जाडो की नर्म धुप

Submitted by विजय देशमुख on 27 November, 2013 - 04:19

शनीवारचा दिवस. पहाटे ८ लाच उठलो. इच्छा नव्हती उठायची, पण "बाबा, भुक लागली" ऐकुन उठावच लागलं. बाहेर बघितलं तर धुकं असावं असं वाटत होतं. थंडीने बघुदा सुर्यदेवही झोपले असावे.

"रोज शाळा असते तेंव्हा जबरदस्तीने उठवावं लागते, अन आज मुद्दाम लौकर उठलास?" मी दुध गरम करत विचारलं. तो काय बोलणार बिचारा. एक कार घेउन त्याची खेळायला सुरुवातही झाली होती.

सकाळची कामे उरकली. झाडझुड, साफसफाई, तीही विकेंड स्पेशल. मुलांची तयारी, वगैरे होईपर्यंत बायकोचं काय चाललय याकडे लक्षच नव्हतं. किती वेळ झाला होता कुणास ठाउक. मध्येच मोबाईलवर बाहेरच तापमान बघितलं, ४ डीग्री... हम्म... बाहेर जाण्याचे सगळे बेत कँसल... घरात दिवसभर काय करणार? नविन चित्रपटही नाही कोणता....
अरे, हा सुगंध ओळखीचा वाटतोय... बघतो तर काय.... स्पेशल आलु-पराठे, तेही युपी स्टाईल ...
आणि गॅलरीत छानशी बसण्याची व्यवस्था. काचेची खिडकी बंद असुनही थोडसं थंड वाटतय, पण इटस ओके.
चलो पिकनिक ऐकुन मुलांना आणि मलाही उत्साह आला. लगेच जेवणाचा टेबल {खाली बसुन जेवता येईल असा}, मॅट, पेले, कप्स.... सगळी मांडामांड झाली. बाहेर बघितलं तर पांढरा शुभ्र बर्फ रेंगाळत पडत होता. आताशा सुर्याची किरणेही खिडकीतुन आत आली.
छान प्रसन्न वातावरण, सोबत आलु-पराठे, गरम चहाची किटली, आणि छोटीशी पिकनिक.....
नकळत माझ्या मनातले शब्द ओठावर आले,
जाडो की नर्म धुप और
आंगन मे बैठकर,
बैठे रहे तसव्वरे जाना के हुए ...

दिल ढूंढता है ....

अन कमाल सुर्यकिरणांची की माझ्या गाण्याची, की तिकडे तिच्या गालावर गुलाबी फुलं उमलले.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा:! या गाण्याच्या ओळी अशा आहेत की त्या त्या ऋतूत बरोब्बर आठवतात. "गर्मीयों की रात की पुरवाइयाॅं " अनुभवताना आणि शांततेचा आवाज ऐकताना!
छान जमलाय लेख!

विजय, छान लेख.
मला ते गाणं आवडतं पण ते सगळे सिमला, मनालीचे वर्णन असावे असे वाटायचे. प्रत्यक्ष अनुभव घेता आलाच नाही. तशाही गुलजारच्या कल्पना सुंदर पण नेहमीच आवाक्याबाहेरच्या वाटत आल्यात.

धन्यवाद दिनेश.
अगदी खरय ते. मी मेरठ/ बरेलीला असताना धुक्याचा अनुभव घेतलाय. विशेषतः दुपारी खरच जसं वर्णन केलय, तसं "आंगन मे लेटकर" असे बरेच लोकं बघितले {आणि आम्हीही घरच्या टेरेसवर खाटेवर बसुन जेवायचो} Happy

इथे कोरियात कित्येक पहाड आहेत, पण धुकं नाही. Sad

खर्रोखर क्या बात है! Happy चिमुकलं स्फुट खुप आवडलं.
आणि लग्गेच न राहवून गाणंही लावलं एकीकडे!
सदाबहार नग्मा है ये Happy

दिनेश, तुम्ही म्हणताय त्याच्या उलट गुलजारांच्या काही कल्पना अगदी आवाक्यातल्या वाटतात मला... अगदी ह्याच गाण्याचं उदाहरण घेतलं तर बर्फबिर्फ वगैरे सोडलं तर बाकीचं सगळं त्या त्या मोसमात जिकडे असतो तिकडे जमण्या/जमवण्यासारखं वाटतं. चंद्र-तारे-स्वर्गाच्या कल्पनांपेक्षा जमिनीवरचा खराखुरा कल्पनाविलास Happy

सुंदर !! तो वाफाळणारा चहा आलूपराठे इथं बसूनही फील करता येतय
आणि त्या गालांवरचं गुलाबाचं फूलही Wink