आठवणी - नॅशनल पार्कस भटकंतीतल्या - भाग २.२ : ग्लेशिअर नॅशनल पार्क

Submitted by रायगड on 22 October, 2013 - 18:43

भाग १ : http://www.maayboli.com/node/45931

भाग २.१ : http://www.maayboli.com/node/45966

या ग्लेशिअरच्या आम्ही दोघं इतके प्रेमात पडलो की परत पुढील वर्षी इथे यायचच हा निश्चयच केला आम्ही.

आणि आलो देखील. खरं तर या वर्षी उन्हाळ्यात ऑलरेडी यल्लोस्टोन झालं होतं, ४-५ दिवस. पण सप्टेंबरच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात १-२ मित्र्-मैत्रिणींना आम्ही ग्लेशिअर चं वर्णन ऐकवलं नी वरती येत असाल तर पुढल्या आठवड्यात जाऊन येऊ ३-४ दिवस हे देखील पटवलं...season अजूनही चांगला असेल अशी ग्वाहीही काही विचार न करता देऊन टाकली...बहुदा यंदा, गेल्या वर्षी ठरवल्यानुसार जायचच हा विचार इतका पक्का होता नी ग्लेशिअरची इतकी जबरदस्त ओढ लागलेली की आम्ही फारसं
weather वगैरे बघण्याच्या भानगडीत पडलो नाही वाटतं, नी मित्रमंडळानी पण नको तेवढा विश्वास टाकून येण्याची तयारी दाखवली...

मग काय सप्टेंबरच्या तिसर्‍या आठवड्यातल्या एका मुहुर्तावर आम्ही दोघे नी अजून ३ मित्र्-मैत्रिणी निघालो ग्लेशिअरला. यावेळी हवामान थंड असेल म्हणून कँपिंग मात्र नशिबाने काढले नव्हते. प्रत्यक्ष पार्कात पोहोचलो नी स्वागतालाच कळलं की Going to the sun road हा Logan Pass पुढे बंदच आहे. पार्कात already थोडी थोडी हिमवृष्टी चालू झाली होती. पार्कात यावेळी visitors ची संख्या अगदीच नगण्य होती. हरकत नाही...तेवढं तर तेवढं असा विचार करून आम्ही दोघांनी दुसर्‍या दिवशी आम्ही आदल्या वर्षी आवडलेल्या पण न झालेल्या Grinnel Glacier ट्रेकला जायची टूम काढली.

सर्व जामानिमा करून निघालो...थंडीची जॅकेट्स, हातमोजे, पायात जाड मोजे, कानटोपी, असं सारं चढवून निघालो. पण trekking चे sturdy shoes आम्हा दोघांकडेच होते (तेच ते गेल्या वर्षी घेतलेले!). बाकी तिघांनी आपले साधे sneakers च घातलेले.

ट्रेलहेड पाशी गाडी लावून आम्ही ट्रेल चढायला सुरुवात केली नी ५व्या मिनिटाला पहिला दणका बसला. पाण्याचा एक ओहोळ डोंगरावरून खाली येत होता नी त्यात पाय घातल्याने ग्रुपमधील एकीच्या शूजच्या पार आत ते बर्फाचं पाणी शिरून तिला हुडहुडी भरली. मग शूज काढा, सॉक्स मधील पाणी पिळून घ्या हे उद्योग झाले...पण ते गारेगार सॉक्स परत घालणे म्हणजे शिक्षाच होती....पण इतक्यात कशी हार मारणार म्हणून निघालो सगळे पुढे. आधीच प्रचंड थंडी नी त्यात एखाद मैल चाललो असू तर पाऊस सुरु झाला. आम्ही आमचे पोंचू चढवले. मंडळींचा उत्साह नी निर्धार खचू लागला. पण आमचा ग्रुपलीडर म्हणजे नवरा सर्वांचे morale boost करत पुढे ढकलतच होता. जवळपास 4 मैल चालून वर जायचं होतं नी हा आपला हे काय, आलंच आता.. हे वळण गेलं की आलंच हे ऐकवत सर्वांची गाडी रेटत होता. अजून एखाद मैल गेला. आमची चालण्याची वाट आता ओहोळातूनच चालली होती. एव्हाना आमच्या दोघांच्या शू़ज मध्ये सुद्धा पाणी गेले होते. सर्वजण गोठलेल्या अवस्थेत चालत होते. परतूया आता असा एक सूर उरलेल्या तिघांचा चालू झाला. मला थंडीही वाजत होती नी पुढे जायचं ही होतं. खरतर यावेळेस सुध्दा ग्रिझली अस्वलांची भीती होतीच्...नी या थंडीपायी पाण्यात पाय घालून घालून एखाद्याला hypothermia व्हायचा अशीही मला भीती वाटत होती. नवरोजींना याचे काही नाही...चाललेत पुढे. अजून १/२ एक मैल चाललो असू नी एकीने एका दगडावर बसकण मारली नी जाहिर केले, मी ही इथे बसणार आहे आता. तुम्ही लोकं वर जाऊन या तोपर्यंत मी इथेच बसणार नी परतताना तुमच्या बरोबर येईन परत खाली...आता कोणाला एकटं कसं सोडून जाणार त्यामुळे सर्वचजणं परतूया असं आम्हा उरलेल्या चौघांचं मत पडलं....ग्रुप लीडर ने तरी देखील "आता आलाच वाटतं शेवटचा Grinnel Glacier पॉईंट" असा काहीसा एक डायलॉग टाकून बघितला पण यावेळी मात्र सर्वांनी त्याला धरून बडवायचीच धमकी दिली. अखेरीस सर्वजणं परतीच्या वाटेवर लागलो....पावसातून- पाण्यातून वाट काढत खालती आलो तोपर्यंत हाता-पायाची बोटं अक्षरशः बधीर झाली होती. हात खिश्यात घालून गाडीची किल्ली काढायला जमत नव्हतं अक्षरशः. कसेबसे गाडीत बसलो नी गाडीचा हीटर सर्वांत वरच्या तापमानाला नेऊन बोटं शेकली...तब्बल ५-७ मिनीटं लागली बोटात प्राण परत आणून steering wheel धरता येईपर्यंत...नंतरचे २ दिवस जे काही पार्कात होतो ते फक्त गाडीने जमेल तेवढे फिरलो नी माफकच उतरून फिरलो.तर असा हा ग्लेशियरचा वेगळाच अनुभव यावेळी.

पण यावरती थांबून कसं चालेल? ४ वर्षांनी परत ग्लेशिअर ची टूम काढून परत एकदा आम्ही ग्लेशिअरला गेलोच. मधल्या काळात अजून एकदा यल्लोस्टोन झाले होते, संसारवेलीवर २ फुले उमलली होती वगैरे वगैरे :D. मोठे युवराज सव्वा वर्षाचे असताना त्याला घेऊन बॅन्फ नी जॅस्परची भटकंती झालेली पण समेवर ग्लेशिअर झालेच पाहिजे ना...!

दुसरे युवराज ६ महिन्यांचे होते नी गेली दोन वर्षे कुठे नॅशनल पार्कात गेलो नाही असे म्हणून आम्ही उन्हाळ्याचं ग्लेशिअरचं बुकींग केलं...यावेळी तर निमूटपणे घरं बूक केली - किचन वगैरे असलेली...एक ३ वर्षाचं नी एक ६ महिन्यांचं, अश्या समुदायाला घेऊन तेच करणे सोयीचे होते. बुकिंग केल्यानंतच्या काळात भारतातून बहिणीने येते म्हणून declare केले. मग काय? समुदायात ती नी तिची ७ वर्षाची मुलगी यांची भर! ही ट्रीप मात्र strictly family trip होती. नाही म्हणायला तरी पण पहिल्या वेळी केलेला एक त्यातला एक सोप्पा आणि तरीही सुंदर असा Avalanche lake हा ५ मैल राऊंडट्रीप असलेला एक ट्रेल करायचं ठरवलं. छोट्याला पाठीवर बॅक कॅरिअर मध्ये नी बाकी जनता चालत असे निघालो ट्रेल वर. परत एकदा पोरं हाकणे हे काम नवरा करत होता. एक ७ वर्षाचं नी एक ३ वर्षांचं - यांना आत्ता आलाच तलाव, मग तलावात तुम्हाला दगडं टाकायला मिळणार, असं काहीही सांगून त्याने २.५ वरती चढवलं...पण वरती खरोखर पाण्यात दगडं टाकून मंडळींना फारच आनंद झाला आणि परत येताना आता परत चालतच खाली जावं लागणार अशी विचारणा झाली....त्यामुळे परत एकदा कसली कसली अमिषं दाखवून सर्वांना खाली आणलं.


Avalanche Lake


KIds playing the Avalanche lake

ग्लेशिअर जवळ "बॅब" नावाच्या एका ठिकाणी एक घर बूक केलेलं...आजूबाजूला फारशी वस्ती नाही, नी घरातून दिसणारा सुंदर नजारा - त्यामुळे ह्याठिकाणी खूपच मजा आली रहायला. मग एकदम टिपिकल barbeque वगैरे प्रकार झाले.

View from the House in Babb


On the right corner is our rented house in Babb


Thats not a photo frame - its a view from the window from Babb house


Lake McDonald Lodge - back side

लेक मॅकडोनाल्ड मध्ये बोट राईड, लोगान पास व्हिजिटर सेंटर च्या आसपास त्यावेळी बर्फ होत. त्यामुळे भाची फारच खूश. मग तिथे बर्फात खेळणे वगैरे family activities अश्या गोष्टींनी ही ट्रीप साजरी झाली पण आम्हाला आपलं ग्लेशिअर ला पुन्हा एकदा पाय लावल्याचा आनंद झाला.


Ferry ride in Lake McDonald


Snow around Logan Pass Visitor Center

पुढील भाग : http://www.maayboli.com/node/46019

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण trekking चे sturdy shoes आम्हा दोघांकडेच होते (तेच ते गेल्या वर्षी घेतलेले!). >>> Proud

मस्त आठवणी लिहिल्या आहेस. Happy

व्वा! झकास ट्रेक चे वर्णन.
मस्त वाटले वाचायला.
मला तर अशा ठिकाणाहून परतच यावेसे वाटत नाही.
शहरी वातावरण अगदी अ‍ॅसिडीक वाटते परत आल्यावर!