श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग २

Submitted by पुरंदरे शशांक on 18 November, 2013 - 02:26

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग २

नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत
तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत

स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष न मावे
म्हणूनि वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे

अशा अतिशय सार्थ शब्दात पांवसच्या स्वामी स्वरुपानंदांनी माऊलींचे सुरेख वर्णन केले आहे. माऊली हे योग्यांचे योगी, विरक्त, तत्वज्ञ, संतश्रेष्ठ, गुरुंचे गुरु, सत्कविवर इतकेच काय प्रत्यक्ष भगवंतच....

अशा या अतिशय पवित्र माऊलींचे स्मरण करायचे ते ज्ञानेश्वरी वाचून, ज्ञानेश्वरी अभ्यासून .....
ज्ञानेश्वरीच्या पवित्र ओव्या वाचताना आपले अंतःकरण भरुन येते याचे कारण हे एका महाभागवताचे शब्द आहेत. एका योगेश्वराच्या, ज्ञानियाच्या ठिकाणी असलेला भक्तिभाव यात काठोकाठ भरलेला आहे.

तत्कालिन समाजाने या सर्व भावंडांना संपूर्णतः बहिष्कृत केले, त्यांच्या मात्यापितरांना देहदंडाची शिक्षा सुनावली, माऊलींची व त्यांच्या भावंडांची कुचेष्टा -अवहेलना केली - आणि तरीही या महापुरुषाच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात या समाजाबद्दल कटुतेचा एक शब्दही नाही. एवढेच नव्हे तर या समाजाबद्दल अपरंपार प्रेम व करुणाच भरुन वहाते आहे. यामुळेच ते संपूर्ण जगाची माऊली म्हणून ओळखले जातात.

ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रुप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारिली ॥४॥
श्रवनाचे मिषें बैसावें येउनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥ ----संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज ||

कैवल्याचा पुतळा | प्रगटला भूतळा | चैतन्याचा जिव्हाळा | ज्ञानोबा माझा || --शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज ||

ज्ञानियांचा राजा | गुरुमहाराव | म्हणती ज्ञानदेव | तुम्हा ऐसे || ---- जगद्गुरु श्री तुकाराम महाराज ||

खरोखर, गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वरमहाराजांनीच. भारतीय युद्धामध्ये परमात्मा पीतांबर नेसून, अर्जुनाच्या रथावर बसून, रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले. पुढे हजारो वर्षांनी, भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय. त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे. - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज.

ग्रंथ नव्हे कादंबरी हा मनरंजनाची | सबळ पुण्ण्य बुध हो ज्याचे तोची हिला वाची | ---- श्री दासगणू महाराज, श्री ज्ञानेश्वरी संदर्भात.

स्वामी स्वरुपानंदांचे सद्गुरु स्वामी गणेशनाथमहाराज हे ज्ञानेश्वरीला इतका पवित्र ग्रंथ मानत की पूजा वगैरे झाल्यावर सोवळ्यातच ते ज्ञानेश्वरी वाचत, इतरत्र कुठेही ज्ञानेश्वरी नेण्याला, वाचायला त्यांचा सक्त विरोध असे.

माधानचे सुप्रसिद्ध संत गुलाबरावमहाराज - हे अंध असले तरी प्रज्ञाचक्षु होते. त्यांच्या दर्शनाला जो कोणी येईल त्याचे हात हातात घेत व लगेच त्याचे नाव सांगत. असे हे गुलाबरावमहाराज प्रकांडपंडित ही होते. त्यांच्याबरोबर कायम एक मोठी पेटी असायची - पुस्तकांची -त्यात विविध विषयावरची पुस्तके -ती सगळी महाराजांनी दुसर्‍याकडून वाचून घेतलेली - पण कुठल्या पानावर काय लिहिले आहे हे महाराज क्षणार्धात सांगू शकत. तत्कालिन अनेक विद्वान्/पंडित्/शास्त्रज्ञ यांजबरोबर वादविवादही करायचे, त्यांना वादात हरवायचे....... असे हे महाराज मधुराभक्तीचे अधिकारी होते - ते स्वतःला श्रीकृष्णपत्नी म्हणवून साडी वगैरे नेसून श्रीकृष्णाची पूजाअर्चा करायचे (कात्यायनीव्रत)... याचबरोबर ते स्वतःला ज्ञानेश्वरकन्यका म्हणवून घ्यायचे - इतके माऊलीप्रेम...... ते जेव्हा आळंदीला जायचे तेव्हा जसजशी आळंदी जवळ यायची तसतसे ते इतके कासाविस व्हायचे की वेशीपासून बैलगाडीतून उडी मारुन धावत सुटायचे - माऊली, माऊली हाक मारत - ते थेट समाधीला मिठी मारेपर्यंत...... मगच शांत व्हायचे....
त्याकाळातले एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व - श्री. ल. रा. पांगारकर हे महाराजांच्या अगदी जवळचे. ते एकदा महाराजांबरोबर आळंदीला गेले होते- माऊलींना अभिषेक करायचा म्हणून सर्व साहित्य घेऊन पांगारकर पूजेला बसले - शेजारी महाराज बसलेले. पांगारकरांचे ते दूध-दही -पंचामृत समाधीवर हाताने पसरवणे चालू होते - हे करताना त्यांच्या बोटातील अंगठी समाधीवर घासल्याचा सूक्ष्म आवाज झाला मात्र - महाराज कळवळून ओरडलेच जवळजवळ - अरे पांगारकर, ते बोटातले अंगठ्या, सल्ले फेकून दे बरं आधी - माऊलींच्या अंगावर किती ओरखडे उठताहेत........

एका महापुरुषांच्या (स्वामी स्वरुपानंदांचे उत्तराधिकारी) समवेत आळंदीला माऊलींच्या दर्शनाचा योग मला आलेला होता. समाधि-दर्शनाच्या आधी हरिपाठाचे वाचन, काही काळ ध्यान, ज्ञानेश्वरी वाचन असे सारे यथास्थित व्हायचे व मगच भावपूर्ण अंतःकरणाने समाधीचे दर्शन असे सगळे ते असायचे.
ते महापुरुष म्हणत - "पटकन दर्शन व मग निवांतपणे फराळ - हे असले काय उपयोगाचे ? माऊलींच्या दर्शनाला जायचे तर आपली काही तयारी नको ? माऊलींचेच ग्रंथ वाचून मन निर्मळ, शांत, प्रसन्न झाले की मग दर्शन घ्यायला आपण काहीबाही पात्र झालो"

अशा अनेक संत-महात्म्यांना जसे माऊलींबद्दल अतीव प्रेम, आदर, श्रद्धा आहे तसेच सर्वसामान्यांनाही आहे, इतकेच काय अगदी तिर्‍हाईत, अनोळखी वाटणार्‍या परदेशी मंडळींनाही आहे -------
ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या जमान्यातील दूरदर्शनवर मी पाहिलेला एक प्रसंग. एका परदेशी माणसाची मुलाखत घेतली जात होती. तो परदेशी, गोरा इसम बर्‍यापैकी मराठी बोलत होता.

मुलाखतकार : तुम्ही महाराष्ट्रात कसे आलात ?

परदेशी इसम : काही वर्षांपूर्वी संशोधनाकरता मी आफ्रिकेच्या जंगलात गेलो होतो. तिथे मला डायरियाचा जबरदस्त त्रास झाला. अनेक वेगवेगळी औषधे घेऊनही काही फरक पडेना. अशात माझ्या एका भारतीय मित्राने मला आयुर्वेदिक वैद्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या आयुर्वेदिक औषधांनी मी पूर्ण बरा झालो. मग पुढे हा आयुर्वेद काय आहे हे शिकण्यासाठी मी भारतात आलो आणि आता पुण्यात एका वैद्यांकडे आयुर्वेदाचे शिक्षण घेत आहे.

मुलाखतकार : तुम्ही जगभरात अनेक ठिकाणे फिरलेले दिसता - कुठे कुठे गेला होतात, कुठली ठिकाणे तुम्हाला विशेष आवडली ?

परदेशी इसम : मी जगभरातल्या सर्व प्रमुख, मोठ्या मोठ्या शहरांमधे फिरलो आहे, आफ्रिकेतील जंगले, वाळवंटे तुडवली आहेत. अमेरिका, युरोप, आशियातील जवळ जवळ सर्व मोठी शहरे मी पाहिली आहेत, पण माझे सगळ्यात आवडते ठिकाण आळंदी. इथे पुण्याजवळची जी आळंदी आहे ती.., (हसत हसत) ....ती चोराची आळंदी नाही बरं का ? माऊलींची आळंदी.....

मुलाखतकार : (अतीव आश्चर्याने) माऊलींची आळंदी ? ती का आवडते तुम्हाला ?

परदेशी इसम : का म्हणजे ? अहो, प्रत्यक्ष माऊलीच आहे ना तिथे..
एवढे म्हणून त्या परदेशी इसमाने तिथल्या तिथे दोन्ही हात जोडून माऊलींच्या नावाचा जयघोष केला...

हे सगळे पहात असताना मी विचार केला की कोण हा परदेशी इसम ? काय याला माऊलींचे चरित्र माहित असणार ? काय याचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास असणार ? पण याला माऊलींचे इतके प्रेम कसे काय ?
आणि माझ्या लक्षात आले आईबद्दल कुठल्याही लेकराला प्रेम वाटणारच की.... त्यासाठी आईची कुठली भाषा वगैरे कळण्याची गरज असते का ? आणि असलीच आईची भाषा तर ती फक्त प्रेमाची भाषा आणि लेकराला ती कळणारच की....

........अशी ही लोकोत्तर माऊली.

आपल्याला मराठी भाषा लिहिता वाचता येते हे आपले केवढे भाग्य - कारण याच भाषेत माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांचे अभंग आहेत, समर्थांचे सर्व वाङ्मय आहे.....

अशा माऊलींची ज्ञानेश्वरीची एक जरी ओवी कोणी ऐकली, वाचली वा म्हटली तरी तो धन्यच झाला.

कां फेडित पाप ताप | पोखीत तीरींचे पादप | समुद्रा जाय आप | गंगेचें जैसें ||१९९-अ. १६||
(पोखीत = पोषण करणे ; पादप = वृक्ष ; आप = पाणी)
कां जगाचें आंध्य फेडित | श्रियेचीं राउळें उघडित | निघे जैसा भास्वत | प्रदक्षिणे ||२००||
(आंध्य = काजळी, अंधार ; श्रिया = लक्ष्मी, भास्वत = सूर्य)
तैसीं बांधिलीं सोडित | बुडालीं काढित | सांकडी फेडित | आर्तांचिया ||२०१||
(साकडी = संकट, अडथळे, आर्त = दु:खी)
किंबहुना दिवसराती | पुढिलांचें सुख उन्नति | आणित आणित स्वार्थीं | प्रवेशिजे ||२०२||
(पुढीलांचे = दुसर्‍याचे)

परमपवित्र गंगामैया ही तिच्याठिकाणी सुस्नात होणार्‍या भाविकांचे पाप-ताप दूर करते, तसेच तीरावरील सर्व वृक्षांचे संवर्धनही करते. सूर्य देव उगवताक्षणी जगाचा अंधार दूर होतो, सूर्यविकासिनी कमळे उमलतात - तसेच संत महात्म्यांचे जीवन केवळ दुसर्‍यासाठीच असते. अनेक बद्ध जिवांना ते सोडवतात, संसारात बुडालेल्यांना हात देतात, आर्तांची संकटे दूर करतात - रात्रंदिन दुसर्‍यांच्या सुख-उन्नतीसाठी जगणे हाच संतांचा निजस्वार्थ होय ......

या सारख्या ओव्या नुसत्या वाचल्या तरी किती प्रसन्न वाटते - अशा ओव्या वाचता वाचताच त्यांचा अर्थ कळू लागेल - ते शब्द आपल्या वाणीत बसून जातील आणि कधी भाग्याने ते आठवले तर माऊलींच्या प्रेमाने नेत्र भरुन येतीलच येतील.....

------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/46338 - श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग १

http://www.maayboli.com/node/46475 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ३

http://www.maayboli.com/node/46591 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ४
------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -

१] http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/abhang/svarup/

२] http://sanskritdocuments.org/marathi/

३] http://www.gharogharidnyaneshwari.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा शशांकजी, अनेकानेक धन्यवाद तुम्हाला. तुम्हाला खूप आध्यात्मिक माहिती आहे आणि ती इथे शेअर केलीत, खूप छान वाटले, असेच शेअर करा. खूपजणांना आवडेल.

स्वामी स्वरूपानंद यांचे अनेक भक्त आहेत पुण्यात, त्यांचा संप्रदाय आहे, माझा एक शाळेतला मित्र पुण्यात असतो, तो भक्त आहे त्यांचा म्हणून मला माहिती. ( हे अवांतर लिहिले ).

वा शशांक,
मला आळंदीपेक्षा नेवासे जास्त आवडते. आता जरा मोठे देऊळ झालेय. पण तो खांब अजून तसाच आहे.
दुर्गा भागवतांनीही त्यावर एक लेख लिहिला होता. ( पैस )

दिनेशदा, मलापण आळंदी आणि नेवासे दोन्ही आठवले शशांकजींनी लिहिलेले दोन्ही भाग वाचतांना.

शशांकजी,
उत्तम. खुपच छान.

"आपल्याला मराठी भाषा लिहिता वाचता येते हे आपले केवढे भाग्य - कारण याच भाषेत माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांचे अभंग आहेत, समर्थांचे सर्व वाङ्मय आहे....." - काय लिहिलेत Happy

गुलाबरावमहाराजांचा एक ग्रन्थ आहे - संप्रदाय सुरतरु. तो कुठे मिळु शकेल?

शशांकजी , मिस केला होता हा धागा. उत्कट संवादाच्या वाटेने हे लिखाण चाललं आहे व वाचताना प्रसन्नतेचा अनुभव देतं आहे. स्वामी स्वरूपानंदांचे,गुलाबराव महाराजांचे उल्लेख व अवतरणे लेखाला एक वेगळेच परिमाण देणारे . लेखन शुभेच्छा ..

सर्व माऊली भक्तांना सप्रेम नमस्कार .....

गुलाबरावमहाराजांचा एक ग्रन्थ आहे - संप्रदाय सुरतरु. तो कुठे मिळु शकेल? >>> आकाश नील, मला माहित नाही हो...