अ‍ॅनॅस्थेशिया....

Submitted by अशोक. on 16 October, 2013 - 01:42

मला न्यूरोसर्जनने जेव्हा ऑपरेशनसाठी टेबलवर घेण्याची तारीख जाहीर केली त्याच्या आधल्या रात्री रूममध्ये एक नाभिक आपली अवजारे घेऊन आला आणि माझे सर्वांग नापिक करून टाकले. "पहाटे भूलतज्ज्ञ येतील आणि तुमचे बीपी तपासतील..." असे त्याच्याबरोबर असलेल्या हॉस्पिटलच्या असिस्टंटने सांगितले. मी रात्रभर विचार करत पडलो की कसला असेल हा भूलतज्ज्ञ ? कारण या अगोदर कधीच असल्या खास व्यक्तीची गाठ पडली नव्हती किंबहुना असल्या तज्ज्ञाचे नाव असलेला दवाखानाही कधी पाहिला नव्हता. सकाळी ते डॉ.केळुसकर आले....नाव त्यानीच सांगितले....मला ऑपरेशन रूमकडे नेण्याची अन्यांची तयारी चालू होती त्यावेळी मी सहज चौकशी करायची म्हणून डॉक्टरांना विचारले, "सर, हे अॅनॅस्थेशिया आणि प्रत्यक्ष ऑपरेशन यांच्यातील नाते मला नेमके काही माहीत नाही..." त्यावर स्मितहास्य करून ते म्हणाले, 'मि.पाटील, आत्ता त्यावर काहीच सांगता येणार नाही, पण एकदा तुमचे ऑपरेशन झाले की नंतर येथील वा घरातील विश्रांतीच्या अवधीत मी तुम्हाला काही बुकलेट्स देतो नक्की....त्यावरून तुम्ही त्याचा इतिहास बघू शकाल....".

प्रत्यक्ष ऑपरेशन थिएटरमध्ये मला निळ्या ओव्हरऑलमध्ये टेबलवर पाठीवर पडण्यास सांगितले त्यावेळी मी न्यूरॉलॉजिस्ट पतीपत्नीपेक्षाही [कारण ते माझ्या ओळखीचे झालेच होते] अॅनॅस्थेशिया तज्ज्ञ कधी आणि कसे आपले काम करतात याबद्दलच उत्सुक होतो. मेंदूचे इतके मोठे ऑपरेशन व्हायचे आहे [ही माझी स्वत:शीच समजूत] आणि इथली मंडळी तर चक्क रंकाळ्यावर गप्पागोष्टी चालू आहेत याच आविर्भावात वावरत होती...फरक होता तो शस्त्रांच्या आवाजाचा आणि प्रखर अशा उजेडाचा. डॉ.केळुसकर दुसरीकडे दिसत होते आणि मध्येच डॉ. पवार [न्यूरोसर्जन] यानी मला हसतहसत विचारले, "पाटीलसर, गाणी ऐकणार का ?" मला हा प्रश्न वेगळा वाटला नाही, कारण मी ऐकले आणि पाहिलेही होते की बरेच डॉक्टर्स ऑपरेशन रूममधील वातावरण हलकेफुलके राहावे यासाठी हळू आवाजात टेपवरील गाणीही लावतात. मी म्हणालो..."जरूर, लता किंवा तलत असेल तर खूपच बरे....". त्यावर डॉक्टर, "छान, आहे आमच्याकडे तलत स्पेशल एक...लावू या". असे म्हणाले आणि मी तलतचे कोणते गाणे कानावर पडणार याची वाट पाहात टेबलवर पडलो.... आणि बेशुद्धच झालो.....

बेशुद्ध म्हणजे तब्बल सोळा तास [हे नंतर बहिणींनी सांगितले]....बाप रे ! त्या डॉ. केळुसकरांनी भूलेची काय जादू केली याची मला तसूभरही पत्ता लागला नाही....ना मला त्यानी काही मॉर्फिन दिले वा इथर चे इंजेक्शन दिले वा काही नलिकेवाटे दिले. काहीही समजले नाही...जाणवले नाही....तलतची तर एक ओळही ऐकू आली नाही....जाग आली त्यावेळी मी आय.सी.यू. रूममध्ये कसल्यातरी चित्रविचित्र पोशाखात होतो....डोके जड वाटत होते....तर आजुबाजूला कोण आहेत....आणि मुळात मी कुठे आहे याचा अजिबात पत्ता लागत नव्हता. असाच आणखीन् एक तास गेला असणार आणि दूर कुठून तरी...."मामा...मामा...उठलास काय ? बरे वाटते ना ?" असा एका मुलीचा आवाज कानी येऊ लागला....खूपशा प्रयत्नानंतरही ही माझी स्मिता नामक एक शहाणी भाची आहे अशी अस्पष्ट जाणीव होत चालली....पण शरीर भयानक जड झाले होते....वास्तविक ब्रेन ऑपरेशन होते...ट्यूमर्स काढण्यात आले असताना शरीराला अशी जडशीळ अवस्था का आली ? याचे उत्तर नव्हते.

तो आणखीन् दुसरा तिसरा दिवसही आय.सी.यू. मध्येच गेला. पण तिसर्या दिवशी घरची बरीच मंडळी आत आली होती आणि घरचे खाणेही मिळाले....जरी ते डॉक्टर युनिटकडून मंजूर करून घेतले गेले. चौथ्या दिवशी नित्याच्या रूममध्ये मला हलविण्यात आले....आय.सी.यू. ला रामराम केला....[परत कधी इकडे कधी आणू नकोस रे बाबा....अशी प्रार्थना करत करत तो मजला सोडला]. हॉस्पिटलमधील त्या स्पेशल रुममध्ये दुपारच्या वेळी मी एकटाच असल्याने परत त्या भूलतज्ज्ञाच्या करामतीकडे माझे ध्यान जाऊ लागले आणि एका ट्रेनी डॉक्टरतर्फे डॉ.केळुसकर याना निरोप पाठवून अॅनॅस्थेशियावरील एकदोन पुस्तके मागवून घ्यावी असे ठरविले. निरोप दिला...पण पुस्तके जास्त आली नाहीत. एक बुकलेट टाईप आले...त्यात बर्‍यापैकी अभ्यासक्रमाची माहिती दिली होते. त्यात लिहिले होते ~ भूलतज्ज्ञांचे मदतनीस म्हणून काम करणारे तंत्रज्ञ व्हायचं असल्यास डिप्लोमा इन अॅनेस्थेशिया टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला कमीत कमी वेदना व्हाव्यात म्हणून भूल देण्याचं काम भूलतज्ज्ञ करतात. या भूलतज्ज्ञांना तंत्रज्ञांची गरज असते. हे तंत्रज्ञ नेमक्या कोणत्या औषधांची, किती प्रमाणात गरज आहे, त्याची उपलब्धता शस्त्रक्रियेदरम्यान आहे का, डॉक्टरांसाठी शस्त्रक्रियेपूर्वीची आवश्यक ती सर्व तयारी करून ठेवणं.. ही सर्व कामं भूलतज्ज्ञ अर्थात अॅनेस्थेशिया टेक्निशिअनला करावी लागतात. थेट ऑपरेशन थिएटरमध्ये यांचं काम असल्यामुळे ते अतिशय जबाबदारीचं असतं.....आदी. आता मला प्रश्न पडला की हे जे भूलतज्ज्ञ माझ्यावेळी थिएटरमध्ये होते त्याने मला हे भूल देण्याचे काम केले ते मला जाणवले कसे नाही ? किंवा ज्या डॉ.केळुसकरांनी मी तिथे पाहिले होते ते एक मिनिटही टेबलकडे आल्याचेही मी तितक्या वेळेत पाहिले नाही....अर्थात भूल जबरदस्त दिली होती....नो डाऊट.

आज दिनांक १६ आक्टोबर....आणि भूलतज्ज्ञांसंदर्भात इतके सारे आठवायचे कारण म्हणजे आजचा दिवस हा "जागतिक भूलतज्ज्ञ दिन" म्हणून साजरा केला जात आहे. १६ आक्टोबर १८४६ साली म्हणजे जवळपास १७० वर्षापूर्वी "इथर डोम, मॅसॅच्यूसेट्स जनरल हॉस्पिटल, बोस्टन' येथील एका जवळपास सार्वजनिक कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त झालेल्या ऑपरेशनसमयी डॉ.विल्यम मॉर्टॉन यानी पहिला अॅतनॅस्थेशियाचा यशस्वी प्रयोग केला. ज्या पेशंटवर हा प्रयोग झाला तो बेशुद्धीत गेल्यानंतर सर्जन जॉन कॉलिन्स आणि हेन्री जेकॉब बिगलो यानी शस्त्रक्रिया केल्याचा दाखला सापडतो. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आणि मग इतिहासात "१६ आक्टोबर" ही तारीखही भूलतज्ज्ञाचा दिवस म्हणून ओळखला जावा असा प्रघातही पडला.

Ana.jpg

[हा त्या ऑपरेशनचा १६ आक्टोबर १८४६ मधील फोटो..... जालावरून साभार]

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद इब्लिस! अ‍ॅनास्थेशिऑलॉजिस्ट हा योग्य शब्द सांगितल्याबद्दल...मी लगेच चुकीची दुरूस्ती केलेय माझ्या आधीच्या प्रतिसादात.

असो,
मघा माझाही घोळ झाला होता. लेख न वाचताच तो डॉ. अशोक यांचा आहे असे समजून. हा लेख अशोक पाटील सरांचा आहेत. कोल्हापूरचे.
*
माझा पहिला प्रतिसाद थोडे अशुद्धलेखान बदलण्यासाठी संपादित करीत आहे.

मस्त लेख!!
इब्लिस, तुमचा प्रतिसाद खूपच आवडला.

माझे सासरे भूलतज्ञ/अ‍ॅनास्थेशिऑलॉजिस्ट असल्याने त्यांच्याकडूनच मला कळले की अ‍ॅनॅस्थेशिया हा किती महत्वाचा भाग आहे. इब्लिस म्हणतात तसे, हे खरे ओ.आर.चे इन चार्ज! बाबाही हेच म्हणतात. पेशंटला जिवंत ठेवणे हे सर्वतोपरी भूलत्ज्ञाच्या हाती असते. मला अजिबात आयडिया नव्हती!! (माझ्या आठवणीत ते असंच बोलले होते, तपशील चुकले असतील तर चुभुद्याघ्या. मला वैद्यकिय ज्ञान नाहीये)..

मामा लेख भारी पण नुसतच स्टार्टर सारखा वाटला. Happy
इब्लिसरावानी अजुन त्यात माहिती दिलीच आहे म्हणा.

अशोक, वेगळाच अनुभव ना !
इलिस, तूम्ही असे छान लिहिता, तेव्हा खुप आवडता !!

माझे कानाचे स्टॅपेडोक्टॉमी मात्र मला पुर्ण भूल न देता झाले होते. मामुली भूल दिली होती.
ऑपरेशनभर डॉक्टर माझ्याशी बोलत होते आणि मला उत्तरे देणे भाग होते. भूलतज्ञ माझा हात धरून बसल्या होत्या. वेदना सहन झाल्या नाहीत तर त्यांचा हात मी दाबायचा असे ठरले होते.

मी सगळे सहन केले पण ज्यावेळी दोन कानाना जोडणारी, तोल साधणारी ट्यूब पंक्चर केली, त्यावेळी मला
वाटले मी टेबलवरुन खाली पडणार. त्यावेळी त्यांचा हात मी दाबला. पण नंतर थोड्याच वेळात ऑपरेशन संपले व मी थिएटरमधून थेट वॉर्डमधे. रिकव्हरी रूममधे नाही.

इब्लीस धन्यवाद. प्रतिसाद देताना माझी चूक झाली. सुधारतोय Happy
दोन्ही अशोकरावांबद्दल माहिती आहे. पण शीर्षक वाचल्यावर हे डॉ अशोक याच समजुतीने वाचला गेला.

माझ्या ऑपरेशनच्या वेळी मला खूपच भूक लागली होती आणि डॉ. पण उपमा वै. बद्दलच आपापसात बोलत होते.. Sad तेन्व्हा भूल कधी दिली ते मला खाण्याच्या विचारात कळलच नाही.. :खिखि: बहुदा एक विन्जेक्शन दिले. जागी झाले तेन्व्हा जरासा खोकला आला असे आठवते.

हल्ली भारतातदेखिल एपिड्युरलचा पर्याय उपलब्ध आहे.. त्याचे दुष्परीणाम माहित नाहीत.. पण २ तास शांतता नक्की मिळते हे सांगू शकेन. त्यासाठी देखील भूलतज्ञ लागतात असे वाटते.

:पुन्हा भुलतज्ञांना ऑपरेशनसाठी भेटण्यास उत्सुक नसलेली बाहुली :

डॉक्टर....

काल रात्री आणि आज सकाळी परत एकदा तुमचा अत्यंत अभ्यासपूर्ण दीर्घ प्रतिसाद वाचला....आणि वाटू लागले की चला माझ्या निमित्ताने इब्लिससरांनी एरव्ही तशा दुर्लक्ष विषयाकडे सार्‍यांचेच लक्ष वेधले. वास्तविक १६ आक्टोबर ही तारीख आकाशवाणीवर सांगितली गेली आणि 'दिनविशेष' कार्यक्रमात तिचा सविस्तर उल्लेख केला गेला. "भूलतज्ज्ञ" यामुळे मग मीही माझ्या ऑपरेशन दिवसाकडे गेलो आणि मनी खदखदत असणारा तो विचार....मला कसा समजले नाही, भूल दिला जाणारा क्षण....परत पुढे आला मग तो इथे शब्दबद्ध केला. मात्र आता तुमचा आणि अनेक सुहृदांचे अभ्यासपूर्ण तसेच सदिच्छेचे प्रतिसाद वाचल्यावर लक्षात आले की आपण तसे पाहिल्यास एक बरा लेख लिहिला, त्या विषयातील माहितीसंदर्भात.

अ‍ॅनास्थेशिआ शिवाय सर्जरीची प्रगतीच नव्हे, सर्जरीच फारशी नाही.... असे तुमचे निरीक्षण, जे योग्यच आहे, वाचताना अ‍ॅनास्थेशिआ अगोदरचा काळ नजरेसमोर आणल्यास शस्त्रक्रियेची प्रक्रिया किती भयावह, असह्य असू शकेल याचा अंदाज येतो. मद्य पाजणे, अफू खिलविणे, दांडग्यांनी पेशंटला घट्ट पकडून ठेवणे....असे प्रकार म्हणजे देवीसमोर बळी देण्याच्या प्रघातात मोडू शकतील...फरक फक्त पहिल्या प्रकारात "वाचविण्यासाठी" केले जात असलेले उपाय.

अनेक प्रतिसादक या अ‍ॅनास्थेशिआच्या रांगेतून गेल्याचे मला दिसले....काहीना समजले, काहीना कळालेही नाही ते केव्हा त्या अंमलाखाली गेले....

.....पण देवाचे आभार की या मुळे आपण परत श्वसन करण्यास सज्ज झालो. सर्जरी करणार्‍या डॉक्टरांना जितका दुवा दिला जावा तितकाच ते ऑपरेशन सुरू होण्यापूर्वी आणि ते संपेपर्यंत एका ठिकाणी शांतपणे बसणार्‍या भूलतज्ज्ञांलादेखील न विसरता द्यावा.

[जाताजाता : "अशोक." आणि "डॉ.अशोक" असे आम्ही दोन सदस्य आहोत. डॉ.अशोक कुलकर्णी याना मी ओळखतो आणि ते मला....जालीय ओळख आहे. वास्तविक इथले सदस्यत्व घेताना मी 'अशोक पाटील' अशाच नावाने फॉर्म भरला होता...पण ते नाव स्वीकारले गेले नाही, म्हणजेच त्या नावाचे आणखीन् कुणीतरी सदस्य असणारच....नंतर केवळ 'अशोक' असे भरले, तर तेही स्वीकारले गेले नाही, ते पाहून 'अशोक,' असा एक जादाचा बिंदू बदल केला, तर तो स्वीकारला गेला......नाव सर्वसामान्य असल्याने काहीवेळा नक्कीच गोंधळ होतो. असो.]

तिथे नेऊन, पुढची पायरी उतरून / चढून मृत्यूपर्यंत पोहोचू न देता अन एक पायरी वरच ठेवून तुम्हाला वेदनांनी तळमळू न देता तुमचे वेदनादायी आजार कापून टाकायला आमच्यासारख्या सर्जन्सना जे 'मोकळे रान' देतात, ते भूलतज्ञ! >>>

kiti perfect lihilay

अशोककाका आणि इब्लिस, तुम्ही दोघांनीही खुप मोलाचं लिहीलं आहे. खरोखर वरदान आहे हे. माणसांबरोबरच आता प्राण्यांसाठीपण. इतका महत्वाचा विषय आहे, तरी अनोळखी आणि दुर्लक्षित राहिलेला आहे. किरकोळ ते दुर्धर, सर्व वेदना भूल किती सुसह्य करते... सध्या मी माझ्या दातांच्या छोट्या-मोठ्या समस्या सोडवते आहे, ही भुलाबाई नसती तर काय झालं असतं या विचारानीच माझी गाळण उडते Sad

मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया काही अतिशय निष्णात सर्जन भूल देणारे आयड्रॉप्स वापरून करतात. ही भूल काही मिनिटेच (१०-१५ मिनिटे बहुतेक) टिकते. त्यामुळे संपूर्ण शस्त्रक्रिया तेव्हड्या वेळात झालीच पाहिजे.

लेख आवडला. नर्मविनोदी शैलीत लिहिलंत तुम्ही; त्यामुळे तुमच्या दुखण्याचं विस्मरण झालं आम्हा वाचकांनाही!

लेख आवडला. नर्मविनोदी शैलीत लिहिलंत तुम्ही; त्यामुळे तुमच्या दुखण्याचं विस्मरण झालं आम्हा वाचकांनाही!

धन्यवाद आतिवास.....

दुखण्याचे विस्मरण मलाही झाले होतेच....त्रास आहे तो औषधपाण्याचाच....त्याचाच विचार करीत पडलो असताना भूलतज्ज्ञ विषयावर आकाशवाणीवर कार्यक्रम लागला आणि मला तो प्रसंग आठवला....तोच शब्दबद्ध केला....आता ऑपरेशन तरी किती गंभीरतेने घ्यायचे ? म्हणून सारेच हलके लिखाण झाले.

अतिशय हलक्याफुलक्या वातावरण निर्मितीतून तुम्ही तुमचा अनुभव मांडलात. आवडले. आणि अतिशय समयोचित ही. Happy

सकारात्मक भावनाही भावली. Happy

>> लेख आवडला. नर्मविनोदी शैलीत लिहिलंत तुम्ही; त्यामुळे तुमच्या दुखण्याचं विस्मरण झालं आम्हा वाचकांनाही!

सहमत आहे.
इब्लिस तुमचाही प्रतिसाद आवडला. नवीन माहिती कळाली. आभारी आहे.

व्वा! छान माहितीपूर्ण लेख.
स्वता:च्या ऑपरेशनसंबंधी इतक्या तिर्‍हाइत नजरेने लिहिणं सोपं नाही. कारण मेंदू ऑपरेशन म्हटलं की माणूस आधीच अर्धा होत असणार!

डॉ. इब्लिस यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांने इथल्या सदस्यांना किती आनंद झाला आहे हे ते त्यांचे लिखाण वाचताना समजतेच. मी त्याबद्दल सविस्तर लिहिले आहेच; पण इब्लिस यानी "...झोप व मृत्यू यांच्या मधली जागा तो अ‍ॅनास्थेशिआ...." हे जे वाक्य लिहिले आहे त्यावरून सर्जरी दरम्यान अ‍ॅनास्थेशिआ किती महत्वाचे काम करण्यात मग्न असतो ते पटते.

@ मानुषी ~ धन्यवाद..... मी फार वैताग स्थितीतून गेलो आहे त्या ऑपरेशनपासून आजतागयत....मोडूनच पडलो होतो असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे नाही. मग तो रोजचा बिनसुराचा दिवस किती दिवस आळवत राहायचा, म्हणून सारेच ते प्रकरण सहजगत्या घ्यायला शिकलो... अ‍ॅन्ड येस, ब्रेन ऑपरेशन शुअरली अ की दॅट कीप्स अ पर्सन ऑन द लाईन ऑफ डेस्परेशन.

अशोक , अपघात, त्यातही साक्षात मेंदूवर शस्त्रक्रिया , त्यानंतरचे दु:सह कधी निराशादायकही वाटणारे उपचाराचे, औषधपाण्याचे न संपणारे सत्र या गोष्टी पचवून तुम्ही परतून आलात यात तुमच्या सकारात्म दृष्टीकोनाचा खूप मोठा भाग आहे. हा लेख लिहून तुम्ही अ‍ॅनास्थेशिआ बरोबरच या अनमोल वृत्तीचाही परिचय आम्हाला दिला आहे.
तलतचे गाणे तुम्हाला शुद्ध हरपण्याआधी ऐकायचे होते हा तुमच्या रसिकतेचा मोठा परिचय !
प्रतिसादही आवडले.

मस्त धागा लेख माहिती प्रतिसाद वगैरे वगैरे...

आणि स्वताचेही ३ भूल देण्याचे प्रसंग आठवले.. Happy

पहिले तर आपले साधेसे अपेंडीक्स ऑपरेशन, वय वर्षे धोक्याचे असल्याने तेव्हा तर ऑपरेशन थिएटरमधील लेडी डॉक्टरला पाहूनच भुललो होतो.. तरी त्या दुष्टांनी पाठीमागे कसलेसे ईजेक्शन खुपसून भुल दिलीच.. तेव्हाचे आठवतेय की माझ्या पोटावर, छातीवर सुई टोचून चेक करत होते की दुखण्याची जाणीव होतेय का म्हणून.. पहिल्यांदा टोचले तेव्हा दुखले... मी जसे म्हणालो की हो दुखले, तसे तो टोचणारा माणूस त्या लेडी डॉक्टरला म्हणाला, दुखतेय की याला.. तर ती संयम राखून उत्तरली, ठिक आहे, आताच तर ईंजेक्शन दिलेय, बघूया थोडा वेळ.. अन आपल्या हत्यारांची जुळवाजुळव करण्यात मग्न झाली.. मग पाचेक मिनिटांनी.. (किंवा कदाचित अर्ध्या-एक मिनिटानेही असेल, कारण ऑपरेशन टेबलवर प्रत्येक क्षण युगासमान भासतो).. तर मला बहुधा पुन्हा सुई टोचली आणि पुन्हा दुखले का आता म्हणून विचारले.. बहुधा म्हणालो कारण यावेळी सुई टोचल्याचे जाणवले नाही... पण मी सुद्धा हुशार, टोचले नसूनही मुद्दामच हो, थोडेसे टोचलेय म्हणालो.. रिस्क कशाला घ्या, नाही तर उगाच सुरू केली असती फटाफट माझी कापाकापी.. पण त्यानंतर पुन्हा टोचल्याचे आठवत नाही कारण मग माझे डोळे मिटले ते थेट वार्डातच उघडण्यासाठी... (पुढच्या अनुभवासाठी माझी फिर मिलेंगे भाईजान स्टोरी वाचा Wink )

त्यानंतरचे दोन अनुभव कोलोनोस्कोपी केली होती तेव्हाचे.. कोलोनोस्कोपी म्हणजे ज्यात मलविसर्जनाच्या मार्गाद्वारे आत कॅमेरा घालून आतड्याचे फोटो घेऊन कुठे कुठे काय कापलेय करपलेय हे चेक करतात.. त्यात काय निघाले हे इथे महत्वाचे नाही, मात्र पहिल्यावेळी ज्या डॉक्टरकडे केली त्याच्याकडे अ‍ॅनेस्थेशिया द्यायच्या आधी माझ्याकडून काही झाले गेले तर जबाबदार नाही अश्या काहीश्या स्वरुपाच्या पेपरवर माझी सही घेतली.. आईशप्पथ, नाही म्हटले तरी खरेच जाम टरकली होती तेव्हा त्या पेपरवर साधीशी साईन करताना.. त्यानंतर अ‍ॅनेस्थेशिया हाताला लावलेल्या सलाईनमधून दिला अन लुडकलो बघता बघता.. पण बरोबर दिला नव्हता तो, कारण मध्येच मला शुद्ध आली आणि माझ्या आतवर आतड्यात कुठेतरी काहीतरी ढवळले जातेय असे जाणवून अस्वस्थ वाटू लागले अन किंचित व्हिवळलो देखील मी.. तसे डॉक्टरचे, "बस हा राजा, झाले झाले" असे काहीसे शब्द कानावर पडले अन पुन्हा शुद्ध हरपली ते जाग ५-६ तासांनीच आली.. त्यानंतर मात्र पुढचे चोवीस तास ना काही खाऊ शकलो ना पिऊ शकलो.. एक दोन प्रयत्नांचे उलट्यात रुपांतर झाले.. तेथील एका नर्सने मला सांगितले की अ‍ॅनेस्थेशिया उतरताना होते असे.. मी अजाण बालक, मुंडी हलवून गप्प बसलो..

मात्र त्यानंतर अ‍ॅनेस्थेशिया या प्रकारामुळे मी एकंदरीत कोलोनोस्कोपीचाच धसका घेतला... खरे तर या स्कोपीच्या आधी पोट पुर्ण साफ व्हावे म्हणून जमालगोट्यासारखे काम करणारे एखादे लिक्विड बाटल्या बाटल्या भरून प्यायचे असते आणि सात-आठ वेळा परसदारी पळायचे असते हा देखील एक नकोसाच वाटणारा अनुभव.. पण तरीही मला हलवले होते ते या न उतरलेल्या अ‍ॅनेस्थेशियानेच...

त्या कोलोनोस्कोपीत आजाराचे योग्य निदान झाले नाही.. म्हणजे मला खरे तर क्रॉंज नामक रोग झाला होता, पण तेव्हा त्या डॉक्टरांद्वारे आतड्याचा टी.बी. घोषित करण्यात आला. त्याच्या गोळ्या चालू झाल्या पण कोर्स पुर्ण करूनही तब्येत सुधारता सुधारत नव्हती म्हणून डॉक्टर बदलले.. यावेळी नशीबाने आधीच्यापेक्षा चांगले डॉक्टर सापडले, पण त्यांनीही रोगाचे निदान करायला कोलोनोस्कोपी करायला सांगितले.. अगोदर घेतलेल्या धसक्याने मी पहिली डेट चुकवली, पण नंतर याशिवाय पर्याय नाही म्हणून झालो तयार.. यावेळचा अनुभव मात्र कमालीचा सुखद किंवा सुसह्य होता म्हणा.. पुन्यांदा एकदा हाताला लावलेल्या सलाईनमधूनच काहीतरी आत सोडले आणि कधी गुंगीत गेलो हे माझे मलाच समजले नाही.. दुपारी तीनच्या दरम्यान सुरू झालेली स्कोपी, कधीतरी संपली असावी पण मला मात्र संध्याकाळी सहा-सातच्या दरम्यान जाग आली, ते मी स्वताहून उठून एकटा कोणाचाही आधार न घेता बाथरूमला जाऊन आलो.. नर्स अडवत असूनही, अजून थोडा वेळ आराम करायचा सल्ला देत असूनही, सोबत म्हणून आलेल्या बायकोला घेऊन निघालो देखील.. रिक्षा पकडून जवळच असलेल्या सासुरवाडीला पोहोचलो.. उलट्या-मळमळ वगैरे तर दूर, तिथे सासूबाईंनी केलेले कांदेपोहे मस्तपैकी हादडले.. पण त्यानंतर डोके जड झाले तसे झोपलो ते थेट दुसर्‍या दिवशी दुपारीच उठायला.. पण त्रास असा काही नाही.. बारा-चौदा तास ताणून देणे हे तर माझ्या सुखाच्या व्याख्येत मोडते.. एकंदरीत या चांगल्या अनुभवाने माझे पुढचे आयुष्य सुकर केले आहे कारण हा आजार बरा होणारा नसल्याने या कोलोनोस्कोपीज आता माझ्या नशिबी आयुष्यभर लिहिल्या आहेत.. अन अर्थातच अ‍ॅनेस्थेशियाचे अनुभवही Happy

अशोकमामा धन्यवाद, आठवणी जागवल्यात आणि त्या कागदावर उतरवूनही बरे वाटले.. खरे तर आता विचार करतोय असे अ‍ॅनेस्थेशियापुरते न लिहिता आणखी सविस्तर या आठवणी लिहून काढाव्यात.. Happy

आणि हो, काळजी घ्या Happy

Pages