अ‍ॅनॅस्थेशिया....

Submitted by अशोक. on 16 October, 2013 - 01:42

मला न्यूरोसर्जनने जेव्हा ऑपरेशनसाठी टेबलवर घेण्याची तारीख जाहीर केली त्याच्या आधल्या रात्री रूममध्ये एक नाभिक आपली अवजारे घेऊन आला आणि माझे सर्वांग नापिक करून टाकले. "पहाटे भूलतज्ज्ञ येतील आणि तुमचे बीपी तपासतील..." असे त्याच्याबरोबर असलेल्या हॉस्पिटलच्या असिस्टंटने सांगितले. मी रात्रभर विचार करत पडलो की कसला असेल हा भूलतज्ज्ञ ? कारण या अगोदर कधीच असल्या खास व्यक्तीची गाठ पडली नव्हती किंबहुना असल्या तज्ज्ञाचे नाव असलेला दवाखानाही कधी पाहिला नव्हता. सकाळी ते डॉ.केळुसकर आले....नाव त्यानीच सांगितले....मला ऑपरेशन रूमकडे नेण्याची अन्यांची तयारी चालू होती त्यावेळी मी सहज चौकशी करायची म्हणून डॉक्टरांना विचारले, "सर, हे अॅनॅस्थेशिया आणि प्रत्यक्ष ऑपरेशन यांच्यातील नाते मला नेमके काही माहीत नाही..." त्यावर स्मितहास्य करून ते म्हणाले, 'मि.पाटील, आत्ता त्यावर काहीच सांगता येणार नाही, पण एकदा तुमचे ऑपरेशन झाले की नंतर येथील वा घरातील विश्रांतीच्या अवधीत मी तुम्हाला काही बुकलेट्स देतो नक्की....त्यावरून तुम्ही त्याचा इतिहास बघू शकाल....".

प्रत्यक्ष ऑपरेशन थिएटरमध्ये मला निळ्या ओव्हरऑलमध्ये टेबलवर पाठीवर पडण्यास सांगितले त्यावेळी मी न्यूरॉलॉजिस्ट पतीपत्नीपेक्षाही [कारण ते माझ्या ओळखीचे झालेच होते] अॅनॅस्थेशिया तज्ज्ञ कधी आणि कसे आपले काम करतात याबद्दलच उत्सुक होतो. मेंदूचे इतके मोठे ऑपरेशन व्हायचे आहे [ही माझी स्वत:शीच समजूत] आणि इथली मंडळी तर चक्क रंकाळ्यावर गप्पागोष्टी चालू आहेत याच आविर्भावात वावरत होती...फरक होता तो शस्त्रांच्या आवाजाचा आणि प्रखर अशा उजेडाचा. डॉ.केळुसकर दुसरीकडे दिसत होते आणि मध्येच डॉ. पवार [न्यूरोसर्जन] यानी मला हसतहसत विचारले, "पाटीलसर, गाणी ऐकणार का ?" मला हा प्रश्न वेगळा वाटला नाही, कारण मी ऐकले आणि पाहिलेही होते की बरेच डॉक्टर्स ऑपरेशन रूममधील वातावरण हलकेफुलके राहावे यासाठी हळू आवाजात टेपवरील गाणीही लावतात. मी म्हणालो..."जरूर, लता किंवा तलत असेल तर खूपच बरे....". त्यावर डॉक्टर, "छान, आहे आमच्याकडे तलत स्पेशल एक...लावू या". असे म्हणाले आणि मी तलतचे कोणते गाणे कानावर पडणार याची वाट पाहात टेबलवर पडलो.... आणि बेशुद्धच झालो.....

बेशुद्ध म्हणजे तब्बल सोळा तास [हे नंतर बहिणींनी सांगितले]....बाप रे ! त्या डॉ. केळुसकरांनी भूलेची काय जादू केली याची मला तसूभरही पत्ता लागला नाही....ना मला त्यानी काही मॉर्फिन दिले वा इथर चे इंजेक्शन दिले वा काही नलिकेवाटे दिले. काहीही समजले नाही...जाणवले नाही....तलतची तर एक ओळही ऐकू आली नाही....जाग आली त्यावेळी मी आय.सी.यू. रूममध्ये कसल्यातरी चित्रविचित्र पोशाखात होतो....डोके जड वाटत होते....तर आजुबाजूला कोण आहेत....आणि मुळात मी कुठे आहे याचा अजिबात पत्ता लागत नव्हता. असाच आणखीन् एक तास गेला असणार आणि दूर कुठून तरी...."मामा...मामा...उठलास काय ? बरे वाटते ना ?" असा एका मुलीचा आवाज कानी येऊ लागला....खूपशा प्रयत्नानंतरही ही माझी स्मिता नामक एक शहाणी भाची आहे अशी अस्पष्ट जाणीव होत चालली....पण शरीर भयानक जड झाले होते....वास्तविक ब्रेन ऑपरेशन होते...ट्यूमर्स काढण्यात आले असताना शरीराला अशी जडशीळ अवस्था का आली ? याचे उत्तर नव्हते.

तो आणखीन् दुसरा तिसरा दिवसही आय.सी.यू. मध्येच गेला. पण तिसर्या दिवशी घरची बरीच मंडळी आत आली होती आणि घरचे खाणेही मिळाले....जरी ते डॉक्टर युनिटकडून मंजूर करून घेतले गेले. चौथ्या दिवशी नित्याच्या रूममध्ये मला हलविण्यात आले....आय.सी.यू. ला रामराम केला....[परत कधी इकडे कधी आणू नकोस रे बाबा....अशी प्रार्थना करत करत तो मजला सोडला]. हॉस्पिटलमधील त्या स्पेशल रुममध्ये दुपारच्या वेळी मी एकटाच असल्याने परत त्या भूलतज्ज्ञाच्या करामतीकडे माझे ध्यान जाऊ लागले आणि एका ट्रेनी डॉक्टरतर्फे डॉ.केळुसकर याना निरोप पाठवून अॅनॅस्थेशियावरील एकदोन पुस्तके मागवून घ्यावी असे ठरविले. निरोप दिला...पण पुस्तके जास्त आली नाहीत. एक बुकलेट टाईप आले...त्यात बर्‍यापैकी अभ्यासक्रमाची माहिती दिली होते. त्यात लिहिले होते ~ भूलतज्ज्ञांचे मदतनीस म्हणून काम करणारे तंत्रज्ञ व्हायचं असल्यास डिप्लोमा इन अॅनेस्थेशिया टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला कमीत कमी वेदना व्हाव्यात म्हणून भूल देण्याचं काम भूलतज्ज्ञ करतात. या भूलतज्ज्ञांना तंत्रज्ञांची गरज असते. हे तंत्रज्ञ नेमक्या कोणत्या औषधांची, किती प्रमाणात गरज आहे, त्याची उपलब्धता शस्त्रक्रियेदरम्यान आहे का, डॉक्टरांसाठी शस्त्रक्रियेपूर्वीची आवश्यक ती सर्व तयारी करून ठेवणं.. ही सर्व कामं भूलतज्ज्ञ अर्थात अॅनेस्थेशिया टेक्निशिअनला करावी लागतात. थेट ऑपरेशन थिएटरमध्ये यांचं काम असल्यामुळे ते अतिशय जबाबदारीचं असतं.....आदी. आता मला प्रश्न पडला की हे जे भूलतज्ज्ञ माझ्यावेळी थिएटरमध्ये होते त्याने मला हे भूल देण्याचे काम केले ते मला जाणवले कसे नाही ? किंवा ज्या डॉ.केळुसकरांनी मी तिथे पाहिले होते ते एक मिनिटही टेबलकडे आल्याचेही मी तितक्या वेळेत पाहिले नाही....अर्थात भूल जबरदस्त दिली होती....नो डाऊट.

आज दिनांक १६ आक्टोबर....आणि भूलतज्ज्ञांसंदर्भात इतके सारे आठवायचे कारण म्हणजे आजचा दिवस हा "जागतिक भूलतज्ज्ञ दिन" म्हणून साजरा केला जात आहे. १६ आक्टोबर १८४६ साली म्हणजे जवळपास १७० वर्षापूर्वी "इथर डोम, मॅसॅच्यूसेट्स जनरल हॉस्पिटल, बोस्टन' येथील एका जवळपास सार्वजनिक कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त झालेल्या ऑपरेशनसमयी डॉ.विल्यम मॉर्टॉन यानी पहिला अॅतनॅस्थेशियाचा यशस्वी प्रयोग केला. ज्या पेशंटवर हा प्रयोग झाला तो बेशुद्धीत गेल्यानंतर सर्जन जॉन कॉलिन्स आणि हेन्री जेकॉब बिगलो यानी शस्त्रक्रिया केल्याचा दाखला सापडतो. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आणि मग इतिहासात "१६ आक्टोबर" ही तारीखही भूलतज्ज्ञाचा दिवस म्हणून ओळखला जावा असा प्रघातही पडला.

Ana.jpg

[हा त्या ऑपरेशनचा १६ आक्टोबर १८४६ मधील फोटो..... जालावरून साभार]

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज दिनांक १६ आक्टोबर....आणि भूलतज्ज्ञांसंदर्भात इतके सारे आठवायचे कारण म्हणजे आजचा दिवस हा "जागतिक भूलतज्ज्ञ दिन" म्हणून साजरा केला जात आहे. >>>>> ही नवीनच माहिती (माझ्याकरता तरी) मिळाली. या भूल Happy देणेबाबत (शस्त्रक्रियांकरता दिली जाणारी भूल... ) अजून काही माहिती मिळाल्यास वाचायला आवडेलच...

अशोकराव, खुसखुशीत शैलीतील लेख आवडला. जणू दुसर्‍याच कोणाचे ऑपरेशन होणार आहे - अशा पद्धतीने जे तुम्ही लिहिलंय त्याकरता सलामच ....

मस्त लेख. (पटकन संपल्यासारखा वाटला.)

बर्‍याच वर्षांपूर्वी एका डॉक्टरांनी (बहुतेक डॉ. संजय ओक यांनी) एका स्तंभलेखात भूलतज्ज्ञांच्या कामाची चांगली ओळख करून दिली होती. तेंव्हा कळले की अरे, भूलतज्ज्ञ म्हणूनही कोणी एक घटक शस्त्रक्रियेत तितकाच महत्त्वाचा असतो.

अशोकजी सुस्वागतम ! हा माहितीप्रद तरीही हलक्याफुलक्या पद्धतीने लिहिलेला लेख लिहून तुम्ही त्या अपघातपर्वातून शरीर-मनाने बाहेर पडल्याचे सिद्ध केले आहे. हे सर्व यापुढे तुमच्या स्मृतीत अन लेखनवाचनातच राहो अशी मनापासून शुभेच्छा.
आजचा दिवस हा अॅनेस्थेशिया दिवस आहे हे तुमच्यामुळे कळले अन त्याच्याशी निगडीत अशा अनेक आठवणी जाग्या झाल्या.विशेषत: भूल दिल्याचे तुम्हाला कळले नसेल ते का असा विचार मनात आला. हल्ली मोठ्या शल्यक्रियेतही कण्यात इंजेक्शन देऊन भूल देतात. पूर्वी स्टेनलेसच्या सच्छिद्र वाटीवर क्लोरोफोर्म फवारून ती नाकावर दाबण्यात येत असे तेव्हा जाणीवेतून नेणिवेतला हा प्रवास अधिक मजेदारपणे होत होता Happy
कुणीतरी लिहिले आहे मानवजातीची वेदना कमी करणारा हा अॅनेस्थेशिया ज्या संशोधकांमुळे लाभला त्यांचे उपकार आपल्यावर कोणत्याही संत -प्रेषितापेक्षा कमी नाहीत. खरेच आहे ते. आज या लेखाच्या निमित्ताने त्या सर्व दु:खविमोचक संशोधक व भूलतज्ज्ञांना अभिवादन !

आभारी आहे मंडळी.....

.... आणि गजाननराव, तुमचे निरीक्षण अगदी बरोबर तसेच योग्यही. तसे पाहिले तर १६ आक्टोबर या तारखेशी लेखाची सांगड मला घालावी वाटले....आणि त्यानिमित्तानेच मला आलेल्या शस्त्रक्रियेचा अनुभवही. लेख मोठा नक्कीच केला असता, पण ज्यावेळी त्यावरील लेखन वाचले त्यावेळी त्याना पर्यायी शब्द काय द्यावेत याबद्दल गोंधळ तर झालाच शिवाय कुणाला विचारून त्याचा वापर करणेही बरे वाटले नाही. पण तुमची सूचना नक्की लक्षात ठेवतो. तसे पाहिले तर भूलतज्ज्ञ म्हणूनही कोणी एक घटक शस्त्रक्रियेत तितकाच महत्त्वाचा असतो ही बाब मला निश्चित्त माहीत होती, प्रत्यक्षात त्याची कधी गाठ पडेल हे स्वप्नातही आले नव्हते.

<<जाणीवेतून नेणिवेतला हा प्रवास अधिक मजेदारपणे होत होता<< सुंदर वाक्य भरतजी! Happy

<< ज्या डॉ.केळुसकरांनी मी तिथे पाहिले होते ते एक मिनिटही टेबलकडे आल्याचेही मी तितक्या वेळेत पाहिले नाही....<< मग भुल नक्की कशी दिली गेली???

बघ ना....आर्या.... माझे जे दुखणे आहे ते हेच की मला भूल दिलीच होती ती मग दिली कुठल्या वाघ्याने ? काही तरी जादुटोणा असणार त्या न्यूरोच्या दवाखान्यात.

प्रज्ञा..... अगं कसला खुसखुशीत !!! फार वैताग आला होता त्या महिन्यात तिथे पडून पडून.... बघेल तिकडे सारे मेंदूचेच पेशंट.... जो तो तिथे येतो....तो डोक्याला हात आणि पट्ट्या बांधूनच....एकदेखील साधासुधा नाहीच. मी पण त्यासाठीच होतो म्हणा.... गेला माझा मेंदू तिथे.

अशोकमामा, हेच ते! Happy पाईल्ससाठी मी इन्जेक्शन ट्रीटमेंट घेतली होती औरंगाबादेत.. कमलनयन बजाज हॉस्पीटलमधे. तेव्हा असच झालं होतं. अर्धवट बेशुद्ध की काय ते केले होते त्यांनी अगदी १५ मिंटाकरता.
म्हणजे ते आकडे वगैरे मोजायला सांगतात तसं काहीच नाही.

साधारण २रीत असतानाची गोष्ट, माझे अ‍ॅडेनॉईड्सचे (pharyngeal Tonsils) चे ऑपरेशन होते. काहीही पुर्वकल्पन न देता, सरळ नेले की ऑपरेशन थिएटरमध्ये.. त्या बेडवर पडून मी छ्तावर टांगलेल्या दिव्याकडे पहात होते, अचानक डॉक्टरचा मास्क लावलेला चेहरा समोर आला, त्यानी मला विचारलं, कविता म्हणून दाखवणार का? मी म्हणाले, ईंजेक्शन देणार नसाल तरच..ते म्हणाले तू सुरु तर कर.. मी सुरु केलं...'लव लव हिरवी, गार पालवी..काट्यांची मनमोहक जाळी...' टच्कन काहीतरी हाताला टोचले..आणि बू<<<<<<<<ग...झपप..अंधार..भूल देताना काही कळलं नाही, पण उतरताना कोण त्रास...

सगळ्याच प्रकारची भूल गूढच नाही का?? आता अशोक मामांचा लेख वाचता वाचता मला अशा अनेक भूली आठवल्या..आणि आठवली..'भूलीतली भूल शेवटली'...

Happy मस्त लेख हो अशोकमामा, पण तुम्ही कोणत्यातरी दुसर्‍या डॉकना विचारुन एकदा समजून घ्यायला हवं होतं, की तुम्हाला नेमकी केंव्हा आणि कुठल्या पद्धतीने भूल देण्यात आली.. आता तुमच्याप्रमाणेच हे आमच्यासाठीही एक न सुटलेले कोडे बनले आहे.

माबोवरील इतर डॉक्टरांनी तरी यावर प्रकाश टाकावा ही आशा आहे.

<<जाणीवेतून नेणिवेतला हा प्रवास अधिक मजेदारपणे होत होता<< सुंदर वाक्य भरतजी!>>> येस्स्स-- दक्स +१ Happy पण ते भरतजींचं वाक्य नसून भारतीताईचं आहे.. Happy

लेख आवडला.

ते आकडे मोजायला लावण्याची पद्धत जुनी झाली बहुदा किंवा जुन्या चित्रपटात राहिली बहुदा. हल्ली डॉ/ टेक्निशियन रुग्णाशी गप्पा मारत रहातात का काय असे वाटते! माझा इथला अनुभव असाच आहे.

तुम्हाला डॉ येऊन गेल्याचं समजलं नसेल कारण मुख्य डॉ अगदी इंजेक्षन देण्याची वेळ आली की येत असावेत. ऑपरेशन थिएटरमधील ड्रेस कोडमध्ये तुमच्या लक्षात आले नसावेत. असो. सगळे व्यवस्थित झाले हे बरे झाले.

त्यात जादू वगैरे काही नाही...इस्पितळात दाखल झाल्यावर शीरेतून इंजेक्शन देण्यासाठी जे काही सुईयुक्त टोपण (नेमका शब्द आठवत नाहीये आत्ता) हाताला लावले जाते ना त्यातूनच भुलीचे इंजेक्शन हळूहळू देतात अ‍ॅनास्थेशिऑलॉजिस्ट...ते तसं करतांना रूग्णाशी सुसंवाद साधत असतात...त्याची दोन कारणं संभवतात....१) रुग्णाच्या मनावरचं (विषय बदलून) शस्त्रक्रियेबद्दलच दडपण दूर करणं आणि २) रुग्णाला किती प्रमाणात भूल पडत चाललेय हे पाहण्यासाठी....जसे इथे अशोकरावांना त्यांच्या गाण्याच्या आवडीबद्दल...खास करून तलतच्या गाण्याबद्दल विचारलं गेलं.

देव काका त्याला ईंट्राकॅथ असं म्हणतात बहुतेक.

असो, मामा तुम्हाला कोणताही विषय द्यावा तुम्ही त्याचं सोनं कराल. आता भूल ही काय गोष्ट आहे का लेख लिहिण्याची? पण तुम्ही सुरेख शब्दात मांडलत सगळं, महत्व, दिनविशेष शिवाय त्याला स्वत:च्या अनुभवाची सुद्धा जोड दिलित.

त्या बेफींना कसं तरही का काय ते रचायला फक्त एक शब्द/ओळ बास होते... तसं आहे तुमचंही.

तुम्हाला पुढील प्रत्येक लिखाणासाठी शुभेच्छा!

<< हे सर्व यापुढे तुमच्या स्मृतीत अन लेखनवाचनातच राहो अशी मनापासून शुभेच्छा.>> +१००

प्रासंगिक लेखनाला स्वतःच्या अनुभवाची जोड आणि सोबत नर्मविनोदाची पखरण अशा प्रकारचे तुमचे लिखाण एखाया सदराच्या/ब्लॉगच्या रुपात वाचायला आवडेल.

Long long ago, once upon a time..

प्राचीन काळी सुश्रुताने मोतिबिंदूसाठी काऊचिंग व कापलेल्या नाकाची प्लास्टिक सर्जरी शोधून काढली. अन केली. (it was a true invention)

अमुक आजार का होतो. त्याच्या निराकरणासाठी हातात अमुक हत्यार घेउन तमुक केले तर बरे वाटू शकते, ही बुद्धीची झेप त्यांच्या काळी प्रचण्ड मोठी होती. आजही देशोदेशीचे सर्जन्स नतमस्तक होतात, इतकी. किंबहुना त्याही पलिकडे जाऊन तमुक क्रिया करण्यासाठी असे हत्यार हवे, ते डिझाईन केले. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता. हॅट्स ऑफ!

यानंतरचा मेडिसिनचा (वैद्यकाचा) इतिहास पाहिला, तर आयुर्वेदातल्या या दोन महत्वाच्या शल्यक्रिया सोडल्या, तर युद्धातील जखमांना टाके घालणे, पिकलेले गळू छेदणे, व शरीराबाहेर लोंबणारी अर्बुदे कापणे, इतपतच 'सर्जरी' अथवा शल्यकर्मे मर्यादित होती.

(अवांतरः अर्बुद = ट्युमर, गाठ. माझ्यामते कॉपीराईट गोळेकाका)

अ फास्ट सर्जन इज द बेस्ट सर्जन. अतीशय सफाईने अन त्वरेने शस्त्र चालवून काम करील तो सर्जन सर्वोत्तम अशी आजही समजूत आहे, ती 'त्या' काळापासूनची आहे. कारण, त्या काळी पेशंटला भूल दिलेली नसे. अगदीच अँप्युटेशन वगैरे करायची वेळ आली तर ४-६ दांडगे लोक पेशंटला पकडून धरीत, व फारच झाले तर त्या रुग्णाला धोत्र्याचा काढा, किंवा अफू खिलवलेली असे, अथवा भरपूर दारू पाजून झिंगवलेला असे...

इथून पुढे कधीतरी कोकेनमुळे येणारी बधीरता. तिथून झायलोकेन. अन पुढची प्रगती झाली, अ‍ॅनास्थेशिआ शास्त्राचा उगम झाला, व प्रगतीही झाली. याच्या सोबत, अन सोबतच सर्जरीही वाढली.

पेशंट शांतपणे झोपलेला असल्याशिवाय मी नवे ऑपरेशन करायचा विचारही करू शकत नाही. अ‍ॅनास्थेशिआ शिवाय सर्जरीची प्रगतीच नव्हे, सर्जरीच फारशी नाही.

सव्वा तास वयापासून सव्वाशे वर्षे वयापर्यंतच्या नाजुक पेशंटवर, घशातच सिताफळाची बी गिळलेल्या मुलावर, स्पंदणार्‍या हृदयावर, उघड्या मेंदूवर, फाटलेल्या पोटावर, पोटतल्याच बाळावार.. अनेकानेक आजारांवर आम्ही सर्जन्स जेव्हा सुर्‍या कात्र्या घेऊन हल्ला करायचा विचार करतो, तेव्हा या सर्जनला ओ.आर. उर्फ ऑपरेशन रूममधे प्रवेशच द्यायचा की नाही, याचाच निर्णय या भूलतज्ज्ञाच्या हाती असतो.

हे खरे ओ.आर.चे इन चार्ज!

झोप व मृत्यू यांच्या मधली जागा तो अ‍ॅनास्थेशिआ.

ती भूल..

तिथे नेऊन, पुढची पायरी उतरून / चढून मृत्यूपर्यंत पोहोचू न देता अन एक पायरी वरच ठेवून तुम्हाला वेदनांनी तळमळू न देता तुमचे वेदनादायी आजार कापून टाकायला आमच्यासारख्या सर्जन्सना जे 'मोकळे रान' देतात, ते भूलतज्ञ!

पेशंटचा अन यांचा डायरेक्ट संबंध भारतात फारसा येत नाही.

यांना अ‍ॅनास्थेटीस्ट म्हणत नाहीत. (ही टेक्निशियन साठीची टर्म आहे) हे आहेत अ‍ॅनास्थेशिऑलॉजिस्ट. हे डी.ए. वा एमडी असतात. त्यांच्या विषयातले त्रिपदवीधर.

असो. लिहावे तितके थोडे.

या माझ्या सगळ्या अ‍ॅनास्थेशिऑलॉजिस्ट मित्र मैतरणींना अ‍ॅनास्थेशिआ डे च्या शुभेच्छा!

पाटील सर,
अ‍ॅनास्थेशिआ डे चे योग्य निमित्त शोधून लिहिलेल्या लेखावर मोठा पर्तिसाद लिवलाय. गोड माणून घ्या हेनवि.

छान समयोचित लेख.
इब्लिस, तुमचा सोप्या साध्या भाषेतला माहितीपूर्ण प्रतिसादही भूल पाडणारा आहे अगदी Happy

असे हत्यार हवे, ते डिझाईन केले. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता. हॅट्स ऑफ!>>> +१ इब्लिसराव मस्त प्रतिसाद Happy

Pages