होता ! चित्त्याने मला पाहिलं होतं यात शंकाच नव्हती. नाऊ ऑर नेव्हर !

माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याने मी टॉर्चचं बटण दाबलं. अंधार चिरत त्याचा प्रखर प्रकाशझोत पडला तो थेट चित्त्याच्या लालसर डोळ्यांवरच ! माझ्यापासून दहाएक फूट अंतरावर होता तो. टॉर्चच्या प्रकाशात त्याचं तोंड आणि छाती मला स्पष्ट दिसली. त्याच्या गळयावर नेम धरून मी गोळी झाडली. तो एक पाऊल पुढे आला आणि मागच्या दोन्ही पायांवर उभा राहिला. माझ्या विंचेस्टर रायफलच्या दुसर्‍या गोळीने त्याच्या छातीचा वेध घेतला. छातीत गोळी बसताच तो मागच्या मागे कोसळला आणि झुडूपात दिसेनासा झाला. काही क्षण त्याचे विव्हळण्याचे आणि घशात लागलेल्या घरघरीचे आवाज आले आणि मग सर्वत्र शांतता पसरली.

मी झुडूपात द्डून अर्धा तास चित्त्याची हालचाल टिपण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर मी झुडूपातून बाहेर पडण्याच निर्णय घेतला. लोड केलेली रायफल हातात धरुन कोणत्याही क्षणी गोळी झाडण्याच्या तयारीने मी झुडूपातून बाहेर पडलो. चित्ता मेला असावा याची मला पक्की खात्री होती. बोकडाला सोडून बरोबर न्यावं असा विचार माझ्या मनात आला, पण तसं करण्याचं मी विचारपूर्वक टाळलं. न जाणो हा चित्ता सामान्य चित्ता असून नरभक्षक मोकळाच असला तर ? पाटलाच्या गावाकडे परतताना मला खूपच सावधानता बाळगावी लागणार होती. अशा परिस्थीतीत बोकडाला बरोबर नेणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं होतं. त्याला तसाच ओढ्याकाठी सोडून सावधपणे मार्गक्रमणा करत मी गावात पोहोचलो. पाटील आणि गावकरी जागेच होते. त्यांना सगळी कथा सांगून मी रात्रीच्या निवांत झोपेसाठी माझी कोठी गाठली.

दुसर्‍या दिवशी सकाळी पाटील आणि काही गावकर्‍यांसह मी परत ओढा गाठला, चित्त्याला मी जिथे गोळी घातली होती तिथेच तो मरुन पडला होता. आम्ही त्याची पूर्ण तपासणी केली. तो एक वयस्कर म्हातारा नर होता. त्याचा रंग फिकट झालेला होता. दात झिजलेले होते. नखं चिरलेली होती. ही सगळी नरभक्षकाचीच लक्षणं. अर्थात येणारा काळच मी मारलेला चित्ता नरभक्षक आहे की नाही हे ठरवणार होता.

दुपारनंतर मी त्याचं कातडं सोडंवलं आणि बंगलोरला परतण्यासाठी टेकडी उतरून जालारपेट गाठलं.

या घटनेला आता बरीच वर्षं उलटून गेली आहेत. येल्लागीरी किंवा जावडी टेकड्यांच्या परिसरात त्यानंतर मानवी बळी गेल्याची कोणतीही नोंद नाही. त्या रात्री माझ्या रायफलच्या गोळ्यांना बळी पडलेला चित्ता हाच येल्लागीरीचा नरभक्षक होता हे मी आता खात्रीपूर्वक सांगू शकतो !

(मूळ कथा : केनेथ अँडरसन )

समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच !!!