दुःख!

Submitted by सारंग भणगे on 27 October, 2013 - 02:45

ऐकण्या पुरतेच त्याला चाहते,
दुःख माझे मूक होऊ पाहते.

काळजामध्ये कट्यारी खोवल्या,
भावना रक्तात माझी नाहते.

गर्भ माझा वेदनांनी अंकुरे,
आसवांचे मूल डोळी वाहते.

दु:ख आहे पोरके माझ्यापरी,
प्राण माझा होऊनी ते राहते.

द्रौपदीचा वारसा माझ्याकडे,
पंचप्राणांच्या चुकांना साहते.
------------------------------------
सारंग भणगे (ऑक्टोबर २०१३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गर्भ माझा वेदनांनी अंकुरे,
आसवांचे मूल डोळी वाहते.<<< शेरामधील कल्पना आवडली Happy

दु:ख आहे पोरके माझ्यापरी <<< ओळ छानच आहे
प्राण माझा होऊनी ते राहते<<< होनी - किरकोळ टायपो

गझलेचा मूड छान आहे

धन्यवाद

(अवांतर - एका मिसर्‍यानंतर स्वल्पविराम आणि शेरानंतर पूर्णविराम या चिन्हांना टाळता येते)

चाहते हा हिंदी शब्द खटकला.

''ऐकण्यासाठी मिळावे चाहते '' असं मराठीकरण जमेलसं वाटतंय.

बाकी गझल आवडली.

ऐकण्या पुरतेच त्याला चाहते,
दुःख माझे मूक होऊ पाहते.

>>
डॉक,
मला असं वाटतं की इथे 'चाहते' हा शब्द 'चाहता'चं अनेकवचन म्हणून आला असावा.

--------------------------------------

गर्भ माझा वेदनांनी अंकुरे,
आसवांचे मूल डोळी वाहते.

दु:ख आहे पोरके माझ्यापरी,
प्राण माझा होऊनी ते राहते.

मतल्यासह हे दोन शेरही फार आवडले.
'द्रौपदी'चा शेर नीटसा कळला नाही, पण भारी असावा असं वाटतंय !

आवडली
मूल डोळी वाहते<< जबरदस्त नाविन्य खूप अवडले
द्रौपदी व पंचप्राण -५ ही संख्या हेही मस्त जुळून आले आहे

चाहते बद्दल जितूशी सहमत पण डॉ.साहेबांनी दिलेली बदली ओळ अप्रतीमच सारंगची मूळ ओळ नेमक्या व नेटक्या अर्थासाठी कमी पडते आहे