स्पाईसी बिस्किट्स

Submitted by माधवी. on 20 November, 2013 - 14:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१. मैदा १ कप
२. कणीक १/२ कप
३. बेकिंग सोडा
४. साखर १ चमचा
५. फ्रिजमधील थंडगार लोणी २-३ चमचे
६. दही २-३ चमचे
७. हिरवी मिरची १
८. कढीपत्त्याची पाने ७-८
९. कोथिंबीर
१०. जिरे १ चमचा
११. मिरे ३-४
१२. आल्याचा तुकडा
१३. वरून लावण्यासाठी तीळ
१४. मीठ

क्रमवार पाककृती: 

एका बाऊलमधे मैदा , कणी़क, साखर, मीठ, बेकिंग सोडा घालून एकत्र करून घ्यावे.
नंतर त्यामधे थंड लोणी घालून नीट मिक्स करावे. मिश्रण ब्रेडक्रम्ब्ससारखे दिसेल.
जिरे आणि मिरे भाजून त्याची पूड करून घ्या. ती वरील मिश्रणात टाका.
आता हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता बारिक चिरून मिश्रणात घाला. आल्याचा तुकडा किसून तो किस घाला.
व्यवस्थित मिक्स करून मिश्रणात दही घाला. वाटल्यास किंचित पाणी घालून मिश्रण भिजवा आणि अर्धा तास झाकून ठेवा.

आता ओव्हन १८० डि से किंवा ३५० डि फॅ ला प्रिहिट करा.
भिजवलेला गोळा शंकरपाळ्यासाठी लाटतो तसा लाटून (आपल्या आवडीप्रमाणे जाड्/बारिक) , त्यावर तीळ पसरून, त्याला आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकारात कापा.
ट्रेला थोडे तेल लावून त्यावर ही बिस्किटे ठेवून २०-२५ मि. बेक करा.
बाहेर काढून थंड होऊद्या. कुरकुरीत मसाला बिस्किट रेडी!

biscuit.jpg

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तसे!
अधिक टिपा: 

मिश्रणात थोडे तांदळाचे पीठ मिक्स केले तर छान लागतात.
पूर्ण मैद्याचे केले तर अजून मस्त!
बेकिंग पावडरही थोडी घालावी लागते पण मला काही मिळाली नाही तर मी घातली नव्हती.
अर्धा तास मिश्रण भिजवून ठेवले तर छान होतात पण लगेच केले तरी चालतात. मी दोन्ही करून पाहिले आहे.
तीळाबरोबर वरती कलोंजीही लावल्यास छान दिसते.

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मस्त दिसत आहेत बिस्किटं... मी करून बघणार नक्कीच.

मैदा नाही वापरला चालेल का?
पूर्ण कणकेची केलेली चालतील का?
किंवा तांदळाच्या पीठाचाही उल्लेख केला आहे तर तांदूळ पीठ + कणीक अशी बिस्किटं चांगली होतील का? चव छान येईल का? खुसखुशीत होतील का?

हे आणि असेच प्रश्न पुढे विचारले जाण्याची शक्यता आहे. Wink

मी पहिल्यांदा करताना वर दिल्याबरहुकुमच करणार आहे.

कडीपत्त्या एवजी तेजपत्ता चालेल का? कडीपत्ता आहे तर सांबार बिस्किटे का नाही म्हणायची? (विचारणारे काहीही विचारतील... तेव्हा तयारी ठेवा) ह. घ्या.

बाकी, रेसीपी चांगलीय.
मठरी सारखी लागतात का?( हा एकच माझा समजूतदार प्रश्ण आहे) Happy

>>>>तेजपत्ता काय असतं?<<

आला ना प्रश्ण? घालायचा आहे का बिस्किटात तर सांगते. कारण नंतर विचारशील की तेजपत्ता घालू का? म्हणून आधीच विचारते...

(गंमत गं... ह. घ्या)

तेजपत्ता... मराठीत माहीती नाही(आठवत नाही). नवर्‍याबरोबर राहून मराठी विसरले. Proud

गूगलून बघ ना... गूगल्ल तुझ्यासाठी....
हे घे, बे लीफ ईंग्रजीत

मराठीत, तमाल पत्र. मसाल्याचे पान.
मसाले भातात घालतात ते.. आणि बरेच पदार्थात घालतात. घरचा मसाल्याचा डबा बघ आईचा. मग कळेल.

मस्त वाटत आहेत बिस्किटं. चहाबरोबर खायला मस्त लागतील.

ओव्हन नसेल तर काय करायचे? (अजून एक प्रश्न? :))

सगळ्यांचे धन्यवाद Happy

मंजूडी
कणकेची मैद्याइतकी खुसखुसखुशीत होत नाहीत. वरील प्रमाणासाठी मी अर्धा चमचा सोडा वापरला. बेकिंग पावडरही वापरली तर अजून छान होतील.

झंपी
मठरीमधे कसुरी मेथी असते ना? इथे कसुरी मेथी घातली नाही. चव मठरीसारखी लागत नाही.
बाकी आपल्या आवडीप्रमाणे वेगळे मसाले घालून ट्राय करायला हरकत नाही. Happy

प्राची
नॉनस्टीक पॅनमधे करून बघावे असे मला वाटत होते. माहित नाही होतील का!

पौर्णिमा
फारच सोपी आहे करायला Happy

क्रिम चीज किंवा घट्ट दह्याचं डिप करून स्टार्टर म्हणून मस्त लागतात. कोणी केले तर कसे झाले ते जरूर सांगा.

करके देखना पडेंगा. लाजोची च्यामारी आमच्याकडे बरीच फेमस झाली. आता ही पण मसालेदार बिस्कीटं करणार.

Pages