हेही करून दमले तेही करून दमले

Submitted by बेफ़िकीर on 11 November, 2013 - 10:19

हेही करून दमले तेही करून दमले
वणवे मनातले ना काही करून शमले

मागे बघून वळणे नाही अपेक्षिले मी
मागे वळून बघणे हेही तुला न जमले

विरहातल्या अबोल्या घे धन्यवाद माझे
आले समोर तेव्हा दोघे किती वरमले

देवास निर्मिणे ही माणूसकीच आहे
माणूस होउनी ते देवासमोर नमले

नव्हतो कधी तिचा जी नव्हती कधीच माझी
माझे न मन करमले ना मन तिचे करमले

ज्याच्या नजाकतीवर केले प्रहार त्यांनी
तो 'बेफिकीर' आहे कळताच ते शरमले

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मक्ता धारदार !

सगळी गझलच कॉपी -पेस्ट करावी लागेल ..सगळेच आवडलेत शेर ..वरमले थोडा कमी आवडला .बाकी भन्नाट !

जियो !!

बेफी सगळे शेर सुंदर आहेत.
विरहातल्या अबोल्याचा आणि शेवटचा शेर एक नंबर..

पण
नव्हतो कधी तिचा जी नव्हती कधीच माझी
माझे न मन करमले ना मन तिचे करमले
हा शेर अजिबात कळला नाही.

आणि देवास निर्मिणे ही माणुसकी म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला?

नव्हतो कधी तिचा जी नव्हती कधीच माझी
माझे न मन करमले ना मन तिचे करमले

विचार चांगला आहे, पण वरचे शेर वाचतानाची सहजता इथे कमी होत आहे.

गझल उत्तम..

"देवास निर्मिणे ही माणूसकीच आहे
माणूस होउनी ते देवासमोर नमले"

"ज्याच्या नजाकतीवर केले प्रहार त्यांनी
तो 'बेफिकीर' आहे कळताच ते शरमले" >>> हे दोन शेर सर्वात विशेष वाटले.
त्यातही 'बेफिकीर' हा खासच.

बेफिजी,
गझल फार सुंदर आहे नेहमी प्रमाणे, सर्व शेर आवडले फक्त
"नव्हतो कधी तिचा जी नव्हती कधीच माझी
माझे न मन करमले ना मन तिचे करमले" हा वाचताना अडखळलो, करमले, करमले दोन वेळा येण्या ऐवजी 'रमले आणि करमले आले तर बरे वाटेल (वैयक्तिक मत )
सुचने बद्दल क्षमस्व!