मासे ४६) नारबा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 October, 2013 - 04:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नारबा मासा
हळद अर्धा चमचा
१ ते २ चमचे मसाला
चवीनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
आवडत असल्यास लसुण पाकळ्या ठेचून

क्रमवार पाककृती: 

नारबा मासा किंवा त्याच्या तुकड्या कोळणीकडूनच कापून आणायच्या. (आख्खा आणुन घरी कापण्याचा खटाटोप मी फोटो काढण्यासाठी करते. :स्मित:)
तुकड्यांना मिठ, मसाला, हळद लावून घ्या.

तवा चांगला गरम करा (अन्यथा तुकड्या चिकटतील) त्यावर शॅलो फ्राय करण्यासाठी तेल टाका. आता त्यावर जर आवडत असेल तर लसुण परवा. नंतर तुकड्या तळण्यासाठी सोडा.

५-६ मिनीटे मिडीयम गॅस वर शिजवून पलटवा व ती ही बाजू ४-५ मिनीटे शिजवून तुकड्या खरपूस तळून घ्या.

आता कोणी तुम्हाला विचारल की आज जेवायला काय? उपवास का? तर सांगा ना र बा Lol

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

नारबा माश्याला सौम्य खवले असतात. मध्ये काटा. साधारण जिताडा, सुरमई ह्या गटामध्ये बसणारा. चवीला चांगला लागतो. रस्साही चांगला होतो.

लसूण तेलात तळल्याने तुकड्यंना लसूण फ्लेवर येतो थोडा. लसुण नाही टाकला तळलेल्या माश्यांना तरी चालतो. काही जण आल-लसुण पेस्टही मुरवतात व वरुन पिठ किंवा रवा लावतात. मासे कसेही केले तरी चविष्टच लागतात. Lol

इतर माश्यांच्या रेसिपीस - http://www.maayboli.com/node/23836

माहितीचा स्रोत: 
कोळीण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागुली, अगं माशांची किंमतही सोबत टाकत जा..

हल्लीच्या किंमती ऐकुन चक्कर यायची वेळ येते. फुटभर लांबीच्या रावसाला (दोक्यापासुन शेपटापर्यंत Sad Sad ) गेल्या आठवड्यात ३२० रुपये देऊन घरी आणले. दोन वेळेला केले तर फक्त दोघांनाच पुरेल इतक्याच तुकड्या पडल्या. त्यापेक्षा लहान सुरमई घासाघिस करुन २०० ला घेतली. ती दोघांमध्ये एकाच वेळेला संपली. Sad मासे खायला हवेत हे खरेय पण किंमती बघुन जीव गलबलतो.

जागू, तुझ्या रेसिपी बघून मासे करावेसे वाटतात. तू इतक्या सरळ पद्धतीनी सांगतेस ना की खूप सोपे वाटते.
पण माझ्या सारखीला ( जिला मासे खाण्याचा सुद्धा अनुभव जास्त नाही) तिला मासे चांगले कसे ओळखायचे ते पण सांग ना.
पुण्यात माझ्या जवळपास १-२ दुकाने आहेत पण तिथे गेले की काही कळत नाही.
इतकेच काय सुकवलेले मासे पण काय बघून घ्यावे हे हि कळत नाही.
जमल तर एखादा वेगळा धागा काढ की मासे बघताना साधारणपणे काय बघावे, कोणते मासे कधी खावे, साफ कसे करावे. अगदी विनंती समज.

नारबाचे डोळे लाल झालेत.
१ मासा दि ड शे रुपयांना????? बापरे! एवढं महाग प्रकरण असतंय होय मासे म्हणजे?

झंपी मासा चांगला आहे चविला >>>> जागू, अगं स्वल्पविराम वगैरे वापरत जा गं Happy झंपी Light 1 Happy

अश्वे.. अगं माझे आई, तु मासेमार्केटात जाऊ नकोसच. उगीच पडशील.

काही मासे नगावर मिळतात तर काही किलोवर. कोळणी दोन्ही प्रकाराने विकतात तर हल्ली दुकानात मिळतात ते किलोवर मिळतात. पण दोन्ही प्रकारे किंमत सारखीच येते जवळपास.. आणि किती रुपये किलो असतात माहिताय? कमीत कमी रु. ४०० पासुन सुरू होतो भाव. पापलेट सरंगा वगैरेंना मी ८०० रुपयेचा भावही पाहिलाय रविवारच्या दिवशी. एकदा रिलायंस फ्रेशमध्ये मोठी कोलंबी ८०० रुपयांना होती आणि लॉब्स्टर्स चक्क रु. ११०० किलो.

साधारण फुटभर मासा आरामात किलोभर भरतो. साफ केला की त्यातला २०-३०% जातो. त्यामुळे साफ केल्यावर भाव केला तर तो अजुन जास्त भरेल...

बापरे! मग आठवड्यातून ३ दिवस मासे खाणार्‍यांना किती खर्च असेल? माझ्या काही मैत्रिणींकडे तर एका दिवशी एक प्रकार नाही चालत, २ प्रकार तरी करावे लागतात. घरी भाजी उगवतात (निदान कार्ली, मेथी, पालक, वांगी वगैरे ) तसा खायच्या माश्यांचा टँक नाही का ठेवू शकत घरी? एक गोड्या पाण्याचा आणि एक खार्‍या पाण्याचा... असे दोन ठेवायचे Uhoh :लोकांना पैसे कसे वाचवता येतील ह्याचा विचार करणारी कोब्रा बाहुली:

जागु धन्यवाद ,
वाट बघतेय. खरच खूप मदत होईल मला
@साधना - म्हणून तर मी जागुला विनंती केली. एवढे पैसे देवून काय घेतोय ते तर कळायला पाहिजे ना.

अश्विनी के (के स्टँड्स फॉर कोब्रा Proud )

जागु ते मास्याच्या किमती लिहायची आयडिया खूप प्रॅक्टिकल आहे नाहीतर माझ्यासारख्या नवशिक्या ग्राहकाला

हातोहात बनऊ पाहतात विक्रेते..

जमल्यास( तुला कंफर्टेबल वाटल्यास) लिहित जा किमती

नेहमीप्रमाणे मस्त्, तोपासु. जागु, मासा कसा कापायचा याची व्हिडीओ ,जमली तर टाकशील का? अगदी आताच नाही पण जमेल तेव्हा.

काल माझी ऑफिसातली एक मैत्रिण सांगत होती की पुण्यात अपोलो थिएटरच्या शेजारी एक छोटी गल्ली आहे, तिथे फिश मार्केट आहे, तिथे अत्यंत फ्रेश आणि स्वस्त मासे मिळतात, शिवाय ते लोक साफ करून कट सुद्धा करून देतात. त्याचे २० रूपये एक्स्ट्रा घेतात. बाहेर ६०० ल मिळणारे मासे तिथे ४००ला च मिळतात असं सांगत होती.

पुण्यातल्या गरजूंनी खात्री करून घेऊन लाभ घेणे. Proud

बाहेर ६०० ल मिळणारे मासे तिथे ४००ला च मिळतात असं सांगत होती.

याला तु स्वस्त म्हणतेस? ते २० रुपये वाला वाक्य डोळ्यासमोर होतं त्यामुळे २० रु.ला,. मासे मिळतात असे वाटलेले.

तसे सगळॅच मासे महाग असतात असे नाही हा.. मांदेलीचा ब-यापैकी वाटा २० रुपयाला येतो सध्या. त्यात बोटभर लांब आणि मस्त जाड १५-२० मांदेली आरामात येतात. बांगडे लहान असतील तर ५० रुपयाला चार, मोठे १०० रुपयाला ५-६ मिळतात. बोंबिलही २० रुपयाला ४-५ असे मिळतात. जागु टाकते ते अगदी लहान मासेही २०-३० रुपये वाटा मिळतात,.

हे ४०० रुपये किलो पासुन सुरू होतात ते नेहमीचे मोठे मासे सुरमई, रावस, रोहु, वगैरे. काल पाहिले रिलायन्स फ्रेशमध्ये, मोठा कटला १००० रुपये किलो, सरंगा ८९० रुपये किलो. अर्थात कटला रोहु वगैरे मी खात नाही पण आता सरंगा ही गेला माझ्या हातातुन.

पुण्यात अपोलो थिएटरच्या शेजारी एक छोटी गल्ली आहे, तिथे फिश मार्केट आहे, - अपोलो च्या शेजारी. नक्की विचार बर कुठे
का कुंभार वाड्या जवळ म्हणतीय
(मासे करायचेच अस ठरवलंय मी आता )

कुंभार वाड्या जवळ म्हणतीय >>>> ती भोई आळी तीथे सकाळी जाणे ताजे मासे स्वस्तात मीळेल
पुण्यात अपोलो थिएटरच्या शेजारी एक छोटी गल्ली आहे ती गणेश आळी तो घाऊक बाजार आहे.

Pages