अंत नसलेल्या कथा- ३

Submitted by साजिरा on 29 November, 2013 - 00:51

'आयड्या..!' आवल्या अचानक किंचाळला.

आता आवल्याकडे नवनवीन कल्पनांचा नेहमीचा खजिना असे आणि त्यामुळे तो आयड्यांचा सर्वात मोठा बादशहा आहे, यावर आम्हा सर्वांचं कधीचंच एकमत झालेलं होतं. त्यामुळे त्याच्या अशा किंचाळण्याने पहिल्यासारखं कुणी दचकत नसे. उलट काहीजण तर शिव्याही घालत, कारण तसं किंचाळताना तो आजुबाजूच्यांना नानांच्या मळ्यातल्या खिल्लारी जोडीतल्या पोश्या बैलागत खूप हालचाल करून ढोसत असे. या सार्‍या ढोसाढोशीत आमचे हंप्या-नान्यासारखे नाजूक मित्रगडी अगदी कोलमडून जात. पण काहीही असलं तरी तो आयड्याबाज होता म्हणजे होताच. त्यामुळे तो असं किंचाळला, की आम्ही सारे सावरून बसत त्याच्याकडे लक्षपुर्वक बघत असू.

आताही तसंच झालं. आवल्या काय करणार, याची आम्हाला सर्वांना नीटच उत्सुकता लागून राहिली.

पांढर्‍या बुंदक्यांच्या लाल रंगाच्या घोंगडीमधून हेम्याने मळ्यातून तुरीच्या शेंगा बांधून आणल्या होत्या. ते गासोडं आवल्याने एका हिसक्यासरशी सोडलं, तशा सार्‍या शेंगा तिथल्या दगडी ओट्यावर पसरल्या. 'ओय..' करत हेम्या धावून गेला, पण आवल्याने लक्ष दिलंच नाही. त्यानं दिलं नाही म्हणून कुणीच दिलं नाही. 'सैपाकाच्या हितनं माचिस आण रे..!' अशा सांगून विशूला त्यानं पिटाळलं. विशूच्याच घरात त्याच्यावरच दादागिरी- ही पण आयड्या तशी भन्नाटच होती, पण तेव्हा तसं कुणालाच वाटलं नाही. माचिस आणायला पाठवल्यावर घोंगडीला पेटवतो की काय या संशयाने हेम्या पुन्हा 'हाऽऽऽ..' करत पुढे सरसावला, पण आवल्याने एका हिसक्यासरशी त्याला मागे ढकलला. मग सिनेम्यातल्या एखाद्या हिरोच्या रुबाबात त्याची जाड मान इकडेतिकडे नीट वळवून पाहिलं. त्याची नजर थांबली तिकडे सर्वांनी बघितलं, तर नानांची म्हणजे विशूच्या वडिलांची भगव्या-पांढर्‍या रंगाची लुंगी जिन्याच्या लाकडी कठड्यावर लोंबकळत होती. ती त्याने एका झेपेत ओढली आणि कमरेला बांधली. मग कपाळावर तर्जनीचं टोक बंदुकीसारखं दोन तीन सेकंदभर रोखलं. ही त्याची विचार करण्याची पद्धत आम्हाला नीटच माहिती होती. मग पुन्हा ओरडला, 'विशा, येताना छत्री पण आण रे..!'

तुरीच्या शेंगा बांधलेली घोंगडी मग त्याने पिळा करून गळ्यात टाकली. एव्हाना विशू आलाच त्याच्या पुढ्यात. त्याच्याकडची माचिस घेऊन त्याने एक काडी ओठांच्या कोपर्‍यात धरली. पण गुलाचा भाग तोंडात गेल्याचं कळताच थू थू करून काडी थुंकून टाकली, आणि दुसरी काडी तोंडात घेतली. मग ती तशीच ओठांत ठेऊन हंप्याला त्याने हुकुम सोडला, 'ओट्यावर चढ नि छत्री घेऊन माझ्यामागे उभा राहा!' हंप्या गुमान त्याच्यामागे गेला नि सांगितल्याप्रमाणे छत्री उघडून उभा राहिला तसा आवल्या ओरडला, 'च्यायला हित्तं काय पाऊस येऊन र्‍हायलाय का पावट्या? छत्रीचं पुढचं टोक माझ्या पाठीकडे कर आणि तशीच फिरवत उभा राहा..!' हंप्याने तसं केलं आणि छत्रीच्या मध्यभागाचा अंदाज घेऊन ओट्याखाली हंप्या किंचित वाकून उभा राहिला आणि उजवा पाय पहिल्या पायरीवर ऐटीत टेकवला. आता देवांच्या चित्रांत असतं तसं एखादं चक्र आवल्याच्या पाठीमागे डोक्याभोवती फिरतं आहे, असं दृश्य आम्हाला दिसलं, आणि जाम मजाच वाटली. एका हाताचं कोपर मांडीवर टेकवत, पंजा आमच्यापुढे नाचवत, तोंडातली काडी ओठांत खेळवत किंचित ओठ पुढे काढून बदललेल्या खर्जातल्या आवाजात म्हणाला, 'मर्द को कभी दर्द नही होता.. हांय!!'

दोन-पाच सेकंद कडेकोट बंदोबस्त असल्यागत शांतता नानांच्या वाड्याच्या त्या एवढ्या मोठ्या काळ्याशार दगडी ओट्यावर पसरली. आम्हाला हे सारं भलतंच आवडलं होतं. डोळे मोठे करून आम्ही सारे आवल्याकडे बघत राहिलो. हंप्या छत्री उघडून ती समोर घेऊन फिरवत उभा असल्याने त्याला पुढे काय चाल्लंय काहीच कळेना. त्याने छत्री बाजूला करून बघायचा प्रयत्न केला, पण आम्ही सार्‍यांनी आरडाओरडा करून त्याला ती तशीच धरून फिरवत राहा म्हणून दम भरला.

मग पुढे झुकून नान्याने आवल्याच्या गळ्यात, कमरेत अडकवलेल्या लालपांढर्‍या कपड्यांकडे आणि छत्रीकडे बोट दाखवत विचारलं, 'पण हे असं कुठे आहे?'

'अभिता बच्चन! कुलीमध्ये!!' आवल्या मघाच्याच ऐटीत म्हणाला. तो नेहमी 'अभिता' म्हणायचा आणि त्याचं कुणालाच काही वाटत नसायचं. अनेक दिवस तर तेच खरं नाव आहे, असंच आम्हाला वाटे. नंतर खरं नाव कळल्यावरही 'अभिता' हे जास्त भारी नि नीटच वाटायचं.

'हा तर फसवून र्‍हायलाय रे!' नान्या विजय मिळवल्यागत ओरडला, 'ते मर्द को दर्द मर्दमध्ये नाही का? कुलीमध्ये कुठे? आणि छत्री नाही काही, पंखा, पंखा!'

'हा, मर्दमध्येच. काय फरक पडून र्‍हायलाय असा मग?' आवल्या बेफिकिरीने म्हणाला. त्याच्या मते अभिता हा इथून तिथून एकच होता. कुठच्याही सिनेम्याचं कुठच्याही सिनेम्याला जोडलं तरी काहीच फरक पडत नाही, कारण शेवटी अभिताच महत्वाचा आहे. सार्‍या ठिकाणी तो भारी भारी डॉयलाग बोलत घूम करत असतो. नाव कुठचंही असू दे सिनेम्याचं. कुठूनही बघायला सुरूवात करा नि कुठेही संपवा. एकाचं रीळ काढून दुसर्‍यात घाला.. काही बिघडत नाही. मजा येणार म्हणजे येणारच! नीटच!

आवल्या आमच्या वर्गात असला तरी आम्हा सार्‍यांपेक्षा तीनेक वर्षांनी तरी मोठा असावा. एकदा काहीतरी भयंकर आजार झाल्याने त्याचं एक वर्ष वाया गेलं नि एकदोनदा तर तो चक्क नापासच झाला होता. आवल्याला बरोबरीची मुलं पुढे गेल्याचं काही वाटत नसे. उलट खुषच असायचा तो. कारण त्याचं बोलणं आम्हाला आवडायचं आणि आवडतं हे त्याला कळत असल्याने दिवसभर आम्हाला सिनेमा आणि दुनियाभरच्या कायकाय गोष्टी सांगत असायचा. त्याबदल्यात त्याच्या गृहपाठांचं काम बिनबोभाट आम्ही सारे मिळून नीट करत असू.

एखाद्या टॉकीजमध्ये जाऊन मी तरी आजवर कधीच सिनेमा बघितला नव्हता. सिनेमाचं नावही आमच्या घरात चालत नसे. आवल्या मात्र तालुक्याच्या साखर कारखान्यातल्या त्याच्या काकांकडे तो बर्‍याचवेळा जायचा नि येताना गुपचुप सिनेमा बघून यायचा. शिवाय गावातल्याच एस्टीस्टँडजवळच्या व्हिडिओ दाखवत असलेल्या दुकानातही चोरून जायचा. असे कित्येक सिनेमे त्याने बघितले होते, आम्ही सगळ्यांनी मिळून बघितले नसतील त्याच्या शंभरपट तरी! या सार्‍यांची सरमिसळ करून तो सांगायचा. त्यातही आवल्याने आम्हाला अभिताचं जबरदस्त वेड लावलं होतं. नाचगाणी, तुफान मारामारीचे आणि डॉयलागबाजीचे प्रसंग आणि अभिताचे हिरोईनसोबतचे किस्से तो सांगू लागला की आम्ही नीटच गुंगुन जायचो. आम्हाला त्यातलं काही कळायचं तर काही नाही. पण ऐकायला मात्र नीटच मजा यायची.

'मर्द तर मर्द!' आवल्या म्हणाला, 'तिथं अशीच एकेक स्टाईल आहे अभिताची! कुलीहून भारी!' मग आवल्याचे डोळे जरा चमकल्यागत झाले. त्याचे हे असे डोळे केव्हा चमकायला लागत हे आम्हाला आता नीटच माहिती झालं होतं. 'अरे, मर्दमध्ये एक अमृतासिंग म्हणून हिरोईन आहे,' खाजगीत सांगितल्यागत तो पुढे झुकुन आम्हाला सांगू लागला, ' तिचे गाल असले आहेत ना अरे.. माझा तो गट आठवतो तुला गोट्या खेळायचा.. संगमरवरवाला, पांढरास्वच्छ? अगदी तस्से! स्सऽऽहा! तिच्या गालावर तू अस्सा हात ठेवलास ना..' आवल्या गोर्‍याभुर्‍या मुक्याच्या गालावर हात ठेऊन म्हणाला, 'तर अस्सा नीटच सरकेल बघ हात.. कळणार देखील नाही.. लोण्याला हात लावून र्‍हायलोय काय, अस्सं! माझा तो संगमरवरवाला गट कसा नीट हळूच बद्यात जातो, कळत देखील नाही की नाही? तस्सं!'

आम्ही अगदी मंत्रमुग्ध का काय तसले होऊन डोळे न मिटता आवल्याकडे बघतच राहिलो. आवल्या स्वप्न बघत असल्यागत म्हणाला, 'आणि घोड्यावर बसून कस्सला नेतो माहितिये तिला अभिता! दोघांचे केस असले उडतात. आणि एकदा तर चारा रचलेल्या उडीमधल्या खोपट्यात तिला घेऊन जातो, आणि..'

'आणि काय?' हंप्यानं घाईघाईने विचारलं, तसा आवल्या डोळा घालत म्हणाला, 'काही नाही अरे.. फक्त हलणार्‍या चार्‍याचा ढीग दिसतो आणि चार्‍याच्या उडीच्या बाहेर दोघांचे पाय फक्त! स्सस्सऽहाऽऽऽ!'

त्यानंतर आवल्या आम्हाला कायकाय सांगत राहिला. खरंतर नान्यानेही तो मर्द सिनेमा बघितलेला, पण तो सुद्धा नीट लक्ष देऊन ऐकत होता. वातावरण जामच भारी झालं एकदम, आणि आवल्याचे डोळे आणखीच एखादं भारीतलं स्वप्न बघत असल्यागत चमकले. मध चाटवल्यावर लहान बाळ करतं तसा चेहरा करून तो म्हणाला 'आयला नान्या, एक नीटच भारी पिक्चर आलाय रे. बघायचाच आपल्याला काहीही करून..'

'कुठचा सिनेमा रे?' नान्याने घाई झाल्यागत विचारलं. आता नान्याचेही डोळे स्वप्नाळू वगैरे दिसायला लागले होते, त्यामु़ळे आमची उत्सुकता आणखीच वाढली.

मोठ्ठं गुपित सांगितल्यागत पुढे झुकुन कुजबुजत आवल्या म्हणाला, 'राम तेरी गंगा मैली!'

***

प्रभूरामचंद्र नाशिकला राहून गेले होते असं आम्ही गोष्टींमध्ये ऐकलं होतं, शिवाय आज्जी पण नेहमी कायकाय सांगत असायची. नाशिकच्या पंचवटीतल्या कुठच्या झाडाजवळ रामाने कायकाय केलं होतं, हे ती आम्हाला नीटच व्यवस्थित सांगायची. 'तू तेव्हा तिथे बाजूला बसून बघत होतीस का राम कायकाय करतो त्याकडे?' असं आमचे दादा तिला चिडवायचे, तर कधी चिडायचे देखील. पण ती मात्र 'तेव्हा गंगा होती नि आता सुद्धा आहे. तेव्हा राम होता तसा तो आताही आहेच तिथं!' असं ठणकावून सांगायची. आमच्या भुगोलाच्या पुस्तकात गंगा नदी वेगळीच कुठेतरी दाखवली होती नि इथं गोदावरी आहे, असंही. पण आजी हट्टानं गंगाच म्हणायची. आता आवल्याने सांगितलेल्या सिनेम्याच्या नावावरून रामाच्या काळी या नदीला गंगाच म्हणत असावेत असं वाटून गेलं. त्यामुळे दादा म्हणत त्याप्रमाणे आमच्या आज्जीने त्याकाळी राम नि गंगा या दोघांना पाहिलं असावं नि आता ती गंगा खूप मळली आहे, घाणेरडी झाली आहे, अशी तक्रार आज्जी रामाकडे करतेय असं चित्र पण नीटच डोळ्यासमोर मी उभं करून बघितलं.

पण मग आवल्याचे डोळे इतके चमकायचे कारण काय, ते मात्र कळलंच नाही.

***

त्या आठवड्यात आवल्या काकांकडे गेला तेव्हा तो परत येण्याची आम्ही डोळ्यात तेल घालून वाट बघत राहिलो. आवल्या तो सिनेमा बघितल्याशिवाय सोडणार नाही, याची आम्हाला खात्रीच. सोमवारी आवल्या शाळेत आला तेव्हा सार्‍यांनी त्याला नीटच भंडावून सोडलं. आवल्या गंभीर चेहरा करून म्हणाला, 'आयला आमचा काकाच तिथं मित्रांसोबत आला होता रे पुष्पांजली टॉकीजला. मी नुसताच फिरायला आलो असं सांगितलं तर काकाने जाम शिव्या घातल्या च्यायला आणि पिटाळलंच मला. मग मी तिथनं दूर जाऊन काका आत जायची वाट बघत राहिलो. आणि मग जवळ जाऊन बाहेर लावलेली चित्रं बघत राहिलो. त्यात ती मंदाकिनी नावची हिरोईन आहे अरे. एक भलंमोठं चित्र लावलं आहे, त्यात नदीचं पाणी पांढरंस्वच्छ दुधासारखं दिसतं. त्या मंदाकिनीचे कपडे पण पांढरे. आणि ती तर त्याहूनही दुधागत नीटच गोरी नि भुरी..'

आवल्या नीटच स्वप्नात गेल्यागत दिसू लागला. तिथली इतकी रंगीबेरंगी पोस्टरं सोडून सगळं पांढरंपांढरं का बघून आलास असं हंप्याने विचारलंही. त्यावर आवल्याने 'हॅ! तुला नाही कळत ते!' असं म्हणून वेडावून दाखवलं आणि दूर कुठेतरी आरपार बघत पुन्हा स्वप्नाळू झाला.

नानांची आई, म्हणजे रेशमाआजी मुक्याची छोट्या बहिणीला- झिंगीला 'भुरी पाल' म्हणून सतत हाक मारत असायची, ते मला उगीचच आठवलं. या सिनेम्यात काहीतरी, अभिताच्या सिनेम्यांपेक्षाही भारी खास आहेच असं आता मलाही आता वाटू लागलं.

***

नंतर दोन आठवडे आवल्याला त्याच्या घरातल्यांनी पाठवलंच नाही. पण आयड्याबाज आवल्या बहाद्दर तिसर्‍या आठवड्याला तो सिनेमा बघून आलाच. त्यानंतरच्या सोमवारी आमचं लक्ष शाळेत लागेना. कधी एकदा मधली सुट्टी होते नि आवल्याला गाठतो असं झालं होतं. मधली सुट्टी झाल्यावर आवल्या उगाच भास मारत फिरत होता, स्वत:जवळ काहीतरी भारी खास गोष्ट असल्यागत. खूप जणांनी खूप वेळा विचारल्यावर तो वर आभाळाकडे बघून बारीक डोळे करत म्हणाला, 'अरे काय सांगूऽऽ. अस्सला सिनेमाच पाहिला नव्हता मी अजून..!'

'अरे काय सांगू काय सांगू काय करून र्‍हायलास! श्टोरी सांग की पावट्या.' शेवटी नान्या ओरडला.

'अरे, एक गोरागोरा, मस्त भांग पाडलेला हिरो आहे. त्याचं नाव नरेन..'

'नरेन काय नरेन? नरेन्द्र असेल..' हंप्या म्हणाला.

'तू गप. तर तो नरेन आजारी आजीसाठी गंगेचं पाणी घ्यायला जातो. तिथं त्याला एक मुलगी भेटते. तिचंही नाव गंगाच!'

नदीचं आणि मुलीचं नाव एकच! काय नीटच भारी आयड्या केली त्या सिनेमावाल्यांनी.. मी मनात विचार केला. हे आज्जीला सांगितलं पाहिजे खरंतर. पण दादांना कळण्याच्या भितीने मी तो लगेच गिळून टाकला.

'ती गंगा म्हणजे एकदम भारी आहे बाबा. लोण्यासारखी. अभिताच्या त्या अमृता सिंगला काय बघून र्‍हायलास.. असली आहे बघ. ती जंगलात असल्याने तिच्याकडे जास्त कपडे नसतात. पण जेवढे असतात तेवढे इतके पांढरेस्वच्छ, की..' आवल्या आजूबाजूला बघत म्हणाला. शेवटी मुक्याचा शर्ट पकडून म्हणाला, 'हा सदरा सातशे शहाऐंशी वेळा धुतल्यावर कसा होईल ना? तर तितके पांढरेस्वच्छ! घराशेजारून पांढर्‍याशुभ्र पाण्यावाली गंगा नदी वाहत असते ना. साबण नाही नि काहीच नाही.. आता बोल!'

'सातशे शहाऐंशी? माझी आई दर रविवारी एकदाच धुते दगडावर रगडून तरी सदरा विरून आरपार दिसायला लागतं. मग आमचे आप्पा शिव्या पण देतात..' मुक्या कसनुसं तोंड करून म्हणाला. खरं म्हणजे सातशे शहाऐंशी हे मला सुद्धा काहीच्याकाही वाटून राहिलं होतं. पण अशा वेळी मी मध्ये बोलत नाही. आवल्याला नक्की त्या अभिताचा बिल्ला आठवला असावा.

'तेच तेच!' आवल्या डोळे विस्फारून म्हणाला, 'आरपार दिसतंच. तेच कपडे नेसून ती डायरेक नदीतच आंघोळ करते. आंघोळीनंतरही तेच कपडे. पण असले स्वच्छ ना!'

आता मात्र एकदम नीटच शांतता पसरली. मी मनात विचार करता करता नान्याकडे बघितलं, तर तो तोंड उघडं टाकून आवल्याकडे बघत होता आणि आवल्या एकदम अभिताच्या स्टाईलमध्ये उभा होता. डोळे मात्र अभितासारखे नसून वेगळेच दिसत होते. त्या सिनेम्यातल्या हिरोचे डोळे असे असतील असं मला उगाच वाटलं. मुक्याकडे बघितलं, तर त्याच्या गणवेशाचा तो पांढरा सदरा जिथं विरला होता तिथून आरपार बघत असल्यागत दिसत होता. सगळेजण आवल्याच्या त्या 'आरपार'चा नीटच विचार करत असल्यागत.

'..ते तसले कपडे घालून ती आंघोळ करतानाच गाणं म्हणते आणि दोघांचं प्यार होतं..!' आवल्या कानाजवळ हळूच गवताची बारीक पानांनी झुळझुळ करावी तसं झाल्यागत अंग वाकडंतिकडं करत म्हणाला. आम्हाला सगळ्यांनाही तेच गवत अंगभर फिरत गुदगुल्या होत असल्यागत काहीतरी वाटत होतं.

'पण गंगा नदी पांढरीस्वच्छ. ती गंगा मुलगी पण पांढरीस्वच्छ. तर मग मळतं कोण? आणि मळवतं कोण?' पंक्याने शंका काढली.

'अरे असं काय करून र्‍हायलास? त्यांचं प्यार होतं म्हणून सांगतोय ना तो?' मुक्या हलकेच म्हणाला. तो अजूनही त्याच्या विरलेल्या पांढर्‍या मळक्या सदर्‍याकडे बघत होता.

त्यानंतर आवल्याने खूप हातवारे करून सारी गोष्ट नीटच सांगितली. तो सांगत असलेलं सारंच समजत नव्हतं. पण ती सांगताना त्याचे डोळे अधुनमधून चमकताना बघून आम्हाला फार भारी वाटायचं. त्यावेळी कानाजवळ तशाच गवताच्या नाजूक झुळझूळीचा भास व्हायचा. मुक्या तर कानाला तिखट लागल्यागत मान दोन्ही बाजूला झटकून कानात बोटं घालून हलवायचा. अशा पांढर्‍यास्वच्छ मुलीशी 'प्यार' म्हणजे काहीतरीच भारी वाटत होतं. ते तसलं प्यार करताना कुणालाही आजवर आम्ही शाळेत, कॉलेजात, बागेत, मैदानावर, तालुक्याच्याच काय, पण जिल्ह्याच्या गावातही बघितलं नव्हतं. पण 'तसं करतात अन सिनेमात दाखवल्यागतच नाही, तर अजूनही बरंच काय काय करत असतात!' असं आवल्या आम्हाला नेहमी सांगायचा, तेव्हा ते नीटच खरं असलं पाहिजे.

मध्येमध्ये अशी छान झुळझूळ सोडली, तर प्यार झाल्यानंतरची एकूण गोष्ट मात्र वाईटच होती. इतक्या सुंदर पांढर्‍यास्वच्छ मुलीला तो हिरो सोडून जातो, मग तिला बाळ होतं, मग त्यांचे हाल. मग सारे त्यांना खूप फसवतात- हे काही बरोबर नाही असं वाटलं. पण आवल्या म्हणाला- सिनेमात असंच असतं.

घरी जाताना मी विचार करू लागलो. हा सिनेमा आपण बघितलाच पाहिजे. रात्री झोपताना सारखी ती गंगा नदी, ती गंगा नावाची बाई आणि तिचे पांढरीशुभ्र कपडे आठवत होते. आवल्याने त्याचं अंग वेडंवाकडं करून सांगितलेली गोष्ट आठवल्याने आता माझ्याही कानांना तिखट लागून डोकं हलवावंसं वाटत होतं. तसं केलं अंगावर जोरदार काटा यायचा. तो खर्‍यातला काटा होता, की स्वप्नातला, हेही मला दुसर्‍या दिवशी नीट आठवेना.

***

दुसर्‍या दिवशी एक जोरदार कल्पना डोक्यात आली. सोनवणे सरांना विचारायची. सोनवणे सरांच्या ताब्यात शाळेतलं सिनेमा दाखवायचं एक मोठं मशिन होतं. त्या खोलीची चावी त्यांच्याकडेच असे. कारण त्यांच्याशिवाय ते कुणालाच चालवता येत नसे. कधीतरी शाळेत आणि पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी आणि गांधीजयंतीच्या दिवशी दरजातल्या बाजाराच्या मैदानावर सिनेमे दाखवले जायचे. या मशिनवर आम्ही आतापर्यंत प्रपंच, जयसंतोषीमा, ओवाळिते भाऊराया असे आठदहा तरी सिनेमे बघितले होते.

मी सोनवणे सरांना विचारलं तर ते फिस्सकन हसले. मग पाठीवर हात ठेऊन म्हणाले, 'असले सिनेमे बघायचे नसतात. आणि असल्या सिनेम्यांच्या प्रिंटही मिळत नाहीत आपल्याला. जा वर्गात बस.'

मला काहीतरीच वाटलं. उगाच विचारायला गेलो असं झालं. असले म्हणजे कसले?

आवल्याला हे सांगितल्यावर तोही सरांसारखाच फिस्सकन हसला नि म्हणाला, 'काहीही बोलून र्‍हायला मास्तर. त्याला विचारलं पायजे- भिंगरी नि फटाकडी असे सिनेमे कसे दाखवले म्हणून.' मग गंभीर होऊन म्हणाला, 'बरोबरचे मास्तराचं. राम तेरी गंगा मैली नाही दाखवणार. भिंगरी नि फटाकडीसुद्धा राममंदिराच्या मागच्या मैदानाला पडदे लावून तिकिट लावून दाखवले होते. आपल्याला कुठे सोडलं आत? पण मी वाचनालयाच्या गच्चीतून चोरून बघितला नीटच!'

आता तो सिनेमा इथे दाखवणार नाही म्हणजे आपल्याला बघायला मिळणारच नाही हे मला कळून चुकलं. कॉलेजला गेल्यावर मात्र तो बघायचाच असं मी ठरवून टाकलं. कॉलेजला अजून किती वर्षे आहेत, याचा नीट हिशेब करता करता मला झोप लागली.

***

एकदा रात्री जेवणं झाल्यावर पाण्याच्या टाकीजवळच्या उतरतीवर आम्ही गप्पा मारत होतो. तिथं पंक्या धावत आला नि म्हणाला, 'अरे, शाळेच्या मैदानावर तो राम तेरी गंगावाला सिनेमा दाखवून राहिलेत म्हणे!'

आवल्या ताडकन उठत संशयाने त्याच्याकडे बघत म्हणाला, 'तुला कसं माहिती? आणि मला कसं कळलं नाही ते?'

'काय की. आता तो कॉलेजवाला सोपान सांगत होता मघाशी.' पंक्या म्हणाला.

आवल्या 'चला रे' म्हणाला तसे सारे उठले. मी पटकन घरात जाऊन पंक्याकडे थोडावेळ अभ्यासाला जातो असं सांगून आलो. शाळेत चालू आहे म्हणजे नक्की सोनवणे सर दाखवत असतील. त्यादिवशी तर नाही म्हणाले होते. मला जरा रागच आला.

शाळा जवळ आली तरी कसलाही आवाज येईना. 'कमी आवाजात लावला असेल' असं आवल्या म्हणालाही. थोड्या वेळाने शाळा आली तरी सामसूम होती. कुंपणाच्या आत जाऊन बघून येतो म्हणून आवल्या म्हणाला. थोड्या वेळाने आतून खैरनार सरांच्या जडाभरड्या आवाजातल्या शिव्या ऐकू आल्या तसं आम्ही घाबरलो. आवल्या भिंतीवरून बाहेर उडी टाकून म्हणाला, 'काही नाही रे सिनेमा. मास्तर लोक आत वाळूवर बसून पिऊन राहिलेत साले नीटच. चला पळा हितनं.'

मला खट्टू व्हायला झालं. खाली मान घालून विचार करत घरी आलो. सोनवणे सर बरोबरच म्हणत होते. माझ्याशी तरी खोटं बोलणार नाहीत. पंक्याने आवल्याच्या हातचे दोन दणके खाल्ले घरी येताना, पण माझं त्याकडे नीट लक्षच नव्हतं.

***

एक दिवस नानांच्या वाड्यातल्या दगडी ओट्यावर खेळत असताना आवल्याने एकदम अभितासारखा लांब ढांगा टाकत पळत तिथं आला, नि कमरेवर हात ठेऊन धापा टाकत म्हणाला, 'स्टँडवरच्या व्हिडिओला राम तेरी गंगा मैली आलाय!'

ओट्यावर एकदम शांतता पसरली. आम्ही सारे आश्चर्य बघितल्यागत आवल्याकडे बघू लागलो. थोड्या वेळाने हंप्याने विचारलं, 'चित्र पण लावलंय तिथं?'

'हो तर. तेच चित्र. मी कारखान्यावर गेलेलो, तेव्हा पाहिलेलं, तेच.' आवल्या म्हणाला.

मुक्या ताडकन उठून 'चला बघून येऊ' म्हणाला आणि चालूही लागला. मंत्र मारल्यासारखे आम्हीही सारे त्याच्या मागून चालू लागलो.

दरजा ओलांडून एस्टीस्टँडवर आलो आणि दुकांनाच्या रांगेला वळसा घालून व्हिडिओजवळ पोचलो, तर खरंच त्या भिंतीवर ते मोठं चित्र लावलं होतं.

जवळ जाऊन एकदम गप्प होऊन सारे ते नीटच निरखून बघू लागले. बाजूला पांढर्‍यास्वच्छ गंगा नदीतून दुध खळखळत वाहत असल्यागत दिसत होतं. त्या हिरोईनचेही कपडे पांढरे स्वच्छ होते. आवल्याने सांगितल्याप्रमाणे विरल्यागत दिसणारे. असे कपडे कुणी कधी घातल्याचं पाहिलं नव्हतं. कानाजवळ पुन्हा त्या गवताच्या नाजूक झुळझूळीचा भास झाला. आवल्या त्या चित्राकडे एकटक पाहत त्याच्या चिरकत्या आवाजात गाणं म्हणू लागला. त्या सिनेमातलंच असावं.

बराच वेळ तिथं थांबल्यावर एकदम आतून लोकांची गर्दी बाहेर आली. मग घाईघाईने आम्ही तिथून सटकलोच. 'व्हिडिओमध्ये सिनेमा बघू का' असं घरी विचारलं तर काय होईल याचा नीट विचार करून बघितला. मग लगेच तसा विचारही नको असं ठरवून टाकलं.

रात्र होऊन झोप येईस्तोवर ते चित्र डोळ्यांसमोरून हलत नव्हतं. हळूहळू पांढर्‍यास्वच्छ नदीचं पांढरंशुभ्र बर्फ झालं. त्या बर्फाचा हळुहळू सिनेमाचा पांढरा पडदा झाला. मग तो नीटच पारदर्शक होऊन पलीकडचंही दिसू लागलं. तिथं आवल्या कमरेला लाल रूमाल घट्ट बांधून एका नवीन सिनेमाची गोष्ट तावातावाने सांगत होता. ते नंतरचं सारं बहुधा स्वप्नातलं असावं.

***

नंतर खूप दिवसांनी किंवा महिन्यांनी असेल, एकदा आवल्या म्हणाला, 'अरे तो राम तेरीवाला सिनेमा पुन्हा आला..!'

तालुक्याच्या गावचे पुष्पांजली टॉकीजवाले नवीन सिनेमा नसला की असा एखादा भारीतला काही महिन्यांपुर्वीचा सिनेमा पुन्हा लावत, हे मला ऐकून माहिती होतं. शेजारी 'खास लोकाग्रहास्तव' अशी खास तयार करून घेतलेली लाल रंगातली भलीमोठी पाटी पण लावत.

माझ्या डोक्यात आता चक्रं फिरू लागली. तालुकापातळीवरच्या निबंध आणि वक्तृत्वस्पर्धेसाठी माझी निवड झाली होती, आणि याच आठवड्यातल्या शनिवारी तिथं जायचं होतं. ते सारं संपल्यावर आवल्याच्या काकांकडे जातो आणि नंतर त्याचे काका संध्याकाळी आम्हाला नीट एस्टीत बसवून देतील, असं सरांना सांगायचं ठरलं. खूप चर्चा करून काय नक्की करायचं ते सर्वांनी ठरवलं.

शनिवारी ठरल्याप्रमाणे सार्‍या स्पर्धा संपल्यानंतर आम्ही थोरात सरांना तसं सांगितलं. आम्हा पाच मुलांना सोडून मग थोरात सर निघून गेले. गेला आठवडा भरपूर गमतीजमती करून खोटं बोलून प्रत्येकाने कुठूनकुठून पाच पाच रूपये जमवले होते. ते सारे आवल्याकडे नीटच जमा केले, कारण खिडकीत जाऊन तिकीट काढून आणायची कुणाचीही हिंमत नव्हती. ती काढून आवल्याने दुरूनच आम्हाला हवेत झेंड्यागत फडकावून दाखवली तेव्हा पोटात गरम गरम गोळा आल्यागत काहीतरी झालं. कानाजवळ तीच गवताची झुळझूळ आणि शब्दांत सांगता न येणारी हुळहूळ!

सिनेमा सुरू व्हायला अजून थोडा वेळ बाकी होता म्हणून आवल्याकडच्या उरलेल्या पैशांच्या कुल्फ्या घेऊन खात खात आम्ही वळत असताना कानाजवळ मोठा फटाका फुटल्याचा आवाज झाला. मग आणखी दोन तीन मोठे आवाज झाले आणि सार्‍यांच्या कुल्फ्या खाली मातीत पडल्या. घाबरून वर बघितलं तर थोरात सर आणि आमचे दादा.

संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा नीटच भरपूर मार पडला. एक आवल्या सोडला तर सगळ्यांनाच ज्यांच्या त्यांच्या घरी बसला असणार. आवल्याला बसला असला तरी तो कधी सांगणार नाही, हे नक्की. दुखर्‍या अंगावर पांढरास्वच्छ कपडा कुणीतरी प्रेमाने पांघरूणागत टाकतं आहे, कसला तरी अनोळखी सुवास येतो आहे, कुणीतरी मधाळ घार्‍या डोळ्यांनी आणि गोड गोर्‍यागोबर्‍या गालांनी हसतं आहे, असं वाटल्याचे भास होते की स्वप्न, ते दुसर्‍या संपूर्ण दिवसभरात आठवून बघत राहिलो.

***

ओट्यावर खेळताना एक दिवस आवल्या एका भन्नाट सिनेम्याची गोष्ट नि कायकाय सांगत होता. वातावरण जामच भारी झालं एकदम, आणि आवल्याचे डोळे आणखीच एखादं भारीतलं स्वप्न बघत असल्यागत चमकले. मध चाटवल्यावर लहान बाळ करतं तसा चेहरा करून तो म्हणाला 'आयला नान्या, एक नीटच भारी पिक्चर आलाय रे. जुना आहे, पण बघायचाच आपल्याला काहीही करून..'

'कुठचा सिनेमा रे?' नान्याने घाई झाल्यागत विचारलं. आता नान्याचेही डोळे स्वप्नाळू वगैरे दिसायला लागले होते, त्यामु़ळे आमची उत्सुकता आणखीच वाढली.

मोठ्ठं गुपित सांगितल्यागत पुढे झुकुन कुजबुजत आवल्या म्हणाला, 'सत्यम शिवम सुंदरम!'

***
***

(पूर्वप्रकाशित- माहेर दिवाळी २०१२)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही गेल्या वर्षी माहेरच्या अंकात वाचली होती त्यावेळीच खूप आवडली होती.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद. परत वाचता आली.