माझ्या मुलीच्या पुढील दातांमधे बरीच फट होती तसेच दातही थोडे पुढे होते. ती ३ री मधे असताना आम्ही कोथरुडच्या एका सुपर प्रसिद्ध ऑर्थोडोंर्टीस्टकडे उपचाराकरता गेलो. त्यावेळेस ती (मुलगी) ट्रीटमेंटसाठी घाबरत होती कारण ह्या प्रकारात खूप दुखते हे तिला तिच्या मैत्रिणींनी सांगितले होते. आम्ही डॉ. ला दाखवल्यानंतर डॉ ने, हे लहान वयातच केले तर बरे होईल असे सांगितले व त्यावेळची ट्रीटमेंटची किंमत सांगितली. (२००३ साली संपूर्ण ट्रीटामेंटाचे १६हजार, १ ह. अॅडव्हान्स व नंतर दर तिने वर्शे ५ हजार प्रमाणे) मुलगी ह्या ट्रीटमेंटसाठी तयार नाहीये त्यामुळे आता कसे करायचे असे आम्ही विचारल्यावर त्यांनी सांगितले की तुम्ही ते काम माझ्यावर सोपवा. मी तिला तयार करून घेईन. आम्ही तयार झालो. मग त्यांनी अॅडव्हान्स रक्कम ५ हजार + १ हजार घेतले व तिला पंधरा दिवसांनी यायला सांगितले. पंधरा दिवसांनी १ तास नं लावून वगैरे त्यांना भेटल्यावर त्यांनी तिला सांगितले, मी तुझ्या मनाविरुद्ध ही ट्रीटमेंट करणार नाही. त्यांनी तिला दात आत वळवल्यावर होणारे फायदे व तोटे सांगितले व विचारले, की आईबाबा किंवा मला न घाबरता सांग की तुला ही ट्रीटमेंट करायला आवडेल का नाही? तिने टिळकांच्या स्पष्टवक्तेपणाने "नाही" असे सांगितले. झाले, पुढची अपॉइंटमेंट्..अजून १५ दिवसांनी. नंतरही तेच्....असे तब्बल ३ वर्षे चालले. आम्ही जायचे, त्यांनी विचारायचे, तिने नाही म्हणायचे त्यांनी ओके म्हणायचे व नंतर आम्ही परत घरी यायचे. (पैसे दिले होते न जाऊन काय करता?) शेवटी तिच्या सहावीत तिने त्यांना "होकार" दिला व तिच्या दातांना क्लीप बसली. त्यावेळेस त्यांनी रिवाइज्ड पैसे सांगितले, की पुर्वी ह्या कामासाठी १६ ह. होते पण आता त्याचीच किंमत २५ ह. झाली आहे. आम्ही मुकाट्याने तयार झालो. तिच्या दहावीत ही ट्रीटमेंट पूर्ण झाली, दात सरळ झाले व क्लीपा निघाल्या. नंतर ते परत पुढे येऊ नयेत म्हणून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे रिटेनर्ससुद्धा ५ह. करून घेतल्या. (रिटेनर्स हा प्रकार जरा विचित्र असतो. म्हणजे त्या घालायल मुलांना आवडत नाही कारण त्याची तार सतत टाळ्याशी असल्याने त्यांना मळमळते व ती घालायचा ते कंटाळा करतात. ) तिने आळस व हट्टीपणा करून ह्या रिटेनर्स वापरल्या नाहीत व तिचे दात एक वर्षात परत पुढे आले. आता हे दात परत आत कसे वळवायचे असा विचार करत आम्ही परत त्या डॉ. न शरण गेलो तेव्हा त्यांनी परत सगळी ट्रीटमेंट करावी लागेल व त्याची सद्ध्याची किंमग ४५ ह असे सांगितले. आम्ही परत आलो कारण आता परत हे सगळे करवून घेण्याइतकी शारीरिक व मानसिकसुद्धा ताकत आमच्यात शिल्लक नाही. पण आता लक्षात येते आहे की, त्यावेळेस तिच्या बरोबर दात सरळ करून घेतलेल्या बर्याच जणांच्या बाबत हे घडले आहे. म्हणजे रिटेनर्स न वापरणे, मग दात परत माघारी येणे हे जर एवढे कॉमन असेल, तर ती ट्रीटमेंट त्यानुसार बदलत का नाहीत? म्हणजे पर्मनंट क्लीप्स हळूहळू काढत मग आवश्यक काळापर्यंत त्या ठेवत का नाहीत? त्याने हा सगळा त्रास व खर्च वाचणार नाही का? आतासुद्धा ह्या प्रकारात परत पहिल्यापसून ही ट्रीटमेंट करावी लागेल व तेवढा खर्च परत येईल हे बरोबर आहे क? कृपया जाणकारांनी प्रकाश पाडावा.
पुढे असलेले दात तार लावून आत वळवणे - उपचाराबद्दल अधीक माहीती हवी आहे.
Submitted by मेधावि on 16 November, 2013 - 22:07
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुमेधा मी डॉ. ना विचारुन
सुमेधा मी डॉ. ना विचारुन सांगेन.
माझी सुध्हा ही ट्रिटमेंट झाली आहे आणि तीही पुण्यातच. माझे दात पुढे वगैरे काहीच नव्हते पण माझे दुधाचे दातच पडले नव्हते आणि मला २ दात नव्हतेच. माझी ही सगळी ट्रिटमेंट ४-५ वर्ष चालु होती. माझी सगळी भिस्त ह्या डॉक्टरांवर होती - डॉ. किरण गद्रे व डॉ. सुनिता गद्रे, डॉ. चारुहास नाईक (हे दोघेही डॉ. करबेळकरांचे क्लासमेट्स आहेत.) व डॉ. साबळे.
डॉ. चारुहास नाईकांचा दवाखाना डेक्कनला रेमंड्सच्या शोरुम समोरच्या बिल्डींगमध्ये आहे. (हल्लीच पुण्यात गेले होते तेव्हा बघितले होते)
डॉ. साबळे हे तर खुपच छान आहेत. त्यांचाही दवाखाना तेव्हा डेक्कनला प्रेस्टिज चेंबर्स मध्ये होता आता मला माहित नाही. तु माहिती काढुन बघ.
ही चर्चा मी आजच पाहिली.
ही चर्चा मी आजच पाहिली. ह्यावर अगदी सविस्तर आणि सुसूत्र माहिती आज रात्री बसून लिहीन. खरं तर ह्यासाठी एक वेगळा लेख लिहायचे डोक्यात होते. तो लिहेन तेव्हा लिहेनच पण आत्ता ह्याबाबत इथे नक्की लिहेन.
vel ani varsha....mala
vel ani varsha....mala reasonable kimatit he kam karnare punyatale Drs. have ahet. karan mi already barach kharch already kela ahe tyamule ata navyane ashyach eka navin lubadanarya Dr. chya tavadit sapadayache nahiye.
मी इथे कोणत्याही शहरातल्या
मी इथे कोणत्याही शहरातल्या कोणत्याही डॉ चा रेफरन्स देणे चूक ठरेल.
त्यामुळे ओर्थोडोन्टिक्स किंवा दातांना तारा लावणे ह्याबद्दल थोडी अधिक माहिती देते. ह्यातली काही माहिती तुम्हाला तुमच्या डॉ कडून एइकून माहिती असेल.
मुळात दातांना तारा लावण्याची प्रक्रिया हे चेहर्याची आणि हास्याची सौंदर्य किंमत वाढवणे ह्यासाठी नाही आहे. ही प्रक्रिया आहे तोंडातला बिघडलेला चावा सुधारण्यासाठी.
आपण तोंड बंद करतो तेव्हा आपले पुढचे दात एक्मेकावर बसत नाहीत तर वरचे दात पुढे आणि खालचे त्याच्या मागे असे असतात. पुढच्या दातांनी योग्य चाव्यासाठी - खरे तर वस्तू तोडता यावी म्हणून त्या दातांचा कोन काय असावा, वरचा जबडा खालच्या जबड्याच्या किती पुढे असवा, वरची खालची पहिली परमनंट दाढ कशी बंड व्हावी ह्यासाठी काही ठोकताळे असतात. हे जबड्याचे नाते जर चुकले असेल तर दाताने अन्न चावण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो, अन्न चावायला वेळ लागतो, दात लवकर झिजतात, त्या दातात अन्नकण अडकून दाताला किड लागते. हे सगळे त्रास कमी व्हावेत म्हणून मुळात दाताची ट्रीट्मेण्ट करायची असते. फटी असलेल्या दातांना तारांच्या ट्रीटमेंटची गरज आहेच असे नसते.
कधी कधी सरळ व्यवस्थित जागी असलेल्या दातात, योग्य ठिकाणी बंद होणार्या दातात जबडा मोठा आणि दात लहान ह्या कारणाने नैसर्गिक फटी असतात. उदा - लहान मुलांचे दात. चार वर्षानंतर मुलाम्च्या दातात फटी दिसू शकतात कारण जबड्याची वाढ होत असते पण दात तेवढ्याच आकाराचे असतात. त्या फटी बंद करायला तारांची ट्रीट्मेंट गरजेची नसते. ह्या फती वयानुसार बंदसुद्धा होतात.
मुलांना ताराम्ची ट्रीटमेण्ट करायची की नाही ह्याचा पहिला अंदाज वयाच्या आठव्या वर्षी घेता येतो जेव्हा त्यांच्या पहिल्या चारही दाढा पूर्णपणे आलेल्या असतात. आम्ही मजेने ह्या दाढांना तोंडतले राजे म्हणतो कारण ह्या दाढांचं महत्व तोंडात अनन्य साधारण असतं. ह्या दाढा एक्मेकावर कशा बंद होतात हे पहिल्यावरच तुमचे डेंटिस्ट ठरवतात की त्या मुलाला / मुलीला तारांच्या ट्रीटमेंटची गरज आहे का.
त्यामुळे तुम्हाला असे वाटले की माझ्या मुलाला/ मुलीला तारांच्या ट्रीटमेंटची गरज असू शकते तर सर्वात प्रथम तुमच्या फॅमिली डेंटिस्टचा सल्ला घ्यावा. तुमचा फॅमिली डेंटिस्ट तुम्हाला ओर्थोडोंटिस्टकडे रेफरन्स देतो. डायरेक्ट ओर्थोडोंटिस्टकडे शक्यतो जाऊ नये कारण दाताला लावणार्या तारांसोबत दातांची पूर्ण काळजी घेणे हे तुमच्या डेंटिस्टचे काम आहे ऑर्थो. चे नाही. ऑर्थो कडे ट्रीटमेंट चालू करण्यापूर्वी तुमचा फॅमिली डेंटिस्ट पेशंटचे कौन्सेलिंग करणे पेशण्ट मेंटली, फिझिकली आणि हॅबिच्युअली ट्रीटमेंट साठी तयार आहे की नाही हे पाहातो. मग तोंडाचा पूर्ण एक्स रे काढला जातो. त्यानंतर ऑर्थो डॉ सोबत कन्सिल्टिंग होते, ट्रीटमेंट प्लान ठरतो. काही ऑर्थोडॉ ट्रीटमेंट प्लान देण्यापूर्वीच सगळी किंवा पार्शल फी घेतात. काही ऑर्थो.डॉ फक्त कन्सल्टींग फी घेतात. काही ऑर्थोडॉ जर ते तुमच्या फॅमिली डॉ च्या क्लिनिकमध्ये कन्सल्टंट म्हणून येत असतील तर कन्सल्टींगसाठी कोणतीही फी घेत नाहीत. (असे फार कमी जण करतात.)
ट्रीटमेण्ट प्लान ठरल्यानंतर ऑर्थो ट्रीटमेण्टसाठी दात तयार करणे हे कामही फॅमिली डेंटिस्टचे असते. ऑर्थो ट्रीटमेण्ट पूर्वीच्या तयारी मध्ये पुढील गोष्टी येतात.
१. ऑर्थो ट्रीटमेंट म्हणजे काय केले जाते, काय होते, ट्रीटमेण्ट पूर्ण कधी होते. पुन्हा दात पुढे येऊ नयेत ह्यासाठी काय करायचे ह्याची पूर्ण माहिती देणे.
२. ट्रीटमेंटचा पूर्ण खर्च सांगणे. ह्यात उपदाढ काढणे, ओर्थोसाठी दात तयार करण्याचा खर्च, ब्रेसेसचा खर्च, ऑर्थोनंतरच्या रिटेन्शनचा खर्च - फिक्स्ड रिटेन्शनची गरज पडल्यास त्याचा खर्च जास्त कमी होईल का, ओर्थोनंतरच्या क्लिनिंगचा खर्च हे सगळे त्यात आले पाहिजे.
३. दाताला कीड लागली असेल तर ती साफ करून खड्डे भरणे.
४. दात सडला असेल - कीड मुळापर्यंत गेली असेल तर रूट कॅनाल करणे.
५. ओरल प्रोफायलॅक्सिस करणे- म्हणजेच दात साफ करणे. दातात कुठेही प्लाक टार्टर जमा असेल ते स्केलिंगने काढून दात पॉलिश करणे.
६. हिरड्या सुजल्या असतील तर त्या साफ करने आणि त्या नॉर्मल होईपर्यंत पेशण्टची ऑर्थो ट्रीटमेंट सुरू करू न देणे.
७. ज्या उपदाढा काढायची गरज असेल त्या काढणे आणि ती जखम व्यवस्थित भरली गेली आहे की नाही हे पाहाणे. (दाढा काढल्या जात नाहीत, उपदाढा काढल्या जातात. सुळ्यांच्या लगेचच मागच्या छोट्या दाढा. जर कोणी दाढा किंवा सुळे काढायचा ऑप्शन दिला तर ताबडतोब डेण्टिस्ट बदला.)
८. तारांच्या ट्रीटमेंटमध्ये किती दुखते, का दुखते, ती दूख किती काळ राहाते, ट्रीटमेंट चालू असताना घ्यायची काळजी, खायचे पथ्य, तारांच्या ट्रीटमेण्ट चालू असण्याच्या काळात दात कसे साफ ठेवायचे, त्याप्रकारे दात साफ ठेवले आहेत की नाही ते पाहाणे, ट्रीटमेंट संपल्यानंतर घेण्याची दाताम्ची काळजी, रिटेन्शन प्लेट, रिटेन्शन प्लेटचे तोटे ह्यासगळ्याची माहिती देणे
९. तारांची ट्रीटमेण्ट संपल्यानंतरही दात जागेवर आहे का ती ट्रीटमेण्ट रिलॅप्स होते आहे हे पाहणे असे असल्यास पुढचा अॅक्शन प्लान ठरवणे.
हे सगळे प्रोटोकॉल तुमच्या फॅमिली डेंटिस्टने पाळले पाहिजेत. जर तुम्ही फॅमिली डेंटिस्ट च्या रेफरन्स शिवाय ऑर्थोडॉ. कडे गेला असाल तर हे प्रोटोकॉल ऑर्थोडॉ ने पाळले पाहिजेत. जर डेंटिस्टने हे पाळले नसतील तर पेशंट्ला फसवले गेल्याची भावना होणे साहजिक आहे.
जर पेशंट तयार नसेल तर फॅमिली डेंटिस्टकडून रेग्युलर व्हिजिटमध्ये पेशंटचे कौन्सेलिंग होत राहाते. कित्येकदा पालकांना उत्साह असतो मुलांची ट्रीटमेंट करून घेण्याचा पण मुले मानसिकरीत्या तयार नसतात. जर फॅमिली डेंटिस्ट ना वाटत असेल की ही ट्रीटमेण्ट करणे आत्ता करने मस्ट आहे तर ऑर्थो. कडे कन्सल्टिंग करून घ्यावे. मग त्या ट्रीटमेण्ट केल्याचे आणि न केल्याचे प्रोज कॉन्स समजून घेऊन मग निर्णय घ्यावा. शिवाय ऑर्थो ट्रीटमेण्टच्या पूर्वतयारीमध्ये थोडा वेळ निघून जातो त्यात आपले मूल खरच तयार आहे का नाही हेही आपल्याला कळते.
जर पेशंट मेटली तयार नसेल तरही ट्रीटमेण्ट सुरू करू नये. कारण बाकीच्या ट्रीटमेण्टसारखी ही ट्रीटमेण्ट महिन्याभरात संपणारी नाही. ह्यात जर मुलांना कंटाळा आला तर मुले ट्रीटमेण्ट अर्धवट सोडून द्यायचा विचारही करतात. त्यामुळे पेशण्ट मानसिकरित्या तयार असेल त्याच्यात जर अँझायटी, भीती नसेल तरच ही ट्रीटमेण्ट सुरू करावी. बरेचदा सुरुवातीचा मुलांचा उत्साह ट्रीटमेंट अर्ध्यावर येई पर्यंत संपतो, तेव्हा फॅमिली डेंटिस्ट खूप महत्वाची भूमिका बजावतात - कौन्सेलिंग, दातांचा क्लीनअप वगैरे.
वत्सलाचा प्रश्न दाढा का काढाव्या लागतात - जबडा लहान असल्याने दात वेडेवाकडे असल्याने तेच दात जर सरळ रेषेत बसवायचे असतीत तर उपदाढा काढणे मस्ट आहे. अगदी हेल्दी असलेली उपदाढ काढावी लागते तेव्हा वाईट वाटते पण काही दुसरा पर्याय नसतो.
अशोक ह्यांचा प्रश्न - दुधाच्या दातावर ही ट्रीटमेण्ट होऊ शकतच नाही. ही ट्रीटमेण्ट परमनंट दाताम्साठीच असते. केवळ दातात फटी आहेत म्हणून ही ट्रीटमेण्ट करू नये. ही ट्रीटमेण्ट करायची गरज आहे का नाही ह्याचा परामर्ष वयाच्या आठव्या वर्षीच घ्यावा, त्यापूर्वी नाही. (जबड्याची डिफॉर्मिटि असेल तरच त्यापूर्वी दोन तीन डॉ कडून सल्ला घ्यावा). कोल्हापूरमध्ये राजारामपुरी ह्या भागात ह्या ट्रीटमेण्टचा नॉर्मल खर्च २००००-२२००० आहे. जर जबड्यात खूप डिफॉर्मिटि असेल तर खर्च वाढू शकतो. परंतु ट्रीटमेण्ट करायचीच नाही हे ठरवण्यापूर्वी ती का करायची आणि केली नाही तर काय त्रास होईल हे दुसर्या डेंटिस्ट कडून समजावून घ्यावे.
साधना ह्यांचा मुद्दा - ट्रीटमेंट चालू असताना दात थोडे नाजूक असतात. कारण दात हलत असतात. दातांखालचे हाड झिजत असते, पुन्हा तयार होत असते.
नितीनचंद्र - ट्रीटमेण्ट झाल्यावर पेरू किंवा चिक्की हे पदार्थ खाण्यास सर्वसाधारणपणे हरकत नसते. तुम्हाल डॉ ने सांगितले आहे का खाऊ नका म्हणून.? तुमच्या पुढच्या दातांवर कॅप बसवली आहे का?
काही मुलांची ट्रीटमेंट लवकर सुरू करावी लागते कारण त्यांचा जबडा लहान असतो, पुढे मागे असतो. तो जबडा मायक्रोइम्प्लांटस घालून थोडा मोठा करावा लागतो, जागेत आणावा लागतो, हे काम सगळे परमनंट दात येण्यापूर्वी करावे लागते. त्यामुळे ही ट्रीटमेण्ट ८-१३ वयात होते. अक्कल दाढा सोडून बाकीचे सगळे परमनंट दात १३व्या वर्षापर्यंत येतात. ज्या मुलांना केवळ दात सरळ करून हवे असतात जबडयाची हालवा हालव करायची नसते त्यांची ट्रीटमेण्ट तेराव्या वर्षानंतर केलेली चालते. (वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षीसुद्धा ही ट्रीटमेण्ट करता येते.)
ब्रेसेस काढल्यानंतरही दातांच्या हालचाली चालू असतात. तेव्हा दाताची पुन्हा हालचाल होऊन ते नवीन जागेवरून हलू नयेत म्हणून रिटेन्शन प्लेटची गरज असते. प्रत्येक डॉ स्वत:च्या अनुभवानुसार आणि पेशंटच्या गरजेनुसार रिटेंशन प्लेट बनवून देतो. काही प्लेटस पूर्ण टाळू झाकत नाहेत. काही प्लेटस पातळ पण मजबूत मटेरिअलच्या असतात. काही प्लेटस पूर्णपने टाळू झाकतात, काही जाड मटेरिअलच्या बनवल्या जातात आणि त्या कधी कधी रफ असतात (ह्याचे कारण मात्र डॉ चा चॉईस हेच आहे. पूर्न टाळू झाकणे, जाड मटेरिअल, रफनेस ह्याची गरज नसते.) कधी कधी रिटेन्शन प्लेट न देता, पेशण्टच्या गरजेनुसार - सवयींनुसार फिक्स्ड रिटेशन दिले जाते, दाताच्या आतल्या बाजूने ते लावले जाते. परंतु जर जबडा वाढवण्याची , हलवण्याची ट्रीटमेण्ट झाली असेल तर रिटेशन प्लेटच दिली जाते. आणि ती वापरली नाही तर ट्रीटमेंट रिलॅप्स होते. कधी कधी रिलॅप्स इतके जास्त असते की दाताची ओरिजिनल स्थिती परवडली असे वाटते. अशा स्थितीत दात आल्यास करेक्शन ट्रीटमेण्टचा खर्च वाढतो. कधी कधी थोडीशीच हालचाल झाल्याने थोड्याश्याच खर्चात दात चांगल्या स्थितीला आणता येतात. ह्याचकरता रोज रिटेन्शन प्लेट वापरण्यासोबत फॅमिली डेंटिस्टकडे रेग्युलरली जाऊन चेकप करून घेणे महत्वाचे असते. रिटेन्शन प्लेट लावल्यावर काही मुलांना उलटीची भावना होऊ शकते, तेव्हा रिटेन्शन प्लेट न लावणे हा त्यावर उपाय नाही. त्याऐवजी डॉ कडे जाऊन रिटेन्शन प्लेटला पर्याय शोधावा.
ही ट्रीटमेट सुरू होण्यापूर्वी तोंडाचा पूर्ण एक्स रे काढला जातो - ओपीजी - ऑर्थोपेंटोग्राम. तसेच दातांचे वेगवेगळ्या कोनातून फोटो काढले जातात. बरेचदा केस सुरू होण्यापूर्वी दाढा एक्मेकावर कशा बंद होतात, डिफॉर्मिटि नक्की कुठे आहे, हे अभ्यासण्यासाठी तोंडाचे माप घेऊन मॉडेल बनवले जाते ज्यावर तुमच्या दातांची प्लेसमेण्ट कशी आहे, कोणत्या ट्रीटमेण्टचा सल्ला दिला जात आहे व का हे सगळे समजावले जाते. ट्रीटमेंट संपताना पुन्हा एकदा दातांचे वेगवेगळ्या कोनातून फोटो काढले जातात. ओपीजी, हे सारी अधी आणि नंतरचे फोटोज डो स्वतःकडे जपून ठेवणार आहेत की नाही ह्याची खात्री करून घ्यावी. शिवाय हे तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवावे. अभ्यासण्याचे मॉडेल सुध्दा डॉ बर्याचदा तुम्हाला देतात तेही जपून ठेवावे.
आता प्रश्न येतो ही ट्रीटमेण्ट इतकी महाग का असते. मुळात ऑर्थो ट्रीटमेंट करता येणारे सगळे मटेरियल महाग असते. त्यातले मोस्ट सगळे मटेरियल इम्पोर्ट होते. शिवाय ऑर्थो मध्ये दोन पद्धतीच्या ट्रीटमेंट असतात एक जुनी ट्रीटमेण्ट ज्यात कमी कष्ट, कमी मटेरियल, कमी खर्च येतो पण ती ट्रीटमेण्ट रिलॅप्स होण्याचे चान्सेस दुसर्या ट्रीटमेण्ट पेक्षा जास्त असतात.
आजकाल बाजारात सिरॅमिकचे ब्रेसेस जे दाताच्या रंगाचे आहेत ते आले आहेत. ते वापरायचा निर्णय घेतल्यास त्याची ट्रीटमेण्ट कॉस्ट जास्त असते. शिवाय, काही जण ब्रेसेस बाहेर दिसू नयेत म्हणून दाताच्या आतून लावून घेतात त्याचीही किंमत जास्त असते.
सुमेधा - पुण्यात दातांच्या सरकारी इस्पितळात ट्रीटमेण्ट करून घेतल्यास खर्च कमी येईल आणि तिथे खरोखरच खूप चांगली ट्रीटमेंट होईल. तुम्ही अजिबात लुबाडले जाणार नाही. मुंबईत असे सर्वात चांगले हॉस्पिटल्स म्हणजे - नायर डेण्टल. इथले डॉ काम रगडून इतके चांगले झालेले असतात की त्यांच्याकडून फार फार कमी चुका होतात. फक्त आपण खूप प्रश्न विचारत राहायचे. (आता तर तुम्हाला सगळेच माहित आहे.) पुण्यातसुद्धा गव्हर्न्मेंट डेंटल कॉलेज आहे असे मला वाटते. त्याबद्दल मी चौकशी करून सांगेन. तुम्हाला प्रायव्हेट डॉचाच रेफ हवा असेल तर थोडा दिवस द्या मी शोधून संपर्कात सांगते.
ह्याहून महत्वाचे गोष्ट म्हणजे हे सुपर स्पेशालिटि काम आहे, ह्याकरता खूप जास्त अभ्यास करावा लागतो. याशिवाय एक मुद्दा आपण लक्षात घेत नाही तो असा की डॉच्या शैक्षणिक फीज इतक्या वाढल्या आहेत की ट्रीटमेण्ट फी त्याप्रमाणात वाढते.
अवांतर --- तुमचे डॉ कुठे प्रॅक्टिस करतात, त्यांचे पेशण्टस कोणत्या आर्थिक स्तरातून येतात त्यावरही त्या डॉ ची फी अवलंबून असते. (ऐश्वर्या राय सुश्मिता सेन अंबानी ह्यांची ट्रीटमेण्ट करणार्या डॉ ची फी जास्त नसणार का?) तुम्ही उच्च्भ्रू भागातल्या डॉ कडे गेलात तर त्यांची फी इतर डॉ पेक्षा जास्तच असणार. --- अवांतर बंद
साधना - किडलेली दाढ काढून घेऊ नकोस, रूट कॅनाल करून घे, त्यावर कॅप बसवून घे. नैसर्गिक दात टिकवणे जास्त महत्वाचे.
मला असे वाटते की वर विचारलेल्या किंवा चर्चीलेल्या सगळ्या प्रश्नांची तउत्तरे दिली आहेत, अजूनही कोणालाही अजून काहीही प्रश्न विचारायचे असतील तर मी उत्तरे द्यायला तयार आहे.
vel, tari maza prashna
vel, tari maza prashna uratoch....he protocols palanare Drs. punyat ahet ka?
पुण्यात माझ्या माहितीतले आणि
पुण्यात माझ्या माहितीतले आणि विश्वासातले कोणीच डेंटिस्ट नाहीत. अधिक माहिती साठी मी तुम्हाला संपर्कातून मेल केली आहे.
माझ्या मुलीला करावे लागले ,
माझ्या मुलीला करावे लागले , दात पुढे म्हणून नाही तर डिप बाईट होता म्हणून.
जसे वरती "वेल" नी लिहिलेय तसे डीप बाईट असेल तर करणे चांगले. ती चावून अन्न खायचीच नाही. मग अदृश तारा लावून घेतल्या. मग रीटनर्स लावून घेतले ३ वर्षे. आता एकदम नीट आहे. हे अमेरीकेत केले.
वयाच्या १७-१८ पर्यंत जबडा पुर्ण होत असतो असे डॉक ने सांगितले तेव्हा तारा जरी १३ वर्षी बसल्या तरी कमीत कमी ३-४ वर्षे रीटेनर्स बसवावे लागतात जशी दाताची गरज असेल तसे. ज्यांचे दात/दाढा काढले असतात, त्यांना परत दात सरकणे वगैरे होते. व त्रास होतो पण केस टू केस वर आहे.
पुन्हा काहींना म्हातारपणी रीटेनर्स लाग्तात कारण आपला जबडा बदलतो.
Pages