मिकी व्हायरस :- चित्रपट आस्वाद

Submitted by विजय देशमुख on 23 November, 2013 - 03:59

मागच्या वर्षी "विकी डोनर" बघितला होता आणि आवडलाही. नर्म विनोदी चित्रपटाची वेगळीच मजा असते. तसाच नाव साधर्म्य दाखवणारा "मिकी व्हायरस" बघावा असा विचार झाला. तसं या चित्रपटातला एकही चेहरा ओळखीचा नव्हता, ना दिग्दर्शक, ना निर्माता.

इंटरनेट - एक जबरदस्त माध्यम. आज आपले कित्येक व्यवहार याच इंटरनेट आणि सेक्युअर कम्युनिकेशनच्या माध्यमातुन होतात. उदाहरणार्थ ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातुन पैसे ट्रान्सफर.
याच इंटरनेटवर दुसर्‍याच्या कंप्युटरमध्ये घुसुन तिथली माहिती चोरणारेही लोकं आहेत, त्या माहितीचा उपयोग ते कसा करतील हे त्यांच्यावर आहे. समजा एखाद्याने बँक लुटायची ठरली तर.... ?
अश्या अनेक करामती हॅकर्स मंडळी करत असतात. {इथे अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची वेबसाईट हॅक केली होती, ते आठवले, असो.}
हा चित्रपट आहे तो अशाच एका हॅ़करची. नाव मिकी व्हायरस. सर्वसाधारण शिक्षणात रस नसणारा पण अत्यंत हुशार, तितकाच बेफिकिर (असं हॉलीवुडच्या कोणत्याही चित्रपटात शोभेल असं पात्र).
दिल्ली पोलिसांना अचानक दोन परदेशी हॅकर्सच्या खुनाची केस सोडवण्याचं आव्हान मिळतं. त्यासाठी पोलिसांना एका हॅकरची गरज पडते, अन इथेच एक पोलिस अधिकारी मिकीला हेरतो. मिकी नाईलाजानेच ते काम हातात घेतो आणि सुरु होते ती एक मजेदार कहाणी.
त्याच दरम्यान मिकीची ओळख बँकेत काम करणार्‍या कामायनीशी होते. तिने केलेल्या एका हवाला किंगच्या खात्यातुन केलेल्या १०० कोटी रुपयांच्या चुकीच्या मनी ट्रान्सफरला मिकी चक्क तिच्या बँकेत जाऊन ते ट्रान्सफर थांबवतो.
पण ............ इथे एक गडबड होते अन सुरु होतो एक खेळ. मिकी भलेही संगणकाच्या दुनियेत वरचढ असला तरी नेमकं मनी ट्रान्सफरचं गुढ त्याला कळेनासं होतं. कामायनीला पैसे ट्रान्सफरची मदत करताना नेमकी काय चुक झाली तेही कळेनासं होतं. त्यात तिकडे पोलिस इन्सपेक्टर "गुढ हॅकर गँग"ची पर्दाफाश करन्याची घाई करतो. आणि मिकी एका चक्रव्यहात अडकतो.
तो त्यातुन कसा बाहेर निघतो, हे पडद्यावर पाहणेच योग्य. या प्रसंगानंतर चित्रपट अतिशय थरारक बनतो, कारण हॅकर्सचा खुन करणारी गँग मिकीच्या मागे लागली आहे, अशी पोलिसांना भिती वाटते.

चित्रपट अत्यंत वेगवान असला तरी मधली गाणी रटाळ होतात. चित्रपटातची नायिका मात्र जरा प्रौढ वाटते. पण मिकी, इन्स्पेक्टर, मिकीला मदत करणारे त्याचे मित्र, इंटरनेट, जिपीएसचा मोबाईल ट्रॅकिंगसाठी "मिशन इंपॉसिबल" टाईप केलेला वापर..... तंत्रज्ञानाशी संबंधीत लोकांना निश्चित आवडेल असा चित्रपट वाटला.

ज्यांना वेगवान आणि थरारक चित्रपट पहायला आवडतात, त्यांनी चुकवू नयेच असा चित्रपट. हा व्हायरस तुम्हालाही निश्चितच आवडेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users