अंत नसलेल्या कथा- २

Submitted by साजिरा on 28 November, 2013 - 07:51

मनोमय काल म्हणाला-- काहीही दिसलं, ऐकू आलं, मनात आलं, की पटकन लिहून ठेवायचं. जमेल तसं लिहायचं. जमेल तितकं डिटेल लिहायचं. वेळ नसेल तर सांकेतिक लिहायचं. नंतर वेळ मिळाला की पुन्हा लिहून काढायचं. पण असं पुन्हा लिहून काढण्यात त्या त्या प्रसंगाचा, घटनेचा, त्या क्षणाचा आत्मा हरवतो. पण सांकेतिक आणि थोडक्यात लिहिण्यामधेही बर्‍याच गोष्टी सुटून जातात. दोन्ही प्रकारांचे फायदेतोटे आहेतच. पण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. जमेल तसं, जमेल तितकं लिहायचंच. रोज लिहायचं. कागदावर, नोटबुकवर, चिटवर, डायरीत, पाकिटातल्या चिटोर्‍यावर, काँप्युटरवर, मोबाईलवर- कुठेही.

तो आणखी असंही म्हणाला की स्वप्न पडलं, की ते उठल्या उठल्या लिहून काढायचं. लगेच. ब्रशबिश आणि चहा वगैरेच्या आधीच. बेडवरच. कारण जसजसा वेळ जातो, तसतसं ते हरवत जातं, बोथट होत जातं, त्याचे रंग हरवत जातात. गंध तर कुठलेच राहत नाहीत नंतर. उदाहरणार्थ दुपार वगैरे झाली, की मग संपलंच. तुम्हाला चक्क आठवत देखील नाही.

मनोमय म्हणजे मला एका फुटकळ स्क्रिप्ट रायटिंग वर्कशॉपमध्ये भेटलेला मित्र. वर्कशॉपमधलं मला फारसं काही कळलं नाही. मात्र मनोमयशी मस्त जुळलं. लेक्चर संपलं की आम्ही भटकत असू, त्यातल्या बोलण्यातूनच मला या वर्कशॉपपेक्षा जास्त गोष्टी समजल्या. किंवा मग असंही असेल, की सांगणारा मुळात तुम्हाला आवडणारा असला, की मग बोललेलं सगळं समजतं, पचतं, कळतं, आत्मसात होतं.

डॅड आवडत नाहीत, असं प्रकट म्हणायची पद्धत नाही. निदान घरात तरी. आमचे बरेच मित्र तर आपसांत किंवा मनाशी सुद्धा ही गोष्ट कबूल करत नाहीत. ते असो, पण डॅडचं सांगितलेलं मला खरंच कळत नाही. ते मॅथ्स शिकवायचे तेव्हा तर मी शुंभासारखा मिचमिचे डोळे करत काहीच न समजल्यागत त्यांच्याकडे नुसता पाहतो- असं ते आईला सांगतात. पण मम्मीला ते ऐकायलाही वेळ नसतो. तिने तिच्या मॅगॅझिनच्या कामाला संपूर्ण वाहून घेतलं आहे. रात्री केव्हातरी घरी आल्यावरही चष्मा लावून ती रात्र रात्र जागत असते. बर्‍याच वेळा तिची ती ढिगाने पुस्तकं, संदर्भांचे गठ्ठे, मासिकांचे हारे मीही चाळत बसतो. म्हणजे विशेषतः झोप आली नाही तर. असं बर्‍याच वेळा होतंच. खूप वेळा पाणी पिऊन बाथरूमला जाऊनही झोप आली नाही, की मी तिच्या खोलीत जातो. ती काहीच म्हणत नाही, पण माझ्याशी फारसं बोलतही नाही. पण हेही तितकंसं खरं नाही. खरी गोष्ट अशीही असू शकेल, की काहीही विचारल्यावर ती असं लंबंचौडं आणि न समजणारं उत्तर देते की --जाऊ दे, गब्बस. तू कर तुझं काम-- असं मीच तिला सांगून टाकतो.

स्क्रिप्टरायटिंगबद्दल मी तिलाही अनेकवेळा अनेक प्रश्न विचारलेले. पण ती भयानक उत्तरं देते. डॅडच्या मॅथ्सपेक्षाही भयंकर.

एकदा असं झालं, की मी बारावीला सपशेल नापासच झालो.

याचे दोन परिणाम झाले- एक, डॅडनी माझाशी बोलणंच टाकलं. दोन, मम्मी माझी जास्त काळजी करू लागली. पहिल्यापेक्षा जास्त बोलू लागली. एकंदरित दोन्ही परिणाम उत्तम झाले.

सुट्याच सुट्या मिळाल्याने मला त्यांचं काय करावं ते कळत नव्हतं. असेच दीड-दोन महिने गेल्यावर एकदा मम्मीने कुठून तरी त्या स्क्रिप्ट रायटिंग वर्कशॉपचं शोधून काढलं, आणि अशा प्रकारे मनोमय मला भेटला. हे सारं अगदीच मस्त झालं. बारावी नापास झालो नसतो तर असलं काही घडलं नसतं.

तर सांगायची गोष्ट म्हणजे मनोमय काल जेव्हा असं बरंच काय काय लिहून ठेवण्याबद्दल म्हणाला, तेव्हा मी त्याला सांगितलं-- आमचं अपार्टमेंटच काय, पण अख्खीच्या अख्खी हौसिंग सोसायटी ही अत्यंत नीरस आणि बधीर जागा आहे. लिहून वगैरे ठेवण्यासारखं तिथं काही घडत नाही. एकतर दिवसभर मेल्यागत शांत असते. आणि रात्री कामावरून जेव्हा सारे घरी येतात तेव्हा एकतर कुकरच्या शिट्यांचे, लहान मुलांच्या रडण्याचे किंवा मोठ्या माणासांच्या ओरडण्याचे आवाज येतात. बस. आता यात लिहून लिहायचं ते काय?

मनोमय म्हणाला-- तसं नाही. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणाला स्क्रिप्ट घडत असतं. स्क्रिप्टरायटरने ते उघड्या डोळ्यांनी बघायचं, उघड्या कानांनी ऐकायचं, आणि मेंदू संपूर्ण जागा ठेऊन टिपून घ्यायचं असतं.

मला अचानक जाणवलं, असंच काहीतरी खूप पुर्वी मम्मीने सांगितलेलं, पण भयंकर जाडजूड शब्दांत. असलं कोण ऐकेल? मनोमयसारख सांगणारा पाहिजे. अगदी हुबेहुब पटण्यासारखं बोलणारा.

तर उद्यापासून हे असं सुरू करायचं. लिहून वगैरे ठेवायला. निरीक्षण करायला. टिपून घ्यायला. आता झोपायला हवं. कदाचित एखादं स्वप्नही पडेल. यापुढची स्वप्नंही लिहून ठेवायची- हेही तसं ठरलं आहेच म्हणा.

***

प्रत्येक फ्लोअरवर चार फ्लॅट्स आणि प्रत्येक इमारतीला आठ फ्लोअर्स आणि सोसायटीतल्या एकुण इमारतींची संख्या सतरा. अशा साडेपाचशे घरांमधल्या अंदाजे दोनेक हजार व्यक्तींना रोज निरखुन बघायचं म्हणजे फारच जंगी कार्यक्रम आहे-- असं मी दुसर्‍या दिवशी म्हणालो, तेव्हा मनोमयने कपाळावर हात मारून घेतला.
मी हसलो. तोही हसला.
म्हणाला-- च्यायला भोच्या, स्क्रिप्टरायटर व्हायचंय की कारकुन? दुसरा ऑप्शन बराय-- असं अनेक जण म्हणतात. पुन्हा नीट विचार करून ठरव बघू.

मी म्हणालो-- ते भोच्या फार बोअर आहे.
तो म्हणाला-- शॉर्टफॉर्म बरा असतो.
तो पुन्हा म्हणाला-- पण हे बोलतानाच. कुठच्याही स्क्रिप्टमध्ये काहीही शॉर्टकटमध्ये लिहिणं म्हणजे मुर्खपणा.

***

शेवाळ्यांच्या घरात नेहमी सोसायटीच्या मॅनेजमेंटचं काहीतरी चाललेलं असतं.
नवर्‍याप्रमाणेच मिसेस शेवाळ्यांनाही अशा आणि एकंदरच सार्वजनिक कामात बर्‍यापैकी रस आहे.
असंच काहीतरी सही करण्यासाठी घेऊन त्या मम्मीकडे आल्या. मी मम्मीच्याच खोलीत होतो. त्यांच्याकडे नीट बघितल्यावर लक्षात आलं, की त्यांच्याकडे आजवर नीट कधीच बघितलं नव्हतं.
बोलता बोलता माझ्याकडे बघितल्यावर त्या जरा चपापल्यागत झाल्या.
काय करायचं ठरवलंस या वर्षी-- असं विचारल्यावर मी म्हणालो-- काहीच नाही.
मम्मी मात्र बरंच सांगत बसली. स्क्रिप्ट रायटिंग वर्कशॉप, चित्रांचं प्रदर्शन, पत्रकार संघाची वैठक इ.इ. त्यातलं बरंच माझ्याशी संबंधित होतं.
त्या गेल्यावर मी हॉलमध्ये येऊन टीव्ही बघत बसलो.

दुपारी जेवण झाल्यावर मम्मी समोर, सप्र्यांच्याकडे गेली. तिथं बराच वेळ बसली.
मग तिचा फोन आला, म्हणून मी तो समोर द्यायला गेलो. तर मिसेस सप्रे आणि त्यांची मुलगी भलत्याच अघळपघळ आणि सोफ्यावर जवळजवळ लोळत वगैरे पडल्या होत्या.
त्या चपापुन नीट बसू लागल्या, तेव्हा मला सकाळच्या मिसेस शेवाळ्यांच्या चपापण्याची आठवण आली.
मिसेस सप्रे आणि त्यांची मुलगी सेम दिसतात. शिवाय आई-मुलगी वाटत नाहीत.
हे अर्थात, कधीच मी बघून ठेवलं होतं. पण आता एक निरीक्षण नोंदवलं, इतकंच.

मग मी झोपलो.
उठून चहा पीत असताना इशा आली. म्हणजे सप्र्यांची मुलगी.
ती एफवायला आहे. तिला काहीतरी वाचत राहायचा जबरदस्त शोक आहे.
ती म्हणाली-- आता तुला बराच मोकळा वेळ आहे, तर माझी लायब्ररी लावतोस का?
मी विचार केला, मम्मीच्या लायब्ररीपेक्षा हे परवडलं. लगेच हो म्हणून टाकलं.
मग ती काय वाचावं, कुठून सुरूवात करावी- असं बरंच कायकाय बोलत राहिली. मम्मीने याच विषयावर अनेक लेक्चरं दिली आहेत. पण फारसं समजत नाही तिचं बोलणं.
इशाचं सहज समजतं- हे लक्षात आलं. किंवा मग मी तिच्या डोळ्यांकडे बघत एकाग्रतेने ऐकत होतो, म्हणूनही असेल. मम्मीचं बोलणं असं एकाग्रतेने ऐकून बघायला हवं. फरक तरी कळेल.

संध्याकाळी सोसायटी हॉलमध्ये कसलीशी मिटींग होती. तिथं जा म्हणून मम्मी म्हणाली.
जा तर जाऊ. अशीही कधीच सोसायटीची सभा बघितली नव्हती.
तिथं जाऊन मन लावुन सारं ऐकलं.
मी तर थक्कच झालो. किती विषय असतात एखाद्या सोसायटीत.
लिफ्ट, पाणी, साफसफाई, इलेक्ट्रिसिटी, गार्डन, सिक्युरिटी..
हे सारं नीट चाललेलं आपल्याला रोज दिसतं. आता ते नीट म्हणजे नक्की कसं चालतं, हे उद्यापासून जवळुन बघायचं मी ठरवलं- तेव्हा जरा हुरूप आला.

मिटिंग संपताना वादावादी झाली. आमच्या विंगेतले शेवाळे हातात बरेच कागद घेऊन बरीच स्पष्टीकरणं देत होते. किती लोक किती प्रश्न विचारत होते. शेवटी तर चक्क आरडाओरडा झाला.

मी घरी आलो तेव्हा डॅड आले होते.
मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा बाहेर कसला आवाज आला, म्हणून बाहेर येऊन बघितलं, तर खालच्या मजल्यावरचे सलियन आले होते. त्यांच्या बोलण्यावरून हे कळलं, की त्यांच्या त्या भल्यामोठ्या एक्सकॅव्हेटर यंत्राला मोठा अपघात झाला आहे.

सलियन नेहमी मोठमोठ्या पैशांचे व्यवहार करत असतात. पण तरी नेहमी मोठमोठ्या अडचणींत सापडत असतात. हे आपलं एक निरीक्षण म्हणून.

***

भोच्या, शोक नाही, शौक. शौक-- मनोमय दुसर्‍या दिवशी सकाळी माझी डायरी हातात धरून वाचताना म्हणाला.

अर्थात काही वाचनग्रस्त लोकांचं वाचन, त्यावर ते स्वतःबद्दल करत असलेला विचार, आणि असं विशिष्ठ प्रकारचं वाचन करून करून एकंदरच त्यांचं झालेलं भजं- याला शोक हेच जास्त बरोबर होईल-- असं तोच पुन्हा म्हणाला. आणि खदाखदा हसू लागला.

मग पुढे म्हणाला-- हं. ठीक आहे. चालू दे. काहीतरी सापडेल आपल्याला.
काहीतरी सापडेल म्हणजे?-- मी विचारलं.
अरे काहीतरी लिहायला काहीतरी सापडेल. इनमीन दोन दिवसांत आणि इनमीन चार अघळपघळ बायकापुरूष बघून आणि दोनचार निरीक्षणं नोंदवून तू काय टॉलस्टॉय किंवा दस्तोयव्हस्की होणार नाहीस-- तो म्हणाला.
मी म्हणालो-- बरं.

टॉलस्टॉय आणि दस्तोयव्हस्कीबद्दल इशाला विचारलं पाहिजे. तिच्या लायब्ररीत उद्यापासून जाणार आहेच-- त्या निमित्ताने.

***

दुपारी इशासोबत लायब्ररीत गेलो. मस्त जागा आहे. ही लायब्ररी सोडायची नाही.
टॉलस्टॉय आणि दस्तोयव्हस्कीबद्दल इशाला विचारलं तर म्हणाली- फारसं माहिती नाही.
वर्गणी भरून, तिचं आणि माझं- अशी दोन पुस्तकं घेऊन आम्ही बाहेर पडलो.
येताना ती म्हणाली-- तुला माहिती आहे, काल संध्याकाळी खालच्या सलियन आणि त्यांच्या शेजारच्या गौरी दिघ्यांचं जोरदार भांडण झालं.
माझ्या लक्षात आलं- मी तेव्हा नेमका सोसायटी हॉलमध्ये होतो. त्या मिटिंगसाठी.
ती पुढे म्हणाली-- गौरी व्याजाने पैसे देते. तिचा धंदाच आहे तो. तसेच पैसे मिस्टर सलियननाही दिले होते. मिसेस सलियन आणि गौरीची खूप वादावादी झाली. आईने मला ते पूर्ण ऐकू दिलं नाही. पण काहीतरी सस्पेन्स आहे खास.

मी विचार करत घरी आलो.
गौरी कॉलसेंटर मध्ये मॅनेजर आहे म्हणे. मिस्टर दिघे एका अपघातात गेले काही वर्षांपुर्वी. गौरीचं वय तसं फार नव्हतं. पस्तीस असेल फार तर. पण मम्मी एकदा म्हणालेली-- ती चाळीशीतली असावी, पण ती राहते छान म्हणून तसं वाटत नाही.
कॉलसेंटरच्या मॅनेजरकडे इतके पैसे -म्हणजे दुसर्‍यांना व्याजानेबिजाने देण्याइतके- नसतात म्हणे, पण तिचे वडिल खूप श्रीमंत म्हणूनही असेल-- असंही मम्मीच एकदा म्हणालेली.

संधाकाळी शेळक्यांच्या घरात गोंधळ ऐकू आला. मिस्टर शेळके प्रचंड दारू प्याले असावेत- असं वाटलं.
मिसेस शेळके टापटीप राहतात, पण एकुणात ही फॅमिली गचाळ वाटतेच. कसं- ते कळत नाही. घरात नेहमी पसारा. अघळपघळ गप्पा. खूप लोकांचं येणंजाणं. घरात मुलं आणि मोलकरणीही जास्त- यामुळेही असेल.
गौरी दिघे पण तशीच टापटीपीत राहते. ती आणि तिचं घर मात्र मला कधी गचाळ, अजागळ वगैरे वाटत नाही.

***

मनोमय म्हणला-- वा वा. चालू दे. काही सापडो, न सापडो. तू चालू ठेव. कुणाच्या हातात पडू देऊ नकोस मात्र.
मी म्हणालो-- ठीक आहे.
मग थोड्या वेळाने तो विचार करून म्हणाला-- त्या सलियनवर लक्ष ठेव.
मी म्हणालो-- ठीक आहे.

***

दिघ्यांकडे चोरी झाली.
पण गौरीने काहीही पोलिसांत तक्रार वगैरे केली नाही.
मम्मी म्हणाली-- नवलच आहे. पण गौरीबद्दल काहीही म्हणजे नवल नव्हे.
डॅड म्हणाले-- शी इज क्रेझी. सलियनच्या बोलण्यावरून तर मला वाटतं- कुठच्याही थराला जाणारी बाई आहे ती.
मम्मी म्हणाली-- आय नो. बट शी कॅरीज ऑल दॅट व्हेरी नाईसली. कुठच्याही थराला जाणं हे पुरूषालाच शोभतं, असं तुला वाटतं का?
डॅड गप्प राहिले.

थोड्या वेळाने मग मम्मीच म्हणाली-- मी बोलले तिच्याशी. कारण आपल्या विंगेत चोर असे बिनधास्त फिरणं म्हणजे तसं डेंजरस आहे. पण ती म्हणाली, डोंट वरी. हे कुणाचं काम आहे, आय कॅन गेस. आय विल डील विथ इट परफेक्टली. चोर ओळखीचा आहे. असावा- आय थिंक.

मला खूपच नवल वाटलं. तब्बल अडीच लाख रुपये चोरीला जाऊनही गौरी इतक्या शांततेत बोलत होती. मम्मी नंतर म्हणाली-- जास्तही असतील. ती आपल्याला अडीच लाख सांगतेय!

दुपारी चहा झाल्यानंतर खाली जाऊन शेजारच्या विंगेतल्या अमर बोराडेशी बोलत राहिलो. त्याने गौरीबद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या. अर्थात त्यातल्या निम्म्याहून अधिक थापा आणि त्याने स्वतःच जुळवलेलं असणार- हे मला सवयीने माहिती होतंच.

त्या खालच्या कट्ट्यावर बसलेलो असताना सलियन घाईघाईने जाताना दिसले तेव्हा अमरला कळणार नाही अशा पद्धतीने त्याचा निरोप घेऊन मी सलियनचा पाठलाग करायचं ठरवलं. सगळ्या इमारतींच्या मागून त्यांच्यावर लक्ष ठेवत मी जाऊ लागलो.

मेनगेटच्या बाहेर आल्यावर डावीकडे वळून हायवेला लागणार्‍या रस्त्याकडे ते गेले. आता पाठलाग जरा अवघड होता. कारण अजिबात गर्दी आणि आडोसे नसलेल्या मोकळ्या रस्त्यावरून सहज दिसलो असतो.

गार्डनची छोटी कंपाऊंडवॉल मी उडी मारून ओलांडली आणि थोडं मागे जात झुडूपांच्या आडोशाने त्यांच्या मागे जाऊ लागलो. संध्याकाळच्या कमी प्रकाशात फारसा दिसलो नसतो तसा म्हणा.

नीट निरखून बघितलं तर दूर गौरीची गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती.

सलियन तिच्या गाडीचा दरवाजा उघडून आत गेल्यावर मी जास्तीत जास्त जवळ जाऊन आणि निरखून बघण्याचा प्रयत्न करू लागलो.

कारमध्ये काय बोलणं चाललं होतं, ते ऐकू येण्याचा प्रश्नच नव्हता. थोडा वेळ बघत राहिल्यावर मला चक्क झटापट चालू असलेली दिसली- एक दोनच क्षण.

नंतर सलियन गाडीतून बाहेर आले, आणि गौरी गाडी चालू करून निघून गेली तेव्हा गौरीने त्यांच्या कानशिलात वाजवली- हे माझ्या मेंदूपर्यंत पोचलं.

घरी येऊन बसलो तर गप्प का-- म्हणून समोरच्या इशाने विचारलं. मी काही न बोलता पुस्तक वाचायला घेतलं.

रात्री जेऊन झोपलो, तरी पाहिलेल्या घटनेचा विचार करत आणि नक्की अर्थ लावत बसलो होतो.

उद्या आमच्याकडे चक्रपूजा आहे. त्याची तयारी करत मम्मी आणि डॅड बर्‍याच उशिरापर्यंत करत बसलेले. आमचे कुळाचार का काय ते- मम्मी आणि डॅड नक्की कुणाला घाबरून करत असतात, हा एक नवलाचाच प्रश्न आहे.

***

हां. गुड. तू भरपूर वाचायला लागलास ही एक फार चांगली गोष्ट आहे-- मनोमय म्हणाला.

मी त्याच्याकडे नीट निरखून बघू लागलो. मग न राहवून विचारलं-- मी काल बघितलेली घटना महत्वाची आहे की नाही?

तो म्हणाला-- तुझं लिहिणं जास्त महत्वाचं आहे. त्या तुला अचानक दिसल्या म्हणून प्रेडिक्टेबल नाहीत असं नसतं काही. आपल्याला न माहित अशा अनेक घटना घडत असतात.

मी गप्प राहिलो. मग थोड्या वेळात विचारलं-- गौरीकडे चोरी कुणी केली असेल?

तो म्हणाला- ते महत्वाचं नाही. पण तरी सांगतो. तुला मिस्टर सलियन चोर आहेत असं वाटतंय ना? मला नाही तसं वाटत. त्या मिस्टर सलियनचं ऑफिस भावाच्या शेजारीच आहे. मी नीट पाहिलंय त्याला. पण पुन्हा सांगतो- ते महत्वाचं नाही. चोरीचा तपास लावायला आणि गुन्हेगार शोधायला आपण काही पोलिस नाही. आणि एखादं रहस्य शोधून काढायला आपण गुप्तहेर नाही. तुझ्या स्क्रिप्टने काही शोधलं तर शोधू देत. ते आपलं काम नाही. आपलं काम काय- ते नीट लक्षात आलं नाही का तुझ्या?

मी मान नकळत डोलावली.

बराच वेळ बसून राहिल्यावर तो म्हणाला-- आता मिस्टर सलियन सोड. गौरीवर लक्ष ठेव.

मी पुन्हा मान डोलावली.

***

चक्रपुजेची भव्य धामधुम आहे घरात. मम्मीला पाणी प्यायलाही सवड नाही. डॅडही काहीतरी भयंकर ओझं वागवत असल्यागत वावरत आहेत. आमच्या इमारतीतले काही लोक, कर्जतहून काका आणि आमचे इतरही काही नातेवाईक आलेले. माझ्या बारावी नापास होण्याच्या चर्चेचं मला आता विशेष काही वाटत नाही. आताही मी तसाच गप्प बसून चर्चा ऐकत राहिलो. माझ्या जास्त न बोलण्याच्या सवयीचाही उपयोग झाला.

त्यातल्या त्यात इशाने माझी बाजू घेतली. पण ती नसती घेतली तरी मला फार काही वेगळं वाटलं नसतं.

चक्रपुजेच्या वेळी ते तीन चार रंगांचे तांदुळ तयार करून एकात एक अशी नऊ गोल चक्रं काढतात- तसं आजही केलं. सर्वात बाहेरच्या चक्राला बाहेर जाण्याचा रस्ता असल्यागत चार ठिकाणी फोडलं. तिथं मीठ, काळी बाहुली, हिंग, मोहर्‍या आणि असं बरंच काहीबाही ठेवलं. हे सगळं करत आणि तोंडानं काहीतरी अगम्य पुटपुटत असलेला आमचा काळाकभिन्न काका बघून मला सिनेम्यातल्या मांत्रिकाचीच आठवण आली.

मग या सार्‍यावर फळझांडांची खूप पानं, फळं, मग त्यावर नऊ मोठ्या पुरणपोळ्या, मग त्यावर नऊ कणकेचे मोठे दिवे असं ठेवल्यावर ती भितीदायक चक्रं एकदम सुंदर दिसू लागली. मी अचानक वर पाहिलं तर बाजूला बसून गौरी एकाग्रतेने या सार्‍याकडे बघत होती. तिने वर पाहिलं तेव्हा तिचा चेहरा त्या सार्‍या प्रकाशात एकदम उजळलेला दिसला. माझ्याकडे तिचं लक्ष गेलं, तेव्हा ती हसली. मला तिच्या डोळ्यांतून नजर काढून घेताना खूप प्रयत्न करावा लागला.

त्यानंतर ती माझ्याकडेच बघतेय असे भास मला होत राहिले. पण पुन्हा तिच्याकडे पाहण्याची हिंमत मात्र नव्हती. सारे जेवायला बसले तेव्हाही मी खाली मान घालून जेवत होतो.

जेवणं करून सारे गेले. सप्रे कुटुंब, मिसेस शेवाळे आणि गौरी- इतकेच लोक फक्त राहिले.
खूप गप्पा झाल्यावर गौरी जायला निघाली तेव्हा माझ्या गालावर हात ठेऊन म्हणाली-- कुर्ता पायजमा घातलेल्या तुला पहिल्यांदाच बघितलं. केवढा मोठा पुरूष दिसतोस.

मी नजर चोरून आजूबाजूला बघितलं. कुणी ऐकत, बघत नव्हतं- हे बघून हायसं वाटलं. गौरी हसत जिन्याकडे निघून गेली. तोंडात कोरड पडून पोटात खड्डा पडल्यागत आणि एकदम खूप घाम आल्यागत वाटलं.

***

छान. छान. हे चक्रपुजा प्रकरण पहिल्यांदाच ऐकतोय-- मनोमय बोटांतल्या अंगठ्यांच्या खड्यांशी खेळत म्हणाला. त्याने या पुजेबद्दल बरेच प्रश्न विचारले. मी घाईघाईने उत्तरं देऊन टाकली.

नंतर तो गप्पच झाला, तेव्हा माझा धीर सुटला. मी म्हणालो-- गौरीवर लक्ष ठेवायचं म्हणजे अवघड आहे. घरात कळलं, तर माझी शंभरी भरलीच समज. लिहिण्याबिहिण्यासाठी म्हणून गौरीवर लक्ष ठेवतोय- हे कुणाला पटेल?

मी सांगतोय ते बरोबर आहे-- मनोमय पटकन म्हणाला- सारेच शहाजोग आहेत. सारे आतुन नंगे असतात, भितीदायक असतात हे लक्षात ठेव. तुझ्या त्या चक्रपुजेतल्या तांदळाच्या कड्यांसारखे. मीही तसाच. तूही. कुणी अपवाद नाही. पण ही विकृती, नंगेपण आणि भिती- ही आपण शहाजोगपणे दिलेली नावं असतात. मुळात ते सारं निखळ, नैसर्गिक आणि शुद्ध असू शकतं. तुला नक्की भिती कसली वाटतेय? उगाच तुझं डोकं नको तिथं चालवू नकोस-- तो एकदम तिरसटून म्हणाला आणि निघालाच.

हा कधीतरी असा कोड्यात का बोलतो हे मला समजत नाही. यानं दोन पुस्तकंही लिहिली आहेत म्हणे. तीही अशीच असतील- कोडं सोडवण्याचा आवेश दाखवत आणखीच कोड्यांत टाकणारी.

***

सकाळीच मिसेस सलियनबद्दल डॅड आणि मम्मी काहीतरी हळू आवाजात बोलत होते. मी नाश्त्याला आल्याचं बघताच त्यांनी तो विषय बंद केला- हे मला सहज कळलं. मला बघून डॅड नेहमीप्रमाणे उठून गेले.

इशाचं कॉलेज सुटल्यावर दुपारी आम्ही लायब्ररीत गेलो. तिथं तब्बल तीन तास वाचत बसलो, आणि मग घरी आलो.

संध्याकाळी मिसेस शेवाळे भडक कपडे, मेकप करून आल्या. त्यांची लालभडक लिपस्टिक बघून अगदी मळमळल्यागत झालं. त्या गोर्‍यापान आणि सुंदर असूनही या अशा अवतारात त्या भयंकर दिसत होत्या. हसल्यावर आणखीच भयंकर.

भयंकर सर्दी झाली असल्याने मी लवकर झोपलो. मग काहीतरी स्वप्न पडत असताना मम्मीच्या हाका ऐकू आल्या म्हणून मी गोंधळून जागा झालो.

मम्मी म्हणाली-- हे बघ. गौरीचा फोन आला होता. तिला तिच्या कॉलसेंटरच्या कॅबवाल्यांनी काहीतरी चेष्टा करून घाबरवलं आहे. तिच्या घरी कुणी नाही. आजचा दिवस तुमच्या घरात झोपू का म्हणून विचारतेय. घाबरलीय बिचारी. तिची कॅब आता दोन मिनिटांत पोचेल. तू तिला वर घेऊन ये बघू. इथं तिची काळजी घेणारं कुणीतरी आहे, ती एकटी नाही- हे कळलं त्या मूर्ख कॅबवाल्यांना, तरी पुष्कळ आहे.

मी खडबडून जागा झालो. पाणी पिऊन खाली निघालो तेव्हाही मम्मीची बड्बड चालूच होती-- सोसायटीच्या वॉल कंपाऊंडवर रात्री कुणीतरी बसलेलं असतं, आणि चेहरे दिसत नाहीत म्हणे. द्वाड कुठचे. बाईमाणूस आहे, रात्रीबेरात्री असं घाबरवणारं बोलू नये- हेही कळत नाही या मूर्ख कॅबवाल्यांना..

मी खाली आलो, तेव्हा गौरीची गाडी नुकतीच पार्किंगमध्ये आली होती. तिला ड्रॉप करून तिच्या ऑफिसची गाडी निघून गेल्यावर सँडल्सचा आवाज करत हळुहळु चालत ती लिफ्टजवळ आली आणि माझ्याकडे बघत राहिली. माझ्या केसांवरून हात फिरवत म्हणाली-- सर्दी झालीय का? नाक केवढं लाल झालंय!

तिने काल गालांवरून फिरवलेला हात मला आठवला. मला अगदीच भोवळ आल्यागत झालं. कसाबसा मी भिंतीचा आधार घेतला, तोवर लिफ्ट आली होती. लिफ्टमध्ये शिरताना तिच्या पर्फ्युमचा वास आला आणि लिफ्ट कसल्या तरी भयंकर वेगाने एखाद्या कृष्णविवराकडे जाते आहे- असा मला भास झाला.

लिफ्ट थांबली, तेव्हाच मी व॑र मान करून बघितलं, तेव्हा ती काहीतरी शोधत असल्यागत माझ्याकडे बघत होती, आणि कुठच्या भितीचा तर लवलेशही दिसत नव्हता. ती आणखी आता पुन्हा माझ्या गालाला हात लावेल या भितीने मी पटकन लिफ्टच्या बाहेर पडलो. सरळ माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो. झोप येणार नाही हे माहिती होतंच.

बराच वेळ मम्मी आणि गौरीच्या बोलण्याचा आवाज ऐकत राहिलो. उशिरा केव्हातरी तोही बंद झाला. सर्दीने गच्च झालेल्या नाकपुड्या उघडण्यासाठी आणि नीट श्वास घेता यावा यासाठी आता अजून कितीवेळा कुशी बदलावी- ते कळत नाही.

***

छान. तू आज इशाशी काय काय बोललास? आणि काय वाचलंस आज?-- मनोमय म्हणाला.

मी म्हणालो-- काहीच बोललो नाही. काही वाचलंही नाही. सकाळी उठलोच मुळात अकरा वाजता आणि दुपारी पुन्हा औषध घेऊन झोपलो.

हं. ठीक आहे. चल आता जाऊ या-- मनोमय जागेवरून उठत आणि मग पुन्हा माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत म्हणाला-- गौरीवर लक्ष ठेवायचं आहे, स्वतःवर नव्हे.. लक्षात ठेव. अगदी काहीही झालं तरी.

***
***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast.